वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwbr21 सप्टेंबर पृ. १-११
  • जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ
  • जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिकेसाठी संदर्भ—२०२१
  • उपशिर्षक
  • ६-१२ सप्टेंबर
  • १३-१९ सप्टेंबर
  • टेहळणी बुरूज१३ १/१५ ११ ¶२०
  • २०-२६ सप्टेंबर
  • २७ सप्टेंबर–३ ऑक्टोबर
  • ४-१० ऑक्टोबर
  • ११-१७ ऑक्टोबर
  • १८-२४ ऑक्टोबर
  • २५-३१ ऑक्टोबर
जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिकेसाठी संदर्भ—२०२१
mwbr21 सप्टेंबर पृ. १-११

जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ

६-१२ सप्टेंबर

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | अनुवाद ३३-३४

“यहोवाच्या ‘सर्वकाळाच्या हातांखाली’ सुरक्षित राहा”

इन्साइट-२ ५१

यशुरून

इस्राएल राष्ट्राचा सन्मान करण्याच्या हेतूने यहोवाने त्यांना दिलेलं हे एक नाव आहे. ग्रीक सेप्टुअजिंट मध्ये “यशुरून” हा शब्द “प्रिय” असा भाषांतरीत करण्यात आला आहे. यावरून या शब्दात आपुलकीची भावना असल्याचं दिसून येतं. या नावावरून इस्राएली लोकांना याची आठवण होत होती की यहोवाने त्यांच्याशी एक करार केलेला आहे आणि त्यामुळे त्यांना नैतिक रित्या शुद्ध राहणं गरजेचं आहे.—अनु ३३:५, २६; यश ४४:२.

टेहळणी बुरूज११ १०/१५ २६ ¶१८

“सर्व सांत्वनदाता देव” यहोवा याच्यावर भरवसा ठेवा

१८ मोशेने इस्राएल लोकांना बळ व सांत्वन देण्यासाठी एक गीत लिहिले. त्यात त्याने म्हटले: “अनादि देव तुझा आश्रय आहे, सनातन बाहूंचा तुला आधार आहे.” (अनु. ३३:२७) शमुवेल संदेष्ट्याने काही काळानंतर इस्राएलांना सांगितले: “परमेश्‍वराला अनुसरण्याचे सोडून दुसरीकडे वळू नका, तर मनोभावे परमेश्‍वराची सेवा करा; . . . परमेश्‍वर आपल्या थोर नामास्तव आपल्या लोकांचा त्याग करणार नाही.” (१ शमु. १२:२०-२२) आपण खऱ्‍या उपासनेद्वारे यहोवाला बिलगून राहिलो, तर तो कधीच आपला त्याग करणार नाही. तो नेहमी आपल्याला आवश्‍यक असलेला आधार देईल.

टेहळणी बुरूज११ ९/१५ १९ ¶१६

जीवनाच्या शर्यतीत धीराने धावा

१६ अब्राहामाप्रमाणेच, मोशेनेदेखील आपल्या जीवनकाळात देवाच्या प्रतिज्ञेची पूर्णता पाहिली नाही. इस्राएल लोक प्रतिज्ञात देशाच्या उंबरठ्यावर उभे होते तेव्हा मोशेला असे सांगण्यात आले: “जो देश मी इस्राएल लोकांना देत आहे तो तू समोर पाहशील पण तेथे तुझे जाणे होणार नाही.” याचे कारण, याआधी इस्राएल लोकांच्या बंडखोर वृत्तीमुळे चेतवले जाऊन त्याने व अहरोनाने ‘मरीबा नावाच्या झऱ्‍याजवळ इस्राएल लोकांदेखत [देवाचा] विश्‍वासघात केला’ होता. (अनु. ३२:५१, ५२) पण, यामुळे मोशे निराश झाला का, किंवा त्याने मनात राग बाळगला का? नाही. त्याने इस्राएल लोकांना आशीर्वाद दिला आणि शेवटी म्हटले: “हे इस्राएला, तू धन्य आहेस; परमेश्‍वराने उद्धरलेल्या राष्ट्रा, तुझ्यासमान कोण आहे? तो तुझ्या साहाय्याची ढाल आहे, तुझ्या प्रतापाची तरवार आहे.”—अनु. ३३:२९.

आध्यात्मिक रत्नं

टेहळणी बुरूज१५ २/१५ ६ ¶६

येशूप्रमाणे तुम्हीही नम्रता व दयाळूपणा दाखवाल का?

६ त्याचा स्वतःबद्दलचा दृष्टिकोन: पृथ्वीवर येण्याआधी येशूच्या जीवनात घडलेल्या एका घटनेबद्दल आपण बायबलमधल्या यहूदा या पुस्तकात वाचतो. (यहूदा ९ वाचा.) आद्यदेवदूत मीखाएल, म्हणजेच सर्वात प्रमुख देवदूत या नात्यानं येशूनं, “मोशेच्या शरीरासंबंधाने सैतानाला विरोध करून त्याच्याशी वाद घातला” असं तिथं सांगण्यात आलं आहे. मोशेच्या मृत्यूनंतर यहोवानं त्याचं शरीर कोणत्याही मानवाला सापडणार नाही अशा ठिकाणी पुरलं होतं. (अनु. ३४:५, ६) पण, मोशेच्या शरीराचा वापर करून इस्राएली लोकांना खोटी उपासना करायला लावण्याची कदाचित सैतानाची इच्छा असावी. दियाबलाचा दुष्ट हेतू नेमका काय होता हे आपल्याला माहीत नाही. पण मीखाएलनं धैर्यानं त्याला रोखलं एवढं मात्र खरं. एका पुस्तकानुसार “विरोध करून” आणि “वाद घातला” हे शब्द “न्यायालयातील खटल्याच्या संदर्भातही” वापरले जातात. यावरून, दियाबलाला मोशेचं शरीर घेण्याचा हक्क नसल्याचा मीखाएलनं दावा केला असावा, असं या पुस्तकात म्हटलं आहे. पण, सर्वात प्रमुख देवदूत असूनही आपला अधिकार मर्यादित आहे याची येशूला जाणीव होती. त्यामुळे त्यानं अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायाधीश असलेल्या यहोवावर सोडून दिला. सैतानाचा न्याय करण्याचा हक्क केवळ यहोवालाच आहे हे येशूला माहीत होतं. खरोखर, येशू किती नम्र होता!

१३-१९ सप्टेंबर

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | यहोशवा १-२

“यशस्वी होण्यासाठी काय करता येईल?”

टेहळणी बुरूज१३ १/१५ ८ ¶७

खंबीर व्हा यहोवा तुमच्यासोबत आहे!

७ देवाच्या इच्छेप्रमाणे करण्याकरता लागणारे धैर्य उत्पन्‍न करण्यासाठी आपण त्याच्या वचनाचा अभ्यास केला पाहिजे आणि शिकलेल्या गोष्टी अंमलात आणल्या पाहिजेत. मोशेनंतर इस्राएल लोकांचे नेतृत्व करण्यासाठी यहोशवाला निवडण्यात आले तेव्हा देवाने त्याला असे सांगितले: “तू खंबीर हो व खूप हिंमत धर, आणि माझा सेवक मोशे ह्‍याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ। . . . नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे; त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यशःप्राप्ती घडेल.” (यहो. १:७, ८) यहोशवाने या सल्ल्याचे पालन केले आणि तो यशस्वी झाला. आपणही तसेच केल्यास, आपण आणखी जास्त धैर्यवान बनू आणि देवाच्या सेवेत आपल्याला यशःप्राप्ती घडेल.

टेहळणी बुरूज१३ १/१५ ११ ¶२०

खंबीर व्हा यहोवा तुमच्यासोबत आहे!

२० या दुष्ट व समस्यांनी ग्रस्त असलेल्या जगात देवाच्या इच्छेनुसार वागणे मुळीच सोपे नाही. आपल्यावर परीक्षा येतीलच. पण, आपण एकटे नाही. देव आपल्यासोबत आहे. तसेच, त्याचा पुत्रही आपल्यासोबत आहे, जो मंडळीचे मस्तक आहे. त्यासोबतच यहोवाचे साक्षीदार असलेले जगभरातील ७० लाखांपेक्षा जास्त बंधुभगिनी आपल्यासोबत आहेत. त्या सर्वांसोबत मिळून आपणही विश्‍वास व्यक्‍त करत राहू या आणि सुवार्ता घोषित करत राहू या. या बाबतीत २०१३ चे वार्षिक वचन आपल्याला साहाय्यक ठरेल: “खंबीर हो आणि हिंमत धर। . . . यहोवा तुझा देव तुझ्याबरोबर आहे.”—यहो. १:९, NW.

आध्यात्मिक रत्नं

टेहळणी बुरूज०४ १२/१ ८ ¶६

यहोशवाच्या पुस्तकातील ठळक मुद्दे

२:४, ५—हेरांचा पिच्छा करत आलेल्या राजाच्या लोकांना राहाब चुकीची माहिती का देते? राहाब आपला जीव धोक्यात घालून हेरांना वाचवते कारण तिचा यहोवावर विश्‍वास बसला आहे. त्यामुळे, देवाच्या लोकांची हानी करू पाहणाऱ्‍या लोकांना, हेरांची माहिती देण्यात ती बाध्य नाही. (मत्तय ७:६; २१:२३-२७; योहान ७:३-१०) वास्तविक पाहता, राहाबला ‘तिच्या क्रियांमुळे’ आणि राजाच्या प्रतिनिधींची दिशाभूल करण्याच्या कृत्यामुळे देखील ‘नीतिमान ठरवण्यात आले.’—याकोब २:२४-२६.

२०-२६ सप्टेंबर

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | यहोशवा ३-५

“विश्‍वासाने केलेल्या कामावर यहोवा आशीर्वाद देतो”

इन्साइट-२ १०५

यार्देन

नकाशात पाहिलं तर गालील समुद्राच्या खालच्या बाजूला यार्देन नदीचा जो भाग आहे, त्याची खोली साधारण ३ ते १० फूट आणि नदीच्या पात्राची रुंदी अंदाजे ९० ते १०० फूट इतकी आहे. पण वसंत ऋतूत यार्देन नदीला पूर यायचा आणि पाणी नदीच्या पात्राबाहेर यायचं. त्यामुळे नदीची खोली आणि पात्राची रुंदीही खूप वाढायची. (यहो ३:१५) अशा परिस्थितीत इस्राएली लोकांनी ही नदी पार करणं धोकादायक होतं. त्यांच्यासोबत स्त्रिया आणि लहान मुलंसुद्धा होती. यरीहोजवळ खासकरून जास्त धोका होता. कारण आजसुद्धा या ठिकाणी नदीचा प्रवाह खूप जास्त असतो. त्यामुळे यार्देन नदीत उतरणारे बरेच लोक त्याच्या प्रवाहात वाहून जातात. पण यहोवाने चमत्कारिकपणे या नदीचा प्रवाह थांबवला आणि नदीचं पाणी ओसरून गेलं. त्यामुळे इस्राएली लोकांना ही नदी पार करता आली.—यहो ३:१४-१७.

टेहळणी बुरूज१३ ९/१५ १६ ¶१७

यहोवाच्या सूचनांचे आनंदाने पालन करा

१७ यहोवाच्या सेवेत केलेल्या कार्यांमुळे त्याच्यावरील आपला भरवसा कसा वाढू शकतो? उदाहरणार्थ, अभिवचन दिलेल्या देशात प्रवेश करणाऱ्‍या इस्राएल राष्ट्राचा विचार करा. यहोवाने याजकांना कराराचा कोश घेऊन यार्देन नदीत उतरण्यास सांगितले. पण ते नदीच्या जवळ आले तेव्हा कापणीच्या काळात पडणाऱ्‍या पावसामुळे नदी तुडुंब भरून वाहत असल्याचे त्यांनी पाहिले. आता इस्राएली लोक काय करणार होते? नदीच्या काठावर तंबू ठोकून नदीचे पाणी कमी होईपर्यंत ते काही आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त काळ तिथे थांबणार होते का? नाही, त्यांनी यहोवावर पूर्ण भरवसा दाखवला व त्याचे मार्गदर्शन पाळले. याचा परिणाम? अहवाल म्हणतो: “याजक नदीकाठी आले. त्यांनी पाण्यात पाऊल टाकले. आणि लगेच पाणी वाहायचे थांबले। . . . [याजक] नदीच्या मध्यावर आले व थांबले. सर्व इस्राएल लोक कोरड्या जमिनीवरून यार्देन पलीकडे निघून जाईपर्यंत ते तिथेच थांबले.” (यहो. ३:१२-१७, ईझी-टू-रीड व्हर्शन) इतक्या जोरात वाहणारे पाणी थांबल्याचे पाहून इस्राएली लोक किती आनंदी झाले असतील याचा जरा विचार करा. खरेच, यहोवाच्या मार्गदर्शनाचे पालन केल्यामुळे यहोवावरील त्यांचा भरवसा नक्कीच दृढ झाला असेल.

टेहळणी बुरूज१३ ९/१५ १६ ¶१८

यहोवाच्या सूचनांचे आनंदाने पालन करा

१८ हे खरे आहे की यहोवा आज त्याच्या लोकांकरता असे चमत्कार करत नाही, पण जेव्हा आपण त्याच्यावर भरवसा दाखवतो व त्याच्या मार्गदर्शनाचे पालन करतो तेव्हा तो आपल्याला आशीर्वाद देतो. देवाची क्रियाशील शक्‍ती आपल्यावर सोपवलेले काम करण्यास अर्थात जगभरात राज्याची सुवार्ता सांगण्यास मदत करते. आणि येशू ख्रिस्त जो यहोवाचा सर्वात महत्त्वाचा साक्षीदार आहे त्याने त्याच्या शिष्यांना असे वचन दिले की या महत्त्वाच्या कार्यात तो त्यांच्यासोबत आहे. त्याने म्हटले: “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा . . . युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.” (मत्त. २८:१९, २०) लाजाळू स्वभाव असल्यामुळे किंवा भीती वाटत असल्यामुळे बऱ्‍याच यहोवाच्या साक्षीदारांना इतरांशी संभाषण करणे कठीण जाते. पण देवाचा पवित्र आत्मा त्यांना सेवाकार्यात अनोळखी लोकांशी संभाषण करण्याचे धैर्य देतो.—स्तोत्र ११९:४६; २ करिंथकर ४:७ वाचा.

आध्यात्मिक रत्नं

टेहळणी बुरूज०४ १२/१ ९ ¶२

यहोशवाच्या पुस्तकातील ठळक मुद्दे

५:१४, १५—“परमेश्‍वराचा सेनापती” कोण आहे? वचनयुक्‍त देशाची लढाई सुरू करण्याआधी यहोशवाला धीर द्यायला आलेला सेनापती दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द “शब्द” अर्थात मानवपूर्व अस्तित्वातील येशू ख्रिस्त आहे. (योहान १:१; दानीएल १०:१३) देवाचे लोक आज आध्यात्मिक युद्धात भाग घेत असताना गौरवी येशू ख्रिस्त त्यांच्याबरोबर आहे ही शाश्‍वती किती विश्‍वास मजबूत करणारी आहे!

२७ सप्टेंबर–३ ऑक्टोबर

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | यहोशवा ६-७

“व्यर्थ गोष्टींपासून दूर राहा”

टेहळणी बुरूज१० ४/१५ २० ¶५

निरर्थक गोष्टींपासून आपली दृष्टी वळवा!

५ याच्या अनेक शतकांनंतर इस्राएल लोकांनी यरीहो शहरावर कब्जा केला तेव्हा त्या शहरातील काही वस्तू चोरण्यास आखान नावाच्या एका इस्राएली पुरुषाला त्याच्या डोळ्यांनी भुरळ घातली. इस्राएल लोकांनी त्या शहरातील काही विशिष्ट वस्तू यहोवाच्या भांडारात जमा कराव्यात व बाकीच्या सर्व नष्ट कराव्यात अशी आज्ञा देवाने त्यांना दिली होती. देवाने त्यांना अशी ताकीद दिली: “तुम्ही मात्र नाश करण्यास समर्पित केलेल्या वस्तूंपासून दूरच राहा. नाहीतर तुम्हाला मोह होऊन,” त्या शहरातील काही वस्तू तुम्ही घ्याल. आखानाने या आज्ञेचे उल्लंघन केले तेव्हा आय येथे इस्राएल लोकांना पराभव पत्करावा लागला आणि त्यांच्यापैकी अनेक जण मृत्यूमुखी पडले. आखानाचे कृत्य उघड केल्यानंतरच त्याने आपली चोरी कबूल केली. त्या वस्तू “मला दिसल्या तेव्हा मला लोभ सुटून मी त्या घेतल्या” असे त्याने म्हटले. डोळ्यांच्या वासनेमुळे आखानाला आपला जीव गमवावा लागला आणि त्यासोबतच “त्याचे जे काही होते नव्हते ते सर्व” नष्ट झाले. (यहो. ६:१८, १९, NW; ७:१-२६) आखानाने, जे मना करण्यात आले होते त्याची लालसा मनात बाळगली.

टेहळणी बुरूज९७ ८/१५ २८ ¶२

जे वाईट आहे त्याबद्दल का कळवावे?

अपराध सांगण्याचे एक कारण असे आहे, की त्यामुळे मंडळीतील शुद्धता टिकून राहण्यास मदत होते. यहोवा शुद्ध आणि पवित्र देव आहे. त्याची उपासना करणाऱ्‍यांनी आध्यात्मिकरीत्या व नैतिकरीत्या शुद्ध असले पाहिजे अशी त्याची अपेक्षा आहे. त्याचे प्रेरित वचन बोध करते: “तुम्ही आज्ञांकित मुले व्हा आणि अज्ञानावस्थेतील आपल्या पूर्वीच्या वासनांनुसार वागूवर्तू नका; तर तुम्हांस पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्हीहि सर्व प्रकारच्या आचरणांत पवित्र व्हा; कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे.’” (१ पेत्र १:१४-१६) अशुद्धता आचरणाऱ्‍या किंवा अपराध करणाऱ्‍या लोकांना वाग्दंड देण्यासाठी किंवा त्यांना बहिष्कृत करण्यासाठी पावले उचलली नाहीत तर त्यांच्यामुळे संपूर्ण मंडळी दूषित होऊ शकते व तिजवर यहोवाची अवकृपा राहते.—पडताळा यहोशवा, ७ अध्याय.

टेहळणी बुरूज१० ४/१५ २१ ¶८

निरर्थक गोष्टींपासून आपली दृष्टी वळवा!

८ डोळ्यांची वासना व देहाची वासना यांचा खऱ्‍या ख्रिश्‍चनांवरही प्रभाव पडतो. त्यामुळे आपण जे काही पाहतो व ज्याची मनोकामना करतो त्यांसंबंधी स्वतःला शिस्त लावण्याचे उत्तेजन बायबल आपल्याला देते. (१ करिंथ. ९:२५, २७; १ योहान २:१५-१७ वाचा.) आपली दृष्टी व मनोकामना यांचा एकमेकांशी किती जवळचा संबंध आहे याची नीतिमान पुरुष ईयोब याला जाणीव होती. त्याने म्हटले: “मी तर आपल्या डोळ्यांशी करार केला आहे; मी कोणा कुमारीवर नजर कशी जाऊ देऊ?” (ईयो. ३१:१) एखाद्या स्त्रीला वाईट हेतूने स्पर्श करणे तर दूरच, पण तसा विचारसुद्धा तो आपल्या मनात घोळू देणार नव्हता. अनैतिक विचारांपासून आपण आपले मन शुद्ध ठेवले पाहिजे यावर भर देताना येशूने म्हटले: “जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो [“पाहत राहतो,” NW] त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे.”—मत्त. ५:२८.

आध्यात्मिक रत्नं

टेहळणी बुरूज१५ ११/१५ १३ ¶२-३

वाचकांचे प्रश्‍न

प्राचीन काळात, शहराच्या भोवती वेढा देऊन ते काबीज करण्याची पद्धत अगदी सर्वसामान्य होती. हा वेढा जर जास्त काळासाठी असेल, तर शहरातील लोक साठवून ठेवलेलं अन्‍नधान्य वापरायचे. शेवटी जेव्हा शत्रू सैनिक त्या शहरावर चढाई करायचे, तेव्हा शहरातील इतर सर्व गोष्टींसोबत ते अन्‍नधान्यही लुटायचे. म्हणूनच, जेव्हा या पद्धतीनं नाश करण्यात आलेल्या पॅलेस्टाईनच्या शहरांचे अवशेष तपासण्यात आले, तेव्हा त्या ठिकाणी अन्‍नसाठा जवळजवळ संपल्याचं आढळून आलं. पण यरीहो शहराच्या बाबतीत मात्र असं नव्हतं. याविषयी सांगताना, बायबल इतिहासाचा पुरातत्व अहवाल देणारं एक पुस्तक (बिब्लिकल आर्किओलॉजी रिव्यू) म्हणतं, की “[यरीहोच्या] अवशेषांमध्ये, मातीच्या भांड्यांसोबत अतिशय मोठ्या प्रमाणात आढळलेली दुसरी गोष्ट म्हणजे धान्याचा साठा.” पुस्तक पुढे असं म्हणतं: “अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात धान्य सापडणं ही एक असामान्य गोष्ट आहे.”

बायबल म्हणतं, की इस्राएलांनी यरीहो शहरातील अन्‍नधान्य लुटलं नाही. कारण यहोवानं तशी आज्ञा त्यांना दिली होती. (यहो. ६:१७, १८) शिवाय, बायबल सांगतं, की इस्राएलांनी कापणीच्या हंगामानंतर, म्हणजे शहरात मोठ्या प्रमाणात धान्यसाठा असतो, तेव्हा यरीहोवर आक्रमण केलं. (यहो. ३:१५-१७; ५:१०) त्यामुळे यरीहो शहरात मोठ्या प्रमाणात मिळालेल्या धान्यावरून हे स्पष्ट होतं, की बायबलमध्ये सांगितल्यानुसार यरीहो शहराभोवती देण्यात आलेला वेढा अत्यंत कमी कालावधीचा होता.

४-१० ऑक्टोबर

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | यहोशवा ८-९

“गिबोनी लोकांकडून आपण काय शिकू शकतो?”

टेहळणी बुरूज०३ ६/१५ १२ ¶५

आपला निःपक्षपाती देव यहोवा याचे अनुकरण करा

यानंतर इस्राएल लोक यार्देन नदीजवळील सखल प्रदेशांपासून देशाच्या मध्यभागी असलेल्या डोंगराळ प्रदेशात चढत गेले. यहोवाच्या मार्गदर्शनानुसार यहोशवाने आय शहराजवळ आपल्या सैन्याला दबा धरून बसवले. (यहोशवा, अध्याय ८) इस्राएलने आय शहरावर विजय मिळवल्याची बातमी ऐकल्यावर अनेक कनानी राजे इस्राएलविरुद्ध लढाई करण्यास एकत्र आले. (यहोशवा ९:१, २) पण जवळच्या गिबोन नामक हिव्वी शहराच्या रहिवाशांची मात्र वेगळी प्रतिक्रिया होती. यहोशवा ९:४ सांगते, की “तेव्हा आपल्यापरीने त्यांनीहि कपटाची युक्‍ति योजिली.” यहोवाने कशाप्रकारे इस्राएल लोकांना ईजिप्तमधून सोडवले होते, तसेच सीहोन व ओग यांचा कशाप्रकारे पराजय केला होता याविषयी राहाबप्रमाणे त्यांनी देखील ऐकले होते. (यहोशवा ९:६-१०) इस्राएल लोकांचा विरोध करण्यात अर्थ नाही हे गिबोनी लोकांनी ओळखले होते. म्हणून त्यांनी गिबोनच्या व जवळपासच्या—कफीरा, बैराथ व किर्याथ-यारीम—या तीन शहरांच्या वतीने गिलगाल येथे यहोशवाकडे एक प्रतिनिधी मंडळ पाठवले. या लोकांनी यहोशवाला असे भासवले जणू ते दूर देशाहून आले होते. त्यांची युक्‍ती यशस्वी ठरली. यहोशवाने त्यांच्यासोबत एक करार केला आणि त्यांचे संरक्षण करण्याची हमी दिली. तीन दिवसांनंतर यहोशवा व इस्राएल लोकांना कळले की आपली फसवणूक करण्यात आली आहे. पण त्यांनी यहोवाची शपथ घेऊन करार केला होता त्यामुळे ते आपल्या शब्दाला जागले. (यहोशवा ९:१६-१९) यहोवाने याला संमती दिली का?

टेहळणी बुरूज११ ११/१५ ८ ¶१४

“आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नका”

१४ आपण सर्व अपरिपूर्ण आहोत; त्यामुळे निर्णय घेताना आपण सर्वांनीच, अगदी अनुभवी ख्रिस्ती वडिलांनीसुद्धा, यहोवाचे मार्गदर्शन घेण्याचे कधीच विसरू नये. चतुर गिबोनी लोकांनी आपली खरी ओळख लपवली व आपण एका दूरच्या देशातून आलो आहोत असे सांगितले, तेव्हा मोशेचा उत्तराधिकारी यहोशवा याने व इस्राएलच्या वडील जनांनी कशी प्रतिक्रिया दाखवली त्याचा विचार करा. त्यांनी यहोवाचे मार्गदर्शन न घेता गिबोनी लोकांसोबत शांतीचा करार केला. यहोवाने जरी सरतेशेवटी या कराराला मान्यता दिली असली, तरी यहोशवाने व इस्राएलच्या वडील जनांनी या बाबतीत आपले मार्गदर्शन घेतले नाही याचा अहवाल त्याने आज आपल्या फायद्यासाठी शास्त्रवचनांत नमूद केला आहे.—यहो. ९:३-६, १४, १५.

टेहळणी बुरूज०४ १०/१५ १८ ¶१४

‘हा देश फिरून पाहा’

१४ ते म्हणाले: “तुझा देव परमेश्‍वर ह्‍याचे नाव ऐकून तुझे दास फार दूर देशाहून आले आहेत.” (तिरपे वळण आमचे.) (यहोशवा ९:३-९) त्यांचे कपडे व त्यांच्याजवळ असलेली अन्‍नसामग्री पाहून खरोखरच ते दूर देशाहून आल्याचे भासत होते पण खरे पाहता गिबोन हे गिलगालपासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर होते. यहोशवाला त्यांच्या बोलण्यावर विश्‍वास बसला आणि त्याने व त्याच्या सरदारांनी गिबोन व त्याच्या आसपासच्या शहरांशी मैत्रीचा करार केला. आपला नाश होऊ नये म्हणून केवळ गिबोन्यांनी ही शक्कल लढवली होती का? नाही, उलट इस्राएलांच्या देवाची संमती मिळवण्याची उत्सुकता त्यांच्या कृतीवरून दिसून आली. यहोवाने गिबोनी लोकांना ‘परमेश्‍वराच्या वेदीसाठी लाकूडतोड्ये व पाणक्ये’ म्हणून सेवा करण्याची अनुमती दिली व ते बलिदानाच्या वेदीवर जाळण्याकरता लाकूड पुरवू लागले. (यहोशवा ९:११-२७) गिबोनी लोकांनी कुरकूर न करता यहोवाच्या सेवेत विनम्र कार्ये करण्याची तयारी दाखवली. त्यांच्यापैकी काहीजण बॅबिलोनहून परतल्यावर मंदिराच्या पुनर्बांधणीत सहभागी झालेल्या नेथिनिमांपैकी होते. (एज्रा २:१, २, ४३-५४; ८:२०) आपणही देवासोबत शांतीसंबंध कायम ठेवण्यास झटण्याद्वारे आणि देवाच्या सेवेत साधी कामे करण्याचीही तयारी दाखवण्याद्वारे गिबोन्यांच्या उदाहरणाचे अनुकरण करू शकतो.

आध्यात्मिक रत्नं

इन्साइट-१ १०३०

वधस्तंभावर लटकवणं

इस्राएली लोकांना दिलेल्या नियमशास्त्रानुसार, काही विशिष्ट प्रकरणांमध्ये गुन्हेगाराला फक्‍त मृत्यूची शिक्षाच दिली जात नव्हती, तर मेल्यानंतर त्याचा देह वधस्तंभावर लटकवून ठेवला जायचा. अशी व्यक्‍ती देवाकडून शापित आहे असं मानलं जायचं. शिवाय, इस्राएली लोकांना त्यातून इशाराही मिळायचा.

सेवाकार्यासाठी तयार व्हा

इन्साइट-१ ५२०; ५२५ ¶१

करार

“करार” असं भाषांतर केलेल्या इब्री शब्दाचा अर्थ आपण ज्याला कंत्राट, सौदा किंवा कॉन्ट्रॅक्ट म्हणतो, त्याच्याशी मिळता-जुळता आहे. त्यामुळे असं म्हणता येईल की दोन किंवा त्यापेक्षा जास्त लोकांमध्ये एखाद्या गोष्टीबद्दल झालेला ठराव म्हणजे करार. अशा ठरावात शक्यतो दोन्ही पक्षाचे लोक काय करायचं किंवा काय नाही करायचं ते ठरवतात.

यहोशवा आणि इस्राएली लोकांच्या प्रधानांनी गिबोनी लोकांसोबत करार केला होता. या करारानुसार इस्राएली लोकांनी गिबोनी लोकांना वचन दिलं होतं, की ते त्यांना जिवंत राहू देतील. गिबोनी लोकसुद्धा कनानी असल्यामुळे शापीत होते आणि इस्राएली लोकांनी खरंतर त्यांना मारून टाकायचं होतं. पण त्यांच्याशी केलेल्या करारामुळे इस्राएली लोकांनी त्यांना मारून टाकलं नाही. पण त्यांच्यावर असलेला शाप कायम असल्यामुळे, त्यांना इस्राएलच्या सगळ्या लोकांसाठी लाकूड तोडण्याचं आणि पाणी भरण्याचं काम देण्यात आलं.—यहो ९:१५, १६, २३-२७.

११-१७ ऑक्टोबर

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | यहोशवा १०-११

“यहोवा इस्राएलांच्या वतीने लढतो”

इन्साइट-१ ५०

अदोनी-सदेक

इस्राएली लोक वचन दिलेला देश काबीज करत होते त्या काळात, यरुशलेममध्ये असणारा हा एक राजा होता. जेव्हा गिबोनी लोकांनी यहोशवासोबत शांतीचा करार केला, तेव्हा अदोनी-सदेक खूप घाबरला. त्याला वाटलं की इतर राजेसुद्धा इस्राएलांना शरण जातील. म्हणून गिबोनवर हल्ला करण्यासाठी अदोनी-सदेकने इतर चार राजांसोबत मिळून कट रचला.

इन्साइट-१ १०२०

गारांचा पाऊस

यहोवाने वापरलेली एक नैसर्गिक शक्‍ती. आपलं अभिवचन पूर्ण करण्यासाठी आणि आपलं सामर्थ्य प्रकट करण्यासाठी यहोवाने कधीकधी या नैसर्गिक शक्‍तीचा वापर केला आहे. (स्तो १४८:१, ८; यश ३०:३०; निर्ग ९:१८-२६; स्तो ७८:४७, ४८; १०५:३२, ३३) वचन दिलेल्या देशात पाच अमोरी राजे गिबोनवर हल्ला करायला आले, तेव्हा इस्राएली लोक गिबोनी लोकांच्या मदतीसाठी धावून आले. यहोवाने अमोरी लोकांवर जोरदार गारांचा पाऊस पाडला. त्या वेळी युद्धात जितके लोक मारले गेले त्याहून जास्त लोक गारांमुळे मारले गेले.—यहो १०:३-७, ११.

टेहळणी बुरूज०४ १२/१ ११ ¶१

यहोशवाच्या पुस्तकातील ठळक मुद्दे

१०:१३—ही अनोखी घटना घडणे कसे शक्य आहे? स्वर्ग आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या यहोवाला “काही असाध्य आहे काय?” (उत्पत्ति १८:१४) यहोवाच्या मनात आले तर तो पृथ्वीच्या हालचालीत फेरफार करू शकतो ज्यामुळे पृथ्वीवर राहणाऱ्‍यांना, सूर्य आणि चंद्र स्तब्ध आहेत असे वाटेल. किंवा तो, पृथ्वी आणि चंद्राच्या हालचाली न बदलता, सूर्य आणि चंद्राच्या किरणांचे अशाप्रकारे वक्रीभवन करू शकतो ज्यामुळे या दोन्ही तेजस्वी गोलातून प्रकाश चमकत राहील. काहीही असो, मानव इतिहासात “असा दिवस त्यापूर्वी किंवा त्यानंतरही आला नाही.”—यहोशवा १०:१४.

आध्यात्मिक रत्नं

टेहळणी बुरूज०९ ३/१५ ३२ ¶५

वाचकांचे प्रश्‍न

बायबलमध्ये काही पुस्तकांचा उल्लेख आढळत असला व बायबलच्या इतर लिखाणांत या पुस्तकांचा संदर्भ घेण्यात आला असला तरीही ती ईश्‍वरप्रेरित लिखाणे होती असे नाही. पण, ‘आपल्या देवाच्या वचनात’ समाविष्ट असलेली सर्व लिखाणे यहोवा देवाने जतन करून ठेवली आहेत व ती ‘सर्वकाळ कायम राहतील.’ (यश. ४०:८) होय, आपण ‘पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावे’ म्हणून आवश्‍यक असलेली सर्व माहिती यहोवाने आज उपलब्ध असलेल्या ६६ पुस्तकांमध्ये जतन करून ठेवली आहे.—२ तीम. ३:१६, १७.

१८-२४ ऑक्टोबर

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | यहोशवा १२-१४

“पूर्ण मनाने यहोवाचं ऐका”

टेहळणी बुरूज०४ १२/१ १२ ¶२

यहोशवाच्या पुस्तकातील ठळक मुद्दे

१४:१०-१३. कालेब ८५ वर्षांचा होता तरीसुद्धा तो हेब्रोनच्या परिसरातल्या लोकांना पिटाळून लावण्याची कठीण कामगिरी मागून घेतो. अनाकी लोकांनी हा परिसर व्यापला होता; हे असामान्य आकाराचे लोक होते. पण चार पावसाळे पाहिलेला हा योद्धा यहोवाच्या मदतीने त्यांच्यावर विजय मिळवतो आणि हेब्रोन एक शरणपूर बनते. (यहोशवा १५:१३-१९; २१:११-१३) कालेबच्या उदाहरणातून आपल्याला, कठीण ईश्‍वरशासित नेमणुकी न टाळण्याचे उत्तेजन मिळते.

टेहळणी बुरूज०६ १०/१ १९ ¶११

विश्‍वास आणि देवाचे भय बाळगून धैर्यवान व्हा

११ अशाप्रकारच्या विश्‍वासाची नेहमी वाढ होत राहते, ती खुंटत नाही. आपण शिकत असलेल्या सत्याचे जसजसे आपण पालन करीत राहतो, त्याच्या लाभांचा “अनुभव” घेतो, आपल्या प्रार्थना पूर्ण होताना ‘पाहतो’ आणि इतर मार्गांद्वारे आपल्या जीवनात यहोवाच्या मार्गदर्शनाची आपल्याला जाणीव होते, तसतसा हा विश्‍वास वाढत राहतो. (स्तोत्र ३४:८; १ योहान ५:१४, १५) यहोशवा आणि कालेबने देवाचा चांगुलपणा चाखून पाहिल्यामुळे त्यांचा विश्‍वास वाढला होता, असे आपण खात्रीने म्हणू शकतो. (यहोशवा २३:१४) या मुद्द्‌यांचा विचार करा: देवाने त्यांना वचन दिले त्याप्रमाणे ते ४० वर्षांच्या अरण्य प्रवासातून सुखरूप आले होते. (गणना १४:२७-३०; ३२:११, १२) कनानवर विजय मिळवण्यासाठी इस्राएलांना सहा वर्षांपर्यंत संघर्ष करावा लागला. पण सरतेशेवटी, त्यांना दीर्घायुष्य आणि चांगले आरोग्य लाभले; शिवाय प्रत्येकाला त्याचा वारसाहक्क देखील मिळाला. जे यहोवाची विश्‍वासूपणे व धैर्याने सेवा करतात त्यांना तो सढळ हाताने प्रतिफळ देतो!—यहोशवा १४:६, ९-१४; १९:४९, ५०; २४:२९.

आध्यात्मिक रत्नं

इन्साइट-१ ९०२-९०३

गिबली

जो प्रदेश अजून ताब्यात घ्यायचा बाकी होता, त्याबद्दल बोलताना यहोवाने ‘गिबली लोकांच्या प्रदेशाचाही’ उल्लेख केला. (यहो १३:१-५) टिकाकारांचं असं म्हणणं आहे, की ही गोष्ट चुकीची आहे कारण गिबली लोकांचा प्रदेश इस्राएलच्या उत्तरेला खूप दूरवर आहे. (दानपासून १०० किमी दूर उत्तरेला) तसंच, काही तज्ञांना असं वाटतं, की मूळ इब्री लिखाणात कदाचित ‘गिबली लोकांचा प्रदेश’ असं म्हणण्याऐवजी “लबानोनला लागून असलेला प्रदेश” किंवा “गिबली लोकांच्या सीमेपर्यंतचा प्रदेश” असं म्हटलं असावं. पण नंतर या वचनातले शब्द पुसले गेले असावेत. कारण असं दिसून येतं, की इस्राएलांनी त्यावर कधीच कब्जा केला नव्हता. पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, की यहोशवा १३:२-७ मध्ये यहोवाने सांगितलेल्या गोष्टी पूर्ण व्हायच्या असतील तर त्यासाठी इस्राएली लोकांनी यहोवाला आज्ञाधारक राहणं गरजेचं होतं. पण इस्राएली लोकांनी यहोवाची आज्ञा पाळली नाही. त्यामुळे कदाचित हा प्रदेश त्यांना ताब्यात घेता आला नाही.—यहो २३:१२, १३ सोबत तुलना करा.

२५-३१ ऑक्टोबर

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | यहोशवा १५-१७

“तुम्हाला मिळालेल्या अनमोल वारशाचं रक्षण करा”

इन्साइट-१ १०८३ ¶३

हेब्रोन

हे खरंय, की इस्राएलांनी यहोशवाच्या नेतृत्त्वाखाली हेब्रोन ताब्यात घेतलं होतं. पण त्यानंतर या जिंकलेल्या नवीन प्रदेशाचं संरक्षण करण्यासाठी तिथे लगेच सैन्य तैनात केलं नव्हतं. असं दिसतं की, जेव्हा इस्राएली लोकांचं दुसऱ्‍या ठिकाणी युद्ध सुरू होतं, तेव्हा अनाकी लोकांनी हेब्रोन पुन्हा ताब्यात घेतलं. हे शहर वारसा म्हणून कालेबला देण्यात आलं होतं. त्यामुळे त्याला (किंवा कालेबच्या नेतृत्त्वाखाली यहूदाच्या मुलांना) तो प्रदेश अनाकी लोकांपासून पुन्हा ताब्यात घ्यावा लागला.—यहो ११:२१-२३; १४:१२-१५; १५:१३, १४; शास १:१०.

इन्साइट-१ ८४८

गुलाम

वचन दिलेल्या देशात पोचल्यानंतर, इस्राएलांनी यहोवाची आज्ञा पाळली नाही. सर्व कनानी लोकांना आपल्या प्रदेशातून घालवून देऊन त्यांचा नाश करण्याऐवजी, इस्राएली लोकांनी त्यांना आपले गुलाम म्हणून ठेवलं. पण याचा काय परिणाम झाला? कनानी लोकांनी इस्राएली लोकांना आपल्या जाळ्यात अडकवलं आणि ते खोट्या देवतांची उपासना करू लागले.—यहो १६:१०; शास १:२८; २:३, ११, १२.

इन्साइट-१ ४०२ ¶३

कनान

इस्राएलांनी कनानमध्ये जी युद्धं लढली त्यात सर्वच कनानी लोकांचा नाश झाला नाही. पण यहोवाने “इस्राएली लोकांच्या वाडवडिलांना वचन दिल्याप्रमाणे सगळा देश इस्राएली लोकांना दिला.” त्यांना “चारही बाजूंनी शांती” मिळाली. आणि “इस्राएलच्या घराण्यांना चांगल्या गोष्टींबद्दल दिलेल्या सर्व अभिवचनांपैकी एकही अभिवचन निष्फळ ठरलं नाही. त्यापैकी प्रत्येक अभिवचन पूर्ण झालं.” (यहो २१:४३-४५) इस्राएलच्या आसपासच्या सर्व शत्रू राष्ट्रांना इस्राएली लोकांची दहशत होती. त्यांना कोणत्याही शत्रूकडून धोका नव्हता. कनानी लोकांकडे भयंकर शस्त्रास्त्र होती. (चाकांना लांब सुऱ्‍या असलेले ९०० लोखंडी रथ) त्यामुळे इस्राएली लोकांना त्यांची खूप भीती वाटत होती. पण यहोवाने त्यांना आश्‍वासन दिलं होतं, की तो त्यांच्या सर्व शत्रूंना त्यांच्या हातात देईल. (यहो १७:१६-१८; शास ४:१३) पण पुढे कनानी शत्रूंशी लढताना इस्राएली लोकांना काही वेळा हार मानावी लागली. याचं कारण यहोवा नव्हता तर त्यांचा अविश्‍वासूपणा होता.—गण १४:४४, ४५; यहो ७:१-१२.

आध्यात्मिक रत्नं

टेहळणी बुरूज१५ ७/१५ ३२

तुम्हाला माहीत होतं का?

बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे प्राचीन इस्राएलात खरंच खूप झाडं होती का?

बायबल सांगतं की अभिवचन दिलेल्या देशातील काही भागात झाडं अगदी “विपुल” प्रमाणात होती. (१ राजे १०:२७; यहो. १७:१५, १८) पण, सध्या या क्षेत्रात झाडांचं प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे, तिथं पूर्वी खरंच पुष्कळ प्रमाणात झाडं होती का, अशी शंका टीकाकार व्यक्‍त करतात.

‘लाईफ इन बिब्लिकल इस्राएल’  या पुस्तकात स्पष्ट करण्यात आलं आहे, की “प्राचीन इस्राएलमध्ये आजच्या तुलनेत खूप जास्त प्रमाणात झाडं होती.” तिथल्या डोंगराळ प्रदेशात खासकरून पाईन, ओक आणि एलोन जातीच्या वृक्षांचं प्रमाण जास्त होतं. तसंच, मध्य पर्वतरांग आणि भूमध्य सागर किनारपट्टी यांच्यामध्ये असलेल्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उंबराची झाडंदेखील होती.

‘प्लान्ट्‌स ऑफ द बायबल’  या पुस्तकात सांगितल्यानुसार, इस्राएलमधील काही क्षेत्रात आज झाडं दिसतच नाहीत. याचं कारण हे पुस्तक असं देतं, “लोकांनी जनावरांच्या चाऱ्‍यासाठी, शेतीसाठी, तसंच बांधकाम आणि जळणासाठी लाकूडतोड केली आणि यामुळे हळूहळू तिथली झाडं कमी होत गेली.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा