खरे ख्रिस्ती ऐक्य—कसे?
१ दोनशेचौतीस राष्ट्रांतील आणि सुमारे ३८० भाषांच्या गटांच्या ६० लाखांपेक्षा अधिक लोकांमध्ये ऐक्य कसे साध्य झाले असावे? केवळ यहोवा देवाच्या उपासनेमुळे त्यांच्यामध्ये ऐक्य आहे. (मीखा २:१२; ४:१-३) यहोवाचे साक्षीदार आपल्या अनुभवावरून सांगतील की खरे ख्रिस्ती ऐक्य आज एक वास्तविकता आहे. ‘एका मेंढपाळाच्या’ निगराणीखाली “एक कळप” या नात्याने, या जगाच्या विभाजक आत्म्याचा प्रतिकार करण्याचा आपला दृढनिश्चय आहे.—योहा. १०:१६; इफिस. २:२.
२ सर्व बुद्धिमान सजीव प्राण्यांनी एकजुटीने खरी उपासना करावी हा देवाचा सुरवातीपासूनच उद्देश होता. (प्रकटी. ५:१३) याचे महत्त्व माहीत असल्यामुळे येशूने आपल्या अनुयायांमध्ये ऐक्य राहावे म्हणून कळकळीने प्रार्थना केली. (योहा. १७:२०, २१) आपल्यातील प्रत्येक जण ख्रिस्ती मंडळीच्या ऐक्याला बढावा देण्यासाठी हातभार कसा लावू शकतो?
३ ऐक्य कसे साध्य होते: देवाचे वचन आणि देवाचा आत्मा यांच्याविना ख्रिस्ती ऐक्य साध्य करणे अशक्य आहे. आपण बायबलमध्ये जे वाचतो त्याचा अवलंब केल्याने देवाचा आत्मा आपल्या जीवनात अखंड राहतो. यामुळे आपल्याला “आत्म्याच्याद्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखावयास” मदत होते. (इफिस. ४:३) शिवाय आपण एकमेकांचे प्रेमाने सहन करण्यास प्रवृत्त होतो. (कलस्सै. ३:१३, १४; १ पेत्र ४:८) तुम्ही दररोज देवाच्या वचनावर मनन करून ऐक्याला बढावा देत आहात का?
४ प्रचार करण्याच्या व शिष्य बनवण्याच्या आपल्या कामगिरीमुळेसुद्धा आपल्यामध्ये एकता येते. आपण ख्रिस्ती सेवेमध्ये इतरांबरोबर काम करतो, “सुवार्तेच्या विश्वासासाठी एकत्र लढत” राहतो तेव्हा आपण ‘सत्यामध्ये एकमेकांचे सहकारी होतो.’ (फिलिप्पै. १:२७; ३ योहा. ८) असे करत असताना मंडळीतील एकतेचे प्रेमळ बंधन आणखी मजबूत होते. तुम्ही अलीकडे ज्याच्याबरोबर काम केले नाही अशा एखाद्या बांधवाला अथवा बहिणाला या आठवडी आपल्यासोबत क्षेत्र सेवा करायला बोलावण्यात काय हरकत आहे?
५ आज पृथ्वीवर असलेल्या एकमात्र खऱ्या बंधूसमाजाचा एक भाग असण्याचा सुहक्क आपल्याला मिळाला आहे! (१ पेत्र ५:९) अलीकडेच, हजारोंनी “देवाचे गौरव करा” या आंतरराष्ट्रीय अधिवेशनांमध्ये या विश्वव्यापी एकतेचा स्वतः अनुभव घेतला. तेव्हा, देवाचे वचन दररोज वाचण्याद्वारे, आपसांतील मतभेद प्रेमाने सोडवण्याद्वारे आणि “एकमताने” सुवार्तेचा प्रचार करण्याद्वारे या बहुमोल एकतेला आपण सर्व हातभार लावू या.—रोम. १५:५.