वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 ११/१५ पृ. ८-९
  • दानीएलाने देवाची नित्य सेवा केली

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • दानीएलाने देवाची नित्य सेवा केली
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • धूर्त योजना
  • दानीएल दृढ राहतो
  • आपल्यासाठी धडा
  • सिंहांच्या गुहेत दानीएल!
    बायबलमधून शिकू या!
  • सिंहांच्या गुहेत दानीएल
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • दारयावेश—न्यायबुद्धी असलेला राजा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • दानीएल पुस्तकातील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 ११/१५ पृ. ८-९

त्यांनी यहोवाच्या इच्छेप्रमाणे केले

दानीएलाने देवाची नित्य सेवा केली

एका रात्रीत इतिहास बदलणे तशी दुर्मिळच गोष्ट आहे. तथापि, सा. यु. पू. ५३९ मध्ये मेदी आणि पारसी यांनी केवळ काही तासांत बॅबिलोन साम्राज्य नेस्तनाबूद केले तेव्हा मात्र असे घडले. त्या वर्षापर्यंत दानीएल हा यहोवाचा संदेष्टा बॅबिलोनमध्ये यहुदी-देशपारी म्हणून जवळजवळ ८० वर्षांपासून वास्तव्यास होता. तो त्याच्या वयाच्या सुमारे नव्वदीमध्ये असताना त्याला देवाबद्दल असणाऱ्‍या त्याच्या सत्वाच्या सर्वात मोठ्या परीक्षेस सामोरे जावयाचे होते.

बॅबिलोनचा पाडाव झाल्यानंतर दानीएलासाठी सर्व गोष्टी कशा सुरळीत होत असल्याचे वाटत होते. ६२ वर्षांच्या दारयावेश मेदी या नवीन राजाची दानीएलावर कृपापसंती होती. दारयावेश गादीवर आल्यानंतर त्याने जे पहिले काम केले ते म्हणजे त्याने १२० जणांना प्रांताधिकारी नेमले व त्यांजवर तीन अध्यक्ष नेमले.a दानीएल या तीन कृपापसंती पात्र झालेल्यांपैकी होता. दानीएलाची अलौकिक क्षमता ओळखून दारयावेशाने त्याला मुख्यमंत्री म्हणून नेमण्याचा देखील विचार केला! तथापि, त्याचवेळी असे काही घडले ज्यामुळे राजाच्या सर्व योजना बदलल्या.

धूर्त योजना

दानीएलाचे सहअध्यक्ष आणि प्रांताधिकाऱ्‍यांचा एक मोठा समुदाय कारस्थानी कल्पना घेऊन राजाकडे गेला. “हे राजा, तीस दिवसपर्यंत आपल्याशिवाय कोणाहि देवाची अथवा मानवाची आराधना कोणी करील तर त्यास सिंहांच्या गुहेत टाकावे,” असे नवीन आज्ञापत्र संमत करावे अशी त्यांनी त्याला विनंती केली. (दानीएल ६:७) ते लोक आपल्यावर असणाऱ्‍या त्यांच्या एकनिष्ठेची उघड कबुली देत असल्याचे दारयावेशला कदाचित वाटले असावे. या नियमामुळे परदेशी या नात्याने राज्यातील त्याच्या प्रमुख स्थानास बळकटी मिळेल असाही त्याने विचार केला असावा.

तथापि, अध्यक्षांनी आणि प्रांताधिकाऱ्‍यांनी राजासाठी या नियमाचा प्रस्ताव मांडला नव्हता. त्यांनी “राज्यकारभारासंबंधाने दानीएलाविरुद्ध काही निमित्त शोधण्याचा प्रयत्न . . . चालविला; पण त्यांस काही निमित्त किंवा दोष सापडेना; कारण तो विश्‍वासू असून त्याच्या ठायी काही चूक किंवा अपराध सापडला नाही.” त्यामुळे या धूर्त लोकांनी असा विचार केला की, “दानीएलाविरुद्ध काही निमित्त काढता येणार नाही मात्र त्याच्या देवाच्या नियमासंबंधाने त्याच्याविरुद्ध काही निमित्त काढता आले तर येईल.” (दानीएल ६:४, ५) दानीएल यहोवास दररोज प्रार्थना करतो हे ठाऊक असल्यामुळे या गोष्टीस देहान्त दंड अपराध करण्यासाठी त्यांनी व्यूह रचला.

अध्यक्ष आणि प्रांताधिकारी दानीएलाच्या नावाने कदाचित बोटे मोडत असतील यासाठी, की तो “[त्यांच्यात] श्रेष्ठ ठरला, कारण त्याच्या ठायी उत्तम आत्मा वसत होता; त्याला सर्व राज्यावर नेमावे असा राजाचा विचार होता.” (दानीएल ६:३) दानीएलाच्या प्रामाणिकपणामुळे भ्रष्टाचार आणि अवैध प्राप्ती यांवर आळा बसला जो की अनेकांना नको होता. काही असले तरी आज्ञापत्रावर राजाची सही मिळविण्यासाठी त्यांनी त्यास पटविले आणि हे आज्ञापत्र ‘मेदी व पारसी यांच्या कधी न पालटणाऱ्‍या कायद्याचा’ एक भाग बनविले गेले.—दानीएल ६:८, ९.

दानीएल दृढ राहतो

नवीन ठराव कळल्यानंतर दानीएलाने यहोवाची प्रार्थना करण्याचे थांबवले का? निश्‍चितच नाही! त्याने “आपल्या नित्यक्रमाप्रमाणे” घराच्या वरील खोलीत गुडघे टेकून दिवसातून तीन वेळा देवाला प्रार्थना करण्याचे चालूच ठेवले. (दानीएल ६:१०) तो प्रार्थना करीत असताना त्याचे शत्रू असलेली “मनुष्ये जमावाने आली तो दानीएल आपल्या देवाची प्रार्थना व आराधना करीत आहे असे त्यांस आढळून आले.” (दानीएल ६:११) त्यांनी ही गोष्ट राजाच्या निदर्शनास आणून दिली तेव्हा दारयावेश खिन्‍न झाला कारण त्याने ज्या नियमावर स्वाक्षरी केली होती त्या नियमाचा परिणाम दानीएलाला भोगावा लागणार होता. हा वृतान्त आपल्याला सांगतो की, “त्याचा बचाव करावा म्हणून त्याने सूर्य मावळेपर्यंत प्रयत्न केला.” परंतु, राजा देखील त्याने संमत केलेला नियम रद्द करू शकत नव्हता. यास्तव, दानीएलास कदाचित जमिनीखालील किंवा भूमिअंतर्गत सिंहांच्या गुहेत नेण्यात आले असावे. “ज्या देवाची तू नित्य सेवा करितोस तो तुला सोडवील,” असे म्हणून राजाने दानीएलास धीर दिला.—दानीएल ६:१२-१६.

त्या रात्री दारयावेशाच्या डोळ्याला डोळा लागला नाही तसेच त्याने काही खाल्ले देखील नाही, तो दुसऱ्‍या दिवशी घाईघाईने गुहेकडे गेला. दानीएल जिवंत होता आणि त्याला कोणतीही इजा झालेली नव्हती! त्यानंतर राजाने लगेचच कार्यवाही केली. त्याने दानीएलाच्या शत्रूंना आणि त्यांच्या कुटुंबांना शिक्षा म्हणून सिंहाच्या गुहेत टाकले. “माझ्या साम्राज्याच्या सर्व हद्दीतील लोकांनी दानीएलाच्या देवापुढे कंपित होऊन त्याचे भय धरावे,” अशी दारयावेशाने त्याच्या संपूर्ण राज्यात दवंडी देखील पिटविली.—दानीएल ६:१७-२७.

आपल्यासाठी धडा

विश्‍वासूपणाचे दानीएल उत्तम उदाहरण होता. दानीएलाने यहोवाची सेवा “नित्य” केली, या गोष्टीची नोंद यहोवाची उपासना न करणाऱ्‍या राजाने देखील घेतली. (दानीएल ६:१६, २०) “नित्य” असा भाषांतरित केलेल्या अरेमिक मूळ शब्दाचा अर्थ मूलभूतपणे “वर्तुळात फिरणे” असा होतो. हे अखंडतेस सूचित करते. यहोवाबद्दल असणारे दानीएलाच्या अभंग सत्वाचे किती उत्तम हे वर्णन!

दानीएलाला सिंहांच्या गुहेत टाकण्यात आले त्याच्या पुष्कळ काळापूर्वी त्याने नित्याचे वैशिष्ट्य विकसित केले होते. बॅबिलोनमधील एक तरुण बंदीवासी या नात्याने, मोशेच्या नियमशास्त्राने निषिद्ध ठरविलेले अथवा मूर्तिपूजक विधीद्वारे अशुद्ध असलेले अन्‍न किंवा पेय घेण्यास त्याने नकार दिला होता. (दानीएल १:८) त्यानंतर, त्याने बॅबिलोनचा राजा नबुखद्‌नेस्सर यास देवाचा संदेश धैर्याने घोषित केला. (दानीएल ४:१९-२५) बॅबिलोनचा पाडाव होण्याच्या काही तासांपूर्वीच दानीएलाने निर्भिडपणे राजा बेलशस्सरवरील देवाचा न्यायदंड घोषित केला. (दानीएल ५:२२-२८) यामुळे दानीएलाला सिहांच्या गुहेत टाकण्यात आले तेव्हा त्याने प्रस्थापित केलेल्या विश्‍वासू मार्गात तो कायम राहिला.

तुम्ही सुद्धा देवाची नित्य सेवा करू शकता. तुम्ही तरुण व्यक्‍ती आहात का? तर मग, जगाची कुसंगत आणि भ्रष्ट आचार यांना नाकारून नित्याचे वैशिष्ट विकसित करण्यासाठी आताच कार्य करा. तुम्ही काही काळापासून यहोवाची सेवा करीत असल्यास विश्‍वासू सहनशीलतेचा नमुना कायम ठेवा. हार मानू नका कारण तुम्ही प्रत्येक परीक्षेस तोंड देता तेव्हा यहोवाची नित्य सेवा करण्याचा आपण निर्धार केला आहे, हे त्यास दाखविण्याची आपल्याला एक संधी मिळते.—फिलिप्पैकर ४:११-१३.

[तळटीपा]

a “प्रांताधिकारी” (अक्षरशः अर्थ “राज्याचा संरक्षक”) ही संज्ञा अधिकारिता असणाऱ्‍या जिल्ह्यावर प्रमुख राज्यकर्ता म्हणून कार्य करण्यासाठी पारसी राजाद्वारे नियुक्‍त केलेल्या राज्यपालास सूचित होते. राजाचा अधिकृत प्रतिनिधी या नात्याने, तो कर जमा करण्यासाठी आणि मिळालेला वसूल राजकीय न्यायालयात पाठविण्यासाठी जबाबदार होता.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा