वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 १२/१ पृ. १०-१४
  • यहोवा, ‘क्षमा करायला तयार असणारा’ देव

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवा, ‘क्षमा करायला तयार असणारा’ देव
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवा “क्षमा करायला तयार” का आहे?
  • यहोवा किती पूर्णपणे क्षमा करतो?
  • “त्यांचे पाप मी यापुढे स्मरणार नाही”
  • परिणामांबद्दल काय?
  • यहोवाने तुम्हाला माफ केलंय यावर विश्‍वास ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • यहोवाची क्षमा—तुमच्यासाठी काय अर्थ होतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • यहोवा क्षमा करायला नेहमी तयार असतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • यहोवाप्रमाणे तुम्ही क्षमा करता का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 १२/१ पृ. १०-१४

यहोवा, ‘क्षमा करायला तयार असणारा’ देव

“हे प्रभू, तू चांगला आहेस आणि क्षमा करायला तयार आहेस.”—स्तोत्र ८६:५, पं.र.भा.

१. कोणते जड ओझे दावीद राजाने वाहिले आणि त्याच्या समस्याग्रस्त हृदयासाठी त्याला कसे सांत्वन मिळाले?

अपराधी विवेकाचा भार किती जड असू शकतो, याची प्राचीन इस्राएलाच्या दावीद राजाला कल्पना होती. त्याने लिहिले: “माझे अपराध माझ्या डोक्यावरून गेले आहेत; जड ओझ्याप्रमाणे ते मला फार भारी झाले आहेत. माझे अंग बधिर झाले आहे व फारच ठेचून गेले आहे; मी आपल्या हृदयातील तळमळीमुळे ओरडत आहे.” (स्तोत्र ३८:४, ८) तथापि, दावीदाला त्याच्या त्रस्त हृदयाकरता सांत्वन प्राप्त झाले. यहोवा पापाचा द्वेष करतो, पण तो पाप करणाऱ्‍याचा—अपराधी व्यक्‍ती खरोखरच पश्‍चात्तापी असल्यास आणि तिने आपला पापी मार्ग सोडून दिला असल्यास तो तिचा द्वेष करत नाही हे दावीदाला माहीत होते. (स्तोत्र ३२:५; १०३:३) पश्‍चात्तापी जनांना दया दाखवण्याच्या यहोवाच्या इच्छेवर पूर्ण विश्‍वास ठेवून दावीदाने असे म्हटले: “हे प्रभू, तू चांगला आहेस आणि क्षमा करायला तयार आहेस.”—स्तोत्र ८६:५, पं.र.भा.

२, ३. (अ) आपण जेव्हा पाप करतो तेव्हा त्याचा परिणाम म्हणून आपण कोणते ओझे वाहू आणि ते हितकारक का आहे? (ब) अपराधामुळे ‘बुडून जाण्यात’ कोणता धोका आहे? (क) यहोवाच्या क्षमा करण्याच्या इच्छेविषयी बायबल आपल्याला कोणती खात्री देते?

२ आपण पाप करतो तेव्हा आपण देखील पापामुळे परिणीत होणाऱ्‍या दुःखमय विवेकाचे भयंकर ओझे वाहत असतो. ही पश्‍चात्तापाची भावना स्वाभाविक आणि हिताची देखील आहे. यामुळे चुका सुधारण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्यास आपल्याला चालना मिळू शकते. तथापि, काही ख्रिस्ती अपराधामुळे अगदी भाराक्रांत झाले आहेत. त्यांच्या आत्म-दोषी हृदयामुळे कदाचित त्यांना नेहमी असे वाटत राहते, की कितीही पश्‍चात्ताप केला तरी देव काही त्यांना पूर्णपणे क्षमा करणार नाही. केलेल्या एका चुकीबद्दल सांगताना एका बहिणीने म्हटले, “यापुढे यहोवा आपल्यावर प्रेम करणार नाही, या विचाराने तुमच्यात जी भावना निर्माण होते ती अगदी भयंकर असते.” या बहिणीने नंतर पश्‍चात्ताप केला आणि मंडळीच्या वडिलांकडून मदतदायक सल्ला स्वीकारला तरी देखील आपण देवाच्या क्षमेला अपात्र आहोत, असे तिला वाटत होते. ती म्हणते: “मी यहोवाकडे क्षमा मागितली नाही, असा एकही दिवस नाही.” अपराधामुळे आपण अगदी ‘बुडून गेलो’ तर सैतान हाच प्रयत्न करील, की आपण हार मानावी आणि यहोवाची सेवा करण्यास आपण पात्र नाही, असा विचार करावा.—२ करिंथकर २:५-७, ११.

३ पण यहोवा निश्‍चितच, बाबींकडे अशा प्रकारे पाहत नाही! त्याचे वचन आपल्याला याची खात्री देते, की आपण खरा मनःपूर्वक पश्‍चात्ताप दाखवल्यास यहोवा क्षमा करण्यास इच्छुक, होय तयार आहे. (नीतिसूत्रे २८:१३) तर मग, देवाची क्षमा मिळवणे तुम्हाला कधी अशक्य वाटल्यास तो का आणि कशी क्षमा करतो हे अधिक चांगल्यारीतीने समजून घेणे तुमच्यासाठी आवश्‍यक ठरेल.

यहोवा “क्षमा करायला तयार” का आहे?

४. आपल्या प्रकृतीविषयी यहोवा काय स्मरणात ठेवतो आणि आपल्यासोबतच्या त्याच्या व्यवहारावर याचा कसा परिणाम होतो?

४ आपण वाचतो: “पश्‍चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत. जसा बाप आपल्या मुलांवर ममता [“दया,” NW] करितो, तसा परमेश्‍वर आपले भय धरणाऱ्‍यांवर ममता [दया] करितो.” यहोवा दया दाखविण्यास इच्छुक का आहे? त्यानंतरचे वचन उत्तर देते: “कारण तो आमची प्रकृति जाणतो; आम्ही केवळ माती आहो हे तो आठवितो.” (स्तोत्र १०३:१२-१४) होय, आपली निर्मिती मातीपासून झाली आहे, अपरिपूर्णतेमुळे आपल्यात दोष किंवा कमतरता आहेत, हे यहोवा कधीही विसरत नाही. त्याला ‘आपली प्रकृती’ माहीत आहे, ही अभिव्यक्‍ती आपल्याला या गोष्टीची आठवण करून देते, की बायबल यहोवाची तुलना एखाद्या कुंभाराशी आणि आपली तुलना तो घडवत असलेल्या भांड्यांशी करते.a (यिर्मया १८:२-६) कुंभार त्याची मातीची भांडी मजबूतपणे आणि तरीही नाजूकपणे हाताळतो कारण त्याला त्या भांड्यांची घडण माहीत असते. त्याचप्रमाणे महान कुंभार अर्थात यहोवा देखील आपल्या सर्वांच्या दोषी आणि पापमय स्वभावाची जाण ठेवून आपल्याशी व्यवहार करतो.—पडताळा २ करिंथकर ४:७.

५. रोमकरांना लिहिलेले पुस्तक आपल्या पतित शरीरावर असलेल्या पापाच्या जबरदस्त पकडीविषयी कसे वर्णन करते?

५ पाप किती गंभीर आहे, हे यहोवाला समजते. मानवावर पूर्णपणे पकड असलेली एक प्रबळ शक्‍ती, असे पापाचे वर्णन शास्त्रवचनांत करण्यात आले आहे. पापाची पकड किती मजबूत आहे? प्रेरणा झालेला प्रेषित पौल, रोमकरांना लिहिलेल्या पुस्तकात याचे हुबेहूब वर्णन करतो: सैनिक जसे कमांडरला वश असतात त्याप्रमाणे आपण “पापवश” आहोत (रोमकर ३:९); राजाप्रमाणे पापाने मानवजातीवर “राज्य केले” आहे (रोमकर ५:२१); ते आपल्यामध्ये ‘वसते’ किंवा “राहत” आहे (NW) (रोमकर ७:१७, २०); आपल्यावर नियंत्रण राखता यावे या उद्देशाने त्याचा “नियम” आपल्यामध्ये सतत कार्यरत असतो. (रोमकर ७:२३, २५) आपल्या पतित शरीरावर असलेल्या पापाच्या जबरदस्त पकडीला विरोध करण्याचा किती कठीण संघर्ष आपल्याला करायचा आहे!—रोमकर ७:२१, २४.

६. अनुतापी हृदयाने दयेची मागणी करणाऱ्‍यांकडे यहोवा कोणत्या दृष्टीने पाहतो?

६ यास्तव, आपल्याला कितीही मनापासून वाटले तरी परिपूर्ण आज्ञाधारकपणा दाखवणे आपल्याला शक्य नाही, हे आपल्या दयावान देवाला ठाऊक आहे. (१ राजे ८:४६) तो प्रेमळपणे आपल्याला याची खात्री देतो, की आपण अनुतापी हृदयाने त्याच्या पितृतुल्य दयेची मागणी केल्यास, तो आपल्याला नक्की क्षमा करील. स्तोत्रकर्त्या दावीदाने म्हटले: “देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा; हे देवा, भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस.” (स्तोत्र ५१:१७) अपराधाच्या ओझ्यामुळे भग्न आणि अनुतप्त झालेले हृदय यहोवा कधीही त्यागणार नाही किंवा त्याकडे पाठ फिरवणार नाही. क्षमा करण्याच्या यहोवाच्या तत्परतेचे किती सुंदर वर्णन!

७. आपण देवाच्या दयेचा गैरफायदा का घेऊ शकत नाही?

७ तथापि, पाप करण्याकरता आपल्या पापमय प्रवृत्तीस सबब बनवून आपण देवाच्या दयेचा गैरफायदा घेऊ शकतो, असा याचा अर्थ होतो का? निश्‍चितच नाही! यहोवा केवळ भावनांच्या आधारावर चालत नाही. त्याच्या दयेला मर्यादा आहेत. पाषाणहृदयी होऊन कोणत्याही पश्‍चात्तापाविना आकसखोर, मुद्दाम पाप करत राहणाऱ्‍यांना तो कोणत्याही प्रकारे क्षमा करणार नाही. (इब्री लोकांस १०:२६-३१) दुसऱ्‍या बाजूला पाहता, यहोवा “भग्न व अनुतप्त” हृदय पाहतो तेव्हा तो “क्षमा करायला तयार” असतो. (नीतिसूत्रे १७:३) ईश्‍वरी क्षमा किती संपूर्ण असते, याविषयी बायबलमध्ये वापरण्यात आलेल्या बोधक भाषेचा आपण विचार करू या.

यहोवा किती पूर्णपणे क्षमा करतो?

८. यहोवा आपल्या पातकांची क्षमा करतो तेव्हा तो परिणाम म्हणून काय करतो आणि याचा आपल्यावर कोणता परिणाम होण्यास हवा?

