यहोवाची करुणा आम्हास निराशेपासून वाचवते
“हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर; तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक.”—स्तोत्रसंहिता ५१:१.
१, २. यहोवाच्या एका सेवकावर गंभीर पापाचे कसे परिणाम घडू शकतात?
यहोवाच्या कायद्यांचा भंग शिक्षेविना करता येत नाही. हे, देवाविरूद्ध गंभीर पाप घडल्यानंतर किती स्पष्ट दिसून येते! आम्ही यहोवाची सेवा विश्वासूपणाने कित्येक वर्षांपासून केली असेल, तरी त्याच्या कायद्यांचा आज्ञाभंग केल्याने खूप अस्वस्थता व तीव्र औदासिन्य मिळते. यहोवाने आम्हांस सोडून दिले आहे आणि त्याच्या सेवेसाठी आम्ही लायक राहिलो नाहीत असे आम्हास वाटू शकते. आपले पाप देवाच्या कृपेच्या प्रकाशाला अडथळा आणणाऱ्या एखाद्या प्रचंड मोठ्या ढगासारखे वाटेल.
२ प्राचीन इस्राएलाच्या दावीद राजाला आपण स्वतः अशाच परिस्थितीत आहोत असे एकदा दिसले. हा प्रसंग कसा उद्भवला बरे?
चुकीची पावले गंभीर पापाकडे नेऊ शकतात
३, ४. संपन्नतेच्या कालावधीत दावीद राजाला काय झाले?
३ दावीदाची देवावर प्रीती होती परंतु गंभीर पापाकडे निरवणारी चुकीची पावले त्याने उचलली. (पडताळा गलतीकरांस ६:१.) हे खास करून दुसऱ्यावर अधिकार असणाऱ्या कोणत्याही अपूर्ण मानवाच्या बाबतीत होऊ शकते. संपन्न राजा म्हणून, दावीदाने कीर्ती आणि सामर्थ्य उपभोगले. त्याच्या शब्दाला आव्हान देण्यास कोणाची हिंमत होणार होती? कार्यक्षम माणसे त्याच्या सदैव सेवेला तत्पर होती, आणि लोकांनी उत्सुकतेने त्याची आज्ञा पाळली. तरीपण, दावीदाने स्वतःसाठी बायका वाढवून आणि लोकांची गणना करून चूक केली.—अनुवाद १७:१४-२०; १ इतिहास २१:१.
४ भौतिक संपन्नतेच्या ह्या कालावधीत, दावीदाने देवाविरूद्ध आणि मानवाविरूद्ध गंभीर पाप केले. सैतानाने जणू युक्तिबाजपणे विणलेल्या कापडाच्या गुंफलेल्या धाग्यांप्रमाणे एक पाप दुसऱ्या पापाला विणत गेले! सह इस्राएली अमोऱ्यांविरूद्ध युद्ध करण्यासाठी गेले असताना, दावीदाने त्याच्या गच्चीवरून उरीयाच्या सुदंर पत्नीला, बथशेबाला स्नान करताना पाहिले. उरीया लढाईस गेल्यामुळे, राजाने त्या स्त्रीला आपल्या राजमंदिरात आणले आणि तिच्याबरोबर व्यभिचार केला. तिला गर्भ राहिला हे नंतर कळाल्यावर त्याला बसलेल्या धक्क्याची जरा कल्पना करा! दावीदाने उरीयाला बोलावणे पाठवले, ही आशा करून की ती रात्र तो बथशेबाबरोबर घालवेल आणि ते मूल आपले म्हणून समजेल. दावीदाने त्याला मद्य पाजल्यावरही, उरीयाने तिच्याबरोबर निजण्यास नाकारले. आता निराश होऊन, दावीदाने सेनापती यवाब याला गुप्त आज्ञा देऊन उरीयाला युद्धाच्या तोंडी ठेवण्यास सांगितले, जेथे तो खात्रीने मारला जाऊ शकेल. उरीयाला युद्धात ठार मारण्यात आले, आणि त्याच्या विधवेने नेहमीप्रमाणे त्याचे सुतक पाळले, व लोकांना तिच्या गरोदरपणाची जाणीव होण्याआधीच दावीदाने तिच्याशी लग्नही केले.—२ शमुवेल ११:१-२७.
