यहोवाच्या संघटनेशी एकनिष्ठेने सेवा करणे
“एकनिष्ठ मनुष्याशी तू एकनिष्ठेने वागशील.”—२ शमुवेल २२:२६, NW.
१, २. एकनिष्ठेची अशी कोणती उदाहरणे आहेत जी मंडळीत आपण सर्वजण पाहू शकतो?
एक वडील, एके संध्याकाळी ख्रिस्ती सभेतील आपले भाषण तयार करतात. त्यांना विश्राम घ्यावासा वाटतो; पण त्याऐवजी ते लोकांच्या अंतःकरणाप्रत पोहंचू शकतील व कळपाला उत्तेजन देऊ शकतील अशा शास्त्रवचनीय उदाहरणांसाठी व दाखल्यांसाठी संशोधन करतात. त्याच मंडळीतील थकूनभागून गेलेल्या पालकांच्या एका जोडीला घरात राहून निवान्तपणे संध्याकाळ घालवण्याची इच्छा होते; पण त्याऐवजी सहनशीलतेने ते आपल्या मुलांना तयार करून सभेला जातात. सभेनंतर काही ख्रिस्ती, वडिलांच्या भाषणाची चर्चा करतात. एका भगिनीला, याच वडिलांनी एकदा तिला कसे दुखवले होते ते सांगण्याचा मोह होतो; पण त्याऐवजी ती त्याने उल्लेखलेल्या मुद्द्यांविषयी अगदी आवेशाने बोलते. या दृष्यांतील सामान्य धागा तुम्हाला दिसतो का?
२ तो धागा आहे एकनिष्ठा. देवाच्या कळपाची सेवा करण्यासाठी वडील एकनिष्ठेने कार्य करतात; पालक एकनिष्ठेने मंडळीच्या सभांना उपस्थित राहतात; ती भगिनी एकनिष्ठेने वडिलांना पाठिंबा देते. (इब्री लोकांस १०:२४, २५; १३:१७; १ पेत्र ५:२) होय, जीवनाच्या हरएक पैलूत आपण, यहोवाच्या लोकांनी देवाच्या संघटनेशी एकनिष्ठेने सेवा करण्याचा निर्धार केल्याचे पाहतो.
३. आपण यहोवाच्या पार्थिव संघटनेशी एकनिष्ठ राहणे इतके महत्त्वपूर्ण का आहे?
३ यहोवा या भ्रष्ट जगाकडे पाहतो तेव्हा त्याला फार कमी प्रमाणात एकनिष्ठा दिसून येते. (मीखा ७:२) आपल्या लोकांची एकनिष्ठा पाहून त्याचे मन किती प्रफुल्लित होते! होय, तुमची एकनिष्ठा त्याला आनंदविते. परंतु, मूळ बंडखोर सैतानाला याचा राग येतो व यावरून तो लबाड ठरतो. (नीतिसूत्रे २७:११; योहान ८:४४) सैतान, यहोवाशी आणि यहोवाच्या पार्थिव संघटनेशी असलेल्या तुमच्या एकनिष्ठेचा भंग करण्याचा प्रयत्न करील अशी अपेक्षा करा. सैतान ज्या मार्गांद्वारे असे करतो त्यांचा आपण विचार करू या. अशाप्रकारे आपण शेवटपर्यंत एकनिष्ठ कसे राहू शकतो ते आपल्याला चांगल्याप्रकारे माहीत होईल.—२ करिंथकर २:११.
अपरिपूर्णतांवर लक्ष केंद्रित केल्यास एकनिष्ठेचा नाश
४. (अ) अधिकारपदावर असलेल्यांबद्दल टिकात्मक दृष्टिकोन बाळगणे इतके सोपे का असते? (ब) कोरह यहोवाच्या संघटनेशी बेईमान कसा ठरला?
४ जबाबदार पदावर असलेल्या बांधवाच्या चुका कदाचित अधिक स्पष्ट दिसू लागतील. “आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणिता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ” काढणे किती सोपे असते, हो ना? (मत्तय ७:१-५) परंतु, चुकांवर सारखा सारखा विचार केल्यास आपल्यामध्ये बेईमानपणा उत्पन्न होऊ शकतो. कोरह आणि दावीद यांच्यातील फरक पाहा. कोरहवर खूप जबाबदाऱ्या होत्या व कदाचित तो अनेक वर्षांपासून एकनिष्ठ राहिला असेल पण कालांतराने महत्त्वाकांक्षी बनला. आपल्या चुलत भावांच्या अर्थात मोशे व अहरोनाच्या अधिकाराची त्याला चीड येऊ लागली. मोशे सर्व मनुष्यात नम्र होता पण कोरह त्याच्याकडे टिकात्मक नजरेने पाहू लागला. त्याला कदाचित मोशेमध्ये चुका दिसून आल्या असतील. परंतु, या चुका कोरहला यहोवाच्या संघटनेशी बेईमान होण्यासाठी समर्थन देत नाहीत. मंडळीमधून त्याचा नाश करण्यात आला.—गणना १२:३; १६:११, ३१-३३.
५. शौलाविरुद्ध बंड करावयास दाविदाला मोह का झाला असता?
५ दुसरीकडे पाहता, दाविदाने राजा शौलाच्या अधिपत्याखाली सेवा केली. एकेकाळी भला पुरुष असलेला राजा शौल अक्षरशः दुष्ट बनला. द्वेषी शौलाच्या हल्ल्यांपासून वाचण्याकरता दाविदाला विश्वास, सहनशीलता आणि चातुर्याची देखील गरज होती. पण, दाविदाला एकदा प्रतिकार करण्याची संधी मिळाली तेव्हा तो म्हणाला, की यहोवाने ज्याचा अभिषेक केला आहे अशा विरुद्ध बेईमान कृत्य करण्याचा ‘यहोवाच्या दृष्टिकोनातून तो विचार देखील करू शकत नाही.’—१ शमुवेल २६:११.
६. वडिलांमध्ये आपण कमजोरी किंवा चुका पाहतो तेव्हा देखील आपण काय केले पाहिजे?
६ आपल्यापैकी पुढाकार घेणारे कधीकधी न्याय करण्यात चूक करतात, कठोरतेने बोलतात किंवा पक्षपातीपणा दाखवत असल्यासारखे भासतात तेव्हा आपण त्यांच्याविरुद्ध कुरकूर करून व कदाचित मंडळीमध्ये निंदाखोर आत्मा वाढवता का? निषेध व्यक्त करण्यासाठी आपण ख्रिस्ती सभांपासून वंचित राहू का? निश्चितच नाही! दाविदाप्रमाणे आपणही दुसऱ्यांच्या चुकांमुळे यहोवा आणि त्याच्या संघटनेशी बेईमान होण्यास स्वतःला प्रवृत्त करण्यासाठी वाव देणार नाही!—स्तोत्र ११९:१६५.
७. जेरूसलेममधील मंदिराच्या बाबतीत कोणत्या भ्रष्ट चालीरितींचा विकास झाला आणि येशूला याबद्दल कसे वाटले?
७ येशू ख्रिस्त एकनिष्ठेचे सर्वात महान मानवी उदाहरण होता; यहोवाचा “एकनिष्ठ” असे त्याचे भविष्यसूचक वर्णन करण्यात आले आहे. (स्तोत्र १६:१०, NW) जेरुसलेममधील मंदिराच्या भ्रष्ट दुरूपयोगामुळे एकनिष्ठा प्रदर्शित करणे आव्हानासारखे वाटले असावे. येशूला ठाऊक होते, की महायाजकाचे कार्य आणि बलिदाने त्याच्या स्वतःच्या सेवेला आणि बलिदानरूपी मृत्यूला पूर्वसूचित करत होते आणि त्याला हेही ठाऊक होते, की या गोष्टींमधून लोकांनी शिकून घेणे किती महत्त्वाचे होते. म्हणूनच, जेव्हा त्याने मंदिराला “लुटारूंची गुहा” झाल्याचे पाहिले तेव्हा त्याच्यात धार्मिक क्रोध संचारला. देव-प्रदत्त अधिकाराद्वारे मंदिर स्वच्छ करण्यासाठी त्याने दोनदा पाऊल उचलले.a—मत्तय २१:१२, १३; योहान २:१५-१७.
८. (अ) येशूने मंदिर व्यवस्थेला एकनिष्ठा कशी दाखवली? (ब) यहोवाच्या शुद्ध संघटनेसोबत आपण त्याची उपासना केली पाहिजे ही गोष्ट आपल्याला समजल्याचे आपण कसे दाखवू शकतो?
८ तरीसुद्धा, येशूने एकनिष्ठेने मंदिर व्यवस्थेला पाठिंबा दिला. बालपणापासून तो मंदिरातील सणासुदीला उपस्थित राहत असे व बहुतेकवेळा तेथे शिकवत असे. मंदिराचे कर भरण्याचे बंधन नसतानाही त्याने ते भरले. (मत्तय १७:२४-२७) एका गरीब विधवेने मंदिराच्या भांडारात “आपली सर्व उपजीविका” टाकल्याबद्दल येशूने तिची प्रशंसा केली. त्यानंतर काही काळातच, यहोवाने कायमसाठीच त्या मंदिराचा त्याग केला. पण तोपर्यंत येशू मंदिराशी एकनिष्ठ राहिला. (मार्क १२:४१-४४; मत्तय २३:३८) आज देवाची पार्थिव संघटना मंदिर असलेल्या यहुदी व्यवस्थीकरणापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. कबूल आहे की ही संघटना परिपूर्ण नाही, म्हणूनच तर वेळोवेळी फेरबदल केले जातात. पण भ्रष्टाचारामुळे तिची चाळण झालेली नाही किंवा यहोवा देव तिच्याऐवजी दुसरी संघटना स्थापित करण्याच्या विचारात नाही. तिच्यात आपल्याला कोणतीही अपरिपूर्णता दिसल्यास, त्यामुळे नाराज होण्यास किंवा टिकात्मक, नकारात्मक आत्मा उत्पन्न करण्यास आपण स्वतःला प्रवृत्त होऊ देता कामा नये. उलट, येशू ख्रिस्ताच्या एकनिष्ठेचे आपण अनुकरण करू या.—१ पेत्र २:२१.
आपल्या स्वतःच्या अपरिपूर्णता
९, १०. (अ) सैतानाचे व्यवस्थीकरण आपल्या अपरिपूर्णतांचा गैरफायदा घेऊन बेईमान वर्तन आचरणाचे आमिष कसे दाखवते? (ब) गंभीर पाप करणाऱ्याने काय केले पाहिजे?
९ आपल्या अपरिपूर्णतांचा अयोग्य वापर करून बेईमान होण्यास देखील सैतान आपल्याला प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करतो. त्याचे व्यवस्थीकरण आपल्या कमतरतांचा फायदा घेऊन यहोवाच्या दृष्टीने जे चूक आहे ते करण्याचा आपल्याला मोह घालते. दुःखाची गोष्ट म्हणजे, हजारो लोक दरवर्षी अनैतिकतेला बळी पडतात. काही जण दुहेरी जीवन जगून, विश्वासू ख्रिश्चन असल्याचे ढोंग रचून चुकीचे मार्गाक्रमण आचरीत राहून बेईमान होतात. या विषयांवर सावध राहा! नियतकालिकातील “तरुण लोक विचारतात . . .” शृंखलेचे लेख वाचल्यावर एका तरुणीने लिहिले: “ते लेख जणू माझीच जीवन कहाणी होते.” तिने यहोवाबद्दल प्रेम नसलेल्या तरुणांसोबत गुप्तपणे सूत बांधले होते. परिणाम? ती लिहिते: “माझं जीवन अगदी रसातळाला पोहंचलं व मी अनैतिकतेत गुरफटून गेल्यामुळं मला बहिष्कृत करावं लागलं. यहोवासोबतचा माझा नातेसंबंध बिघडला व माझ्या आईवडिलांचा आणि मंडळीतील वडिलांचा माझ्यावरचा भरवसा उडाला.”b
१० या तरुणीला वडिलांकडून साहाय्य मिळाले व ती पुन्हा यहोवाची एकनिष्ठेने सेवा करू लागली. परंतु अनेक जण अतिशय वाईट परिणाम भोगतात व काही तर पुन्हा कळपात येतही नाहीत ही शोचनीय गोष्ट आहे. एकनिष्ठ राहणे व या दुष्ट जगाच्या मोहपाशांचा प्रतिकार करणे कितीतरी पटीने उत्तम आहे बरे. जगिक सहवास आणि हिणकस मनोरंजन यांसारख्या इतर बाबींवर टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिकांतील इशाऱ्यांकडे लक्ष द्या. बेईमान वर्तनाच्या पाशात केव्हाही पडू नका. आणि पडलाच तर, तो मी नव्हेच, असे ढोंग करू नका. (स्तोत्र २६:४) त्याऐवजी मदत घ्या. ख्रिस्ती पालक आणि वडील त्यासाठीच तर आहेत.—याकोब ५:१४.
११. आपली परिस्थिती आशाहीन आहे असा दृष्टिकोन बाळगणे चुकीचे का असू शकते व बायबलमधील कोणते पूर्वोदाहरण आपल्या दृष्टिकोनात बदल करण्यास आपली मदत करू शकते?
११ आपल्या अपरिपूर्णता आपल्याला आणखी एका मार्गाने धोक्यात घालू शकतात. एखादे बेईमान कृत्य आचरलेले काही, यहोवाला खूष करण्याचा प्रयत्न सोडून देतात. दाविदानेही गंभीर पापे केली होती हे आठवा. तरीसुद्धा, दाविदाचा मृत्यू होऊन कित्येक वर्षे उलटल्यावर यहोवाने त्याची विश्वासू सेवक म्हणून आठवण केली. (इब्री लोकांस ११:३२; १२:१) का बरे? कारण त्याने यहोवाला खूष करण्याचे सोडून दिले नाही. नीतिसूत्रे २४:१६ म्हणते: “धार्मिक सात वेळा पडला तरी पुनः उठतो.” होय, आपण झगडत आहोत अशा आपल्या एखाद्या कमजोरीमुळे लहानसहान चुका केल्या व त्याही वारंवार केल्या आणि ‘पुन्हा उठत’ राहिलो म्हणजेच प्रामाणिकपणे पश्चात्ताप करून पुन्हा एकवार एकनिष्ठ सेवेस प्रारंभ केला तर यहोवाच्या नजरेत धार्मिकच राहू शकतो.—पडताळा २ करिंथकर २:७.
बेईमानीच्या धूर्त प्रकारांपासून सावध!
१२. परूशांनी कठोर, विधिवादी दृष्टिकोन बाळगल्यामुळे ते बेईमान कसे ठरले?
१२ बेईमानी धूर्त रूपे धारण करतो. ते एकनिष्ठेचे सोंगही असू शकते! उदाहरणार्थ, येशूच्या दिवसांतील परूशांना कदाचित वाटत असावे, की ते सर्वात एकनिष्ठ आहेत.c पण, एकनिष्ठ मनुष्य आणि मानव-निर्मित नियमांचे काटेकोरपणे पालन करणारा मनुष्य यांच्यातील फरक ते पाहू शकले नाहीत कारण ते कडक व कठोरपणे न्याय करणारे होते. (पडताळा उपदेशक ७:१६.) याबाबतीत ते—त्यांना ज्या लोकांची सेवा करावयाची होती त्या लोकांशी, जे नियमशास्त्र शिकवण्याचा दावा करत होते त्या नियमशास्त्राच्या आत्म्याशी आणि स्वतः यहोवाशी खरे पाहता बेईमान झाले होते. उलटपक्षी, येशू प्रीतीवर आधारित असलेल्या नियमशास्त्राच्या आत्म्याशी एकनिष्ठ होता. म्हणूनच मशिही भविष्यवाणींनी भाकीत केले त्याप्रमाणे त्याने लोकांची उभारणी केली, त्यांना उत्तेजन दिले.—यशया ४२:३; ५०:४; ६१:१, २.
१३. (अ) ख्रिस्ती पालक बेईमान कसे ठरू शकतात? (ब) पालकांनी, आपल्या मुलांना शिक्षा देताना अति कठोर, टिकात्मक किंवा नकारात्मक होण्याचे का टाळावे?
१३ पुष्कळ प्रमाणात अधिकार असलेल्या ख्रिश्चनांना याबाबतीत येशूच्या नमुन्याचा खूप फायदा होतो. जसे की, एकनिष्ठ पालकांना ठाऊक आहे, की त्यांनी आपल्या मुलांना शिक्षा केली पाहिजे. (नीतिसूत्रे १३:२४) तरीसुद्धा, क्रोधिष्ठ होऊन किंवा सतत टिकांचा भडिमार करून कठोर शिक्षा देण्याद्वारे ते आपल्या मुलांना चिरडीस आणणार नाहीत याची ते पूर्ण खात्री करतात. आपण आपल्या पालकांना कधीच खूष करू शकणार नाही किंवा आपल्या पालकांचा धर्म त्यांना फक्त नकारात्मक व टिकाकुशलच बनवत आहे असा विचार करणारी मुले निराश होऊ शकतात आणि परिणामी खऱ्या विश्वासापासून बहकू शकतात.—कलस्सैकर ३:२१.
१४. ख्रिस्ती मेंढपाळ, ते सेवा करत असलेल्या आपल्या कळपाशी एकनिष्ठ असल्याचे कसे शाबीत करू शकतात?
१४ त्याचप्रकारे, ख्रिस्ती वडील आणि प्रवासी पर्यवेक्षक कळपाला सामना कराव्या लागणाऱ्या समस्यांकडे व धोक्यांकडे लक्ष देतात. एकनिष्ठ मेंढपाळ या नात्याने ते, आवश्यक वेळी सल्ला देतात, पण सल्ला देण्यापूर्वी त्यांच्याजवळ सर्व पुरावे आहेत व आपण जे काही बोलतो ते बायबल व संस्थेच्या प्रकाशनांवर आधारित आहे याची ते काळजीपूर्वक खात्री करतात. (स्तोत्र ११९:१०५; नीतिसूत्रे १८:१३) त्यांना हेही माहीत आहे, की आध्यात्मिक उभारणी व भरवणुकीसाठी मेंढरे त्यांच्यावरच अवलंबून आहेत. यास्तव, ते उत्तम मेंढपाळ येशू ख्रिस्त याचे अनुकरण करू पाहतात. ते दर आठवडी ख्रिस्ती सभांमध्ये एकनिष्ठेने मेंढरांची सेवा करतात. त्यांच्याशी बेपर्वाईने न वागता त्यांची उभारणी करून त्यांचा विश्वास बळकट करतात.—मत्तय २०:२८; इफिसकर ४:११, १२; इब्री लोकांस १३:२०, २१.
१५. पहिल्या शतकातील काहींनी त्यांची भलत्याच गोष्टींप्रती एकनिष्ठा असल्याचे कसे दाखवले?
१५ बेईमानीचा आणखी एक धूर्त प्रकार म्हणजे भलत्याच गोष्टीशी एकनिष्ठ राहणे होय. बायबलनुसार पाहिल्यास, खरी एकनिष्ठा, यहोवा देवाप्रती असलेल्या आपल्या एकनिष्ठेआधी दुसऱ्या कोणत्याही एकनिष्ठेला वाव देत नाही. पहिल्या शतकातील अनेक यहुदी मोशेच्या नियमशास्त्राला व यहुदी व्यवस्थीकरणाला ठामपणे जडून होते. तरीसुद्धा, त्या बंडखोर राष्ट्रावरील आपला आशीर्वाद काढून आध्यात्मिक इस्राएल राष्ट्राला देण्याचा यहोवाचा समय आला होता. तुलनात्मकरीत्या थोडे लोकच यहोवाला एकनिष्ठ राहिले होते व त्यांनी या महत्त्वपूर्ण बदलाशी जुळवून घेतले. खऱ्या ख्रिश्चनांपैकीसुद्धा काही यहुदी मत समर्थकांनी ख्रिस्तामध्ये पूर्ण झालेल्या मोशेच्या नियमशास्त्रातील “दुर्बळ व नि:सत्व अशा प्राथमिक शिक्षणाकडे” पुन्हा जाण्याचा आग्रह केला.—गलतीकर ४:९; ५:६-१२; फिलिप्पैकर ३:२, ३.
१६. यहोवाचे एकनिष्ठ सेवक फेरबदलांविषयी कशी प्रतिक्रिया दाखवतात?
१६ याच्या विपरीत, आधुनिक काळातील यहोवाच्या लोकांनी परिवर्तनाच्या काळात स्वतःला एकनिष्ठ शाबीत केले आहे. प्रकट सत्याचा प्रकाश जसजसा तेजोमय होत राहतो, तसतसे फेरबदल केले जातात. (नीतिसूत्रे ४:१८) अलीकडेच, ‘विश्वासू व बुद्धिमान दासाने,’ मत्तय २४:३४ मध्ये वापरण्यात आलेल्या “पिढी” या संज्ञेविषयी, मत्तय २५:३१-४६ मधील “मेंढरे” आणि ‘शेरडे’ यांच्या न्यायदंडाच्या समयाविषयी आपल्याला जी समज होती तिच्यात तसेच नागरी सेवांच्या विशिष्ट प्रकारांबद्दलच्या दृष्टिकोनात सुधारणा करण्यास मदत केली आहे. (मत्तय २४:४५) याविषयांवरील पूर्वीचीच विचारसरणी अनेक यहोवाचे साक्षीदार बाळगून राहिले असते आणि प्रगती करण्यास नकार दर्शवला असता तर काही धर्मत्याग्यांना आनंदी आनंद झाला असता. पण असे काही घडले नाही. का बरे? कारण यहोवाचे लोक एकनिष्ठ आहेत.
१७. काही वेळा प्रियजन आपल्या एकनिष्ठेला परिक्षेत कसे उतरवू शकतात?
१७ परंतु, भलत्याच गोष्टीला एकनिष्ठा दाखवल्याने आपल्यावर व्यक्तिगतपणे प्रभाव पडू शकतो. आपला एखादा प्रिय स्नेही किंवा कदाचित कौटुंबिक सदस्य बायबल तत्त्वांचे उल्लंघन करणारा मार्ग निवडतो तेव्हा, व्यक्तीप्रती आणि यहोवाप्रती या दोघांशी एकनिष्ठ राहण्यासाठी आपली ओढाताण होत असल्यासारखे आपल्याला वाटू शकेल. साहजिकच, आपण कौटुंबिक सदस्यांशी एकनिष्ठ असतो. परंतु व्यक्तीप्रती एकनिष्ठा यहोवाप्रती असलेल्या एकनिष्ठेच्या आधी येता कामा नये! (पडताळा १ शमुवेल २३:१६-१८.) अपराध करणाऱ्यांना त्यांचे गंभीर पाप लपवून ठेवण्यास आपण मदत करणार नाही किंवा अपराध्यांना “सौम्य वृत्तीने ताळ्यावर” आणणाऱ्या वडिलांच्या विरुद्ध होऊन अपराध्यांची बाजू घेणार नाही. (गलतीकर ६:१) असे करणे म्हणजे यहोवाशी, त्याच्या संघटनेशी आणि एखाद्या प्रिय व्यक्तीशी बेईमान होणे. कारण, अपराध्याची बाजू घेणे व त्याला आवश्यक असलेल्या शिक्षेचा विरोध करणे म्हणजे खरे पाहता, त्या अपराध्यापर्यंत पोंहचणाऱ्या यहोवाच्या प्रीतीच्या अभिव्यक्तीच्या आड येणे होय. (इब्री लोकांस १२:५-७) हेही लक्षात असू द्या, की “मित्राने केलेले घाय खऱ्या प्रेमाचे” असतात. (नीतिसूत्रे २७:६) मोकळ्या मनाने दिलेला व देवाच्या वचनावर आधारित प्रेमळ सल्ला चूक करणाऱ्या एखाद्या प्रियजनाच्या गर्वावर घाव करू शकतो; परंतु पुढे तो जीवनरक्षक ठरू शकतो!
एकनिष्ठा छळातही टिकून राहते
१८, १९. (अ) अहाबाला नाबोथाकडून काय हवे होते आणि नाबोथाने ते देण्यास का नाकारले? (ब) नाबोथाच्या एकनिष्ठेचा काही फायदा झाला का? स्पष्टीकरण द्या.
१८ कधीकधी सैतान आपल्या एकनिष्ठेवर थेट हल्ला चढवतो. नाबोथाचेच उदाहरण घ्या. राजा अहाबाने त्याचा द्राक्षमळा विकण्यास त्याच्यावर दबाव आणला तेव्हा तो म्हणाला: “माझ्या वाडवडिलांचे वतन मी आपणाला द्यावे असे परमेश्वर माझ्या हातून न घडवो.” (१ राजे २१:३) नाबोथ हट्टी नव्हता; तो एकनिष्ठ होता. कोणीही इस्राएली वारशाने मिळालेल्या जमिनीची मालकी कायमसाठी विकू शकत नाही असे मोशेच्या नियमशास्त्रात म्हटले होते. (लेवीय २५:२३-२८) अहाबाने आपल्या पत्नीला यहोवाच्या अनेक संदेष्ट्यांची कत्तल करू दिली असल्यामुळे हा दुर्गुणी राजा आपलाही बळी घेऊ शकतो हे नाबोथाला नक्कीच माहीत होते! तरीसुद्धा नाबोथ दृढ राहिला.—१ राजे १८:४.
१९ एकनिष्ठेमुळे केव्हाकेव्हा किंमत मोजावी लागते. ईजबेलीने काही ‘कुचकामी’ मनुष्यांना हाताशी धरून, नाबोथाने न केलेल्या पापाचा आरोप त्याच्यावर ठेवण्याचा डाव रचला. याचा परिणाम असा झाला की त्याला आणि त्याच्या पुत्रांना ठार मारण्यात आले. (१ राजे २१:७-१६; २ राजे ९:२६) याचा अर्थ नाबोथाने भलत्याच गोष्टीसाठी एकनिष्ठा दाखवली होती का? नाही! नाबोथ, पुनरुत्थानाच्या समयापर्यंत कबरेत शांतपणे निद्रा घेणाऱ्या व आता देखील यहोवाच्या स्मरणात “जिवंत” असलेल्या त्या अनेक एकनिष्ठ पुरुष व स्त्रियांपैकी एक आहे.—लूक २०:३८; प्रेषितांची कृत्ये २४:१५.
२०. आशा आपल्याला एकनिष्ठा टिकवून ठेवण्यास कशी मदत करू शकते?
२० हीच आशा यहोवाच्या आजच्या निष्ठावान सेवकांचा आत्मविश्वास वाढवते. आपल्याला माहीत आहे की या जगात आपल्याला आपल्या एकनिष्ठेची मोठी किंमत मोजावी लागू शकते. येशू ख्रिस्ताने आपले जीवन देऊन त्याच्या एकनिष्ठेची किंमत मोजली आणि त्याने त्याच्या अनुयायांना सांगितले की त्यांनाही असेच वागवले जाईल. (योहान १५:२०) भविष्यातील या आशेने जसे त्याला टिकवून ठेवले तसे आपल्यालाही या आशेमुळे टिकवून ठेवले जाते. (इब्री लोकांस १२:२) अशा प्रकारे आपण सर्व प्रकारच्या छळात एकनिष्ठ राहू शकतो.
२१. यहोवा आपल्या एकनिष्ठ जणांना कोणती हमी देतो?
२१ तुलनात्मकरीत्या आपल्यातील काहींनाच एकनिष्ठेवरील थेट हल्ले सहन करावे लागतात हे खरे आहे. पण अंत येण्याआधी देवाच्या लोकांना कदाचित अधिक छळाचा सामना करावा लागू शकतो. आपली एकनिष्ठा टिकवून ठेवण्याची आपण खात्री कशी करू शकतो? आताच एकनिष्ठ राहण्याद्वारे. यहोवाने आपल्यावर त्याच्या राज्याचा प्रचार करण्याची व शिकवण्याची मोठी कामगिरी सोपवली आहे. हे महत्त्वपूर्ण कार्य आपण एकनिष्ठेने करीत राहू या. (१ करिंथकर १५:५८) आपण मानवी अपरिपूर्णतांना यहोवाच्या संघटनेबद्दल असलेली आपली एकनिष्ठा नाहीशी करू दिली नाही व भलत्या गोष्टींप्रती एकनिष्ठा दाखवण्यासारख्या बेईमानीच्या धूर्त प्रकारांपासून सावध राहिलो तर आपल्या एकनिष्ठेची कडक परीक्षा होण्यासाठी आपण अधिक तयार होऊ. परिस्थिती कोणतीही असो, यहोवा आपल्या एकनिष्ठ सेवकांशी न चुकता एकनिष्ठ राहतो याची आपण नेहमी खात्री बाळगू शकतो. (२ शमुवेल २२:२६) होय, तो आपल्या एकनिष्ठ सेवकांचे रक्षण जरूर करील!—स्तोत्र ९७:१०.
[तळटीपा]
a अशा नफेशीर व्यापारी धंद्यावर हल्ला करण्यासाठी येशूकडे धैर्य होते. एका इतिहासकाराच्या मते, मंदिराचे कर विशिष्ट रोमी नाणे देऊन भरावे लागत असे. यास्तव, मंदिराला भेट देणाऱ्यांना कर भरण्यासाठी स्वतः जवळच्या पैशांची देवघेव करावी लागत असे. सराफांना या अदलाबदलीवर एकच किंमत लावण्याची परवानगी असल्यामुळे त्यांना भरपूर पैसा मिळत असे.
b सावध राहा! (इंग्रजी) डिसेंबर २२, १९९३; जानेवारी ८, १९९४; आणि जानेवारी २२, १९९४ पाहा.
c त्यांच्या समाजाची सुरवात हसिडीम पासून झाली; अनेक शतकांआधी ग्रीक प्रभावाविरुद्ध लढण्यासाठी या गटाचा उदय झाला होता. हसिडीम लोकांनी आपले हे नाव इब्री शब्द खासिडीम, ज्याचा अर्थ “एकनिष्ठ जन” किंवा “भक्तीमान जन” असा होतो यातून घेतला आहे. त्यांना कदाचित असे वाटले, की शास्त्रवचनांमध्ये यहोवाच्या ‘एकनिष्ठ जणांचा’ उल्लेख झाला आहे तो त्यांनाच एका खास मार्गाने लागू होतो. (स्तोत्र ५०:५) हे, आणि त्यांच्या नंतरचे परूशी धर्मवेडे, नियमशास्त्रातील मजकूराचे स्वयं नियुक्त संरक्षणकर्ते होते.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
◻ इतरांच्या अपरिपूर्णतांमुळे बेईमान होण्याचे आपण कसे टाळू शकतो?
◻ आपल्या स्वतःच्या अपरिपूर्णता कोणत्या मार्गांद्वारे आपल्याला बेईमान कृत्य आचरण्यास प्रवृत्त करू शकतात?
◻ भलत्याच गोष्टीला एकनिष्ठा दाखवण्याची प्रवृत्ती आपण कशी टाळू शकतो?
◻ छळातही एकनिष्ठ राहण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला मदत करील?
[९ पानांवरील चौकट]
बेथेलमध्ये एकनिष्ठेने सेवा करणे
“सर्व काही शिस्तवार व व्यवस्थितपणे होऊ द्या.” असे प्रेषित पौलाने लिहिले. (१ करिंथकर १४:४०) मंडळीला कार्य करण्याकरता ‘व्यवस्थितपणा,’ संघटन यांची गरज लागेल हे पौलाला माहीत होते. त्याचप्रमाणे आज वडिलांना, मंडळीतील सदस्यांची विविध पुस्तक अभ्यासाच्या ठिकाणी नेमणूक करणे, क्षेत्र कार्याच्या सभांची व्यवस्था करणे आणि क्षेत्र पूर्णपणे उरकले की नाही ते पाहणे यांसारख्या व्यावहारिक बाबींवर निर्णय घ्यावे लागतात. अशा व्यवस्थांमुळे काही वेळा एकनिष्ठेची परीक्षा घेतली जाऊ शकते. या व्यवस्था ईश्वरप्रेरित आज्ञा नाहीत आणि सर्वांना त्या आवडतीलच असेही नाही.
ख्रिस्ती मंडळीमध्ये करण्यात आलेल्या काही व्यावहारिक व्यवस्थांना एकनिष्ठा दाखवणे तुम्हाला आव्हान वाटते का? वाटत असल्यास, तुम्हाला बेथेलचे उदाहरण फायदेकारक ठरू शकेल. बेथेल या इब्री संज्ञेचा अर्थ “देवाचे घर” असा होतो; वॉच टावर संस्थेच्या १०४ शाखांना तसेच अमेरिकेतील मुख्यालयाला देखील हेच नाव देण्यात आले आहे.d बेथेल कॉम्प्लेक्समध्ये राहून काम करणाऱ्या स्वयंसेवकांना ही ठिकाणे यहोवाप्रती भय आणि आदर प्रतिबिंबित करणारी असावीत असे वाटते. यासाठी प्रत्येकाला एकनिष्ठ असण्याची गरज आहे.
बेथेलला भेट देणारे तेथे त्यांनी पाहिलेल्या व्यवस्थितपणाचा व स्वच्छतेचा उल्लेख नेहमी करतात. तेथील कामकरी संघटित व आनंदी आहेत; त्यांची भाषा, त्यांचा शिष्टाचार आणि त्यांचा पेहराव देखील प्रौढ, बायबल प्रशिक्षित ख्रिस्ती विवेक प्रतिबिंबित करतो. बेथेल परिवाराचे सर्व सदस्य एकनिष्ठेने देव वचनातील दर्जांना जडून राहतात.
यासोबतच, नियमन मंडळाने त्यांना ऐक्याने एकत्र राहणे (इंग्रजी), नावाची एक पुस्तिका दिली आहे. एका मोठ्या कुटुंबाला एकत्र मिळून कार्य करण्याकरता आवश्यक असलेल्या काही व्यावहारिक व्यवस्था त्या पुस्तिकेत प्रेमळपणे दिल्या आहेत. (स्तोत्र १३३:१) उदाहरणार्थ, त्यामध्ये राहण्याची व्यवस्था, भोजन, आरोग्य, पेहराव आणि केशभूषा आणि अशाच इतर बाबींबद्दल सांगितले आहे. बेथेल कुटुंब सदस्य, त्यांच्या व्यक्तिगत आवडीनिवडी वेगवेगळ्या असल्या तरीसुद्धा ते अशा व्यवस्थांना एकनिष्ठेने पाठिंबा देऊन त्यांना जडून राहतात. ते या पुस्तिकेकडे, भावनाशून्य नियमांचा व कायद्यांचा संग्रह म्हणून पाहत नाहीत तर ऐक्य आणि सुसंगततेला बढावा देण्यासाठी रचलेला उपयुक्त मार्गदर्शनाचा एक संच या दृष्टीने पाहतात. पर्यवेक्षक, एकनिष्ठेने या बायबल आधारित कार्यपद्धती मान्य करतात व बेथेल परिवाराला आपली पवित्र बेथेल सेवा चालू ठेवता यावी म्हणून त्यांची उभारणी करण्यासाठी आणि उत्तेजन देण्यासाठी यांचा सकारात्मक मार्गाने उपयोग करतात.
d देवाचे महान आध्यात्मिक मंदिर किंवा घर या कारखान्यांचे, कार्यालयांचे आणि वसाहत कॉम्प्लेक्सचे मिळून बनलेले नाही. देवाचे आध्यात्मिक मंदिर शुद्ध उपासनेकरता त्याची व्यवस्था आहे. (मीखा ४:१) म्हणूनच, ते पृथ्वीवरील कोणत्याही भौतिक रचनेपुरतेच मर्यादित नाही.
[१० पानांवरील चौकट]
एकनिष्ठवादी आणि विधिवादी
सन १९१६ मध्ये मागे, एन्सायक्लोपिडिआ ऑफ रिलिजन ॲण्ड एथिक्स नावाचा विश्वकोश अशी नोंद करतो, की “एकनिष्ठवादी आणि विधिवादी यांच्यामधील हा फरक कदाचित सर्व काळांत व सर्व ठिकाणी आढळून येईल.” तो पुढे म्हणाला: “विधिवादी असा मनुष्य असतो जो सांगितलेले काम करतो, नियमांचे उल्लंघन करीत नाही; लिखित वचनाचे विश्वासूपणे पालन करतो. एकनिष्ठवादी हे सर्व काही करतो पण . . . तो अधिक भरवसालायक असू शकतो कारण तो संपूर्ण मन ओतून आपले कर्तव्य बजावतो, त्याला पूर्ण करावयाच्या उद्देशाच्या पूर्ततेसाठी, उद्देशाच्या आत्म्याच्या एकवाक्यतेत तो आपली मनोवृत्ती घडवतो.” हाच ग्रंथ पुढे असे निरीक्षण करतो: “नियमाचे पालन करण्यापेक्षा एकनिष्ठ असणे जास्त महत्त्वाचे आहे . . . एकनिष्ठ मनुष्य पूर्ण मनाने व अंतःकरणाने सेवा करत असल्यामुळे नियमाचे पालन करणाऱ्या मनुष्यापेक्षा भिन्न आहे . . . एकनिष्ठ मनुष्य जे करायचे आहे ते न करण्याचे पाप, जे करायचे नाही ते करण्याचे पाप किंवा अज्ञानतेमुळे हेतुपूर्वक पाप करीत नाही.”