“तुमच्या तर्कशक्तीनुसार पवित्र सेवा”
“तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी, ही तुमच्या तर्कशक्तीनुसार पवित्र सेवा आहे.”—रोमकर १२:१, NW.
१, २. बायबल तत्त्वे लागू करण्याचे शिकणे नवीन भाषेवर प्रावीण्य मिळवण्यासारखे कसे आहे?
तुम्ही एखादी नवीन भाषा शिकण्याचा प्रयत्न केला आहे का? असे असल्यास, ते एक अवघड काम आहे याजशी तुम्ही निश्चितच सहमत असाल. शेवटी, यात केवळ नवे शब्द शिकण्यापेक्षाही अधिक काही गोवलेले आहे. निपुणतेने एखाद्या भाषेचा उपयोग करण्यासाठी तिच्या व्याकरणात प्रावीण्य मिळवण्याची गरज आहे. शब्दांचा एकमेकांशी काय संबंध आहे आणि ते जुळवून पूर्ण विचार कसे तयार होतात याचे तुम्हाला आकलन झाले पाहिजे.
२ हीच गोष्ट देवाच्या वचनाचे ज्ञान घेण्याच्या बाबतीतही खरी आहे. निवडक शास्त्रवचने पाठ करण्यापेक्षाही अधिक गोष्टींचा यात समावेश आहे. आलंकारिक भाषेत म्हणावयाचे तर, आपण बायबलचे व्याकरणही शिकले पाहिजे. शास्त्रवचने एकमेकांशी कशी संबंधित आहेत आणि ती दररोजच्या जीवनात लागू केली जाऊ शकणारी तत्त्वे म्हणून कशी उपयोगी पडतात हे आपण समजून घेण्याची गरज आहे. अशाप्रकारे आपण, “पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज” होऊ शकतो.—२ तीमथ्य ३:१७.
३. देवाची सेवा करण्याच्या बाबतीत, सा. यु. ३३ मध्ये कोणता बदल घडला?
३ मोशेच्या नियमशास्त्राच्या व्यवस्थेखाली स्पष्ट केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्याने विश्वासूपणा मोठ्या प्रमाणात प्रदर्शित केला जाऊ शकत होता. तथापि, सा. यु. ३३ मध्ये यहोवाने नियमशास्त्र रद्द केले, वास्तविकतेत, त्याचा पुत्र ज्या स्तंभावर मारला गेला त्या ‘वधस्तंभावर ते खिळले.’ (कलस्सैकर २:१३, १४) त्यानंतर, देवाच्या लोकांना अर्पण करण्याच्या बलिदानांची आणि पाळाव्या लागणाऱ्या नियमांची यादी देण्यात आली नाही. त्याउलट, त्यांना सांगण्यात आले: “आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी, ही तुमच्या तर्कशक्तीनुसार पवित्र सेवा आहे.” (रोमकर १२:१, NW) होय, ख्रिश्चनांना देवाच्या सेवेत आपले पूर्ण अंतःकरण, जीव, मन आणि शक्तीने परिश्रम करावयाचे होते. (मार्क १२:३०; पडताळा स्तोत्र ११०:३.) परंतु, “तुमच्या तर्कशक्तीनुसार पवित्र सेवा” करण्याचा काय अर्थ होतो?
४, ५. आपल्या तर्कशक्तीने यहोवाची सेवा करण्यामध्ये काय गोवलेले आहे?
४ “तर्कशक्ती” ही संज्ञा ग्रीक शब्द लो·गी·कोसʹ यातून भाषांतरीत केली आहे, तिचा अर्थ “समंजस” किंवा “बुद्धिमान” असा होतो. देवाच्या सेवकांकडून बायबल-प्रशिक्षित विवेकाचा उपयोग करण्याची अपेक्षा केली जाते. ख्रिश्चनांनी आपले निर्णय अनेक पूर्व-निर्मित नियमांवर आधारण्याऐवजी, बायबलची तत्त्वे काळजीपूर्वक तोलून पाहण्यास हवी. बायबलचे “व्याकरण” किंवा त्याचे विविध तत्त्व एकमेकांशी कसे संबंधित आहेत हे त्यांना समजले पाहिजे. अशाप्रकारे, ते आपल्या तर्कशक्तीनुसार संतुलित निर्णय घेऊ शकतात.
५ याचा अर्थ ख्रिश्चनांना कोणतेही नियम नाहीत असा होतो का? मुळीच नाही. ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचने स्पष्टतः, मूर्तिपूजा, लैंगिक अनैतिकता, खून, लबाडी, भूतविद्या, रक्ताचा दुरुपयोग आणि इतर अनेक पापांची मनाई करतात. (प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९; १ करिंथकर ६:९, १०; प्रकटीकरण २१:८) तरीसुद्धा, आपल्या तर्कशक्तीचा बायबल तत्त्वे शिकण्यात व लागू करण्यात उपयोग केला पाहिजे अशी अपेक्षा इस्राएल लोकांकडून करण्यात आली त्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात आपल्याकडून केली जाते. एखादी नवीन भाषा समजून घेण्याप्रमाणेच यासाठी वेळ आणि परिश्रमाची गरज आहे. आपली तर्कशक्ती कशी विकसित केली जाऊ शकते?
तुमची तर्कशक्ती विकसित करणे
६. बायबलचा अभ्यास करण्यामध्ये काय समाविष्ट आहे?
६ प्रथम, आपण बायबलचे अतिउत्साही विद्यार्थी असावयास हवे. देवाचे प्रेरित वचन, “सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्यांकरिता उपयोगी आहे.” (२ तीमथ्य ३:१६) एखाद्या समस्येचे उत्तर बायबलच्या एकाच वचनात मिळण्याची अपेक्षा आपण नेहमीच बाळगू नये. त्याउलट, एका विशिष्ट परिस्थितीवर किंवा समस्येवर प्रकाश पाडणाऱ्या अनेक शास्त्रवचनांवर आपल्याला तर्क करावा लागेल. आपल्याला त्या गोष्टीवरील देवाच्या विचाराचा मेहनतीने शोध घ्यावा लागेल. (नीतीसूत्रे २:३-५) आपल्याकडे समजूतदारपणा असण्याची देखील गरज आहे कारण ‘सुविचार प्राप्त करून घेणारा समजूतदार आहे.’ (नीतीसूत्रे १:५) एक समजूतदार व्यक्ती एखाद्या बाबीचे प्रत्येक घटक वेगळे करून त्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे याचे आकलन करू शकते. एखाद्या कोड्याप्रमाणे ती व्यक्ती संपूर्ण चित्र दिसण्याकरता त्याचे सर्व भाग जुळवते.
७. शिस्तीच्या बाबतीत पालक बायबल तत्त्वांवर कारणमीमांसा कशी करू शकतात?
७ उदाहरणार्थ, पालकत्वाचीच गोष्ट घ्या. नीतीसूत्रे १३:२४ म्हणते की जो पिता आपल्या पुत्रावर प्रेम करतो तो “त्याला शिक्षा करितो.” केवळ याच शास्त्रवचनाचा विचार केल्यास, हे शास्त्रवचन कठोर, कडक शिक्षेला मान्यता देते असा गैर अर्थ लावला जाऊ शकतो. तथापि, कलस्सैकर ३:२१ संतुलित बोध करते: “बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका; आणाल तर ती खिन्न होतील.” जे पालक आपल्या तर्कशक्तीचा उपयोग करतात आणि या तत्त्वांचा मेळ घालतात ते “गैरवागणूक” असणाऱ्या शिस्तीचा वापर करणार नाहीत. ते आपल्या मुलांशी प्रेमाने, समजूतीने आणि सभ्यतेने व्यवहार करतील. (इफिसकर ६:४) यास्तव, पालकत्वाचा किंवा बायबल तत्त्वांचा समावेश असणाऱ्या इतर कोणत्याही बाबतीत सर्व संबंधित गोष्टींचा काळजीपूर्वक विचार करून आपण आपली तर्कशक्ती विकसित करू शकतो. अशा प्रकारे, आपण देवाचा हेतू काय होता आणि तो कसा साध्य करावा याविषयी बायबल तत्त्वांचे “व्याकरण” समजू शकतो.
८. मनोरंजनाची बाब येते तेव्हा आपण कडक, दुराग्रही दृष्टिकोन कसे टाळू शकतो?
८ आपली तर्कशक्ती विकसित करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे, कडक, दुराग्रही दृष्टिकोन टाळणे होय. कडक दृष्टिकोन आपल्या तर्कशक्तीची वाढ खुंटवतो. मनोरंजनाच्या गोष्टीचा विचार करा. बायबल म्हणते: “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” (१ योहान ५:१९) जगाने निर्माण केलेले प्रत्येक पुस्तक, चलचित्र किंवा टीव्ही कार्यक्रम भ्रष्ट आणि सैतानी आहेत असा याचा अर्थ होतो का? असा दृष्टिकोन वाजवी ठरणार नाही. अर्थात, काहीजण टीव्ही, चित्रपट किंवा ऐहिक साहित्यापासून स्वतःला पूर्णपणे दूर ठेवण्याचे निवडतील. तो त्यांचा हक्क आहे आणि त्यासाठी त्यांची टीका केली जाऊ नये. परंतु, इतरांनीही अशीच कडक भूमिका घ्यावी यासाठी त्यांनी देखील इतरांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये. संस्थेने बायबलची तत्त्वे प्रस्तुत करणारे लेख प्रकाशित केले आहेत ज्यांनी आपल्याला विरंगुळ्याबद्दल किंवा मनोरंजनाविषयी सुज्ञतेने निवडक असण्यात मदत देण्यास हवी. या मार्गदर्शनांपलीकडे जाऊन या जगातील मनोरंजनात अधिककरून असणारे अनैतिक विचार, घोर हिंसा किंवा भूतविद्या यांची झळ आपण स्वतःला लावून घेणे, ही खूपच मूर्खपणाची गोष्ट आहे. खरेच, मनोरंजनाची सुज्ञ निवड ही आपल्याकडून, देवासमोर आणि मनुष्यासमोर शुद्ध विवेक असावा म्हणून बायबल तत्त्वे लागू करण्यास तर्कशक्तीचा उपयोग करण्याची मागणी करते.—१ करिंथकर १०:३१-३३.
९. “सर्व प्रकारचा विवेक” याचा काय अर्थ होतो?
९ आजचे बहुतेक मनोरंजन ख्रिश्चनांकरता स्पष्टपणे अयोग्य आहे.a यास्तव, आपण आपली अंतःकरणे ‘वाईटाचा द्वेष करण्यास’ प्रशिक्षित केली पाहिजेत जेणेकरून आपण पहिल्या शतकातील जे लोक “कोडगे” होते त्यांच्याप्रमाणे बनणार नाही. (स्तोत्र ९७:१०; इफिसकर ४:१७-१९) अशा गोष्टींची कारणमीमांसा करण्यासाठी, आपल्याला ‘अचूक ज्ञान व सर्व प्रकारचा विवेक’ हवा आहे. (फिलिप्पैकर १:९) ‘विवेक’ असा भाषांतरीत केलेला ग्रीक शब्द “संवेदनशील नैतिक आकलन” यास सूचित करतो. तो शब्द दृष्टी यासारख्या प्रत्यक्ष मानवी ज्ञानेन्द्रियांना सूचित करतो. मनोरंजनाची किंवा व्यक्तिगत निर्णयाची आवश्यकता असणारी इतर कोणतीही बाब असते तेव्हा, आपल्या नैतिक ज्ञानेन्द्रियाला एकाग्र केले पाहिजे जेणेकरून आपल्याला केवळ स्पष्ट दाखवलेल्या बऱ्यावाईटाचेच नव्हे तर त्यांच्यामधील इतर गोष्टींचे देखील आकलन होऊ शकेल. त्याचवेळी, बायबल तत्त्वे काही अवाजवी कडक नियमांना लागू करण्याचे व आपल्या सर्व बांधवांनी तेच करावे असा अट्टाहास धरण्याचे आपण टाळावे.—फिलिप्पैकर ४:५.
१०. स्तोत्र १५ मध्ये दिल्याप्रमाणे आपण यहोवाचे व्यक्तिमत्त्व कसे समजू शकतो?
१० आपली तर्कशक्ती विकसित करण्याचा तिसरा मार्ग म्हणजे, यहोवाच्या विचारपद्धतीची जाणीव राखणे आणि ती आपल्या अंतःकरणात खोलवर रुजवणे. यहोवा त्याचे व्यक्तिमत्त्व आणि दर्जे यांना आपल्या वचनात प्रकट करतो. उदाहरणार्थ, यहोवा कोणत्या प्रकारच्या व्यक्तीला आपल्या मंडपात वस्ती करण्यास अनुमती देतो याबद्दल स्तोत्र १५ मध्ये आपण वाचतो. अशा प्रकारची व्यक्ती नीतिमत्व अनुसरते, अंतःकरणापासून सत्य बोलते, तिच्या अभिवचनांशी विश्वासू राहते आणि इतरांचा स्वार्थीपणाने लाभ घेत नाही. हे स्तोत्र वाचत असताना, स्वतःला विचारा, ‘हे गुण माझे वर्णन करतात का? यहोवा मला त्याच्या मंडपात वस्ती करावयास आमंत्रण देईल का?’ आपण यहोवाचे मार्ग आणि विचारशैली यांच्या एकवाक्यतेत येतो तेव्हा आपली आकलन शक्ती बळकट केली जाते.—नीतीसूत्रे ३:५, ६; इब्रीयांस ५:१४.
११. परूश्यांनी “न्याय व देवाची प्रीति ह्यांकडे दुर्लक्ष” कसे केले?
११ परूशी याच विशिष्ट बाबीमध्ये खूप अपयशी ठरले. परूश्यांना नियमशास्त्राची तांत्रिक मांडणी माहीत होती परंतु, त्याच्या ‘व्याकरणाचे’ आकलन होत नव्हते. ते नियमशास्त्राचे लाखो तपशील तोंडपाठ म्हणू शकत होते परंतु त्यामागील व्यक्तिमत्त्व समजून घेण्यास ते अपयशी ठरले. येशूने त्यांना सांगितले: “तुम्ही पुदिना, सताप व प्रत्येक भाजी ह्यांचा दशांश देता, पण न्याय व देवाची प्रीति ह्यांकडे दुर्लक्ष करिता!” (लूक ११:४२) त्यांच्या कठोर मनांमुळे व कठीण अंतःकरणांमुळे परूशी आपली तर्कशक्ती उपयोगात आणण्यास अपयशी ठरले. त्यांनी येशूच्या शिष्यांची, शब्बाथाच्या दिवशी कणसे तोडल्याबद्दल व त्यातील दाणे खाल्ल्याबद्दल टीका केली तेव्हा त्यांची अव्यावहारिक कारणमीमांसा प्रदर्शित झाली; तरीपण, त्याच दिवशी नंतर त्यांनी येशूचा वध करण्याचा कट रचला तेव्हा त्यांचा विवेक त्यांना मुळीच बोचला नाही!—मत्तय १२:१, २, १४.
१२. यहोवाला व्यक्ती समजून त्याच्या अधिक एकवाक्यतेत आपण कसे येऊ शकतो?
१२ आपण परूश्यांपेक्षा वेगळे असावयास हवे. देव वचनाच्या आपल्या ज्ञानाने, यहोवाला व्यक्ती समजून त्याच्या अधिक एकवाक्यतेत राहण्यास मदत केली पाहिजे. आपण हे कसे करू शकतो? बायबल किंवा बायबल आधारित साहित्याचा काही भाग वाचल्यावर काहींना अशा चिंतन करण्याजोग्या प्रश्नांमुळे मदत मिळाली आहे, ‘ही माहिती मला यहोवा व त्याच्या गुणांविषयी काय शिकवते? इतरांसोबतच्या माझ्या व्यवहारात मी यहोवाचे गुण कसे प्रदर्शित करू शकतो?’ अशा प्रश्नांवर मनन केल्याने आपली तर्कशक्ती विकसित होते आणि आपल्याला ‘देवाचे अनुकरण करणारे होण्यास’ मदत मिळते.—इफिसकर ५:१.
मनुष्यांचे नव्हे तर देवाचे व ख्रिस्ताचे दास
१३. परूशी नैतिक हुकुमशहांप्रमाणे कसे वागत होते?
१३ वडिलांनी त्यांच्या निगराणीमध्ये असणाऱ्यांना त्यांच्या तर्कशक्तीचा उपयोग करण्यास वाव द्यावयास हवा. मंडळीचे सदस्य मनुष्यांचे दास नाहीत. पौलाने लिहिले, “मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतुष्ट करीत राहिलो असतो तर मी ख्रिस्ताचा दास नसतो.” (गलतीकर १:१०; कलस्सैकर ३:२३, २४) त्याउलट, देवापेक्षा मनुष्यांची स्वीकृती मिळवणे अधिक महत्त्वाचे आहे असा विश्वास लोकांनी करावा अशी परूश्यांची इच्छा होती. (मत्तय २३:२-७; योहान १२:४२, ४३) परूश्यांनी स्वतःला नैतिक हुकुमशहा म्हणून नियुक्त केले, ते स्वतःचे नियम बनवत असत आणि इतर त्यास किती पात्र होते यावरून त्यांचा न्याय करीत असत. जे परूश्यांचे अनुयायी बनले, ते बायबल-प्रशिक्षित विवेकाचा उपयोग करण्यात कमजोर झाले परिणामतः, ते मनुष्यांचे दास झाले.
१४, १५. (अ) वडील कळपासोबत सहकारी असल्याचे कसे दाखवून देऊ शकतात? (ब) वडिलांनी विवेकाच्या बाबी कशा हाताळाव्या?
१४ ख्रिस्ती वडिलांना आज ठाऊक आहे की, कळप प्रामुख्याने त्यांना जबाबदार नाही. प्रत्येक ख्रिश्चनाने त्याचा किंवा तिचा भार वाहिला पाहिजे. (रोमकर १४:४; २ करिंथकर १:२४; गलतीकर ६:५) हे योग्य आहे. खरे म्हणजे, कळपाचे सदस्य मनुष्यांचे दास असते व त्यांच्यावर देखरेख केली जाते म्हणून ते आज्ञेत राहिले असते, तर देखरेख करणारे लोक जवळ नसताना त्यांनी काय केले असते? फिलिप्पैकरांबद्दल आनंद करण्याचे पौलाकडे कारण होते: “जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करीत आला आहा, ते तुम्ही, मी जवळ असता केवळ नव्हे तर विशेषकरून आता, म्हणजे मी जवळ नसताहि भीत व कापत आपले तारण साधून घ्या.” ते खरोखरच पौलाचे नव्हे तर ख्रिस्ताचे दास होते.—फिलिप्पैकर २:१२.
१५ यास्तव, विवेकाच्या बाबतीत, वडील त्यांच्या निगराणीमध्ये असणाऱ्यांसाठी निर्णय घेत नाहीत. एखाद्या गोष्टीमध्ये गोवलेल्या बायबल तत्त्वांचे स्पष्टीकरण ते देतात आणि त्यामध्ये गोवलेल्या वैयक्तिकांना निर्णय घेण्यासाठी त्यांच्या तर्कशक्तीचा उपयोग करण्यास मुभा देतात. ही गंभीर जबाबदारी आहे तरीपण त्या व्यक्तीने ती स्वतः उचलली पाहिजे.
१६. समस्या हाताळण्यासाठी इस्राएलमध्ये कोणती व्यवस्था होती?
१६ यहोवाने इस्राएलला मार्गदर्शित करण्यासाठी शास्त्यांचा उपयोग केला त्या काळचा विचार करा. बायबल आपल्याला सांगते: “त्या काळी इस्राएलाला कोणी राजा नव्हता; ज्याला जसे बरे दिसे तसे तो करी.” (शास्ते २१:२५) तरीसुद्धा, यहोवाने आपल्या लोकांना मार्गदर्शन मिळवण्याकरता माध्यम पुरवले. प्रत्येक शहरात प्रश्न आणि समस्यांसाठी अनुभवी मदत पुरवू शकणारे वडील जन होते. त्याशिवाय, लोकांना देवाच्या नियमांचे शिक्षण देण्याकरवी लेवीय याजक चांगल्या गोष्टींसाठी प्रेरणा असे होते. विशेष कठीण बाबी उद्भवल्या तर, महायाजक देवाकडून उरीम व थुमीमच्या साहाय्याने सल्ला घेऊ शकत होता. शास्त्रवचनांवर सूक्ष्मदृष्टी (इंग्रजी) विवेचन मांडते: “जी व्यक्ती या गोष्टींचा फायदा करून घेत होती, देवाच्या नियमांचे ज्ञान जिने मिळवले होते व ते लागू केले होते तिला आपल्या विवेकासाठी चांगला मार्गदर्शक होता. अशा बाबतीत ‘तिला बरे दिसे’ तसे केल्याने वाईट परिणाम होणार नव्हता. यहोवाने लोकांना स्वखुशीची किंवा नाखुशीची मनोवृत्ती आणि मार्गाक्रमण दाखवण्यास अनुमती दिली.”—खंड २, पृष्ठे १६२-३.b
१७. वडील स्वतःच्या नव्हे तर देवाच्या दर्जांनुरूप सल्ला देतात हे कसे दाखवून देऊ शकतात?
१७ इस्राएली शास्ते व याजकांप्रमाणे, मंडळीतील वडील समस्यांसाठी अनुभवी मदत पुरवतात आणि मौल्यवान सल्ला देतात. काहीवेळा, ते ‘सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखवतात, निषेध करतात व बोध देखील करतात.’ (२ तीमथ्य ४:२) असे ते स्वतःच्या नव्हे तर देवाच्या दर्जांनुरूप करतात. वडील उदाहरणीय बनतात व अंतःकरणांपर्यंत पोहंचण्याचा प्रयत्न करतात तेव्हा हे किती परिणामकारक ठरते!
१८. वडिलांनी अंतःकरणांप्रत पोहंचावे हे विशेषकरून परिणामकारक का आहे?
१८ अंतःकरण हे आपल्या ख्रिस्ती कार्यहालचालीचे “इंजिन” आहे. यास्तव बायबल म्हणते: “त्यात जीवनाचा उगम आहे.” (नीतीसूत्रे ४:२३) जे वडील अंतःकरणांना उत्तेजन देतात त्यांना हे दिसून येईल की, अशा प्रकारे मंडळीतील सर्वांना देवाची सेवा करण्यात होईल तितके करण्यास प्रेरणा मिळते. ते पुढाकार घेणारे होतील, इतरांनी प्रत्येक वेळा त्यांना टुमणे लावण्याची गरज राहणार नाही. यहोवाला बळजबरीची आज्ञाधारकता नको. प्रेमाने ओथंबलेल्या अंतःकरणातून येणाऱ्या आज्ञाधारकतेचा तो शोध घेतो. वडिलजन, कळपातील लोकांना त्यांची तर्कशक्ती विकसित करण्यास मदत देऊन अशा अंतःकरणाने प्रेरित झालेल्या सेवेसाठी उत्तेजन देऊ शकतात.
“ख्रिस्ताचे मन” विकसित करणे
१९, २०. आपण ख्रिस्ताचे मन विकसित करावे हे आपल्यासाठी महत्त्वाचे का आहे?
१९ निरीक्षिल्याप्रमाणे, केवळ देवाचे नियम जाणणे पुरेसे नाही. स्तोत्रकर्त्याने विनवणी केली, “मला बुद्धि दे, म्हणजे मी तुझे नियमशास्त्र पाळीन; खरोखर अगदी मनापासून ते मी पाळीन.” (स्तोत्र ११९:३४) यहोवाने त्याच्या वचनात “ख्रिस्ताचे मन” प्रकट केले आहे. (१ करिंथकर २:१६) आपल्या तर्कशक्तीने यहोवाची सेवा केलेली व्यक्ती, या नात्याने येशूने आपल्यासाठी परिपूर्ण कित्ता घालून दिला आहे. त्याला देवाचे नियम व तत्त्वे समजली व त्याने त्यामध्ये कोणतीही खोट न काढता त्यांचा अवलंब केला. त्याच्या उदाहरणाचा अभ्यास करून, आपण “तिची रुंदी, लांबी, उंची व खोली किती हे . . . समजून घ्यावयास व बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीति ओळखून घ्यावयास शक्तिमान” होऊ. (इफिसकर ३:१७-१९) होय, आपण येशूविषयी बायबलमधून जे वाचतो ते वरवरच्या ज्ञानापेक्षाही अधिक आहे; यहोवा स्वतः कसा आहे याचे स्पष्ट चित्र ते आपल्याला देते.—योहान १४:९, १०.
२० अशा प्रकारे, देवाच्या वचनाचा अभ्यास करताना, आपण प्रत्येक गोष्टीवरील यहोवाचा विचार काय आहे हे समजून संतुलित निर्णयाप्रत पोहंचू शकतो. यासाठी परिश्रम लागतील. आपण देवाच्या वचनाचे अतिउत्साही विद्यार्थी झाले पाहिजे व यहोवाचे व्यक्तिमत्त्व व त्याचे दर्जे याबद्दल स्वतःला संवेदनशील केले पाहिजे. आपण जणू नवे व्याकरण शिकत आहोत. तथापि, असे करणारे लोक, “[त्यांनी] आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी, ही [त्यांच्या] तर्कशक्तीनुसार पवित्र सेवा आहे,” या पौलाच्या सल्ल्याचे अनुकरण करत असतील.—रोमकर १२:१.
[तळटीपा]
a ही गोष्ट सैतानी, अश्लील किंवा क्रूरतेचा समावेश असणाऱ्या मनोरंजनाला तसेच ख्रिस्ती मान्य करू न शकणाऱ्या स्वैर किंवा स्वतंत्र कल्पनांना उत्तेजन देणाऱ्या तथाकथित कौटुंबिक मनोरंजनाला प्रतिबंध घालते.
b वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉर्क, इंका., द्वारे प्रकाशित.
तुम्ही काय शिकलात?
◻ सा. यु. ३३ मध्ये देवाची सेवा करण्याविषयी कोणता बदल घडला?
◻ आपण आपली तर्कशक्ती कशी विकसित करू शकतो?
◻ देवाचे व ख्रिस्ताचे दास होण्यास वडील कळपातील लोकांना मदत कशी करू शकतात?
◻ आपण “ख्रिस्ताचे मन” विकसित का करावे?
[२३ पानांवरील चित्रं]
वडील इतरांना त्यांच्या तर्कशक्तीचा उपयोग करण्यास मदत करतात