५. दावीदाने बथशेबाशी पाप केल्यावर काय झाले, आणि त्याच्या पापांचा त्याच्यावर काय परिणाम झाला?
५ देवाने, नाथान संदेष्ट्याकरवी दावीदाच्या पापांना उघड केले आणि म्हटले: “मी तुझ्याच घरातून तुजवर अरिष्ट उभे करीन.” त्यामुळे, बथशेबाला झालेले मूल मेले. (२ शमुवेल १२:१-२३) दावीदाचा ज्येष्ठ पुत्र, अम्नोन याने, त्याची सावत्र बहीण तामार हिजवर बलात्कार केला आणि तिच्या भावाकडून त्याचा खून झाला. (२ शमुवेल १३:१-३३) राजाचा मुलगा अबशालोम ह्याने सिंहासन बळकावण्याचा प्रयत्न केला आणि दावीदाच्या रखेल्यांसोबत लैंगिक संबंध ठेवून त्याच्या पित्याला कलंकित केले. (२ शमुवेल १५:१–१६:२२) मुलकी युद्धात अबशालोमचा मृत्यू घडला आणि दावीदाला आणखी दुःखित केले. (२ शमुवेल १८:१-३३) तथापि, दावीदाच्या पापांनी त्यास लीन केले आणि त्याच्या दयाळू देवाच्या जवळ राहण्याच्या गरजेची जाणीव करून दिली. आपण चुकल्यास, लीनतेने पश्चात्ताप करू आणि देवाच्या समीप येऊ या.—पडताळा याकोब ४:८.
६. दावीद राजा विशेषेकरून का दोषी होता?
६ दावीद यहोवाच्या कायद्याचा जाणीव राखणारा एक इस्राएली राजा होता त्यामुळे तो विशेषकरून दोषी होता. (अनुवाद १७:१८-२०) तो कोणा एका मिसरी राजा किंवा बाबेलच्या राजा सारखा नव्हता ज्यांना असे ज्ञान नव्हते व जे नित्यक्रमाने देवाला नापसंत असणाऱ्या गोष्टी करत होते. (पडताळा इफिसकरांस २:१२; ४:१८.) यहोवाला समर्पित असणाऱ्या राष्ट्राचा एक सदस्य असल्याकारणाने, दावीद हे जाणून होता की व्यभिचार आणि खून हे गंभीर पाप आहेत. (निर्गम २०:१३, १४) ख्रिश्चनांनाही देवाचा कायदा माहीत आहे. दावीदासमान, काही जण जन्मापासून पापी असल्यामुळे, मानवी दुर्बलतेमुळे, आणि प्रतिकार न करता येण्याजोग्या मोहामुळे त्याचे उल्लंघन करतात. तेच आम्हामधल्या काहीजणास झाल्यास, आम्हाला तीव्र निराशेत आच्छादणाऱ्या आणि आपल्या आध्यात्मिक दृष्टिला अंधळे करणाऱ्या निबीड अंधाराच्या स्थितीत राहण्याची गरज नाही.
कबुलीने दिलासा मिळतो
७, ८. (अ) त्याचे पाप लपवण्याचा प्रयत्न केल्यावर दावीदाला काय झाले? (ब) एखाद्याचे पाप का कबूल करावे आणि सोडून द्यावे?
७ देवाच्या कायद्याचे गंभीर स्वरूपात उल्लंघन करणाऱ्या पापाचे दोषी असल्यास, यहोवाला देखील आपल्या पापांची कबूली देण्यास आपल्याला कठीण वाटेल. त्या परिस्थितींमध्ये काय घडू शकते? स्तोत्रसंहिता ३२ मध्ये दावीदाने कबूल केले: “मी गप्प राहिलो होतो, तेव्हां सतत कण्हण्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली; कारण रात्रंदिवस तुझ्या हाताचा भार माझ्यावर होता; उन्हाळ्याच्या तापाने सुकावा तसा माझ्यातला जीवनरस सुकून गेला आहे.” (वचने ३, ४) स्वच्छंदी दावीदाला त्याचे पाप लपवण्याचा प्रयत्न करण्यामुळे आणि दोषी विवेकाला दडपून टाकण्याच्या प्रयत्नामुळे खच्ची पाडले. यातनांनी दावीदाची शक्ती इतकी कमी केली की तो जीवन-देणारा ओलावा नसलेल्या कोरड-पडलेल्या झाडाप्रमाणे झाला. त्याने मानसिक व शारीरिक दुष्परिणामांचा अनुभव खरोखर घेतला असावा. काही झाले तरी, त्याने त्याचा आनंद गमावला. आपल्यातील कोणी तशाच स्थितीत असल्याचे आढळून आल्यास, आम्ही काय केले पाहिजे?
८ देवाला कबुली देण्याने क्षमा व दिलासा मिळू शकेल. दावीदाने गायिले: “मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले; मी आपली अनीति लपवून ठेविली नाही; मी आपले अपराध परमेश्वराजवळ [यहोवा न्यू.व.] कबूल करीन असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पापदोषाची क्षमा केली.” (स्तोत्रसंहिता ३२:५) कोणत्याही गुप्त पापामुळे तुम्ही दुःखी आहात का? देवाची कृपा प्राप्त होण्यासाठी पाप कबूल करून ते करण्याचे सोडून देणे हे चांगले नसणार का? मंडळीतल्या वडिलांना बोलावून त्याच्याकडून आध्यात्मिकरित्या बरे होण्याचा प्रयत्न का करू नये? (नीतिसूत्रे २८:१३; याकोब ५:१३-२०) तुमचा पश्चात्तापी आत्मा कबूल केला जाईल, आणि लवकरच तुमचा ख्रिस्ती आनंद परत मिळेल. दावीद म्हणाला, “ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरूण घातले आहे, तो धन्य! ज्याच्या हिशेबी परमेश्वर [यहोवा न्यू.व.] अनीतीचा दोष लावीत नाही व ज्याच्या मनात कपट नाही, तो मनुष्य धन्य!”—स्तोत्रसंहिता ३२:१, २.
९. स्तोत्रसंहिता ५१ कधी व का रचण्यात आले?
९ दावीद आणि बथशेबा त्यांच्या गुन्ह्यासाठी यहोवा देवाला जबाबदार होते. त्यांच्या पापांकरता त्यांना ठार मारण्यात आले असते, तरीपण देवाने त्यांच्यावर कृपा दाखवली. विशेषकरून राज्याच्या करारामुळे तो दावीदाशी कृपाळू होता. (२ शमुवेल ७:११-१६) बथशेबा आणि त्याच्या पापांसाठी दावीदाची पश्चात्तापी मनोवृत्ती स्तोत्रसंहिता ५१ मध्ये दिसून येते. हे हृदयस्पर्शी स्तोत्र दावीदाने, संदेष्टा नाथानाने त्याच्या विवेकास ईश्वरी कायद्याविरूद्ध त्याने अतिदुष्ट पाप केल्यामुळे जागृत केले, तेव्हा लिहिले. दावीदाला त्याचे पाप दाखवून देण्यासाठी नाथानाला धैर्य लागले, तसेच आजही अशा गोष्टी करण्यासाठी नियुक्त ख्रिस्ती वडिलांनी धैर्यशील असले पाहिजे. लावलेल्या आरोपाला नाकारण्याऐवजी आणि नाथानाला दंडाची आज्ञा देण्याऐवजी, राजाने नम्रतेने कबुली दिली. (२ शमुवेल १२:१-१४) देवाला त्या नीच कामाबद्दल तो काय म्हणाला हे स्तोत्र ५१ दाखवते आणि ते आपण चुकलो असल्यास आणि यहोवाच्या कृपेची आपल्याला उत्कंठा असल्यास प्रार्थनापूर्वक चिंतनासाठी विशेषेकरून योग्य आहे.
आम्ही देवाला जबाबदार आहोत
१०. आध्यत्मिक सुधारणेचा अनुभव दावीद कसा घेऊ शकत होता?
१० दावीदाने पापासाठी सबब सांगण्याचा प्रयत्न केला नाही पण विनंती केली की: “हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर; तूं आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक.” (स्तोत्रसंहिता ५१:१) दावीदाने पाप करून देवाच्या कायद्यांच्या मर्यादेचे उल्लंघन केले होते. तथापि, देवाने त्याच्या प्रेमळ कृपेनुसार, किंवा विश्वासू प्रेमानुसार त्यावर कृपा दाखवली तरच, त्याला आध्यात्मिकरित्या बरे होण्याची आशा होती. देवाच्या गतकालीन करुणांची विपुलता असल्यामुळे पश्चात्तापी राजाला निर्माणकर्ता आपले पाप पुसून टाकील असा विश्वास करण्यासाठी एक आधार मिळाला.
११. प्रायश्चित्ताच्या दिवसाच्या होमापर्णांच्या द्वारे काय सुचविण्यात आले, आणि आज तारणासाठी कशाची गरज आहे?
११ प्रायश्चित्त दिवसाच्या होमार्पणांच्या भविष्यवादीत पडछायेद्वारे, यहोवाने हे सुचवले की पश्चात्तापी जणांना त्यांच्या पापांपासून शुद्ध करण्याचा एक मार्ग त्याच्याकडे होता. आम्हाला आता माहीत आहे की येशू ख्रिस्ताच्या खंडणीच्या बलिदानामध्ये आपल्या विश्वासाच्या आधारावर त्याची करुणा आणि क्षमाशीलपणा आम्हाप्रत विस्तारण्यात आली आहे. दावीद फक्त ह्या बलिदानाचे प्रकार आणि पडछाया त्याच्या मनात ठेवून, यहोवाच्या प्रेमळ कृपेवर आणि करुणांवर निष्ठा ठेऊ शकत होता, तर देवाच्या आधुनिक काळच्या सेवकांनी त्यांच्या उद्धारासाठी पुरवलेल्या खंडणीमध्ये किती विश्वास प्रकट करायला हवा!—रोमकरांस ५:८; इब्रीकरांस १०:१.
१२. पाप करणे ह्याचा काय अर्थ होतो, आणि दावीदाला त्याच्या पापाबद्दल कसे वाटले?
१२ दावीदाने देवाकडे कळकळीची विनंती करताना, पुढे म्हटले: “मला धुऊन माझा दोष पूर्णपणे काढून टाक, माझे पाप दूर करून मला निर्मळ कर. कारण मी आपले अपराध जाणून आहे, माझे पाप माझ्यापुढे नित्य आहे.” (स्तोत्रसंहिता ५१:२, ३) पाप करणे म्हणजे यहोवाच्या दर्जांचे चिन्ह चुकवणे. दावीदाने निश्चीतच ते केले होते. तरी, तो फक्त त्याच्या शिक्षेवर किंवा एक रोग लावून घेण्याच्या शक्यतेवर दुःखित असणाऱ्या व त्याच्या गुन्ह्याबद्दल निष्काळजी असणाऱ्या एका खूनी किंवा व्यभिचारी व्यक्तीसारखा नव्हता. यहोवाचा प्रेमी असल्याकारणाने, दावीद वाईटाचा द्वेष करत होता. (स्तोत्रसंहिता ९७:१०) त्याच्याच पापाचा त्याला तिटकारा वाटत होता आणि देवाने त्याला त्यापासून पूर्णपणे शुद्ध करावे असे तो इच्छित होता. दावीद त्याच्या पापांना पूर्णपणे जाणून होता आणि त्याने त्याच्या पापी वासनेला त्याच्यावर प्रभुत्व करू दिले याबद्दल त्याला तीव्रतेने दुःख वाटत होते. त्याचे पाप सतत त्याच्या समोर होते, कारण देवभिरू व्यक्तीचा दोषी विवेक त्याला पश्चात्ताप, कबुली, आणि यहोवाची क्षमा मिळेपर्यंत पापाचा भार कधीही हलका होऊ देत नाही.
१३. एकट्या देवाविरूद्धच त्याने पाप केले असे दावीद का म्हणू शकला?
१३ यहोवाला त्याचा जाब द्यावा लागेल हे कबूल करत, दावीद म्हणाला: “तुझ्याविरूद्ध, तुझ्याविरूद्धच मी पाप केले आहे, तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे; म्हणून तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील, व निवाडा करिशील तेव्हा निस्पृह ठरशील.” (स्तोत्रसंहिता ५१:४) दावीदाने देवाचे कायदे मोडले होते, बादशाही अधिकाराला अप्रतिष्ठीत केले होते, आणि त्याची निंदा व्हावयास वाव देऊन, “परमेश्वराच्या शत्रूस उपहास करावयास निमित्त दिले” होते. (२ शमुवेल १२:१४; निर्गम २०:१३, १४, १७) ज्याप्रमाणे बाप्तिस्मा घेतलेला पापी व्यक्ती आज ख्रिस्ती मंडळीमध्ये आणि प्रिय जणांमध्ये खिन्नता किंवा दुःख घडवून आणतो, त्याचप्रमाणे दावीदाची पापी कृत्ये इस्राएल मंडळी आणि त्याच्या कुटुंबाच्या सदस्यांविरूद्ध अपराध होता. पश्चात्तापी राजाला उरीया सारख्या सह मानवांविरूद्ध पाप केले असल्याचे माहीत असूनही, यहोवासाठी असणाऱ्या मोठ्या जबाबदारीची जाणीव त्याला होती. (पडताळा उत्पत्ती ३९:७-९.) यहोवाचा न्याय नीतिमान असल्याचे दावीदाने कबूल केले. (रोमकरांस ३:४) पाप केलेल्या ख्रिश्चनांनी त्यासारखाच दृष्टिकोण ठेवणे जरूरीचे आहे.
पापाचे गांभीर्य कमी करणाऱ्या परिस्थिती
१४. दावीदाकडून कोणत्या गांभीर्य कमी करणाऱ्या परिस्थिती उद्धृत केल्या गेल्या?
१४ जरी, दावीदाने दोषाचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला नाही, तरी तो म्हणाला: “पाहा, मी जन्माचाच पापी आहे; माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे.” (स्तोत्रसंहिता ५१:५) दावीद जन्माचाच पापी होता, आणि वारसाने मिळालेल्या पापामुळे त्याच्या आईने गर्भधारणेच्या पीडेचा अनुभव घेतला होता. (उत्पत्ती ३:१६; रोमकरांस ५:१२) त्याच्या शब्दांचा अर्थ हा होत नाही की, योग्य वैवाहिक संबंध, गर्भधारणा, आणि जन्म हे पाप आहेत, कारण देवाने स्वतः लग्नाची आणि मुलांचा जन्म होऊ देण्याची व्यवस्था केली होती; शिवाय त्याच्या आईने केलेल्या कोणत्या विशिष्ट पापाविषयी दावीद येथे बोलत नव्हता. गर्भधारणा झाल्यापासून तो पातकी होता कारण त्याचे पालक इतर सगळ्या अपूर्ण मानवांसारखे पापी होते.—ईयोब १४:४.
१५. देवाने जरी गांभीर्य कमी करणाऱ्या परिस्थिती विचारात घेतल्या तरीही, आपण काय करू नये?
१५ आपण पाप केले असल्यास, कदाचित आपल्या पापाला हातभार लावण्यास कारणीभूत ठरलेल्या अशा गांभीर्य कमी करणाऱ्या परिस्थितींचा उल्लेख देवाला प्रार्थनेत करू शकतो पण आपण देवाकडील अपात्रित कृपेला स्वैराचारासाठी सबब म्हणून बदलू नये किंवा वारसाने मिळालेल्या पापीपणाचा उपयोग धुराच्या दाट पडद्याप्रमाणे करून, आपण स्वतःला आपल्या पापाचा जाब देण्यापासून लपवू नये. (यहूदा ३, ४) दावीदाने मनात अशुद्ध विचार बाळगण्याची आणि मोहाला उत्पन्न करण्याची जबाबदारी स्वीकारली. मोहास अधीन न होण्यासाठी आपण प्रार्थना करू या आणि मग अशा प्रार्थनेच्या एकमतात कार्य करू या.—मत्तय ६:१३.
शुद्ध करण्यासाठी विनंती
१६. कोणत्या गुणाचा देवाला आनंद वाटतो, आणि त्याचा आपल्या वर्तणुकीवर कसा परिणाम झाला पाहिजे?
१६ अनेक लोक, देवाशी एकनिष्ठ असणाऱ्या उत्तम व्यक्ती वाटतात, परंतु देव बाह्य स्वरूपापेक्षा अंतर्यामी काय आहे ते पाहतो. दावीद म्हणाला: “पाहा, अंतर्यामीची सत्यता तुला [यहोवा] आवडते; तू माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे.” (स्तोत्रसंहिता ५१:६) खोटेपणामुळे तसेच उरीयाचा मृत्यू घडवून आणण्यात त्याचा हात असल्यामुळे आणि बथशेबाच्या गरोदरपणाची सत्य घटना लपवून ठेवण्याचा प्रयत्न केल्यामुळे दावीद दोषी होता. तरीसुद्धा, देवाला सत्यतेचा आणि पवित्रतेचा आनंद वाटतो हे त्याला माहीत होते. आपल्या वर्तणुकीवर ह्याचा चांगला परिणाम घडला पाहिजे, कारण आपण अप्रामाणिक असल्यास यहोवा आपल्याला नापसंत करील. (नीतिसूत्रे ३:३२) दावीदाने हेही जाणून घेतले की जर देवाने त्याला एक पश्चात्तापी राजा या नात्याने ‘ज्ञानाची ओळख करून दिली,’ तर तो त्याच्या उर्वरित जीवनात ईश्वरी दर्जांच्या अनुरूप वागू शकेल.
