वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • bh पृ. २१३-पृ. २१५ परि. २
  • न्यायाचा दिवस—म्हणजे काय?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • न्यायाचा दिवस—म्हणजे काय?
  • बायबल नेमके काय शिकवते?
  • मिळती जुळती माहिती
  • न्यायाचा दिवस व त्यानंतर
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
  • देवाचा न्यायाचा दिवस —त्याचा आनंदी परिणाम!
    प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!
  • न्यायाच्या दिवशी काय होईल?
    टेहळणी बुरूज: न्यायाच्या दिवशी काय होईल?
बायबल नेमके काय शिकवते?
bh पृ. २१३-पृ. २१५ परि. २

परिशिष्ट

न्यायाचा दिवस—म्हणजे काय?

न्यायाचा दिवस म्हटले, की तुमच्या मनात काय येते? पुष्कळ लोकांचा असा विश्‍वास आहे, की एकेका फेरीत कोट्यवधी लोकांना देवाच्या सिंहासनासमोर आणले जाईल. तिथे प्रत्येक व्यक्‍तीचा न्याय केला जाईल. काहींना स्वर्गीय जीवन मिळेल तर काहींना चिरकाल यातना भोगण्याची शिक्षा दिली जाईल. परंतु, बायबलमध्ये न्यायाच्या दिवसाचे एक वेगळेच चित्र रेखाटले आहे. तो थरकाप उडवणारा काळ नव्हे तर आशा व पुनर्वसनाचा काळ असेल, असे देवाचे वचन वर्णन करते.

प्रकटीकरण २०:११, १२ मध्ये आपण न्यायाच्या दिवसाचे प्रेषित योहानाने दिलेले वर्णन वाचतो: “मोठे पांढरे राजासन व त्यावर बसलेला एक जण माझ्या दृष्टीस पडला, त्याच्या तोंडापुढून पृथ्वी व आकाश ही पळाली; त्याकरिता ठिकाण उरले नाही. मग मृत झालेल्या लहानथोरांना मी राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले. त्या वेळी पुस्तके उघडली गेली; तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले गेले ते जीवनाचे होते; आणि त्या पुस्तकांमध्ये जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय ज्यांच्या त्यांच्या कृत्यांप्रमाणे ठरविण्यात आला.” इथे वर्णन केल्याप्रमाणे न्यायाधीश कोण आहे?

यहोवा देव संपूर्ण मानवजातीचा सर्वोच्च न्यायाधीश आहे. परंतु, प्रत्यक्षात न्याय करण्याचे काम तो कोणा दुसऱ्‍याला देतो. प्रेषितांची कृत्ये १७:३१ नुसार, प्रेषित पौलाने म्हटले, की “एक दिवस नेमला आहे की, ज्या दिवशी तो आपण नेमलेल्या मनुष्याच्याद्वारे जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्त्वाने करणार आहे.” हा निवडलेला न्यायाधीश पुनरुत्थित येशू ख्रिस्त आहे. (योहान ५:२२) पण न्यायाचा दिवस केव्हा सुरू होतो? तो किती काळाचा असेल?

प्रकटीकरणाचे पुस्तक दाखवते, की न्यायाचा दिवस हर्मगिदोनाच्या लढाईनंतर सुरू होईल जेव्हा सैतानाची पृथ्वीवरील संपूर्ण भ्रष्ट व्यवस्था नाश केली जाईल.a (प्रकटीकरण १६:१४, १६; १९:१९–२०:३) हर्मगिदोनानंतर, सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांना एक हजार वर्षांसाठी एका अथांग डोहात बंदिस्त केले जाईल. या कालावधीत, १,४४,००० स्वर्गीय सहवारीस “ख्रिस्ताबरोबर एक हजार वर्षे राज्य” करतील. (प्रकटीकरण १४:१-३; २०:१-४; रोमकर ८:१७) तेव्हा न्यायाचा दिवस हा फक्‍त २४ तासांच्या कालवधीचा नसेल जेव्हा सर्वकाही घाईघाईत आटपले जाईल. तो एक हजार वर्षांचा आहे.

हजार वर्षांच्या कालावधीत, येशू ख्रिस्त “जिवंताचा व मृतांचा न्याय करील.” (२ तीमथ्य ४:१) ‘जिवंत’ म्हणजे हर्मगिदोनातून वाचलेला “मोठा लोकसमुदाय.” (प्रकटीकरण ७:९-१७) प्रेषित योहानाने न्यायाच्या ‘राजासनासमोर मृत झालेल्यांना’ देखील पाहिले. येशूने वचन दिल्याप्रमाणे, पुनरुत्थानाद्वारे “[“स्मृती,” NW] कबरेतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील.” (योहान ५:२८, २९; प्रेषितांची कृत्ये २४:१५) पण कशाच्या आधारावर सर्वांचा न्याय केला जाईल?

प्रेषित योहानाच्या दृष्टान्तानुसार, “पुस्तके उघडली गेली” आणि “त्या पुस्तकांमध्ये जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय ज्यांच्या त्यांच्या कृत्यांप्रमाणे ठरविण्यात आला.” ही पुस्तके म्हणजे, लोकांच्या गतकार्यांची नोंद आहे का? नाही. मृत्यूपूर्वी लोकांनी कोणती कार्ये केली त्याच्या आधारावर त्यांचा न्याय केला जाणार नाही. हे आपण कसे म्हणू शकतो? बायबल म्हणते: “जो कोणी मेला तो पापाच्या दोषापासून मुक्‍त” झाला आहे. (रोमकर ६:७) त्यामुळे ज्यांचे पुनरुत्थान होते ते जणू काय एका कोऱ्‍या पाटीसारखे होतात. तेव्हा, ही पुस्तके देवाच्या पुढील अटींना सूचित करत असावीत. चिरकाल जगण्याकरता, हर्मगिदोनातून जे वाचले आहेत व ज्यांचे पुनरुत्थान झाले आहे या दोघांना देवाच्या आज्ञांचे पालन करावे लागेल आणि हजार वर्षांच्या कालावधीत यहोवा ज्या नवीन अटी घालेल त्याही त्यांना पूर्ण कराव्या लागतील. अशाप्रकारे, न्यायाच्या दिवसाच्या दरम्यान लोक जे करतील त्याच्या आधारावर त्यांचा न्याय केला जाईल.

न्यायाच्या दिवसामुळे कोट्यवधी लोकांना देवाच्या इच्छेविषयी शिकून त्यानुसार आपल्या जीवनात बदल करण्याची पहिली संधी मिळेल. याचा अर्थ, तेव्हा खूप मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक कार्य केले जाईल. होय, ‘तेव्हा जगात राहणारे धार्मिकता शिकतील.’ (यशया २६:९) परंतु, सर्वच लोक देवाच्या इच्छेनुसार जीवन जगू इच्छिणार नाहीत. यशया २६:१० म्हणते: “दुर्जनावर कृपा केली तरी तो नीति शिकावयाचा नाही; धर्मराज्यात देखील तो अधर्म करील; परमेश्‍वराचे ऐश्‍वर्य त्याला दिसावयाचे नाही.” अशा दुष्ट जनांना न्यायाच्या दिवसादरम्यान कायमचे नाश केले जाईल.—यशया ६५:२०.

न्यायाच्या दिवसाच्या शेवटी, वाचलेले मानव परिपूर्ण मानव म्हणून पूर्णार्थाने ‘जिवंत होतील.’ (प्रकटीकरण २०:५) अशाप्रकारे न्यायाच्या दिवसादरम्यान मानवजातीला पूर्ववत परिपूर्ण स्थितीत आणले जाईल. (१ करिंथकर १५:२४-२८) यानंतर एक शेवटली परीक्षा होईल. सैतानाला बंदिवासातून मोकळे केले जाईल व मानवजातीला मार्गभ्रष्ट करण्याची एक शेवटची संधी त्याला दिली जाईल. (प्रकटीकरण २०:३, ७-१०) जे सैतानाचा प्रतिकार करतील ते बायबलच्या या अभिवचनाच्या पूर्णतेचा पूर्णपणे लाभ घेतील: “नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील.” (स्तोत्र ३७:२९) होय, न्यायाचा दिवस विश्‍वासू मानवजातीसाठी एक आशीर्वाद असेल!

a हर्मगिदोनाविषयी अधिक माहिती हवी असेल तर कृपया शास्त्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी, (इंग्रजी) खंड १, पृष्ठे ५९४-५, १०३७-८ आणि एकमात्र खऱ्‍या देवाची उपासना करणे, (इंग्रजी) पुस्तकाचा अध्याय २० पाहा. ही दोन्ही प्रकाशने यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केली आहेत.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा