देवाच्या जवळ या
“त्यांचे क्लेश मी जाणून आहे”
“यहोवा, पवित्र, पवित्र, पवित्र आहे.” (यशया ६:३, पं.र.भा.) या ईश्वरप्रेरित शब्दांवरून दिसून येते की यहोवा परमपवित्र आहे. पण कदाचित तुम्ही असा विचार कराल: ‘परमपवित्र असल्यामुळे यहोवा एखाद्या बेपर्वा, किंवा कोणालाही जवळ न करणाऱ्या व्यक्तीसारखा आहे का? अशा परमपवित्र देवाला माझी—माझ्यासारख्या पापी, अपरिपूर्ण मानवाची खरेच काळजी असेल का?’ या प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्याकरता आपण देवाने मोशेला उद्देशून बोललेल्या अतिशय दिलासा देणाऱ्या शब्दांचे परीक्षण करू या. हे शब्द आपल्याला निर्गम ३:१-१० यात वाचायला मिळतात.
एकदा मेंढरांची राखण करत असताना मोशेला एक अतिशय विलक्षण दृश्य दिसले. एक झुडूप अग्नीने जळत असूनही “ते भस्म झाले नाही” असे त्याला दिसले. (२ रे वचन) हा प्रकार आहे तरी काय हे शोधून काढण्यासाठी तो झुडपाजवळ गेला. तेव्हा, आपल्या देवदूताच्या माध्यमाने यहोवा अग्नीतून मोशेशी बोलला: “इकडे जवळ येऊ नको; तू आपल्या पायांतले जोडे काढ, कारण ज्या जागी तू उभा आहेस ती भूमि पवित्र आहे.” (५ वे वचन) जरा विचार करा: ते जळणारे झुडूप, पवित्र देव त्या ठिकाणी उपस्थित असण्याचे चिन्ह असल्यामुळे तेथील जमीनही पवित्र झाली होती!
मोशेशी बोलण्यामागे पवित्र देवाचा एक उद्देश होता. देवाने म्हटले: “मिसर देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ति मी खरोखर पाहिली आहे; त्यांच्या मुकादमांच्या जाचामुळे त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकला आहे; त्यांचे क्लेश मी जाणून आहे.” (७ वे वचन) देवाच्या लोकांना सोसावी लागणारी दुःखे त्याच्यापासून लपलेली नव्हती; शिवाय, त्यांच्या विनवण्यांकडेही त्याने दुर्लक्ष केले नाही. उलट, त्यांचे दुःख पाहून त्यालाही यातना झाल्या. देवाने काय म्हटले याकडे लक्ष द्या: “त्यांचे क्लेश मी जाणून आहे.” एका पुस्तकात “जाणून आहे” या वाक्यांशाबद्दल असे म्हटले आहे: “या शब्दांतून एखाद्याबद्दल कळकळ, ममता व करुणा असल्याचे दिसून येते.” यहोवाच्या शब्दांतून, त्याला आपल्या लोकांबद्दल किती काळजी वाटते, त्यांच्यावर त्याचे किती मनापासून प्रेम आहे हे दिसून येते.
तर मग, देवाने काय केले? त्याने आपल्या लोकांकडे फक्त दयाळुपणे पाहिले नाही व त्यांच्या विनवण्या त्याने फक्त सहानुभूतीने ऐकल्या नाहीत. तर या दयेमुळे व करुणेमुळे तो त्यांच्यासाठी कार्य करण्यास प्रवृत्त झाला. त्याने आपल्या लोकांना इजिप्तच्या गुलामीतून सोडवून त्यांना “दुधामधाचे प्रवाह जेथे वाहत आहेत अशा देशात” नेण्याचा संकल्प केला. (८ वे वचन) आणि हे कार्य त्याने मोशेवर सोपवले. यहोवा मोशेला म्हणाला: “तू मिसर देशातून माझे लोक इस्राएलवंशज यांस बाहेर [काढ].” (१० वे वचन) मोशेने विश्वासूपणे ही कामगिरी पार पाडली आणि सा.यु.पू. १५१३ मध्ये त्याच्या नेतृत्त्वाखाली इस्राएल लोक इजिप्तमधून बाहेर पडले.
यहोवा बदललेला नाही. आजही त्याचे उपासक ही खातरी बाळगू शकतात की त्यांच्यावर येणारी संकटे तो पाहतो आणि मदतीसाठी केलेल्या त्यांच्या प्रार्थनांकडे तो कान देतो. त्यांना होणाऱ्या यातनांची त्याला पुरेपूर जाणीव आहे. पण, यहोवाला आपल्या विश्वासू उपासकांबद्दल करुणा वाटते हे जरी खरे असले, तरी तो तेवढ्यावरच थांबत नाही. तर आपला दयाळू देव त्याच्या सेवकांसाठी कार्य करण्यास प्रवृत्त होतो कारण त्याला त्यांची “काळजी” आहे.—१ पेत्र ५:७.
देवाच्या करुणेमुळे आपल्याला आशादायी मनोवृत्ती बाळगण्याचे प्रोत्साहन मिळते. आपण अपरिपूर्ण असलो, तरी देवाच्या आज्ञांचे पालन करण्याद्वारे आपण त्याच्या नजरेत शुद्ध व पवित्र बनण्याचा प्रयत्न करू शकतो. (१ पेत्र १:१५, १६) नैराश्याला तोंड दिलेल्या व अगदी खचून गेलेल्या एका ख्रिस्ती स्त्रीला, जळणाऱ्या झुडपाबद्दलच्या मोशेच्या अहवालातून खूप सांत्वन मिळाले. ती म्हणते: “जमिनीवरच्या धुळीला जर यहोवा पवित्र करू शकतो तर मग माझ्यासारख्या व्यक्तीची परिस्थिती तितकी निराशादायी नाही. या विचाराने मला नैराश्यावर मात करण्यास खूप मदत झाली.”
पवित्र देव, यहोवा याच्याबद्दल तुम्हाला आणखी जाणून घ्यावेसे वाटते का? त्याच्यासोबत घनिष्ठ नातेसंबंध जोडणे शक्य आहे, कारण “तो आमची प्रकृति जाणतो; आम्ही केवळ माती आहो हे तो आठवितो.”—स्तोत्र १०३:१४. (w०९ ३/१)