‘वादळात समुद्रप्रवासाला निघणे’
अशी जोखीम पत्करण्याच्या निर्णयाला तुम्ही उतावीळपणाचा, अविचारीपणाचा आणि अतिशय धोकेदायक म्हणणार नाही का? पण लाक्षणिक अर्थाने, बरेच जण स्वतःला अशाच परिस्थितीत आपणहून झोकून देतात. ते कसे? १७ व्या शतकातील इंग्रज लेखक टॉमस फुलर म्हणतात: “रागाच्या भरात काही करू नये. हे वादळात समुद्रप्रवासाला निघण्यासारखे आहे.”
अनावर क्रोधात केलेल्या कृतीचे भयंकर परिणाम होऊ शकतात. बायबलमध्ये अभिलिखित करण्यात आलेल्या एका घटनेच्या अहवालावरून हे स्पष्ट होते. आपली बहीण दीना हिची अब्रू लुटण्यात आली आहे हे कळले तेव्हा, प्राचीन काळातील कुलपिता याकोब याचे शिमोन व लेवी हे दोन पुत्र क्रोधाच्या भरात सूड घ्यावयास निघाले. परिणाम? मोठ्या प्रमाणात रक्तपात आणि लुटालूट. म्हणूनच, याकोबाने त्यांच्या या दुष्ट कृत्याचा धिक्कार करीत म्हटले: “या देशचे रहिवासी कनानी व परिज्जी यांस माझा वीट येईल असे तुम्ही करून मला संकटांत घातले आहे.”—उत्पत्ति ३४:२५-३०.
देवाचे वचन, बायबल आपल्याला एक वेगळा मार्ग पत्करण्याचा सुज्ञ सल्ला देते. ते म्हणते: “राग सोडून दे, क्रोधाविष्टपणाचा त्याग कर; जळफळू नको, अशाने दुष्कर्माकडे प्रवृत्ति होते.” (स्तोत्र ३७:८) या सल्ल्याचा अवलंब केल्यास मोठमोठी दुष्कृत्ये टळू शकतात.—उपदेशक १०:४; नीतिसूत्रे २२:२४, २५ देखील पाहा.