ईयोबाचे प्रतिफळ —आशेचा एक स्रोत
“यहोवाने ईयोबाची शेवटली स्थिति त्याच्या पहिल्या स्थितीपेक्षा अधिक आशीर्वादित केली.” —ईयोब ४२:१२, पं. र. भाषांतर.
१. परीक्षांमुळे लोकांना अतिशय दुर्बळ केले असले तरी यहोवा आपल्या लोकांसाठी काय करतो?
यहोवा “त्याचा शोध झटून करणाऱ्यांना प्रतिफळ देणारा आहे.” (इब्रीयांस ११:६) परीक्षांनी आपल्या समर्पित लोकांना मेल्यासारखे अशक्त केलेले असले, तरी धैर्याने साक्ष देण्यासाठी तो त्यांना प्रवृत्त करतो. (ईयोब २६:५; प्रकटीकरण ११:३, ७, ११) हे, त्रास सहन करीत असलेल्या ईयोबाच्या प्रकरणात खरे शाबीत झाले. तीन खोट्या सांत्वनदात्यांनी त्याची नालस्ती केली, तेव्हा मनुष्याच्या भयामुळे तो निरुत्तर झाला नव्हता. उलटपक्षी, त्याने धैर्याने साक्ष दिली.
२. यहोवाच्या साक्षीदारांना छळ व हाल सहन करावे लागले, तरी ते आपल्या परीक्षांतून कसे निभावले आहेत?
२ आधुनिक दिवसातील अनेक यहोवाच्या साक्षीदारांनी इतके छळ आणि कष्ट सहन केले, की ते अगदी मृत्यूच्या दाढेत आले होते. (२ करिंथकर ११:२३) परंतु त्यांनी ईयोबासारखी, देवावर प्रीती प्रदर्शित केली व धार्मिकतेचे आचरण केले. (यहेज्केल १४:१४, २०) ते, यहोवाला संतुष्ट करण्याच्या निश्चयाने, धैर्याने साक्ष देण्यास व खरी आशा असल्यामुळे आपल्या छळातून देखील निभावले.
ईयोब जोरदार साक्ष देतो
३. ईयोबाने आपल्या समारोपाच्या भाषणात कोणत्या प्रकारची साक्ष दिली?
३ आपल्या समारोपाच्या भाष्यात, ईयोबाने आधीपेक्षा अधिक मोठी साक्ष दिली. त्याने आपल्या खोट्या सांत्वनदात्यांचे तोंड पूर्णपणे बंद केले. झोंबणाऱ्या विधानाचा उपयोग करुन त्याने म्हटले: “तू निर्बळांस केवढेसे साहाय्य केले?” (ईयोब २६:२) ईयोबाने यहोवाची स्तुती केली ज्याने आपल्या सामर्थ्याने अवकाशात पृथ्वीच्या गोलाकाराला निराधार टांगले आहे व जो पाण्याने भरलेल्या मेघाला पृथ्वीच्या वर कोंडून ठेवतो. (ईयोब २६:७-९) तरीही, ईयोबाने अशा आश्चर्याबद्दल म्हटले, की त्या ‘यहोवाच्या कार्यक्षेत्राच्या केवळ सीमा आहेत.’—ईयोब २६:१४.
४. सचोटीबद्दल ईयोबाने काय म्हटले व अशाप्रकारे तो स्वतःला का व्यक्त करु शकला?
४ ईयोबाने आपल्या निरपराधीपणाबद्दल म्हटले: “माझा प्राण जाईतोवर मी आपले सत्वसमर्थन सोडणार नाही.” (ईयोब २७:५) त्याच्या विरुद्ध केलेल्या खोट्या आरोपाच्या उलट, त्याच्यावर जे काही गुदरले आहे ते येण्याजोगे असे त्याने काहीही केले नव्हते. यहोवा धर्मत्यागी लोकांच्या प्रार्थना ऐकत नाही पण तो सचोटी रक्षकांना प्रतिफळ देईल हे ईयोबाला माहीत होते. ही गोष्ट आपल्याला, हर्मगिदोनाचे वादळ लवकरच दुष्टांना त्यांच्या सामर्थ्याच्या स्थानातून काढून टाकील व ते देवाच्या कठोर हातातून बचावणार नाहीत, याची आठवण करुन देते. तोवर, यहोवाचे लोक त्यांची सचोटी राखून चालतील.—ईयोब २७:११-२३.
५. ईयोबाने खऱ्या बुद्धीची व्याख्या कशी दिली?
५ मानवाने सोने, चांदी व पृथ्वीतील तशीच समुद्रातील इतर संपत्ती शोधण्यासाठी आपल्या कुशलतेचा वापर केल्याचे ईयोबाने दाखवल्यावर, ऐकत असणाऱ्या त्या फाजील ज्ञानी त्रिकूटाची कल्पना करा. ‘पण,’ त्याने म्हटले, “ज्ञानाचे [बुद्धी, NW] मोल मोत्याहून अधिक आहे.” (ईयोब २८:१८) ईयोबाचे खोटे सांत्वनकर्ते खऱ्या बुद्धीला विकत घेऊ शकत नव्हते. त्याचा स्रोत हवा, पाऊस, वीजा व गडगडाट यांचा निर्माणकर्ता आहे. खरोखर, भीतीयुक्त “प्रभूचे [यहोवा, NW] भय—हेच ज्ञान [बुद्धी, NW] होय, दुष्टतेपासून दूर राहणे हेच सुज्ञान होय.”—ईयोब २८:२८.
६. ईयोबाने त्याच्या आधीच्या जीवनाबद्दल का सांगितले?
६ दुःखात असतानाही, ईयोबाने यहोवाची सेवा करण्याचे थांबवले नाही. परात्परापासून दूर जाण्याऐवजी, सचोटी राखणाऱ्या या मनुष्याने आधी ‘देवाबरोबर असलेल्या मैत्रीची’ ओढ दाखवली. (ईयोब २९:४, पं. र. भाषांतर) ईयोबाने ‘दीनाला साहाय्य केले, स्वतःवर धर्माने पांघरुण घातले व दरिद्य्रांचा पिता असे,’ म्हटले तेव्हा तो स्वतःची बढाई मारत नव्हता. (ईयोब २९:१२-१६) उलट, यहोवाचा एक विश्वासू सेवक या नात्याने तो वस्तुस्थितीला उद्धृत करीत होता. अशाचप्रकारचे उत्तम उदाहरण तुम्ही विकसित केले आहे का? अर्थातच, तीन धर्मनिष्ठ ढोंग्यांनी केलेल्या खोटेपणाच्या आरोपाला ईयोब उघड करीत होता.
७. ईयोब कशाप्रकारचा मनुष्य होता?
७ ‘ज्यांच्या वडिलांना ईयोबाने आपल्या मेंढ्याबकऱ्या राखावयास कुत्रे म्हणून सुद्धा ठेवले नसते,’ असे तरुण पुरूष त्याच्याकडे बघून हसले. त्याला अमंगळ समजून त्याजवर थुंकण्यात आले. गंभीरपणे त्याला पीडिले असले, तरी ईयोबाबद्दल विचारशीलपणा किंवा सहानुभूती दाखवण्यात आली नाही. (ईयोब ३०:१, १०, ३०) तथापि तो, यहोवाला पूर्णपणे समर्पित असल्यामुळे, त्याचा विवेक शुद्ध होता व त्यामुळेच असे म्हणू शकला की: “त्याने मला न्यायाच्या ताजव्यांत तोलावे, देवाला माझी सात्विकता कळून येऊ द्या.” (ईयोब ३१:६) ईयोब व्यभिचारी किंवा कारस्थानी नव्हता तसेच गरजवंतांना मदत करण्यात उणा पडला नव्हता. तो श्रीमंत होता तरी, त्याने भौतिक धनसंपत्तीवर कधीही भरवसा ठेवला नाही. शिवाय, चंद्रासारख्या निर्जीव गोष्टींची भक्ती करुन ईयोबाने कधीही मूर्तीपूजा केली नाही. (ईयोब ३१:२६-२८) देवावर भरवसा ठेवून, सचोटी रक्षकाचे एक उत्तम उदाहरण त्याने मांडले. ईयोबाने सर्व दुःख आणि खोट्या सांत्वनकर्त्यांकडील दबाव असतानाही, कुशलतेने लढा व भव्य साक्ष दिली. आपले बोलणे संपल्यावर, त्याने देवाकडे न्यायाधीश व प्रतिफळ देणारा या नात्याने पाहिले.—ईयोब ३१:३५-४०.
अलीहू बोलतो
८. अलीहू कोण होता व त्याने आदर आणि धैर्य कसे दाखवले?
८ जवळच तरुण अलीहू बसलेला होता जो नाहोरचा मुलगा बूजी याचा वंशज होता व यामुळे तो यहोवाचा मित्र अब्राहाम याचा दूरुन नातेवाईक लागत होता. (यशया ४१:८) अलीहूने वादविषयाच्या दोन्ही बाजू ऐकण्याद्वारे वयोवृद्धांना आदर दाखवला. तरीही, त्यांच्या चुकीच्या गोष्टींबद्दल तो धैर्याने बोलला. उदाहरणार्थ, ईयोबाने “देवाला निर्दोषी ठरविण्याचे सोडून स्वतःस निर्दोषी ठरवावयास पाहिले” म्हणून त्याजवर याचा राग भडकला. अलीहूचा राग विशेषपणे खोट्या सांत्वनकर्त्यांवर होता. त्यांची विधाने देवाची स्तुती करीत असल्याची वाटत होती पण तीव्र मतभेदात सैतानाची बाजू घेण्याद्वारे ती खरेपणाने त्याजवर दूषण लावत होती. ‘मनात शब्दांची गर्दी करून’ व पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन, अलीहू यहोवाचा एक निःपक्षपाती साक्षीदार होता.—ईयोब ३२:२, १८, २१.
९. अलीहूने ईयोबाच्या पुनःर्स्थापनेचा संकेत कसा दिला?
९ ईयोबाला देवाचे समर्थन करण्याऐवजी स्वतःचे समर्थन करण्याची अधिक काळजी लागली होती. वास्तविक पाहता त्याने देवासोबत युक्तीवाद केला होता. परंतु त्याचा मृत्यू जवळ येऊन ठेपला होता तेव्हाच, पुनःर्स्थापनेचा संकेत लागला. कशाप्रकारे? यहोवाची ईयोबावर कृपादृष्टी आहे हे सांगण्यास अलीहू प्रवृत्त झाला: “याला खाचेत उतरण्यापासून सोडीव, मला खंडणी मिळाली आहे. त्याचा देह बालकाच्यापेक्षा टवटवीत होईल, तो पुनः आपल्या तरुणपणाच्या दिवसात येईल.”—ईयोब ३३:२४, २५, पं. र. भाषांतर.
१०. ईयोबाची परीक्षा कोठवर घेतली जाणार होती; पण १ करिंथकर १०:१३ च्या अनुषंगाने आपण कशाची खातरी बाळगू शकतो?
१० सात्त्विकता टिकवून देवामध्ये रस घेण्यात काही लाभ नाही या ईयोबाच्या बोलण्याला अलीहूने सुधारले. अलीहूने म्हटले: “देवाकडून दुष्कर्म व्हावे, सर्वसमर्थाकडून अन्याय व्हावा, ही कल्पनाहि करावयाला नको. तो मनुष्याला त्याच्या कर्माचे प्रतिफळ देतो [देईल].” ईयोबाने स्वतःच्या धार्मिकतेला महत्त्व देऊन उतावीळपणाने कार्य केले. पण हे त्याने पुरेसे ज्ञान व सुक्ष्मदृष्टीच्या अभावामुळे केले. अलीहूने पुढे म्हटले: ईयाबाने दुष्ट लोकांना जी उत्तरे दिली त्याबाबतीत त्याची शेवटपर्यंत कसोटी पाहावी हे बरे.” (ईयोब ३४:१०, ११, ३५, ३६, NW) अशाच रीतीने, आमचा विश्वास आणि सात्विकता, आमची काही गोष्टीत ‘शेवटपर्यंत कसोटी पाहिल्यास’ पूर्णपणे शाबीत होऊ शकते. तरीही, आमचा प्रेमळ स्वर्गीय पिता आमच्या सहनशक्तीपलीकडे आमची परीक्षा होऊ देणार नाही.—१ करिंथकर १०:१३.
११. अधिक गंभीरपणे परीक्षा घेतली जात असताना आपण काय लक्षात ठेवले पाहिजे?
११ अलीहू पुढे सांगत असताना, ईयोब स्वतःच्या धार्मिकतेवर अधिक जोर देत असल्याचे त्याने पुन्हा दाखवले. आपण आपल्या निर्माणकर्त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. (ईयोब ३५:२, ६, १०) अलीहूने म्हटले की, देव “अर्धम्यास वाचवीत नाही; तो दीनांचा न्याय करितो. (ईयोब ३६:६) देवाच्या मार्गांबद्दल कोणीही प्रश्न करु शकत नाही व तो अधार्मिक आहे, असे कोणीही म्हणू शकत नाही. आम्हाला आकलन होऊ शकणार नाही इतका तो थोर व अगम्य आहे आणि त्याच्या वर्षांची संख्या अगण्य आहे. (ईयोब ३६:२२-२६) अति तीव्रपणे परीक्षा होत असताना, हे लक्षात ठेवा की, आमचा सर्वकाळचा देव धार्मिक आहे व तो त्याला गौरविण्याच्या विश्वासू कार्यांबद्दल आपल्याला प्रतिफळ देईल.
१२. देवाचा दुष्टांवरील न्यायदंड याबद्दल अलीहूचे समारोपाचे वक्तव्य काय सूचित करते?
१२ अलीहू बोलत असताना वादळ येण्याच्या बेताला होते. ते जवळ येत असताना, त्याचे अंतःकरण जोराने थरथरू लागले. यहोवाने ज्या पराक्रमाच्या गोष्टी केल्या त्यांच्याविषयी त्याने सांगितले व म्हटले: “ईयोबा, कान देऊन ऐक. स्तब्ध राहून देवाच्या अद्भुत कृत्यांचे मनन कर.” ईयोबाप्रमाणे आपण देखील देवाच्या अद्भुत कृत्यांचे व भयप्रद माननीयतेचा विचार केला पाहिजे. अलीहूने म्हटले: “सर्वसमर्थ तर अगम्य आहे, त्याचे सामर्थ्य अप्रतिम आहे; न्याय व धर्म विपरीत करीत नाही; म्हणून मनष्ये त्याचे भय धरतात.” (ईयोब ३७:१, १४; २३, २४) लवकरच देव दुष्ट लोकांवर न्यायदंड बजावताना न्याय व धार्मिकता विपरीत करणार नाही व जे आदरयुक्त उपासकांप्रमाणे त्याचे भय बाळगतात त्यांना तो बचावील, या गोष्टीची आठवण आपल्याला अलीहूचे समारोपाचे वक्तव्य करुन देते. यहोवाला विश्वाचा सार्वभौम या नात्याने स्वीकार करीत असलेल्या सचोटी रक्षकांमध्ये असणे हा केवढा विशेषाधिकार आहे! ईयोबाप्रमाणे सहन करा व आनंदी समुदायात असलेल्या तुमच्या आशीर्वादित जागेतून स्वतःला दियाबलास दूर करु देऊ नका.
यहोवा ईयोबाला उत्तर देतो
१३, १४. (अ) यहोवाने ईयोबाला कशाविषयी प्रश्न विचारण्यास सुरवात केली? (ब) देवाने ईयोबाला विचारलेल्या इतर प्रश्नांपासून कोणते मुद्दे शिकता येऊ शकतात?
१३ यहोवा ईयोबाशी वावटळीतून बोलला तेव्हा त्याला किती आश्चर्य वाटले असावे! ती वावटळ देवाचे एक कृत्य होते, सैतानाने घर पाडण्यात व ईयोबाच्या मुलांना ठार मारण्यासाठी वापरलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यापेक्षा ते वेगळे होते. देवाने ईयोबाला विचारले तेव्हा तो निरुत्तर झाला: “मी पृथ्वीचा पाया घातला तेव्हा तू कोठे होतास? . . . तिची कोनशिला कोणी बसविली? त्या समयी प्रभातनक्षत्रांनी मिळून गायन केले व सर्व देवकुमारांनी जयजयकार केला.” (ईयोब ३८:४, ६, ७) समुद्र, त्याच्या मेघवस्राचे पांघरुण, प्रातःसमय, मृत्यूची दारे, प्रकाश आणि अंधकार व मृगशीर्ष यांच्याविषयी यहोवाने ईयोबाला प्रश्नांवर प्रश्न विचारले. “आकाशमंडळाचे नियम तुला माहीत आहेत काय?” असे ईयोबाला विचारले तेव्हा तो काही सांगू शकला नाही.—ईयोब ३८:३३.
१४ इतर प्रश्न सूचित करतात, की मनुष्याला घडवण्याआधी व त्यांना मासे, पक्षी, प्राणी, रांगणारे प्राणी यांच्यावर सत्ता गाजवण्याचा अधिकार देण्याआधी—मानवाच्या कोणत्याही मदतीविना किंवा सल्ल्याविना—देव त्यांची काळजी घेत होता. रानटी बैल, शहामृग व घोडे अशा प्राण्यांबद्दल यहोवाचे पुढील प्रश्न उद्धृत करतात. ईयोबाला विचारले गेले: “गरुड तुझ्या आज्ञेने भरारी मारितो व उंच ठिकाणी घरटे करितो काय?” (ईयोब ३९:२७) मुळीच नाही! “हा बोल लावणारा सर्वसमर्थाशी आता वाद घालील काय?” हा प्रश्न देवाने ईयोबाला विचारला तेव्हा त्याच्या प्रतिक्रियेची कल्पना करा. ईयोबाने जे म्हटले त्यात काही आश्चर्य नव्हते: “पाहा, मी तर पामर आहे, मी तुला काय उत्तर देऊ? मी आपला हात आपल्या तोंडावर ठेवितो.” (ईयोब ४०:२, ४) यहोवाचे नेहमीच बरोबर असल्यामुळे, त्याच्या विरुद्ध काही बोलण्यास आम्ही प्रलोभित झालो तर, ‘आपला हात आपल्या तोंडावर ठेवला’ पाहिजे. देवाने विचारलेल्या प्रश्नांनी सृष्टीत प्रदर्शित केल्याप्रमाणे त्याची श्रेष्ठता, सन्मान व सामर्थ्य देखील अधिक प्रमाणात गौरविले.
बेहेमोथ आणि लिव्याथान
१५. बेहेमोथला सर्वसामान्यपणे कोणता प्राणी म्हणून समजले जाते व त्याची काही वैशिष्ट्ये कोणती आहेत?
१५ यहोवा पुढे बेहेमोथचा उल्लेख करतो, तो पाणघोडा असावा असे सामान्यपणे समजले जाते. (ईयोब ४०:१५-२४) त्याचा प्रचंड आकार, जबरदस्त वजन व कणखर कातडी याबाबतीत हा प्राणी उल्लेखनीय असला, तरी तो ‘हिरवे गवत खात असतो.’ त्याची शक्ती व जोम याचा स्रोत त्याच्या उदग्यात व त्याच्या जांघेच्या स्नायुत असतो. त्याच्या पायांची हाडे ‘तांब्याच्या नळ्याप्रमाणे,’ मजबूत असतात. बेहेमोथ पाण्याच्या जोराच्या लोटामुळे डगमगत नाही, तर तो लाटांच्या विरुद्ध दिशेकडे सहजपणे पोहत जातो.
१६. (अ) लिव्याथानाचे वर्णन कोणत्या प्राण्याला लागू होते आणि त्याबद्दल कोणत्या काही वस्तुस्थिती आहेत? (ब) यहोवाच्या सेवेतील नेमणूकीला पूर्ण करण्याबद्दल, बेहेमोथ व लिव्याथान यांचे सामर्थ्य काय सुचवते?
१६ देवाने ईयोबाला हे देखील विचारले: “लिव्याथानास गळ घालून तुला ओढता येईल काय?” लिव्याथानाचे वर्णन मगरीला योग्यपणे लागू होते. (ईयोब ४१:१-३४) तो कोणासोबतही शांतीचा करार करु शकणार नाही तसेच कोणीही बुद्धिमान माणूस पाण्यात राहणाऱ्या या प्राण्याला चिडवण्याचे धाडस करणार नाही. बाण त्याला पळवीत नाहीत व “परजणाऱ्या भाल्यास तो हसतो.” लिव्याथानाला क्रोध आणून दिल्याने तो मलमाच्या उकळत्या कढईसारखा घुसळतो. लिव्याथान व बेहेमोथ ईयोबापेक्षा अधिक शक्तिशाली आहेत या वस्तुस्थितीने, त्याला नम्र होण्यास मदत केली. आपणही स्वतः शक्तिशाली नाहीत, हे नम्रपणे कबूल केलेच पाहिजे. सर्प म्हटलेल्या सैतानाच्या तीक्ष्ण दातांपासून निसटण्यासाठी व यहोवाच्या सेवेतील आपली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आपल्याला देवाने दिलेल्या बुद्धीची व सामर्थ्याची गरज आहे.—फिलिप्पैकर ४:१३; प्रकटीकरण १२:९.
१७. (अ) ईयोबाने कशाप्रकारे ‘देवाला पाहिले?’ (ब) ईयोब निरूत्तर ठरल्याने काय शाबीत झाले आणि हे आपल्याला कसे साहाय्य करु शकते?
१७ ईयोबाने स्वतःला पूर्णपणे नम्र केले व स्वतःच्या चुकीच्या दृष्टिकोनाला मान्य करुन अज्ञानतेत तो असे बोलला हे त्याने कबूल केले. तरीही, त्याने तो ‘देवाला पाहील’ असा विश्वास प्रकट केला. (ईयोब १९:२५-२७) यहोवाला पाहून जर कोणी मनुष्य जिवंत राहू शकत नाही तर मग हे कसे असू शकते? (निर्गम ३३:२०) वस्तुतः, ईयोबाने ईश्वरी सामर्थ्याचे प्रकटन पाहिले, देवाचे वचन ऐकले आणि यहोवाविषयीचे सत्य पाहण्यासाठी त्याचे मनःचक्षू उघडले. यास्तव, ईयोबाने ‘माघार घेतली व धूळराखेत बसून पश्चात्ताप केला.’ (ईयोब ४२:१-६) तो निरूत्तर झालेल्या अनेक प्रश्नांमुळे देवाचे सर्वश्रेष्ठबळ शाबीत झाले आणि मानवाची कनिष्ठता दिसून आली. ईयोब जसा यहोवाला एकनिष्ठ होता त्याप्रमाणे एखाद्याच्या बाबतीतही असेच होऊ शकते. ते स्वतःच्या आस्थेला, यहोवाच्या नावाचे पवित्रीकरण व त्याच्या सार्वभौमतेचे समर्थन करण्यापेक्षा अधिक महत्त्व देऊ नये हे पाहण्यास आम्हाला मदत करते. (मत्तय ६:९, १०) आमची प्रमुख काळजी, यहोवाला सचोटी राखणे व त्याच्या नावाचा सन्मान करणे ही असली पाहिजे.
१८. ईयोबाच्या भिकार सांत्वनदात्यांना काय करण्याची गरज होती?
१८ आता फाजील अहंकारी असलेल्या भिकार सांत्वनदात्यांबद्दल काय? ईयोब यहोवाबद्दल जसे यथार्थ बोलला तसे अलीफज, बिल्दद व सोफर सत्य न बोलल्यामुळे यहोवा त्यांना ठार मारु शकला असता. यहोवाने म्हटले, “तुम्ही सात बैल व सात एडके घेऊन माझा सेवक ईयोब याजकडे जा व आपल्यासाठी होमबलि अर्पण करा; मग माझा सेवक ईयोब तुम्हांसाठी प्रार्थना करील.” या त्रिकूटाला हे मान्य करण्यासाठी स्वतःला नम्र करावेच लागले. सचोटी राखणाऱ्या ईयोबाला त्यांच्याकरता प्रार्थना करावयाच्या होत्या व यहोवाला त्याची प्रार्थना स्वीकृत वाटली. (ईयोब ४२:७-९) पण देवाला शाप देऊन मरुन जाण्याचे आर्जविलेल्या ईयोबाच्या पत्नीबद्दल काय? असे दिसते, की देवाच्या दयेमुळे ती देखील ईयोबासोबत एकदिलाची झाली.
वचन दिलेली प्रतिफळे आपल्याला आशा देतात
१९. ईयोबाच्या संबंधी, यहोवाने आपली सर्वश्रेष्ठता दियाबलाच्या वरचढ कशी दाखवली?
१९ ईयोबाने स्वतःच्या दुःखाबद्दल काळजी करण्याचे सोडले व देवाच्या सेवेत पुन्हा जोम आणला, तेव्हा यहोवाने त्याच्यासाठी अनेक बाबतीत बदल केला. ईयोबाने त्रिकूटासाठी प्रार्थना केल्यावर, देवाने त्याच्या ‘दुःखाचा परिहार’ केला व ‘पूर्वी मालमत्ता होती तिच्या दुप्पट त्याला दिली.’ यहोवाने रोगजंतूचा फैलाव झालेला सैतानाचा हात थांबवून चमत्कारिकपणे ईयोबाला बरे करुन आपले श्रेष्ठत्व दियाबलाच्या वरचढ असल्याचे दाखविले. देवाने पुन्हा एकदा ईयोबाच्या सभोवती देवदूतांच्या छावणीचे कुंपण घालण्याद्वारे दुरात्म्यांच्या टोळींचा प्रतिकार केला व त्यांना पुन्हा जवळ येऊ न देणाऱ्या स्थितीत ठेवले.—ईयोब ४२:१०; स्तोत्र ३४:७.
२०. यहोवाने ईयोबाला कशाप्रकारे प्रतिफळ व आशीर्वाद दिला?
२० ईयोबाचे भाऊ, बहिणी व पूर्वीचे संबंधीत त्याच्यासोबत भोजन करण्यास, सहानुभूती व्यक्त करण्यास व यहोवाने त्याच्यावर जी विपत्ती गुदरण्यासाठी अनुमती दिली याबद्दल सांत्वन देण्यास येऊ लागले. त्यातील प्रत्येकाने ईयोबाला पैसे व सोन्याची एक अंगठी दिली. यहोवाने ईयोबाची शेवटली स्थिती त्याच्या पहिल्या स्थितीपेक्षा अधिक आशीर्वादित केल्यामुळे १४,००० मेंढरे, ६,००० उंट, १,००० बैलांच्या जोड्या व १,००० गाढवी त्याकडे झाल्या. ईयोबाला आधी होते त्याप्रमाणेच सात मुले व तीन मुली झाल्या. त्याच्या मुली—यमीमा, कसीया व केरेनहप्पूक—सगळ्या देशात या सुंदर स्त्रिया होत्या व ईयोबाने त्यांना त्यांच्या भावाप्रमाणेच वतन वाटून दिले. (ईयोब ४२:११-१५) शिवाय, त्यानंतर ईयोब १४० वर्षे जगला व आपल्या पुत्रपौत्रांच्या चार पिढ्या पाहिल्या. अहवाल शेवटी म्हणतो: “नंतर ईयोब वृद्ध व पुऱ्या वयाचा होऊन मरण पावला.” (ईयोब ४२:१६, १७) त्याच्या आयुष्याची वाढ म्हणजे यहोवाच्या वतीने चमत्काराचे एक कृत्य होते.
२१. ईयोबाविषयी असलेल्या शास्त्रवचनीय अहवालाने आपल्याला कशी मदत मिळते व आपण काय करण्याचा निश्चय केला पाहिजे?
२१ ईयोबाचा शास्त्रवचनीय अहवाल आपल्याला सैतानाच्या युक्त्यांविषयी अधिक सावध करतो व मानवाच्या सचोटीचा यहोवाच्या सार्वभौमत्त्वाशी कसा संबंध आहे, हे पाहण्यास आपल्याला मदत करतो. ईयाबाप्रमाणे देवावर प्रीती करणाऱ्या सर्वांचीच परीक्षा घेतली जाईल. पण आपणही ईयाबाप्रमाणे सहन करु शकतो. तो त्याच्या परीक्षांतून विश्वास व आशा यामुळे बचावला व त्याला अनेक प्रतिफळ मिळाले. यहोवाचे सेवक या नात्याने आज आपल्याला खरा विश्वास व आशा आहे. तसेच प्रतिफळ देणाऱ्या आमच्या थोर दात्याने आम्हा प्रत्येका समोर किती महान आशा ठेवली आहे! अभिषिक्त जणांनी आपले स्वर्गीय प्रतिफळ लक्षात ठेवल्याने पृथ्वीवर उरलेले आयुष्य निष्ठावंतपणे देवाची सेवा करण्यात घालवण्यास त्यांना मदत होईल. पार्थिव आशा असलेले कधीही मरणार नाहीत; पण जे मरतात त्यांना ईयोबासोबत नंदनवन पृथ्वीवर पुनरुत्थानाचे प्रतिफळ देण्यात येईल. आमच्या अंतःकरणात व मनात अशी खरी आशा बाळगून यहोवाच्या बाजूने एक सचोटी रक्षक या नात्याने दृढ उभे राहून आणि त्याच्या विश्वसार्वभौमत्त्वाला विश्वसनीय पाठबळ देणारे होण्याद्वारे देवावर प्रीती करणारे सर्वजण सैतानाला लबाड शाबीत करुया.
तुम्ही कसा प्रतिसाद द्याल?
▫ ईयोबाने भिकार सांत्वनदात्यांना दिलेल्या आपल्या अंतिम प्रत्युत्तरात काही मुद्दे कोणते मांडले होते?
▫ अलीहूने स्वतःला यहोवाचा एक निःपक्षपाती साक्षीदार म्हणून कसे सिद्ध केले?
▫ देवाने ईयोबाला कोणते प्रश्न विचारले आणि त्याचा काय परिणाम झाला?
▫ ईयोबाच्या बाबतीत असलेल्या शास्त्रवचनीय अहवालापासून तुम्हाला कसा लाभ झाला?
[१८ पानांवरील चित्रं]
यहोवाने बेहेमोथ व लिव्याथान यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे ईयोबाला नम्र होण्यास मदत मिळाली