१७. एजोबाने शुद्ध होण्यासाठी केलेल्या प्रार्थनेचे काय महत्त्व आहे?
१७ स्तोत्रकर्त्याला पापी प्रवृत्तींवर मात करण्यासाठी देवाच्या मदतीची गरज भासल्यामुळे, त्याने पुढे अशी विनंती केली: “एजोबाने माझा पापमल काढ म्हणजे मी निर्मळ होईन; मला धू म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईन.” (स्तोत्रसंहिता ५१:७) एजोब वनस्पतीचा (कदाचित सुवासिक पाने असलेले रोप, किंवा ओरीगॅनम मारू) पूर्वी इतर गोष्टींसमवेत, महारोगाने दूषित झालेल्या लोकांसाठी शुद्धीकरणाच्या विधित उपयोग केला जात होता. (लेवीय १४:२-७) यास्तव दावीदाने एजोबाने पाप शुद्ध करण्यासाठी प्रार्थना करणे उचित होते. शुद्धतेची ही कल्पना यहोवाने त्याला धुऊन काढण्याच्या त्याच्या विनंतीशी संबंधीत आहे की ज्यामुळे तो पूर्णपणे शुद्ध, बर्फाहूनही श्वेत की ज्यावर काजळी किंवा दुसरी घाण साठली नाही, असे होऊ शकेल. (यशया १:१८) आम्हापैकी कोणी आता चुकांमुळे विवेकाच्या वेदना भोगत असेल, तर आम्हाठायी हा विश्वास असू द्यावा की जर आम्ही पश्चात्तापाने देवाची क्षमा मिळविण्याचा प्रयत्न केला, तर येशूच्या खंडणी बलिदानाच्या आधारावर तो आम्हाला शुद्ध आणि स्वच्छ करील.
पुनर्स्थापनेसाठी विनंती
१८. पश्चात्ताप करण्याच्या आणि कबुली देण्याच्या आधी दावीदाची काय स्थिती होती, आणि ह्याचे ज्ञान आज कसे साहाय्यक होऊ शकते?
१८ कोणत्याही ख्रिश्चनाला त्याच्या दोषी विवेकामुळे त्रास सहन करावा लागला असेल तर तो दावीदाच्या शब्दांना समजू शकतो: “आनंदाचे व हर्षाचे शब्द माझ्या कानी पडू दे; म्हणजे तू मोडिलेली माझी हाडे उल्लासतील.” (स्तोत्रसंहिता ५१:८) दावीदाने पश्चात्ताप करण्याआधी आणि त्याच्या पापाची कबुली देण्याआधी, त्याच्या त्रस्त विवेकाने त्याला दुःखित केले. त्याला अत्यानंदाच्या गीतांमध्ये आणि उत्तम गायकांद्वारे तसेच कुशल संगीतकारांद्वारे सादर केलेल्या आनंदोत्सवात रस वाटला नाही. देवाच्या नापसंतीवर पापी दावीदाचे दुःख इतके मोठे होते की जणू हाडे दुःखदायकरित्या चिरडल्या गेलेल्या माणसासारखी त्याची स्थिती झाली होती. क्षमा मिळण्यासाठी, आध्यात्मिकरित्या बरे होण्यासाठी, आणि त्याने पूर्वी अनुभवलेल्या आनंदाला परत मिळवण्यासाठी, त्याने अत्युत्कट इच्छा धरली. एका पश्चात्तापी अपराध्याला आज देवाशी असलेला संबंध काही कारणामुळे धोक्यात टाकण्याआधी जो त्याचा आनंद होता तो परत मिळवण्याकरता यहोवाच्या क्षमेची गरज आहे. पश्चात्तापी व्यक्तीला “पवित्र आत्म्याच्या आनंदा”ची पुनर्स्थापना झाल्यामुळे हे दिसते की यहोवाने त्याला क्षमा केली आणि त्याच्यावर तो प्रेम करतो. (१ थेस्सलनीकाकरांस १:६) ते किती समाधान देते!
१९. देवाने दावीदाचे सर्व पाप पुसून टाकले असते तर त्याला कसे वाटले असते?
१९ दावीदाने पुढे प्रार्थना केली: “माझ्या पापांपासून तू आपले तोंड फिरीव; माझे सर्व अपराध काढून टाक.” (स्तोत्रसंहिता ५१:९) पापांकडे कृपा दृष्टीने पाहण्यासाठी यहोवाकडून अपेक्षा केली जाऊ शकत नव्हती. याच कारणास्तव, दावीदाच्या पापांपासून त्याचे तोंड फिरवण्यास सांगितले गेले. देवाने त्याच्या सर्व चुकांना पुसून टाकावे, त्याच्या सर्व अधार्मिकतेला झाकून टाकावे अशी ही राजाने त्याला विनंती केली. यहोवाला तसे करता आले असते तर ते किती बरे झाले असते! त्यामुळे दावीदाच्या आत्म्याला वर उचलले गेले असते, त्रस्त विवेकाचे ओझे काढून टाकले असते, आणि आता पश्चात्ताप केलेल्या राजाला हे कळू दिले असते की त्याला त्याच्या प्रेमळ देवाकडून क्षमा मिळाली.
तुम्ही पाप केले असल्यास काय?
२०. गंभीररित्या पाप केलेल्या कोणत्याही ख्रिश्चनाला काय करण्याची शिफारस करण्यात आली आहे?
२० स्तोत्रसंहिता ५१ दाखवते की यहोवाच्या कोणत्याही समर्पित सेवकांपैकी कोणी गंभीररित्या पाप केले असले पण जे पश्चात्तापी आहेत ते आत्मविश्वासाने त्यांच्यावर कृपापसंती दाखवावी आणि त्यांच्या पापापासून शुद्ध करावे अशी मागणी करू शकतात. जर अशाप्रकारची चूक केलेले तुम्ही एक ख्रिस्ती असाल, तर नम्र प्रार्थनेद्वारे आमच्या स्वर्गीय पित्याची क्षमा मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न का करत नाही? त्याच्यासमोर मान्यताप्राप्त भूमिकेत उभे राहण्यास देवाच्या मदतीची तुम्हाला गरज आहे हे कबूल करा, आणि तुमचा अगोदरचा आनंद परत मिळवून देण्यासाठी त्याला विनंती करा. पश्चात्तापी ख्रिश्चन आत्मविश्वासाने यहोवाकडे अशा विनंत्या घेऊन प्रार्थनेत जाऊ शकतात, कारण “तो भरपूर क्षमा करील.” (यशया ५५:७; स्तोत्रसंहिता १०३:१०-१४) अर्थात, मंडळीतल्या वडिलांकडे जायला हवे की जेणेकरून ते आम्हाला आवश्यक असलेली आध्यात्मिक मदत देऊ शकतात.—याकोब ५:१३-१५.
२१. ह्यानंतर आम्ही कशाचे परिक्षण करणार आहोत?
२१ यहोवाची करुणा त्याच्या लोकांना निराशेपासून जरूर वाचवते. परंतु पश्चात्तापी दावीदाच्या दुसऱ्या मनःपूर्वक विनंत्यांचे स्तोत्रसंहिता ५१ मध्ये आपण नीट परीक्षण करू या. आपला अभ्यास आम्हाला दाखवून देईल की यहोवा भंगलेल्या हृदयाला तुच्छ लेखत नाही.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
▫ गंभीर पापाचा एखाद्या यहोवाच्या सेवकावर कोणता परिणाम घडू शकतो?
▫ दावीदाने पाप लपवण्याचा प्रयत्न केल्यावर त्याच्यावर काय परिणाम झाला?
▫ एकट्या देवाविरूद्धच त्याने पाप केले असे दावीद का म्हणाला?
▫ आम्ही पाप केल्यावर देवाने जरी गांभीर्य कमी करणाऱ्या परिस्थितींना विचारात घेतले, तरीही आम्ही काय करू नये?
▫ एखाद्या ख्रिश्चनाने गंभीर पाप केले असल्यास त्याने काय करावे?