तुमच्या एकनिष्ठेमुळे यहोवाचे मन आनंदित होते
“माझ्या मुला, सुज्ञ होऊन माझे मन आनंदित कर, म्हणजे माझी निंदा करणाऱ्यास मी प्रत्युत्तर देईन.”—नीति. २७:११.
१, २. (क) ईयोबाच्या पुस्तकात सैतानाने लावलेल्या कोणत्या आरोपाचे वर्णन करण्यात आले आहे? (ख) ईयोबाच्या मृत्यूनंतरही सैतान यहोवाची निंदा करत आहे हे कशावरून दिसते?
यहोवाने सैतानाला आपला निष्ठावान सेवक ईयोब याची परीक्षा घेण्याची परवानगी दिली. परिणामस्वरूप, ईयोबाने त्याची गुरेढोरे, मुले, व आरोग्य गमावले. पण ईयोबाच्या सात्विकतेला आव्हान देताना सैतानाच्या मनात एकटा ईयोबच नव्हता. सैतानाने असा दावा केला, “त्वचेसाठी त्वचा! मनुष्य आपल्या प्राणासाठी आपले सर्वस्व देईल.” सैतानाच्या या दाव्यामुळे एक असा वादविषय अस्तित्वात आला जो एकट्या ईयोबापुरता मर्यादित नव्हता. आणि ईयोबाच्या मृत्यूनंतरही शतकानुशतके हा वादविषय चालूच आहे.—ईयो. २:४.
२ ईयोबावर परीक्षा आल्यानंतर जवळजवळ ६०० वर्षांनी शलमोनाने देवाच्या प्रेरणेने असे लिहिले: “माझ्या मुला, सुज्ञ होऊन माझे मन आनंदित कर, म्हणजे माझी निंदा करणाऱ्यास मी प्रत्युत्तर देईन.” (नीति. २७:११) याचा अर्थ, सैतान अजूनही यहोवाच्या सेवकांच्या सात्विकतेच्या प्रश्नावरून त्याची निंदा करतच होता. शिवाय, १९१४ मध्ये देवाचे राज्य स्वर्गात स्थापित झाल्यावर सैतानाला स्वर्गातून बाहेर काढण्यात आले तेव्हा तो देवाच्या सेवकांवर दोषारोप करत असल्याचे एका दृष्टांतात प्रेषित योहानाला दाखवण्यात आले होते. शेवटल्या काळाच्या या अंतिम टप्प्यातही सैतान देवाच्या सेवकांच्या सात्विकतेला आव्हान देतच आहे.—प्रकटी. १२:१०.
३. ईयोबाच्या पुस्तकातून आपण कोणते महत्त्वपूर्ण धडे शिकू शकतो?
३ ईयोबाच्या पुस्तकातून आपण जे तीन महत्त्वाचे धडे शिकतो त्यांवर विचार करा. पहिला, ईयोबावर आलेल्या परीक्षा मानवजातीचा खरा शत्रू कोण आहे व देवाच्या लोकांना होणाऱ्या विरोधामागे मुळात कोण आहे हे उघडकीस आणतात. तो शत्रू दियाबल सैतान आहे. दुसरा, आपल्यावर कोणत्याही परीक्षा आल्या तरी यहोवासोबत असलेल्या आपल्या जवळच्या नातेसंबंधामुळे आपण आपली सात्विकता टिकवून ठेवू शकतो. तिसरा, जेव्हा आपल्यावर संकटे येऊन आपली परीक्षा होते तेव्हा ईयोबाप्रमाणे देव आपल्याही पाठीशी राहून आपले साहाय्य करतो. आज यहोवा त्याचे वचन, त्याची संघटना, व त्याच्या पवित्र आत्म्याच्या माध्यमाने आपले साहाय्य करतो.
खरा शत्रू कोण हे नेहमी आठवणीत ठेवा
४. जगातील सध्याच्या परिस्थितीसाठी कोण जबाबदार आहे?
