अभ्यास लेख २४
तुम्ही तुमची आध्यात्मिक ध्येयं पूर्ण करू शकता
“आपण हिंमत हारून चांगलं ते करत राहायचं सोडू नये. कारण जर आपण खचून गेलो नाही, तर योग्य वेळी आपल्या पदरी पीक पडेल.”—गलती. ६:९.
गीत ८४ याहाच्या सेवेत सर्वस्व देऊ या
सारांशa
१. आध्यात्मिक ध्येय गाठण्याच्या बाबतीत बऱ्याच जणांना कोणता अनुभव आला आहे?
तुम्ही एखादं आध्यात्मिक ध्येय ठेवलं पण तुम्हाला ते पूर्ण करता आलं नाही, असं कधी तुमच्या बाबतीत घडलंय का?b तसं असेल तर निराश होऊ नका. बऱ्याच जणांच्या बाबतीत असं झालंय. उदाहरणार्थ, फिलिप नावाच्या एका भावाला असं वाटायचं, की आपण आणखी चांगल्या प्रकारे आणि जास्त प्रार्थना केली पाहिजे. पण त्यासाठी वेळ काढणं त्याला मुश्कील जायचं. एरिका नावाच्या बहिणीने ठरवलं होतं, की क्षेत्रसेवेच्या प्रत्येक सभेला आपण वेळेवर हजर राहायचं. पण तसं झालं नाही. प्रत्येक सभेला ती उशीराच पोचायची. तोमाशनेसुद्धा बऱ्याचदा संपूर्ण बायबल वाचून काढायचा प्रयत्न केला. तो म्हणतो: “बायबल वाचायला मला मुळीच आवडलं नाही. मी तीन वेळा प्रयत्न केला पण जेमतेम लेवीय पुस्तकापर्यंतच पोचलो.”
२. एखादं ध्येयं तुम्ही गाठलं नसेल तर निराश व्हायची गरज का नाही?
२ तुम्ही जर एखादं ध्येय ठेवलं असेल आणि ते अजून गाठलं नसेल, तर निराश होऊ नका. कारण एखादं छोटंसं ध्येय गाठण्यासाठीसुद्धा वेळ आणि मेहनत लागते. पण तुम्हाला तुमचं ध्येय गाठायची अजूनही इच्छा आहे यावरून दिसून येतं, की यहोवासोबतचं नातं तुमच्यासाठी खूप मोलाचं आहे आणि तुम्हाला त्याची चांगल्या प्रकारे सेवा करायची इच्छा आहे. तुमच्या या मेहनतीची यहोवा मनापासून कदर करतो. पण तुम्हाला जे जमणार नाही, त्याची अपेक्षा तो कधीच तुमच्याकडून करणार नाही. (स्तो. १०३:१४; मीखा ६:८) त्यामुळे तुम्ही जेव्हा एखादं ध्येय ठेवाल, तेव्हा असं ध्येय ठेवा जे तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला गाठता येईल. तर मग एखादं ध्येय गाठण्यासाठी तुम्ही काय करू शकता? चला काही सल्ल्यांवर विचार करू या.
प्रेरणा मिळणं महत्त्वाचं आहे
आणखी प्रेरणा मिळावी म्हणून प्रार्थना करा (परिच्छेद ३-४ पाहा)
३. प्रेरणा मिळणं महत्त्वाचं का आहे?
३ आध्यात्मिक ध्येय गाठण्यासाठी प्रेरणा खूप महत्त्वाची आहे. प्रेरणा मिळाल्यामुळे एखाद्या व्यक्तीला आपलं ध्येय गाठायचं प्रोत्साहन मिळतं किंवा ते मिळवण्याची जबरदस्त इच्छा त्याच्यामध्ये निर्माण होते. प्रेरणेची तुलना शिडाच्या बोटीला पुढे ढकलणाऱ्या वाऱ्याशी केली जाऊ शकते. वारा सतत वाहत राहिला तर बोट चालवणाऱ्या व्यक्तीला जिथे जायचं आहे, तिथे तो पोहचू शकतो. आणि वारा जर जोरदार असेल, तर तो आणखी लवकर त्या ठिकाणी पोहचू शकतो. अगदी तसंच, आपल्याला जर प्रेरणा मिळाली, तर आपण आपल्या ध्येयापर्यंत सहज पोहचू शकतो. एल साल्व्हाडोर या देशात राहणारा एक भाऊ म्हणतो: “तुम्हाला प्रेरणा मिळते तेव्हा तुम्ही जास्त मेहनत करायला तयार असता. मार्गात कितीही अडथळे आले, तरी तुम्ही तुमचं ध्येय गाठता.” तर मग, प्रेरणा मिळावी म्हणून तुम्ही काय करू शकता?
४. आपण कोणत्या गोष्टीसाठी प्रार्थना करू शकतो? (फिलिप्पैकर २:१३) (चित्रसुद्धा पाहा.)
४ प्रेरणा मिळण्यासाठी प्रार्थना करा. तुमचं ध्येय गाठण्यासाठी यहोवा त्याच्या पवित्र शक्तीद्वारे तुम्हाला प्रेरणा देऊ शकतो. (फिलिप्पैकर २:१३ वाचा.) आपलं काहीतरी ध्येय असलं पाहिजे किंवा ध्येय ठवणं ही एक चांगली गोष्ट आहे, हे माहीत असल्यामुळे काही वेळा आपण ध्येय ठेवतो. पण ते गाठायची इच्छा कदाचित आपल्यात नसेल. युगांडामध्ये राहणाऱ्या नॉरिना नावाच्या एका बहिणीच्या बाबतीतही असंच होतं. तिने एक बायबल अभ्यास चालवण्याचं ध्येय ठेवलं होतं. पण ते ध्येय साध्य करायची तिची फारशी इच्छा होत नव्हती. कारण आपण चांगलं शिकवू शकत नाही, असं तिला वाटत होतं. मग कोणत्या गोष्टीमुळे तिला मदत झाली? ती म्हणते: “बायबल अभ्यास चालवायची माझी आणखी इच्छा व्हावी म्हणून मी दररोज यहोवाला प्रार्थना करू लागले. आणि प्रार्थनेसोबतच माझी शिकवण्याची कौशल्यंही मी सुधारू लागले. काही महिन्यांनंतर माझ्या लक्षात आलं, की बायबल अभ्यास चालवायची माझी इच्छा बऱ्यापैकी वाढली आहे. आणि त्याच वर्षी मी दोन बायबल अभ्यास चालवू लागले.”
५. आपलं ध्येय गाठायची प्रेरणा मिळण्यासाठी आपण कशावर मनन करू शकतो?
५ यहोवाने तुमच्यासाठी जे केलंय त्यावर मनन करा. (स्तो. १४३:५) यहोवाने आपल्याला जी अपार कृपा दाखवली, त्यावर प्रेषित पौलने मनन केलं आणि त्यामुळे यहोवासाठी खूप काही करायची प्रेरणा त्याच्यामध्ये निर्माण झाली. (१ करिंथ. १५:९, १०; १ तीम. १:१२-१४) अगदी तसंच, यहोवाने तुमच्यासाठी जे केलंय, त्यावर तुम्ही जितकं जास्त मनन कराल, तितकी जास्त तुम्हाला तुमचं ध्येय गाठायची प्रेरणा मिळेल. (स्तो. ११६:१२) होन्डुरासमध्ये राहणाऱ्या एका बहिणीला पायनियर बनण्याचं आपलं ध्येय गाठायला कशामुळे मदत झाली त्याकडे लक्ष द्या. ती म्हणते: “यहोवा माझ्यावर किती प्रेम करतो, यावर मी खोलवर विचार केला. त्याने मला त्याच्या लोकांकडे आणलं. तो माझी काळजी घेतो. माझं संरक्षण करतो. अशा सगळ्या गोष्टींवर मनन केल्यामुळे त्याच्यावरचं माझं प्रेम वाढलं आणि पायनियरींग सुरू करण्याची मला जास्त प्रेरणा मिळाली.”
६. आणखी कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला आपलं ध्येय गाठायची प्रेरणा मिळू शकते?
६ ध्येय पूर्ण केल्यामुळे किती फायदे होतात यावर विचार करा. एरिका नावाच्या ज्या बहिणीबद्दल आपण आधी पाहिलं होतं, तिला क्षेत्रसेवेच्या सभेला वेळेवर पोचण्यासाठी कोणत्या गोष्टीने मदत केली त्याकडे लक्ष द्या. ती म्हणते: “माझ्या लक्षात आलं, की सेवेला उशीरा गेल्यामुळे कितीतरी गोष्टींचा आनंद मी घेऊ शकत नव्हते. पण तेच जर मी लवकर गेले, तर मला भाऊबहिणींना भेटता येणार होतं. त्यांच्यासोबत वेळ घालवता येणार होता. इतकंच नाही तर सेवाकार्यातलं आपलं कौशल्य वाढवण्यासाठी आणि सेवाकार्याचा आनंद घेण्यासाठी ज्या चांगल्या-चांगल्या गोष्टी शिकवल्या जातात, त्यासुद्धा मला ऐकायला मिळणार होत्या.” अशा प्रकारे वेळेवर पोचण्याचे किती फायदे आहेत, यावर एरिकाने विचार केला आणि त्यामुळे तिला तिचं ध्येय गाठता आलं. तुम्हाला जर एखादं ध्येय गाठायचं असेल तर तुम्ही कोणत्या फायद्यांचा विचार करू शकता? तुम्ही जर बायबल वाचायचं किंवा प्रार्थना करण्याचं ध्येय ठेवलं असेल, तर हे ध्येय गाठल्यामुळे यहोवासोबतचं तुमचं नातं किती मजबूत होईल यावर विचार करा. (स्तो. १४५:१८, १९) तुम्ही एखादा ख्रिस्ती गुण वाढवण्याचं ध्येय ठेवलं असेल, तर त्यामुळे इतरांसोबतचे तुमचे नातेसंबंध किती चांगले होतील, यावर विचार करा. (कलस्सै. ३:१४) तर एखादं ध्येय गाठल्यामुळे कोणकोणते फायदे होतील, हे लिहून काढा. आणि वेळोवेळी ते पाहत राहा. आधी ज्याचा उल्लेख केला होता तो तोमाश म्हणतो: “एखादं ध्येय गाठल्यामुळे किती फायदे होतील, हे जेव्हा माझ्या लक्षात येतं तेव्हा ते ध्येय गाठण्यासाठी मी आणखी मेहनत घ्यायला तयार असतो.”
७. जुलिओ आणि त्याच्या पत्नीला आपलं ध्येय गाठायला कशामुळे मदत झाली?
७ तुम्हाला प्रोत्साहन देतील अशांसोबत वेळ घालवा. (नीति. १३:२०) जुलिओ आणि त्याच्या पत्नीने आपलं सेवाकार्य वाढवायचं ध्येय ठेवलं होतं. हे ध्येय गाठण्यासाठी कोणत्या गोष्टीने त्यांना मदत केली त्याकडे लक्ष द्या. जुलिओ म्हणतो: “आम्ही असेच मित्र निवडले जे आम्हाला आमचं ध्येय गाठायला मदत करतील. आम्ही त्यांच्यासोबत आमच्या ध्येयांविषयी बोलायचो. त्यांच्यापैकी कित्येकांनी अशीच ध्येयं ठेवली होती आणि ती पूर्णही केली होती. त्यामुळे ते आम्हाला उपयुक्त सल्ले देऊ शकले. आम्ही जे ठरवलंय ते आम्हाला जमतंय का, याबद्दल ते आमची विचारपूस करायचे आणि गरज असेल तेव्हा प्रोत्साहनही द्यायचे.”
ध्येय गाठायची प्रेरणा नसते तेव्हा . . .
ध्येयापर्यंत पोचण्यासाठी मेहनत घ्या (परिच्छेद ८ पाहा)
८. प्रेरणा असेल तेव्हाच फक्त जर आपलं ध्येय गाठायचा प्रयत्न केला तर काय होऊ शकतं? (चित्रसुद्धा पाहा.)
८ खरं पाहिलं तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही दिवस असतात, जेव्हा आपल्याला काहीच करायची इच्छा किंवा प्रेरणा नसते. मग याचा अर्थ आपलं ध्येय गाठण्यासाठी आपण काहीच करू शकत नाही असा होतो का? नाही. हे समजण्यासाठी एक उदाहरण घेऊ या. शीडाची बोट पुढे जाण्यासाठी वाऱ्याचा प्रवाह जोरदार असणं खूप महत्त्वाचं आहे. पण वाऱ्याचा प्रवाह नेहमीच जोरदार असेल असं नाही. काही-काही वेळा तर अजिबातच वारा नसतो. मग याचा अर्थ, खलाशी ठरलेल्या ठिकाणी पोहचूच शकत नाही का? नाही, असं नाही. काही बोटींना मोटर असते तर काहींना वल्हे असतात. यांचा उपयोग करून खलाशी आपल्या ठरलेल्या ठिकाणी नक्कीच पोहचू शकतो. प्रेरणासुद्धा वाऱ्यासारखीच आहे. काही दिवशी आपल्याला खूप प्रेरणा असेल, तर काही वेळा आपल्याला काहीच करावंसं वाटणार नाही. पण प्रेरणा असेल तेव्हाच आपण आपलं ध्येय गाठायचा प्रयत्न केला तर आपण कदाचित त्यापर्यंत कधीच पोहोचणार नाही. पण खलाशी जसं आपल्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी वेगवेगळे मार्ग वापरतो, अगदी तसंच आपणसुद्धा आपल्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांनी मेहनत घेऊ शकतो. हे करणं कदाचित तितकं सोपं नसेल, पण त्याचे फायदे भरपूर आहेत. आपल्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी आपण काय करू शकतो, हे पाहण्याआधी आपण एका प्रश्नावर चर्चा करू या.
९. एखादं ध्येय गाठण्याची इच्छा होत नसतानाही, त्यासाठी प्रयत्न करत राहणं चुकीचं आहे का? समजावून सांगा.
९ आपण आनंदाने आणि स्वखुशीने यहोवाची उपासना करावी अशी त्याची इच्छा आहे. (स्तो. १००:२; २ करिंथ. ९:७) मग प्रश्न आहे, की एखादं आध्यात्मिक ध्येय गाठायची आपल्याला इच्छाच होत नसेल तरीसुद्धा आपण त्याच्यासाठी मेहनत करत राहावी का? प्रेषित पौलचंच उदाहरण घ्या. तो म्हणाला: “मी आपल्या शरीराला कठोरपणे शिस्त लावतो आणि त्याला दास करून ठेवतो.” (१ करिंथ. ९:२५-२७) योग्य ते करायची इच्छा नसतानाही पौलने स्वतःला ते करण्यासाठी भाग पाडलं. मग यहोवाने पौलची सेवा स्वीकारली का? नक्कीच! आणि त्याने केलेल्या प्रयत्नांचं त्याला प्रतिफळही दिलं.—२ तीम. ४:७, ८.
१०. इच्छा नसतानाही आपण आपलं ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करत राहतो, तेव्हा काय फायदे होतात?
१० पौलसारखंच आपणही इच्छा नसताना आपलं ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करत राहतो, तेव्हा यहोवा खूश होतो. कारण ती गोष्ट करायला आपल्याला आवडत नसलं तरी त्याच्यावरच्या प्रेमापोटी आपण ती गोष्ट करतो, हे त्याला माहीत आहे. आणि त्याने जसं पौलच्या प्रयत्नांवर आशीर्वाद दिले, तसं तो आपल्या प्रयत्नांवरही आशीर्वाद देईल. (स्तो. १२६:५) आणि यहोवा कशा प्रकारे आपल्याला आशीर्वाद देतो, हे पाहून आपलं ध्येय गाठायची आपल्याला प्रेरणा मिळते. पोलंडमध्ये राहणारी लुसीना नावाची बहीण म्हणते: “कधी-कधी क्षेत्रसेवेत जायची माझी इच्छाच होत नाही. खासकरून मी थकलेले असते, तेव्हा तर अजिबातच नाही. पण असं असतानाही मी सेवेला जाते तेव्हा जो आनंद मिळतो त्यासारखा दुसरा आनंद नाही.” पण आपलं ध्येय गाठायची आपल्याला प्रेरणाचं नसते तेव्हा आपण काय करू शकतो, ते आता आपण पाहू या.
११. आपलं ध्येय गाठण्यासाठी यहोवा आपल्याला कशी मदत करू शकतो?
११ पवित्र शक्तीसाठी प्रार्थना करा. एखादं ध्येयं गाठणं आपल्याला कठीण वाटत असेल किंवा ते गाठण्याची आपल्याला आतून प्रेरणाच मिळत नसेल तर आपण यहोवाकडे पवित्र शक्तीसाठी प्रार्थना करू शकतो. आपलं ध्येयं गाठण्यासाठी ज्या गुणांची गरज आहे ते गुण स्वतःमध्ये वाढवण्यासाठी पवित्र शक्ती आपल्याला मदत करू शकते. त्यामुळे स्वतःमध्ये पवित्र शक्तीचे फळ उत्पन्न करण्यासाठी यहोवाकडे पवित्र शक्तीसाठी प्रार्थना करा. (लूक ११:१३; गलती. ५:२२, २३) आधी उल्लेख केलेला डेवीड वैयक्तिक अभ्यास करायचा. पण त्याला तो आणखी नियमितपणे करायची इच्छा होती. त्यामुळे त्याने पवित्र शक्तीसाठी यहोवाला प्रार्थना केली. मग प्रार्थनेमुळे त्याला कशी मदत झाली? त्याबद्दल तो म्हणतो: “यहोवाच्या मदतीने मी अभ्यासाची एक चांगली योजना बनवू शकलो आणि त्यामुळे मला नियमितपणे अभ्यास करत राहणं शक्य झालं.”
१२. उपदेशक ११:४ हे वचन आपल्याला आध्यात्मिक ध्येयं गाठायला कशी मदत करतं?
१२ सगळं काही ठीक झाल्यावर सुरुवात करू असा कधीच विचार करू नका. या जगात तरी सगळं काही ठीक होण्याची अपेक्षा आपण करू शकत नाही. परिस्थिती ठीक होण्याची आपण वाट पाहत राहिलो तर आपण आपलं ध्येय कधीच गाठू शकणार नाही. (उपदेशक ११:४ वाचा.) डेनियेल नावाचा एक भाऊ म्हणतो: “परिस्थिती पूर्णपणे चांगली कधीच असू शकत नाही. त्यामुळे परिस्थिती चांगली होण्याची वाट पाहण्याऐवजी सुरुवात करणं केव्हाही चांगलं.” ध्येय गाठण्याच्या बाबतीत आपण टाळाटाळ का करू नये याचं आणखी एक कारण युगांडामध्ये राहणारा पॉल नावाचा एक भाऊ सांगतो. तो म्हणतो: “परिस्थिती बरोबर नसतानाही आपण सुरुवात करतो, तेव्हा आपल्याला आशीर्वाद द्यायची संधी आपण यहोवाला देत असतो.”—मला. ३:१०.
१३. छोट्या-छोट्या ध्येयांपासून सुरुवात करण्याचे फायदे काय आहेत?
१३ छोटी-छोटी ध्येयं ठेवून सुरुवात करा. एखादं ध्येयं गाठणं कठीण वाटत असल्यामुळे ते पूर्ण करण्याची इच्छाच कदाचित आपल्याला होत नसेल. तुमच्या बाबतीतही असंच होत असेल तर तुम्ही सुरुवातीला छोटी-छोटी ध्येयं ठेवू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही जर स्वतःमध्ये एखादा गुण वाढवायचं ध्येय ठेवलं असेल, तर सुरुवातील छोट्या-छोट्या गोष्टींमधून तुम्ही तो दाखवायचा प्रयत्न करू शकता का? तुम्ही जर पूर्ण बायबल वाचून काढायचं ध्येय ठेवलं असेल, तर सुरुवातीला तुम्ही त्यासाठी थोडा-थोडा वेळ काढू शकता का? या लेखाच्या सुरुवातीला तोमाश नावाच्या ज्या भावाचं आपण उदाहरण पाहिल होतं, त्याने एका वर्षात संपूर्ण बायबल वाचून काढायचं ध्येय ठेवलं होतं. पण त्याला ते करणं खूप कठीण वाटत होतं. तो म्हणतो: “माझ्या लक्षात आलं की मी खूपच भरभर बायबल वाचतोय. त्यामुळे मी पुन्हा सुरुवात करायचं ठरवलं. पण या वेळी दररोज बायबलचा थोडा-थोडा भाग वाचायचा आणि त्यावर मनन करायचं असं मी ठरवलं. त्यामुळे मला बायबल वाचायला आवडू लागलं.” आवड वाढत गेल्यामुळे तो जास्त वेळ बायबल वाचू लागला आणि शेवटी तोमाशने संपूर्ण बायबल एका वर्षात वाचून काढलं.c
अडथळे आले तरी निराश होऊ नका
१४. कोणत्या काही अडथळ्यांमुळे आपल्याला आपलं ध्येय गाठणं कठीण जाऊ शकतं?
१४ आपलं ध्येय गाठायची आपल्याला कितीही प्रेरणा मिळत असली किंवा आपण स्वतःला कितीही शिस्त लावली तरी काही ना काही अडथळे येण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, एखादी “अनपेक्षित घटना” घडल्यामुळे आपलं ध्येय गाठण्यासाठी आपल्याला पुरेसा वेळ आणि लक्ष देता येणार नाही. (उप. ९:११) किंवा कुठल्यातरी समस्येमुळे आपण खूप निराश होऊ आणि काही करण्याची ताकदच आपल्यामध्ये उरणार नाही. (नीति. २४:१०) किंवा मग आपल्या अपरिपूर्णतेमुळे आपल्याकडून काही चुका होतील, ज्यामुळे आपलं ध्येय गाठणं आपल्याला कठीण जाईल. (रोम. ७:२३) किंवा मग आपल्याला खूप थकल्यासारखं वाटेल. (मत्त. २६:४३) अशा अडथळ्यांवर किंवा अडचणींवर आपल्याला कशा प्रकारे मात करता येईल?
१५. अडथळ्यांमुळे ध्येय गाठणं कठीण झालं तरी आपण हार का मानू नये? (स्तोत्र १४५:१४)
१५ अडथळ्यांमुळे ध्येय गाठता आलं नाही तरी हार मानू नका. बायबल म्हणतं की जीवनात समस्या आणि अडचणी या येतच राहतील. पण बायबल असंही म्हणतं, की यहोवाच्या मदतीने आपण त्यातून सावरू शकतो आणि आपली ध्येयं गाठू शकतो. (स्तोत्र १४५:१४ वाचा.) आधी उल्लेख केलेला फिलिप नावाचा भाऊ म्हणतो: “माझं ध्येय गाठायचा प्रयत्न करताना मी किती वेळा पडतो यावर मी लक्ष देत नाही. पण पडल्यावर मी किती पटकन उठून माझं ध्येय गाठायचा पुन्हा प्रयत्न करतो यावर मी लक्ष देतो.” तसंच आधी उल्लेख केलेला डेवीड म्हणतो: “माझ्या मार्गात अडथळे आले तर मी हार मानत नाही; उलट या अडथळ्यांमुळे यहोवावर माझं किती प्रेम आहे हे दाखवण्याची संधी मला मिळते असा मी विचार करतो.” खरंच, अडथळे असतानाही आपण आपलं ध्येय गाठायचा प्रयत्न करत राहतो, तेव्हा यहोवाला खूश करायची आपली इच्छा आहे हेच आपण दाखवून देतो. विचार करा, आपली ही मेहनत पाहून यहोवाला किती आनंद होत असेल!
१६. जेव्हा अडथळा किंवा समस्या येते तेव्हा त्यातून काय कळतं?
१६ अडथळ्यांमधून शिका. तुमच्या ध्येयाच्या आड एखादा अडथळा किंवा समस्या आली, तर ती का आली याचा विचार करा आणि स्वतःला विचारा: ‘असं पुन्हा होऊ नये म्हणून मला काय करता येईल?’ (नीति. २७:१२) कधी-कधी आलेल्या अडथळ्यांमुळे आपल्याला हे समजतं की आपण ठेवलेलं ध्येयं हे साध्य करण्यासारखं नव्हतं. तुम्ही ठेवलेल्या ध्येयाच्या बाबतीतही असंच काही आहे असं जर तुम्हाला जाणवलं, तर ते ध्येय अजूनही तुमच्यासाठी साध्य करण्यासारखं आहे का या गोष्टीचा विचार करा.d तुमच्या क्षमतेपलीकडे असलेलं एखादं ध्येय जर तुम्हाला गाठता आलं नाही तर यहोवा तुम्हाला त्यासाठी अपयशी समजणार नाही.—२ करिंथ. ८:१२.
१७. आपण आधी पूर्ण केलेली ध्येयं का लक्षात ठेवली पाहिजे?
१७ तुम्ही आतापर्यंत कोणती ध्येयं पूर्ण केली आहेत ते लक्षात ठेवा. बायबल म्हणतं: ‘तुमचं काम विसरून जायला देव अन्यायी नाही.’ (इब्री ६:१०) त्यामुळे तुम्हीही आधी केलेली कामं विसरू नका. यहोवासोबत मैत्री करणं, त्याच्याबद्दल इतरांना सांगणं किंवा बाप्तिस्मा घेणं यांसारखी कोणती ध्येयं तुम्ही पूर्ण केली आहेत याचा विचार करा. आधी ठेवलेली आध्यात्मिक ध्येयं पूर्ण करण्यासाठी जशी तुम्ही प्रगती केली तशीच प्रगती तुम्ही आता ठेवलेल्या ध्येयासाठीही करू शकता.—फिलिप्पै. ३:१६.
प्रवासाचा आनंद घ्या (परिच्छेद १८ पाहा)
१८. आपली ध्येयं पूर्ण करत असताना कोणती गोष्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता? (चित्रसुद्धा पाहा.)
१८ जसा एखादा खलाशी आपल्याला हव्या असलेल्या ठिकाणी पोहोचतो आणि त्याला त्याबद्दल आनंद होतो त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा यहोवाच्या मदतीने आपल्या ध्येयांपर्यंत आनंदाने पोहोचू शकता. पण हेही लक्षात ठेवा की बरेच खलाशी आपल्या प्रवासाचीदेखील मजा घेतात. त्याचप्रमाणे तुमची ध्येयं पूर्ण करत असताना यहोवा तुम्हाला कशी मदत करत आहे किंवा तुम्हाला कसा आशीर्वाद देत आहे हे अनुभवण्याचा आनंद घ्यायला विसरू नका. (२ करिंथ. ४:७) आणि हार न मानता तुम्ही जर तुमची ध्येयं पूर्ण केली तर यहोवा तुम्हाला आणखी जास्त आशीर्वाद देईल.—गलती. ६:९.
गीत १२६ जागे राहा, सावध व बलशाली व्हा!
a आपल्याला नेहमीच आध्यात्मिक ध्येय ठेवायचं प्रोत्साहन दिलं जातं. पण तुम्ही जर एखादं ध्येय ठेवलं आणि ते गाठणं जर तुम्हाला कठीण जात असेल तर काय? आपण आपली ध्येयं कशी गाठू शकतो त्याबद्दल या लेखात उपयुक्त सल्ले दिले आहेत.
b शब्दांचा अर्थ: आध्यात्मिक ध्येय म्हणजे यहोवाची सेवा आणखी चांगल्या प्रकारे करता यावी आणि त्याचं मन आनंदित करता यावं, म्हणून एखाद्या गोष्टीत सुधारणा करण्यासाठी किंवा ती मिळवण्यासाठी घेतलेली मेहनत. जसं की, स्वतःमध्ये एखादा ख्रिस्ती गुण वाढवण्याचं ध्येय ठेवणं. किंवा बायबलचं वाचन करणं, वैयक्तिक अभ्यास करणं, क्षेत्रसेवा किंवा यांसारख्या एखाद्या गोष्टीमध्ये आणखी सुधारणा करायचं ध्येय ठेवणं.
d जास्त माहितीसाठी १५ जुलै, २००८ च्या टेहळणी बुरूज अंकातला, “स्वतःकडून वाजवी अपेक्षा ठेवा व आनंदी राहा” हा लेख पाहा.