भग्न हृदयास यहोवा तुच्छ लेखत नाही
“देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा; हे देवा, भग्न व अनतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस.”—स्तोत्रसंहिता ५१:१७.
१. गंभीररित्या पाप घडलेल्या पण पश्चात्तापी असणाऱ्या त्याच्या उपासकांना यहोवा कोणत्या दृष्टिकोनाने पाहतो?
यहोवा ‘प्रार्थनेचा प्रवेश त्यामधून होत नाही, अशा अभ्राने स्वत:ला आच्छादू’ शकतो. (विलापगीत ३:४४) पण त्याच्या लोकांनी त्याच्या जवळ जावे असे तो इच्छितो. जरी त्याच्या कोणा एका उपासकाने गंभीररित्या पाप केले असेल परंतु तो जर पश्चात्तापी आहे, तर आमचा स्वर्गीय पिता त्या व्यक्तीने केलेल्या चांगल्या गोष्टींची आठवण करतो. यास्तव, सह ख्रिश्चनांना प्रेषित पौल असे सांगू शकला: “तुमचे कार्य व तुम्हा पवित्र जनांची केलेली व करीत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखविलेली प्रीति, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.”—इब्रीकरांस ६:१०.
२, ३. चुकणाऱ्या सह विश्वासूजणांशी वागताना ख्रिस्ती वडिलांनी काय विचारात घेण्यास हवे?
२ सह विश्वासूजणांनी देवाला निष्ठावंतपणाने केलेल्या सेवेचा काळ ख्रिस्ती वडिलांनी विचारात घेण्यास हवा. ज्यांनी चुकीचे पाऊल उचलले होते किंवा गंभीररित्या पाप केले होते अशा पश्चात्तापीजणांकडून दिलेल्या पवित्र सेवेचा ह्यामध्ये समावेश आहे. देवाच्या कळपात असणाऱ्या सर्वांच्या आध्यत्मिक हिताचा ख्रिस्ती मेंढपाळ शोध घेतात.—गलतीकर ६:१, २.
३ पश्चात्तापदग्ध अपराध्याला यहोवाच्या कृपेची गरज आहे. तरीसुद्धा, अजून काही जरूरी आहे. हे स्तोत्रसंहिता ५१:१०-१९ मध्ये दावीदाच्या शब्दांनी स्पष्ट केले आहे.
शुद्ध हृदयाची गरज
४. शुद्ध हृदय आणि नवीन आत्म्यासाठी दावीदाने का प्रार्थना केली?
४ पापामुळे बिकट आध्यात्मिक स्थितीत एखादा समर्पित ख्रिस्ती असेल, तर यहोवाची कृपा आणि क्षमा या शिवाय त्याला कशाची गरज आहे? तर, दावीदाने अशी विनंती केली की: “हे देवा माझ्या ठायी शुद्ध हृदय उत्पन्न कर; माझ्या ठायी स्थिर असा आत्मा पुन्हा घाल.” (स्तोत्रसंहिता ५१:१०) गंभीर पापाची प्रवृत्ती अजूनही त्याच्या मनात असल्याचे त्याने जाणून घेतल्यामुळे दावीदाने ही विनंती केली. बथशेबा आणि उरीया संबंधीच्या जाळ्यात ज्याप्रकारे दावीद सापडला होता त्याप्रकारच्या पापांमध्ये कदाचित आपण गुंतलेले नसू, पण कोणत्यातरी गंभीर पापी वर्तणुकीमध्ये गुंतले जाऊ शकू यासाठी आपल्याला मोहाला नमते घेण्यापासून अलिप्त राहण्यास यहोवाच्या मदतीची गरज आहे. शिवाय, आपल्या हृदयातून लोभ आणि द्वेषासारखे पापी गुण—जे चोरी आणि खुनासारखेच गुन्हे आहेत—काढून टाकण्यासाठी आपल्याला ईश्वरी मदतीची गरज आहे.—कलस्सैकरांस ३:५, ६; १ योहान ३:१५.
५. (अ) शुद्ध हृदय असणे ह्याचा काय अर्थ होतो? (ब) दावीदाने नवीन आत्म्यासाठी मागणी केली तेव्हा त्याने काय इच्छिले होते?
५ शुद्धतेचा हेतू किंवा उद्देश असणारे “शुद्ध हृदय” त्याच्या सेवकांनी बाळगावे, असे यहोवा अपेक्षितो. दावीदाने याप्रकारची शुद्धता दर्शवली नाही हे जाणल्यावर, देवाने त्याचे हृदय स्वच्छ करावे आणि त्याच्या ईश्वरी दर्जांच्या एकतेत त्याला आणावे अशी त्याने प्रार्थना केली. स्तोत्रकर्त्याला एक नवीन, सरळ आत्मा किंवा मनाची प्रवृत्ती देखील हवी होती. मोहाला प्रतिकार करण्यात आणि यहोवाच्या कायद्यांना आणि नियमांना खंबीरपणे चिटकून राहण्यात मदत करणाऱ्या आत्म्याची गरज त्याला होती.
पवित्र आत्मा अत्यंत जरूरीचा
६. यहोवाने त्याच्याकडून पवित्र आत्मा काढून न घेण्यासाठी दावीदाने विनंती का केली?
६ आपल्या चुकांसाठी किंवा पापासाठी निराशीत असतो, तेव्हा देव आपल्याला दूर करील व त्याचा पवित्र आत्मा, किंवा कार्यकारी शक्ती आपल्यावरून काढून घेईल असे आपल्याला वाटू शकेल. दावीदाला त्याच प्रकारे वाटल्यामुळे त्याने यहोवाला अशी विनंती केली की: “तू मला आपल्यापुढून घालवून देऊ नको; आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नको.” (स्तोत्रसंहिता ५१:११) त्याच्या पापांनी त्याला यहोवाची सेवा करण्यासाठी अयोग्य बनवले असे पश्चात्तापदग्ध व लीन दावीदाला वाटले. यहोवाच्या पुढून घालवून देणे म्हणजे त्याची पसंती, सांत्वन आणि आशीर्वाद गमावणे असा त्याचा अर्थ होईल. आध्यात्मिकरित्या पुनर्स्थापनेसाठी दावीदाला यहोवाच्या पवित्र आत्म्याची गरज होती. त्याच्यावर पवित्र आत्मा असल्याने यहोवाला संतुष्ट करण्यासाठी तो प्रार्थनापूर्वकतेने ईश्वरी मार्गदर्शन मिळवू शकत होता, पाप टाळू शकत होता, आणि बुद्धिमत्तेने राज्य करू शकत होता. पवित्र आत्म्याच्या देणाऱ्याविरूद्ध पाप केल्याची दावीदाला जाणीव असल्यामुळे, त्याने तो त्याच्याकडून काढून न घेण्यासाठी यहोवाकडे विनंती केली.
७. आपण पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना का करावी आणि त्याला न दुखवण्यासाठी काळजी का घ्यावी?
७ आपल्याबद्दल काय? आपण पवित्र आत्मा मिळण्याकरता प्रार्थना केली पाहिजे आणि त्याचे मार्गदर्शन पाळण्याच्या उणीवामुळे त्याला दुःखित न करण्याची काळजी घेतली पाहिजे. (लूक ११:१३; इफिसकरांस ४:३०) नाहीतर, आपण तो आत्मा गमावू आणि प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन ह्या देवाने दिलेल्या फळांना दाखवण्यात असमर्थ ठरू. आम्ही पश्चात्ताप न करता देवाच्याविरूद्ध पाप करत राहिल्यास, तो त्याचा पवित्र आत्मा आम्हावरून काढून घेईल.
तारणाचा परमानंद
८. आम्ही पाप केले असेल पण आम्हाला तारणाचा आनंद घ्यावयाचा आहे, तर आम्ही काय करण्याची गरज आहे?
८ आध्यत्मिक सुधारणेचा अनुभव घेणारी पश्चात्तापदग्ध पापी व्यक्ती यहोवाच्या तारणाच्या व्यवस्थेचा उपभोग पुन्हा घेऊ शकते. त्यासाठी उत्सुक असल्यामुळे, दावीदाने देवाकडे अशी विनंती केली की: “तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे; आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर.” (स्तोत्रसंहिता ५१:१२) यहोवाकडून खात्रीने असलेल्या तारणाच्या आशेत हर्षभरित होणे किती आश्चर्याचे आहे! (स्तोत्रसंहिता ३:८) देवाविरूद्ध पाप केल्यानंतर, दावीद त्याच्याकडून मिळणाऱ्या तारणाच्या आनंदाचा शोध घेऊ लागला. यहोवाने काही काळानंतर, त्याचा पुत्र, येशू ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाद्वारे तारण पुरविले. आम्ही देवाचे समर्पित सेवक म्हणून जर गंभीर पाप केले असेल पण तारणाचा आनंद परत मिळवू इच्छितो, तर पवित्र आत्म्याविरूद्ध पाप करण्याचे टाळण्यासाठी आमची पश्चात्तापी मनोवृत्ती असली पाहिजे.—मत्तय १२:३१, ३२; इब्रीकरांस ६:४-६.
९. “उत्सुकतेच्या आत्म्याने” दावीदाला मदत देण्यास त्याने देवाला विचारले तेव्हा तो काय विनंती करत होता?
९ यहोवाने त्याची मदत “उत्सुकतेच्या आत्म्याने” करावी म्हणून दावीदाने त्याकडे विनंती केली. स्पष्टपणे मग, हे देवाने साहाय्यक असण्याच्या किंवा त्याच्या पवित्र आत्म्याच्याविषयी नव्हे तर, ते दावीदाच्या प्रवर्तक मनाच्या प्रवृत्तीविषयी होते. देवाने दावीदाला बरोबर ते करण्यासाठी आणि पुन्हा एकदा पापात न पडण्यासाठी स्वखुषीचा आत्मा देऊन त्याची मदत करावी असे तो इच्छित होता. यहोवा देव सतत त्याच्या सेवकांना पाठिंबा देत राहतो, आणि विविध संकटांनी नमलेल्यांना उठवत असतो. (स्तोत्रसंहिता १४५:१४) आपण चूक केली असेल पण पश्चात्तापयुक्त आहोत आणि यहोवाची सेवा सर्वदा करू इच्छितो तर ते जाणणे किती सांत्वन करणारे असेल!
पापी लोकांना काय शिकवावे?
१०, ११. (अ) इस्राएली पापी व्यक्तींना दावीद काय शिकवू शकत होता? (ब) दावीदाने स्वतःने काय केल्यानंतरच तो पापी व्यक्तींना शिकवू शकत होता?
१० देवाने अनुमती दिल्यास, दावीद असे काही करू इच्छित होता ज्यामुळे यहोवाच्या करुणेबद्दल गुणग्राहकता प्रगट करता येणार होती आणि त्याची दुसऱ्यांना मदत झाली असती. पश्चात्तापदग्ध राजाने यहोवाला प्रार्थनापूर्वक विचार उद्देशून पुढे म्हटले: “मी अपराध्यास तुझे मार्ग शिकवीन; आणि पातकी तुझ्याकडे वळतील.” (स्तोत्रसंहिता ५१:१३) पापी दावीद देवाचा कायदा मोडणाऱ्यांना काय शिकवू शकत होता? तो काय सांगू शकत होता? आणि त्यामुळे कोणती चांगली गोष्ट साध्य होऊ शकणार होती?
११ इस्राएली पापीजणांना कुमार्गापासून वळवण्याच्या आशेने यहोवाच्या मार्गांना दाखवत असताना, पाप किती वाईट आहे, पश्चात्तापाचा काय अर्थ होतो आणि देवाची कृपा कशी मिळवावी हे दावीद दर्शवू शकत होता. यहोवाची नापसंती आणि तीव्र हृदयाच्या वेदना अनुभवल्यामुळे, निःसंशयाने दावीद पश्चात्तापीजणांचा, हृदय भंगलेल्या पापीजणांचा एक दयाळू शिक्षक बनण्याच्या स्थितीत येऊ शकला. अर्थात, यहोवाचे नियम त्याने स्वतःने स्वीकारल्यावरच आणि त्याची क्षमा मिळवल्यावरच इतरांना शिकवण्यासाठी तो त्याचे उदाहरण वापरू शकत होता, कारण ईश्वरी गरजांच्या अधीन राहण्यास जे नाकारतात त्यांना ‘देवाचे नियम सांगायला’ काही अधिकार नाही.—स्तोत्रसंहिता ५०:१६, १७.
१२. देवाने दावीदाला रक्तदोषापासून मुक्त केले ह्या ज्ञानापासून त्याला काय लाभ झाला?
१२ त्याचे हेतू दुसऱ्याप्रकारे पुन्हांपुन्हा सांगण्याच्या उद्देशाने, दावीद म्हणाला: “हे देवा, माझ्या उद्धारक देवा, तू मला रक्तपाताच्या दोषापासून मुक्त कर, म्हणजे माझी जीभ तुझ्या न्यायपरायणतेचा गजर करील.” (स्तोत्रसंहिता ५१:१४) रक्तदोषाने त्यासोबत मृत्यूकडे निरवणारी तीव्र नापसंती आणली होती. (उत्पत्ती ९:५, ६) पण, त्याच्या उद्धारक देवाने उरीया संबंधीत असणाऱ्या रक्तदोषापासून त्याला मुक्त केले ह्या ज्ञानामुळे दावीदाला मनाची व हृदयाची शांतता प्राप्त होऊ शकली. मग त्याची जीभ आनंदाने त्याच्या स्वतःच्या नव्हे तर देवाच्या नीतिमत्वतेबद्दल गाऊ शकली. (उपदेशक ७:२०; रोमकरांस ३:१०) ज्याप्रकारे सध्याच्या दिवसातील कोणी मनुष्य वाईट मार्गाला लावलेल्या एका व्यक्तीचे पावित्र्य परत मिळवू शकत नाही किंवा ठार मारलेल्याला पुनरूत्थित करू शकत नाही त्याप्रमाणे दावीद त्याच्या अनैतिकतेला नाहीसे करू शकला नाही किंवा उरीयाला कबरेतून परत आणू शकला नाही. आपल्याला भुरळ पाडली जाते तेव्हा, आपण या गोष्टींबद्दल विचार करू नये का? यास्तव, नीतिमत्वामध्ये दाखवलेल्या यहोवाच्या कृपेचे आपण किती गुणग्रहण केले पाहिजे! खरोखरच, गुणग्राहकतेमुळे दुसऱ्यांना ह्या नीतिमत्वतेच्या आणि क्षमाशीलतेच्या उगमस्थानाकडे वळवण्यास आपण प्रवृत्त केले पाहिजे.
१३. एखाद्या पाप्याला यहोवाची स्तुती गाण्यासाठी आपले ओठ केवळ कोणत्या परिस्थितीत योग्यपणे उघडता येतील?
१३ जोपर्यंत यहोवा कोणा पापी व्यक्तीचे ओठ त्याच्या सत्याची स्तुती गाण्यासाठी जणू उघडत नाही तोपर्यंत या पाप्याला देवाची योग्यपणे स्तुती करता येणार नाही. म्हणूनच दावीदाने गायिले: “हे प्रभू, माझे ओठ उघड; म्हणजे माझे मुख तुझी कीर्ति वर्णील.” (स्तोत्रसंहिता ५१:१५) देवाच्या क्षमेमुळे त्याच्या विवेकाची सुटका झाल्यामुळे दावीद यहोवाच्या मार्गांबद्दल पापीजणांस शिकवण्यासाठी प्रवृत्त होऊ शकला आणि तो मुक्तपणे त्याची स्तुती करू शकला. दावीदाप्रमाणेच पापांची क्षमा मिळालेल्यांनी त्यांच्यावर दाखवलेल्या यहोवाच्या अपात्रित कृपेचे गुणग्रहण करावे, आणि देवाच्या सत्याची घोषणा करण्यासाठी आणि ‘त्याची कीर्ति वर्णि’ण्यासाठी प्रत्येक संधीचा फायदा घेतला पाहिजे.—स्तोत्रसंहिता ४३:३.
देवाने स्वीकारण्याजोगे यज्ञ
१४. (अ) नियम शास्त्र करारानुसार कोणत्या यज्ञांची अपेक्षा केली जात होती? (ब) नित्याने आचरत राहिलेल्या पापांची भरपाई चांगल्या कामांद्वारे केली जाऊ शकते असा विचार करणे चुकीचा का ठरेल?
१४ सूक्ष्म दृष्टी मिळवल्यामुळे दावीद असे म्हणू शकला: “तुला पशुयज्ञ आवडत नाही; नाही तर तो मी केला असता; होमबलिही तुला प्रिय नाही.” (स्तोत्रसंहिता ५१:१६) पशुयज्ञ देऊ करावीत अशी मागणी नियमशास्त्राची होती. पण अशा यज्ञांद्वारे मृत्यूने दंडणीय असलेल्या दावीदाच्या खुन व व्यभिचार या पापांचे प्रायश्चित तो करू शकत नव्हता. नाहीतर, यहोवाला पशुयज्ञ देऊ करण्यास त्याने कोणतीही कसर बाकी ठेवली नसती. मनःपूर्वक पश्चात्तापाविना, यज्ञ निरूपयोगी आहेत. म्हणूनच सतत आचरत राहिलेल्या पापांची भरपाई काही चांगल्या कामांद्वारे केली जाऊ शकते, असा विचार करणे चुकीचा ठरेल.
१५. भग्न हृदय असणाऱ्या समर्पित व्यक्तीची मनोवृत्ती कशी असते?
१५ दावीद पुढे म्हणाला: “देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा; हे देवा, भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस.” (स्तोत्रसंहिता ५१:१७) पश्चात्तापदग्ध पापी व्यक्तीच्या बाबतीत, देवाला स्वीकारण्याजोगा असा “यज्ञ म्हणजे भग्न आत्मा” आहे. अशा व्यक्तीची भांडखोर मनोवृत्ती नसते. भग्न आत्मा असलेल्या पापी व्यक्तीचे हृदय त्याच्या पापासाठी तीव्रतेने दुःखित असते, देवाच्या नापसंतीची जाणीव झाल्यामुळे नम्र झालेले असते, आणि ईश्वरी पसंती मिळवण्याकरता काहीही करण्यास तयार असते. आपल्या पापांसाठी पश्चात्ताप केल्याशिवाय आणि आपले हृदय त्याला एकनिष्ठ भक्तीत दिल्याशिवाय आपण देवाला मोलाचे असे काहीच देऊ शकत नाही.—नहूम १:२.
१६. पापामुळे हृदय भग्न झालेल्या व्यक्तीकडे परमेश्वर कसे पाहतो?
१६ भंग झालेल्या आणि चिरडलेल्या हृदयाच्या यज्ञांना देव नापसंत करत नाही. या कारणामुळे, त्याचे लोक या नात्याने आम्हासमोर कोणतीही अडचण निर्माण झाली तरी त्यामध्ये आपण निराश होऊ नये. जीवनाच्या मार्गावर कोठे अडखळल्यामुळे आपले मन दैवी कृपेसाठी आक्रोश करत असले तरी, परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. आपण जरी गंभीररित्या पाप केले असले पण पश्चात्तापी आहोत, तरी यहोवा आपल्या भंगलेल्या हृदयाला तिरस्काराने झिडकारणार नाही. ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाच्या आधारे तो आम्हास क्षमा करील आणि त्याची कृपापसंती आम्हास परत मिळवून देईल. (यशया ५७:१५; इब्रीकरांस ४:१६; १ योहान २:१) तथापि, दावीदाप्रमाणे, आवश्यक दोषारोप किंवा शासनापासून सुटका मिळवण्यासाठी नव्हे तर ईश्वरी पसंती परत मिळवण्यासाठी आपल्या प्रार्थना असल्या पाहिजेत. देवाने दावीदाला क्षमा जरूर केली, परंतु त्याने त्याला शिक्षाही दिली.—२ शमुवेल १२:११-१४.
शुद्ध भक्तीसाठी काळजी
१७. पापी व्यक्तींनी, देवाच्या क्षमेसाठी विनंती करण्यासोबत आणखी काय करावयास हवे?
१७ कोणतेही गंभीर पाप केल्यामुळे, आपले मन नक्कीच आपल्याला खात राहील आणि पश्चात्तापदग्ध हृदय आपल्याला देवाच्या क्षमेसाठी विनंती करण्यास प्रवृत्त करील. तरीसुद्धा, आपण दुसऱ्यांकरताही प्रार्थना करू या. देवाला स्वीकारयोग्य भक्ती देण्यासाठी दावीद इच्छा करीत होता, तरी स्वार्थीपणाने त्याच्या स्तोत्रामध्ये दुसऱ्यांचा उल्लेख करण्यासाठी तो विसरला नाही. यहोवाला केलेल्या ह्या विनंतीचा त्यात समावेश आहे: “तू प्रसन्न होऊन सीयोनेचे हित कर; यरूशलेमेचे कोट बांधून काढ.”—स्तोत्रसंहिता ५१:१८.
१८. पश्चात्तापी दावीदाने सियोनेसाठी प्रार्थना का केली?
१८ होय, ईश्वरी पसंती पुन्हा मिळविण्याची अपेक्षा दावीदाने केली. त्याशिवाय, ‘देवाने प्रसन्न होऊन सीयोनेचे,’ म्हणजेच इस्राएलची राजधानी, जी यरूशलेम होती तिचे, हित करावे अशी नम्र दावीदाची विनंती होती. तेथेच दावीदाने देवाचे मंदिर बांधण्याची आशा केली होती. दावीदाच्या पापांमुळे संपूर्ण राष्ट्र धोक्यात आले होते, कारण त्याच्या पापांमुळे सर्व लोकांना त्रास सहन करावा लागला असता. (२ शमुवेल, अध्याय २४ पडताळा.) परिणामतः त्याच्या पापांमुळे “यरूशलेमेचे कोट” जणू कमजोर झाले होते म्हणून ते पुन्हा बांधून काढण्याची गरज होती.
१९. आपण गंभीर पाप केलेले पण देवाची क्षमा मिळवलेले असे असलो, तर कशासाठी प्रार्थना करणे उचित ठरेल?
१९ आपण गंभीर पाप केलेले, पण देवाची क्षमा मिळवलेले असे असलो, तर आपल्या वर्तणुकीमुळे झालेले कोणतेही नुकसान दुरूस्त करण्यासाठी प्रार्थना करणे उचित ठरेल. त्याच्या नावावर आपण निंदा आणली असेल, मंडळीला खराब केले असेल, आणि कुटुंबाला दुःखित केले असेल. आपला प्रेमळ स्वर्गीय पिता त्याच्या नावावर आणली गेलेली निंदा काढू शकतो, मंडळीला उभारू शकतो, आणि त्यावर प्रीती करणाऱ्या आणि त्याची सेवा करणाऱ्या आपल्या प्रियजनांच्या हृदयांचे सांत्वन करू शकतो. त्यात पापाचा समावेश असो किंवा नसो, आपण नेहमीच देवाच्या नावाचे पवित्रीकरण आणि त्याच्या लोकांचे कल्याण ह्याची चिन्ता केली पाहिजे.—मत्तय ६:९.
२०. कोणत्या परिस्थितींमध्ये इस्राएलच्या यज्ञांनी आणि अर्पणांनी यहोवा प्रसन्न होणार होता?
२० यहोवाने सीयोनेचे कोट बांधले, तर आणखी काय घडले असते? दावीदाने गायिले: “म्हणजे नीतिमत्वपूर्वक केलेले यज्ञ, होमबलि, निःशेष होमबलि तुला [यहोवा] आवडतील; मग ते तुझ्या वेदीवर गोऱ्हे अर्पितील.” (स्तोत्रसंहिता ५१:१९) यहोवाची स्वीकारयोग्य भक्ती करण्यासाठी त्याने व त्याच्या राष्ट्राने त्याच्या कृपेचा आनंद लुटावा असे दावीदाने मनापासून इच्छिले. मग त्यांच्या होमबलींनी आणि निःशेष होमबलींनी देव प्रसन्न झाला असता. कारण देवाची कृपा उपभोगणाऱ्या समर्पित, प्रामाणिक आणि पश्चात्तापी लोकांकडून अर्पिलेले ते नीतिमत्वतेचे यज्ञ असले असते. त्यांनी यहोवाच्या कृपेच्या कृतज्ञतेमुळे त्याच्या वेदीवर—सर्वोत्तम आणि अधिक महाग असे—गोऱ्हे अर्पिले असते. आपल्याकडे आहे त्यातील अत्युत्तम देऊन आज आपण यहोवाचा सन्मान करतो. आणि आपल्या दयावन्त यहोवा देवाला स्तुतीचे यज्ञ म्हणून “वाणीचे फळ” यांचा समावेश आपल्या अर्पणांमध्ये आहे.—होशेय १४:२; इब्रीकरांस १३:१५.
यहोवा आपल्या निकडीच्या विनंत्या ऐकतो
२१, २२. स्तोत्रसंहिता ५१ मध्ये आपल्या हितासाठी कोणते उपदेश आहेत?
२१ पापांसाठी खऱ्या पश्चात्तापदग्ध आत्म्याने कशी प्रतिक्रिया करावी हे स्तोत्रसंहिता ५१ मध्ये नोंदविलेल्या दावीदाच्या मनःपूर्वक प्रार्थनेद्वारे दिसून येते. या स्तोत्रात आपल्या हितासाठी मार्मिक उपदेशांचा देखील समावेश आहे. उदाहरणार्थ, आपण पाप केलेले पश्चात्तापदग्ध व्यक्ती आहोत तर, देवाच्या कृपेवर आपण विश्वास ठेवू शकतो. तरीपण, प्रथम आपण यहोवाच्या नावावर आणलेल्या कोणत्याही निंदेबद्दल चिंतायुक्त असू या. (वचन १-४) दावीदाप्रमाणे, वारसाने मिळालेल्या पापाच्या आधारावर आपण आपल्या स्वर्गीय पित्याकडे कृपेसाठी विनंती करू शकतो. (वचन ५) आपण प्रामाणिक असले पाहिजे, आणि देवाकडून येणाऱ्या ज्ञानाचा शोध घेतला पाहिजे. (वचन ६) आपण पाप केले असल्यास, यहोवाकडे शुद्धीकरणासाठी, शुद्ध हृदयासाठी आणि खंबीर आत्म्यासाठी विनंती केली पाहिजे.—वचने ७-१०.
२२ आपण स्वतःला पापात निर्ढावलेले बनण्यासाठी कधीही अनुमती देऊ नये हे देखील स्तोत्रसंहिता ५१ मधून आपल्याला दिसून येते. असे केल्यास, यहोवा आम्हावरून त्याचा पवित्र आत्मा किंवा त्याची कार्यकारी शक्ती काढून घेईल. देवाचा आत्मा आम्हावर असता, आम्ही इतरांना त्याच्या मार्गांबद्दल यशस्वीरितीने शिकवू शकतो. (वचने ११-१३) यहोवा भंगलेल्या व चिरडलेल्या हृदयाला कधीही तुच्छ लेखत नाही त्यामुळे आपल्या पापांसाठी पश्चात्ताप केल्यास तो आपल्याला त्याची स्तुती करत राहण्यास अनुमती देईल. (वचने १४-१७) आपल्या प्रार्थना आपल्या पुरत्याच नसाव्यात ह्याबद्दल हे स्तोत्र पुढे दर्शवते. उलटपक्षी, यहोवाच्या शुद्ध भक्तीत गुंतलेल्या सगळ्यांच्या आशीर्वाद आणि आध्यात्मिक कल्याणासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे.—वचने १८, १९.
२३. स्तोत्रसंहिता ५१ ने आम्हाला धैर्यशील आणि आशावादी होण्यासाठी का प्रवृत्त करावे?
२३ दावीदाच्या ह्या हृदयद्रावक स्तोत्राने आम्हाला धैर्यशील आणि आशावादी होण्यासाठी प्रवृत्त करावयास हवे. आम्ही पापात अडखळलो तर परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही हे जाणण्यास ते आम्हाला मदत करते. का बरे? कारण आपण पश्चात्तापी असल्यास यहोवाची कृपा आम्हाला निराशेपासून वाचवू शकते. आपण पश्चात्तापदग्ध आणि आपल्या प्रेमळ स्वर्गीय पित्याला पूर्णपणे वाहिलेले असलो, तर तो कृपेसाठी असलेल्या आपल्या निकडीच्या प्रार्थना ऐकतो. यहोवा भंगलेल्या हृदयास तुच्छ लेखत नाही हे जाणून घेणे किती सांत्वन देणारे आहे!
तुम्ही कसे उत्तर द्याल?
▫ ख्रिश्चनांना शुद्ध हृदय आणि देवाच्या पवित्र आत्म्याची का गरज आहे?
▫ यहोवाच्या कायद्याचा भंग करणाऱ्याला एखादा पश्चात्तापी व्यक्ती काय शिकवू शकतो?
▫ भग्न आणि चिरडलेल्या हृदयाकडे यहोवा कोणत्या दृष्टिकोनाने पाहतो?
▫ स्तोत्रसंहिता ५१ मध्ये कोणते उपदेश मिळतात?
[चित्र]
तुम्ही पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करता का आणि त्याला न दुखवण्याची काळजी घेता का?
[चित्र]
यहोवाचे सत्य घोषित करून त्याच्या अपात्रित कृपेसाठी गुणग्राहकता दाखवा