४ सैतान अस्तित्वात आहे यावर अनेकांचा विश्वास नाही. जगाच्या परिस्थितीबद्दल जरी त्यांना काळजी वाटत असली, तरीसुद्धा या परिस्थितीमागे खरेतर दियाबल सैतान आहे हे त्यांना समजत नाही. अर्थात, मानवजातीच्या समस्यांसाठी बऱ्याच अंशी ते स्वतःच जबाबदार आहेत. आदाम व हव्वा या आपल्या पहिल्या पालकांनी आपल्या निर्माणकर्त्यापासून स्वतंत्र होऊन जीवन जगण्याचा मार्ग निवडला. आणि त्यानंतरच्या पिढ्यांमध्ये मानव अतिशय निर्बुद्धपणे वागला आहे. तरीसुद्धा, हव्वेला देवाविरुद्ध बंड करण्यास उद्युक्त करणारा दियाबलच होता. त्यानेच अपरिपूर्ण व मरणाधीन असलेल्या मानवजातीत एक अशी जागतिक यंत्रणा अस्तित्वात आणली आहे जी पूर्णपणे त्याच्या नियंत्रणात आहे. सैतान या ‘युगाचे दैवत’ असल्यामुळे आज मानवसमाजात त्याचेच दुर्गुण दिसून येतात, जसे की गर्विष्ठपणा, भांडखोर प्रवृत्ती, ईर्ष्या, लोभ, कपट आणि बंडखोर प्रवृत्ती. (२ करिंथ. ४:४; १ तीम. २:१४; ३:६; याकोब ३:१४, १५ वाचा.) अशा प्रकारच्या दुर्गुणांमुळे राजकीय व धार्मिक संघर्ष, द्वेषभाव, भ्रष्टाचार, आणि गैरशिस्तपणा यांसारख्या गोष्टी वाढत चालल्या आहेत. आणि यामुळे मानवजातीच्या दुःखात भर पडली आहे.
५. आपल्याजवळ असलेल्या मौल्यवान ज्ञानाचे आपण काय केले पाहिजे?
५ यहोवाचे सेवक असल्यामुळे आपल्याजवळ किती मौल्यवान ज्ञान आहे! आज, बिघडत चाललेल्या जगातील परिस्थितीसाठी कोण जबाबदार आहे हे आपल्याला माहीत आहे. तर मग, क्षेत्र सेवाकार्यात सहभाग घेऊन, मानवजातीचा खरा शत्रू कोण हे लोकांना सांगण्याची आपल्याला प्रेरणा मिळत नाही का? आणि खरा देव यहोवा याचे समर्थन करण्यास व तो कशा प्रकारे सैतानाचा नाश करून मानवजातीच्या सर्व समस्या सोडवेल याबद्दल खुलासा करण्यास आपल्याला आनंद होत नाही का?
६, ७. (क) यहोवाच्या खऱ्या उपासकांच्या होणाऱ्या छळासाठी कोण जबाबदार आहे? (ख) आपण कशा प्रकारे प्राचीन काळातील अलीहूच्या उदाहरणाचे अनुकरण करू शकतो?
६ सैतान हा केवळ जगातील दुःखदायक समस्यांसाठीच नव्हे तर देवाच्या लोकांना होणाऱ्या विरोधासाठीही जबाबदार आहे. त्याने आपली परीक्षा पाहण्याचा जणू चंगच बांधला आहे. येशू ख्रिस्ताने प्रेषित पेत्राला सांगितले: “शिमोना, शिमोना, पाहा, तुम्हास गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागणी केली.” (लूक २२:३१) त्याप्रमाणेच, येशूच्या पावलांवर पाऊल ठेवून चालणाऱ्या आपल्या प्रत्येकालाही या ना त्या मार्गाने परीक्षांना तोंड द्यावेच लागेल. कारण, पेत्राने दियाबलाची तुलना एका ‘गर्जणाऱ्या सिंहाशी’ केली जो “कोणाला गिळावे हे शोधीत फिरतो.” आणि पौलाने म्हटले: “ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्यक्रमण करावयास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल.”—१ पेत्र ५:८; २ तीम. ३:१२.
७ एखाद्या बांधवावर संकट येते तेव्हा मानवजातीचा खरा शत्रू कोण आहे हे आपल्या आठवणीत असल्याचे आपण कसे दाखवू शकतो? संकटात सापडलेल्या अशा बांधवाला टाळण्याऐवजी आपण प्राचीन काळातील अलीहूप्रमाणे वागले पाहिजे, जो ईयोबाशी एका सच्चा मित्राप्रमाणे बोलला. आपल्या सर्वांचाच शत्रू असणाऱ्या सैतानाविरुद्ध लढण्यासाठी आपण आपल्या बांधवाला साहाय्य करतो. (नीति. ३:२७; १ थेस्सलनी. ५:२५) कारण, काही झाले तरी, आपल्या बांधवाला त्याची एकनिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी मदत करणे आणि यहोवाचे मन आनंदित करणे हेच आपले ध्येय आहे.
८. यहोवाचा सन्मान करण्यापासून ईयोबाला रोखण्यात सैतान यशस्वी का झाला नाही?
८ ईयोबाच्या संपत्तीपैकी सैतानाने सर्वप्रथम त्याची गुरेढोरे हिरावून घेतली. ही जनावरे निश्चितच मौल्यवान होती. कदाचित ती त्याच्या उदरनिर्वाहाचे साधनही असू शकतील. ईयोबाने आपल्या उपासनेतही या जनावरांचा वापर केला होता. ईयोब आपल्या मुलांची शुद्धी केल्यावर, “प्रात:काळी उठून त्या सर्वांच्या संख्येइतक्या बलीचे हवन करी; कारण तो म्हणे की, ‘न जाणो माझ्या पुत्रांनी पाप केले असेल आणि आपल्या मनाने देवाचा अव्हेर केला असेल.’ असा ईयोबाचा नित्यक्रम असे.” (ईयो. १:४, ५) अशा प्रकारे, ईयोब यहोवाला नियमितपणे जनावरे अर्पण करायचा. ईयोबावर परीक्षा येण्यास सुरुवात झाल्यावर साहजिकच असे करणे त्याला शक्य नव्हते. यहोवाचा सन्मान करण्यासाठी ईयोबाजवळ कोणत्याही मौल्यवान वस्तू उरलेल्या नव्हत्या. (नीति. ३:९) पण, तो आपल्या ओठांनी यहोवाचा सन्मान करू शकत होता आणि त्याने तसे केलेही!
यहोवासोबत जवळचा नातेसंबंध विकसित करा
९. आपल्या जीवनात सर्वात जास्त महत्त्वाचे काय आहे?
९ आपण श्रीमंत असो वा गरीब, तरुण असो वा वृद्ध, आपले आरोग्य चांगले असो वा नसो, आपण सर्वच जण यहोवासोबत जवळचा नातेसंबंध विकसित करू शकतो. आपल्यावर कोणत्याही परीक्षा आल्या तरीही, देवासोबत जवळीक असल्यास आपण आपली एकनिष्ठा टिकवून ठेवू शकतो व यहोवाचे मन आनंदित करू शकतो. खरेतर, सत्याविषयी मर्यादित ज्ञान असलेल्या काही व्यक्तींनीही धैर्य दाखवून स्वतःची एकनिष्ठा टिकवून ठेवली आहे.
१०, ११. (क) एकनिष्ठेची परीक्षा झाली तेव्हा एका बहिणीची प्रतिक्रिया काय होती? (ख) या बहिणीने सैतानाला चोख उत्तर दिले असे का म्हणता येईल?
१० वॅलेन्टीना गार्नोफ्सकाया या बहिणीच्या उदाहरणावर लक्ष द्या. परीक्षांचा सामना करावा लागला तरी विश्वासू ईयोबाप्रमाणेच आपली एकनिष्ठा टिकवून ठेवलेल्या रशियातील कित्येक साक्षीदारांपैकी ती एक होती. १९४५ साली ती २० वर्षांची असताना, एका बांधवाने तिला साक्ष दिली होती. बायबलविषयी चर्चा करण्यासाठी तो बांधव तिला आणखी दोनदा भेटला. पण, त्यानंतर तिची त्या बांधवाशी पुन्हा कधीच भेट झाली नाही. तरीसुद्धा, वॅलेन्टीनाने आपल्या शेजाऱ्यांना प्रचार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तिला अटक करण्यात आली व तिला आठ वर्षे श्रम शिबिरामध्ये पाठवण्यात आले. १९५३ साली तिची सुटका करण्यात आली आणि लगेच तिने प्रचार कार्य सुरू केले. तिला पुन्हा अटक करण्यात आली व यावेळी तिला दहा वर्षांचा कारावास झाला. बरीच वर्षे एका शिबिरात घालवल्यानंतर तिला दुसऱ्या एका शिबिरात पाठवण्यात आले. त्या शिबिरात काही बहिणी होत्या ज्यांच्याजवळ एक बायबल होते. एके दिवशी त्यांच्यापैकी एकीने वॅलेन्टीनाला ते बायबल दाखवले. तो क्षण तिच्याकरता अतिशय आनंददायक होता! कारण, १९४५ साली तिला देवाच्या राज्याबद्दल सांगणाऱ्या त्या बांधवाच्या हातात तिने बायबल पाहिले होते त्यानंतर आज पुन्हा एकदा तिला बायबल पाहायला मिळाले होते!
११ सन १९६७ मध्ये वॅलेन्टीनाची सुटका झाली आणि शेवटी ती बाप्तिस्मा घेऊन यहोवाला केलेले आपले समर्पण जाहीर करू शकली. स्वातंत्र्याचा फायदा घेऊन ती आवेशाने सेवाकार्य करू लागली. पण १९६९ साली तिला पुन्हा अटक झाली आणि तीन वर्षांचा तुरुंगवास झाला. तरीसुद्धा वॅलेन्टीनाने देवाच्या राज्याविषयी सांगण्याचे बंद केले नाही. २००१ साली तिचा मृत्यू होईपर्यंत तिने ४४ लोकांना सत्य शिकून घेण्यास साहाय्य केले होते. तिने तुरुंगांत व श्रम शिबिरांत एकूण २१ वर्षे घालवली होती. आपली एकनिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी ती आपल्या स्वातंत्र्यासहित सर्व काही गमावण्यास तयार होती. मृत्यूच्या काही काळाआधी वॅलेन्टीना म्हणाली: “माझं स्वतःचं घर कधीच नव्हतं. एका सूटकेसमध्ये मावतील एवढ्याच वस्तू माझ्याजवळ होत्या, पण तरीसुद्धा यहोवाच्या सेवेत मी आनंदी व समाधानी होते.” संकटे आल्यास मानव देवाला एकनिष्ठ राहणार नाहीत असा दावा करणाऱ्या सैतानाला वॅलेन्टीनाने किती चोख उत्तर दिले! (ईयो. १:९-११) तिच्या विश्वासूपणामुळे यहोवाचे मन निश्चितच आनंदित झाले असेल. पुनरुत्थानात वॅलेन्टीना आणि तिच्यासारख्याच आपल्या इतर सर्व विश्वासू सेवकांना पुन्हा जिवंत करण्यास यहोवा उत्सुक आहे असे आपण खातरीने म्हणू शकतो.—ईयो. १४:१५.
१२. यहोवासोबत असलेल्या आपल्या नातेसंबंधात प्रेमाची काय भूमिका आहे?
१२ आपले यहोवावर प्रेम असल्यामुळेच आपण त्याच्यासोबत घनिष्ठ नातेसंबंध जोडतो. देवाच्या अप्रतिम गुणांमुळे आपण त्याच्याकडे आकर्षित होतो आणि त्याच्या उद्देशांनुसार वागण्याची आपल्याला प्रेरणा मिळते. दियाबलाने आरोप केल्याप्रमाणे स्वार्थाने प्रवृत्त होऊन नव्हे, तर स्वेच्छेने व बिनशर्तपणे आपण यहोवावर प्रेम करतो. या मनःपूर्वक प्रेमामुळेच आपल्याला संकटांतही यहोवाला एकनिष्ठ राहण्याची ताकद मिळते. त्याचसोबत यहोवा देखील आपल्या एकनिष्ठ ‘भक्तांचा मार्ग संभाळतो.’—नीति. २:८; स्तो. ९७:१०.
१३. आपण यहोवासाठी जे काही करतो त्याकडे तो कोणत्या दृष्टीने पाहतो?
१३ आपण यहोवाच्या सेवेत फार काही करू शकत नाही असे कधीकधी आपल्याला वाटू शकते. पण असे वाटत असले तरीसुद्धा, यहोवावर असलेल्या प्रेमामुळे आपल्याला त्याच्या नावाची स्तुती करण्याची प्रेरणा मिळते. आपल्याला यहोवाच्या सेवेत जितके करावेसे वाटते तितके करता आले नाही, तरीसुद्धा तो याकरता आपल्याला दोषी ठरवत नाही तर आपल्या मनातील चांगल्या हेतूंची तो कदर करतो. आपण काय करतो हे नव्हे तर कोणत्या भावनेने करतो हे अधिक महत्त्वाचे आहे. ईयोब दुःखाने व्याकूळ होता आणि बरीच संकटे त्याने सोसली होती तरी, आपल्यावर दोष लावणाऱ्यांशी बोलताना त्याने यहोवाच्या कार्यांची स्तुती केली. (ईयोब १०:१२; २८:२८ वाचा.) ईयोबाच्या पुस्तकातील शेवटल्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे अलीफज, बिल्दद व सोफर यांनी सत्याचे समर्थन न केल्यामुळे देवाचा क्रोध त्यांच्याविरुद्ध भडकला. पण दुसरीकडे पाहता, ईयोबाला चार वेळा “माझा सेवक” असे म्हणून आणि त्याला त्या खोट्या सांत्वनकर्त्यांच्या वतीने प्रार्थना करण्यास सांगून यहोवाने त्याच्याबद्दल पसंती व्यक्त केली. (ईयो. ४२:७-९) आपल्याबद्दलही यहोवाने पसंती व्यक्त करावी अशा प्रकारे वागण्याचा आपण नेहमी प्रयत्न करू या.
यहोवा आपल्या विश्वासू सेवकांना साहाय्य करतो
१४. ईयोबाला त्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी यहोवाने कशा प्रकारे मदत केली?
१४ अपरिपूर्ण असूनही ईयोब एकनिष्ठ राहिला. अर्थात काहीवेळा, अतिशय मानसिक तणावात असताना त्याने चुकीच्या दृष्टिकोनाने विचार केला. उदाहरणार्थ, त्याने यहोवाला म्हटले: “मी तुझा धावा करितो, पण तू ऐकत नाहीस; . . . तू आपल्या बाहुबलाने माझा छळ करीत आहेस.” शिवाय, स्वतःला निर्दोष शाबित करण्यावर त्याने खूप जास्त भर दिला व म्हटले: “मी दुष्ट नाही.” “माझ्या हातून काही अन्याय झाला नाही; माझी प्रार्थना शुद्ध भावाची आहे.” (ईयो. १०:७; १६:१७; ३०:२०, २१) यहोवाने ईयोबाला अनेक प्रश्न विचारून त्याचा चुकीचा दृष्टिकोन सुधारण्यास प्रेमळपणे मदत केली. यामुळे त्याला स्वतःकडे जास्त लक्ष न देता, देव किती महान आहे व त्याच्या तुलनेत मनुष्य किती क्षुद्र आहे हे स्पष्टपणे समजून घेणे शक्य झाले. ईयोबाने हे मार्गदर्शन स्वीकारून त्यानुसार आपला दृष्टिकोन बदलला.—ईयोब ४०:८; ४२:२, ६ वाचा.
१५, १६. आज यहोवा आपल्या सेवकांना कोणकोणत्या मार्गांनी साहाय्य पुरवतो?
१५ यहोवा आपल्या सेवकांना प्रेमळपणे मार्गदर्शन व सल्लाही देतो. शिवाय, आपल्याला अनेक आशीर्वाद लाभले आहेत. उदाहरणार्थ, येशू ख्रिस्ताने खंडणी बलिदान देण्याद्वारे आपल्या पापांची क्षमा होण्याचा मार्ग खुला केला. आपण अपरिपूर्ण असूनही, या बलिदानाच्या आधारावर देवासोबत जवळचा नातेसंबंध जोडू शकतो. (याको. ४:८; १ योहा. २:१) परीक्षांना तोंड देत असताना, आपण देवाच्या पवित्र आत्म्याच्या साहाय्याकरताही प्रार्थना करतो. शिवाय आपल्याजवळ संपूर्ण बायबल आहे. जर आपण त्याचे वाचन केले आणि त्यावर मनन केले तर भविष्यातील परीक्षांना तोंड देण्यासाठी आपण सुसज्ज होऊ. बायबलचा गहन अभ्यास केल्याने देवाच्या आधिपत्याविषयी आणि आपल्यापैकी प्रत्येकाच्या एकनिष्ठेविषयी सैतानाने उठवलेले वाद आपल्याला स्पष्टपणे समजून घेता येतील.
१६ तसेच, जगभरात असलेल्या आपल्या बंधुसमाजाचा भाग असणेही आपल्याकरता अतिशय फायदेकारक आहे. कारण, यहोवा या बंधुसमाजाला ‘विश्वासू व बुद्धिमान दासाद्वारे’ आध्यात्मिक अन्न पुरवतो. (मत्त. २४:४५-४७) यहोवाच्या साक्षीदारांच्या जवळजवळ १,००,००० मंडळ्यांमध्ये चालवल्या जाणाऱ्या सभांतून आपल्याला मार्गदर्शन दिले जाते आणि संभाव्य परीक्षांना तोंड देण्याकरता आपल्याला साहाय्य पुरवले जाते. जर्मनीत राहणाऱ्या शीला नावाच्या एका १५ वर्षीय साक्षीदार मुलीच्या उदाहरणावरून हे स्पष्ट होते.
१७. आज यहोवाच्या संघटनेकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनाचे काळजीपूर्वक पालन करणे सुज्ञपणाचे आहे हे एका उदाहरणाच्या साहाय्याने स्पष्ट करा.
१७ एके दिवशी शाळेत शीलाच्या वर्गात कोणीही शिक्षक नसताना तिच्या वर्गसोबत्यांनी वीजा बोर्डचा (भविष्य जाणून घेण्यासाठी वापरले जाणारे एक भूतविद्येचे साधन) प्रयोग करून पाहायचे ठरवले. शीला लगेच वर्गातून निघून गेली. नंतर तिला जे ऐकायला मिळाले ते ऐकून आपण वर्गातून बाहेर गेलो हे बरेच केले असे तिला वाटले. कारण वीजा बोर्डचा प्रयोग करत असताना काही विद्यार्थ्यांना दुरात्म्यांचा प्रभाव जाणवला आणि ते घाबरून तेथून पळून गेले. पण शीलाला वर्गातून लगेच बाहेर जाण्याचा निर्णय का घेता आला? ती सांगते, “ही घटना घडण्याच्या काही दिवसांआधीच राज्य सभागृहातील एका सभेत वीजा बोर्डचा प्रयोग करणं किती धोकेदायक ठरू शकतं याबद्दल आम्ही चर्चा केली होती. त्यामुळं त्या परिस्थितीत मी काय करावं हे मला लगेच ठरवता आलं. नीतिसूत्रे २७:११ यात सांगितल्याप्रमाणे मला यहोवाला आनंदित करायचं होतं.” शीला त्या सभेला उपस्थित होती आणि तेथे सांगितलेल्या गोष्टी तिने लक्षपूर्वक ऐकल्या हे किती बरे झाले!
१८. तुम्ही वैयक्तिक रीत्या काय करण्याचा निर्धार केला आहे?
१८ तर मग, आपण सर्व जण देवाच्या संघटनेद्वारे मिळणाऱ्या मार्गदर्शनाचे काळजीपूर्वक पालन करण्याचा दृढ निश्चय करू या. नियमित सभांना उपस्थित राहणे, बायबल वाचणे, बायबलवर आधारित प्रकाशनांचा अभ्यास करणे, प्रार्थना करणे तसेच प्रौढ ख्रिस्ती बांधवांशी संगती करणे, या सर्व गोष्टींमुळे आपल्याला परीक्षांना तोंड देण्यासाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन व साहाय्य मिळते. सैतानाने आणलेल्या सर्व परीक्षांना तोंड देण्यात आपण यशस्वी ठरावे असे यहोवाला वाटते आणि आपण त्याला एकनिष्ठ राहू असा त्याला पूर्ण भरवसा आहे. खरोखर, यहोवाच्या नावाचे गौरव करण्याचा, त्याला एकनिष्ठ राहण्याचा आणि त्याचे मन आनंदित करण्याचा केवढा अद्भुत सन्मान आपल्याला मिळाला आहे!
तुम्हाला आठवते का?
• सैतान कोणत्या परिस्थितीसाठी व परीक्षांसाठी जबाबदार आहे?
• आपल्याजवळ असलेली सर्वात मौल्यवान गोष्ट काय आहे?
• आपण यहोवासोबत घनिष्ठ नातेसंबंध का जोडतो?
• आज यहोवा कोणकोणत्या मार्गांनी आपले साहाय्य करतो?
[८ पानांवरील चित्र]
तुमच्याजवळ असलेल्या मौल्यवान सत्याबद्दल इतरांना सांगण्याची तुम्हाला प्रेरणा मिळते का?
[९ पानांवरील चित्र]
आपण आपल्या बांधवांना यहोवाला एकनिष्ठ राहण्यास मदत करू शकतो
[१० पानांवरील चित्र]
आपली एकनिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी वॅलेन्टीना सर्व गोष्टींचा त्याग करण्यास तयार होती