तुम्हाला माहीत होतं का?
बायबल काळातल्या कारभाऱ्याची काय भूमिका होती?
बायबल काळात एक कारभारी एखाद्या व्यक्तीच्या घरातलं काम पाहायचा किंवा तिच्या मालमत्तेची देखरेख करायचा. ज्या हिब्रू आणि ग्रीक शब्दांचं भाषांतर “कारभारी” असं करण्यात आलं आहे त्याचा अर्थ देखरेख करणारा किंवा घराची व्यवस्था पाहणारा असा होतो.
कुलपिता याकोबचा मुलगा योसेफ इजिप्तच्या गुलामगिरीत होता. त्या वेळी एका इजिप्तच्या माणसाने त्याला आपल्या घराचा कारभारी म्हणून नेमलं. खरंतर त्याच्या मालकाने “आपले सर्व काही योसेफाच्या हवाली केले होते.” (उत्प. ३९:२-६) नंतर स्वतः योसेफ जेव्हा इजिप्तचा एक शक्तिशाली शासक बनला तेव्हा त्यानेही त्याच्या घरावर देखरेख करण्यासाठी कारभाऱ्याला नियुक्त केलं.—उत्प. ४४:४.
येशूच्या काळात, जमीनदार बऱ्याचदा त्यांच्या शेतीपासून दूर शहरांमध्ये राहायचे. शेतीमध्ये काम करणाऱ्या मजुरांच्या दररोजच्या कामाची देखरेख करण्यासाठी जमीनदार कारभाऱ्यांना नेमायचे.
कारभाऱ्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी कोणाला नेमलं जायचं? पहिल्या शतकातला रोमी लेखक कॉलुमॅला याच्यानुसार एक देखरेख करणारा किंवा कारभारी असा असला पाहिजे जो “त्याचं काम अगदी चांगल्या प्रकारे करायला शिकला असेल आणि त्याच्या कामात खूप अनुभवी असेल.” कामगार व्यवस्थित काम करत आहेत की नाही याची त्याने खातरी करून घेतली पाहिजे. तसंच, त्याने त्यांच्यासोबत क्रूरतेने वागू नये.” त्याने पुढे असंही म्हटलं की “सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका कारभाऱ्याने कधी असा विचार करू नये की त्याला सर्व गोष्टी माहीत आहेत. पण त्याने नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी नेहमी तयार असलं पाहिजे.”
ख्रिस्ती मंडळीत होणाऱ्या काही कार्यांचं वर्णन करण्यासाठी देवाच्या वचनात एका कारभाऱ्याच्या उदाहरणाचा वापर केला आहे. उदाहरणार्थ, प्रेषित पेत्रने ख्रिश्चनांना प्रोत्साहन दिलं की त्यांनी देवाकडून मिळालेल्या क्षमतांचा वापर करावा. त्याने असं म्हटलं की “चांगले कारभारी या नात्याने, प्रत्येकाला . . . कृपादान मिळाले आहे, त्यानुसार त्याने ते इतरांच्या सेवेसाठी उपयोगात आणावे.”—१ पेत्र ४:१०.
लूक १६:१-८ या वचनांत येशूने स्वतः कारभाऱ्याच्या उदाहरणाचा वापर केला. त्यासोबतच, येशूचं राजा म्हणून उपस्थितीचं चिन्ह याबद्दलच्या भविष्यवाणीत त्याने त्याच्या शिष्यांना खातरी करून दिली की तो “विश्वासू आणि बुद्धिमान दास” व “विश्वासू कारभारी” यांना नियुक्त करेल. शेवटच्या दिवसांत ख्रिस्ताच्या शिष्यांना नियमितपणे आध्यात्मिक अन्न मिळावं ही कारभाऱ्याची महत्त्वाची जबाबदारी असणार होती. (मत्त. २४:४५-४७; लूक १२:४२) खरंच, आपण या गोष्टीसाठी खूप आभारी आहोत की विश्वासू कारभारी आपल्याला आणि सर्व जगातल्या लोकांना विश्वास मजबूत करणारे प्रकाशनं उपलब्ध करून देतो!