तुम्ही यहोवाच्या संघटनेची कदर करता का?
“परमेश्वर म्हणतो, आकाश माझे सिंहासन व पृथ्वी माझे पादासन आहे.”—यशया ६६:१.
१, २. (अ) यहोवाच्या संघटनेचा कोणता दृश्य पुरावा तुम्ही दाखवू शकता? (ब) यहोवाचे वास्तव्य कोठे आहे?
यहोवाची एक संघटना आहे यावर तुम्ही विश्वास करता का? का तुम्ही तसा विश्वास करता? तुम्ही म्हणाल: ‘कारण आमचं एक राज्य सभागृह आहे. वडीलवर्ग असलेली आमची एक सुव्यवस्थित मंडळी आहे. आमचे नियुक्त विभागीय पर्यवेक्षक आहेत जे आम्हाला नियमितरीत्या भेट देतात. आम्ही संघटित संमेलनांना व अधिवेशनांना उपस्थित राहतो. आमच्या देशात वॉच टावर संस्थेचे एक शाखा दफ्तर आहे. तेव्हा, या सर्व आणि आणखी पुष्कळ गोष्टी, यहोवाची एक कार्यकारी संघटना असल्याचे शाबीत करतात.’
२ ही सर्व वैशिष्ट्ये, संघटना असल्याचाच पुरावा देतात. परंतु, आपण केवळ ही पार्थिव संघटनाच पाहत असू तर यहोवाची संघटना म्हणजे काय हे आपल्याला पूर्णपणे उमगलेले नाही. यहोवाने यशयास सांगितले, की पृथ्वी ही त्याचे पादासन आहे परंतु आकाश त्याचे सिंहासन आहे. (यशया ६६:१) यहोवा कोणत्या ‘आकाशाबद्दल’ बोलत होता? आपल्या वातावरणाबद्दल? अंतराळाबद्दल? की, कोणत्या तरी दुसऱ्या जीवनाबद्दल? यशया यहोवाच्या ‘पवित्र व प्रतापी निवासस्थानाविषयी’ बोलतो आणि स्तोत्रकर्ता या आकाशाला ‘त्याचे निवासस्थान’ असे संबोधतो. तेव्हा, यशया ६६:१ मधील “आकाश,” अदृश्य आत्मिक क्षेत्राला सूचित करते जे यहोवाचे सर्वोच्च सर्वश्रेष्ठ स्थान आहे.—यशया ६३:१५; स्तोत्र ३३:१३, १४.
३. आपण शंकेचे निरसन कसे करू शकतो?
३ यास्तव, यहोवाच्या संघटनेची पूर्ण समज हवी असल्यास व तिची कदर करायची असल्यास आपण आकाशाकडे दृष्टी लावणे आवश्यक आहे. पण, काहीजण येथेच अडतात. यहोवाची स्वर्गीय संघटना अदृश्य आहे तर ती वास्तविकतेत अस्तित्वात आहे हे आपल्याला कसे माहीत होते? काहींना शंका वाटते, ‘आपली खात्री कशी पटेल?’ विश्वास शंकेचे निरसन कसे करू शकतो? देवाच्या वचनाचा खोल व्यक्तिगत अभ्यास आणि ख्रिस्ती सभांमध्ये नियमित उपस्थिती व सहभाग, हे दोन मुख्य मार्ग आहेत. सत्याचा प्रकाश आपल्या शंकेचे निरसन करू शकतो. देवाचे इतरही सेवक होते ज्यांना शंका होत्या. सिरियाच्या राजाने इस्राएलवर हल्ला करतेवेळी अलीशाच्या सेवकाची काय मनोवृत्ती होती त्याचा आपण विचार करू या.—पडताळा योहान २०:२४-२९; याकोब १:५-८.
स्वर्गीय सेना पाहिलेला
४, ५. (अ) अलीशाच्या सेवकाची काय समस्या होती? (ब) यहोवाने अलीशाच्या प्रार्थनेचे उत्तर कसे दिले?
४ सिरियाच्या राजाने अलीशाला पकडण्यासाठी रातोरात भले मोठे सैन्य धाडले. अलीशाचा सेवक पहाटेच उठला आणि मध्यपूर्वेकडे असलेल्या त्याच्या घराच्या गच्चीवर ताज्या हवेत आला, आणि समोरचे दृश्य पाहून त्याचे धाबेच दणाणले! देवाच्या संदेष्ट्याला पकडण्यासाठी संपूर्ण नगराला सिरीयाच्या सैन्याने घोडे व रथ यांसह वेढले होते. सेवक ओरडत येऊन अलीशाला म्हणाला: “स्वामी, हाय! हाय! आता आपण काय करावे?” शांत चित्ताने व पूर्ण खात्रीने अलीशा त्याला म्हणाला: “भिऊ नको; त्याच्या पक्षाचे आहेत त्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहेत.” सेवकाला कदाचित तेव्हा प्रश्न पडला असेल, ‘आपल्या पक्षाचे कुठं आहेत? मला तर कोणीच दिसत नाही!’ कधीकधी आपल्याबाबतीतही असेच घडू शकते—आपणही आपल्या ज्ञानचक्षुंनी स्वर्गीय सेना पाहू शकणार नाही, किंवा समजू शकणार नाही.—२ राजे ६:८-१६; इफिसकर १:१८.
५ आपल्या सेवकाचे डोळे उघडावेत म्हणून अलीशाने प्रार्थना केली. मग? “परमेश्वराने त्या तरुणाचे डोळे उघडिले, तो पाहा, अलीशाच्या सभोवतालचा डोंगर अग्नीचे घोडे व रथ यांनी व्यापून गेला आहे असे त्यास दिसले.” (२ राजे ६:१७) होय, त्याने देवाच्या सेवकाचे संरक्षण करण्याकरता स्वर्गीय सेना अर्थात देवदूतांची सेना तयारीत असलेली पाहिली. आता त्याला अलीशाच्या आत्मविश्वासाचे आकलन झाले.
६. आपल्याला यहोवाच्या स्वर्गीय संघटनेस समजण्याची अंतर्दृष्टी कशी मिळू शकते?
६ अलीशाच्या सेवकाप्रमाणे आपल्यालाही काहीवेळा आकलन होण्यास कठीण वाटते का? आपल्याला किंवा विशिष्ट देशात ख्रिस्ती कार्याला धोकादायक असणाऱ्या परिस्थितींची केवळ दृश्यच बाजू आपण पाहतो का? असल्यास, आपल्याला समजावे म्हणून आपण एखाद्या खास दृष्टान्ताची अपेक्षा करू शकतो का? नाही, कारण आपल्याकडे अशी एक गोष्ट आहे जी अलीशाच्या सेवकाकडे नव्हती—आपल्याकडे अनेक दृष्टान्त असलेले पुस्तक अर्थात बायबल आहे, जे आपल्याला स्वर्गीय संघटनेस समजण्याची अंतर्दृष्टी देऊ शकते. ते ईश्वरप्रेरित वचन, मार्गदर्शक तत्त्वेही देते ज्याद्वारे आपल्या विचारसरणीला व आपल्या जीवनाला सरळ वळण लागेल. परंतु, समजबुद्धीकरता परिश्रमाची आवश्यकता आहे व यहोवाच्या व्यवस्थेबद्दल कदर विकसित केली पाहिजे. हे आपण, व्यक्तिगत अभ्यासासोबत प्रार्थना आणि मनन यांद्वारे करू शकतो.—रोमकर १२:१२; फिलिप्पैकर ४:६; २ तीमथ्य ३:१५-१७.
आकलन होण्याकरता अभ्यास
७. (अ) व्यक्तिगत बायबल अभ्यासाबाबत काहींना कोणती समस्या येऊ शकेल? (ब) व्यक्तिगत अभ्यास केल्याने फायदा का होऊ शकतो?
७ ज्यांनी शाळेत अभ्यासात कधी रसच घेतला नाही किंवा ज्यांना अभ्यास करण्याची संधीच मिळाली नाही अशा पुष्कळांसाठी व्यक्तिगत अभ्यास हा इतका भावणारा विषय वाटणार नाही. परंतु, आपल्या ज्ञानचक्षुंनी आपल्याला यहोवाच्या संघटनेची समज व्हायची आहे व तिची कदर करायची आहे तर अभ्यास करण्याची इच्छा विकसित करणे आवश्यक आहे. तयारीविना बनवलेल्या भोजनाचा तुम्ही स्वाद लुटू शकाल का? कोणताही आचारी किंवा स्वयंपाकी तुम्हाला सांगेल, की स्वादिष्ट भोजन करण्याकरता खूप तयारी करावी लागते. पण, ते अर्ध्या तासात किंवा त्यापेक्षा कमी वेळात गट्टम केले जाऊ शकते. दुसऱ्या बाजूला पाहता, व्यक्तिगत अभ्यासाचे फायदे जीवनभर टिकू शकतात. आपण प्रगती करू शकतो हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा हळूहळू व्यक्तिगत अभ्यास हा आपला आवडीचा विषय होऊ लागतो. आपण स्वतःकडे आणि आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष देणे आवश्यक आहे; शिवाय वाचनाकडेही लक्ष ठेवणे जरूरीचे आहे असे प्रेषित पौलाने उचितरीत्या म्हटले होते. यासाठी अविचल परिश्रमाची आवश्यकता आहे, पण फायदे मात्र अनंतकाळासाठी असू शकतात.—१ तीमथ्य ४:१३-१६.
८. नीतिसूत्राचे पुस्तक कोणती मनोवृत्ती विकसित करण्याची शिफारस करते?
८ प्राचीन काळातील एका सुज्ञ मनुष्याने लिहिले: “माझ्या मुला [किंवा मुली], जर तू माझी वचने स्वीकारिशील, माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेविशील, आपला कान ज्ञानाकडे देशील, आणि आपले मन सुज्ञानाकडे लावशील, जर तू विवेकाला हाक मारिशील, सुज्ञतेची आराधना करिशील, जर तू रुप्याप्रमाणे त्याचा शोध करिशील, व गुप्त निधीप्रमाणे त्याला उमगून काढिशील, तर परमेश्वराच्या भयाची तुला जाणीव होईल, आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल.”—नीतिसूत्रे २:१-५.
९. (अ) सोन्याची तुलना “देवाविषयीचे ज्ञान” याजबरोबर कशी होते? (ब) अचूक ज्ञान मिळण्याकरता आपल्याला कोणत्या साधनांची आवश्यकता आहे?
९ ही कोणाची जबाबदारी आहे हे तुमच्या लक्षात आले का? “तू” हा शब्द वारंवार उच्चारण्यात आला आहे. तसेच, “गुप्त निधीप्रमाणे त्याला उमगून काढिशील,” या वाक्याकडे ध्यान द्या. दक्षिण आफ्रिका, बोलिव्हिया, मेक्सिको, आणि इतर राष्ट्रांत सोन्यारुप्यासाठी खोदकाम केलेल्या खाणीतील मजूरांचा विचार करा. हे मौल्यवान धातू मिळण्याकरता त्यांनी मेहनतीने टिकाव आणि फावड्याचा उपयोग करून खडक फोडले. सोन्याचे त्यांना इतके महत्त्व वाटत होते की यु.एस.ए. कॅलिफोर्नियातील एका खाणीत त्यांनी एकूण ५९१ किलोमीटरचे आणि सुमारे १.५ किलोमीटर खोल बोगदे खणले—फक्त सोनं मिळवण्यासाठी! पण, तुम्ही सोनं खाऊ शकाल का? पिऊ शकाल? एखाद्या वाळवंटात असताना त्याने तुमची भूक, तहान भागेल का? कधीच नाही, त्याचे मूल्य आर्थिक आणि अनिश्चित आहे; आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दिसते त्याप्रमाणे दररोज बदलत राहते. तरीसुद्धा, लोकांनी त्यासाठी आपले प्राण दिले आहेत. तेव्हा, आध्यात्मिक सोने अर्थात, “देवाविषयीचे ज्ञान” मिळवण्यासाठी आपण किती प्रयत्न केला पाहिजे? विचार करा, विश्वाच्या सार्वभौम प्रभूचे, त्याच्या संघटनेचे आणि त्याच्या उद्देशांचे ज्ञान! यासाठी आपण आध्यात्मिक टिकाव आणि फावडे या साधनांचा उपयोग करू शकतो. ही साधने बायबल आधारित प्रकाशने आहेत जी यहोवाचे वचन खोदून त्यांचा अर्थ समजण्यास आपल्याला साहाय्य करू शकतात.—ईयोब २८:१२-१९.
समज मिळण्यासाठी खोदणे
१०. दानीएलाने एका दृष्टान्तात काय पाहिले?
१० यहोवाच्या स्वर्गीय संघटनेचे ज्ञान मिळण्याकरता आपण जरा आध्यात्मिक खोदकाम करू या. एक प्रमुख समज मिळण्याकरता आपण आसनारूढ पुराणपुरुषाबद्दल दानीएलला झालेला दृष्टान्त पाहू या. दानीएल असे लिहितो: “मी पाहत असता आसने मांडण्यात आली आणि एक पुराणपुरुष आसनारुढ झाला; त्याचा पेहेराव बर्फासारखा पांढरा होता, त्याच्या डोक्याचे केस स्वच्छ लोकरीसारखे होते; त्याचे आसन प्रत्यक्ष अग्निज्वालामय होते, व त्या आसनाची चक्रे धगधगीत अग्निरूप होती. त्याच्यासमोरून अग्निप्रवाह वाहत होता; हजारो लोक त्याची सेवा करीत होते; लाखो लोक त्याच्यासमोर उभे होते; न्यायसभा भरली; वह्या उघडल्या गेल्या.” (दानीएल ७:९, १०) यहोवाची सेवा करणारे हे हजारो लोक कोण होते? “टिकाव” आणि “फावडे” म्हणून वापरण्यात आलेले नवीन जग भाषांतर (इंग्रजी) मधील समासलिखित संदर्भ आपल्याला, स्तोत्र ६८:१७ आणि इब्री लोकांस १:१४ हे संदर्भ दाखवतात. होय, सेवा करणारे ते स्वर्गीय देवदूत होते!
११. दानीएलाचा दृष्टान्त आपल्याला अलीशाचे शब्द समजण्यास कशी मदत करू शकतो?
११ देवाच्या दिम्मतीस असलेल्या सर्वच्या सर्व विश्वासू देवदूतांना आपण पाहिले असे दानीएलाचा अहवाल म्हणत नाही. आणखी कोट्यवधी देवदूत असतील. पण अलीशाने, “त्याच्या पक्षाचे आहेत त्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहेत,” असे का म्हटले असावे हे आता आपल्याला नक्कीच समजू शकेल. सिरियाच्या राजाच्या सैन्याबरोबर अविश्वासू देवदूत, दुरात्मे असले तरी, यहोवाच्या स्वर्गीय सैन्यापुढे ते तुटपुंजेच ठरले!—स्तोत्र ३४:७; ९१:११.
१२. तुम्हाला देवदूतांची सविस्तर माहिती कशी मिळू शकेल?
१२ कदाचित तुम्हाला या देवदूतांविषयी आणखी माहीत करून घ्यायची आहे, जसे की, यहोवाच्या सेवेत ते कोणती भूमिका बजावतात वगैरे. देवदूत यासाठी असलेल्या ग्रीक शब्दातून आपल्याला समजते की ते संदेशवाहक आहेत कारण त्या शब्दाचा अर्थ “संदेशवाहक” असाही होतो. परंतु, त्यांच्या आणखी पुष्कळ जबाबदाऱ्या आहेत. ते माहीत करून घेण्यासाठी तुम्हाला जरा खोदकाम करावे लागेल. तुमच्याजवळ शास्त्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी (इंग्रजी) हा खंड असल्यास, तुम्ही “देवदूत” या विषयाचा अभ्यास करू शकता किंवा पूर्वीच्या टेहळणी बुरूज नियतकालिकात देवदूतांवर आलेले लेख पाहू शकता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, देवाच्या या तेजोमय सेवकांबद्दल तुम्हाला कितीतरी शिकता येईल आणि त्यांच्या आधाराची तुम्ही कदर कराल. (प्रकटीकरण १४:६, ७) पण, देवाच्या स्वर्गीय संघटनेत काही आत्मिक प्राण्यांना विशेष कार्य सोपवले आहे.
यशयाने काय पाहिले
१३, १४. यशयाने दृष्टान्तात काय पाहिले व याचा त्याच्यावर कोणता प्रभाव पडला?
१३ आता आपण यशयाच्या दृष्टान्तावर जरा खोदकाम करू या. सहाव्या अध्यायातील १ ते ७ वचने वाचल्यावर तुम्ही चकित व्हाल. “प्रभूस उच्चस्थळी असलेल्या उच्च सिंहासनावर बसलेले मी पाहिले, . . . त्याच्या भोवताली सराफीम उभे होते,” असे यशया म्हणतो. ते यहोवाच्या वैभवाची घोषणा करीत होते, त्याच्या पावित्र्याची स्तुती करीत होते. हा अहवाल वाचूनच तुमच्यावर प्रभाव झाला पाहिजे. यशयाची प्रतिक्रिया काय होती? “मी म्हणालो, हाय हाय! माझे आता वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो; आणि सेनाधीश परमेश्वर, राजाधिराज ह्यास मी आपल्या डोळ्यांनी पाहिले.” तो दृष्टान्त पाहून किती प्रभावित झाला होता तो! आणि तुम्ही?
१४ हा वैभवी दृष्टान्त यशयाला पेलता आला का? तो म्हणतो, की एक सराफदूत त्याच्या साहाय्यास आला आणि त्याला म्हणाला: “तुझा दोष दूर झाला आहे, तुझ्या पापाचे प्रायश्चित झाले आहे.” (यशया ६:७) यशया देवाच्या दयेवर भरवसा ठेवू शकत होता व यहोवाच्या शब्दांकडे ध्यान देऊ शकत होता. आता, तुम्हाला या उच्च-पदावरच्या आत्मिक प्राण्यांविषयी आणखी माहीत करून घ्यावेसे वाटत नाही का? त्यासाठी तुम्ही काय करणे आवश्यक आहे? आणखी खोदकाम करा. टेहळणी बुरूज प्रकाशन सूची (इंग्रजी), हे एक साधन आहे ज्याचा तुम्ही वापर करू शकता; त्यातील संदर्भ पाहिले तर आणखी स्पष्टता देणारी माहिती तुम्हाला मिळेल.
यहेज्केलने काय पाहिले?
१५. यहेज्केलाचा दृष्टान्त विश्वसनीय आहे हे कशाने सूचित होते?
१५ आता आपण दुसऱ्या एका प्रकारच्या आत्मिक सृष्टीबद्दल पाहू या. यहेज्केल बॅबिलोनमध्ये अजूनही बंदिवासात असताना त्याला एक प्रेरक दृष्टान्त पाहण्याची धन्यता प्राप्त झाली. तुमच्या बायबलमधून यहेज्केल अध्याय १ काढून पहिली तीन वचने वाचा. सुरवात कशी करण्यात आली आहे? ‘एकदा, एका दूर देशी . . .’ अशी सुरवात आहे का? नाही, कारण ती पौराणिक काळातील काल्पनिक कथा नाही. पहिले वचन म्हणते: “मी खबार नदीच्या तीरी पकडून आणिलेल्या लोकात राहत होतो, तेव्हा तिसाव्या वर्षाच्या चौथ्या मासी पंचमीस असे झाले की आकाश दुभागून मला दिव्यदृष्टांत दिसले.” या वचनात तुम्हाला खास असे काय दिसते? ते वचन तुम्हाला एक अचूक तारीख आणि अचूक ठिकाण सांगते. ही सविस्तर माहिती, सा.यु.पू. ६१३ सालातील राजा यहोयाखीन याच्या बंदिवासाचे पाचवे वर्ष दर्शवते.
१६. यहेज्केलाने काय पाहिले?
१६ यहोवाचा वरदहस्त यहेज्केलावर आला; एका प्रचंड स्वर्गीय रथात सिंहासनारूढ असलेल्या यहोवाचा भय-प्रेरक दृष्टान्त त्याने पाहिला; रथाच्या मोठमोठाल्या चाकांच्या धावांसभोवती सर्वत्र डोळे होते. मनोरंजक गोष्ट म्हणजे, तेथे चार प्राणी होते, प्रत्येक प्राणी एकएका चाकाशेजारी उभा होता. “दिसण्यात ते मनुष्याकृति होते. त्या प्रत्येकास चार मुखे होती, व प्रत्येकास चार पंख होते. . . . त्या चौघांच्या मुखांपैकी एक मुख मनुष्याचे होते, त्या चौघांचे उजव्या बाजूचे एक मुख सिंहाचे होते; त्या चौघांचे डाव्या बाजूचे एक मुख बैलाचे होते; आणि त्या चौघांचे एक मुख गरुडाचेहि होते, अशी त्यांची मुखे होती.”—यहेज्केल १:५, ६, १०.
१७. करूबांचे चार मुख कशाचे प्रतिनिधीत्व करतात?
१७ हे चार प्राणी काय होते? ते करूब होते असे स्वतः यहेज्केल आपल्याला सांगतो. (यहेज्केल १०:१-३, १४) त्यांना चार मुखे का होती? सार्वभौम प्रभू यहोवाच्या चार उल्लेखनीय गुणांचे प्रतिनिधित्व करण्याकरता. गरुडाचे मुख दूरदर्शी बुद्धीचे प्रतीक होते. (ईयोब ३९:२७-२९) बैलाच्या मुखाने कशाचे प्रतिनिधित्व केले? त्याच्या मानेतील आणि खांद्यांतील प्रचंड शक्तीमुळे, झुंज देणारा बैल घोड्याला आणि घोड्यावरील स्वाराला आकाशात फेकू शकतो असे म्हटले जाते. होय, बैल यहोवाच्या अमर्यादित शक्तीचे प्रतीक आहे. सिंह धैर्यवान न्यायाचे प्रतीक आहे. आणि मनुष्याचे मुख देवाची प्रीती उचितरीत्या दर्शवते; कारण पृथ्वीवरील केवळ मानवप्राणीच हा गुण बुद्धिमानीने प्रदर्शित करू शकतो.—मत्तय २२:३७, ३९; १ योहान ४:८.
१८. प्रेषित योहान, स्वर्गीय संघटनेविषयी आणखी माहिती कशी देतो?
१८ यांना पूर्णपणे समजण्याकरता इतरही अनेक दृष्टान्त आहेत. यामध्ये, बायबलमधील प्रकटीकरणाच्या पुस्तकातील योहानाच्या दृष्टान्तांचा समावेश होतो. यहेज्केलाप्रमाणे त्यानेही, यहोवाला एका वैभवी सिंहासनावर आरूढ असलेला व त्याच्यासह करूब असलेले पाहिले. ते करूब काय करीत आहेत? “पवित्र, पवित्र, पवित्र, जो होता, जो आहे, व जो येणार तो सर्वसमर्थ प्रभु देव,” या यशयाच्या ६ व्या अध्यायातील सराफांच्या घोषणेचे पडसाद ते उमटवत आहेत. (प्रकटीकरण ४:६-८) योहान सिंहासनाशेजारी एका कोकऱ्यालाही पाहतो. तो कोणाला चित्रित करीत असावा? देवाचा कोकरा, अर्थात येशू ख्रिस्त याला.—प्रकटीकरण ५:१३, १४.
१९. या अभ्यासातून तुम्हाला यहोवाच्या संघटनेविषयी काय समजले?
१९ तेव्हा, या दृष्टान्तांद्वारे आपल्याला कशाचे आकलन झाले? की, स्वर्गीय संघटनेत, यहोवा देव आपल्या सिंहासनावर परमोच्च स्थानी आहे; त्याच्या शेजारी कोकरा, अर्थात येशू ख्रिस्त जो शब्द किंवा लोगोस आहे. मग, आपण देवदूतांची स्वर्गीय सेना, तसेच सराफ आणि करूब पाहिले. ते एका विशाल, संयुक्त संघटनेचे भाग असून यहोवाचे उद्देश पूर्ण करीत आहेत. आणि त्यांतील एक उद्देश म्हणजे, या अंतसमयी संपूर्ण जगभरात सुवार्तेचा प्रचार करणे होय.—मार्क १३:१०; योहान १:१-३; प्रकटीकरण १४:६, ७.
२०. पुढील लेखात कोणत्या प्रश्नाचे उत्तर दिले जाईल?
२० सरतेशेवटी, पृथ्वीवर यहोवाचे साक्षीदार, सार्वभौम प्रभूची इच्छा कशी पूर्ण करावी याबद्दलचे शिक्षण त्यांच्या राज्य सभागृहात घेत आहेत. निश्चितच, सैतान आणि सत्याचे शत्रू यांच्याबरोबर जितके आहेत त्यांच्यापेक्षा अधिक आपल्याबरोबर आहेत हे आपण समजू शकतो. पण येथे असा प्रश्न येतो, की स्वर्गीय संघटनेचा राज्याच्या सुवार्तेच्या प्रचाराशी काय संबंध आहे? पुढील लेख याचे आणि इतर बाबींचे परीक्षण करील.
उजळणीकरता प्रश्न
◻ यहोवाच्या संघटनेची कदर करण्याकरता आपल्याला काय समजणे आवश्यक आहे?
◻ अलीशाच्या सेवकाला कोणता अनुभव आला व संदेष्ट्याने त्याचे धाडस कसे बांधले?
◻ व्यक्तिगत अभ्यासाबद्दल आपण कोणता दृष्टिकोन बाळगला पाहिजे?
◻ दानीएल, यशया आणि यहेज्केल स्वर्गीय संघटनेची सविस्तर माहिती कशी देतात?
[१३ पानांवरील चित्र]
व्यक्तिगत अभ्यासाचे फायदे, उत्तमप्रकारे तयार केलेल्या भोजनापेक्षा कितीतरी पटीने वरचढ आहेत
[१५ पानांवरील चित्र]
स्वर्गीय सैन्याचा दृष्टान्त दाखवून यहोवाने अलीशाच्या प्रार्थनेचे उत्तर दिले