वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w00 १/१५ पृ. २३-२६
  • यहोवाच्या जवळ या

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाच्या जवळ या
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • प्रेमळ-दया व सत्यता प्रकट करा
  • यहोवावर पूर्ण भरवसा ठेवणे
  • यहोवाला उत्तम ते द्या
  • यहोवाकडून येणारे ताडन स्वीकारा
  • बुद्धी आणि समज यांना धरून राहा
  • जे चांगले ते करा
  • ईश्‍वरी भय उत्पादित करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • यहोवावर भाव ठेवा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • नीतिसूत्रे पुस्तकातील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • ‘यहोवा बुद्धी देतो’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
w00 १/१५ पृ. २३-२६

यहोवाच्या जवळ या

“देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल,” असे शिष्य याकोबाने लिहिले. (याकोब ४:८) “परमेश्‍वराचे सख्य त्याचे भय धरणाऱ्‍याशी असते,” असे स्तोत्रकर्त्याने गायिले. (स्तोत्र २५:१४) यावरून, आपल्याबरोबर जवळीक साधावी हीच यहोवाची इच्छा आहे हे स्पष्ट होते. परंतु, देवाची उपासना करणाऱ्‍या व त्याच्या नियमांचे पालन करणाऱ्‍या सर्वांनाच त्याच्या समीप असल्यासारखे वाटत नाही.

तुम्हाला काय वाटते? तुमचा देवाबरोबर जवळचा संबंध आहे का? तुम्हाला त्याच्या जवळ जायला नक्कीच आवडेल. पण आपण ही जवळीक कशी साधू शकतो? जवळीक साधण्याचा काय अर्थ होतो? बायबलमधील नीतिसूत्रे पुस्तकाचा तिसरा अध्याय याचे उत्तर देते.

प्रेमळ-दया व सत्यता प्रकट करा

प्राचीन इस्राएल राष्ट्राचा राजा शलमोन नीतिसूत्रे पुस्तकाच्या तिसऱ्‍या अध्यायाची सुरवात या शब्दांनी करतो: “माझ्या मुला, माझे धर्मशास्त्र विसरू नको, तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागोत; कारण त्यांपासून दीर्घ आयुष्य, वयोवृद्धि व कल्याण [शांती] ही तुला प्राप्त होतील.” (नीतिसूत्रे ३:१, २) शलमोनाने ईश्‍वरप्रेरणेने हे लिहिले असल्यामुळे एका प्रेमळ पित्याप्रमाणे हा सल्ला थेट यहोवा देवाने आपल्याला दिला आहे. देवाच्या स्मरणिका अर्थात बायबलमध्ये लिहून ठेवण्यात आलेले त्याचे नियम किंवा त्याच्या शिकवणी व आज्ञा यांचे पालन करण्याचा सल्ला आपल्याला देण्यात आला आहे. असे केल्यास, आपल्याला “दीर्घ आयुष्य, वयोवृद्धि व कल्याण [शांती]” प्राप्त होईल. आपल्याला आता शांतिमय जीवन जगता येईल व बहुतेक वेळा पापी लोकांवर ज्या गोष्टींमुळे अकाली मृत्यू ओढावतो त्या सर्व गोष्टींपासून आपल्याला दूर राहता येईल. शिवाय, आपल्याला शांतिमय नवीन जगातील सार्वकालिक जीवनाची आशा देखील प्राप्त होईल.—नीतिसूत्रे १:२४-३१; २:२१, २२.

पुढे शलमोन म्हणतो: “[प्रेमळ] दया व सत्य ही तुला न सोडोत; त्यांची माळ तू आपल्या गळ्यात वागीव; त्यांस आपल्या हृत्पटलावर लिहून ठेव; म्हणजे तुला देव व मनुष्य यांजकडून, अनुग्रह व सुकीर्ति ही प्राप्त होतील.”—नीतिसूत्रे ३:३, ४.

“प्रेमळ-दया” यासाठी असलेल्या मूळ भाषेतील शब्दाचे भाषांतर कधीकधी “एकनिष्ठ प्रीती” असेही करण्यात आले आहे; व इमानीपणा, दृढ ऐक्य व एकनिष्ठपणा असाही त्या मूळ शब्दाचा अर्थ होतो. कोणत्याही परिस्थितीत यहोवाला जडून राहण्यास आपण दृढनिश्‍चयी आहोत का? सहविश्‍वासूंबरोबरच्या आपल्या नातेसंबंधात आपण प्रेमळ-दया व्यक्‍त करतो का? आपण त्यांच्यासोबत चांगले संबंध टिकवण्याचा प्रयत्न करतो का? त्यांच्याबरोबर दैनंदिन व्यवहार करताना, आणि तेही आणीबाणीच्या प्रसंगी देखील आपल्या ‘जिव्हेवर दयेचे शिक्षण’ असते का?—नीतिसूत्रे ३१:२६.

विपुल प्रमाणात प्रेमळ-दया दाखवणारा यहोवा नेहमी ‘क्षमा करण्यास तत्पर’ आहे. (स्तोत्र ८६:५) आपल्या मागील पापांबद्दल आपण पश्‍चात्ताप करून सरळ मार्गाने चालू लागतो तेव्हा यहोवाकडून आपल्याला “विश्रांतीचे समय” येतील ही खात्री आपण बाळगू शकतो. (प्रेषितांची कृत्ये ३:१९) तेव्हा इतरांच्या चुका क्षमा करण्याद्वारे आपण आपल्या देवाचे अनुकरण करू नये का?—मत्तय ६:१४, १५.

यहोवा “सत्यस्वरूप” देव आहे आणि त्याच्याशी जवळीक साधणाऱ्‍यांनी “सत्य” असावे अशी तो त्यांच्याकडून अपेक्षा करतो. (स्तोत्र ३१:५) ख्रिश्‍चनांबरोबर असताना एकप्रकारे आणि त्यांच्यापाठीमागे ‘कपटी लोकांप्रमाणे’ असे दुहेरी जीवन आपण जगलो तर यहोवा आपला मित्र होईल अशी आपण अपेक्षा तरी करू शकतो का? (स्तोत्र २६:४) असे दुहेरी जीवन जगणे किती मूर्खपणाचे ठरेल कारण यहोवाच्या “दृष्टीला सर्व उघडे व प्रगट” आहे.—इब्री लोकांस ४:१३.

प्रेमळ-दया आणि सत्यता या गुणांना आपण गळ्याभोवती असलेल्या एखाद्या मौल्यवान हाराप्रमाणे लेखले पाहिजे; कारण यांमुळे आपण “देव व मनुष्य यांजकडून, अनुग्रह व सुकीर्ति” प्राप्त करू शकतो. आपण फक्‍त वरकरणी हे गुण दाखवू नयेत तर ते आपण “आपल्या हृत्पटलावर लिहून” ठेवले पाहिजेत, त्यांना आपल्या व्यक्‍तिमत्त्वाचा अविभाज्य भाग बनवले पाहिजे.

यहोवावर पूर्ण भरवसा ठेवणे

सुज्ञ राजा पुढे म्हणतो: “तू आपल्या सर्व हृदयाने यहोवाच्या ठायी भरवसा ठेव; आपल्याच बुद्धीवर ठेवू नको; तू आपल्या सर्व मार्गांत त्याला ओळख, म्हणजे तो तुझ्या वाटा नीट करील.”—नीतिसूत्रे ३:५, ६, पं.र.भा.

आपण यहोवावर नक्कीच पूर्ण भरवसा ठेवू शकतो. निर्माणकर्ता या नात्याने तो “महासमर्थ” आणि “प्रबळ” शक्‍तीचा स्रोत आहे. (यशया ४०:२६, २९) तो जे काही उद्देशितो ते तो सफल करतो. त्याच्या नावाचा शब्दशः अर्थच “तो व्हावयास कारणीभूत ठरतो,” असा आहे आणि म्हणूनच तो जे वचन देतो ते पूर्ण करण्याची ताकत त्याच्याजवळ आहे हा आपला भरवसा आणखी वाढतो. “खोटे बोलणे देवाला अशक्य” असल्यामुळे तो सत्याचा परमोच्च आदर्श आहे. (इब्री लोकांस ६:१८) प्रेम हा त्याचा प्रमुख गुण आहे. (१ योहान ४:८) तो “सर्व मार्गांत न्यायी आहे, तो आपल्या सर्व कृत्यांत दयाळू आहे.” (स्तोत्र १४५:१७) आपण देवावर नाही तर इतर कोणावर भरवसा ठेवणार? पण त्याच्यावर भरवसा ठेवण्यास शिकण्याकरता आधी आपल्याला, आपण बायबलमधून जे काही शिकतो ते आपल्या जीवनात लागू करून व याद्वारे जे चांगले फळ उत्पन्‍न होते त्यावर मनन करून आपण तो “किती चांगला आहे ह्‍याचा अनुभव” घेतला पाहिजे.—स्तोत्र ३४:८.

आपल्याला ‘सर्व मार्गांत यहोवाची ओळख’ कशी करता येईल? ईश्‍वरप्रेरणेने स्तोत्रकर्ता पुढे म्हणतो: “मी तुझ्या सर्व कृत्यांचे मननहि करीन आणि तुझ्या महत्कृत्यांचा विचार करीन.” (स्तोत्र ७७:१२) आपण देवाला पाहू शकत नसल्यामुळे, त्याच्या महत्कृत्यांवर आणि गतकाळात आपल्या लोकांबरोबर त्याने केलेल्या व्यवहारांवर मनन केल्यानेच आपण त्याच्याशी जवळीक साधू शकतो.

यहोवाशी ओळख करण्याचा आणखी एक मार्ग आहे प्रार्थना. राजा दावीदाने “दिवसभर” यहोवाला प्रार्थना केली. (स्तोत्र ८६:३) तो रानावनात भटकत होता तेव्हा बहुतेकदा रात्रीच्या वेळी प्रार्थना करीत असे. (स्तोत्र ६३:६, ७) “सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा,” असे प्रेषित पौलाने आपल्याला आर्जवले आहे. (इफिसकर ६:१८) आपण कितींदा प्रार्थना करतो? देवाबरोबर मनमोकळेपणाने बोलायला आपल्याला आवडते का? आपल्यासमोर जेव्हा एखादा बिकट प्रसंग येतो तेव्हा आपण त्याच्याकडे मदतीची याचना करतो का? महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याआधी आपण प्रार्थनेद्वारे त्याचे मार्गदर्शन मिळवण्याचा प्रयत्न करतो का? आपण केलेल्या मनापासूनच्या प्रार्थना त्याला आवडतात. आणि तो आपल्या प्रार्थना ऐकेल आणि आपल्या ‘वाटा नीट करील’ हा भरवसा आपण बाळगू शकतो.

यहोवावर पूर्ण भरवसा ठेवता येणे शक्य असताना, ‘आपल्याच बुद्धीवर’ किंवा जगाच्या प्रमुख लोकांवर भरवसा ठेवणे किती मूर्खपणाचे ठरेल! शलमोन म्हणतो: “तू आपल्या दृष्टीने स्वतःस शहाणा समजू नको.” तर “परमेश्‍वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा. हे तुझ्या देहाला आरोग्य व हाडांना सत्व असे होईल.” (नीतिसूत्रे ३:७, ८) देवाला नाराज न करण्याच्या हितकारक भयाचे आपल्या कार्यांवर, विचारांवर आणि भावनांवर वर्चस्व असले पाहिजे. अशाप्रकारचे आदरयुक्‍त भय आपल्याला वाईट कामे करण्यापासून परावृत्त करते; हे भय आध्यात्मिकरीत्या आपल्याला बरे करते व तजेला देते.

यहोवाला उत्तम ते द्या

आणखी कोणत्या मार्गांनी आपण देवाच्या समीप जाऊ शकतो? “तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्‍नाच्या प्रथम फळाने परमेश्‍वराचा सन्मान कर,” असा सल्ला राजा शलमोन देतो. (नीतिसूत्रे ३:९) यहोवाचा सन्मान करण्याचा अर्थ, त्याला उच्च मानणे व त्याचे नाव घोषित करण्याच्या कार्यात भाग घेऊन व पाठिंबा देऊन त्याला उंचावणे. आपला वेळ, आपली कौशल्ये, आपली शक्‍ती आणि आपली भौतिक संपत्ती, या सर्व मौल्यवान गोष्टींचा आपण यहोवाचा सन्मान करण्याकरता उपयोग करतो. या सर्व गोष्टी प्रथमफळ—सर्वांत उत्तम असल्या पाहिजेत. आपल्या व्यक्‍तिगत साधनसंपत्तीचा आपण ज्याप्रकारे उपयोग करतो त्यावरून ‘त्याचे राज्य आणि त्याचे नीतिमत्त्व मिळवण्यास आपण झटत’ असल्याचे दिसून येते का?—मत्तय ६:३३.

आपल्या मौल्यवान वस्तूंनी आपण यहोवाचा सन्मान केल्यावर आपल्याला त्याचे प्रतिफळ मिळते. “तुझी कोठारे समृद्धीने भरतील, तुझी कुंडे नव्या द्राक्षारसाने भरून वाहतील,” अशी हमी शलमोन आपल्याला देतो. (नीतिसूत्रे ३:१०) आध्यात्मिक समृद्धी पाठोपाठ भौतिक समृद्धीही येते असे नाही परंतु यहोवाचा आदर करण्याकरता आपल्या साधनसंपत्तीचा उदारपणे उपयोग केल्याने आपल्याला यहोवाकडून समृद्ध आशीर्वाद मिळतात. देवाच्या इच्छेप्रमाणे वागण्यालाच येशूने स्वतःचे “अन्‍न” समजले. (योहान ४:३४) तसेच, यहोवाचा महिमा करणाऱ्‍या प्रचारकार्यात आणि शिष्य बनवण्याच्या कार्यात भाग घेतल्याने आपले पोषण होते. आपण चिकाटीने हे काम केल्यास आपली आध्यात्मिक कोठारे गच्च भरतील. आपल्या आनंदास चित्रित करणारा नवा द्राक्षारस ओसंडून वाहील.

आपल्याला दररोजचे अन्‍न मिळावे म्हणून आपण यहोवाकडेच पाहत व प्रार्थना करीत नाही का? (मत्तय ६:११) खरे तर, आपल्याजवळ जे जे आहे ते ते सर्व आपल्या प्रेमळ स्वर्गीय पित्याकडून मिळालेले आहे. यहोवाची स्तुती करण्याकरता आपण आपल्या मौल्यवान वस्तूंचा जितक्या प्रमाणात उपयोग करतो तितक्याच जास्त प्रमाणात तो आपल्याला आशीर्वाद देईल.—१ करिंथकर ४:७.

यहोवाकडून येणारे ताडन स्वीकारा

यहोवाबरोबर जवळीक साधण्याकरता ताडन महत्त्वपूर्ण आहे; त्याबाबतीत इस्राएलचा राजा आपल्याला सल्ला देतो: “माझ्या मुला, परमेश्‍वराचे शिक्षण तुच्छ मानू नको आणि त्याच्या शासनाला कंटाळू नको; कारण जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला, तसा परमेश्‍वर ज्याच्यावर प्रीति करितो त्याला शासन करितो.”—नीतिसूत्रे ३:११, १२.

ताडनाचा आपण इतक्या सहजतेने स्वीकार करू शकणार नाही. “कोणतीहि शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते; तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्त्व व शांतिकारक फळ देते,” असे प्रेषित पौलाने लिहिले. (इब्री लोकांस १२:११) सुधारणूक आणि ताडन या दोन गोष्टी प्रशिक्षणाचा महत्त्वपूर्ण भाग आहेत ज्या आपल्याला देवाच्या आणखी जवळ आणतात. पालकांद्वारे, ख्रिस्ती मंडळीद्वारे किंवा आपल्या व्यक्‍तिगत अभ्यासादरम्यान शास्त्रवचनांवर मनन करण्याद्वारे यहोवा आपली सुधारणूक करतो तेव्हा त्यावरून आपल्याबद्दल त्याला असलेले प्रेम व्यक्‍त होते. आपण सुज्ञ असलो तर या सुधारणुकीचा आपण स्वीकार करू.

बुद्धी आणि समज यांना धरून राहा

देवाबरोबर जवळीक साधण्याकरता बुद्धी आणि समज या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत यावर शलमोन पुढे जोर देतो. तो म्हणतो: “ज्याला ज्ञान [बुद्धी] प्राप्त होते, जो सुज्ञता [समज] संपादन करितो, तो मनुष्य धन्य होय. कारण त्याचा सौदा रुप्याच्या सौद्यापेक्षा, व त्याचा लाभ उत्कृष्ट सोन्यापेक्षा उत्तम आहे. . . . जे त्याला धरून राहतात त्यांस ते जीवनवृक्षरूप आहे; जो कोणी ते राखून ठेवितो तो धन्य होय.”—नीतिसूत्रे ३:१३-१८.

यहोवाच्या अद्‌भुत सृष्टीत बुद्धी आणि समज दिसून येत असल्याची आठवण करून देत राजा पुढे म्हणतो: “परमेश्‍वराने पृथ्वीचा पाया ज्ञानाने घातला; त्याने बुद्धीने आकाश निर्माण केले. . . . माझ्या मुला, ती तुझ्या डोळ्यांआड होऊ देऊ नको; तू चातुर्य व विवेक ही संभाळून ठेव. म्हणजे ती तुझ्या आत्म्याला जीवन व तुझ्या कंठाला भूषण अशी होतील.”—नीतिसूत्रे ३:१९-२२.

बुद्धी आणि समज हे ईश्‍वरी गुण आहेत. आपण हे गुण आपल्या अंगी फक्‍त विकसित करणे पुरेसे नाही. शास्त्रवचनांचा परिश्रमपूर्वक अभ्यास करण्यास व शिकलेल्या गोष्टी जीवनात लागू करण्यास आपण मागे न पडल्यास या गुणांना आपण नेहमी धरून राहू. “तेव्हा तू आपल्या मार्गाने निर्भय चालशील, तुझ्या पायाला ठोकर लागणार नाही. तू निजतेवेळी भिणार नाहीस; तू निजशील आणि तुझी झोप सुखाची होईल,” असे शलमोन पुढे म्हणतो.—नीतिसूत्रे ३:२३, २४.

चोर जसा अचानक येतो तसे सैतानाच्या दुष्ट जगावर ‘अकस्मात येणाऱ्‍या नाशाची’ आपण वाट पाहत असताना निर्भय राहू शकतो व आपल्याला सुखाची झोप लागू शकते. (१ थेस्सलनीकाकर ५:२, ३; १ योहान ५:१९) जवळ येऊन ठेपलेल्या मोठ्या संकटादरम्यानही आपल्याला ‘अकस्मात येणाऱ्‍या धोक्याला किंवा दुष्टांची धाड आली तरी भिण्याची गरज नाही. कारण यहोवा आपला रक्षणकर्ता होईल, तो आपला पाय गुंतू देणार नाही.’—नीतिसूत्रे ३:२५, २६; मत्तय २४:२१.

जे चांगले ते करा

“एखाद्याचे बरे करणे उचित असून ते करण्याचे तुझ्या अंगी सामर्थ्य असल्यास, ते करण्यास माघार घेऊ नको,” असा सल्ला शलमोन देतो. (नीतिसूत्रे ३:२७) दुसऱ्‍यांचे बरे करण्यात, आपल्या साधनसंपत्तीचा सढळ हाताने त्यांच्यासाठी उपयोग करणे गोवलेले आहे; हे अनेक प्रकारे केले जाऊ शकते. परंतु, या ‘अंतसमयात’ त्यांना खऱ्‍या देवाबरोबर एक जवळचा नातेसंबंध निर्माण करण्यास मदत करणे हेच सर्वात चांगले काम नाही का? (दानीएल १२:४) राज्याच्या प्रचारकार्यात आणि शिष्य बनवण्याच्या कार्यात आवेश दाखवण्याचा हाच समय आहे.—मत्तय २८:१९, २०.

आपण टाळावीत अशाही कामांबद्दल सुज्ञ राजा म्हणतो: “एखादी वस्तु तुजजवळ असता आपल्या शेजाऱ्‍याला असे सांगू नको की तू जा आणि उद्या परत ये, म्हणजे ती मी तुला देईन. तुझा शेजारी तुजजवळ निर्भय राहतो असे पाहून त्याचे वाईट योजू नको. एखाद्या मनुष्याने तुझे वाईट केले नसता त्याजशी उगीच भांडण करू नको. जुलूम करणाऱ्‍याशी स्पर्धा करू नको. त्याची कोणतीहि रीत स्वीकारू नको.”—नीतिसूत्रे ३:२८-३१.

सल्ला देण्यामागच्या कारणाचा सारांश शलमोन अशाप्रकारे देतो: “परमेश्‍वराला कुटिलाचा वीट आहे. पण सरळांबरोबर त्याचे रहस्य आहे. परमेश्‍वराचा शाप दुर्जनांच्या घरावर असतो; पण धार्मिकांच्या वस्तीला तो आशीर्वाद देतो. उपहास करणाऱ्‍यांचा तो अवश्‍य उपहास करितो, पण दीनांवर तो कृपाप्रसाद करितो. ज्ञानी वैभवाचे वतनदार होतील, पण मूर्ख लज्जेची बढती पावतील.”—नीतिसूत्रे ३:३२-३५.

यहोवाबरोबर आपल्याला जवळीक साधायची आहे तर आपण कपटी व हानीकारक कट रचू नयेत. (नीतिसूत्रे ६:१६-१९) देवाच्या नजरेत जे योग्य आहे ते आपण केल्यास आपण त्याची मर्जी आणि आशीर्वाद प्राप्त करू शकू. आपण ईश्‍वरी बुद्धीनुसार वागतो हे जेव्हा दुसरे लोक पाहतील तेव्हा त्यांच्याकडूनही आपोआप आपला आदर केला जाईल. तेव्हा, या दुष्ट आणि हिंसक जगाच्या सर्व कपटी मार्गांना आपण टाळू या. तसेच एक सात्विक जीवन जगू आणि यहोवाबरोबर जवळीक साधू या!

[२५ पानांवरील चित्रे]

‘यहोवाचा सन्मान करण्यासाठी आपल्या मोलवान वस्तूंचा उपयोग करा’

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा