एकाग्र चित्ताने यहोवाची एकनिष्ठ भक्ती करत राहा
“मी तुझ्या सत्यमार्गाने चालेन; तुझ्या नावाचे भय धरण्यास माझे चित्त एकाग्र कर.”—स्तो. ८६:११.
१, २. (क) स्तोत्र ८६:२, ११ या वचनांनुसार, आपल्यासमोर परीक्षा व मोह येतात तेव्हा कोणती गोष्ट आपल्याला यहोवाप्रती एकनिष्ठ राहण्यास साहाय्य करेल? (ख) यहोवाला एकनिष्ठ राहण्याकरता आपण केव्हा आपले चित्त एकाग्र केले पाहिजे?
काही ख्रिस्ती, तुरुंगवास किंवा छळ यांसारख्या कठीण परीक्षांना तोंड देऊनही वर्षानुवर्षे यहोवाला विश्वासू राहतात. पण नंतर, धनसंपत्तीच्या मागे लागून यहोवाला सोडून देतात. असे का घडते? या प्रश्नाचे उत्तर आपल्या लाक्षणिक हृदयाशी किंवा चित्तवृत्तीशी—म्हणजेच आपण मुळात कशा प्रकारची व्यक्ती आहोत याच्याशी संबंधित आहे. ८६ व्या स्तोत्रानुसार ज्या मनुष्याचे चित्त एकाग्र असते, अर्थात ज्याचे हृदय डळमळीत नसते तोच यहोवाची एकनिष्ठपणे भक्ती करू शकतो. म्हणूनच, स्तोत्रे रचणाऱ्या दाविदाने अशी प्रार्थना केली: “माझ्या जिवाचे रक्षण कर, कारण मी तुझा भक्त आहे; हे माझ्या देवा, तुझ्यावर भाव ठेवणाऱ्या सेवकाचे तारण कर.” दाविदाने यहोवाला अशीही विनंती केली, की “हे परमेश्वरा, तुझा मार्ग मला दाखीव; मी तुझ्या सत्यमार्गाने चालेन; तुझ्या नावाचे भय धरण्यास माझे चित्त एकाग्र कर.”—स्तो. ८६:२, ११.
२ आपण संपूर्ण मनाने यहोवावर भरवसा न ठेवल्यास, जीवनातील चिंता-विवंचना व आशा-आकांक्षा आपल्याला एकनिष्ठेने यहोवाची भक्ती करण्यापासून मागे वळवू शकतात. स्वार्थी इच्छा बाळगणे हे सुरुंग पेरलेल्या क्षेत्रावरून चालण्यासारखे आहे. आपण कदाचित अनेक खडतर परिस्थितीत यहोवाला विश्वासू राहिलेलो असू. तरीसुद्धा, आपण सैतानाच्या जाळ्यात अडकू शकतो. म्हणूनच, यहोवाला एकनिष्ठ राहण्याकरता आपण आताच, म्हणजे अशा प्रकारच्या परीक्षा व मोह येण्याअगोदरच आपले चित्त एकाग्र करणे किती महत्त्वाचे आहे! बायबल असे सांगते, “सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यांत जीवनाचा उगम आहे.” (नीति. ४:२३) या संदर्भात, यहोवाने यहूदाहून इस्राएलास राजा यराबामाकडे पाठवलेल्या एका संदेष्ट्याच्या अनुभवावरून आपल्याला अनेक महत्त्वाचे धडे शिकायला मिळतात.
“मी तुला काही इनाम देतो”
३. देवाच्या संदेष्ट्याने सुनावलेला न्यायसंदेश ऐकल्यावर यराबाम काय करतो?
३ हे दृश्य आपल्या डोळ्यांसमोर उभे करा. इस्राएलच्या उत्तरेकडील दहा गोत्रांच्या राज्यात वासरांच्या उपासनेला सुरुवात करणाऱ्या राजा यराबामाविरुद्ध, देवाच्या माणसाने नुकताच एक झोंबणारा न्यायसंदेश सुनावला आहे. तो ऐकून राजा अत्यंत क्रोधित होतो. तो आपल्या माणसांना या संदेष्ट्याला धरण्याचा हुकूम देतो. पण, यहोवा आपल्या सेवकाच्या पाठीशी आहे. त्यामुळे, राजाने उचललेला हात चमत्कारिक रीत्या सुकून जातो. तसेच, खोट्या उपासनेकरता वापरली जाणारी वेदी देखील भंग पावते. हे पाहून, अचानक यराबामाची मुद्रा पालटते. तो देवाच्या माणसाची गयावया करू लागतो व म्हणतो: “माझा हात पुनः पूर्ववत व्हावा म्हणून देव परमेश्वर याजकडे मजसाठी प्रार्थना करून त्याचा कृपाप्रसाद माग.” संदेष्टा त्याच्या वतीने प्रार्थना करतो आणि राजाचा हात बरा होतो.—१ राजे १३:१-६.
४. (क) राजाच्या प्रस्तावामुळे संदेष्ट्याच्या एकनिष्ठेची कशा प्रकारे परीक्षा झाली? (ख) संदेष्ट्याने राजास काय उत्तर दिले?
४ मग यराबाम देवाच्या माणसाला असे म्हणतो: “मजबरोबर घरी चल आणि काही उपाहार करून ताजातवाना हो, मी तुला काही इनाम देतो.” (१ राजे १३:७) आता संदेष्ट्याने काय करावे? ज्याच्याविरुद्ध त्याने नुकतीच दंडाज्ञा सुनावली, त्याच्याचकडून आता त्याने पाहुणचार करून घ्यावा का? (स्तो. ११९:११३) की राजाला पश्चात्ताप झाला आहे असे दिसत असूनही त्याने त्याचे निमंत्रण धुडकावून लावावे? यराबामाकडे भरपूर धनसंपत्ती आहे आणि त्याच्या मर्जीस उतरणाऱ्यांना तो मौल्यवान बक्षीसे देऊ शकतो यात शंका नाही. देवाच्या संदेष्ट्याला जर आधीपासूनच मौल्यवान वस्तू मिळवण्याची लालसा असती तर राजाचा प्रस्ताव निश्चितच त्याच्याकरता मोठे प्रलोभन ठरले असते. पण यहोवाने आपल्या संदेष्ट्याला अशी आज्ञा केली आहे, “तू येथे अन्नपाणी सेवन करू नको आणि ज्या वाटेने जाशील तिने परत येऊ नको.” म्हणून, संदेष्टा यराबामास अगदी सडेतोड उत्तर देतो: “तू मला आपले अर्धे घर देशील तरी मी तुझ्या येथे येणार नाही; या ठिकाणी मी अन्नपाणी सेवन करणार नाही.” आणि तो ज्या वाटेने बेथेलास आला होता तिने न जाता, दुसऱ्याच वाटेने परत निघून जातो. (१ राजे १३:८-१०) संदेष्ट्याने घेतलेल्या या निर्णयावरून यहोवाची एकाग्र चित्ताने एकनिष्ठ भक्ती करण्याविषयी आपल्याला काय शिकायला मिळते?—रोम. १५:४.
“तृप्त असावे”
५. धनसंपत्ती मिळवण्याच्या मागे लागल्यामुळे आपल्या एकनिष्ठेची परीक्षा कशी होते?
५ धनसंपत्तीचा एकनिष्ठ भक्तीशी काय संबंध, असे कदाचित आपल्याला वाटू शकते. पण संबंध आहे. आपल्याला ज्या वस्तुंची खरोखर गरज आहे, त्या वस्तू पुरवण्याबद्दल यहोवाने दिलेल्या वचनावर आपल्याला भरवसा आहे का? (मत्त. ६:३३; इब्री १३:५) जीवनातील काही “सुखसोयी” सध्या आपल्या आवाक्यात नसतील, तर काहीही करून त्या प्राप्त करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, त्यांच्याशिवाय चालवून घेण्यास आपण तयार आहोत का? (फिलिप्पैकर ४:११-१३ वाचा.) की जे आपल्याला हवे आहे ते आज, आता, ताबडतोब मिळवण्याच्या अट्टहासापायी, देवाच्या सेवेतील विशेषाधिकारांना बगल देण्याचा आपल्याला मोह होतो? एकनिष्ठपणे यहोवाची सेवा करण्यास आपण आपल्या जीवनात इतर सर्व गोष्टींपेक्षा अधिक महत्त्व देतो का? या सर्व प्रश्नांची उत्तरे, आपण देवाची मनोभावे सेवा करत आहोत किंवा नाही यावर अवलंबून आहेत. प्रेषित पौलाने लिहिले, “चित्तसमाधानासह भक्ती हा तर मोठाच लाभ आहे. आपण जगात काही आणिले नाही, आपल्याला त्यातून काही नेता येत नाही; आपल्याला अन्नवस्त्र असल्यास तेवढ्यात तृप्त असावे.”—१ तीम. ६:६-८.
६. आपल्याला कदाचित कोणते “इनाम” देऊ करण्यात येतील, आणि ते स्वीकारावेत किंवा नाही हे ठरवण्यास कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल?
६ उदाहरणार्थ, आपले वरिष्ठ अधिकारी कदाचित आपल्याला बढती व त्यासोबत पगारवाढ व इतर सवलती देऊ करतील. किंवा, आपल्याला असे वाटू शकते की परदेशात नोकरी मिळवल्यास आपल्याला भरपूर पैसा कमवता येईल. सुरुवातीला कदाचित, ही संधी यहोवाच्या आशीर्वादानेच चालून आली आहे असे आपल्याला वाटेल. पण पुढचे पाऊल उचलण्याअगोदर, आपण मुळात असा निर्णय का घेऊ इच्छितो हे तपासून पाहू नये का? आपल्याला सर्वात जास्त या गोष्टीची काळजी असली पाहिजे, की “या निर्णयाचा यहोवा देवासोबतच्या माझ्या नात्यावर काय परिणाम होईल?”
७. अधिक धनसंपत्ती मिळवण्याची स्वार्थी इच्छा मनातून उपटून टाकणे का महत्त्वाचे आहे?
७ सैतानाच्या कह्यात असलेले हे जग सतत आपल्याला आणखी पैसा कमवण्याचे, आणखी श्रीमंत होण्याचे प्रोत्साहन देते. (१ योहान २:१५, १६ वाचा.) कसेही करून आपले चित्त विचलित करावे व देवाच्या सेवेपासून आपल्याला परावृत्त करावे हाच दियाबलाचा एकमेव उद्देश आहे. म्हणूनच, धनसंपत्ती मिळवण्याच्या स्वार्थी इच्छा आपल्या मनात उत्पन्न झाल्या आहेत का, हे ओळखून आपण त्या उपटून टाकल्या पाहिजेत. (प्रकटी. ३:१५-१७) सैतानाने जगातील सर्व राज्ये येशूला देऊ केली तेव्हा, सैतानाच्या या प्रस्तावाला नकार देण्यासाठी येशूला दोनदा विचार करावा लागला नाही. (मत्त. ४:८-१०) त्याने असा इशारा दिला: “संभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा; कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ति असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही.” (लूक १२:१५) यहोवाप्रती आपली एकनिष्ठा, आपल्याला स्वतःवरच भरवसा ठेवण्याऐवजी यहोवावर विसंबून राहण्यास साहाय्य करेल.
एका वृद्ध संदेष्ट्याने त्याला फसवले
८. देवाच्या संदेष्ट्याच्या एकनिष्ठेची कशा प्रकारे परीक्षा झाली?
८ देवाचा संदेष्टा सरळ आपल्या घरी गेला असता तर बरे झाले असते. पण लगेचच, त्याच्यासमोर आणखी एक परीक्षा उभी ठाकली. बायबलमधील अहवालानुसार, “बेथेल येथे त्या काळी एक वृद्ध संदेष्टा राहत असे; त्याच्या पुत्रांनी येऊन देवाच्या माणसाने त्या दिवशी बेथेलास जे काही केले त्याची सगळी हकीकत आपल्या बापास कळविली.” ती ऐकून, त्या वृद्ध माणसाने आपल्या पुत्रांना गाढवावर खोगीर घालण्यास सांगितले व त्यावर बसून तो देवाच्या संदेष्ट्याला भेटायला निघाला. थोड्याच वेळानंतर त्याला देवाचा संदेष्टा एका मोठ्या झाडाखाली बसलेला आढळला. तो त्याला म्हणाला: “मजबरोबर घरी चल आणि भोजन कर.” देवाच्या संदेष्ट्याने त्याच्या या निमंत्रणास नकार दिला तेव्हा वृद्ध माणूस त्याला म्हणाला: “मीहि तुझ्यासारखाच संदेष्टा आहे; परमेश्वराच्या आज्ञेवरून एक देवदूत मला म्हणाला, त्याला परत आपल्या घरी घेऊन ये, म्हणजे तो अन्नपाणी सेवन करील.” पण बायबल आपल्याला सांगते की “हे त्याचे सांगणे खोटे होते.”—१ राजे १३:११-१८.
९. इतरांची फसवणूक करणाऱ्या लोकांबद्दल बायबल काय म्हणते आणि ते कोणाचे नुकसान करतात?
९ असे करण्यामागे त्या वृद्ध संदेष्ट्याचा काय हेतू होता हे आपल्याला माहीत नाही. पण त्याने देवाच्या संदेष्ट्याशी खोटे बोलून त्याची फसवणूक केली एवढे मात्र खरे. कदाचित, एकेकाळी तो यहोवाचा विश्वासू संदेष्टा असेल. पण या क्षणी मात्र तो धूर्तपणे वागत होता. बायबलमध्ये अशा वागणुकीची अतिशय कड्या शब्दांत निंदा केलेली आहे. (नीतिसूत्रे ३:३२ वाचा.) इतरांची फसवणूक करणारे, आध्यात्मिक दृष्ट्या स्वतःचेच नव्हे तर इतरांचेही नुकसान करतात.
तो वृद्ध माणसाबरोबर ‘परत गेला’
१०. देवाच्या संदेष्ट्याने वृद्ध माणसाचे निमंत्रण स्वीकारले का, व याचा काय परिणाम झाला?
१० वृद्ध संदेष्टा आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करत आहे हे यहूदाहून आलेल्या संदेष्ट्याने खरे तर ओळखायला हवे होते. ‘मला नवीन सूचना देण्याकरता यहोवा दुसऱ्याच व्यक्तीकडे देवदूताला का म्हणून पाठवेल?’ असा त्याने विचार करायला हवा होता. किंवा तो आणखी स्पष्ट मार्गदर्शनासाठी यहोवाकडे विनंती करू शकला असता. पण त्याने यापैकी काहीही केल्याचे बायबल आपल्याला सांगत नाही. त्याऐवजी, “त्याने [वृद्ध माणसाबरोबर] परत जाऊन त्याच्या घरी अन्नपाणी सेवन केले.” यहोवाला हे आवडले नाही. वृद्ध माणसाच्या बहकाव्यात आलेला संदेष्टा शेवटी यहुदाला परत जायला निघाला तेव्हा वाटेत त्याला एका सिंहाने गाठून मारून टाकले. संदेष्टा म्हणून त्याच्या सेवेचा किती हा दुःखद अंत!—१ राजे १३:१९-२५.a
११. अहीयाने एक उत्तम उदाहरण ठेवले असे का म्हणता येईल?
११ दुसरीकडे पाहता, यराबामाचा राज्याभिषेक करण्याकरता पाठवण्यात आलेला संदेष्टा अहीया हा मात्र वृद्धपणीही यहोवाला विश्वासू राहिला. यराबामाने आपल्या आजारी मुलाच्या खुशालीविषयी विचारण्यास आपल्या पत्नीला अहीयाकडे पाठवले तेव्हा अहीया वृद्ध झाला होता व त्याची दृष्टी क्षीण झाली होती. तरीसुद्धा, त्याने निर्भीडपणे सांगितले की यराबामाचा मुलगा जगणार नाही. (१ राजे १४:१-१८) अहीयाला मिळालेल्या अनेक आशीर्वादांपैकी एक आशीर्वाद म्हणजे त्याला देवाच्या प्रेरित वचनाच्या लिखाणाला योगदान करता आले. ते कसे? एज्रा याजकाने आपली पुस्तके लिहिताना त्याच्या लिखाणांचा आधार घेतला.—२ इति. ९:२९.
१२-१४. (क) यहूदाहून आलेल्या संदेष्ट्याच्या अनुभवावरून आपल्याला काय शिकायला मिळते? (ख) वडिलांनी दिलेल्या बायबल-आधारित सल्ल्यावर लक्षपूर्वक व प्रार्थनापूर्वक विचार करणे का महत्त्वाचे आहे हे उदाहरण देऊन स्पष्ट करा.
१२ यहूदाहून आलेल्या संदेष्ट्याने वृद्ध माणासाबरोबर त्याच्या घरी जाऊन अन्नपाणी घेण्याअगोदर, यहोवाचा सल्ला का घेतला नाही हे बायबलमध्ये सांगितलेले नाही. वृद्ध माणसाने जे म्हटले तेच त्यालाही ऐकायचे होते, असे तर नसावे? यावरून आपण काय शिकू शकतो? यहोवा आपल्याकडून ज्या अपेक्षा करतो त्या पूर्णपणे योग्य आहेत याविषयी आपल्या मनात जराही शंका असू नये. आणि काहीही झाले तरी त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आपला दृढ निश्चय असला पाहिजे.
१३ काही जण, सल्ला दिला जातो तेव्हा त्यांना जे ऐकायचे असते तेवढेच ऐकतात. उदाहरणार्थ, एखाद्या प्रचारकाला अशा नोकरीची ऑफर येते, की जी स्वीकारल्यास त्याला आपल्या कुटुंबाकरता व उपासनेशी संबंधित कार्यांकरता पूर्वीसारखा वेळ मिळणार नाही. तो कदाचित याबाबतीत सल्ला मागण्याकरता एखाद्या वडिलांकडे जाईल. वडील त्याला कोणताही सल्ला देण्याआधी, असे म्हणतील की तुमच्या कुटुंबाची देखभाल कशी करायची हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, याविषयी मी तुमच्यासाठी निर्णय घेऊ शकत नाही. यानंतर ते या बांधवाला अशा प्रकारची नोकरी स्वीकारल्यामुळे, आध्यात्मिक दृष्ट्या कोणते धोके संभवू शकतात याविषयी सांगतील. या बांधवाने सुरुवातीला वडिलांनी जे म्हटले तेवढेच फक्त आठवणीत ठेवावे का, की त्यानंतर त्यांनी दिलेल्या सल्ल्यावर त्याने गांभीर्याने विचार करावा? साहजिकच, आध्यात्मिक दृष्ट्या कोणता मार्ग आपल्या हिताचा आहे हे त्या बांधवाने ठरवले पाहिजे.
१४ आणखी एका संभाव्य परिस्थितीचा विचार करा. एक बहीण आपल्या अविश्वासू पतीपासून विभक्त होण्याविषयी वडिलांना विचारते. साहजिकच, वडील तिला समजावून सांगतील की विभक्त होणे किंवा न होणे हा तिचा वैयक्तिक निर्णय आहे. त्यानंतर ते कदाचित सदर विषयासंबंधी बायबलमध्ये दिलेल्या सल्ल्यावर तिच्यासोबत चर्चा करतील. (१ करिंथ. ७:१०-१६) वडिलांनी दिलेल्या सल्ल्यावर ही बहीण लक्षपूर्वक विचार करेल का? की तिने आपल्या पतीपासून विभक्त व्हायचे आधीच ठरवले आहे? याबाबतीत निर्णय घेताना तिने बायबल-आधारित सल्ल्यावर प्रार्थनापूर्वक विचार करणे तिच्या हिताचे ठरेल.
आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नका
१५. देवाच्या संदेष्ट्याने केलेल्या चुकीवरून आपण काय शिकू शकतो?
१५ यहूदाहून आलेल्या संदेष्ट्याने जी चूक केली, त्यावरून आपण आणखी काय शिकू शकतो? नीतिसूत्रे ३:५ यात असे म्हटले आहे: “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको.” यहूदाहून आलेल्या संदेष्ट्याने पूर्वीप्रमाणे यहोवावर विसंबून न राहता, या प्रसंगी स्वतःच्याच निर्णयशक्तीवर भरवसा ठेवला. ही चूक त्याला खूपच महागात पडली. कारण त्याचा प्राण तर गेलाच, पण तो देवाच्या नजरेतूनही उतरला. स्वतःच्याच बुद्धीवर अवलंबून न राहता, नम्रपणे व एकनिष्ठेने यहोवाची सेवा करत राहणे किती महत्त्वाचे आहे हे त्याच्या अनुभवावरून अगदी स्पष्टपणे दिसून येते!
१६, १७. यहोवाला एकनिष्ठ राहण्यास कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल?
१६ आपल्या हृदयाचा कल स्वार्थीपणाकडे असतो आणि त्यामुळे सहसा ते आपली दिशाभूल करते. “हृदय सर्वात कपटी आहे; ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे.” (यिर्म. १७:९) यहोवाला एकनिष्ठ राहण्याकरता आपण आपले जुने व्यक्तित्व व स्वतःच्याच बुद्धीवर अवलंबून राहण्याची गर्विष्ठ प्रवृत्ती झुगारून टाकली पाहिजे. आणि ‘नीतिमत्व व पवित्रता ह्यांनी युक्त असे देवसदृश निर्माण केलेले’ नवे व्यक्तित्व आपण धारण केले पाहिजे.—इफिसकर ४:२२-२४ वाचा.
१७ नीतिसूत्रे ११:२ म्हणते, “नम्र जनांच्या ठायी ज्ञान असते.” नम्रपणे यहोवावर विसंबून राहिल्यामुळे आपण गंभीर चुका टाळू शकतो. उदाहरणार्थ, निराशेमुळे कधीकधी आपण अयोग्यपणे विचार करू लागण्याची शक्यता आहे. (नीति. २४:१०) कदाचित यहोवाच्या सेवेतील एखादा पैलू आपल्याला त्रासदायक वाटू लागेल व आपण असा विचार करू, की इतकी वर्षे आपण जे केले ते पुरे झाले, आता इतरांना संधी द्यायची वेळ आली आहे. किंवा, आता आपणही “चारचौघांप्रमाणे” राहावे असे आपल्याला वाटेल. पण, ‘नेटाने यत्न केल्यास’ व “प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर” राहिल्यास अशा अयोग्य विचारसरणीपासून आपल्या हृदयाचे संरक्षण होईल.—लूक १३:२४; १ करिंथ. १५:५८.
१८. कोणता निर्णय घ्यावा हे समजत नाही तेव्हा आपण काय करावे?
१८ कधीकधी आपल्याला कठीण निर्णय घ्यावे लागतात, तेव्हा आपली द्विधा मनःस्थिती होते. कोणता मार्ग निवडणे योग्य राहील हे ठरवणे आपल्याला कठीण जाते. अशा वेळी, आपल्याला जे योग्य वाटते त्याप्रमाणे करून आलेली समस्या सोडवण्याचा मोह आपल्याला होतो का? असे प्रसंग येतात तेव्हा यहोवाला मदतीची विनंती करण्यातच सुज्ञपणा आहे. याकोब १:५ यात असे सांगितले आहे, “जर तुम्हांपैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे म्हणजे ते त्याला मिळेल; कारण तो . . . सर्वांस उदारपणे देणग्या देतो.” आपला स्वर्गीय पिता आपल्याला पवित्र आत्मा देईल, जेणेकरून आपल्याला योग्य निर्णय घेता येतील.—लूक ११:९, १३ वाचा.
एकनिष्ठ राहण्याचा निर्धार करा
१९, २०. आपण कोणता निर्धार केला पाहिजे?
१९ शलमोन खऱ्या उपासनेपासून बहकला त्यानंतरच्या उलथापालथीच्या वर्षांत देवाच्या सेवकांना अनेक कठीण परीक्षांना तोंड द्यावे लागले व त्यांची एकनिष्ठा पारखली गेली. बऱ्याच जणांनी या ना त्या मार्गाने तडजोड केली हे खरे आहे. पण काही जण मात्र त्याही परिस्थितीत यहोवाला शेवटपर्यंत एकनिष्ठ राहिले.
२० दररोज आपल्याला असे अनेक लहानमोठे निर्णय घ्यावे लागतात, ज्यांमुळे आपली एकनिष्ठा पारखली जाते. आपणही विश्वासू आहोत हे सिद्ध करून दाखवू शकतो. तेव्हा, आपले चित्त एकाग्र करून एकनिष्ठपणे यहोवाची सेवा करत राहण्याचा आपण निर्धार करू या. तो आपल्या एकनिष्ठ सेवकांना सर्वदा आशीर्वाद देत राहील याची आपल्याला पूर्ण खात्री आहे.—२ शमु. २२:२६, NW.
[तळटीप]
a यहोवाने वृद्ध संदेष्ट्याला मृत्यूची शिक्षा दिली किंवा नाही हे बायबल सांगत नाही.
तुमचे उत्तर काय असेल?
• धनसंपत्ती मिळवण्याची स्वार्थी इच्छा मनातून उपटून टाकण्याचा आपण का प्रयत्न केला पाहिजे?
• यहोवाला एकनिष्ठ राहण्यास कोणती गोष्ट आपल्याला साहाय्य करेल?
• नम्रपणे यहोवावर विसंबून राहिल्यामुळे आपल्याला एकनिष्ठ राहण्यास कशी मदत मिळू शकते?
[९ पानांवरील चित्रे]
मोहांना प्रतिकार करणे तुम्हाला कठीण जाते का?
[१० पानांवरील चित्रे]
बायबल आधारित सल्ल्यावर तुम्ही प्रार्थनापूर्वक विचार कराल का?