वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w89 १०/१ पृ. २४-२८
  • “यहोवा माझा मेंढपाळ आहे”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “यहोवा माझा मेंढपाळ आहे”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवा, प्रेमळ मेंढपाळ
  • यहोवा आपल्या मेंढराचे रक्षण करतो
  • शत्रूंच्या मध्ये मिष्टान्‍नाची मेजवानी
  • यहोवा आपला मेंढपाळ आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • आपल्या महान निर्माणकर्त्यासोबत पालन करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • यहोवाने नेमलेल्या मेंढपाळांचे ऐका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
w89 १०/१ पृ. २४-२८

“यहोवा माझा मेंढपाळ आहे”

“यहोवा माझा मेंढपाळ आहे. मला काही उणे पडणार नाही.”—स्तोत्रसंहिता २३:१.

१, २. दावीदाची काही उल्लेखनीय कृत्ये कोणती होती, व त्याने किती स्तोत्रांची रचना केलेली आहे?

यादृश्‍याची कल्पना कराः पलिष्टी सैन्य इस्राएल लष्कराला सामोरे ठाकले होते. गल्याथ, पलिष्ट्यांचा महावीर मोठ्या गर्वाने आव्हान देत होता. एक तरुण, केवळ गोफण व गोटे घेऊन त्याजवर चालून गेला. अचूक नेम धरुन मारलेला दगड वेगात जाऊन त्या राक्षसाच्या कपाळात रुतला आणि तो मरुन पडला. तो तरुण कोण होता? दावीद, एक मेंढपाळ, ज्याने हा अचंबीत विजय यहोवा देवाच्या सहाय्याने मिळविला होता.—१ शमुवेल अध्याय १७.

२ लवकरच, हा तरुण इस्राएलांचा राजा बनला व त्याने ४० वर्षे राज्य केले. तो कुशल वीणावादक तसेच ईश्‍वरी प्रेरणेने काव्य रचणारा होता. याशिवाय, दावीदाने ७० पेक्षा अधिक सुमधुर स्तोत्रे रचिली, जी आजही यहोवा देवाच्या लोकांकरता उत्तेजन देणारी व मार्गदर्शन करणारी आहेत. त्यांचेतील सर्वात अधिक लोकप्रिय २३वे स्तोत्र आहे. आपण आपले पवित्र शास्त्र उघडू या व या स्तोत्राच्या प्रत्येक कवनावर चर्चा करीत असता ते तपासून पाहू.

यहोवा, प्रेमळ मेंढपाळ

३. (अ) कोणत्या प्रसंगी दावीदाने त्याच्या मेंढरांना वाचविण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला होता? (ब) यहोवा कोणत्या अर्थी आमचा मेंढपाळ आहे?

३ “यहोवा माझा मेंढपाळ आहे.” (स्तोत्र २३:१) एक अनुभवी मेंढपाळ या नात्याने मेंढरांचे नेतृत्व, पालनपोषण कसे करावे हे दावीद चांगले जाणून होता. उदाहरणार्थ, आपल्या मेंढरांच्या संरक्षणासाठी एके प्रसंगी सिंहाशी तर दुसऱ्‍या वेळी अस्वलांशी मोठ्या हिम्मतीने त्याने झुंज दिली. (१ शमुवेल १७:३४-३६) दावीदाची मेंढरे त्यांच्या मेंढपाळावर संपूर्ण विश्‍वास ठेऊन होती. पण यहोवासोबच्या नातेसंबंधात, तो स्वतः एका मेंढरासमान होता. दावीदास देवाच्या प्रेमळ देखरेखीत एवढी सुरक्षितता वाटली म्हणूनच तो म्हणू शकलाः “यहोवा माझा मेंढपाळ आहे.” तुम्ही यहोवा देव, सर्वथोर मेंढपाळ, याच्या छत्राखाली तेवढ्याच सुरक्षिततेचा आनंद लुटीत आहात का? तो आज खरोखरी आपल्या मेंढरासमान भक्‍तांचे नेतृत्व, भरवणूक व संरक्षण करीत आहे. अधिक म्हणजे, यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यात नेमस्त वडीलजन आहेत, जे विश्‍वासू, प्रेमळ सहमेंढपाळ आहेत व इर्षेने मेंढरांची काळजी वाहतात.—१ पेत्र ५:१-४.

४. आमची आजची परिस्थिती अरण्यवासातील इस्राएलासारखीच आहे ती कशी?

४ “मला काही उणे पडणार नाही.” या विधानाबद्दल बारकाईने विचार करा. यहोवाच्या वात्सल्यपूर्ण देखरेखीमुळेच आपल्याठायी शांतचित्त आणि आत्मविश्‍वास यांची एवढी सांत्वनपर संवेदना अनुभवीत आहोत ना? इस्राएल ४० वर्षे अरण्यवासात भटकत होते त्या काळात त्यांची काय स्थिती झाली होती ते आठवते ना? देवाने त्यांच्या सर्व मूलभूत गरजा पुऱ्‍या केल्या? आजही तसेच आहे. यहोवाच्या विश्‍वासू सेवकांना कशाचीही कमतरता नाही. अनेकजण दावीदाच्या प्रेरित शब्दात आपला स्वर मिळवून हे म्हणू शकतातः “मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो. तरी धार्मिक निराश्रित झालेला व त्याची संतती भिकेस लागलेली मी पाहिली नाही.” (स्तोत्रसंहिता ३७:२५) आज, “विश्‍वासू व बुद्धीमान दास”वर्गाकरवी आध्यात्मिक अन्‍नाचा विपुल साठा पुरविला जात आहे. (मत्तय ४:४; २४:४५-४७) सप्ताहभरातील अनेक सभांसोबत आम्हापाशी पवित्रशास्त्र, वॉचटावर व अवेक! ही मासिके व इतर अनेक प्रकाशने आहेत. अनेक देशात, जरी यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रचार कार्यावर बंदी आहे, तरी आध्यात्मिक अन्‍नाचा अखंड पुरवठा पुरविला जात आहे. यहोवाच्या मेंढरांना कधीच काही उणे पडत नाही!

५. यहोवाची मेंढरे आज शांतचित्त आणि समाधानी आहेत ते का, आणि याचा काय परिणाम दिसून येतो?

५ “तो मला हिरव्यागार कुरणात बसवितो.” (स्तोत्र २३:२) प्राचीन काळच्या इस्राएल प्रांताभोवती अनेक हिरवीगार कुरणे होती. जसा एखादा प्रेमळ मेंढपाळ आपल्या मेंढरांना भरगच्च व हिरव्यागार तसेच सुरक्षित कुरणात नेई तसेच आज यहोवा त्यांच्या मेंढरांची काळजी घेतो. स्तोत्रकर्त्याने म्हटले आहेः “आपण त्याच्या कुरणातील प्रजा” आहोत. (स्तोत्रसंहिता ७९:१३; ९५:७) खरोखरीची मेंढरे जेव्हा तृप्त असतात व त्यांना मध्यान्हाच्या कडक उन्हापासून विश्राम मिळतो तेव्हा ते अधिक चांगले वागतात. यहोवाची आजची मेंढरे शांतीप्रिय व आरामदायी आहेत कारण त्यांच्याठायी मंडळीतील आणि विभागातील प्रौढ मेंढपाळ—तालीम मिळालेले देखरेखे यांच्याविषयीचा आत्मविश्‍वास आहे. याच्या परिणामात आध्यात्मिक कळपाची वाढ होत आहे. ज्यांना गतकाळात मोठ्या बाबेलच्या खोट्या मेंढपाळांकरवी प्रतिकूल वागणूक मिळाली होती ते अनेक आज यहोवाची मेंढरे बनून आनंदात आहेत.

६. यहोवा आम्हाला कशाप्रकारे “शांत पाण्याजवळ नेतो”?

६ “तो मला शांत पाण्याजवळ नेतो.” इस्राएलात मेंढपाळांना आपापल्या कळपांना पाणी पिण्यासाठी एखाद्या लहान तलावाकडे किंवा ओहोळाकडे न्यावे लागे. पण उन्हाळ्याच्या ऋतुत पाण्याची टंचाई असे. आज यहोवा आम्हाला सत्याचे पाणी मोठ्या विपुलतेत पुरवून ‘प्रवाहाच्या किनाऱ्‍यावरील विश्रामस्थानी निरवीत’ आहे. (यहेज्केल ३४:१३, १४ पडताळा.) तसेच संदेष्टा यशया हे उत्तेजक आमंत्रण देतोः “अहो, तान्हेल्यांनो, तुम्ही सर्व जलाशयाकडे या.” (यशया ५५:१) या आध्यात्मिक पाण्याचे प्राशन करुन मेंढरांचा त्या अग्निमय न्यायापासून स्वतःचा बचाव करता येईल, जो “जे देवाला ओळखत नाहीत व . . . सुवार्ता मानीत नाहीत” अशांच्यावर गुदरणार आहे.—२ थेस्सलनीकाकर १:८; प्रकटीकरण ७:१६, १७.

७. यहोवाकडील आध्यात्मिक भरवणूक खासपणे कोणत्या वेळी मदत करतात आणि कोणत्या पेचप्रसंगात पाठ केलेली शास्त्रवचने अत्यंत उपयुक्‍त ठरतील?

७ “तो माझा जीव ताजातवाना करतो.” (स्तोत्र २३:३) जेव्हा आम्ही थकतो, अडचणीत असतो, निराश झालेलो किंवा गंभीर विरोधास तोंड देऊन असतो अशा समयी यहोवा आपल्या पवित्र वचनाद्वारे आम्हास परत ताजातवाना करतो. यासाठीच प्रत्येक ख्रिस्तीजनाने दररोज पवित्र शास्त्रातील एक भाग नियमाने वाचण्याची सवय स्वतःला लावणे केवढे बरे! तुम्ही हे करीत आहात का? काहींना विशिष्ट शास्त्रवचने, जसे की, निर्गम ३४:६, ७ किंवा नीतीसूत्रे ३:५, ६ सारख्या वचनांची उजळणी करणे सहाय्यक वाटते. पण ते का फायदेकारक ठरते? कारण, जर अडचणी उद्‌भवल्या व त्यावेळी पवित्र शास्त्र हाताशी नसले तरी शास्त्रवचनातील सांत्वनपर विचार तत्काळ तुमच्या आठवणीत येऊन बळ देण्यास सुरवात करतील. अनेक बंधूंना, नीतीमत्वतेच्या जीवनतत्त्वांना चिकटून राहिले म्हणून, तुरुंगात किंवा कारागृहात टाकिले, तेथे जे काही आधी शिकले होते ती वचने आठवून केवढी हुशारी प्राप्त केली. होय, देवाचे वचन “ह्रदयाला आनंदित करते,” आणि “नेत्राला प्रकाश देते.”—स्तोत्रसंहिता १९:७-१०.

८. ‘नीतीमार्गाने चालणे’ सोपे असते का, पण तेच केल्यामुळे ते पुढे कोठे निरविते?

८ “मला नीतीमार्गांनी चालवितो.” नीतीच्या मार्गाची वाटचाल कठीण असते, पण त्यांचा शेवट जीवनात होतो. जसे येशूने म्हटलेः “जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकोचित आहे.” (मत्तय ७:१४) प्रेषित पौलाने लुस्रामधील तसेच इकुन्या व अंत्युखिया येथील शिष्यांसमोर यासारखेच विचार व्यक्‍त करण्यात म्हटलेः “आपणाला पुष्कळ संकटातून देवाच्या राज्यात जावे लागते.” आपण काय बोलत आहोत याची पौलाला चांगली जाणीव होती. कारण याच्या थोडा वेळ आधी लुस्रा येथे त्याला दगडमार करुन मेला म्हणून टाकून गेले होते.—प्रे. कृत्ये १४:१९-२२.

९. (अ) देव कशाप्रकारे आम्हाला ‘नीतीमार्गाने चालवीत असतो’? (ब) स्तोत्रसंहिता १९:१४ कोणत्या मार्गी आमचे सहाय्य करते? (क) कोणती शास्त्रवचने आमचे अनैतिक लैंगिक संबंध टाळण्यात सहाय्य करतात?

९ यहोवा आम्हाला, त्याचे पवित्र वचन व संस्था यांच्याद्वारे ‘नीतीच्या मार्गावर चालवितो.’ पण बहुत लोक “नाशाकडे जाण्याचा मार्ग” जो रुंद व पसरट आहे, तो अनुसरतात. (मत्तय ७:१३) भरमसाट वाढत असलेली लैंगिक अनीती आणि एडस्‌ सारख्या आजारांच्या पीडा चोहोकडे पसरत असता, ख्रिस्तीजनांकरिता हे अत्यावशक आहे की त्यांनी कुसंगत टाळण्यात कुचराई करु नये. (१ करिंथकर १५:३३) आम्ही आमच्या विचारांनाही अमंगळ विचारप्रवाहात वाहवू देऊ नये. (स्तोत्रसंहिता १९:१४) यास्तव, आम्ही लैंगिकविषय आणि अनैतिकतेच्या अनेक खाचखळग्यात पडण्यापासून स्वतःला कसे वाचवावे याबद्दलचा जो उत्तम उपदेश देववचनात दिला आहे तो नेहमी पाळून चालण्याच्या प्रयत्नात राहू या.—१ करिंथकर ७:२-५; इफिसकर ५:५; १ थेस्सलनीकाकर ४:३-८.

१०. (अ) ईश्‍वरी नामासंबंधाने यहोवाच्या साक्षीदारांवर कोणती जबाबदारी आहे? (ब) जगाचे लोक वेळोवेळी आम्हावर टिकास्त्र का सोडत असतात? (क) यहोवा कोणत्या परिस्थितीत आमचे सहाय्य करील?

१० “तो आपल्या नामास्तव” हे करील. देवाचे नाम गौरविण्याची आणि त्याच्या नामास कलंक लागू न देण्याची अति गंभीर जबाबदारी यहोवाच्या साक्षीदारांवर आहे. (मत्तय ६:९; निर्गम ६:३; यहेज्केल ३८:२३) असे अनेक जगीक लोक आहेत जे दोषाचे बोट चटकन यहोवाच्या लोकांकडे उचलण्यास तयार असतात. हे जर, आम्ही तटस्थता किंवा रक्‍ताचे पावित्र्य यांच्याबद्दलच्या पवित्र शास्त्रीय तत्वांना अनुसरण्याच्या आमच्या भूमिकेबद्दल असल्यास, आमचा विवेक सरळ व शुद्ध आहे. पण तेच ते जर, आम्ही केलेल्या चूकीबद्दल असल्यास, त्यात आम्ही यहोवास बदनाम करीत असतो. (यशया २:४; प्रे. कृत्ये १५:२८, २९; १ पेत्र ४:१५, १६) याकरता, आम्हास वाईटाचा द्वेष असावा. (स्तोत्रसंहिता ९७:१०) आम्हास जरी छळ सहन करावा लागला तरी यहोवा आपल्या नामास्तव आमचे सहाय्य करील व संरक्षण पुरवील.

यहोवा आपल्या मेंढराचे रक्षण करतो

११. “मृत्युछायेच्या दरीत” याचा काय अर्थ होतो आणि हे आम्हास येशूबद्दल कदाचित कोणती आठवण देईल?

११ “मृत्युछायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी अरिष्टांस भिणार नाही.” (स्तोत्र २३:४) या वचनाचा आयझेक लेस्सर यांचा अनुवाद असा आहेः “होय, मी जरी मृत्युछायेच्या दरीतून चालत असलो तरी नाशकारी गोष्टींना भिणार नाही.” हे कदाचित मनास, मृतसमुद्राच्या पश्‍चिमेस यहुदाच्या डोंगराळ प्रदेशातील खोल दऱ्‍यांची किंवा कड्याची आठवण करुन देईल. एखादी दरी किंवा खोरे जेथे जंगली श्‍वापदे शिकारीकरता आडजागी अंधारात बसतात अशी जागा मेंढरांकरिता धोक्याची असते. दावीदाने त्याच्या जीवनात अनेक दुःखदायी दऱ्‍या पार केल्या होत्या, जेथे मृत्यु अगदी तोंडावर असे. पण देव त्यास चालवीत असल्यामुळे त्याजठायी भरवसा होता आणि भयास थारा देत नव्हता. आम्हाठायीही यहोवावरील तेवढाच भरवसा असण्यास हवा. यात जो “निबिड अंधकारा”चा उल्लेख आहे, तो कदाचित आम्हास यशयाच्या भविष्यवादाची आठवण करुन देईलः “मृत्युछायेच्या प्रदेशात वसणाऱ्‍यांवर प्रकाश पडला आहे.” मत्तय या भविष्यवादाचा उल्लेख करतो व येशू ख्रिस्ताला लागू करण्यात म्हणतोः “अंधकारात बसलेल्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला, आणि मृत्युच्या प्रदेशात व छायेत बसलेल्यांवर ज्योति उगवली आहे.” कशी? येशूने चालविलेल्या महान प्रचार मोहिमेद्वारा.—यशया ९:२; मत्तय ४:१३-१६.

१२. (अ) अनेक देशात यहोवाच्या सेवकांनी कशाप्रकारे छळास तोंड दिले आहे व याचा काय परिणाम दिसून आला? (ब) पेत्राने सुरवातीच्या काळातील छळग्रस्त ख्रिस्तीजनांना कसे उत्तेजन दिले?

१२ दावीदास कोणाही ‘अरिष्टाचे भय’ वाटत नसे. हेच आज यहोवाच्या सेवकांबद्दल, जरी ते या सैतानी अधिपत्याखालील जगात तितकेसे प्रख्यात नाहीत तरी खरे आहे. (१ योहान ५:१९) अनेक आज प्रत्यक्षात त्यांचा द्वेष करतात व अनेक राष्ट्रांत त्यांचा अमानुष छळही करण्यात आला. तरीही या सर्व राष्ट्रात त्यांनी उघडपणे होत नसली तरी भूमिगतरित्या राज्याची ही सुवार्ता गाजविण्याचे चालू ठेविले. ते हे ओळखून आहेत की यहोवा त्यांच्या संगतीत आहे व तो रक्षण करील. (स्तोत्रसंहिता २७:१) जेथे प्रचारकार्य भूमिगतपणे करणे अपरिहार्य आहे अशा अनेक देशात उत्तम कार्यसिद्धी होत आहे. अशा देशात यहोवाचे साक्षीदार स्तोत्रकर्त्याचे शब्द प्रतिध्वनित करतातः “यहोवा माझ्या पक्षाचा आहे; मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करणार?” (स्तोत्रसंहिता ११८:६) हे साक्षीदार सुरवातीच्या काळातील त्या ख्रिश्‍चनांच्या भूमिकेत आहेत ज्यांना उद्देशून पेत्राने हे उत्तेजक शब्द लिहिले होतेः “जरी तुम्हाला धार्मिकतेमुळे दुःख सोसावे लागले तरी तुम्ही धन्य. त्यांच्या भयाने भिऊ नका व घाबरु नका.”—१ पेत्र ३:१४.

१३. (अ) स्तोत्रसंहिता २३:४ मध्ये कोणता लक्षवेधक बदल घडला व का? (ब) ख्रिस्तीजन आपणाठायीचा भयभीतपणा कसा घालवू शकतात?

१३ “कारण तू मजबरोबर आहेस.” या विधानात असणाऱ्‍या चित्तवेधक सत्याकडे कृपया लक्ष द्या. प्रेरित स्तोत्रकर्ता येथे तृतीयेकडून द्वितीयेकडे वळाला आहे. यहोवास उद्देशून म्हणताना “तो” असे म्हणण्याऐवजी दावीद त्याला “तू” या सर्वनामाने संबोधितो. ते का बरे? कारण ते अधिक सलगीचे वाटते. धोका आपल्याला आमचा प्रेमळ पिता, यहोवा, याच्या अधिक जवळ आणतो. मग आम्ही त्याच्यासोबतचे अधिक सलगीचे नातेसंबंध अनुभवतो. प्रार्थना व याचनेद्वारा आम्ही सुरक्षिततेसाठी त्याला हाक मारु शकतो व भयास घालवू शकतो.—सफन्या ३:१२ पडताळा.

१४. (अ) दावीदाच्या काळातील मेंढपाळ आपणाजवळ कोणते उपकरण बाळगून असत व त्याचा ते कसा उपयोग करीत? (ब) आज ख्रिस्ती मेंढपाळ कळपाचे कसे रक्षण करतात?

१४ “तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात.” ज्याचे भाषांतर “आकडी” असे केले आहे तो इब्री शब्द शेʹवत धनगराच्या हातातील वाकलेल्या आकडीचा अर्थबोध देतो. आकडी व काठी, दोन्हीही प्रतिकार करण्यास तसेच अधिकारास सूचित करते. हे तितकेच निश्‍चित की त्या आधारे लांडगे व सर्प यासारख्या कळपांवर झडप घालणाऱ्‍यांना हाकलण्यास सुलभ जाई. मेंढपाळांची आकडी ही मेंढरांना वळविण्यात व एखादे मेंढरु धोक्याच्या स्थळी बहकून पोहंचले तर त्याला तेथून मागे खेचण्यातही उपयोगी पडे. आज यहोवाने मंडळीत विश्‍वासू मेंढपाळ, वडीलजन पुरविले आहेत, जे त्याच्या देखरेखीखालील कळपांना स्वधर्मत्याग्यासारख्या आध्यात्मिक शिकाऱ्‍यांपासून बचावून ठेवितात. किंवा जे सभांना उपस्थित राहात नाहीत, किंवा ख्रिश्‍चन बागणूकीत जे हयगय करीत आहेत अशांना उपदेशपर सहाय्य करतात.

शत्रूंच्या मध्ये मिष्टान्‍नाची मेजवानी

१५. (अ) स्तोत्रसंहिता २३:५ मध्ये कोणता अर्थपूर्ण बदल झाल्याचे दिसते? (ब) यहोवाचे लोक आध्यात्मिकदृष्ट्या अगदी तृप्त आहेत हे कोणकोणत्या गोष्टी स्पष्ट करतात व हे कोणाच्या तुलनेत असे आहे?

१५ “तू माझ्या शत्रूंच्या देखत मजपुढे ताट वाढितोस.” (स्तोत्र २३:५) या ठिकाणी आपण अर्थपूर्ण बदल झाल्याचे, मेंढपाळाकडून यजमानाकडे वळल्याचे आपण पाहतो. एक अति उदार यजमान या नात्याने स्वतः यहोवा अभिषिक्‍त “दास” वर्गाकरवी भरपूर आध्यात्मिक अन्‍न देत आहे. (मत्तय २४:४५) आम्ही जरी आज विरोधक जगात जगत असलो तरी भरपूर भरविलेले आहोत. टेहळणी बुरुज हे मासिक शंभरपेक्षा अधिक भाषांमध्ये प्रकाशित होत आहे की ज्याद्वारा दक्षिण आफ्रिका, ग्रीनलँड, सालोमन बेटे यासारख्या दूर देशांना तसेच येथे भारतालाही आध्यात्मिकतेत भरविले जात आहे. जगात सर्वत्र ६०,००० पेक्षा अधिक मंडळ्यातून प्रशिक्षित वक्‍ते व शिक्षक आणि उत्तम सभागृहे आहेत आणि यात आणखी नव्या सभागृहांची भर पडत आहे. मेंढरासमान लोकांना मदत देता यावी याकरता ३२,००,००० पेक्षा अधिक घरगुती पवित्र शास्त्र अभ्यास चालविले जात आहेत. याच्या तुलनेत पाहता, मोठी बाबेल, खोट्या धर्माच्या जगव्याप्त साम्राज्यात असणारे लोक भूकेले आहेत.—यशया ६५:१३.

१६. (अ) एका पापी स्त्रीच्या तुलनेत, एक परुशी गृहस्थ येशूसाठी काय करण्यात मागे पडला? (ब) आज यहोवा आपल्या निष्ठावंत सेवकांना कोणते तेल पुरवितो?

१६ “तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस” प्राचीन इस्राएली काळात यजमान आपल्या पाहुण्यांना डोक्यास लावण्यास तेल पुरवीत. एके प्रसंगी, येशू एका परुश्‍याचे घरी पाहुणा होता ज्याने त्याला डोक्यास लावण्यास तेल आणि पाय धुण्यास पाणी दिले नाही. तेव्हा एका पापी स्त्रीने तिच्या अश्रूंनी त्याचे पाय धुतले व खासप्रतीच्या सुवासिक तेलाने त्याचा तैलाभ्यंग केला. (लूक ७:३६-३८, ४४-४६) पण यहोवा अत्यंत आतिथ्यशील यजमान आहे. आपल्या विश्‍वासू सेवकांसाठी तो आध्यात्मिक “हर्षरुप तेल” देतो. (यशया ६१:१-३) होय, यहोवाचे सेवक आज चोहोकडे हर्षभरीत आहेत.

१७. (अ) ‘काठोकाठ भरलेले पात्र’ कशाचे द्योतक आहे? (ब) यहोवा आज आपल्या सेवकांना कशाप्रकारे ‘भरलेले पात्र’ देत आहे?

१७ “माझे पात्र काठोकाठ भरले आहे.” दुसरा अनुवाद म्हणतोः “माझे पात्र ओतप्रोत भरले आहे.” (मोफॅट) यावरुन आध्यात्मिक समृद्धता दिसून येते. जरी मद्यपानातील अतिरेकाच्या अर्थाने नव्हे तरी हे शब्द उत्तम द्राक्षरसाचा प्याला असल्याचे सुचविते. हे मद्य औषधी असल्याचे प्रसिद्ध आहे, जसे पौलाने तीमथ्यास सूचित केले होतेः “यापुढे नुसते पाणीच पीत राहू नको, तर आपल्या पोटासाठी व आपल्या वारंवार होणाऱ्‍या दुखण्यासाठी थोडा द्राक्षारस घे.” (१ तीमथ्य ५:२३) आध्यात्मिक अर्थाने द्राक्षारस हा आपले अंतःकरण आनंदीत करीत असतो. (स्तोत्रसंहिता १०४:१५) आमचा प्रेमळ पिता यहोवा, आपल्या औदार्याने त्याच्या विश्‍वासू सेवकांसाठी आनंदी करणाऱ्‍या व ‘काठोकाठ भरलेल्या पात्रा’सह आध्यात्मिक मिष्ठान्‍नाची मेजवानी देत आहे.

१८. (अ) यहोवाठायीची चांगुलता व दया यांना कोण अनुभवीत आहेत आणि स्तोत्रसंहिता १०३:१७, १८ हे कसे स्पष्ट करते? (ब) यहोवासोबत विश्‍वासू राहणाऱ्‍यांसाठी कोणते उज्वल भवितव्य राखले आहे?

१८ “खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील.” (स्तोत्र २३:६) कल्याण किंवा चांगुलपणा हा यहोवाच्या आत्म्याद्वारेच्या फलप्राप्तीचा एक भाग आहे. (गलतीकर ५:२२, २३) देवाचे चांगुलपण व दया ही जे सर्व त्याच्या मार्गी वाटचाल करीत असतात तेच अनुभवतात. (स्तोत्रसंहिता १०३:१७, १८) यहोवावर भक्कम विश्‍वास व्यक्‍त करुन त्याचे लोक कोणाही सत्वपरिक्षणास तोंड देऊ शकतात. शिवाय अंतापर्यंत विश्‍वासू राहणे याचाच अर्थ नवीन जगात सार्वकालिक जीवनाचा लाभ होईल. केवढे हे विस्मयकारक भवितव्य!

१९. (अ) “यहोवाचे घरात” राहण्याचा काय अर्थ होतो? (ब) आज खऱ्‍या भक्‍तीच्या प्रगतीकरता यहोवाच्या संस्थेने कशाची स्थापना केली आहे व आज हजारो बाप्तिस्मा घेतलेले लोक तेथील सेवेच्या संधीची का वाट पाहून आहेत? (क) देवाची सेवा चिरकालपणे करण्याचा आणखी कोणाचा निर्धार आहे?

१९ “आणि यहोवाच्या घरात मी चिरकाल राहीन.” दावीदाच्या काळी, मंदिराची अद्याप उभारणी झालेली नसल्यामुळे देवाचे पवित्र स्थान हे निवासमंडप होते. स्तोत्रकर्त्याच्या विचारात सर्वथोर यजमान होता त्यामुळे ‘यहोवाच्या घरात वस्तीस असणे’ याचा, एक अतिथी या नात्याने देवासोबत उत्तम नातेसंबंध राखणे असा त्याच्या म्हणण्याचा अर्थ होईल. (स्तोत्रसंहिता १५:१-५) आज, त्या घराची ओळख, यहोवाचे पवित्र मंदिर, त्याने खऱ्‍या भक्‍तीकरता जी सर्व योजना केली आहे तिच्यासोबत करता येते. शलमोन राजाला यहोवाच्या गौरवार्थ, सर्वात वैभवी व सोन्यारुप्यांनी मढविलेले पहिले पार्थिव मंदिर उभारण्याचा मान प्राप्त झाला होता. त्यात सेवा करण्याचा तो केवढा बहुमान होता! आज जरी अशाप्रकारचे कोणतेही मंदिर अस्तित्वात नाही तरी त्याचे गौरव करणारी व खऱ्‍या भक्‍तीची जोपासना करणारी देवाची स्वतःची एक पवित्र संस्था किंवा संघटना आहे. यात सेवा करीत राहण्याचे एक माध्यम आहे व ते म्हणजे यहोवाच्या संस्थेकरवी अनेक देशात “बेथेल” गृहे स्थापित आहेत. “बेथेल” याचा अर्थ “देवाचे घर” आहे आणि या ईश्‍वरशासित केंद्रातून आज हजारो लोक सेवा करीत आहेत. यांचेपैकी काही पुरुष व स्रिया तर अशाप्रकारची सेवा “चिरकाल” आपले सबंध आयुष्य वेचून बेथेल सेवेत खर्च करीत आहेत. इतर लाखो जरी बेथेल कुटुंबाचे सदस्य नसले तरी, यांच्याप्रमाणेच यहोवाची सेवा चिरकालपणे करीत राहण्याचा निश्‍चय बाळगून आहेत.

२०. (अ) २३ वे स्तोत्र हे शास्त्रवचनातील उल्लेखनीय का आहे, आणि ते आम्हाठायी काय रुजविण्यात मदत करते? (ब) यहोवाच्या विश्‍वासू सेवकांकरता कोणते हक्क राखून आहेत?

२० २३ वे स्तोत्र हे अनेकांगी पैलुदार हिऱ्‍याप्रमाणे चकाकणारे स्तोत्र आहे. ते आमचा प्रेमळ स्वर्गीय पिता यहोवा याच्या गौरवी नामास उंचावते व आपल्या मेंढरांचे पालनपोषण व मार्गदर्शन तो कसे करतो याचा उलगडा करते. याच्या परिणामात आज त्याचे लोक आनंदी, आध्यात्मिकतेत भरविलेले आहेत, यांची संख्या, जेथे कटु विरोध आहे अशा देशांसह इतरत्रही सतत वाढत आहे. हे २३ वे स्तोत्र आमचे आमच्या सृष्टीकर्त्यासोबतचे नातेसंबंध अधिक उबदार व निकटचे बनविण्यात सहाय्य करते. शिवाय, जसे दावीद कळपाची देखरेख करताना वारंवार करी तसे आकाशातील तारांगणाकडे पाहिल्यास आम्हाठायी केवढी कृतज्ञता उभारली जाईल की, या एवढ्या महान विश्‍वाचा सृष्टीकर्ता आमचा प्रेमळ मेंढपाळ आहे. आपल्या वात्सल्याने तो आम्हाला नवीन जगातील सार्वकलिक जीवन, जर आम्ही त्याच्यासंबंधाने आपल्या सात्विकतेत टिकून राहिलो तर अवश्‍य देईल. मग, हे केवढे गौरवी असेल की दावीदासारखे देवाचे अनेक विश्‍वासू सेवक पुनरुत्थानात उठून येतील तेव्हा त्यांची भेट होईल. त्यावेळी, सर्वथोर मेंढपाळ यहोवा याची सेवा सतत सदासर्वकाळ करीत राहता येईल हा केवढा विशेषाधिकार राहील!

आपण कसे उत्तर द्याल?

◻ यहोवा आमचा प्रेमळ मेंढपाळ आहे हे तो स्वतः कसे शाबीत करतो?

◻ देव आम्हाला कशाप्रकारे ‘नीतीच्या मार्गाने चालवीत असतो’?

◻ यहोवा आपल्या मेंढरांचे कसे रक्षण करतो?

◻ देवाने आमच्या शत्रूंच्यामध्ये आम्हासमोर मेजवानी कशी सिद्ध केली आहे?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा