“त्यांस समजेल की मी यहोवा आहे”
“इतःपर आपल्या पवित्र नामाची अप्रतिष्ठा मी होऊ देणार नाही; तेव्हा मी यहोवा . . . आहे असे राष्ट्रांना समजून येईल.”—यहेज्केल ३९:७.
१, २. यहोवा आपल्या पवित्र नामाची निंदा आणखी होत राहू देणार नाही हे आपल्याला कसे कळते?
यहोवाच्या पवित्र नामावर प्राचीन इस्त्राएल लोकांनी निंदा आणली होती. यहेज्केलचे हे पुस्तक ते स्पष्ट करते. तथापि, ख्रिस्तीधर्मराज्यातील लोकही देवाची भक्ती करीत आहेत असे म्हणतात पण त्यांनीही त्याच्या नावाला निंदा आणली आहे.
२ आपल्या नावाची होणारी ही निंदा विश्वाचा सार्वभौम प्रभु सदा होत राहू देईल का? नाही, कारण त्यानेच हे घोषित केले आहेः “इतःपर आपल्या पवित्र नामाची अप्रतिष्ठा मी होऊ देणार नाही; तेव्हा मी यहोवा . . . आहे असे राष्ट्रांना समजून येईल.” (यहेज्केल ३९:७; तसेच यहेज्केल ३८:२३ सुध्दा पहा.) याचा काय अर्थ होईल? आणि यहेज्केलच्या या राहिलेल्या अध्यायांपासून आपल्याला कोणते धडे घेता येतील?
इतरांविषयी दिलेली भाकिते
३. (अ) यहुदावर ओढवलेल्या विपत्तीविषयी बाकीच्या राष्ट्रांनी कशी प्रतिक्रिया दाखवली? (ब) सोरच्या “राजा”ला कोणत्या प्रवृत्तीमुळे दूर करण्यात आले, आणि याचा आम्हावर कसा परिणाम झाला पाहिजे?
३ यरुशलेमाचा नाश झाल्यावर अम्मोनला यहुदाच्या विपत्तीवर उल्लास केल्यामुळे आणि मवाबने यहुदाविषयी तिरस्कारयुक्त प्रवृत्ती व्यक्त केल्यामुळे यांचा धिक्कार करण्यात आला. अदोमाला सूडबुध्दी राखल्यामुळे दोषी ठरविण्यात आले आणि पलिष्ट्यांनी वैरभाव दाखविल्यामुळे त्यावर देव “संतापाने शिक्षा” करणार होता. (यहेज्केल २५:१-१७; नीतीसूत्रे २४:१७, १८) यरुशलेमाच्या पतनावर जल्लोष व्यक्त केल्यामुळे सोर शहर नबुखद्नेस्सर किंवा नबुखद्रेस्सर (बाबेलोन्यांना जवळचा वाटणारा उच्चार) याजपुढे पडणार होते. (यहेज्केल २६:१-२१) हे सोर बुडणाऱ्या जहाजाप्रमाणे होते. (यहेज्केल २७:१-३६) सोरचा “राजा” (किंवा बहुधा त्याच्या अधिपतींची मालिका) याला त्याने सैतानासारखा आत्मा दाखविल्यामुळे दूर करण्यात आले. (यहेज्केल २८:१-२६) तर मग आमच्या बाबतीत हे अति आवश्यक आहे की आम्ही पापीष्ठ असा गर्विष्ठपणाचा आत्मा दाखवू नये की ज्याकरवी यहोवाच्या नामास अप्रतिष्ठा आणली जाईल.—स्तोत्रसंहिता १३८:६; नीतीसूत्रे २१:४.
४. फारो व मिसराकरता काय राखून ठेवले होते?
४ यहेज्केलने मिसरास ४० वर्षे निर्जनावस्था मिळणार असे भाकित केले. याची संपत्ती नबुखद्रेस्सरला, सोरवर यहोवाचा न्यायदंड बजावण्यात जी लष्करी सेवा केली त्याचा मोबदला म्हणून मिळणार. (यहेज्केल २९:१-२१) मिसऱ्यांची पांगापांग होत असताना ते ‘हे जाणतील की तो यहोवा आहे’ याकडे यहोवाचे लक्ष राहील. (यहेज्केल ३०:१-२६) मिसऱ्यांचे प्रतिनिधित्व या अर्थी फारोला एका उंच व भव्य गंधसरुप्रमाणे समजण्यात आले पण त्यास छाटून टाकण्यात येणार होते. (यहेज्केल ३१:१-१८) सरतेशेवटी यहेज्केल फारो व मिसराचे वंशज याविषयीचे शोकगीत शिओलात टाकतो.—यहेज्केल ३१:१-३२.
पहारेकऱ्याचे कर्तव्य
५. (अ) देव केवळ कोणत्या स्थितीत आध्यात्मिक पहारेकऱ्यास आपली कृपापसंती दाखवू शकतो? (ब) ‘जीवनाच्या नियमाप्रमाणे चालणे’ याचा काय अर्थ होतो?
५ यहेज्केलला त्याच्या पहारेकऱ्याच्या कर्तव्याविषयीचे स्मरण देण्यात आले. (यहेज्केल ३३:१-७) अर्थातच, आध्यात्मिक पहारेकरी आपले कर्तव्य पुरे करीत आहे व दुष्टांना बजावीत आहे तर त्याला देवाकडील कृपापसंती आहे. (यहेज्केल ३३:८, ९ वाचा.) तद्वत, अभिषिक्त “पहारेकरी” वर्ग यहेज्केलप्रमाणेच इश्वरी दंडाज्ञा मोठ्या निर्भिडपणे घोषित करीत आहे. दुष्टांच्या मरण्याने देवाला संतोष वाटत नसल्यामुळे कोणी दुष्टाने ही दंडाज्ञा श्रवण केली आणि “जीवनाच्या मार्गाप्रमाणे चालेल” तर त्याच्या पूर्वीची कृत्ये विचारात घेण्यात येणार नाहीत. यहेज्केलच्या काळी जीवनाच्या मार्गाने चालणे याचा अर्थ नियमशास्त्राचे अवलंबन करणे हा होत होता, पण सध्या ख्रिस्ताच्या खंडणी यज्ञार्पणाचा स्विकार करणे व त्याचे अनुयायी होणे हा तो अर्थ आहे. (१ पेत्र २:२१) देव लोकांना शिक्षा करतो किंवा प्रतिफळ देतो यात सदोष जुळणी नाही; “मोठे संकट” यात बचाव व्हावयाचा आहे तर त्याच्या नियमांची परिपूर्ति केली गेलीच पाहिजे.—यहेज्केल ३३:१०-२०; मत्तय २४:२१.
६. आज कित्येकजण यहेज्केलच्या काळातील यहुदी बंदिवानांप्रमाणे कसे आहेत?
६ इ. स. पू. ६०७ च्या अंताला कोणा पळून आलेल्या माणसाने यहेज्केलला यरुशलेमचा नाश झाला आहे असे कळविले तेव्हा यहेज्केल परत यहोवाचा संदेश वदवू लागला. (यहेज्केल ३३:२१-२९) याबद्दल बंदिवानांनी कोणती प्रतिक्रिया दाखवली? (यहेज्केल ३३:३०-३३ वाचा.) आजही कित्येकजण त्या यहुदी बंदिवानांप्रमाणेच आहेत ज्यांना यहेज्केल ‘प्रेमगीत गाणारा’ वाटला होता. अभिषिक्त जन व त्यांचे सहकारी घरोघरी भेटी देतात तेव्हा लोकांना राज्य संदेशाचा सूर आवडतो पण ते तो कवटाळत नाहीत. तो त्यांना एका मधुर प्रेमगीताप्रमाणे वाटतो पण पण ते स्वतःचे यहोवाला समर्पण करीत नाहीत व यामुळेच ते “मोठे संकट” यातून बचावणार नाहीत.
यहोवाचा “एक मेंढपाळ”
७. आमच्या काळात यहोवाने केलेल्या कोणत्या कृति, यहेज्केलच्या काळात त्याने मेंढरांशी राखलेल्या दळणवळणाशी तुल्य ठरतात?
७ यरुशलेमाच्या नाशानंतर यहेज्केलला संदेश पुरविताना यहोवाने त्याच्या पवित्र नामास कलंक लावणाऱ्या “इस्त्राएलाच्या [शासकीय] मेंढपाळां”ना दोष दिला. हेच शब्द ख्रिस्ती धर्मराज्याच्या अधिपतींना किती तंतोतंत लागू होतात! (यहेज्केल ३४:१-६ वाचा.) ख्रिस्तीधर्मराज्यातील राजकीय अधिपती उत्तम मेंढपाळ, येशू ख्रिस्ताप्रमाणे न वागता “मेंढरां”पासून स्वतःला धष्टपुष्ट करीत आहेत. (योहान १०:९-१५) यासाठीच, जसे देवाने यहुदाचा विध्वंस झाल्यावर अधिपत्य गाजविणाऱ्या स्वार्थी मेंढपाळांना काढून टाकले त्याचप्रमाणे “मोठे संकट” येईल तेव्हा ख्रिस्ती धर्मजगताच्या अधिपतींचा हक्क काढून घेऊन तो मेंढरांना मुक्त करील. (प्रकटीकरण १६:१४-१६; १९:११-२१) यहोवाने इ. स. पू. ५३७ मध्ये आपल्या मेंढरासमान लोकांची सुटका करुन त्यांच्यावर आपली प्रीती व्यक्त केली त्याचप्रमाणे त्याने थोर कोरेश, येशू ख्रिस्त याच्याद्वारे आध्यात्मिक इस्त्राएलातील शेषांची सुटका केली त्यावेळीही हीच प्रीती दाखवली.—यहेज्केल ३४:७-१४.
८. कोणी “लठ्ठ व बलिष्ट” कळपास जाचू लागला तर यहोवा त्याचे काय करणार आणि ख्रिस्ती सहमेंढपाळांनी मेंढरांना कसे वागवावे?
८ देव आपल्या मेंढरांची फारच कळकळीने काळजी घेतो. (यहेज्केल ३४:१५, १६ वाचा.) कोणी “लठ्ठ व बलिष्ट” देवाच्या कळपाला जाचत आहे तर यहोवा आता त्याला बहिष्कृत करण्याचा ‘चारा देईल’ आणि “मोठ्या संकटा”त त्याचा नाश करील. १९१४ मध्ये अभिषिक्त शेषांवर यहोवाने येशू ख्रिस्त या “एक मेंढपाळ” याची नेमणूक केली. १९३५ पासून त्याने “दुसरी मेंढरे” यांच्या ‘मोठ्या लोकसमुदाया’चे एकत्रीकरण करण्याचे मार्गदर्शन दिले आहे. हे आता ‘यहोवाच्या चरणीतला कळप’ अभिषिक्त जणांसोबत सेवा करीत आहेत. या सर्व मेंढरांना, ख्रिस्ती सहमेंढपाळांनी देव व ख्रिस्ताप्रमाणेच कोमलतेने संभाळावयास हवे.—यहेज्केल ३४:१७-३१; प्रकटीकरण ७:९; योहान १०:१६; स्तोत्रसंहिता २३:१-४; प्रे. कृत्ये २०:२८-३०.
“एदेन बाग”!
९. यहुदा व इस्त्राएल यांच्या प्रदेशांनी शब्बाथ अनुसरावा हे यहोवाने आधीच ठरविले होते त्यामुळे त्याने काय केले?
९ आता परत यहुदा व इस्त्राएल यांच्या निर्जन बनलेल्या प्रदेशांचा विचार करा. या प्रदेशात ७० वर्षे काहीही न होता शब्बाथ पाळला जावा हे देवाने ठरविले होते त्यामुळे त्याने अदोम व इतर राष्ट्रांना या प्रदेशांचा ताबा घेण्यापासून परावृत्त ठेवले. (२ इतिहास ३६:१९-२१; दानीएल ९:२) खरे म्हणजे अदोम व सेईरचा डोंगराळ भाग यालाही, आधी भाकित केल्याप्रमाणे उद्ध्वस्त करण्यात आले; याला बाबेलान्यांनी इ. स. पू. ६०२-६०१ मध्ये जिंकून घेतले होते.—यहेज्केल ३५:१-३६:५; यिर्मया २५:१५-२६.
१०. इ. स. पू. ५३७ मध्ये यहुदाच्या शेषांचे करण्यात आलेले पुनर्वसन आमच्या काळात कोणत्या घडामोडीकडे निर्देश करते?
१० यहुदाच्या शेषांचे इ. स. पू. ५३७ मध्ये करण्यात आलेले पुनर्वसन आमच्या काळातील थरारक घडामोडींकडे निर्देश करते. १९१९ मध्ये “इस्त्राएलाचे पर्वत” किंवा यहोवाच्या अभिषिक्त साक्षीदारांची आध्यात्मिक वसाहत आध्यात्मिकरित्या पुनरुज्जीवित झालेल्या शेषांकरवी बहरू लागली. (यहेज्केल ३६:६-१५) देवाने त्यांना धार्मिक अशुध्दतेपासून शुध्द केले. त्यांच्यात “नवा आत्मा” घालून त्यांना आत्म्याची फलप्राप्ती निर्मिण्यात समर्थ केले. (गलतीकर ५:२२, २३) आपल्या लोकांना शिस्त लावण्यात आली आहे या कारणामुळे यहोवाच्या नामाला अप्रतिष्ठा लागू नये म्हणून त्याने शेषांना समृध्दपणे आशीर्वादित केले.—यहेज्केल ३६:१६-३२.
११. यहेज्केल ३६:३३-३६ च्या अनुषंगाने देवाने अभिषिक्त शेषांच्या आध्यात्मिक वसाहतीच्या बाबतीत काय केले?
११ यहुदाचा शेष परतल्यावर त्यांनी त्या निर्जन जागेचे रुपांतर सुंदर “एदेन बागे”त केले. (यहेज्केल ३६:३३-३६ वाचा.) याचप्रमाणे १९१९ पासून यहोवाने अभिषिक्त शेषांची एकेकाळी निर्जन झालेली वसाहत आध्यात्मिक नंदनवनात परिवर्तित केली आणि यात आता “मोठा लोकसमुदाय” सहभागी होत आहे. या आध्यात्मिक नंदनवनात पवित्र लोकांची वसाहत असल्यामुळे प्रत्येक समर्पित ख्रिश्चनाने ती शुध्द राखण्याची पराकाष्ठा ठेवावी.—यहेज्केल ३६:३७, ३८.
ऐक्य पुनर्स्थापिले गेले
१२. प्राचीन यहुदी राष्ट्राचे पुनरुज्जीवन यहेज्केल ३७:१-१४ मध्ये कसे चित्रित करण्यात आले आहे, आणि याची कोणती आधुनिक समांतरता आहे?
१२ बाबेलोनच्या बंदिवासात यहूदी एका मृत राष्ट्राप्रमाणे झाले होते; त्यांची स्थिती खोऱ्यातील शुष्क अस्थिसारखी झाली होती. (यहेज्केल ३७:१-४) पण आता यहेज्केलने काय पाहिले? (यहेज्केल ३७:५-१० वाचा.) त्या हाडांना स्नायु, मांस व त्वचा चढविण्यात आली व त्यांना जीवनाच्या श्वासाद्वारे पुन्हा क्रियाशील केले गेले. (यहेज्केल ३७:११-१४) सर्व इस्त्राएल वंशांचे ४२,३६० लोक व त्यांच्यासोबत ७,५०० यहुद्देत्तर लोकांनी यहुदा प्रांतात वसाहत केली, यरुशलेम व त्याचे मंदीर उभारले आणि त्यांच्या स्वगृही खऱ्या भक्तीची स्थापना केली तेव्हा देवाने यहुदी राष्ट्राला पुनरुत्थित केले. (एज्रा १:१-४; २:६४, ६५) याप्रमाणेच १९१८ मध्ये आध्यात्मिक इस्त्राएलाचे छळग्रस्त शेष त्या शुष्क हाडांप्रमाणे झाले होते—त्यांच्या जाहीर प्रचारकार्याच्या बाबतीत ते ठार झाले होते. पण १९१९ मध्ये यहोवाने त्यांना राज्याचे घोषक या अर्थाने पुनरुज्जीवित केले. (प्रकटीकरण ११:७-१२) या समांतर तुलनेने आमचा हा आत्मविश्वास दृढ करावा की यहोवा आज ज्या पार्थिव संस्थेचा वापर करीत आहेत त्याचे अभिषिक्त जन आणि त्यांचे सहकारी भाग आहेत.—पहा यहोवाच्या साक्षीदारांचे १९७५ चे वार्षिक अहवाल पुस्तक, पृष्ठे ८७-१२५.
१३. यहेज्केल ३७:१५-२० मध्ये यहोवाच्या प्राचीन लोकांच्या संघटनात्मक ऐक्याची पुनर्स्थापना कशी चित्रित करण्यात आली आहे, आणि याची समांतरता कोणती होती?
१३ यहोवाच्या प्राचीन लोकांच्या संघटनात्मक ऐक्याची पुनर्स्थापना कोणत्या प्रकारे चित्रित करण्यात आली? (यहेज्केल ३७:१५-२० वाचा.) लाकडांच्या दोन ढलप्यांचे (एक यहुदाच्या दोन वंशीय राज्याचे प्रतीक व दुसरा इस्त्राएलाच्या दहा वंशीय राज्याचे प्रतीक) एकत्र होणे याची आधुनिक समांतरता आहे. पहिल्या जागतिक युद्धात काही महत्वाकांक्षी लोकांनी देवाच्या लोकांची ऐक्यता मोडण्याचा प्रयत्न केला, पण १९१९ मध्ये विश्वासू अभिषिक्त जणांचे “एक राजा” व “एक मेंढपाळ” ख्रिस्त यामध्ये एकत्रीकरण घडले. तसेच यहुदात परतलेल्या ७,५०० पेक्षा अधिक यहुद्देतरांप्रमाणे “मोठ्या लोकसमुदाया”चे लोक आता अभिषिक्त शेषांसोबत गोळा होत आहेत. आध्यात्मिक नंदनवनात आमचा “एक राजा” च्या वर्चस्वाखाली ऐक्यतेने यहोवाची सेवा करण्याचा आनंद केवढा आगळा आहे!—यहेज्केल ३७:२१-२८.
गोग हल्ला करतो!
१४. कोण गोग मागोग आहे व तो कोणती कृति करील? (यहेज्केल ३८:१-१७)
१४ यानंतर एक नाट्यमय घटना भाकित करण्यात आली. देवाच्या नामाला अप्रतिष्ठा आणावी आणि त्याच्या लोकांचा नाश करावा यासाठी यहोवाच्या “स्त्री”चे वा स्वर्गीय संस्थेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अभिषिक्त इस्त्राएलांच्या शेषांवर गोग मागोग हल्ला चढवील. (प्रकटीकरण १२:१-१७) गोग हा “या जगाचा अधिकारी” दियाबल सैतान आहे. १९१४ मध्ये स्वर्गात राज्याचा जन्म घडल्यावर त्याला खाली टाकून देण्यात आल्यावर त्याला गोग हे नाम मिळाले. (योहान १२:३१) “मागोग देश” हा तो पृथ्वीचा आसमंत आहे जेथपर्यंत गोग व त्याचे दुरात्मे हे सीमित आहेत. धर्मविरोधी शक्त्यांनी ख्रिस्ती धर्मजगत व बाकीच्या मोठ्या बाबेलीचा नाश केल्यावर यहोवा त्या गोगला अभिषिक्त इस्त्राएलांचे शेष व त्यांचे समर्पित सहकारी यांजवर हल्ला करण्याची मुभा देईल.—यहेज्केल ३८:१-१७; प्रकटीकरण १७:१२-१४.
१५. यहोवाच्या साक्षीदारांवर गोग हल्ला करील त्यावेळी काय घडेल?
१५ गोग यहोवाच्या साक्षीदारांवर हल्ला करील तेव्हा काय होईल? (यहेज्केल ३८:१८-२३ वाचा.) यहोवा त्याच्या लोकांची सुटका करील! यावेळी तो पाऊस, मोठ्या गारा, अग्नि व गंधक यांच्या वृष्टीने प्रत्युत्तर देईल. गोंधळून गेल्यामुळे गोगचे सैन्य आपापल्या तरवारी एकमेकांवर चालवितील. पण देव त्यांना अस्तित्वहीन करील. याच्या अगोदर ‘त्यांना हे कळेल की तो यहोवा आहे.’
१६. (अ) “मागोग देश” याचे काय होईल? (ब) गोगसंबंधाने असलेल्या घटनांचे जे भाकित आहे त्याच्या माहितीचा आम्हावर कसा परिणाम होण्यास हवा?
१६ सैतान व दुरात्मे यांना अगाधकूपात टाकल्यानंतर “मागोग देश” म्हणजे त्यांचा पृथ्वीवर सीमित करण्यात आलेला आसमंत सदाकाळासाठी नाहीसा होईल. (प्रकटीकरण २०:१-३) गोगने युध्दासाठी वापरलेली शस्त्रास्त्रे इतकी असतील की त्यांचा संपूर्ण निःपात करण्यासाठी काही अवधि लागेल. गोगच्या ठार झालेल्या पण दफन न होऊ शकलेल्या समुदायावर आकाशातील पाखरे व वनपशु ताव मारतील. या सर्व माहितीने आम्हावर कसा परिणाम करण्यास हवा? गोगचा हल्ला समीप आहे पण यहोवा आपल्या लोकांची त्यातून सुटका करील या माहितीने आमचा विश्वास बळकट होण्यास हवा आणि या घटनांचा परिणाम, यहोवाच्या नावावर दीर्घकाळापासून होत असलेली निंदा कायमची दूर होऊन ते गौरविण्यात येईल यामुळे आपल्याला आनंद वाटला पाहिजे!—यहेज्केल ३९:१-२९.
यहोवाचे पवित्रस्थान पहा!
१७. (अ) यहेज्केलला इ. स. पू. ५९३ मध्ये कोणता दृष्टांत दिसला? (ब) दृष्टांतमय मंदीराचे अस्तित्व कशाचा पुरावा आहे?
१७ यरुशलेमाच्या मंदीराचा नाश झाल्यानंतर १४व्या वर्षी म्हणजे इ. स. पू. ५९३ मध्ये यहेज्केलला यहोवाच्या उपासनेच्या नव्या पवित्रस्थानाचा दृष्टांत लाभला. संदेष्ट्यास मार्गदर्शन देणाऱ्या दिव्यदूत मार्गदर्शकाने त्याचे जे मोजमाप सांगितले ते खूपच भव्य होते. (यहेज्केल ४०:१-४८:३५) हे मंदीर ‘यहोवाने घातलेल्या खऱ्या मंडपाचे’ सूचक आणि “स्वर्गातील गोष्टींचे नमुने” होते. येशू ख्रिस्त याच्या परमपवित्र स्थानी, म्हणजेच “स्वर्गात” इ. स. ३३ मध्ये आपल्या खंडणी यज्ञार्पणाचे मोल देवाला सादर करण्यासाठी गेला. (इब्रीयांस ८:२; ९:२३, २४) मंदीराचे दृष्टांतमय चित्र दाखविते की गोगच्या हल्ल्यामधून शुध्द उपासना बचावून राहील. हे यहोवाच्या नामाची प्रीती बाळगणाऱ्यांना केवढे सांत्वन देते!
१८. दृष्टांतमय मंदिराची लिखित असणारी काही स्वरुपे कोणती आहेत?
१८ मंदिराची बहुविध स्वरुपे होती. उदाहरणार्थ, त्याच्या आतील व बाहेरील भींतीना सहा दारे होती. (यहेज्केल ४०:६-३५) बाहेरील अंगणात तीस खोल्या (बहुधा लोकांना शांत्यर्पणे खाण्यासाठी) होत्या. (४०:१७) आतील अंगणात होमार्पणाची वेदी होती. (४३:१३-१७) मंदिराच्या पहिल्या गाभाऱ्यात धूप जाळण्यासाठी लाकडी वेदी होती. (४१:२१, २२) परमपवित्र स्थान २० हात चौरस होते आणि मंदिराभोवतालची भिंत प्रत्येक बाजूला ५०० काठ्या (५,१०० फूट) इतकी होती. देवाच्या वैभवाने भरलेले केवढे हे भव्य मंदीर!—यहेज्केल ४१:४; ४२:१६-२०; ४३:१-७.
१९. मंदिराच्या सविस्तर वर्णनामुळे आणि तेथे सेवा करणाऱ्यांना देवाचे दर्जे पूर्ण करावे लागत या गोष्टींकरवी आम्हावर कसा परिणाम होण्यास हवा?
१९ मंदीर, यज्ञयाग, अर्पणे आणि सण याविषयीचे देण्यात आलेल्या सविस्तर वर्णनाने आम्हावर ही छाप पाडावी की आम्ही देवाच्या संस्थेकडून येणाऱ्या सर्व सूचना काळजीपूर्वक पाळाव्या आणि यहोवा व त्याची उपासना उंचावण्याचे हर प्रयत्न करण्यास हवेत. (यहेज्केल ४५:१३-२५; ४६:१२-२०) मंदिरामध्ये सेवा करणाऱ्यांना देवाचे उच्च दर्जे पूर्ण करावे लागत व शिवाय यांना लोकांना ‘पवित्र काय व अशुध्द काय याचा भेद’ शिकवावयाचा होता. (यहेज्केल ४४:१५, १६, २३) या सर्वामुळे आम्हाला देवाचे लोक या नात्याने शुध्दता जोपासण्याची चालना मिळण्यास हवी.—इफिसकर १:३, ४.
२०. (अ) दृष्टांतमय मंदिरातून वाहत येणाऱ्या पाण्यापासून कोणती सूचना मिळते? (ब) हे लाक्षणिक पाणी कोणता परिणाम घडवून आणील?
२० या मंदिरातून एक झरा वाहत राहिला की ज्यामुळे मृत समुद्राचे खारट पाणी चांगले वा गोड झाले आणि तेथे मासे खेळू लागले. (यहेज्केल ४७:१-११) हे पाणी देवाने सार्वकालिक जीवनासाठी केलेल्या तरतुदीची, ज्यात येशूच्या यज्ञार्पणाचाहि समावेश आहे त्याची सूचकता देते. ही तरतूद गोगच्या हल्ल्यातून वाचणाऱ्यांसाठी आणि इतरांसाठी तसेच पुनरुत्थितांसाठीही पुरेशी आहे. (योहान ५:२८, २९; १ योहान २:२; प्रकटीकरण २२:१, २) मृत समुद्र हा मानवजात सध्या ज्या दशेत आहे त्याचे म्हणजे अनुवंशिक पापामुळे धिक्कारलेली स्थिती व मरण तसेच सैतानाचे अधिपत्य यांचे प्रतिनिधित्व करतो. गोड पाण्यात जसे महामूर मासे खेळत होते त्याप्रमाणे मशीही राजवटीतील आरोग्यदायी वातावरणात मानवजातीचा उत्कर्ष होईल.
२१. आज्ञाधारक मानवजात नवीन जगात कशाचा अनुभव घेईल असे यहेज्केल ४७:१२ सुचविते?
२१ दृष्टांतमय झऱ्याच्या बाजूला असणाऱ्या झाडांमुळेही बरे होण्याची सूचकता लाभते. (यहेज्केल ४७:१२ वाचा.) नव्या जगात आज्ञाधारक मानवजातीला परिपूर्ण शारीरिक व आध्यात्मिक आरोग्याचा अनुभव येईल. आणि का येऊ नये? दृष्टांतमय फळझाडांची पानेही औषधीयुक्त आहेत. खरेच, जे यहोवाला जाणतात व त्याची सेवा करतात अशांना केवढा हा आशीर्वाद!
तेव्हा त्यांना समजेल!
२२. नंदनवनात देव लोकांना आपल्या इच्छेनुरुप जागोजागी ठेवील हे कशावरुन दिसते?
२२ यहोवाच्या संस्थेला आता सहकार्य दिल्यामुळे आम्हामध्ये असे गुण उभारले जातील जे, देव लोकांना आपल्या इच्छेनुरुप पृथ्वीवरील नंदनवनात ज्या ठिकाणी ठेवण्याचे निवडील तेथे सहकार्य देण्यास उपयुक्त ठरतील. लोकांना अशाप्रकारे जागोजागी ठेवले जाईल ही गोष्ट यहेज्केलला दृष्टांतात शासकीय पट्ट्याच्या उत्तरेस व दक्षिणेस लोकांना वंशपरत्वे जी वाटणी मिळाल्याचे दाखविण्यात आले त्याकरवी सूचित होते. भूप्रदेशातील तीन भागाच्या “वाट्यात” याजक नसलेल्या लेव्यांसाठी आणि याजकांसाठी भाग त्या दृष्टांतमय मंदिरात देण्यात आला होता. दक्षिण भागाच्या मध्यभागी “अधिपती”च्या समूहाखाली काम करणाऱ्या आंतरवंशीय बळाचा भाग होता. हा “अधिपती” समूह “नव्या पृथ्वीतील” मशीहाचे बादशाही प्रतिनिधित्व करणाऱ्यांना सूचित करतो.—यहेज्केल ४७:१३-४८:३४; २ पेत्र ३:१३; स्तोत्रसंहिता ४५:१६.
२३. बचाव प्राप्त झालेल्या व नंदनवनात जगणाऱ्या मानवजातीत आपल्याला सहभाग मिळविण्यासाठी आम्ही आत्ताच काय केले पाहिजे?
२३ देव आपल्या स्वर्गीय पवित्रस्थानातील आसनावरुन यहेज्केलने पाहिलेल्या लाक्षणिक नगराला आशीर्वादित करील. (यहेज्केल ४८:३५ वाचा.) त्याच्या पृथ्वीवरील व्यवस्थापन जागेला याव्हे-शाम्मा किंवा “यहोवा स्वतः तेथे आहे” असे म्हणतील. तद्वत, देवासाठी दृढ प्रीती व्यक्त करीत राहा आणि बचाव होणाऱ्या मानवजातीमध्ये स्वतःला समाविष्ठ करा आणि नंदनवनमय पृथ्वीवर जिवंत राहा. तेव्हा पृथ्वीवर कोणीही आध्यात्मिक काळोखात नसणार तर सर्व हे जाणतील की यहोवा हाच एकमेव जिवंत व खरा देव आहे. (हबक्कुक २:१४) दुष्टांचा नाश होईल त्यावेळी त्यांच्यामध्ये तुम्हाला तुमच्या इच्छेविरुध्द देवाच्या नावाची कबुली देण्याची पाळी न येवो. आपला विश्वास प्रदर्शित करा आणि आपली आशा बचाव मिळविणाऱ्या लोकांमध्ये आहे हे सिध्द करुन दाखवा, कारण याचवेळी, “राष्ट्रांस समजेल की मी यहोवा आहे” या शब्दांची देव पूर्णता करुन दाखवील.—यहेज्केल ३६:२३.
तुम्ही काय म्हणाल?
◻ यहोवा आध्यात्मिक पहारेकऱ्याचा केवळ कोणत्या स्थितीत स्विकार करतो?
◻ यहोवा आपल्या मेंढरांना कसे वागवितो आणि ख्रिस्ती मेंढपाळांनी त्याच्यासोबत कसा व्यवहार राखावा?
◻ यहुदी राष्ट्राचे पुन्हा क्रियाशील होणे कसे चित्रित करण्यात आले? (यहेज्केल ३७:१-१४) याची आधुनिक समांतरता कोणती आहे?
◻ गोग मागोग कोण आहे, व तो यहोवाच्या साक्षीदारांवर हल्ला चढवील त्यावेळी काय घडेल?
◻ दृष्टांतमय मंदिरातून पाणी वाहत होते ही गोष्ट कशास सूचित आहे?
[२५ पानांवरील नकाशा/चित्र]
पवित्र वाटा व वंशपरत्वे नेमून दिलेल्या जागा
[For fully formatted text, see publication]
दान
आशेर
नफताली
मनश्शे
एफ्राईम
रऊबेन
यहुदा
बन्यामीन
शिमोन
इस्साखार
जबुलून
गाद
यार्देन
नदी
क्षार समुद्र
गालील समुद्र
हामाथाकडे
पवित्र
वाटा
मरीबथ-कादेश
तामार
एन-एग्लेम
एन-गेदी
भूमध्य समुद्र
अधिपती
[२३ पानांवरील चित्रं]
प्राचीन काळच्या मेंढपाळांप्रमाणे यहोवा आपल्या मेंढरांची ममतेने काळजी वाहतो. यासाठीच ख्रिस्ती मेंढपाळांनीही देवाच्या कळपाची ममतेने काळजी वाहण्यास हवी