त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा
प्रार्थनेद्वारे तिने यहोवासमोर आपले मन मोकळे केले
आपल्या समस्यांचा विचार करायचा नाही, असा मनात निश्चय करून हन्नाने प्रवासाची तयारी करण्यात स्वतःला गुंतवून ठेवले. तो खरे तर आनंदाचा काळ होता. तिचा पती एलकाना, आपल्या कुटुंबाला शिलो येथील निवासमंडपात यहोवाच्या उपासनेसाठी दर वर्षाप्रमाणे, याही वर्षी नेणार होता. या प्रसंगांमुळे लोकांनी आनंदी व्हावे अशी यहोवाची इच्छा होती. (अनुवाद १६:१५) यात काही शंका नाही, की हन्नाही लहानपणापासून हे सण आनंदाने साजरे करत असावी. पण अलिकडच्या वर्षांत परिस्थिती जरा बदलली होती.
जिवापाड प्रेम करणारा नवरा तिला लाभला होता. पण एलकानाला आणखी एक बायको होती. तिचे नाव होते पनिन्ना. हन्नाचे जीवन नकोसे करण्याचा तिने जणूकाय चंगच बांधला होता. दरवर्षाच्या या सणासुदीच्या दिवसांत, हन्नाच्या आनंदात विरजण कसे घालायचे हे पनिन्नाला समजले होते. काय करायची ती? पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हन्ना यहोवावरील विश्वासाने या अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीवर कशी काय मात करू शकली? जीवनातला तुमचा आनंद शोषून घेणाऱ्या परिस्थिती तुमच्यावर आल्या तर हन्नाचे उदाहरण तुम्हाकरता खासकरून प्रेरणादायक ठरेल.
“तुझे हृदय खिन्न का?”
हन्नाच्या जीवनात दोन मोठाल्या समस्या आल्या होत्या, असे बायबलमध्ये म्हटले आहे. पहिल्या समस्येच्या बाबतीत ती काहीही करू शकत नव्हती आणि दुसरी समस्यासुद्धा तिच्या हाताबाहेर होती. पहिली गोष्ट म्हणजे, तिच्या नवऱ्याच्या दोन बायका होत्या; तिची सवत तिचा द्वेष करायची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हन्ना वांझ होती. मुले प्रसवू इच्छिणाऱ्या कोणत्याही बायकोसाठी हा जणू काय एक शापच होता; आणि हन्नाच्या काळातल्या संस्कृतीनुसार ही अतिशय दुःखद गोष्ट होती. प्रत्येक कुटुंब आपल्या कुटुंबाचे नाव पुढे चालू ठेवण्याकरता जास्तीत जास्त मुलांना जन्म देण्यावर भर द्यायचे. आणि अशा वेळी, एखाद्या स्त्रीचा वांझपणा ही लज्जास्पद गोष्ट मानली जायची.
हन्नाला जर सवत नसती म्हणजे पनिन्ना नसती तर तिला तिची परिस्थिती यशस्वीपणे सहन करता आली असती. बहुपत्नी करण्याची पद्धत केव्हाच बरोबर नव्हती. ही पद्धत आचरणाऱ्यांच्या पदरी द्वेष, झगडे, मानसिक दुःख हेच पडत होते. एदेन बागेत यहोवा देवाने घालून दिलेल्या एकपत्नीत्वाच्या पद्धतीपासून ही पद्धत खूपच वेगळी होती.a (उत्पत्ति २:२४) त्यामुळे बहुपत्नीत्वाविषयी बायबलमध्ये दिलेले वर्णन सकारात्मक वाटत नाही; आणि एलकानाच्या घरातल्या वातावरणाचे वर्णन देखील मनाला झोंबेल असे असल्यामुळे बायबल बहुपत्नीत्वाविषयी एक भकास चित्र रेखाटते.
एलकानाचे हन्नावर अतिशय प्रेम होते. यहुदी परंपरेनुसार हन्ना ही एलकानाची पहिली पत्नी होती आणि काही वर्षांनंतर त्याने पनिन्नाबरोबर लग्न केले. पण पनिन्नाला हन्नाचा खूप हेवा वाटायचा. तिचे जीवन होता होईल तितके असह्य करण्याचा ती प्रयत्न करत होती. पनिन्नाला मुले होती पण हन्नाला मुलबाळ नसल्यामुळे तिला चिडवण्याचे पन्निनाला कारण मिळाले होते. पनिन्नाला एकापाठोपाठ मुले होत होती, त्यामुळे ती स्वतःला श्रेष्ठ समजत होती. हन्नाबद्दल वाईट वाटण्याऐवजी, तिला सांत्वन देण्याऐवजी पनिन्ना जणू हन्नाच्या जखमेवर मीठ चोळत होती. पनिन्ना “तिला मनस्वी चिडवी, तेणेकरून ती कुढत राही,” असे बायबलमध्ये म्हटले आहे. (१ शमुवेल १:६) पनिन्ना असे मुद्दामहून वागत होती. हन्नाचा जीव मेटाकुटीस आणण्याचा तिचा हेतू होता व त्यात ती सफल झाली होती.
दर वर्षाप्रमाणे शिलोच्या धार्मिक पर्यटनाची वेळ आली होती. पनिन्नाला आणखीन एकदा तिची आवडती संधी अर्थात हन्नाला चिडवण्याची संधी मिळणार होती. एलकाना जेव्हा यहोवाला यज्ञ करी, तो पनिन्नाच्या सर्व “पुत्रांस व कन्यांस” त्या यज्ञाचा वाटा देत असे. पण मुलबाळ नसलेल्या हन्नाला फक्त तिचा एकच हिस्सा मिळत असे. नेहमीप्रमाणे यावर्षीसुद्धा असेच झाले. हन्नाला तिचा एकच हिस्सा मिळाला. यावर पनिन्नाने तिला खिजवून तिच्या वांझपणावर इतके चिडवले की बिचारी हन्ना रडूनरडून बेजार झाली, खाण्यावरून तिचे मनच उडून गेले. हन्नाची ही अवस्था एलकानाच्या नजरेतून सुटली नाही. त्याने तिला सांत्वन देण्याचा प्रयत्न केला. तो तिला म्हणाला: “तू का रडतेस? तू अन्नपाणी का वर्जिले? तुझे हृदय खिन्न का? मी तुला दहा पुत्रांपेक्षा अधिक नाही काय?”—१ शमुवेल १:४-८.
एलकानाच्या बोलण्यावरून आपल्याला कळते, की हन्नाच्या वांझपणामुळे ती अतिशय दुःखी झाल्याचे त्याला समजले. एलकानाचे तिच्यावर खरोखरच प्रेम आहे, याची हन्नाला खात्री होती.b पण एलकानाने पनिन्नाच्या वाईट वागणूकीचा कधीही उल्लेख केला नाही किंवा हन्नानेही याबद्दल त्याच्याकडे कुरकुर केल्याचे अहवालात म्हटलेले नाही. पनिन्नाच्या वाईट वागणुकीबद्दल एलकानाला सांगितल्याने आपलाच तोटा होईल, हे कदाचित हन्नाला माहीत असावे. आणि जरी तिने एलकानाला सांगितले असते तरी, एलकाना यावर खरोखर काही तोडगा काढू शकत होता का? उलट पनिन्ना तिच्यावर आणखीनच खार खाऊन वागली असती शिवाय तिची मुले व नोकर-चाकर हन्नाशी नीट वागले नसते. आणि असे जर झाले असते तर हन्नाला स्वतःच्याच घरात परक्यासारखे वाटले असते.
पनिन्नाच्या लहान-सहान वाटणाऱ्या कुरघोडींविषयी एलकानाला जाणीव होती किंवा नाही हे आपल्याला माहीत नाही, पण यहोवा देवाच्या नजरेतून मात्र हे सुटले नाही. त्याच्या वचनात आपल्याला याबद्दलची सविस्तर माहिती मिळते. यावरून कळते, की बायबल लहान-सहान बाबतीतही द्वेषभावाने किंवा मत्सराने वागणाऱ्यांविरूद्ध ताकीद देते. दुसऱ्या बाजूला पाहता, हन्नासारख्या प्रामाणिक व शांतीप्रिय लोकांना हा दिलासा देण्यात आला आहे, की न्यायप्रिय देव त्याच्या योग्य समयी व योग्य मार्गाने न्याय देईल. (अनुवाद ३२:४) हे हन्नाला कदाचित माहीत असावे म्हणूनच तर ती मदतीसाठी यहोवाकडे वळाली.
‘ती उदास राहिली नाही’
पहाटेच सर्वांची लगबग सुरू झाली. सर्व जण, घरातली चिली-पिली सुद्धा प्रवासाच्या तयारीला लागली. एवढ्या मोठ्या परिवाराला, एफराईमच्या डोंगराळ भागातून शिलोला जायला सुमारे ३० किलोमीटरचा प्रवास करावा लागणार होता.c शिवाय पायी कराव्या लागणाऱ्या या प्रवासाला निदान एक-दोन दिवस तरी लागणार होते. दरवर्षाप्रमाणे याही वर्षी आपली सवत आपल्याशी कशी वागेल, हे हन्नाला माहीत होते. तरीपण हन्ना घरी राहिली नाही. आजच्या दिवसांतील यहोवाच्या उपासकांसाठी तिने एक उल्लेखनीय उदाहरण मांडले. इतरांच्या वाईट वागणुकीने आपण यहोवा देवाची उपासना करायचे थांबवू नये. असे जर आपण केले तर, विश्वासात टिकून राहण्याकरता लागणारे आशीर्वादच आपण गमावून बसू.
नागमोडी वळणमाथ्याच्या रस्त्यांवरून चालत चालत हे कुटुंब एकदाचे शिलोजवळ पोचले. एका लहानशा टेकाडावर हे कुटुंब विसावले. टेकाडाच्या चहुबाजूंनी उंच-उंच डोंगर उभे होते. त्यानंतर जसजसे ते मंदिराच्या जवळ येऊ लागले तसतसे हन्नाच्या मनात, यहोवाला आपण प्रार्थनेत काय काय सांगू शकतो, याचा विचार चालला असावा. शिलोत पोचल्याबरोबर सर्व कुटुंबाने आधी जेवण उरकून घेतले. त्यानंतर हन्ना एकटीच यहोवाच्या मंदिरात गेली. प्रमुख याजक एली मंदिराच्या दारापाशीच बसला होता. पण हन्नाच्या मनात मंदिरात जाऊन प्रार्थना करण्याचाच विचार चालला होता. यहोवा माझी प्रार्थना जरूर ऐकेल हा भरवसा तिला होता. तिला होणाऱ्या मानसिक यातना इतरांना कळू शकत नसल्या तरी, स्वर्गातील तिच्या पित्याला त्या नक्कीच समजणार होत्या. तिचे ऊर भरून आले, तिचा बांध फुटला.
हुंदके देऊन रडत असल्यामुळे तिचे शरीर हलत होते. हन्नाने मनातल्या मनात यहोवासमोर आपले मन मोकळे केले. तिच्या मनातील भावना व्यक्त करताना तिचे ओठ हलत होते. ती खूप वेळपर्यंत मनात जे काही होते ते यहोवाला प्रार्थनेत सांगत होती. आपल्याला मूल द्यावे, फक्त इतकीच विनंती तिने देवाला केली नाही. हन्ना फक्त देवाचे आशीर्वादच मागत नव्हती तर तिला जे जमेल ते ती यहोवाला देण्याचे वचन देत होती. तिने यहोवाला म्हटले, की जर त्याने तिला एक पुत्र दिला तर आयुष्यभर ती त्याला यहोवाच्या मंदिरात सेवा करण्यासाठी समर्पित करेल.—१ शमुवेल १:९-११.
प्रार्थना करण्याच्या बाबतीत हन्नाने देवाच्या सर्व सेवकांपुढे एक उत्तम उदाहरण मांडले. आपल्या लोकांनी आपल्याला खुल्या मनाने, कसलाही संकोच न बाळगता प्रार्थना करावी; एक मूल जसे आपल्या प्रेमळ पालकासमोर आपल्या चिंता व्यक्त करते तसे आपणही करावे, असे यहोवा आपल्याला अगदी दयाळुपणे सांगतो. (स्तोत्र ६२:८; १ थेस्सलनीकाकर ५:१७) यहोवाला आपण प्रार्थना कशी करू शकतो याबाबतीत प्रेषित पेत्राला हे सांत्वनदायक शब्द लिहिण्याची प्रेरणा मिळाली: “त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो.”—१ पेत्र ५:७.
पण मानव, यहोवाप्रमाणे समंजस व सहानुभूतीशील नाहीत. हन्ना रडतरडत प्रार्थना करत असताना अचानक तिला कोणाचा तरी आवाज ऐकू येतो आणि ती चकीत होते. तो आवाज प्रमुख याजक एलीचा असतो जो तिला खूप वेळ पासून पाहत होता. तो तिला म्हणाला: ‘तू अशी कोठवर नशेत राहणार? तू ह्या आपल्या द्राक्षारसाच्या नशेतून मुक्त हो.’ प्रार्थना करताना हन्नाचे हलणारे ओठ, तिचे हुंदके देऊन रडणे, तिची मानसिक अवस्था त्याने पाहिली होती. तिची समस्या जाणून घेण्याआधीच त्याने, ती पिऊन आली आहे, असा निष्कर्ष काढला.—१ शमुवेल १:१२-१४.
एलीचे बोलणे ऐकून हन्नाचे हृदय तुटले असावे. तिला आधीच इतक्या मानसिक यातना होत होत्या आणि त्यात, सन्मानीय पदावर असलेल्या माणसाने तिच्यावर असा बिनबुडाचा आरोप केल्याने तिला आणखी किती वाईट वाटले असावे! याबाबतीतही हन्नाने विश्वासाचे एक सुरेख उदाहरण आपल्यापुढे मांडले. अपरिपूर्णतेमुळे एली अविचारीपणे बोलला होता. पण त्याच्या या बोलण्याने नाराज होऊन तिने यहोवाची उपासना करायचे सोडून दिले नाही. तिने त्याला आदरपूर्वक आपले दुःख सांगितले. तेव्हा एलीला कदाचित त्याची चूक लक्षात आली असावी. कारण नंतर नरम आवाजात तो तिला म्हणाला: “तू सुखाने जा, इस्राएलाच्या देवाकडे जे मागणे तू केले आहे ते तो देवो.”—१ शमुवेल १:१५-१७.
यहोवापुढे आपले मन मोकळे केल्यानंतर व मंदिरात त्याची उपासना केल्यानंतर हन्नाला कसे वाटले? तिने “परत जाऊन अन्न सेवन केले, व यानंतर तिचा चेहरा उदास राहिला नाही,” असे अहवालात म्हटले आहे. (१ शमुवेल १:१८) हन्नाच्या मनावरील ताणाचा निचरा झाला. तिने जणू तिच्या मनावरील ओझे, तिच्यापेक्षा कैकपटीने शक्तिशाली असलेल्या तिच्या स्वर्गीय पित्यावर सोपवले. (स्तोत्र ५५:२२) यहोवाला कोणतीही समस्या भारी वाटली नाही, वाटत नाही आणि पुढेही वाटणार नाही!
एखाद्या समस्येच्या ओझ्याखाली जेव्हा आपण दबून जातो तेव्हा आपण हन्नाच्या उदाहरणाचे अनुकरण करू शकतो. बायबलमध्ये यहोवाला ‘प्रार्थना ऐकणारा’ देव म्हटले आहे. त्याच्यापुढे आपण आपले मन मोकळे करू शकतो. (स्तोत्र ६५:२) आणि आपण जर पूर्ण विश्वासाने अशी प्रार्थना केली तर आपले दुःख निघून जाईल व त्याऐवजी “सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांति” आपल्याला मिळेल.—फिलिप्पैकर ४:६, ७.
“आमच्या देवासारखा दुर्ग कोणी नाही”
दुसऱ्या दिवशी सकाळी, हन्ना पुन्हा एलकानाबरोबर मंदिरात येते. यहोवाला केलेली विनंती व त्याला दिलेली शपथ ती एलकानापासून लपवून ठेवत नाही; कारण, मोशेच्या नियमशास्त्रानुसार जर एखाद्या स्त्रीने तिच्या पतीच्या संमतीविना एखादा नवस केला असेल तर तिच्या पतीला तो नवस रद्द करण्याचा अधिकार होता. (गणना ३०:१०-१५) पण विश्वासू एलकानाने असे काहीही केले नाही. उलट, परतीच्या प्रवासाला निघण्याआधी तो व हन्ना दोघेही यहोवाच्या मंदिरात त्याची उपासना करतात.
पनिन्नाने हन्नाला चिडवण्याचे केव्हा थांबवले असावे? अहवालात त्याबद्दल काहीही सांगितलेले नाही. पण, हन्नाचा “चेहरा उदास राहिला नाही” या वाक्यांशावरून असे सूचित होते, की मंदिरात जाऊन आल्यापासून हन्ना आपले दुःख विसरून गेली होती. पनिन्नाला तेव्हा तिच्या खोचक शब्दांचा हन्नावर काहीही परिणाम झाला नसल्याचे जाणवले असावे. या अहवालानंतर बायबलमध्ये पुन्हा तिच्या नावाचा उल्लेख आढळत नाही.
जसजसे महिने सरत गेले तसतसे हन्नाच्या आनंदाला पारावार उरला नाही. तिला दिवस गेले होते! हा आशीर्वाद तिला कोणामुळे मिळाला होता याचा तिला क्षणभरही विसर पडला नाही. तिला जेव्हा मुलगा झाला तेव्हा तिने त्याचे नाव शमुवेल ठेवले. मूळ भाषेत या नावाचा अर्थ, “देवाचे नाव” असा होतो; म्हणजे हन्नाने केले त्याप्रमाणे देवाच्या नावाचा धावा करणे असा होतो. त्या वर्षी ती एलकाना आणि कुटुंबातील इतर सदस्यांबरोबर शिलोला गेली नाही. बाळाचे दूध सुटेपर्यंत म्हणजे तीन वर्षे ती शिलोला गेली नाही. आणि मग, आपल्या लाडक्या मुलाला एके दिवशी मंदिरात सोडून यावे लागेल यासाठी तिने तिचे मन घट्ट केले.
हे सोपे असणार नव्हते. शिलोमध्ये मंदिरात सेवा करणाऱ्या महिला आपल्या बाळाची चांगली काळजी घेतील, याची हन्नाला खात्री होती. तरीपण, शमुवेल अजून लहान होता. आणि कोणत्या आईला आपल्या पोटच्या गोळ्यापासून दूर राहावेसे वाटेल? पण हन्ना व एलकाना कसलीही कुरकुर न करता बाळ शमुवेलाला अगदी कृतज्ञ अंतःकरणाने मंदिरात आणतात. मंदिरात अर्पणे वाहिल्यानंतर, ते प्रमुख याजक एली याला, काही वर्षांपूर्वी हन्नाने केलेल्या शपथेविषयीची आठवण करून देऊन शमुवेलाला त्याच्या हवाली करतात.
त्यानंतर हन्ना देवाला प्रार्थना करते. देवाला या प्रार्थनेचा आपल्या प्रेरित वचनात समावेश करणे उचित वाटले. तिची ही प्रार्थना, पहिले शमुवेल २:१-१० या वचनांत आहे; ही प्रार्थना वाचताना तुम्हाला, तिच्या प्रत्येक वाक्यातून तिच्या विश्वासाची खोली जाणवेल. गर्वाने फुगून बोलणाऱ्यांचा तोरा कमी करण्याची, जुलूमाने पीडित झालेल्या लोकांना आशीर्वादित करण्याची, प्राण हरण करण्याची व प्राणदान करण्याची यहोवाकडे अतुलनीय शक्ती आहे असे म्हणून ती त्याची स्तुती करते. यहोवाच्या अद्वितीय पावित्र्याची, त्याच्या न्यायाची व विश्वासूपणाची ती प्रशंसा करते. ती त्याच्याबद्दल अगदी उचितरीत्या, “आमच्या देवासारखा दुर्ग कोणी नाही,” असे म्हणते. होय, यहोवावर आपण पूर्णपणे विश्वास टाकू शकतो, तो कधीही बदलत नाही. शिवाय, ज्यांच्यावर जुलूम होतो, जे दुःखी आहेत ते मदतीसाठी त्याला हाक मारू शकतात.
बाळ शमुवेलाला किती मोठा आशीर्वाद मिळाला होता; यहोवावर गाढा विश्वास असलेली आई त्याला लाभली होती. लहानाचा मोठा होत असताना त्याला त्याच्या आईची नक्कीच आठवण येत असावी, पण आपल्याला आपली आई विसरून गेली आहे, असे मात्र त्याला कधी वाटले नसावे. कारण, दर वर्षी हन्ना शमुवेलाला भेटायला शिलोला येत असे. आणि येताना, मंदिरात सेवा करताना त्याला लागणारा लहानसा बिनबाह्याचा झगा ती त्याच्यासाठी आणत असे. या झग्याचा प्रत्येक टाका तिने मायेने व प्रेमाने घातला होता. (१ शमुवेल २:१९) कल्पना करा: या वर्षी तिने आणलेला नवीन झगा ती त्याच्या अंगात घालते, तो नीट करते आणि मग त्याच्याबरोबर बोलताना, त्याला उत्तेजन देताना त्याच्याकडे कौतुकाने बघते. शमुवेलाला अशी आई लाभल्याने किती धन्य वाटले असेल! आणि तो जेव्हा मोठा झाला तेव्हा त्याच्या आईवडिलांसाठी व संपूर्ण इस्राएलासाठी तो स्वतः एक आशीर्वाद ठरला!
हन्नाची कहाणी इथेच संपत नाही. यहोवाने हन्नावर अनुग्रह केला व तिला आणखी पाच मुले झाली. (१ शमुवेल २:२१) पण हन्नाचा सर्वात मोठा आशीर्वाद म्हणजे, यहोवाबरोबरचा तिचा नातेसंबंध जो अधिकाधिक मजबूत होत गेला. हन्नाच्या विश्वासाचे अनुकरण करताना यहोवाबरोबरचा तुमचाही नातेसंबंध असाच वाढत जावो! (w१०-E ०७/०१)
[तळटीपा]
a काही काळासाठी देवाने आपल्या लोकांत बहुपत्नीत्वाची पद्धत का खपवून घेतली त्याच्याबद्दलच्या अधिक माहितीकरता, “यहोवाने आपल्या प्राचीन सेवकांमध्ये अर्थात इस्राएली लोकांमध्ये बहुपत्नीत्वाला परवानगी दिली होती; आता ती परवानगी नाही. याचा अर्थ त्याचे दर्जे बदलत असतात का?” हा टेहळणी बुरूज ऑगस्ट १, २००३, पृष्ठ २८ वरील लेख पाहा.
b यहोवाने हन्नाची “कूस बंद केली होती” असे बायबलमध्ये म्हटले असले तरीसुद्धा, या नम्र व विश्वासू स्त्रीवर यहोवा नाराज होता, असा बायबलमध्ये कोठेही उल्लेख आढळत नाही. (१ शमुवेल १:५) बायबलमध्ये काही वेळा, देवाने अमूक एक घटना घडवली, असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ काही काळापुरती देवाने ती घटना होण्यास अनुमती दिली, असा होतो.
c एलकानाचे गाव रामा आणि येशूच्या दिवसांत ओळखले जाणारे अरिमथाई हे कदाचित एकच ठिकाण असावे. याच आधारावर अंतराचा अंदाज लावण्यात आला असावा.
[२७ पानांवरील चौकट]
दोन उल्लेखनीय प्रार्थना
पहिले शमुवेल १:११ आणि २:१-१० येथील हन्नाच्या दोन प्रार्थनांमध्ये अनेक उल्लेखनीय मुद्दे आहेत. जसे की:
◼ हन्नाने पहिली प्रार्थना ‘सेनाधीश परमेश्वराला’ केली. बायबलमध्ये तिनेच पहिल्यांदा यहोवाला या पदवीने संबोधले आहे. मराठी बायबलमध्ये हा वाक्यांश १८९ वेळा आढळतो. यहोवाच्या आत्मिक पुत्रांच्या मोठ्या सेनेवरील त्याच्या अधिकाराला हा वाक्यांश सूचित करतो.
◼ हन्नाने दुसरी प्रार्थना, तिच्या मुलाचा जन्म झाल्यावर नव्हे तर तिने व एलकानाने त्याला शिलो येथील मंदिरात देवाच्या सेवेकरता समर्पित केले तेव्हा केली. यावरून कळते, की हन्नाला, तिच्या सवतीचे तोंड बंद झाल्यामुळे नव्हे तर यहोवाने आशीर्वादित केल्यामुळे आनंद झाला होता.
◼ हन्नाने जेव्हा “माझे शृंग यहोवाच्या ठायी उंच केलेले आहेत,” असे म्हटले तेव्हा तिच्या मनात कदाचित ओझे वाहून नेणाऱ्या शक्तिशाली प्राण्याचे अर्थात बैलाचे चित्र असावे जो आपली शिंगे शक्तीचे प्रदर्शन करण्यासाठी वापरतो. दुसऱ्या शब्दांत, हन्नाला असे म्हणायचे होते, की ‘यहोवा तू मला शक्तिशाली बनवतोस.’—१ शमुवेल २:१, पं.र.भा.
◼ हन्नाने देवाच्या “अभिषिक्ताचा” केलेला उल्लेख भविष्यसूचक आहे. याचेच भाषांतर “मशीहा” असे केले जाते आणि बायबलमध्ये हन्नाच ही पहिली व्यक्ती आहे जिने भविष्यातील अभिषिक्त राजाचा उल्लेख केला आहे.—१ शमुवेल २:१०.
◼ सुमारे १,००० वर्षांनंतर, येशूची आई मरीया हिनेही यहोवाची स्तुती करताना हन्नासारखेच उद्गार काढले.—लूक १:४६-५५.
[२६ पानांवरील चित्र]
मुलबाळ होत नसल्यामुळे हन्ना खरोखरच खूप दुःखी होती; आणि पनिन्ना हन्नाला खिजवण्याची एकही संधी सोडत नव्हती
[२६, २७ पानांवरील चित्र]
हन्नाविषयी एलीचा अंदाज चुकीचा निघाला असला तरी, तिला त्याचा राग आला नाही
[२७ पानांवरील चित्र]
आपल्या अगदी मनापासून यहोवाला प्रार्थना करण्याच्या बाबतीत तुम्ही हन्नाच्या उदाहरणाचे अनुकरण करू शकाल का?