यहोवा—काळ व ऋतु यांचा देव
“सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो”—उपदेशक ३:१.
१, २. (अ) मानव वेळेसंबंधाने कोणत्या मार्गी जागरूक असतो? (ब) वेळेसंबंधाने काही कळण्याचा मार्ग नसता तर जीवनात काय घडले असते?
दैनंदिनीच्या जीवनात आम्ही वेळेसंबंधाने सदा जागरूक असतो. उदाहरणार्थ, आमच्या घड्याळाचे काटे दाखवतात की आता संध्याकाळ झाली आहे. आम्ही बाहेर बघतो तो सूर्यास्त होत आहे व आकाश काळोखे होत आहे तेव्हा आम्हास कळते आता रात्रकाल होत आहे. याशिवाय, पृथ्वींच्या काही भागात पंचांग दाखवते की शरद ऋतुचा उत्तरार्ध आहे आणि हवामानातील तपमान आठवड्या आठवड्याने उतरत आहे, झाडावरील पाने गळत आहेत तेव्हा आमची खात्री होते की आता हिवाळा येत आहे. अशा प्रकारे कोणता काळ व ऋतु आहे याचा पडताळा आपल्याला घड्याळ व पंचांगावरून मिळतो.
२ काळ व ऋतु सांगणे कठीण झाले असते तर आजच्या जीवनात बराच गोंधळ उडाला असता. जसे की, विचार करा की एका वर्दळीच्या विमानतळावर शेकडो विमाने उतरण्याची वाट पाहून आहेत पण केव्हा उतरावे याची वेळच समजायला काही मार्ग नाही! किंवा असा विचार करा की लाखो लोक वेळेवर कामाला पोंहचण्यायाचा प्रयत्न करीत आहेत पण किती वेळ झाला हे त्यांना कळण्याचा कोणताच मार्ग नाही!
३. काळ व ऋतुंचा आरंभ कोणी करविला?
३ काळ व ऋतु यांचा आरंभ कोणी करून दिला? तो विश्वाचा निर्माता यहोवा देव आहे. उत्पत्ती १:१४ म्हणते: “दिवस व रात्र ही भिन्न करण्यासाठी आकाशाच्या अंतराळात ज्योति होवोत. त्या चिन्हे, ऋतु, दिवस व वर्षे दाखविणाऱ्या होवोत.”
अधिक महत्वाचे काळ व ॠतु
४-६. (अ) मानवी कार्यहालचाली करता वेळ व ऋतु जाणण्यापेक्षा अधिकमहत्वपूर्ण असे काय आहे? का? (ब) कोणते प्रश्न आम्ही विचारवेत?
४ काळ व ऋतु हे मानवाच्या कार्यास महत्वपूर्ण असले तरी अधिक महत्वपूर्ण ते हे आहे: देवाच्या दृष्टीने आता कोणता काळ व ॠतु आहे? उपदेशक ३:१ म्हणते: “सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो. भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो.” मानवी दृष्टीने हे खरे असले तरी ते देवाच्या दृष्टीने अधिक खरे आहे. आपल्या उद्देशांची परिपूर्ति करण्यासाठी त्याने निश्चित काळ व ऋतु ठविलेले आहेत. या वस्तुस्थितीसोबत आम्ही आमच्या जीवनाला सुसंगत ठेवले नाही तर घड्याल व पंचांग याच्याशी बद्ध असणारे आमचे जीवन ओघाओघाने निरर्थक वाटणार.
५ हे असे का असावे? कारण यहोवापाशी ही पृथ्वी व तिजवरील मानव प्राण्यांसाठी एक उद्देश आहे. तो नसता तर त्याने त्यांची निर्मितीच केली नसती. आम्ही आमच्या जीवनाला त्या उद्देशासोबत जुळवून घेतले नाही तर त्यात आमचा प्रवेश होऊ शकणार नाही. देवाचा उद्देश ठविल्याप्रमाणे वेळेवर पूर्ण होणार हे निश्चित. तो सांगतो: “त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल. ते माझी इच्छा पूर्ण केल्यावाचून व ज्या कार्याकरिता मी ते पाठविले ते केल्यावाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही.”—यशया ५५:११.
६ यामुळेच आम्ही विचारण्याची गरज आहे: यहोवाच्या दृष्टीने आता कोणता काळ व ऋतु आहे? त्याच्या वेळापत्रकात या जगातील राष्ट्रे व लोक कसे बसतात? खरे म्हणजे तुम्ही प्रत्यक्षात यात कसे बसता? तुम्ही आपले जीवन देवाचे उद्देश व वेळापत्रकाच्या अनुषंगाने योजिलेले आहे का?
हे जग देवाचा उद्देश पूर्ण करते का?
७. बहुतेक धर्माच्या लोकांठायी कोणता दृष्टीकोन आहे पण तो यथार्थवादी का वाटत नाही?
७ आमचा देवावर विश्वास आहे याधारणेमुळे पुष्कळांना वाटते की आम्ही देवाच्या उद्देशात समाविष्ट आहोत. तरीपण, तुम्ही त्यांना तो उद्देश काय आहे हे देवाच्या स्वतःच्या वचनामधून दाखविण्यास सांगता तेव्हा तो ते सांगू शकत नाही. ते आपलाच मार्ग अनुसरतात तरीपण त्यांना वाटत राहाते की देवाची आपल्यावर मर्जी राहील. बहुतेक जागतिक शासनकर्त्यांना, शतकाशतकात अशीच प्रवृत्ती वाटत राहिली. आपली कृती कशीही असली तरी त्याकरवीच देव आपले उद्देश पूर्ण करून घेत होता असे त्यांना वाटत होते. पण यांनाही तो कोणता उद्देश आहे ते सांगणे जमले नाही.
८. निर्माणकर्ता या जगाचे शासनकर्ते व लोक यांचा पाठीराखा आहे असे विचार करणे मूढतेचे का आहे?
८ या जगाला तसेच धर्म आचरणाऱ्या शासनकर्त्यांना व लोकांना देव पाठबळ देऊन आहे असे पवित्र शास्त्र दाखविते का? याचा विचार करा: देवाचे सामर्थ्य भयप्रेरित आहे. त्याने हे विश्व निर्माण केले ज्यात करोडो आकाशगंगा व प्रत्येकात कितीतरी कोटी तारे समाविष्ट आहेत. (स्तोत्र संहिता १४७:४) याशिवाय देवाठायी अमर्याद सूज्ञान आहे. आता समजा देव आपल्या सूज्ञाना व सामर्थ्यानिशी राष्ट्रांचा पाठीराखा असता तर यांना इतका हिंसाचार, युद्धे अन्याय व त्रास इतक्या साऱ्या शतकांमध्ये अनुभवण्यास मिळाला असता का? देवाने राष्ट्रीय नेत्यांना व त्यांच्या लाखो लोकांना दुसऱ्या देशाच्या राष्ट्रीय नेते व त्याचे लाखो लोक यांच्या विरूद्ध युद्ध पुकारून त्यांची, जे सुद्धा देवाकरवीच मार्गदर्शित होत असल्याचा दावा करतात अशांची, अमानुष कत्तल करायला सांगणार का? हे व्यवहार्य असे वाटते का?
९. देवाच्या खऱ्या सेवकातील आध्यात्मिक परिस्थिती कशी असावी असे त्याचे वचन म्हणते?
९ पवित्र शास्त्र करिंथकरांच्या पहिल्या पत्राच्या १४:३३ मध्ये सांगते: “देव हा अव्यवस्थेचा नाही तर शांतीचा आहे.” जे यहोवाचे खरेच लोक आहेत अशांना तो म्हणतो की, “तुम्हा सर्वांचे बोलणे सारखे असावे; म्हणजे तुमच्यामध्ये फुटी पडू नयेत; तुम्ही एकचिताने व एकमताने जोडलेले व्हावे.” (१ करिंथकर १:१०) देवाच्या लोकांपैकी जो कोणी या दर्जाचे पालन करीत नाही त्याचे काय? रोमकर १६:१७ सूचना देते: “तुम्हाला जे शिक्षण मिळाले आहे त्याविरूद्ध जे फुटी व विभाजन घडवून आणीत आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवा” तद्वत राष्ट्रीय व धार्मिक विभाजन व झगडे याचास्पष्ट पुरवा आहे की देव अशी राष्ट्रे धर्मपुढारी व त्यांचे अनुयायी यांचा पाठीराखा नाही.
१०, ११. या जगाचे शासनकर्ते व लोक यांना कोण पाठबळ पुरवीत आहे याबद्दल कोणती शास्त्रवचने माहिती देतात?
१० तर मग अशांना कोण पाठबळ देत आहे बरे? योहानाचे पहिलेपत्र अध्याय ३, १० ते १२ वचने सांगतात: “ह्यावरून देवाची मुले व सैतानाची मुले उघड दिसून येतात. जो कोणी नीतीने वागत नाही तो देवाचा नाही व जो आपल्या बंधूवर प्रीती करीत नाही तोही नाही. जो संदेश तुम्ही प्रारंभापासून ऐकला तो हाच आहे की आपण एकमेकांवर प्रीती करावी. काईन त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या बंधूचा वध केला त्याच्यासारखे आपण नसावे.” याप्रमाणेच, योहानाचे पहिले पत्र अध्याय ४ वचन २० म्हणते: “‘मी देवावर प्रीती करतो’ असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करतो तर तो लबाड आहे. कारण डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करीत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही.” अशाच प्रकारे येशूनेही योहान १३:३५ मध्ये हा नियम वदविला की, “तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहा.”
११ देवाच्या खऱ्या सेवकांमध्ये जे प्रेम व ऐक्य नांदावयास हवे ते आणि जगाचे पुढारी व सर्वसाधारण लोक यांनी शतकानुशतके जो मार्ग अनुसरला त्यात काही सारखेपणा आढळून येतो का? केवळ आमच्याच शतकात धर्म आचरणाऱ्या लोकांनी धर्म आचरणाऱ्या लोकांची लाखोने कत्तल केली आहे! बहुधा ही कत्तल तर एका धर्माच्या लोकांची झाली! हा अगदी उघड पुरावा आहे की देव अशांचा पाठीराखा नाही. उलटपक्षी, देवाचे वचन दोखविते त्याप्रमाणे त्यांचा पाठीराखा दियाबल सैतानाकरवी दुसरा कोणी नाही. यामुळेच प्रेषित योहान म्हणून शकला: “आपण देवापासून आहो हे आपल्याला ठाऊक आहे. सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” (१ योहान ५:१९) होय, सैतान “या युगाचा देव” आहे. (२ करिंथकर ४:४) हाच तो, जगातील पुढारी व लोक यांच्यामागे सामर्थ्य म्हणून उभा आहे. या लोकांची कृत्येच स्पष्टपणे दाखवतात की ते देवाकडून असूच शकता नाही.
लीन जनांसाठी यहोवाचा उद्देश
१२, १३. ही पृथ्वी व मानव यांच्यासाठी देवाचा उद्देश कोणता आहे?
१२ तथापि, यहोवाने मानवाची निर्मिती केली त्यावेळी त्याने हे उद्देशिले की सबंध पृथ्वी एदेन बागेप्रमाणे नंदनवन व्हावी व ती परिपूर्ण, ऐक्य राखणाऱ्या व आनंदी लोकांनी भरून जावी. (उत्पत्ती १:२६–२८; २:१५; यशया ४५:१८) हा उद्देश बंडखोर मानव आणि दुष्ट दुरात्मे याकरवी रद्द होऊ शकला नाही. वस्तुतः यहोवा हा काळ व ऋतु यांचा देव असल्यामुळे तो या उद्देशाची आपल्या नियुक्त वेळी पूर्णता घडवून आणील. त्याच्यापासून विन्मुख झालेल्या मानवी राजवटीला त्याच्या उद्देशाविरूद्ध तो नियुक्त वेळेच्या पलिकडे टकरा देत राहू देणार नाही.
१३ यहोवाने या पृथ्वी साठी राखलेल्या उद्देशाच्या बाबतीने येशूने पूर्ण आत्मविश्वास राखला होता. त्याच्या विश्वास व्यक्त करणाऱ्या पातक्यास त्याने म्हटले: “तू मजबरोबर नंदनवनात असशील.” (लूक २३:४३) हे पृथ्वीवरील भावी नंदनवन होते. याआधीच्या एके प्रसंगी येशूने म्हटले होते: “जे सौम्य ते धन्य कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील.” (मत्तय ५:५) असे म्हण्यात येशूने बहुधा स्तोत्रसंहिता ३७:११चा संदर्भ घेतला असावा जे म्हणते: “लीन जन पृथ्वीचे वतन पावतील. ते उदंड शांतीसुखाचा उपभोग घेतील.”
१४. पृथ्वीचे वतन कोणत्या प्रकारच्या लोकांना मिळेल?
१४ कोणाला पृथ्वीचे वतन मिळेल? स्तोत्रसंहिता ३७: ३४ म्हणते: “यहोवाची प्रतीक्षा कर व त्याच्यामार्गाचे अवलंबन कर. म्हणजे तो तुझी उन्नति करून तुला पृथ्वीचे वतन देईल. दुर्जनांचा उच्छेद झालेला तू आपल्या डोळयांनी पाहशील.” वचन ३७ व ३८ पुढे म्हणते: “सात्विक मनुष्याकडे लक्ष दे, सरळ मनुष्याकडे पाहा. शांतिप्रिय मनुष्याचा वंश टिकून राहिल. पातकी तर पूर्णपणे नष्ट होतील. दुर्जनांचा वंश छाटला जाईल.” अशाप्रकारे ज्यांना पृथ्वीचे वतन मिळायचे आहे त्यांनी यहोवास ओळखले पाहिजे, त्याच्या अभिवचनांवर विश्वास ठेवण्यास हवा व त्याच्या नियमांचे पालन करण्यामुळे त्याच्या दृष्टीने त्यांनी धार्मिक व सात्विक ठरले पाहिजे. पहिले योहान २:१७ म्हणते: “जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहे, पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.”
१५. मुलभूत असे लाभदायी जागतिक बदल घडून येण्यासाठी महत्वाची अशी कोणती गोष्ट घडून आली पाहिजे?
१५ तथापि, असे हे बदल घडून येण्यासाठी सध्याच्या परिस्थितीत मोठ्या प्रमाणात उलथापालथ होण्यास हवी. यात एक गोष्ट म्हणजे पृथ्वीची सध्याची सर्व राजवट काढली पाहिजे कारण मानवी राजवटीने इच्छित असणाऱ्या परिस्थिती कधीच आणल्या नाहीत. तथापि, पृथ्वीस हादरविणारे हे बदल यहोवाच्या ताब्यात आहेत. जसे की, पवित्र शास्त्र म्हणते: “तोच काळ व ऋतु बदलतो. तो राजांस स्थानापन्न अथवा स्थान भ्रष्ट करतो.”—दानीएल २:२१.
विरोध्यांस काढून टाकणे
१६, १७. (अ) यहोवाने, त्याच्या उद्देशाचा अवमान करणाऱ्या फारोशी कसा व्यवहार केला? (ब) यहोवाच्या भविष्यवादाच्या वचनाची कशी निश्चिती झाली?
१६ प्राचीन काळी यहोवाने, खासपणे जे त्याच्या उद्देशात अडथळा आणू पाहात होतो त्या प्रबळ शासन कर्त्यांना व राजवशांचे काय केले ते विचारात घ्या. त्यांना भंगविले गेले आणि ते व त्यांची साम्राज्ये धुळीस मिळाली. उदाहरणार्थ, देवाच्या लोकांना दास्यत्वात जखडविणारा मिसराचा फारो होता. पण आपल्या सेवकांसाठी उद्देश राखल्यामुळे यहोवाने मोशेला फारोकडे पाठवून त्यांना मुक्त करण्यास सांगितले. फारोने मोठ्या उद्धटपणे म्हटले: “हा कोण यहोवा की ज्याचे मी ऐकावे?” त्याने पुढे म्हटले, “मी यहोवाला जाणत नाही, आणि इस्राएलांस काही जाऊ देणार नाही.”—निर्गम ५:२.
१७ यहोवाने फारोला आपले मन बदलण्यासाठी बरीच संधि दिली. तरी पण प्रत्येक वेळी, निर्गम ११:१० म्हणते त्याप्रमाणे फारोने ‘आपले मन कठीण केले.’ परंतु, यहोवास अजिंक्य सामर्थ्य आहे त्याची नियुक्त वेळ आली त्यावेळी त्याने फारोला व त्याच्या सैन्याला तांबड्या समुद्रात जलसमाधि दिली. निर्गम १४:२८ म्हणते: “त्यातला एकही वाचला नाही.” पण तेच दुसऱ्या बाजूस, यहोवाच्या सेवकांचे रक्षण झाले व त्यांना मुक्तता मिळाली. यात आश्चर्य हे की, हे सर्व यहोवाने विश्वासू अब्राहामाला शतकांआधी भविष्यवादित वचन सांगितले त्या ४०० वर्षाच्या काळाच्या समाप्तीला अगदी तंतोतंत घडले.
१८. बाबेलोनच्या नबुखद्नेस्सराच्या बाबतीत यहोवाने काय केले? का?
१८ बाबेलोनचा राजा नबुखद्नेस्सेर आणखी एकजण होता. त्याला आपले सामर्थ्य आणि मिळविलेली प्रतिष्ठा याची खूप घमेंड होती; तो जणू स्वत:ला देवाप्रमाणे समजत असे. पण दानीएल ४:३१ म्हणते: “हे शब्द राज्याच्या मुखातून निघतात न निघतातच तोच आकाशवाणी झाली की, ‘हे राजा, नबुखद्नेस्सरा, हे तुला विदित होवो की तुझ्या हातची राजसत्ता गेली आहे.’” यहोवाने म्हटले की त्याला वनातल्या पशूएवढी अधोगती मिळणार, जोपर्यंत, ३२ वचन म्हणते त्याप्रमाणे, “मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो ते पाहिजे त्यास देतो” याचे ज्ञान त्याला होत नाही. यहोवाने हे घडण्याचा जो निश्चित काळ उद्देशिला होता नेमक्या त्याच वेळी हे सर्व काही घडले.
१९.बाबेलोन व त्याचा शासक बेलशेस्सर यांच्याविरूद्ध यहोवाचा प्रतिकूल दंड का ओढावला?
१९ बाबेलोनात राज्य करणारा शेवटचा राजा बेलशस्सर होता. या काळी ते प्रचंड साम्राज्य निखळून पाडण्याची यहोवाची वेळ आली. ते का? कारण बाबेलोन्यानी यहोवाच्या लोकांना बंदिस्त स्थितीत ठेवले होते व त्यांनी यहोवाच्या नामाची निंदा केली होती. दानीएलाचा ५वा अध्याय सांगतो की, बेलशस्सरने आपल्या हजार अधिकाऱ्यांसाठी एक मोठी मेजवानी योजली. मग, “बेलशस्सराने हुकुम केली की माझा बाप नबुखद्नेस्सर याने [यहोवाच्या] यरूशलेमातील मंदिरतून जी सोन्यारूप्याची पात्रे आणली आहेत ती घेऊन या . . . राजा, त्याचे सरदार, त्याच्या पत्नी व उपपत्नी ही त्यातून द्राक्षारस प्याली.” (दानीएल ५:२, ३) यानंतर त्यांनी काय केले ते पहा: “त्यांनी द्राक्षारस पिऊन सोने, रूपे ,पितळ, लोखंड, काष्ठ व पाषाण यापासून घडलेल्या दैवतांचे स्तवन केले.” (दानीएल ५:४) यहोवाच्या उपासनेसाठी राखलेल्या पवित्र पात्रातून पिण्याद्वारे त्यांनी यहोवाची थट्टा व निंदा केली. खोट्या दैवतांची उपासना करून त्यांनी सैतानाची भक्ती केली.
२०, २१. दानीएलाने बेलशेस्सरास कोणता संदेश कळवला व त्याची कशी पूर्णता झाली?
२० तथापि, त्याच क्षणी एक आश्चर्यकारक घटना घडली. राजवाडचाच्या भिंतीवर हाताची बोटे लिखाण करीत आहेत असे दिसले! ते बघून राजाला इतका जोरदार धक्का बसला की, “त्याची मुद्रा पालटली व तो चिंताक्रांत झाला. त्याच्या कंबरेचे सांधे ढिले पडले आणि त्याचे गुडघे लटपटू लागले.” (दानीएल ५:६) बेलशस्सराच्या धर्म सल्लागारापैकी कोणालाही ते लिखाण समजू शकले नाही याकरता यहोवाचा सेवक दानीएल याला पाचारण केले गेले. दानीएलाने राजास कळविले की हा यहोवाकडील संदेश होता व तो असा होता: “देवाने तुझ्या राज्याचा काळ मोजून त्याचा अंत केला आहे . . . तुला तागडीत तोलले व तू उणा भरलास . . . तुझे राज्य विभागून ते मेदी व पारसी यांस दिले आहे.”—दानीएल ५:२६–२८.
२१ अगदी त्याच रात्री निष्काळजीपणे उघड्या ठेवलेल्या वेशीतून मेद–पारसाचे सैन्य आत शिरले व त्याने शहरावर हल्ला चढविला. दानीएल ५:३० शेवटी सांगते: “त्याच रात्री . . . बेलशस्सर याचा वध झाला.” बाबेलनचा या पतनामुळे यहोवाच्या लोकांना त्यांचे दास्यत्व आरंभले त्याच्या बरोबर ७० वर्षांनी आपल्या स्वगृही परतव्याची मुभा लाभली. हे नेमके यहोवाच्या वेळापत्रकानुसार घडले जे यिर्मया २९:१० मध्ये आधी प्रकटविण्यात आले होते.
२२, २३. पहिल्या शतकात ख्रिश्चनांचा विरोध करणारा राजा हेरोद अग्रिप्पा पहिला याच्यासोबत यहोवाने कसा व्यवहार केला?
२२ पहिल्या शतकात रोमी साम्राज्याचा भाग असणाऱ्या पॅलेस्टाईनवर हेरोद अग्रिप्पा पहिला शेवटचा शास्ता होता. हेरोदाने पेत्राला कैदेत ठेवले होते आणि इतर ख्रिश्चनांचा छळ आरंभला होता. त्याने प्रेषित याकोबालाही ठार करविले. (प्रे. कृत्ये १२:१, २) हेरोदानेच आखाड्यातील घातकी खेळ व इतर मूर्तिपूजक खेळांचा आरंभ केला. हे सर्व, तो देवाची भक्ति करणारा आहे या त्याच्या दाव्यास खोटे शाबीत करीत होते.
२३ पण मग, या विरोध्यावर दंडाज्ञा बजावण्याची यहोवाची नियुक्त वेळ आली. प्रे. कृत्ये १२:२१ ते २३ वचने आम्हास सांगतात: “नंतर नेमिलेल्या दिवशी हेरोद राजकीय पोषाख करून आसनावर बसला आणि जमलेल्या लोकांबरोबर भाषण करू लागला. तेव्हा लोक गजर करून बोलले: ‘ही देववाणी आहे, मनुष्यवाणी नव्हे!’” यानंतर काय घडले पवित्र शास्त्र म्हणते: “त्याने देवाला मान दिला नाही म्हणून तत्क्षणी यहोवाच्या दूताने त्याजवर प्रहार केला आणि तो किडे पडून मेला.” दानीएल २:२१ म्हणते त्याप्रमाणे यहोवा “राजास . . . स्थान भ्रष्ट करितो” याचे हे आणखी एक उदाहरण होते.
२४. या ऐतिहासिक वस्तुस्थिती कशाची साक्ष देतात?
२४ या ऐतिहासिक घटना, यहोवाला आपल्या उद्देशानुरुपचे काळ व ऋतू आहेत याची साक्ष देतात. त्याकरवी हे सूचित होते की जेथे “नीतीमत्व वास करील” अशा नंदनवनात पृथ्वीचे रूपांतर करण्याच्या त्याच्या उद्देशाची परिपूर्णता करण्याची क्षमता व सामर्थ्य त्याच्याठायी आहे.—२ पेत्र ३:१३.
तुम्हाला आठवते का?
◻ यहोवाचे काळ व ऋतु यांची समज प्राप्त करून घेणे एवढे महत्वाचे का आहे?
◻ या जगाचे शासनकर्ते व लोक यांना देवाचे पाठबळ का नाही?
◻ पृथ्वीवरील भावी नंदनवनात कोणत्या प्रकारच्या लोकांना वतन मिळणार?
◻ यहोवाने, त्याला विरोध करणाऱ्या शासनकर्त्यांना अधोगती प्राप्त करून देण्याचे आपले सामर्थ्य कसे दाखविले?