अभ्यास लेख ४७
एकमेकांवरचं प्रेम आपण मजबूत कसं करत राहू शकतो?
“आपण एकमेकांवर प्रेम करत राहू या, कारण प्रेम देवापासून आहे.”—१ योहा. ४:७.
गीत १०७ देवाच्या प्रीतीचा आदर्श
सारांशa
१-२. (क) प्रेम सगळ्यांत “श्रेष्ठ” आहे असं प्रेषित पौलने का म्हटलं? (ख) या लेखात आपण कोणत्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत?
प्रेषित पौलने जेव्हा विश्वास, आशा आणि प्रेम या गुणांचा उल्लेख केला, तेव्हा शेवटी त्याने म्हटलं की “प्रेम या सगळ्यांत श्रेष्ठ आहे.” (१ करिंथ. १३:१३) त्याने असं का म्हटलं? कारण भविष्यात देवाची अभिवचनं पूर्ण झालेली असतील, त्यामुळे आपल्याला त्यांवर विश्वास ठेवायची गरज पडणार नाही. पण आपल्या मनात यहोवाबद्दल आणि त्याच्या लोकांबद्दल प्रेम असणं नेहमी गरजेचं असेल. इतकंच काय तर हे प्रेम नेहमी वाढत जाईल.
२ आपल्याला नेहमी एकमेकांवर प्रेम करायची गरज पडणार असल्यामुळे आपण आता तीन प्रश्नांवर चर्चा करू या. पहिला, आपण एकमेकांवर प्रेम का केलं पाहिजे? दुसरा, एकमेकांवर प्रेम असल्याचं आपण कसं दाखवू शकतो? आणि तिसरा, एकमेकांवर असलेलं प्रेम आपण आणखी मजबूत कसं करू शकतो?
आपण एकमेकांवर प्रेम का केलं पाहिजे?
३. एकमेकांवर प्रेम करण्याची कोणती कारणं आहेत?
३ एकमेकांवर प्रेम करणं इतकं महत्त्वाचं का आहे? याची बरीच कारणं आहेत. पण त्यांपैकी एक म्हणजे प्रेम हे खऱ्या ख्रिश्चनांचं ओळख चिन्ह आहे. येशूने त्याच्या प्रेषितांना म्हटलं: “तुमचं एकमेकांवर प्रेम असेल, तर यावरूनच सगळे ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात.” (योहा. १३:३५) तसंच प्रेम असल्यामुळे आपल्यातली एकी टिकून राहते. पौलने म्हटलं की प्रेम हे “ऐक्याचं परिपूर्ण बंधन” आहे. (कलस्सै. ३:१४) पण एकमेकांवर प्रेम करण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण आहे. याबद्दल प्रेषित योहानने भाऊबहिणींना एका पत्रात लिहिलंय. त्याने म्हटलं: “जो कोणी देवावर प्रेम करतो, त्याने आपल्या भावावरही प्रेम केलं पाहिजे.” (१ योहा. ४:२१) जेव्हा आपण एकमेकांवर प्रेम करतो, तेव्हा आपलं देवावर प्रेम आहे हे दिसून येतं.
४-५. देवावर असलेल्या आपल्या प्रेमाचा एकमेकांवर असलेल्या प्रेमाशी कसा संबंध आहे? स्पष्ट करा.
४ आपण भाऊबहिणींना जे प्रेम दाखवतो त्याचा संबंध आपण यहोवावर करत असलेल्या प्रेमाशी कसा आहे, हे समजण्यासाठी आपल्या हृदयाचा आपल्या शरीराच्या इतर अवयवांशी काय संबंध आहे, याकडे लक्ष द्या. आपली तब्येत कशी आहे हे समजण्यासाठी डॉक्टर जेव्हा आपल्या मनगटाला बोट लावून आपली नाडी तपासतात, तेव्हा आपल्या हृदयाच्या स्थितीबद्दल त्यांना थोडीफार माहिती मिळत असते. या उदाहरणातून आपल्याला प्रेमाबद्दल काय शिकायला मिळतं?
५ आपली नाडी तपासल्यामुळे डॉक्टरला आपल्या हृदयाची स्थिती कळते, त्याच प्रकारे भाऊबहिणींवर आपलं किती प्रेम आहे हे तपासल्यामुळे आपलं देवावर किती प्रेम आहे हे आपल्याला कळतं. भाऊबहिणींवरचं आपलं प्रेम आधीपेक्षा कमी झालंय असं जर आपल्याला जाणवलं तर यावरून कळेल की देवावरचं आपलं प्रेम कमी होत चाललंय. पण आपण भाऊबहिणींना नियमितपणे प्रेम दाखवत राहिलो, तर यावरून दिसून येईल की देवावरचं आपलं प्रेमसुद्धा मजबूत आहे.
६. भाऊबहिणींवरचं आपलं प्रेम कमी होत चाललं असेल, तर ही एक गंभीर गोष्ट का आहे? (१ योहान ४:७-९, ११)
६ भाऊबहिणींवरचं आपलं प्रेम कमी होत चाललंय असं जर आपल्याला वाटत असेल, तर ही एक खूप गंभीर गोष्ट आहे. का? कारण याचा अर्थ यहोवासोबतचं आपलं नातं कमजोर झालंय असा होतो. प्रेषित योहानने आपल्याला स्पष्टपणे याची आठवण करून दिली की, “ज्याला त्याने पाहिलं आहे त्या भावावर जर तो प्रेम करत नाही, तर न पाहिलेल्या देवावर तो प्रेम करूच शकत नाही.” (१ योहा. ४:२०) यातून आपल्याला कोणता धडा शिकायला मिळतो? हाच की आपण जर “एकमेकांवर प्रेम” केलं, तरच यहोवा आपल्यावर खूश होईल.—१ योहान ४:७-९, ११ वाचा.
आपण एकमेकांना प्रेम कसं दाखवू शकतो?
७-८. आपण कोणत्या काही मार्गांनी एकमेकांवर प्रेम असल्याचं दाखवू शकतो?
७ “एकमेकांवर प्रेम करा” ही आज्ञा वारंवार देवाच्या वचनात देण्यात आली आहे. (योहा. १५:१२, १७; रोम. १३:८; १ थेस्सलनी. ४:९; १ पेत्र १:२२; १ योहा. ४:११) पण प्रेम आपल्या मनात असलेली भावना आहे. आणि कोणतीही व्यक्ती आपल्या मनात काय आहे ते बघू शकत नाही. तर मग आपलं एकमेकांवर प्रेम आहे हे इतरांना कसं कळून येईल? आपल्या शब्दांमधून आणि कामांमधून.
८ आपण बऱ्याच मार्गांनी आपलं भाऊबहिणींवर प्रेम आहे हे दाखवू शकतो. जसं की, “एकमेकांसोबत खरं बोला.” (जख. ८:१६) “एकमेकांसोबत शांतीने राहा.” (मार्क ९:५०) “एकमेकांचा आदर करण्यात पुढाकार घ्या.” (रोम. १२:१०) “एकमेकांचा स्वीकार करा.” (रोम. १५:७) “एकमेकांना मोठ्या मनाने क्षमा करत जा.” (कलस्सै. ३:१३) “एकमेकांची ओझी वाहत राहा.” (गलती. ६:२) “एकमेकांना सांत्वन देत जा.” (१ थेस्सलनी. ४:१८) “एकमेकांना बळकट करत . . . राहा.” (१ थेस्सलनी. ५:११) “एकमेकांसाठी प्रार्थना करा.”—याको. ५:१६.
समस्येत असलेल्या एखाद्या भावाला किंवा बहिणीला आपण कशी मदत करू शकतो? (परिच्छेद ७-९ पाहा)
९. इतरांचं सांत्वन करणं हा प्रेम दाखवण्याचा एक महत्त्वाचा मार्ग का आहे? (चित्रसुद्धा पाहा.)
९ इतरांना प्रेम दाखवण्याचे आपण बरेच मार्ग पाहिलेत. त्यांपैकी एकावर आता आपण चर्चा करू या. पौलने म्हटलं: “एकमेकांना सांत्वन देत जा.” पण एकमेकांना सांत्वन देणं हा प्रेम दाखवण्याचा सगळ्यात महत्त्वाचा मार्ग का आहे? एका बायबल संदर्भानुसार, पौलने “सांत्वन” यासाठी जो शब्द वापरला त्याचा अर्थ “एखादी व्यक्ती जेव्हा खूप कठीण परीक्षांमधून जात असते तेव्हा तिच्या बाजूला उभं राहून तिला धीर देणं,” असा होतो. अशा प्रकारे आपण जेव्हा सांत्वन देतो, तेव्हा परीक्षेतून जाणाऱ्या एखाद्या भावाला किंवा बहिणीला सावरायला आणि यहोवाची विश्वासूपणे सेवा करत राहायला आपण मदत करत असतो. प्रत्येक वेळी जेव्हा आपण एखाद्या भावाला किंवा बहिणीला रडण्यासाठी खांदा देतो, तेव्हा त्यांच्यावर आपलं प्रेम आहे हे आपण दाखवत असतो.—२ करिंथ. ७:६, ७, १३.
१०. सहानुभूती आणि सांत्वन यांचा काय संबंध आहे?
१० इतरांबद्दल सहानुभूती वाटणं आणि त्यांना सांत्वन देणं यांचा खूप जवळचा संबंध आहे. तो कसा? दुःखातून जाणाऱ्या व्यक्तीबद्दल आपल्याला जेव्हा सहानुभूती वाटते, तेव्हा आपण त्याचं सांत्वन करतो. आणि त्याचं दुःख कमी करण्यासाठी त्याला मदत करतो. याचा अर्थ, आधी आपल्याला सहानुभूती वाटते आणि नंतर आपण एखाद्याचं सांत्वन करतो. यहोवाला वाटणारी सहानुभूती आणि तो इतरांचं ज्या प्रकारे सांत्वन करतो, यांचा एकमेकांशी कसा संबंध आहे याबद्दल पौलने जे म्हटलं, त्याकडे लक्ष द्या. पौलने यहोवाबद्दल म्हटलं: तो “खूप करुणामय असा पिता आहे, आणि सगळ्या प्रकारच्या सांत्वनाचा देव आहे.” (२ करिंथ. १:३) एखाद्याबद्दल वाटणाऱ्या सहानुभूतीसाठी पौलने “करुणामय” असा शब्द वापरला. तर मग यहोवाला करुणामय असा पिता म्हटलंय, कारण सहानुभूतीचा स्रोत तोच आहे. आणि त्याच करुणेमुळे “तो आपल्या सगळ्या संकटांमध्ये” आपलं सांत्वन करतो. (२ करिंथ. १:४) ज्या प्रकारे झऱ्यातून वाहणाऱ्या निखळ पाण्यामुळे तहानलेल्या व्यक्तीची तहान भागते आणि त्याला ताजंतवानं वाटतं, त्याच प्रकारे दुःखात असलेल्यांचं यहोवा सांत्वन करतो आणि त्यांना ताजंतवानं करतो. आपण यहोवाचं अनुकरण करून इतरांबद्दल सहानुभूती कशी दाखवू शकतो आणि त्यांचं सांत्वन कसं करू शकतो? एक मार्ग म्हणजे, इतरांचं सांत्वन करण्यासाठी जे गुण वाढवणं गरजेचं आहे ते आपण विकसित करू शकतो. ते गुण कोणते आहेत?
११. कलस्सैकर ३:१२ आणि १ पेत्र ३:८ या वचनांप्रमाणे एकमेकांवर प्रेम करण्यासाठी आणि त्यांचं सांत्वन करण्यासाठी कोणते गुण आपण विकसित केले पाहिजे?
११ दररोज ‘एकमेकांचं सांत्वन करत राहण्यासाठी’ आपल्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम असलं पाहिजे. ते प्रेम आपण कसं टिकवून ठेवू शकतो? आपण स्वतःमध्ये सहानुभूती, बंधुप्रेम आणि प्रेमळपणा यांसारखे गुण विकसित केले पाहिजेत. (कलस्सैकर ३:१२; १ पेत्र ३:८ वाचा.) या गुणांमुळे आपल्याला कशी मदत होईल? जेव्हा हे गुण आपल्या स्वभावाचा भाग बनतात, तेव्हा दुःखात असलेल्या व्यक्तीचं सांत्वन करण्याची तीव्र इच्छा आपल्या मनात उत्पन्न होते. येशूने म्हटलं होतं: “अंतःकरणात जे भरलेलं असतं तेच तोंडातून बाहेर पडतं. चांगला माणूस आपल्या चांगल्या भांडारातून चांगल्या गोष्टी बाहेर काढतो.” (मत्त. १२:३४, ३५) खरंच, भाऊबहिणींचं सांत्वन करणं हा प्रेम दाखवण्याचा सगळ्यात महत्त्वाचा मार्ग आहे.
एकमेकांवर असलेलं आपलं प्रेम आपण आणखी मजबूत कसं करू शकतो?
१२. (क) आपण सावध का राहिलं पाहिजे? (ख) आपण कोणत्या प्रश्नावर चर्चा करणार आहोत?
१२ आपण ‘एकमेकांवर प्रेम करत राहावं’ असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं. (१ योहा. ४:७) पण येशूने असा इशारा दिला होता की “पुष्कळांचं प्रेम थंड होईल.” (मत्त. २४:१२) म्हणून या इशाऱ्याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. पण येशूला असं म्हणायचं नव्हतं की त्याच्या शिष्यांपैकी बहुतेकांचं प्रेम थंड पडेल. असं असलं तरी आपण सावध राहणं गरजेचं आहे. कारण आज जगात आपल्याला प्रेम क्वचितच पाहायला मिळतं. आणि जगातल्या या वृत्तीचा परिणाम आपल्यावर होऊ शकतो. ही गोष्ट लक्षात ठेवून आता आपण एका महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा करू या: भाऊबहिणींवरचं आपलं प्रेम मजबूत आहे हे आपल्याला कसं ओळखता येईल?
१३. आपल्या प्रेमाची परीक्षा कशामुळे होऊ शकते?
१३ आपल्या भाऊबहिणींवरचं आपलं प्रेम मजबूत आहे की नाही हे ओळखण्याचा एक मार्ग म्हणजे, आपल्या जीवनातल्या विशिष्ट परिस्थिती आपण कशा हाताळतो ते तपासून पाहणं. (२ करिंथ. ८:८) अशाच एका परिस्थितीबद्दल प्रेषित पेत्रने म्हटलं: “सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांवर अगदी मनापासून प्रेम करा, कारण प्रेम पुष्कळ पापांना झाकून टाकतं.” (१ पेत्र ४:८) तर यावरून कळतं की भाऊबहिणींच्या कमतरतांमुळे किंवा चुकांमुळे आपल्या प्रेमाची परीक्षा होऊ शकते.
१४. १ पेत्र ४:८ प्रमाणे, आपण भाऊबहिणींवर कसं प्रेम केलं पाहिजे? स्पष्ट करा.
१४ पेत्रच्या शब्दांवर खोलवर विचार करा. आठव्या वचनाच्या सुरुवातीला पेत्रने म्हटलं की आपलं भाऊबहिणींवर “अगदी मनापासून प्रेम” असलं पाहिजे. पेत्रने “अगदी मनापासून” यासाठी जो ग्रीक शब्द वापरला त्याचा शब्दशः अर्थ “ताणून पसरवणं” असा होतो. या वचनाच्या दुसऱ्या भागात, अशा प्रेमामुळे इतरांवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो, याबद्दल सांगितलंय. हे प्रेम आपल्या भाऊबहिणींच्या पापांना झाकून टाकतं असं म्हटलंय. हे समजण्यासाठी एक उदाहरण घ्या. कल्पना करा की, एका टेबलावर बरेच डाग आणि ओरखडे आहेत. पण तुम्ही जर त्यावर एखादं कापड पसरवून टाकलं, तर त्यामुळे फक्त एकदोन डागच नाही, तर सगळेच डाग झाकले जातील. त्याच प्रकारे, आपलं जर भाऊबहिणींवर अगदी मनापासून प्रेम असेल, तर आपण फक्त त्यांच्या एकदोन चुकाच नाही तर “पुष्कळ पापांना” झाकून टाकू.
१५. भाऊबहिणींवरचं आपलं प्रेम मजबूत असेल तर आपल्याला काय करता येईल? (कलस्सैकर ३:१३)
१५ आपल्याला भाऊबहिणींना क्षमा करता येईल, इतकं आपलं त्यांच्यावरचं प्रेम मजबूत असलं पाहिजे. मग कधीकधी यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागली तरी. (कलस्सैकर ३:१३ वाचा.) जर आपण इतरांना क्षमा केली, तर आपलं प्रेम मजबूत आहे आणि आपल्याला यहोवाला खूश करायची इच्छा आहे, हे दिसून येईल. पण भाऊबहिणींच्या काही सवयींमुळे किंवा चुकांमुळे आपल्याला चीड येते तेव्हा आपण आणखी काय करू शकतो?
आपण चांगले फोटो ठेवतो आणि खराब फोटो डिलीट करून टाकतो. तसंच आपल्या भाऊबहिणींसोबतच्या चांगल्या आठवणी आपण जपून ठेवतो आणि वाईट आठवणींकडे दुर्लक्ष करतो (परिच्छेद १६-१७ पाहा)
१६-१७. इतरांच्या किरकोळ चुकांकडे दुर्लक्ष करायला आपल्याला आणखी कशामुळे मदत होईल? स्पष्ट करा. (चित्रसुद्धा पाहा.)
१६ आपल्या भाऊबहिणींच्या कमतरतांवर नाही, तर त्यांच्या चांगल्या गुणांवर लक्ष द्या. यासाठी एक उदाहरण घ्या. कल्पना करा, की तुम्ही भाऊबहिणींसोबत एकत्र वेळ घालवत आहात. तुम्ही छान वेळ घालवता आणि शेवटी काही फोटोपण घेता. आणि एखादा फोटो खराब आला तर तुमच्याकडे निदान चांगले फोटो असावेत म्हणून तुम्ही एक नाही तर दोन-तीन फोटो घेता. आता समजा तुमच्याकडे तीन फोटो आहेत. पण त्यांतल्या एका फोटोमध्ये एका भावाचा फोटो चांगला आलेला नाही. मग त्या फोटोचं तुम्ही काय कराल? तुम्ही तो फोटो नक्कीच डिलीट कराल, कारण बाकीच्या दोन फोटो चांगले आहेत आणि सगळ्यांचेच चेहरे हसरे आहेत.
१७ या फोटोची तुलना आपण आपल्या आठवणींशी करू शकतो. आपल्याजवळ सहसा भाऊबहिणींसोबत वेळ घालवल्याच्या चांगल्या आठवणी असतात. पण समजा अशाच एखाद्या प्रसंगी एखाद्या भावाने किंवा बहिणीने तुम्हाला वाईट वाटेल असं काहीतरी बोललं किंवा केलं, तर अशा वाईट आठवणींचं तुम्ही काय कराल? जो फोटो चांगला आला नाही, त्याला आपण फोनमधून काढून टाकतो. तसंच या वाईट आठवणींना आपण आपल्या मनातून काढून टाकू नये का? (नीति. १९:११; इफिस. ४:३२) आपण या वाईट आठवणी मनातून काढून टाकू शकतो. कारण त्या भावासोबत किंवा बहिणीसोबत आपल्या बऱ्याच चांगल्या आठवणीही आहेत. त्या आठवणी आपल्यासाठी खूप मौल्यवान आहेत आणि आपण त्यांना जपून ठेवलं पाहिजे.
आपल्या काळात खासकरून प्रेमाची गरज का आहे?
१८. या लेखात आपण प्रेमाबद्दल कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी शिकलो?
१८ एकमेकांवर असलेलं आपलं प्रेम आपण मजबूत का करत राहिलं पाहिजे? कारण आपण पाहिलं की आपण जर भाऊबहिणींवर प्रेम केलं, तर आपलं यहोवावरसुद्धा प्रेम आहे हे आपण दाखवत असू. मग हे प्रेम आपण कसं व्यक्त करू शकतो? एक मार्ग म्हणजे, इतरांना सांत्वन देणं. आपल्याला जर भाऊबहिणींबद्दल सहानुभूती असेल, तर आपल्याला त्यांना ‘सांत्वन देत राहता’ येईल. पण भाऊबहिणींबद्दलचं प्रेम आपण कसं मजबूत करू शकतो? आपल्याला कठीण वाटत असलं तरी त्यांच्या चुकांची क्षमा करून आपण असं करू शकतो.
१९. एकमेकांवर प्रेम करणं खासकरून आज इतकं महत्त्वाचं का आहे?
१९ एकमेकांवर प्रेम करणं खासकरून आज इतकं महत्त्वाचं का आहे? याचं कारण देत पेत्रने म्हटलं: “सर्व गोष्टींचा शेवट जवळ आला आहे. म्हणून . . . एकमेकांवर अगदी मनापासून प्रेम करा.” (१ पेत्र ४:७, ८) या दुष्ट जगाचा अंत जवळ असताना, आपण कोणत्या गोष्टीची अपेक्षा करू शकतो? आपल्या शिष्यांबद्दल बोलताना येशूने म्हटलं: “माझ्या नावामुळे सगळी राष्ट्रं तुमचा द्वेष करतील.” (मत्त. २४:९) या कठीण परिस्थितीत टिकून राहण्यासाठी आपल्यात एकी असणं खूप महत्त्वाचं आहे. आपण जर आपल्या भाऊबहिणींवर प्रेम केलं, तर आपल्यात फुटी पाडण्याचा सैतान जो प्रयत्न करतो, त्यात तो अपयशी ठरेल. कारण प्रेम हे “ऐक्याचं परिपूर्ण बंधन” आहे.—कलस्सै. ३:१४; फिलिप्पै. २:१, २.
गीत १२५ जे दयाळू ते सुखी
a आजच्या काळात आपण आपल्या भाऊबहिणींवर प्रेम करण्याची खूप जास्त गरज आहे. असं करणं का महत्त्वाचं आहे? आणि आपण अगदी मनापासून भाऊबहिणींवर प्रेम असल्याचं कसं दाखवू शकतो?