८ पश्‍चात्तापी दावीद राजाने म्हटले: “मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले; मी आपली अनीति लपवून ठेविली नाही; मी आपले अपराध परमेश्‍वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पापदोषाची क्षमा केली.” (तिरपे वळण आमचे.) (स्तोत्र ३२:५) “क्षमा” ही अभिव्यक्‍ती अशा हिब्रू शब्दाचे भाषांतर आहे ज्याचा मूलभूत अर्थ “काढून टाकणे,” “सहन करणे, वाहून नेणे,” असा होतो. या शब्दाचा येथे करण्यात आलेला वापर ‘अपराध, पाप, पातक दूर करण्याला’ सूचित करतो. म्हणून यहोवाने दावीदाची पातके काढून टाकली तसेच ती दूर देखील केली. (पडताळा लेवीय १६:२०-२२.) यामुळे, दावीद ज्या अपराधीपणाच्या भावना वागवत होता त्या मोकळ्या झाल्या हे मात्र नक्की. (पडताळा स्तोत्र ३२:३.) येशू ख्रिस्ताच्या खंडणी यज्ञार्पणावर विश्‍वास ठेवून क्षमेची याचना करणाऱ्‍या लोकांना क्षमा करणाऱ्‍या देवावर आपण देखील पूर्ण विश्‍वास ठेवू शकतो. (मत्तय २०:२८; पडताळा यशया ५३:१२.) अशा प्रकारे यहोवा ज्या लोकांची पातके काढून टाकतो आणि दूर करतो तेव्हा त्यांना भूतकाळातील पातकांबद्दलच्या अपराधी भावनांचे ओझे वाहण्याची आणखीन गरज राहत नाही.

९. “आमची ऋणे आम्हास सोड,” या येशूच्या शब्दांचा काय अर्थ आहे?

९ यहोवा कशी क्षमा करतो हे दाखविण्यासाठी येशूने धनको आणि ऋणको यांमधील संबंधाचा उपयोग केला. उदाहरणार्थ, येशूने आपल्याला अशा प्रकारे प्रार्थना करण्यास सांगितले: “आमची ऋणे आम्हास सोड.” (मत्तय ६:१२) येशूने अशा प्रकारे ‘पातकांची’ तुलना “ऋणे” याबरोबर केली. (लूक ११:४) आपण जेव्हा पाप करतो तेव्हा आपण यहोवाचे ‘ऋणको’ होतो. “क्षमा” या भाषांतरीत ग्रीक क्रियापदाचा अर्थ “ऋणाची कोणतीही मागणी न करता ते सोडून देणे, त्यागणे,” असा होऊ शकतो. म्हणजेच, यहोवा क्षमा करतो तेव्हा तो आपले ऋण रद्द करतो तसे नसते तर ते आपल्या खात्यातून वसूल करण्यात आले असते. अशा प्रकारे पश्‍चात्तापी पातकी सांत्वन प्राप्त करू शकतात. रद्द केलेल्या ऋणाची यहोवा कधीही परतफेड मागणार नाही!—स्तोत्र ३२:१, २; पडताळा मत्तय १८:२३-३५.

१०, ११. (अ) प्रेषितांची कृत्ये ३:१९ येथे वापरण्यात आलेल्या ‘पुसून टाकणे’ या अभिव्यक्‍तीचे हुबेहूब वर्णन कोणते आहे? (ब) यहोवाच्या क्षमाशीलतेच्या परिपूर्णतेचे वर्णन कशा प्रकारे करण्यात आले आहे?

१० देवाच्या क्षमाशीलतेचे वर्णन करण्यासाठी बायबलमध्ये प्रेषितांची कृत्ये ३:१९ येथे आणखी एक हुबेहूब रूपक वापरण्यात आले आहे: “तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्‍चात्ताप करा व वळा.” ‘पुसून टाकणे’ हा शब्दप्रयोग एका ग्रीक क्रियापदाचे भाषांतर आहे, जेव्हा त्याचा लाक्षणिक अर्थाने वापर करण्यात येतो तेव्हा त्याचा अर्थ “मिटणे, घालविणे, रद्द करणे किंवा नाश करणे,” असा होऊ शकतो. काही विद्वानांच्या मते व्यक्‍त करण्यात आलेली संकल्पना, हस्तलिखित खोडणे अशी आहे. ते कसे? प्राचीन काळात सामान्यपणे वापरण्यात येणारी शाई कार्बन, डिंक आणि पाणी यांच्या मिश्रणाने तयार करण्यात येत असे. या शाईने लिहिल्यानंतर लगेचच, एखादी व्यक्‍ती ओला स्पंज घेऊन लिहिलेला मजकूर मिटवू शकत असे.

११ यहोवाच्या क्षमाशीलतेच्या परिपूर्णतेचे ते सुंदर चित्र आहे. आपल्या पातकांची क्षमा करतेवेळी तो जणू स्पंज घेऊन आपली पातके मिटवत असतो. तो अशा प्रकारची पातके भवितव्यातही राखून ठेवील, असे भय वाटण्याची काहीएक आवश्‍यकता नाही कारण बायबल यहोवाच्या दयेविषयी आणखी काही प्रकट करते जे खरोखरच विलक्षण आहे: तो क्षमा करतो, आणि पातकांना विसरतोही!

“त्यांचे पाप मी यापुढे स्मरणार नाही”

१२. यहोवा जेव्हा क्षमा करतो असे बायबल म्हणते तेव्हा त्याला पातके पुन्हा आठवता येत नाहीत, असा याचा अर्थ होतो का आणि तुम्ही तसे उत्तर का देता?

१२ यिर्मया संदेष्ट्याद्वारे यहोवाने नवीन करारामध्ये असलेल्यांकरता अभिवचन दिले: “मी त्यांच्या अधर्माची क्षमा करीन, त्यांचे पाप मी यापुढे स्मरणार नाही.” (यिर्मया ३१:३४) यहोवा जेव्हा क्षमा करतो तेव्हा त्याला पातके पुन्हा आठवता येत नाहीत, असा याचा अर्थ होतो का? निश्‍चितच नाही. यहोवाने क्षमा केलेल्या अनेक लोकांच्या आणि दावीदाच्याही पातकांविषयी बायबल आपल्याला सांगते. (२ शमुवेल ११:१-१७; १२:१-१३) त्यांनी केलेल्या चुकांची यहोवाला अद्यापही जाण आहे आणि आपल्याला देखील ती असली पाहिजे. त्यांच्या पातकांचा तसेच त्यांच्या पश्‍चात्तापाचा आणि देवाद्वारे त्यांना क्षमा केल्याचा अहवाल आपल्या हितासाठी जतन करून ठेवण्यात आला आहे. (रोमकर १५:४) तर मग, यहोवा ज्यांना क्षमा करतो त्यांची पातके तो ‘स्मरणात’ ठेवत नाही, असे जेव्हा बायबल म्हणते तेव्हा त्याचा काय अर्थ होतो?

१३. (अ) “मी यापुढे स्मरणार” या हिब्रू क्रियापदाच्या अर्थामध्ये काय समाविष्ट आहे? (ब) “त्यांचे पाप यापुढे मी स्मरणार नाही,” असे यहोवा म्हणतो तेव्हा तो आपल्याला कोणत्या गोष्टीची हमी देत असतो?

१३ “मी यापुढे स्मरणार” हे हिब्रू क्रियापद केवळ भूतकाळ आठवण्याला सूचवत नाही. थिऑलॉजिकल वर्डबुक ऑफ द ओल्ड टेस्टामेंट यानुसार “उचित कार्य करण्यासाठी जादा सूचितार्थ” याचा त्या क्रियापदात समावेश होतो. तर मग, या ठिकाणी पाप ‘स्मरण’ करणे यात पातक्यांच्या विरोधात कार्य करणे समाविष्ट आहे. भरकटलेल्या इस्राएल लोकांच्या संदर्भात होशेय संदेष्ट्याने असे म्हटले, “तो [यहोवा] त्यांचा अधर्म स्मरतो,” तेव्हा त्या संदेष्ट्याचा म्हणण्याचा असा अर्थ होता, की पश्‍चात्तापाच्या उणिवेमुळे यहोवा इस्राएल लोकांविरुद्ध कार्यवाही करणार होता. अशा प्रकारे, त्या वचनाचा उर्वरित भाग म्हणतो: “तो त्यांच्या पापांचे प्रतिफळ देतो.” (होशेय ९:९) दुसऱ्‍या बाजूला पाहता, यहोवा म्हणतो, “त्यांचे पाप यापुढे मी स्मरणार नाही,” तो आपल्याला या गोष्टीची हमी देतो, की यहोवा जेव्हा पश्‍चात्तापी पातक्याला क्षमा करतो, तेव्हा केलेल्या पातकांमुळे तो सदर व्यक्‍तीच्या विरोधात भवितव्यात कोणतीही कार्यवाही करणार नाही. (यहेज्केल १८:२१, २२) तो अशाप्रकारे विसरतो, म्हणजेच आपल्याला वारंवार खिजवण्यासाठी किंवा शिक्षा करण्यासाठी तो आपल्याला आपल्या पातकांचे पुन्हा पुन्हा स्मरण करून देत नाही. असे करण्याद्वारे इतरांसोबतच्या आपल्या व्यवहारांत अनुकरण करण्यासाठी यहोवा आपल्याकरता एक उत्तम उदाहरण मांडतो. मतभेद होतात तेव्हा केलेल्या चुका न उकरणे उत्तम आहे, ज्या तुम्ही गतकाळात क्षमा करण्याच्या ठरवल्या होत्या.

परिणामांबद्दल काय?

१४. पश्‍चात्तापी व्यक्‍ती तिच्या चुकीच्या कार्यामुळे होणाऱ्‍या परिणामांपासून मुक्‍त होते, असा क्षमेचा अर्थ का होत नाही?

१४ पश्‍चात्तापी व्यक्‍ती तिच्या चुकीच्या कार्यामुळे होणाऱ्‍या सर्व परिणामापासून मुक्‍त होते, असा यहोवाच्या क्षमा करण्याच्या तत्परतेचा अर्थ होतो का? निश्‍चितच नाही. आपण पाप केले म्हणजे आपल्याला शिक्षा ही होणारच. पौलाने लिहिले: “माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल.” (गलतीकर ६:७) आपल्या कार्यांमुळे किंवा समस्यांमुळे आपल्याला काही परिणामांना तोंड द्यावे लागेल, पण यहोवाने एकदा क्षमा केल्यानंतर तो आपल्यावर येणाऱ्‍या विपत्तीस कारणीभूत ठरत नाही. संकटे येतात तेव्हा ख्रिस्ती व्यक्‍तीने असा विचार करता कामा नये की, ‘भूतकाळातील माझ्या पातकांबद्दल कदाचित यहोवा मला शिक्षा देत असावा.’ (पडताळा याकोब १:१३.) दुसऱ्‍या बाजूला पाहता, आपल्या चुकीच्या कार्यांमुळे होणाऱ्‍या सर्व परिणामांपासून यहोवा आपला बचाव करत नाही. घटस्फोट, नको असलेली गर्भधारणा, लैंगिकरीत्या होणारे संक्रमित आजार, विश्‍वास किंवा आदर गमावणे—हे सर्व पातकाचे वाईट परिणाम असू शकतात आणि यहोवा या परिणामांपासून आपला बचाव करणार नाही. हे लक्षात असू द्या, की यहोवाने दावीदाला त्याच्या बथशेबा आणि उरीया यांच्यासंबंधाने केलेल्या पातकांबद्दल क्षमा केली तरी त्यानंतरच्या संकटमय परिणामांपासून त्याने दावीदाचे संरक्षण केले नाही.—२ शमुवेल १२:९-१४.

१५, १६. लेवीय ६:१-७ येथे नमूद केलेला नियम फसवणूक होणाऱ्‍याला आणि फसवणूक करणाऱ्‍यांना कशा प्रकारे लाभदायक ठरत असे?

१५ आपल्या पातकांचे इतर देखील परिणाम असू शकतात. उदाहरण म्हणून लेवीय अध्याय ६ येथील अहवालाचा विचार करा. येथे मोशेचे नियमशास्त्र अशा परिस्थितीविषयी सांगते जेव्हा एखादा माणूस सहइस्राएलाची मालमत्ता लुबाडून, फसवणूक किंवा लबाडी करून बळकावण्याद्वारे गंभीर पातक करतो. पाप करणारी व्यक्‍ती आपण दोषी असल्याचे अमान्य करते इतकेच नव्हे तर कोडगेपणाने खोटी शपथ देखील घेते. यावेळी एका व्यक्‍तीचे शब्द दुसऱ्‍या व्यक्‍तीच्या विरोधात असतात. तथापि, नंतर दोषी व्यक्‍तीला आपल्या पातकाबद्दल खेद वाटतो आणि ती आपले पाप कबूल करते. देवाची क्षमा प्राप्त करण्याकरता त्या व्यक्‍तीला तीन गोष्टी करायच्या आहेत: जे काही घेतले होते ते परत करणे, फसविलेल्या व्यक्‍तीला २० टक्के दंड देणे आणि दोषार्पण म्हणून एक मेंढा अर्पण करणे. नंतर हा नियम असे म्हणतो: “याजकाने . . . परमेश्‍वरासमोर त्याच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे, म्हणजे . . . त्याला क्षमा होईल.”—लेवीय ६:१-७; पडताळा मत्तय ५:२३, २४.

१६ हा नियम देवाने केलेली दयाळू तरतूद होती. या नियमामुळे फसवणूक झालेल्या व्यक्‍तीला लाभ होत असे कारण तिची मालमत्ता तिला परत मिळत असे तसेच अखेरीस दोषी व्यक्‍ती आपले पाप मान्य करते तेव्हा देखील फसवणूक झालेल्या व्यक्‍तीला निश्‍चितच खूप हायसे वाटत असे. त्याचवेळी या नियमामुळे अशा व्यक्‍तीला देखील लाभ होत असे जिचा विवेक अखेरीस आपले पाप कबूल करण्यास आणि चूक सुधारण्यास प्रेरित करीत असे. खरोखरच, त्या व्यक्‍तीने तसे केले नसते तर देवाची क्षमा तिला प्राप्त झाली नसती.

१७. आपल्या पातकांमुळे इतरांना इजा पोहंचते तेव्हा आपण काय करावे, अशी अपेक्षा यहोवा आपल्याकडून करतो?

१७ आपण मोशेच्या नियमशास्त्राच्या अधीन नसलो तरी त्यामुळे आपल्याला यहोवाच्या मनाची तसेच क्षमेच्या बाबतीत त्याच्या विचारसरणीची मौल्यवान सूक्ष्मदृष्टी प्राप्त होते. (कलस्सैकर २:१३, १४) आपल्या पातकांमुळे इतरांना इजा पोहंचते किंवा फसवणूक होते तेव्हा ‘दोषनिवारणासाठी’ आपण आपल्या परीने प्रयत्न करतो तेव्हा यहोवाला नक्कीच आनंद होतो. (२ करिंथकर ७:११) आपले पाप स्वीकारणे, आपला दोष मान्य करणे इतकेच नव्हे तर क्षती पोहंचलेल्याची माफी मागणे देखील यात समाविष्ट आहे. त्यानंतर मात्र आपण यहोवाला येशूच्या यज्ञार्पणाच्या आधारावर अपील करू शकतो तसेच शुद्ध विवेक राखल्याचा आणि आपल्याला देवाने क्षमा केल्याच्या खात्रीचा अनुभव घेऊ शकतो.—इब्री लोकांस १०:२१, २२.

१८. यहोवाच्या क्षमेसोबत कोणती शिस्त मिळू शकते?

१८ प्रेमळ पालकाप्रमाणे, यहोवा क्षमा करील तसेच त्यासोबत शिस्तही लावील. (नीतिसूत्रे ३:११, १२) पश्‍चात्तापी ख्रिस्ती व्यक्‍तीला वडील, सेवा सेवक किंवा पायनियर या नात्याने सेवा करण्याचा विशेषाधिकार गमवावा लागेल. स्वतःसाठी मौल्यवान असलेले विशेषाधिकार काही काळाकरता गमावणे त्या व्यक्‍तीकरता दुःखमय असेल. तथापि, त्या व्यक्‍तीवर यहोवाची कृपापसंती नाही किंवा यहोवाने तिला क्षमा केली नाही, असा त्या शिस्तीचा अर्थ कदापि होत नाही. याशिवाय, आपण हे देखील लक्षात ठेवले पाहिजे, की यहोवापासून मिळणारी शिस्त तो आपल्यावर प्रेम करत असल्याचा पुरावा आहे. ती शिस्त स्वीकारणे आणि तिचा अवलंब करणे आपल्याच हिताकरता आहे आणि त्यामुळे आपल्याला सार्वकालिक जीवन मिळू शकते.—इब्री लोकांस १२:५-११.

१९, २०. (अ) तुम्ही चुका केल्या असल्यास, तुम्हाला यहोवाची दया प्राप्त होऊ शकणार नाही असे तुम्ही का समजता कामा नये? (ब) पुढील लेखात कोणत्या गोष्टीची चर्चा करण्यात येईल?

१९ “क्षमा करायला तयार” असणाऱ्‍या देवाची आपण सेवा करतो हे जाणणे किती तजेला देणारे आहे! यहोवा आपली पातके आणि चुकाच पाहत नाही. (स्तोत्र १३०:३, ४) आपल्या हृदयांत काय आहे, हे त्याला माहीत आहे. गतकाळातील चुकांमुळे तुमचे हृदय भग्न व अनुतप्त असल्याचे तुम्हाला वाटत असल्यास, आपल्याला आता यहोवाची दया प्राप्त होऊ शकणार नाही, असा निष्कर्ष तुम्ही काढू नका. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या चुका केल्या असल्या, पण तुम्ही खरोखरच पश्‍चात्ताप केला, चूक सुधारण्यासाठी प्रयत्न केला आणि येशूने सांडलेल्या रक्‍ताच्या आधारावर यहोवाच्या क्षमेसाठी मनःपूर्वक याचना केली तर १ योहान १:९ येथील शब्द तुम्हाला लागू होतात, असा आत्मविश्‍वास तुम्ही बाळगू शकता: “जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्‍वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील.”

२० आपल्या एकमेकांसोबतच्या व्यवहारांत आपण यहोवाच्या क्षमेचे अनुकरण करण्याचे बायबल आपल्याला उत्तेजन देते. तथापि, आपल्याविरुद्ध इतर जण पाप करतात तेव्हा क्षमा करण्याच्या आणि विसरण्याच्या बाबतीत आपल्याकडून कितपत अपेक्षा केली जाऊ शकते? याची चर्चा पुढील लेखात करण्यात येईल.

[तळटीप]

a मनोरंजक गोष्ट म्हणजे, ‘आपली प्रकृती’ याकरता जो हिब्रू शब्द वापरण्यात आला आहे तो कुंभाराद्वारे बनविण्यात येणाऱ्‍या मातीच्या भांड्याशी संबंधित आहे.—यशया २९:१६.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

◻ यहोवा “क्षमा करायला तयार” का आहे?

◻ बायबल यहोवाच्या क्षमाशीलतेच्या परिपूर्णतेचे कसे वर्णन करते?

◻ यहोवा क्षमा करतो तेव्हा तो कोणत्या अर्थाने चुकांना विसरतो?

◻ आपल्या पातकांमुळे इतरांना इजा पोहंचली असल्यास यहोवा आपल्याकडून कोणती अपेक्षा करतो?

[१२ पानांवरील चित्र]

आपल्या पातकांमुळे इतरांना इजा पोहंचली असल्यास, आपण भरपाई करून द्यावी अशी यहोवा आपल्याकडून अपेक्षा करतो

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा