आपल्या उत्तरांद्वारे एकमेकांची उभारणी करा
१ इब्री लोकांस पत्र १०:२४ आपल्याला सल्ला देते की, ‘प्रीती आणि सत्कर्मे करावयास एकमेकांना उत्तेजन द्या.’ असे करण्याचा एक मार्ग म्हणजे आपल्या सभांमध्ये अर्थपूर्ण उत्तरे देणे. पण आपण उत्तरे का दिली पाहिजेत? आपली उत्तरे कशी असावीत? आपल्या उत्तरांमुळे कोणा-कोणाला फायदा होतो?
२ विचार करा; कितीतरी वेळा इतरांनी दिलेल्या साध्यासोप्या, सुस्पष्ट उत्तरांमुळे एखादा मुद्दा तुम्हाला आणखीन चांगला समजला असेल, आध्यात्मिकरित्या तुम्ही मजबूत झाला असाल. हाच फायदा इतरांना मिळवून देण्याची सुसंधी तुम्हालाही आहे. सभांमध्ये तुम्ही उत्तरे देता तेव्हा खरेतर तुम्ही हे दाखवून देत असता, की उपस्थित असलेल्या सगळ्यांना उत्तेजन देण्यासाठी ‘काही आध्यात्मिक कृपादान देण्याची’ तुमची देखील इच्छा आहे.—रोम. १:११, १२.
३ चांगली उत्तरे म्हणजे काय? उत्तरे देताना परिच्छेदात असलेला प्रत्येक मुद्दा सांगून लांबलचक उत्तरे देऊ नका. लांबलचक उत्तरे दिल्यामुळे खास मुद्दा कोणता होता हे स्पष्ट होत नाही. शिवाय, सगळे मुद्दे तुम्हीच सांगितले तर इतरांना कदाचित हात वर करावासाच वाटणार नाही. एखाद्या परिच्छेदावर प्रश्न विचारल्यानंतर पहिले उत्तर अगदी लहानसेच आणि विचारलेल्या प्रश्नाचे अगदी नेमके उत्तरे असावे. त्यानंतर मग, दिलेल्या माहितीचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे किंवा परिच्छेदात दिलेल्या शास्त्रवचनांचा उत्तराशी काय संबंध आहे यांवर आणखीन उत्तरे दिली जाऊ शकतात. स्कूल गाईडबुक पृष्ठे ९०-२.
४ सभांमध्ये उत्तरे द्यायला तुम्हाला भीती वाटते का? असे असेल तर आधीपासून एखाद्या परिच्छेदावर लहानसे उत्तर तयार करा आणि याविषयी अभ्यास घेणाऱ्या बांधवाला आधीच सांगून ठेवा म्हणजे त्या प्रश्नाचे उत्तर तो बरोबर तुम्हालाच विचारेल. दोनचार वेळा असे केल्यावर सभांमध्ये उत्तरे देणे तुम्हाला अगदी सोपे होऊन जाईल. मोशे आणि यिर्मया या दोघांची आठवण करा; चार लोकांत आपण आत्मविश्वासाने बोलूच शकणार नाही असे त्यांना वाटत होते. (निर्ग. ४:१०; यिर्म. १:६, तळटीप, NW) पण आपल्या वतीने बोलण्यासाठी यहोवाने त्यांना मदत केली; तर मग तो नक्कीच तुम्हाला देखील मदत करील.
५ तुमच्या उत्तरांमुळे कोणा-कोणाला फायदा होतो? एक तर तुम्हाला स्वतःला, कारण उत्तरे दिल्याने सत्याची मुळे तुमच्या मनात आणखीन खोलपर्यंत रुजतात; आणि पुढे मागे ही माहिती पुन्हा आठवण्यास तुम्हाला सोपे जाते. शिवाय, तुमच्या उभारणीकारक उत्तरांमुळे इतरांना देखील फायदा होतो. मंडळीतले सगळेच जण—मग ते अनुभवी असोत, तरुण असोत, बुजरे असोत किंवा अगदीच नवीन असोत—सभांमध्ये आपापला विश्वास शब्दांत व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा सगळ्यांनाच उत्तेजन मिळते.
६ वरील गोष्टी लक्षात ठेवल्यास, सभांमध्ये एकमेकांची उभारणी करण्यासाठी ‘समयोचित बोल किती उत्तम असतात’ याची खात्री आपल्याला पटेल.—नीति. १५:२३.