“माझ्या आज्ञा पाळ म्हणजे तू वाचशील”
तो तरुण होता, हुशार होता. “बांधेसूद व देखणा” देखील होता. ज्याच्याकडे तो कामाला होता, त्याची पत्नी त्याच्यावर भाळली होती. ती स्वतः देखील अत्यंत रूपवती होती आणि दिवसेंदिवस त्याच्याकडे आकृष्ट होत होती. तिच्यात इतके धाडस होते, की आपल्याबरोबर शय्यासोबत करण्यासाठी त्याला भुलवण्याचा ती रोजच प्रयत्न करायची. “एके दिवशी असे झाले की तो आपले काही कामकाज करावयास घरात गेला, त्यावेळी घरांतल्या माणसांपैकी कोणीहि मनुष्य तेथे घरांत नव्हता. तेव्हा तिने त्याचे वस्र धरून म्हटले, ‘मजपाशी नीज.’” पण योसेफ जो कुलपिता याकोबाचा पुत्र होता त्याने आपले वस्र पोटीफरच्या पत्नीच्या हाती सोडून दिले आणि तो बाहेर पळून गेला.—उत्पत्ति ३९:१-१२.
सगळेच लोक असा मोह आवरू शकत नाहीत. राजा शलमोनाने प्राचीन इस्राएलमध्ये रात्रीच्या वेळी रस्त्यावर पाहिलेल्या एका तरुणाविषयी सांगितले. या तरुणाला एका वेश्येने भुलवले तेव्हा तो “तत्काळ तिच्या मागे चालला, जसा बैल कापला जाण्यास जातो,” तसा तो तिच्या मागे चालू लागला.—नीतिसूत्रे ७:२१, २२.
“जारकर्माच्या प्रसंगापासून पळ” काढण्यास ख्रिश्चनांना सांगण्यात आले आहे. (१ करिंथकर ६:१८) तरुण ख्रिस्ती शिष्य तीमथ्य याला प्रेषित पौलाने असे लिहिले: “तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ.” (२ तीमथ्य २:२२) व्यभिचार, जारकर्म किंवा इतर कोणतेही अनैतिक कार्य करावयास लावणाऱ्या परिस्थितीत आपण सापडलोच तर योसेफ जसा पोटीफरच्या पत्नीपासून पळाला तसे आपणही अशा प्रसंगापासून दूर पळालो पाहिजे. असे निर्णायक पाऊल उचलायला कोणती गोष्ट आपल्याला साहाय्य करील? बायबलमधील नीतिसूत्रे या पुस्तकाच्या ७ व्या अध्यायात शलमोन आपल्याला अतिशय मौल्यवान सल्ला देतो. तो आपल्याला फक्त अनैतिक लोकांच्या कपटापासून बचाव करणारे शिक्षणच देत नाही तर ते कोणकोणते डावपेच रचतात त्याविषयीही तो आपल्याला सावध करतो. एक तरुण कशाप्रकारे एका वेश्येच्या आहारी गेला याचे अगदी स्पष्ट वर्णन शलमोनाने केले आहे.
‘माझ्या आज्ञा आपल्या बोटांस बांध’
राजा शलमोन, एखाद्या पित्याप्रमाणे सल्ला देतो. तो अशाप्रकारे सुरवात करतो: “माझ्या मुला माझी वचने राखून ठेव, माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेव. माझ्या आज्ञा पाळ म्हणजे तू वाचशील; माझी शिस्त तू आपल्या डोळ्यांतल्या बाहुलीप्रमाणे सांभाळ.”—नीतिसूत्रे ७:१, २.
आपल्या मुलांना चांगले आणि वाईट याबद्दल असलेल्या देवाच्या स्तरांची शिकवण देण्याची जबाबदारी देवाने पालकांना आणि खासकरून पित्याला दिली आहे. मोशेने पित्यांना असे म्हटले होते: “ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव. आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव; आणि घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निजता, उठता त्यांविषयी बोलत जा.” (अनुवाद ६:६, ७) आणि प्रेषित पौलाने असे लिहिले: “बापांनो तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका; तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा.” (इफिसकर ६:४) म्हणजेच, पालकांनी आपल्या मुलांना देवाचे वचन बायबल यांतील निर्बंध, आज्ञा आणि नियम यांचे शिक्षण द्यायचे होते. आणि मुलांनी पालकांचे हे अनमोल शिक्षण राखून ठेवायचे होते, म्हणजेच त्याप्रमाणे वागायचे होते.
बायबलमध्ये दिलेल्या नियमांव्यतिरिक्त पालक आपल्या मुलांना काही इतर नियम देखील देतात. जसे की प्रत्येक कुटुंबाचे काही विशिष्ट नियम असतात. हे नियम कुटुंबाच्या भल्यासाठीच असतात. अर्थात प्रत्येक कुटुंबात वेगवेगळे नियम असतील, कारण प्रत्येक कुटुंबाच्या वेगवेगळ्या गरजा असतात. कोणत्या नियमांचा अधिक फायदा आपल्या कुटुंबाला होईल हे पाहून त्यानुसार पालकांनी नियम ठरवले पाहिजेत. आईवडिलांना त्यांच्या मुलांबद्दल प्रेम असते आणि त्यांना त्यांची काळजी वाटते म्हणूनच ते हे नियम देतात. तेव्हा मुलांना असा सल्ला दिला जातो, की पालकांनी बनवलेले नियम आणि शास्त्रवचनांतून ते देत असलेले शिक्षण या दोन्हींचे त्यांनी पालन करावे. “डोळ्यातल्या बाहुलीप्रमाणे” त्यांना या नियमांचे जतन करून त्यांचे पालन केले पाहिजे. अशाने, यहोवाच्या स्तरांकडे दुर्लक्ष केल्यामुळे उद्भवणाऱ्या भयंकर परिणामांपासून ते स्वतःला वाचवू शकतात व ‘जिवंत राहू शकतात.’
शलमोन पुढे लिहितो: “ती आपल्या बोटांस बांध; ती आपल्या हृत्पटलावर लिहून ठेव.” (नीतिसूत्रे ७:३) आपण आपल्या हातांची बोटं नेहमी पाहतो; जणू ती नेहमी आपल्या डोळ्यांसमोर असतात. बहुतेक कामे आपण बोटांनीच करतो. तसेच, लहानपणापासून आपल्याला मिळालेल्या बायबलच्या शिक्षणाद्वारे आपल्याला जे धडे मिळालेत ते, आपण करत असलेल्या प्रत्येक कामात यहोवाच्या स्तरांची सतत आठवण करून देतात व आपले मार्गदर्शन करतात. यहोवाचे नियम आपण आपल्या हृदयावर लिहिले पाहिजे; हे नियम आपल्या व्यक्तिमत्त्वात भिनले पाहिजेत.
बुद्धी आणि समजुतदारपणा यांच्या महत्त्वावरही शलमोनाने जोर दिला आहे. तो म्हणतो: “तू माझी बहीण आहेस असे [बुद्धीला] म्हण; आणि [समजुतदारपणाला] आपली जिवलग मैत्रीण म्हण.” (नीतिसूत्रे ७:४) बुद्धी म्हणजे देवाने दिलेल्या ज्ञानाचा उचित वापर करणे. आपल्या बहिणीवर जसे आपण जिवापाड प्रेम करतो तसेच बुद्धीवरही आपले प्रेम असले पाहिजे. आणि समजुतदारपणा म्हणजे काय? समजुतदारपणा म्हणजे, एखादी गोष्ट जवळून पाहणे व तिचे विविध पैलू समजून घेणे. समजुतदारपणा आपल्याकरता जिवलग मित्राप्रमाणे असला पाहिजे.
शास्त्रवचनीय शिक्षणानुसार वागण्याची व बुद्धी आणि समजुतदारपणा यांच्याशी जवळीक साधण्याची काय गरज आहे? कारण, “त्यांच्या योगाने परस्त्रीपासून, गोड भाषण करणाऱ्या परक्या स्त्रीपासून [आपले] रक्षण होईल.” (नीतिसूत्रे ७:५) होय, अशाने आपण अनोळख्या अर्थात अनैतिक व्यक्तीच्या धूर्त व भुलविणाऱ्या मार्गांपासून स्वतःचे रक्षण करू शकू.a
तो तरुण एका “कावेबाज” स्त्रीला भेटतो
इस्राएलच्या राजाने पाहिलेल्या एका दृश्याचे तो अशाप्रकारे वर्णन करतो: “मी आपल्या घराच्या खिडकीजवळील जाळींतून बाहेर पाहिले तो, भोळ्या मंडळीत तरुण जनांमध्ये एक बुद्धीहीन तरुण पुरूष माझ्या दृष्टीस पडला. तो तिच्या घराच्या कोनाजवळून जाणाऱ्या आळीतून फिरत होता; तो तिच्या घराकडच्या वाटेने, संध्याकाळी दिवस मावळता, रात्रीच्या काळोखात निबिड अंधकारात गेला.”—नीतिसूत्रे ७:६-९.
एके दिवशी शलमोन, दिवेलागणीच्या वेळेस आपल्या महालाच्या खिडकीतून बाहेर पाहत उभा आहे. त्याच्या खिडकीला नक्षीदार जाळी आहे. बाहेरच्या अंधारात रस्तेही दिसेनासे झाले आहेत. अशा निबिड काळाखोत शलमोन एका तरुणाला पाहतो. या तरुणाकडे समज नाही, तो बुद्धीहीन आहे कारण आपण कोणत्या वस्तीत शिरलो आहोत, येथे आपल्याला कोणता धोका आहे हे त्याला माहीत असूनही तो तिच्या घराकडे जाणाऱ्या ‘वाटेवरून’ पुढे चालत आहे. पण ही ‘ती’ कोण आहे? आणि ती त्याला काय करणार असते?
शलमोन राजा पुढे म्हणतो: “तेव्हा वेश्येचा पोषाख केलेली कोणीएक कावेबाज स्त्री त्याला भेटली. ती वाचाळ व स्वच्छंदी असून तिचे पाय घरी टिकत नाहीत; कधी रस्त्यावर, कधी चव्हाट्यांवर, कधी प्रत्येक नाक्याजवळ ती टपत असते.”—नीतिसूत्रे ७:१०-१२.
या स्त्रीच्या कपड्यांवरूनच ती कोण असावी याचा आपण अंदाज लावू शकतो. (उत्पत्ति ३८:१४, १५) तिने असभ्य, वेश्येसारखा पोषाख घातला आहे. शिवाय ती “कावेबाज” आहे. ती “कपटी” आहे; आणि तिचा हेतू “धूर्त” आहे. (ॲन अमेरिकन ट्रॅन्सलेशन; न्यू इंटरनॅशनल व्हर्शन) ती वाचाळ व स्वच्छंदी आहे. वटवट करणारी व हट्टी आहे. आपल्याच मनानुसार वागणारी, निर्लज्ज व उद्धट आहे. तिचे पाय घरात टिकत नाहीत. कोणी बकरा मिळतो काय याच्या शोधात ती नेहमी असते. ती त्या तरुणासारख्याच लोकांना शोधत असते.
‘तिचे मोहक भाषण’
अशाप्रकारे हा तरुण धूर्त भाषण करणाऱ्या या स्त्रीला भेटतो. पुढे काय होते याची शलमोनाला निश्चितच उत्सुकता वाटली असावी! तो तिच्याविषयी म्हणतो: “तिने त्याला धरून त्याचे चुंबन घेतले; तिने निर्लज्ज मुखाने त्याला म्हटले; मला शांत्यर्पणे करावयाची होती; मी आपले नवस आज फेडून चुकले. ह्याकरिता तुला भेटावयाला व तुझे मुख पाहावयाला, मी बाहेर आले आहे आणि तू मला सांपडला आहेस.”—नीतिसूत्रे ७:१३-१५.
ही स्त्री गोड बोलून गळा कापणारी आहे. तिच्या बोलण्यावरून तिचे कपट दिसून येत नाही. असे वाटते, की या तरुणाला आपल्या पाशात अडकवण्यासाठी ती अगदी विचारपूर्वक बोलते. ‘मी आपले नवस आज फेडले आहे,’ असे बोलण्याद्वारे ती दाखवू इच्छिते की ती खूप धार्मिक आहे. जेरुसलेमच्या मंदिरात, मांस, पीठ, तेल आणि द्राक्षारस यांचे शांत्यर्पण दिले जात असे. (लेवीय १९:५, ६; २२:२१; गणना १५:८-१०) यज्ञ करणारा मनुष्य शांत्यर्पणातील काही हिस्सा स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी घेऊ शकत होता. त्यामुळे ही स्त्री तिच्या बोलण्यावरून असे सांगू इच्छित होती, की तिच्या घरात खायला प्यायला भरपूर होते. तिच्या बोलण्यामागचा अर्थ अगदी स्पष्ट होता: की या तरुणाला तिच्या घरात आरामात राहता येत होते. ती त्या तरुणाला असेही म्हणाली, की ‘मी तुलाच भेटायला आले होते.’ कोण विश्वास ठेवेल या स्त्रीच्या बोलण्यावर? “ती कोणाच्या तरी शोधात घराच्या बाहेर पडली होती हे नक्की, पण ती याच तरुणाला भेटायला आली होती, यात कितपत तथ्य आहे? या तरुणासारखा कोणी बावळटच तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवू शकतो,” असे एका बायबल विद्वानाने म्हटले.
आपल्या पोषाखाद्वारे, आपल्या गोड बोलण्याद्वारे, तिच्या आलिंगनाद्वारे आणि मदहोष करणाऱ्या तिच्या ओठांद्वारे ती या तरुणाला भुलवते. ती त्याला म्हणते: “मी आपला पलंग वेलबुट्टीदार गिरद्यांनी, मिसरी तागाच्या पट्टेदार वस्त्रांनी सजविला आहे. मी आपली गादी बोळ, अगरू व दालचिनी, यांनी सुवासिक केली आहे.” (नीतिसूत्रे ७:१६, १७) इजिप्तहून आणलेली रंगीबेरंगी चादर आंथरून तिने आपला पलंग सजवला आहे आणि त्यावर बोळ, अगरू व दालचिनीचे खास सुवासिक अत्तर लावले आहे.
मग ती त्याला म्हणते, “ये चल, आपण सकाळपर्यंत प्रीतीने रमून तृप्त होऊ; आपण प्रेमानंदाने आराम पावू.” हे आमंत्रण फक्त जेवणाचे आमंत्रण नाही. ती त्याला शारीरिक सुख देण्याचे वचन देते. आणि या तरुणासाठी तर हा नाविन्यपूर्ण व खूष करणारा अनुभव होता! पण ती एवढ्यावरच थांबत नाही. पुढे ती त्याला म्हणते: “कारण घरधनी घरी नाही; तो दूरच्या प्रवासाला गेला आहे; त्याने पैशांची पिशवी बरोबर नेली आहे; तो पौर्णिमेस घरी येईल.” (नीतिसूत्रे ७:१८-२०) असे बोलून ती या तरुणाला सांगू इच्छिते, की माझा नवरा कामानिमित्ताने दूर गेला असल्यामुळे इतक्यात तो पुन्हा घरी येणे शक्य नाही तेव्हा आपल्याला कसलीही भीती नाही. किती सहजरीत्या तिने या तरुणाला फसवले आहे! “तिने आपल्या पुष्कळ मोहक भाषणाने त्याला वश केले, आपल्या वाणीच्या माधुर्याने त्याला आकर्षून घेतले.” (नीतिसूत्रे ७:२१) हा मोहक प्रसंग टाळण्यासाठी एखाद्याकडे योसेफासारखे मनोबल हवे! (उत्पत्ति ३९:९, १२) आहे का अशी हिम्मत या तरुणाकडे?
“जसा बैल कापला जाण्यास जातो”
शलमोन पुढे आपल्याला सांगतो: “तो तत्काळ तिच्या मागे चालला, जसा बैल कापला जाण्यास जातो, जसा बेडी घातलेला मूर्ख शिक्षा भोगण्यास जातो, जसा पक्षी, पाश आपला जीव घेण्याकरिता आहे हे न जाणून त्याकडे धाव घेतो, तसा तो जातो; पण अखेरिस तीर त्याचे काळीज भेदून जातो.”—नीतिसूत्रे ७:२२, २३.
चालून आलेली ही संधी हा तरुण घालवू इच्छित नाही. बुद्धी गहाण ठेवलेल्या व्यक्तीप्रमाणे तो तिच्या मागे चालू लागतो. ‘बैल जसा कापला जाण्यासाठी’ चालतो, तसा तो तिच्या मागे मुकाट्याने चालू लागतो. बेड्या घातलेला कैदी जसा त्याला मिळणाऱ्या शिक्षेपासून पळून जाऊ शकत नाही तसेच हा तरुणही आपल्या पापाचे फळ भोगल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या डोळ्यांवरील या क्षणभंगुर सुखाच्या पडद्यामुळे त्याला समोरील धोका दिसत नाही. पण अखेरीस, एक ‘तीर त्याचे काळीज [यकृत] भेदून जातो’ म्हणजे, त्याला अशी इजा होते जी त्याला मृत्यूच्या खाईतही लोटू शकते. हा मृत्यू शारीरिक असू शकतो कारण त्याला लैंगिकरीत्या संक्रमित आजार होण्याची शक्यता असते.b किंवा या इजेमुळे तो आध्यात्मिकरीत्या मरण पावू शकतो; हा “पाश आपला जीव घेण्याकरता आहे हे” तो जाणत नाही. त्याचे संपूर्ण आयुष्य धुळीस मिळते. त्याने देवाविरुद्ध घोर पाप केले आहे. पक्षी जसा पाशात सहज अडकतो तसा हा तरुण मृत्यूच्या विळख्यात सहज अडकतो.
“तिच्या वाटांनी जाऊन बहकू नको”
शलमोनाने जे काही पाहिले त्यावरून धडा शिकून घेतल्यावर तो आपल्याला असे आर्जवतो: “तर माझ्या मुलांनो, माझे ऐका, माझ्या तोंडच्या वचनांकडे लक्ष द्या. तुझ्या मनाला तिच्या मार्गाकडे वळू देऊ नको, तिच्या वाटांनी जाऊन बहकू नको. कारण तिने बहुतांना घायाळ करून पाडिले आहे; तिने वधिलेल्या सर्वांची संख्या फार मोठी आहे. तिचे घर म्हटले म्हणजे अधोलोकाकडे, मृत्यूच्या खोल्यांकडे, खाली उतरण्याचा मार्ग होय.”—नीतिसूत्रे ७:२४-२७.
शलमोन राजा आपल्याला असा सल्ला देतो, की आपण अनैतिक लोकांच्या मरणप्राय मार्गांपासून दूर पळावे व ‘वाचावे.’ (नीतिसूत्रे ७:२) हा सल्ला आपल्या दिवसांसाठी किती समयोचित आहे! सावजाच्या शोधात जेथे लोक उभे असतात अशा ठिकाणी जाण्याचे आपण टाळले पाहिजे. मुद्दामहून वाघाच्या जबड्यात का म्हणून हात घालावा? का म्हणून आपण “बुद्धीहीन” होऊन ‘परक्या’ लोकांच्या वाटेवर फिरकावे?
राजाने पाहिलेल्या ‘परक्या स्त्रीने’ त्या तरुणाला “ये चल . . . आपण प्रीतीने रमून तृप्त होऊ” असे आमंत्रण दिले. अनेक युवकांना आणि खासकरून मुलींना अशाचप्रकारे भुलवले जात नाही का? समजा कोणी तुम्हाला अनैतिक कृत्य करायला भुलवत असेल तर थांबा आणि विचार करा की त्या व्यक्तीला तुमच्याविषयी खरोखरच प्रेम आहे की ती फक्त तिची कामवासना आहे? एखादा पुरूष खरोखरच एखाद्या स्त्रीवर प्रेम करत असेल तर तो तिला तिच्या ख्रिस्ती शिक्षणाच्या व विवेकाच्या विरुद्ध कार्य करायला भाग पाडेल का? याचकारणास्तव, शलमोन म्हणतो, की अशा ‘मार्गांकडे आपण आपले मन वळू देऊ नये.’
भुलविणाऱ्या व्यक्तीचे बोलणे अतिशय गोड व विचारपूर्वक असते. आपल्याजवळ बुद्धी व समजुतदारपणा असेल तर आपण अशा लोकांना लगेच ओळखू शकतो आणि त्यांच्यापासून दूर राहू शकतो. यहोवाच्या आज्ञा नेहमी लक्षात ठेवल्याने आपले संरक्षण होऊ शकते. या कारणास्तव, आपण नेहमी ‘देवाच्या आज्ञांचे पालन करू जेणेकरून आपण आपला जीव वाचवून’ सदासर्वकाळ जगू.—१ योहान २:१७.
[तळटीपा]
a नियमशास्त्राचे पालन करण्याचे सोडून यहोवापासून दूर गेलेल्या लोकांना ‘परके’ असे संबोधले जायचे. म्हणूनच, एका अनैतिक स्त्रीला जसे की एका वेश्येला ‘परकी स्त्री’ असे संबोधण्यात आले आहे.
b काही लैंगिकरीत्या संक्रमित आजार यकृताला हानी पोहंचवू शकतात. उदाहरणार्थ, सिफिलीस हा आजार बळावल्यावर या रोगाचे सूक्ष्म जीवाणु संपूर्ण यकृतभर पसरतात. आणि गनोरियासारख्या रोगाच्या जिवाणुंमुळे यकृताला सूज येते.
[२९ पानांवरील चित्रे]
आईवडिलांनी बनवलेले नियम तुम्हाला कसे वाटतात?
[३१ पानांवरील चित्र]
देवाच्या आज्ञा पाळणे जीवनदायक आहे