वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w93 १/१ पृ. १९-२४
  • यहोवाची प्रेमळ कौटुंबिक व्यवस्था

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाची प्रेमळ कौटुंबिक व्यवस्था
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • पवित्र शास्त्र काळातील कुटुंबे
  • ख्रिस्ती पतीची भूमिका
  • आधार देणाऱ्‍या ख्रिस्ती स्त्रिया
  • कदर राखणारी मुले
  • कौटुंबिक जीवन सुखी बनवण्याचा मंत्र
    बायबल नेमके काय शिकवते?
  • कौटुंबिक जीवन यशस्वी करणे
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
  • विवाहित जोडप्यांकरता सुज्ञ मार्गदर्शन
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • अंतःकरणापासून आदर मिळवणारा पती
    तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनवणे
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
w93 १/१ पृ. १९-२४

यहोवाची प्रेमळ कौटुंबिक व्यवस्था

“याकरिता, स्वर्गातील व पृथ्वीवरील प्रत्येक वंशास ज्या पित्यावरून नाव देण्यात येते, त्या पित्यासमोर मी गुडघे टेकून अशी विनंति करतो.”—इफिसकर ३:१४, १५.

१, २. (अ) यहोवाने कोणत्या उद्देशास्तव कुटुंबाची निर्मिती केली? (ब) यहोवाच्या व्यवस्थेनुरुप आज कुटुंबाने कोणता भाग पूर्ण करावयास हवा?

यहोवाने कुटुंब निर्माण केले. याद्वारे त्याने मानवाला सहचर, आधार आणि जवळीक या गोष्टींचा लाभ मिळवून देण्यापेक्षा अधिक असे साध्य केले. (उत्पत्ती २:१८) कुटुंब हे त्याचे असे साधन होते की, ज्याद्वारे पृथ्वी भरुन टाकावी हा त्याचा गौरवी उद्देश सफल होऊ शकत होता. त्याने पहिल्या विवाहीत दांपत्याला म्हटलेः “फलद्रुप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेत आणा.” (उत्पत्ती १:२८) आदाम व हव्वेला आणि त्यांच्या संततीला जी अगणित संतान उत्पन्‍न होणार होती त्या सर्वांना हे उबदार व पोषक वातावरण अत्यंत लाभदायक ठरणार होते.

२ तथापि, त्या पहिल्या जोडप्याने आज्ञाभंजकतेचा मार्ग पत्करला; व यामुळे त्यांच्या स्वतःसाठी आणि त्यांच्या संततीसाठी खूपच विध्वंसक परिणाम आणले. (रोमकर ५:१२) अशाप्रकारे, आजचे कौटुंबिक जीवन देवाची जी त्याबद्दल इच्छा होती, त्यापेक्षा अत्यंत विपरीत स्वरुपाचे झाले आहे. असे असले तरी कुटुंब हे यहोवाच्या व्यवस्थेत महत्त्वपूर्ण जागा राखून आहे व ते ख्रिस्ती समाजात एक मूलभूत घटक म्हणून राहिले आहे. आमच्या म्हणण्याचा मतितार्थ, आम्हामध्ये असणाऱ्‍या कित्येक अविवाहीत ख्रिश्‍चनांद्वारे जे चांगले काम पार पाडले जात आहे त्याकडे आमचे दुर्लक्ष आहे असे नाही. तथापि, आमचा निर्देश कुटुंबे देखील एकंदरीतपणे ख्रिस्ती संघटनेच्या आध्यात्मिक आरोग्याला जो मोठा हातभार लावीत आहेत त्याकडे आहे. सुदृढ कुटुंबे सुदृढ मंडळ्या तयार करतात. मग, सध्याच्या दबावाच्या काळात तुमचे कुटुंब कसे बहरु शकते? याचे उत्तर मिळवण्यासाठी प्रथम, पवित्र शास्त्र कौटुंबिक व्यवस्थेबद्दल काय म्हणते ते आपण बघू या.

पवित्र शास्त्र काळातील कुटुंबे

३. कुलपित्यांच्या कुटुंबात पति व पत्नीची कोणती भूमिका होती?

३ आदाम व हव्वा, दोघांनीही देवाच्या मस्तकपदाच्या व्यवस्थेला झिडकारले. परंतु, नोहा, अब्राहाम, इसहाक, याकोब व ईयोब यासारख्या विश्‍वासी माणसांनी कुटुंबप्रमुख या नात्याने आपली जबाबदारी चांगल्याप्रकाराने पूर्ण केली. (इब्रीयांस ७:४) कुलपित्याचे कुटुंब एक छोटेसे सरकार होते; यामध्ये पिता हा धार्मिक नेता, शिक्षक व न्यायाधीश या नात्याने काम करीत होता. (उत्पत्ती ८:२०; १८:१९) बायकांना देखील महत्त्वपूर्ण भूमिका होती; त्या दासी नव्हे तर घरच्या कारभाऱ्‍यांच्या साहाय्यक होत्या.

४. मोशेच्या नियमशास्त्र वर्चस्वाखाली कौटुंबिक जीवन कसे बदलले गेले, तरीपण पालकांनी कोणती भूमिका करणे चालूच राहिले?

४ इ. स. पूर्वी १५१३ मध्ये इस्राएल एक राष्ट्र बनले तेव्हा कौटुंबिक कायदा हा मोशेद्वारे देण्यात आलेल्या राष्ट्रीय कायद्याच्या तुलनेत दुय्यम ठरला. (निर्गम २४:३-८) जीवन-मरणाच्या प्रकरणासहित काही निर्णय घेण्याची जबाबदारी आता नियुक्‍त न्यायधिशांवर आली होती. (निर्गम १८:१३-२६) उपासनेतील यज्ञयागाच्या हालचाली लेवीय याजकपदाकडे आल्या होत्या. (लेवीय १:२-५) असे असले तरीही बापाची भूमिका महत्त्वपूर्ण अशीच राहिली. मोशाने पित्यांना हे आर्जविलेः “ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात बिंबीव आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर ठशीव आणि घरी असता, मार्गाने चालत असता, निजता, उठता त्याविषयी बोलत जा.” (अनुवाद ६:६, ७) आईचा प्रभाव देखील मोठा असे. नीतीसूत्रे १:८ मध्ये युवकांना आज्ञा दिलेली आहेः “माझ्या मुला, आपल्या बापाचा बोध ऐक; आपल्या आईची शिस्त सोडू नको.” होय, आपल्या पतीने घालून दिलेल्या चाकोरीत इब्री पत्नी कौटुंबिक कायदे घडवू व त्याची अमलबजावणी करू शकत होती. ती वृद्ध झाली तरी तिच्या मुलांनी तिचा मान राखावा अशी अपेक्षा धरली जात होती.—नीतीसूत्रे २३:२२.

५. कौटुंबिक व्यवस्थेत मुलांचे स्थान कोणते होते त्याबद्दल मोशेच्या नियमशास्त्रात कशी स्पष्टता देण्यात आली होती?

५ देवाच्या नियमशास्त्रात मुलांच्या स्थानाबद्दल देखील स्पष्ट रुपाची माहिती कळवण्यात आली आहे. अनुवाद ५:१६ म्हणतेः “तुझा देव परमेश्‍वर [यहोवा, न्यू.व.] याने तुला आज्ञा केली आहे तदनुसार आपला बाप व आई यांचा मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्‍वर [यहोवा, न्यू.व.] तुला देणार आहे त्यात तू चिरकाल राहशील आणि तुझे कल्याण होईल.” आईबापाविरुद्ध दंडेली करणे हा मोशेच्या नियमशास्त्रात खूपच गंभीर अपराध मानला जाई. (निर्गम २१:१५, १७) “आपल्या पित्यास अथवा मातेस जो शिव्याशाप देईल,” नियमशास्त्र सांगते, “त्यांस अवश्‍य जिवे मारावे.” (लेवीय २०:९) पालकांविरुद्ध केली जाणारी बंडाळी ही देवाविरुद्ध केली गेलेली बंडाळी असे समजण्यात येई.

ख्रिस्ती पतीची भूमिका

६, ७. पहिल्या शतकातील वाचकांना पौलाचे इफिसकर ५:२३-२९ वचनांमधील शब्द क्रांतीकारी का वाटले असावे?

६ कौटुंबिक व्यवस्थेवर व खासपणे पतीच्या भूमिकेबद्दल ख्रिस्ती धर्माने अधिक प्रकाश पाडला. पहिल्या शतकात ख्रिस्ती मंडळीबाहेर असणारे पती आपल्या बायकांना मोठ्या क्रूरतेने व जाचकपणे वागवत. स्त्रियांना त्यांचे मूलभूत हक्क व दिमाख यापासून वंचित ठेवण्यात येत असे. द एक्सपोझिटर्स बायबल म्हणतेः “सुसंस्कृत ग्रीक माणसाने बायको ही मुले निपजविणारी साधन असा अर्थ लावला होता. त्याच्या लैंगिक क्षुधेपुढे तिचे कोणतेही हक्क चालत नव्हते. वैवाहिक जीवनात प्रेमाला स्थान नव्हते. . . . दासीला तर काहीच हक्क नव्हते. तिचे शरीर तिच्या मालकाच्या अधीन असे.”

७ असे हे वातावरण असताना, पौलाने इफिसकर ५:२३-२९ मधील लिखाण केलेः “जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा नवरा बायकोचे मस्तक आहे; तसेच ख्रिस्त हा शरीराचा तारणारा आहे. . . . नवऱ्‍यांनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःचे तिच्यासाठी अर्पण केले, तशी तुम्हीही आपापल्या बायकोवर प्रीती करा. . . . नवऱ्‍यांनी आपापल्या बायकोला आपले शरीर असे मानून तिजवर प्राती करावी. जो आपल्या बायकोवर प्रीती करतो तो स्वतःवर प्रीती करतो, कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष करीत नाही; तर तो त्याचे पालनपोषण करतो.” पहिल्या शतकातील वाचकांना हे शब्द मोठे क्रांतीकारक वाटले. द एक्सपोझिटर्स बायबल म्हणतेः “त्या काळाच्या बदफैली आचाराच्या तुलनेत बघता ख्रिस्ती धर्मात विवाहाबद्दल राखला गेलेला दृष्टिकोण हा अधिक नवा व कडक वाटत होता. . . . त्याने मानवजातीला एक नवे पर्व सुरु करून दिले.”

८, ९. स्त्रियांबद्दलची कोणती अनिष्ट प्रवृत्ती काही पुरुषांमध्ये वाढत आहे, आणि अशा दृष्टिकोणांचा ख्रिस्ती पुरुषांनी त्याग केला पाहिजे हे का महत्त्वाचे आहे?

८ पवित्र शास्त्राने पतींबद्दल केलेली सूचना आजच्या काळात कमी क्रांतीकारी नाही. स्त्री मुक्‍तीबद्दल चोहीकडे इतकी भाषणे होत असली तरी पुष्कळ पुरुष आज देखील स्त्रिया या लैंगिक उपभोगाच्या वस्तु आहेत असा दृष्टीकोण राखून आहेत. स्त्रियांना आपणावर वर्चस्व केले जाणे, ताबा राखणे आणि दमदाटी करणे आवडत असते या दंतकथेवर विश्‍वास ठेवून पुष्कळ पुरुष आपल्या बायकांना शारीरिक व भावनिक छळणूक देतात. जगाच्या या विचारसरणीत स्वतःला झोकून देऊन एखाद्या ख्रिस्ती पुरुषाने आपल्या बायकोला अशी वागणूक द्यावी ही किती अपमानकारक गोष्ट आहे! “माझे पति उपाध्य सेवक होते, ते जाहीर भाषणेही देत,” एक ख्रिस्ती स्त्री म्हणते. पण तिने सांगितलेः “मी मारहाण खाणारी बायको बनले.” अशी ही कृति निश्‍चये देवाच्या व्यवस्थेच्या सहमतात नव्हती. तो गृहस्थ एक दुर्मिळ अपवाद होता; त्याला देवाची पसंती मिळवण्यासाठी आपल्या रागावर नियंत्रण ठेवण्यास मदतीची गरज होती.—गलतीकर ५:१९-२१.

९ आपल्या बायकोवर स्वतःच्या शरीराप्रमाणे प्रेम करावे अशी पतींना देवाकडील आज्ञा आहे. असे करण्याचे नाकारणे हे देवाने घालून दिलेल्या व्यवस्थेविरुद्ध आहे व त्यामुळे त्याचे देवासोबत असणारे नाते भंगविले जाऊ शकते. प्रेषित पेत्राचे हे शब्द स्पष्टच आहेतः “नवऱ्‍यांनो, तसे तुम्ही आपल्या स्त्रियांबरोबर त्या अधिक नाजूक पात्र आहेत म्हणून, सूज्ञतेने सहवास ठेवा; म्हणजे तुमच्या प्रार्थनांना व्यत्यय येणार नाही.” (१ पेत्र ३:७) बायकोला क्रूरतेने वागवण्यामुळे तिच्या आध्यात्मिकतेवर व मुलांच्याही आध्यात्मिकतेवर परिणाम होऊ शकतो.

१०. पतीला ख्रिस्ताच्या पद्धतीने आपले मस्तकपद गाजविता येईल असे कोणते मार्ग आहेत?

१० पतींनो, तुम्ही ख्रिस्ताच्या पद्धतीने आपले मस्तकपद चालवले तर तुमचे कुटुंब बहरेल. ख्रिस्त केव्हाही क्रूर किंवा जाच करणारा नव्हता. उलटपक्षी, तो असे म्हणू शकलाः “मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या मजपासून शिका, म्हणजे, तुमच्या जिवांस विश्रांती मिळेल.” (मत्तय ११:२९) हे तुमच्या कुटुंबाला तुमच्या बाबतीत म्हणता येईल का? ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना मित्र म्हणून वागविले आणि त्यांच्यावर भरवसा ठेवला. (योहान १५:१५) तुम्ही देखील आपल्या बायकोला अशीच प्रतिष्ठा देता का? “सद्‌गुणी स्त्री”बद्दल पवित्र शास्त्र असे म्हणतेः “तिच्या पतीचे मन तिजवर भरवसा ठेविते.” (नीतीसूत्रे ३१:१०, ११) याचा अर्थ, तिला काही प्रमाणात मोकळीक व निवडस्वातंत्र्य दिले पाहिजे आणि तिजवर अव्यवहारिक बंधने घालू नयेत. याचप्रमाणे येशूने आपल्या शिष्यांना त्यांच्या भावना व दृष्टिकोण बोलून दाखवण्यास वाव दिला. (मत्तय ९:२८; १६:१३-१५) तुम्हीही असेच आपल्या बायकोबरोबर करता का? का तिने प्रामाणिक स्वरुपाने दाखविलेले असहमत तुमच्या अधिकारपदाला आव्हान म्हणून समजता? तुमच्या बायकोच्या विचारांकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्याकडे लक्ष दिल्यामुळे तुम्ही तुमच्या मस्तकपणाबद्दल तिचा आदर वाढवण्यास मदत देत असता.

११. (अ) बापाला आपल्या मुलांच्या आध्यात्मिक गरजांची कशी काळजी वाहता येईल? (ब) वडील तसेच उपाध्य सेवकांनी आपापल्या कुटुंबांची काळजी घेण्यात उदाहरणशील असण्याची का जरुरी आहे?

११ तुम्ही पिता आहात तर तुमच्या मुलांच्या आध्यात्मिक, भावनिक व शारीरिक गरजांबद्दल देखील पुढाकार घेण्याची तुमची जबाबदारी आहे. याचा अर्थ यासारखा चांगला आध्यात्मिक आराखडा तुमच्या कुटुंबासाठी असला पाहिजेः त्यांच्यासोबत मिळून क्षेत्रसेवा करणे, घरगुती पवित्र शास्त्र अभ्यास चालविणे, दैनंदिन वचनाचे वाचन व चर्चा करणे. पवित्र शास्त्र देखील याच्याच अनुषंगाने असे म्हणते की, वडील किंवा उपाध्य सेवक “आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवणारा” असला पाहिजे. अशा जबाबदार पदी सेवा करणाऱ्‍या पुरुषांनी उदाहरणशील कुटुंबप्रमुख असावयास हवे. मंडळ्यातील गहन जबाबदारींचा भार ते वाहत असले तरी त्यांनी आपल्या कुटुंबाला प्राधान्य दिलेच पाहिजे. या कारणास्तव पौल म्हणालाः “ज्याला आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवता येत नाही, तो देवाच्या मंडळीचा संभाळ कसा करील?”—१ तीमथ्य ३:४, ५, १२.

आधार देणाऱ्‍या ख्रिस्ती स्त्रिया

१२. ख्रिस्ती व्यवस्थेमध्ये पत्नी कोणता भाग पार पाडते?

१२ तुम्ही ख्रिस्ती पत्नी आहात का? तर मग, तुम्हीही कौटुंबिक व्यवस्थेत आपला महत्त्वपूर्ण भाग पार पाडला पाहिजे. ख्रिस्ती स्त्रियांना असा बोध करण्यात आला आहेः “आपल्या नवऱ्‍यांवर व मुलाबाळांवर प्रीती करावी; मर्यादशील, शुद्धाचरणी, घरची कामे पाहणाऱ्‍या, मायाळू, आपल्या नवऱ्‍याच्या अधीन राहणाऱ्‍या” असे त्यांनी असावे. (तीतास २:४, ५) याप्रकारे तुम्हीही उदाहरणशील स्त्री बनले पाहिजे आणि आपल्या कुटुंबासाठी स्वच्छ व नीटनेटके घर राखावयास हवे. घरचे काम कधी कधी फार कष्टाचे वाटेल, पण ते निरर्थक किंवा नीरस जीवन नाही. पत्नी या नात्याने तुम्हाला “घर चालवावे” लागते, त्यामुळे यामध्ये काही अंशी मोकळीक देखील मिळते. (१ तीमथ्य ५:१४) “सद्‌गुणी स्त्री”च्या बाबतीत बघता, तिने घरात लागणारा अन्‍नसाठा विकत आणला, मिळकतीचा व्यवहार केला, आणि छोटासा व्यापार करून काही उत्पन्‍न मिळवले. तेव्हा तिला तिच्या पतीद्वारे प्रशंसा मिळू शकली यात काही नवल नाही! (नीतीसूत्रे अध्याय ३१) अर्थात, अशाप्रकारचा तिने घेतलेला पुढाकार हा तिचा मस्तक असणारा पती याच्या मार्गदर्शनाने घेतला असावा हे स्वाभाविक आहे.

१३. (अ) अधीन राहणे हे काही स्त्रियांच्या बाबतीत कदाचित का कठीण वाटेल? (ब) ख्रिस्ती स्त्रियांनी आपल्या पतीच्या अधीन राहणे हे का लाभदायक आहे?

१३ तथापि, पतीच्या अधीन राहणे हे कदाचित नेहमीच सोपे नसते. सर्वच पुरुष आदर प्राप्त करण्यास पात्र ठरत नाहीत. कदाचित तुमच्या बाबतीत बघता तुम्ही पैसे खर्च करण्याच्या बाबतीत, योजना आखण्यात किंवा संघटन करण्यात हुशार असाल. तुम्ही प्रापंचिक नोकरीही करीत असाल व यामुळे कुटुंबाच्या मासिक प्राप्तीमध्ये भर टाकीत असाल. किंवा पूर्वी तुम्हाला काही मार्गाने पुरुषाच्या वरचढपणाचा त्रास सहन करावा लागला असेल व आता कोणा पुरुषाच्या अधीन राहणे जड वाटत असेल. तरीसुद्धा आपल्या पतीची “भीड राखणे” किंवा “भय बाळगणे” हे देवाने घालून दिलेल्या मस्तकपदाच्या तत्त्वाला आदर देण्यासारखे आहे. (इफिसकर ५:३३, किंग्डम इंटरलिनियर; १ करिंथकर ११:३) तुमच्या कौटुंबिक यशस्वीतेसाठी अधीनता देखील पणाला लावावी लागेल; पण यामुळे तुमच्या विवाहावर अनावश्‍यक भार किंवा दबाव येण्याचे टाळण्यात मदत होऊ शकेल.

१४. पतीने केलेला निर्णय मान्य नसल्यास पत्नीला काय करता येईल?

१४ याचा अर्थ, तुमच्या कुटुंबाच्या कल्याणाविरुद्ध काही निर्णय तुमचे पति घेताना तुम्ही स्तब्ध राहावे असा होतो का? ते जरुरीचे नाही. अब्राहामाची बायको सारा हिने जेव्हा स्वतःच्या पुत्राच्या कल्याणाला धोका संभवणार असल्याचे ताडले तेव्हा ती गप्प राहिली नाही. (उत्पत्ती २१:८-१०) याचप्रमाणे तुम्हाला देखील काही वेळी आपल्या भावना व्यक्‍त करण्याचे कर्तव्य आहे असे वाटू लागेल. हे, आदरणीय मार्गाने व “समयोचित” रितीने केल्यास ईश्‍वरभक्‍ती आचरणारा ख्रिस्ती माणूस निश्‍चितपणे ते लक्षात घेईल. (नीतीसूत्रे २५:११) पण, तुमचा प्रस्ताव अनुसरला गेला नाही आणि पवित्र शास्त्रीय तत्त्वांचे कसलेही गंभीर उल्लंघन होत नसल्यास, आपल्या पतीच्या इच्छेविरुद्ध कुरकुरत बसणे ही गोष्ट स्वतःचा पराजय करणारी ठरणार नाही का? लक्षात घ्या की, “प्रत्येक सूज्ञ स्त्री आपले घर बांधिते; पण मूर्ख स्त्री आपल्या हातांनी ते पाडून टाकिते.” (नीतीसूत्रे १४:१) तुम्ही आपले घर बांधण्याचा एक मार्ग म्हणजे आपल्या पतीच्या मस्तकपदास आधार देणे, त्याने केलेल्या गोष्टींबद्दल त्याची प्रशंसा करणे आणि चुका झाल्या असल्यास त्याबद्दल वादंग न माजवता त्यांचे शांतपणे निरसन करणे हा आहे.

१५. मुलांना शिस्त लावण्यात व तालीम देण्यात बायको कशी सहभाग घेऊ शकते?

१५ आपले घर बांधण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे तुमच्या मुलांना शिस्त लावण्यात व तालीम देण्यात सहभाग घेणे. उदाहरणार्थ, तुम्हाला कौटुंबिक पवित्र शास्त्र अभ्यास नियमित व उभारणीकारक होण्यासाठी आपला भाग पार पाडता येईल. देवाच्या सत्याची सहभागिता करण्याची संधि प्रवासात असताना किंवा त्यांच्याबरोबर बाजारहाट करताना मिळाल्यास ती मुळीच दवडू नका; त्यामध्ये आपला “हात आवरु नका.” (उपदेशक ११:६) सभांसाठी उत्तरे देण्याची तसेच ईश्‍वरशासित सेवकपणाची शाळा यातील भागांची तयारी तुम्ही त्यांच्याकडून तयार करवून घेऊ शकता. ते कोणाशी संगति ठेवतात याकडे लक्ष द्या. (१ करिंथकर १५:३३) ईश्‍वरी दर्जे व शिस्त यांच्याबाबतीत प्रसंग येतो तेव्हा तुम्ही व तुमचे पति एक आहात हे तुमच्या मुलांना कळू द्या. त्यांना तुम्हाला तुमच्या पतिविरुद्ध उभे करुन आपली मागणी पूर्ण करण्याचा वाव मिळू देऊ नका.

१६. (अ) कुटुंबात एकटेच पालक असणाऱ्‍यांना तसेच खऱ्‍या विश्‍वासात नसलेला वैवाहिक सोबती असणाऱ्‍यांना कोणते पवित्र शास्त्रीय उदाहरण उत्तेजन देऊ शकते? (ब) अशा लोकांना मंडळीतील इतर जन कशी मदत करू शकतील?

१६ तुम्ही एकटेच पालक असाल किंवा तुम्हाला खरा विश्‍वास जोपासणारा सोबती नसल्यास तुम्हालाच आध्यात्मिक गोष्टीत पुढाकार घ्यावा लागेल. हे कधी कधी खूपच कठीण व त्रासदायक वाटेल. पण निराश होऊ नका. तीमथ्याची आई, युनिके ही विवाहीत होती आणि तिचा नवरा खऱ्‍या विश्‍वासातील नव्हता तरी तिने तीमथ्याला “बालपणापासून” पवित्र शास्त्रवचनांचे शिक्षण देण्यात यश मिळवले. (२ तीमथ्य १:५; ३:१५) आणि आम्हामधील पुष्कळांना देखील असेच यश मिळत आहे. तुम्हाला याबाबतीत काही मदत हवी असल्यास ती वडीलांकडून मिळवा. ते, तुम्हाला सभांना येण्यामध्ये आणि क्षेत्रसेवेत जाण्यासाठी मदत मिळावी यासाठी काही व्यवस्था आखून देऊ शकतील. ते इतर कुटुंबांना आपल्या मनोरंजनाच्या कार्यक्रमात किंवा मेळाव्यात तुमच्या कुटुंबाला समाविष्ट करून घेण्याचे उत्तेजन देऊ शकतील. किंवा कोणा अनुभवी प्रचारकाला तुमचा कौटुंबिक अभ्यास सुरु करुन देण्यामध्ये मदत करायला सांगू शकतील.

कदर राखणारी मुले

१७. (अ) युवक कुटुंबाच्या कल्याणाला कसा हातभार लावू शकतील? (ब) याबाबतीत येशूने कोणते उदाहरण मांडले?

१७ ख्रिस्ती युवक इफिसकर ६:१-३ मधील आज्ञेचा अवलंब करुन आपल्या कुटुंबांच्या कल्याणास अधिक हातभार लावू शकतात. तेथे म्हटले आहेः “मुलांनो, आपल्या आईबापाची आज्ञा प्रभूमध्ये माना, कारण हे योग्य आहे. ‘आपला बाप व आई यांचा मान राख.’ ही पहिली वचनयुक्‍त आज्ञा आहे; यासाठी की ‘तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायु असावे.’” आपल्या पालकांशी सहकार्य देऊन तुम्ही यहोवाबद्दल आदर दाखवता. येशू ख्रिस्त तर परिपूर्ण होता व आपल्या अपूर्ण पालकांच्या अधीन राहणे हे आपल्या प्रतिष्ठेला डावलणारे आहे असे तो सहजपणे म्हणू शकला असता. तरीही, “तो त्यांच्या आज्ञेत राहिला. . . . येशू हा ज्ञानाने, शरीराने आणि देवाच्या व मनुष्याच्या कृपेत वाढत गेला.”—लूक २:५१, ५२.

१८, १९. (अ) आपल्या पालकांचा मान राखणे म्हणजे काय? (ब) घर विश्रांती देणारे स्थान कसे बनू शकते?

१८ मग, तुम्हीही आपल्या पालकांचा सन्मान करू नये का? “मान राख” याचा अर्थ त्यांच्या योग्य अधिकारपदाला ओळखणे असा आहे. (पडताळा १ पेत्र २:१७.) कोणाचे पालक खऱ्‍या विश्‍वासातील नसले किंवा ते चांगले उदाहरण राखत नाहीत तरीही हा मान त्यांना मिळण्यास हवा. आणि तुमचे पालक उदाहरणशील आहेत तर मग त्यांना अधिकच मान द्यावयास नको का? हे लक्षात ठेवा की, तुमच्या पालकांद्वारे जी शिस्त व मार्गदर्शन केले जाते ते तुम्हावर अवास्तव प्रतिबंध लादण्यासाठी नाही. उलटपक्षी, ते तुमचे रक्षण करू इच्छितात की ज्यामुळे ‘तुम्ही वाचाल.’—नीतीसूत्रे ७:१, २.

१९ यास्तव, कुटुंब ही केवढी प्रेमळ व्यवस्था आहे! जेव्हा पति, पत्नी आणि मुले देवाने कौटुंबिक जीवनाबद्दल आखून दिलेले नियम आचरतात तेव्हा घर अगदी निवाऱ्‍याची जागा, तजेला देणारे ठिकाण बनते. तरी देखील, दळणवळण व मुलांना तालीम देण्याबद्दल काही कुटुंबात समस्या असू शकतील. आमचा पुढचा लेख यापैकीच्या काही समस्या कशा सोडवता येतील याची चर्चा करील.

तुम्हाला आठवते का?

▫ पवित्र शास्त्र काळी देवभिरु पती, पत्नी व मुलांनी कोणता नमूना प्रस्तुत केला?

▫ ख्रिस्ती धर्माने पतीच्या भूमिकेवर कोणता प्रकाश पाडला?

▫ ख्रिस्ती कुटुंबात पत्नीने कोणता भाग पार पाडावा?

▫ ख्रिस्ती युवक कुटुंबाच्या कल्याणास कसा हातभार लावू शकतील?

[२० पानांवरील चित्रं]

“त्या काळाच्या बदफैली आचाराच्या तुलनेत बघता ख्रिस्ती धर्मात विवाहाबद्दल राखला गेलेला दृष्टिकोण हा अधिक नवा व कडक वाटत होता. . . . त्याने मानवजातीला एक नवे पर्व सुरु करून दिले”

[२१ पानांवरील चित्रं]

ख्रिस्ती पती आपल्या बायकोला तिचे विचार बोलण्याचे उत्तेजन देतात आणि तिच्या भावना लक्षात घेतात

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा