वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 ७/१ पृ. ८-१३
  • “सार्वराष्ट्रीय प्रार्थनामंदिर”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “सार्वराष्ट्रीय प्रार्थनामंदिर”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • परम पवित्र
  • पवित्र स्थान
  • अंगण
  • प्रायश्‍चित्ताचा दिवस
  • पहिले आणि दुसरे मंदिर
  • देव त्याच्या पार्थिव भवनाचा कायमचाच त्याग करतो
  • यहोवाच्या आध्यात्मिक मंदिरात उपासना करण्याच्या बहुमानाची कदर करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • यहोवाचे महान आध्यात्मिक मंदिर
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • यहोवाचे मंदिर ‘मोलवान वस्तूंनी’ भरत आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 ७/१ पृ. ८-१३

“सार्वराष्ट्रीय प्रार्थनामंदिर”

“माझ्या घराला सार्वराष्ट्रीय प्रार्थनामंदिर म्हणतील, असा शास्त्रलेख आहे ना?”—मार्क ११:१७.

१. आदाम आणि हव्वेने सुरवातीला कोणत्या नातेसंबंधाचा आनंद लुटला?

आदाम आणि हव्वेला निर्माण केले तेव्हा, त्यांनी त्यांच्या स्वर्गीय पित्यासोबत निकटचा सहवास उपभोगला. यहोवा देवाने त्यांच्याबरोबर दळणवळण राखले आणि मानवजातीसाठी असलेल्या त्याच्या अद्‌भुत उद्देशांची रुपरेषा दिली. निश्‍चितच मग, यहोवाच्या निर्मितीच्या भव्य कार्यांबद्दल त्याची स्तुती करण्यास ते नेहमी प्रवृत्त होत होते. आदाम आणि हव्वेला, मानवी कुटुंबाचे भावी मातापिता होण्याच्या त्यांच्या भूमिकेचा विचार करताना मार्गदर्शन हवे होते, तर त्यांच्या परादीस वास्तव्याच्या कोणत्याही ठिकाणाहून ते देवाशी बोलू शकत होते. मंदिरातील याजकाच्या सेवेची त्यांना गरज नव्हती.—उत्पत्ति १:२८.

२. आदाम आणि हव्वेने पाप केल्यानंतर कोणता बदल झाला?

२ एका बंडखोर देवदूताने हव्वेला, तू ‘देवासारखी होशील,’ असे सांगून यहोवाच्या सार्वभौमत्वाला जर तिने धुडकावले तर तिचे जीवन सुधारेल असा विचार करण्यास लावून फसवले तेव्हा परिस्थिती बदलली. त्याप्रमाणे हव्वेने, देवाने जे फळ खाऊ नका असे सांगितले होते ते फळ खाल्ले. मग सैतानाने, हव्वेचा, तिच्या पतीला मोहात पाडण्यासाठी उपयोग केला. दुःखाची गोष्ट म्हणजे, आदामाने त्याच्या पापी पत्नीचे ऐकले व याद्वारे दाखवून दिले, की देवाच्या नातेसंबंधापेक्षा त्याला आपल्या पत्नीचा नातेसंबंध अधिक मौल्यवान होता. (उत्पत्ति ३:४-७) परिणामतः, आदाम आणि हव्वेने सैतानाला त्यांचा देव निवडले.—पडताळा २ करिंथकर ४:४.

३. आदाम आणि हव्वेच्या बंडाळीचे कोणते दुष्परिणाम होते?

३ असे केल्याने, पहिल्या मानवी जोडप्याने केवळ देवासोबतचा त्यांचा मौल्यवान नातेसंबंध गमावला नाही तर पृथ्वीवरील परादीसमधील अनंतकाळची आशा देखील गमावली. (उत्पत्ति २:१६, १७) त्यांची पापी शरीरे हळुवार खंगत जाऊन शेवटी मृत्यूवश झाली. त्यांच्या अपत्याला ही पापमय अवस्था वारशाने मिळाली. “सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले,” असे बायबल स्पष्टीकरण देते.—रोमकर ५:१२.

४. पापी मानवजातीसाठी देवाने कोणती आशा प्रदान केली?

४ पापी मानवजातीचा त्यांच्या पवित्र निर्माणकर्त्यासोबत समेट करण्यासाठी कशाची तरी आवश्‍यकता होती. आदाम आणि हव्वेला शिक्षा ठोठावताना, सैतानाच्या बंडाळीच्या परिणामांपासून मानवजातीला बचावणाऱ्‍या एका “संतति”बद्दलची भविष्यवाणी करून देवाने त्यांच्या भावी अपत्याला एक आशा प्रदान केली. (उत्पत्ति ३:१५) ही आशीर्वादयुक्‍त संतति अब्राहामाद्वारे येईल असे देवाने नंतर प्रकट केले. (उत्पत्ति २२:१८) हा प्रेमळ उद्देश मनी बाळगून देवाने अब्राहामाचे वंशज, इस्राएल लोकांना त्याचे निवडलेले राष्ट्र होण्यास पसंत केले.

५. इस्राएलसोबत देवाच्या नियमशास्त्र कराराच्या सविस्तर माहितीबद्दल आपण आवड का दाखवली पाहिजे?

५ सा. यु. पू. १५१३ मध्ये, इस्राएल लोकांनी देवाबरोबर कराराच्या नातेसंबंधात प्रवेश केला व त्याचे नियम पाळण्याची तयारी दर्शवली. आज जे लोक देवाची उपासना करू इच्छितात त्या सर्वांना नियमशास्त्र करार आस्थेचा वाटला पाहिजे कारण त्याने वचनदत्त संततिकडे अंगुली दर्शवली. पौलाने म्हटले, की त्यात ‘पुढे होणाऱ्‍या चांगल्या गोष्टींची छाया आहे.’ (इब्री लोकांस १०:१) पौलाने हे विधान केले तेव्हा तो जंगम निवासमंडपातील किंवा उपासना मंडपातील इस्राएलच्या याजकांच्या सेवेची चर्चा करीत होता. त्याला ‘यहोवाचे मंदिर’ किंवा ‘यहोवाचे भवन’ असे संबोधले जात असे. (१ शमुवेल १:९, २४) यहोवाच्या पार्थिव भवनात होणाऱ्‍या पवित्र सेवेचे परीक्षण केल्याने, पापी मानव आज देवाबरोबर समेट करू शकतात अशा दयापूर्ण व्यवस्थेला आपण चांगल्या प्रकारे समजू शकतो.

परम पवित्र

६. परम पवित्र स्थानात काय काय होते, व तेथे देवाच्या उपस्थितीचे प्रतिनिधीत्व कशा प्रकारे करण्यात आले होते?

६ “जो परात्पर तो हातांनी बांधलेल्या घरात राहत नाही,” असे बायबल म्हणते. (प्रेषितांची कृत्ये ७:४८) परंतु, परम पवित्र म्हटलेल्या अंतरपटातील मेघ देवाच्या पार्थिव भवनात त्याच्या उपस्थितीचे प्रतिनिधीत्व करीत असे. (लेवीय १६:२) स्पष्टतः, हा मेघ अतिशय तेजोमय होता ज्यामुळे परम पवित्र स्थानाला प्रकाश मिळे. तो, ‘साक्षीचा कोश’ म्हटलेल्या पवित्र पेटीवर ठेवलेला होता व त्या कोशात दगडी पाट्या होत्या ज्यावर देवाने इस्राएलला दिलेले नियम कोरलेले होते. कोशाच्या दयासनावर पंख पसरलेले दोन सोनेरी करूब होते. हे करूब देवाच्या स्वर्गीय संघटनेतील सर्वोच्च दर्जाच्या आत्मिक प्राण्यांचे प्रतिनिधीत्व करत. हा चमत्कारिक प्रकाशाचा मेघ दयासनावर आणि करूबांच्या मध्यभागी होता. (निर्गम २५:२२) यावरून सर्वसमर्थ देव जिवंत करूबांचा आधार असलेल्या एका स्वर्गीय रथावर सिंहासनाधिष्ठ आहे ही कल्पना ध्वनित होत होती. (१ इतिहास २८:१८) राजा हिज्कियाने “सेनाधीश परमेश्‍वरा, इस्राएलाच्या देवा, करूबारूढ असलेल्या देवा,” अशी प्रार्थना का केली त्याचे हे विवरण देते.—यशया ३७:१६.

पवित्र स्थान

७. पवित्र स्थानात कोणते सामानसुमान होते?

७ निवासमंडपाच्या दुसऱ्‍या कक्षाला पवित्र असे संबोधले जाई. या कक्षेत, दरवाज्याच्या डावीकडे सात-शाखेचा एक अतिशय सुंदर दीपवृक्ष होता आणि उजवीकडे समक्षतेची भाकर असलेला मेज होता. अगदी समोर एक वेदी होती ज्याच्यामधून जळत्या धूपाचा सुगंध येत असे. ही वेदी, पवित्र आणि परम पवित्र कक्षेला दुभागणाऱ्‍या एका पडद्याच्या समोर होती.

८. याजकांनी पवित्र स्थानामध्ये कोणती कामे नियमितरीत्या पार पाडली?

८ दररोज सकाळसंध्याकाळ, एका याजकाला निवासमंडपात प्रवेश करून धूपाच्या वेदीवर धूप जाळायचा होता. (निर्गम ३०:७, ८) सकाळी धूप जाळल्यानंतर, सोनेरी दीपवृक्षावरील सात दिव्यांमध्ये पुन्हा तेल ओतायचे होते. संध्याकाळी पवित्र स्थानाला प्रकाश मिळावा म्हणून दिवे जाळले जात. प्रत्येक शब्बाथाच्या दिवशी एका याजकाला समक्षतेच्या भाकरीच्या मेजावर १२ ताज्या भाकरी ठेवाव्या लागत.—लेवीय २४:४-८.

अंगण

९. पाण्याचे गंगाळ कशासाठी होते, व यातून आपण कोणता धडा शिकू शकतो?

९ निवासमंडपाला एक अंगण देखील होते ज्याला मंडपाच्या कपड्याचे कुंपण होते. या अंगणात एक भले मोठे गंगाळ होते ज्यात याजक पवित्र स्थानात प्रवेश करण्याआधी आपले हातपाय धूत असत. अंगणात असलेल्या वेदीवर अर्पणे वाहण्याआधी सुद्धा त्यांना आपले हातपाय धुवावे लागत. (निर्गम ३०:१८-२१) स्वच्छतेची ही अपेक्षा, देवाच्या आजच्या सेवकांसाठी एक जोरदार स्मरणिका होती; त्यांची उपासना देवाने स्वीकारावी असे त्यांना वाटत असल्यास त्यांनी शारीरिक, नैतिक, मानसिक आणि आध्यात्मिकरीत्या शुद्ध राहण्यास झटले पाहिजे. (२ करिंथकर ७:१) कालांतराने, वेदीवरील अग्नीसाठी लाकूड आणि गंगाळातील पाणी मंदिराचे गैर-इस्राएली दास आणून देऊ लागले.—यहोशवा ९:२७.

१०. वेदीवर केल्या जाणाऱ्‍या अर्पणांपैकी काही अर्पणे कोणती होती?

१० दररोज सकाळी आणि संध्याकाळी, बलिदानाचा एक लहान कोकरा तसेच अन्‍नार्पण व पेयार्पण वेदीवर अर्पिले जात असे. (निर्गम २९:३८-४१) इतर अर्पणे विशेष दिवशी केली जात. काही वेळा एखाद्या विशिष्ट व्यक्‍तिगत पापासाठी अर्पण करावे लागत असे. (लेवीय ५:५, ६) इतर वेळी एखादा इस्राएली स्वखुषीने शांत्यर्पण करू शकत होता. या शांत्यर्पणाचे काही भाग याजक आणि ज्याने ते अर्पण केले तो खात असत. यावरून पाप करणारे मानव देवासोबत शांती संपादू शकतात, जणू काय त्याच्याबरोबर भोजन करू शकतात हे व्यक्‍त होई. एखादा विदेशीसुद्धा यहोवाचा उपासक होऊन त्याच्या भवनात स्वेच्छेने अर्पण करण्याचा सुहक्क प्राप्त करू शकत होता. पण यहोवाला यथायोग्य आदर देण्यासाठी याजकांनी सर्वोत्तम प्रतीची अर्पणे स्वीकारायची होती. अन्‍नार्पणाचे पीठ बारीक दळलेले हवे होते आणि अर्पणासाठी असलेले प्राणी निर्दोष हवे होते.—लेवीय २:१; २२:१८-२०; मलाखी १:६-८.

११. (अ) प्राण्यांचे अर्पण केल्यानंतर त्यांच्या रक्‍ताचे काय केले जाई, व हे कशाकडे अंगुली दर्शवत होते? (ब) मानव आणि प्राणी या दोहोंच्या रक्‍ताविषयी देवाचा दृष्टिकोन काय आहे?

११ या अर्पणांचे रक्‍त वेदीजवळ आणले जाई. यामुळे त्या राष्ट्राला, ते पापी होते व आपले रक्‍त सांडून त्यांना त्यांच्या पापापासून कायमचेच मुक्‍त करणाऱ्‍या व मृत्यूपासून त्यांचा बचाव करणाऱ्‍या एका मुक्‍तीदात्याची गरज होती, ही आठवण त्यांना दररोज होत असे. (रोमकर ७:२४, २५; गलतीकर ३:२४; पडताळा इब्री लोकांस १०:३.) रक्‍ताच्या या पवित्र उपयोगामुळे, रक्‍त जीवनाला चित्रित करते व जीवन देवाच्या मालकीचे आहे याची देखील इस्राएल लोकांना आठवण होत असे. मानवांनी रक्‍ताचा दुसरा उपयोग करण्याला देवाने नेहमीच मनाई केली आहे.—उत्पत्ति ९:४; लेवीय १७:१०-१२; प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९.

प्रायश्‍चित्ताचा दिवस

१२, १३. (अ) प्रायश्‍चित्ताचा दिवस म्हणजे काय? (ब) परम पवित्र स्थानात रक्‍त आणण्याआधी महायाजकाला काय करावयाचे होते?

१२ वर्षातून एकदा म्हणजे, प्रायश्‍चित्ताच्या दिवशी संपूर्ण इस्राएल राष्ट्राला, ज्यामध्ये यहोवाची उपासना करणाऱ्‍या विदेशांचा देखील समावेश होतो, कोणतेच काम करावयाचे नव्हते, शिवाय उपवास करावयाचा होता. (लेवीय १६:२९, ३०) या महत्त्वपूर्ण दिवशी, त्या राष्ट्राला लाक्षणिकपणे पापापासून शुद्ध केले जाई जेणेकरून त्याला आणखी एका वर्षासाठी देवाबरोबरच्या शांतीदायक नातेसंबंधाचा आनंद लुटता येणे शक्य होते. त्या दृश्‍याची आपण कल्पना करून काही ठळक मुद्यांवर विचार करू या.

१३ महायाजक निवासमंडपाच्या अंगणात आहे. गंगाळाच्या पाण्याने हातपाय धुतल्यानंतर, अर्पण करण्यासाठी तो एका गोऱ्ह्याचा वध करतो. त्या गोऱ्ह्याचे रक्‍त एका पात्रात ओतले जाते; हे रक्‍त लेव्यांच्या याजकीय वंशाच्या पापाला मुक्‍त करण्यासाठी एका खास पद्धतीने वापरले जाईल. (लेवीय १६:४, ६, ११) पण अर्पण घेऊन पुढे जाण्याआधी महायाजकाने काहीतरी दुसरे केले पाहिजे. तो (कदाचित एक पळीमध्ये) सुगंधी धूप आणि एका धुपाटण्यात वेदीवरील निखारे घेतो. मग तो पवित्र स्थानात जातो आणि परम पवित्र स्थानाच्या पडद्याच्या दिशेने चालत जातो. तो हळूहळू पडद्याभोवती फिरून कराराच्या कोशासमोर उभा राहतो. नंतर, इतर कोणत्याही मानवाला दिसणार नाही अशा तऱ्‍हेने त्या जळजळत्या निखाऱ्‍यांवर तो धूप ओततो आणि परम पवित्र स्थान सुगंधी मेघाने व्यापते.—लेवीय १६:१२, १३.

१४. महायाजकाला दोन वेगवेगळ्या प्राण्यांचे रक्‍त घेऊन परम पवित्र स्थानात प्रवेश का करावा लागत असे?

१४ आता देव दया दाखवण्यास व एका लाक्षणिक मार्गाने प्रसन्‍न होण्यास तयार आहे. याचकारणास्तव, कोशाच्या आच्छादनाला “दयासन” किंवा “प्रायश्‍चित्त आच्छादन” संबोधले जाई. (इब्री लोकांस ९:५, तळटीप, NW) महायाजक पवित्रांच्या पवित्र जागेतून बाहेर जातो, गोऱ्ह्याचे रक्‍त घेतो आणि पुन्हा परम पवित्र स्थानात प्रवेश करतो. नियमशास्त्रात आज्ञापिल्यानुसार, तो त्याचे बोट रक्‍तात बुडवतो आणि कोशाच्या आच्छादनासमोर सात वेळा ते रक्‍त शिंपडतो. (लेवीय १६:१४) मग तो अंगणात जातो व “लोकांसाठी” पापार्पणाच्या बकऱ्‍याचा वध करतो. बकऱ्‍याचे काही रक्‍त तो परम पवित्र स्थानात आणतो आणि गोऱ्ह्याच्या रक्‍ताचे त्याने जसे केले तसेच याही रक्‍ताचे करतो. (लेवीय १६:१५) प्रायश्‍चित्ताच्या दिवशी इतर महत्त्वपूर्ण सेवा देखील होत असत. उदाहरणार्थ, महायाजकाला आणखी एका बकऱ्‍याच्या डोक्यावर आपले हात ठेवून ‘इस्राएल लोकांच्या सर्व अपराधांचा’ अंगीकार करावा लागत होता. ह्‍या जिवंत बकऱ्‍याला मग संपूर्ण राष्ट्राच्या पापाला लाक्षणिकपणे वाहून नेण्यासाठी रानात सोडले जाई. अशा प्रकारे दर वर्षी “याजक व मंडळीतील सर्व लोक ह्‍यांच्यासाठी” प्रायश्‍चित्त केले जात होते.—लेवीय १६:१६, २१, २२, ३३.

१५. (अ) कशा प्रकारे शलमोनाचे मंदिर निवासमंडपासारखेच होते? (ब) निवासमंडप आणि मंदिर या दोन्ही ठिकाणी होणाऱ्‍या पवित्र सेवांविषयी इब्री लोकांस पुस्तक काय म्हणते?

१५ देवाचे करारबद्ध लोक या नात्याने इस्राएलच्या इतिहासाच्या सुरवातीच्या ४८६ वर्षांपर्यंत, हे जंगम निवासमंडप त्यांच्यासाठी त्यांचा देव, यहोवा याची उपासना करण्याचे एक ठिकाण होते. मग, इस्राएलच्या शलमोनाला एक कायमस्वरूपी बांधकामाचा सुहक्क देण्यात आला. हे मंदिर आकाराने अधिक मोठे आणि भव्य हवे असले तरीही, पुरवलेल्या ईश्‍वरी योजनेने निवासमंडपाचीच रचना अनुसरली. निवासमंडपाप्रमाणे, ते यहोवाच्या उपासनेसाठी एक अधिक मोठे, अधिक प्रभावकारी योजना होती जे ‘माणसाचे नव्हे तर प्रभूचे होते.’—इब्री लोकांस ८:२, ५; ९:९, ११.

पहिले आणि दुसरे मंदिर

१६. (अ) मंदिराचे समर्पण करताना शलमोनाने कोणती प्रेमळ विनंती केली? (ब) शलमोनाची प्रार्थना स्वीकारल्याचे यहोवाने कसे दाखवले?

१६ त्या भव्य मंदिराचे समर्पण करताना, शलमोनाने या प्रेरित विनंतीचा समावेश केला: “तुझ्या इस्राएल लोकांतला नव्हे असा कोणी परदेशीय . . . परदेशाहून आला, आणि त्याने येऊन ह्‍या मंदिराकडे तोंड करून प्रार्थना केली, तर तू आपल्या स्वर्गातील निवासस्थानातून ती ऐक व हा परदेशीय ज्या कशासाठी तुझा धावा करील ते कर; म्हणजे या भूतलावरील सर्व देशांचे लोक तुझे नाम ओळखून तुझ्या इस्राएल लोकाप्रमाणे तुझे भय बाळगितील आणि मी जे हे मंदिर बांधले आहे त्यावर तुझे नाम आहे हे त्यांस कळून येईल.” (२ इतिहास ६:३२, ३३) एका स्पष्ट मार्गाने, देवाने शलमोनाच्या समर्पण प्रार्थनेला त्याची स्वीकृती दर्शवली. स्वर्गातून अग्नीचा एक लोळ खाली पडला, व त्याने वेदीवरील प्राण्याची अर्पणे भस्म केली आणि संपूर्ण मंदिर परमेश्‍वराच्या तेजाने भरून गेले.—२ इतिहास ७:१-३.

१७. शलमोनाने बांधलेल्या मंदिराचे कालांतराने काय झाले व का?

१७ पण दुःखाची गोष्ट अशी, की इस्राएल लोकांनी यहोवाबद्दलचे त्यांचे हितकारक भय गमावले. कालांतराने, त्यांनी रक्‍तपात, मूर्तीपूजा, व्यभिचार, गोत्रगमन आणि अनाथ, विधवा व विदेशी यांच्याशी गैरवागणूक, यांसारख्या कृत्यांनी त्याच्या महान नावाचा अनादर केला. (यहेज्केल २२:२, ३, ७, ११, १२, २६, २९) अशा प्रकारे, सा. यु. पू. ६०७ या वर्षी, मंदिराचा नाश करण्यासाठी बॅबिलोनी सैन्याला आणून देवाने त्यांचा न्यायनिवाडा केला. उरलेल्या इस्राएल लोकांना बॅबिलोनमध्ये बंदिवासात नेण्यात आले.

१८. दुसऱ्‍या मंदिरात, यहोवाच्या उपासनेला पूर्ण अंतःकरणाने पाठबळ देणाऱ्‍या गैर-इस्राएल लोकांना कोणते विशेषाधिकार मिळू लागले?

१८ ७० वर्षांनंतर, पश्‍चात्तापी यहुदी शेष जेरूसलेमेस परतला व त्याला यहोवाच्या मंदिराची पुनर्बांधणी करण्याचा सुहक्क देण्यात आला. या दुसऱ्‍या मंदिरात सेवा करण्यासाठी याजक आणि लेवी कमी पडले ही गोष्ट आस्थेची आहे. म्हणून, गैर-इस्राएली मंदिर सेवकांतून आलेले नथीनीम यांना देवाच्या भवनाचे सेवक म्हणून मोठे विशेषाधिकार बहाल करण्यात आले. परंतु, ते याजक आणि लेव्यांच्या बरोबरीचे कधीच होऊ शकले नाहीत.—एज्रा ७:२४; ८:१७, २०.

१९. दुसऱ्‍या मंदिराविषयी देवाने कोणते अभिवचन दिले, व हे शब्द कसे पूर्ण झाले?

१९ हे दुसरे मंदिर पूर्वीच्या मंदिरासमोर काहीच नसेल असे सुरवातीला वाटले होते. (हाग्गय २:३) पण यहोवाने अभिवचन दिले: “मी सर्व राष्ट्रांस हालवून सोडीन म्हणजे सर्व राष्ट्रांतील निवडक वस्तु येतील; आणि मी हे मंदिर वैभवाने भरीन . . . या मंदिराचे शेवटले वैभव पहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल.” (हाग्गय २:७, ९) भाकीत केल्याप्रमाणे या दुसऱ्‍या मंदिराला मोठे वैभव लाभले. ते १६४ वर्षे टिकले आणि पुष्कळ देशांतील पुष्कळ उपासक त्याच्या अंगणात एकत्र आले. (पडताळा प्रेषितांची कृत्ये २:५-११.) हेरोद राज्याच्या अमदानीत दुसऱ्‍या मंदिराच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले व त्याचे अंगण आणखी मोठे करण्यात आले. उंचावलेले भरभक्कम दगडी व्यासपीठ आणि भोवती सुंदर देवड्या असलेले मंदिर, शलमोनाने बांधलेल्या पहिल्या मंदिरापेक्षा किती तरी पटीने अधिक भव्य दिसत होते. त्यामध्ये यहोवाची उपासना करू इच्छिणाऱ्‍या इतर राष्ट्रांतील लोकांसाठी बाहेर एक मोठे अंगण होते. विदेशांसाठी असलेल्या अंगणाला आणि केवळ इस्राएल लोकांसाठी आरक्षिलेल्या आतील अंगणाला दुभागणारी एक दगडी भिंत होती.

२०. (अ) कोणता उल्लेखनीय फरक पुनर्बांधलेल्या मंदिराला चिन्हित करीत होता? (ब) यहुद्यांनी मंदिराविषयी चुकीचा दृष्टिकोन बाळगला हे कशा वरून दिसून आले व याच्या प्रतिक्रियेत येशूने काय केले?

२० देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याने मंदिराच्या अंगणात शिक्षण देण्याद्वारे ह्‍या दुसऱ्‍या मंदिराला बहुमान मिळाला. पण पहिल्या मंदिराप्रमाणेच सर्वसामान्यपणे यहुद्यांनी देवाच्या भवनाचे रक्षक होण्याच्या सुहक्काचा योग्य दृष्टिकोन बाळगला नाही. त्यांनी तर विदेशांच्या अंगणात व्यापाऱ्‍यांना व्यापार करण्याची सुद्धा परवानगी दिली. शिवाय, जेरूसलेमेत कोठेही सामानसुमान नेण्यासाठी मंदिरातून शॉर्ट-कट मारण्यास लोकांना परवानगी देण्यात आली होती. येशूने त्याच्या मृत्यूच्या चार दिवस आधी, “‘. . . माझ्या घराला सार्वराष्ट्रीय प्रार्थनामंदिर म्हणतील,’ असा शास्त्रलेख आहे ना? परंतु तुम्ही तर ही लुटारूंची गुहा करून टाकली आहे,” असे सतत म्हणून अशा अधार्मिक रीतींना काढून टाकले.—मार्क ११:१५-१७.

देव त्याच्या पार्थिव भवनाचा कायमचाच त्याग करतो

२१. जेरूसलेमच्या मंदिराविषयी येशूने काय सूचित केले?

२१ देवाच्या शुद्ध उपासनेला उंचावून धरण्यासाठी येशूने धैर्याने केलेल्या कृतीमुळे यहुदी नेत्यांनी त्याला ठार मारण्याचा दृढनिश्‍चय केला. (मार्क ११:१८) आपला लवकरच वध केला जाणार आहे हे येशूला माहीत असल्यामुळे तो यहुदी नेत्यांना म्हणाला: “तुमचे घर तुम्हावर सोडले आहे.” (मत्तय २३:३७, ३८) त्यामुळे त्याने हे सूचित केले, की लवकरच जेरूसलेममधील स्वाभाविक मंदिरात होत असलेली उपासना देव स्वीकारणार नाही. ते आता “सार्वराष्ट्रीय प्रार्थनामंदिर” राहणार नव्हते. येशूच्या शिष्यांनी त्याला मंदिराच्या भव्य इमारती दाखवल्या तेव्हा तो त्यांना म्हणाला: “हे सर्व तुम्हाला दिसते ना? . . . येथे चिऱ्‍यावर असा एकहि चिरा राहणार नाही की जो पाडला जाणार नाही.”—मत्तय २४:१, २.

२२. (अ) मंदिराविषयीचे येशूचे शब्द कसे पूर्ण झाले? (ब) एका पार्थिव शहरावर आशा लावण्याऐवजी प्रारंभिक ख्रिश्‍चनांनी कशाची आशा बाळगली?

२२ येशूची भविष्यवाणी ३७ वर्षांनंतर म्हणजे रोमी सैन्यांनी सा. यु. ७० मध्ये जेरूसलेम आणि त्यातील मंदिराचा नाश केला तेव्हा पूर्ण झाली. देवाने खरोखरच त्याच्या स्वाभाविक भवनाचा त्याग केला होता हे त्यावरून नाट्यमयरीत्या शाबीत झाले. येशूने जेरूसलेममध्ये दुसऱ्‍या एका मंदिराच्या पुनर्बांधणीविषयी काहीही भाकीत केले नाही. त्या पार्थिव शहराविषयी, प्रेषित पौलाने हिब्रू ख्रिश्‍चनांना लिहिले: “आपल्याला येथे स्थायिक नगर नाही; तर जे नगर पुढे येणार आहे त्याची आपण वाट पाहत आहो.” (इब्री लोकांस १३:१४) प्रारंभिक ख्रिश्‍चनांनी, “स्वर्गीय यरुशलेम”—शहरासमान असलेल्या देवाच्या राज्याचा भाग होण्याची आतुरतेने वाट पाहिली. (इब्री लोकांस १२:२२) अशा प्रकारे यहोवाची शुद्ध उपासना आता पृथ्वीवरील एखाद्या स्वाभाविक मंदिरात केंद्रित नाही. आपण पुढील लेखात, “आत्म्याने व खरेपणाने” देवाची उपासना करू इच्छिणाऱ्‍या सर्वांसाठी त्याने जी सर्वोत्कृष्ट व्यवस्था केली आहे तिच्याबद्दल चर्चा करू या.—योहान ४:२१, २४.

उजळणीचे प्रश्‍न

◻ आदाम आणि हव्वेने देवाबरोबरचा कोणता नातेसंबंध गमावला?

◻ निवासमंडपाची वैशिष्ट्ये आपल्याला आस्थेची का वाटली पाहिजेत?

◻ निवासमंडपाच्या अंगणात होणाऱ्‍या सेवेतून आपण काय शिकतो?

◻ देवाने आपल्या मंदिराचा नाश का होऊ दिला?

[१०, ११ पानांवरील चित्रं]

हेरोदाने पुन्हा बांधलेले मंदिर

१. परम पवित्र

२. पवित्र

३. होमार्पणाची वेदी

४. गंगाळसागर

५. याजकांचे अंगण

६. इस्राएलचे अंगण

७. स्त्रियांचे अंगण

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा