वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w89 २/१ पृ. १५-१९
  • यहोवाने बादशहांना धडा शिकविला तेव्हा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाने बादशहांना धडा शिकविला तेव्हा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • खरा देव कोण आहे ते नबुखद्‌नेस्सर शिकतो
  • वृक्षाचे स्वप्न
  • बेलशस्सर भिंतीवरील लिखाण बघतो
  • दारयावेश मुक्‍तता देण्याच्या यहोवाच्या सामर्थ्याविषयी शिकतो
  • दानीएल पुस्तकातील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • देवाच्या भविष्यवाणीच्या वचनाकडे आज लक्ष द्या!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • यहोवा विश्‍वास व धैर्याचे प्रतिफळ देतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • नेहमीसाठी टिकणारं राज्य
    बायबलमधून शिकू या!
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
w89 २/१ पृ. १५-१९

यहोवाने बादशहांना धडा शिकविला तेव्हा

“त्याची सर्व कृत्ये सत्य आहेत. त्याचे सर्व मार्ग न्याय्य आहेत. जे अभिमानाने चालतात त्यांना त्याला नीचावस्थेत लोटता येते.”—दानीएल ४:३७.

१. अलीहूने यहोवा देवाच्या कोणत्या गुणाकडे लक्ष वेधविले?

“पाहा, देव आपल्या सामर्थ्याने थोर कृत्ये करतो. त्याच्यासमान शिक्षण देणारा कोण आहे?” अशा शब्दांनी अलीहूने त्रास सहन करणाऱ्‍या इयोबाचे लक्ष निर्माणकर्त्या यहोवा देवाठायी असणाऱ्‍या विविध गुणलक्षणांपैकी एकाकडे नेले. इतरांना सूचना वा शिक्षण देण्याच्या बाबतीत कोणीही देवासमान ठरु शकणार नाही.—इयोब ३६:२२.

२, ३. (अ) लोकांना कोणता एक धडा शिकविण्याची गरज आहे असे यहोवाला दिसून आले? (ब) मोशेच्या काळी असा कोणता अधिपती होता ज्याला हा धडा यहोवाला शिकवावा लागला आणि कशाप्रकारे? (क) लोकांना आपला धडा शिकविण्याचा उद्देश आपल्या वचनात देवाने किती वेळा सांगितला?

२ मानव आणि राष्ट्रे यांना ज्या गोष्टी शिकवाव्या असे देवाला वाटले त्यात त्यांचा त्याच्यासोबतचा योग्य नातेसंबंध ही गोष्ट होती. हे स्तोत्रकर्त्या दावीदाच्या स्तोत्रसंहिता ९:१९, २० मधील शब्दात ठळकपणे सांगण्यात आले. तेथे तो म्हणतोः “हे यहोवा, उठ. मर्त्य मानवास प्रबळ होऊ देऊ नको. राष्ट्रांचा न्यायनिवाडा तुझ्यापुढे होऊ दे. हे यहोवा, त्यांस दहशत घाल. आपण केवळ मर्त्य आहोत असे राष्ट्रांना कळू दे.”

३ पृथ्वीवरील शासनकर्त्यांत मोशेच्या काळी असणारा फारो हा असा होता ज्याला धडा शिकविण्याची गरज यहोवा देवाला दिसून आली. देवाने मिसरी लोकांवर पीडा पाठवून तो धडा दिला. याशिवाय त्या अहंकारी फारोला यहोवाने म्हटलेः “मी तुला आपले सामर्थ्य दाखवावे आणि माझे नाव साऱ्‍या पृथ्वीवर प्रगट व्हावे यासाठीच मी तुला राखले आहे.” (निर्गम ९:१६) तसेच निर्गम ६:७ पासून ते योएल ३:१७ पर्यंत ७० पेक्षा अधिक वेळा यहोवाने त्याच्या वचनात असे म्हटले आहे की तो अशीच महत्कृत्ये करणार की ज्यामुळे बादशहा, लोक व राष्ट्रे यांना कळून येईल की तो यहोवा असून सर्व पृथ्वीवर परात्पर असा आहे.

४. दानीएलाच्या काळी कोणत्या तीन अधिपतींना यहोवाकडून धडा शिकावा लागला व कोणत्या माध्यमाने?

४ यहोवाने बादशहांना कसा धडा शिकविला त्याची थरारक उदाहरणे दानीएलाच्या पुस्तकात लिखित आहेत. नबुखद्‌नेस्सर, बेलशस्सर आणि दारयावेश हे ते अधिपती होत. यांना केव्हा धडा मिळाला? बहुधा इ. स. पू. ६१७ आणि इ. स. पू. ५३५ मध्ये. पण कसा? स्वप्ने दाखवून, त्याचा उलगडा करुन आणि आपले सामर्थ्य प्रदर्शित करुन. आपण विश्‍वाचे सार्वभौम सत्ताधीश आहोत आणि ती माणसे केवळ कःपदार्थ आहेत हे यहोवाने त्या मानवी अधिपतींना शिकवले. हा असा धडा आहे जो सध्याच्या जागतिक शासनकर्त्यांनाहि शिकावा लागेल.

५. दानीएल पुस्तकाच्या विश्‍वासाह्‍यतेविषयी संशय बाळगणाऱ्‍यांना कोणत्या साक्षीने उत्तर देता येईल?

५ पण दानीएलाच्या पुस्तकाच्या विश्‍वासाह्‍यतेविषयी आधुनिक टीकाकारांनी बरीच टीका केलेली नाही का? या टीकाकारांना उत्तर देताना एका पवित्र शास्त्र प्रामाण्यांनी अगदी उचितरित्या म्हटले आहेः “या पुस्तकात जे चमत्कार सांगण्यात आले आहेत, जे भविष्यवाद कथित करण्यात आले आहेत ते त्या काळात राहणाऱ्‍या दानीएलाकरवी आहेत. तर मग आपणाला एकतर चमत्कार आणि भाकिते खरे मानावे लागतील किंवा ते असत्य आहेत असेच पत्करावे लागेल.” (दानीएल द प्रॉफेट, लेखक ई. बी. पुसे, पृष्ठ ७५) आपल्या पुस्तकात लेखकाने आपली ओळख “मी दानीएलाने” अशा शब्दांकरवी वेळोवेळी दिली आहे. (दानीएल ८:१५; ९:२; १०:२) हे सगळे खोटे लिखाण होते का? नाही. १८ व्या शतकाच्या आरंभाला दानीएलाच्या पुस्तकाच्या संपादकत्वाविषयी यहुदी आणि ख्रिश्‍चनांनी कसलाच आक्षेप घेतला नव्हता ही वस्तुस्थिती आहे. तथापि, आधुनिक पवित्र शास्त्र प्रामाण्यांच्या मतापेक्षा दानीएल पुस्तकाच्या बाबतीत शास्त्रवचनीय साक्ष भारदस्त आहे. यहेज्केलच्या पुस्तकात आम्हाला दानीएलचा तीनदा उल्लेख आढळतो. (यहेज्केल १४:१४, २०; २८:३) तसेच देवाचा पुत्र येशू याने उद्‌गारिलेले आणि मत्तय २४:१५, १६ मध्ये लिखित असणारे उद्‌गार अधिक निर्णायक वाटतात. त्याने म्हटलेः “दानीएल संदेष्टयाच्या द्वारे सांगितलेला ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्रस्थानात उभा असलेला तुम्ही पाहाल, (वाचकाने हे ध्यानात आणावे,) तेव्हा जे यहुदीयात असतील त्यांनी डोंगराकडे पळून जावे.”a

खरा देव कोण आहे ते नबुखद्‌नेस्सर शिकतो

६. बाबेलोनच्या राजाचा गर्व कशामुळे वाढला असावा आणि त्याने स्वतःविषयी आपल्या लिखाणात काय म्हटले?

६ यशया संदेष्टा दाखवितो त्याप्रमाणे बाबेलोनचे राजे खूप गर्विष्ठ होते. (यशया १४:४-३२) नबुखद्‌नेस्सर हा सुद्धा धर्मासंबंधाने गाढ आस्था राखून होता. आपल्या लिखाणात त्याने “मोठमोठ्या वास्तुंचा प्रकल्प आणि बाबेलोनियाच्या दैवतांविषयी त्याने घातलेले लक्ष” याविषयीचा उल्लेख केला. सन्हेरीबने यरुशलेम व सर्व यहुदीया प्राप्त करण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्यावर आपण तो प्रयत्न करावा असे नबुखद्‌नेस्सराच्या मनात आले व यात त्याने यशही मिळविले.

७. दानीएलाच्या पहिल्या अध्यायात नमूद असणाऱ्‍या कोणत्या अनुभवाद्वारे नबुखद्‌नेस्सराने इब्री लोकांच्या देवाचा आदर करण्याचा धडा शिकून घ्यावयास हवा होता?

७ नबुखद्‌नेस्सरपुढे दानीएल व त्याचे तीन इब्री साथीदार उभे राहिले तेव्हा यांच्या देवाविषयीचा आदर त्याच्यामध्ये बळावण्याचे कारण होते, कारण “ज्ञानाच्या व विवेकाच्या बाबतीत राजा त्यांस जे काही अवघे विचारी त्यात ते अवघ्या राज्यात असलेल्या सर्व ज्योतिषांपेक्षा व मांत्रिकांपेक्षा दसपट हुशार आहे असे त्यास दिसून येई.” होय, इतर दैवतांची भक्‍ती करणाऱ्‍यांपेक्षा यहोवाला आपला देव मानणाऱ्‍या या तिघा सूज्ञ पुरुषांचा श्रेष्ठपणा अधिक होता. या वस्तुस्थितीकडे नबुखद्‌नेस्सरास दुर्लक्ष करता आले नाही.—दानीएल १:२०.

८. बाबेलोनी ज्ञान्यांठायी खास अशी बुद्धीमत्ता नाही हे यहोवाने कशाप्रकारे उघड केले?

८ पण यहोवाला नबुखद्‌नेस्सराला अजून धडा शिकवायचा होता. हा धडा दानीएलच्या दुसऱ्‍या अध्यायात नमूद आहे. देवाने राजाला एक भयंकर स्वप्न पडू दिले व ते त्याने विसरावे असे केले. बाबेलोनी बादशहाला या स्वप्नाविषयी बरीच उद्विग्नता वाटायला लागली त्यामुळे त्याने आपणाकडील सर्व ज्ञानी लोकांना बोलावून ते स्वप्न कोणते होते व त्याचा काय अर्थ आहे हे कळविण्यास सांगितले. अर्थातच यांना स्वप्न काय आहे ते सांगता आले नाही, मग त्याचा अर्थ सांगणे बाजूलाच राहिले; आणि अशाप्रकारे आपणाठायी खास बुद्धिमत्ता ही नाही हे त्यांनी मूकपणे प्रगट केले. यामुळे राजा इतका चिडला की त्याने या सर्वांची कत्तल केली जावी असे फर्मान काढले. राजाच्या या फर्मानाविषयी दानीएल व त्याच्या तीन साथीदारांना ही माहिती मिळाली तेव्हा दानीएलाने काही वेळ मागून घेतला व तो त्याला देण्यात आला. यानंतर त्याने व त्याच्या सोबत्यांनी याविषयी कळकळीची प्रार्थना यहोवाला केली. याचा परिणाम हा झाला की यहोवाने ते स्वप्न व त्याचा अर्थ दानीएलास प्रगटविला.—दानीएल २:१६-२०.

९. (अ) नबुखद्‌नेस्सराचे स्वप्न केवळ कोणाला सांगता आले आणि त्याने त्याचा कोणता अर्थ सांगितला? (ब) तद्वत, राजा कोणत्या निर्णयास पोहंचला?

९ दानीएलला नबुखद्‌नेस्सरपुढे आणण्यात आल्यावर राजाने त्याला विचारलेः “मी जे स्वप्न पाहिले ते व त्याचा अर्थ मला सांगावयास तू समर्थ आहेस काय?” या अहंकारी बादशहाला, त्याचे ज्ञानी पुरुष ते रहस्यमय स्वप्न व त्याचा अर्थ सांगावयास असमर्थ ठरले याचे स्मरण दिल्यावर दानीएल पुढे म्हणालाः “तरी रहस्ये प्रगट करणारा देव स्वर्गात आहे आणि त्याने पुढील काळी काय होणार हे नबुखद्‌नेस्सर महाराजांना कळविले आहे.” पुढ दानीएलाने, राजाने स्वप्नात पाहिलेल्या एका भव्य मूर्तीचे आणि त्याच्या अर्थाचे कथन केले. राजा इतका स्तंभित झाला की त्याच्या तोंडातून हे उद्‌गार निघालेः “तुमचा देव खरोखरी देवाधिदेव व राजराजेश्‍वर आहे; आणि तुला हे रहस्य प्रगट करता आले म्हणून तो रहस्ये प्रगट करणारा देव आहे.” अशाप्रकारे यहोवाने, तो स्वतः खरा देव आहे हा नबुखद्‌नेस्सर राजाला धडा शिकविला.—दानीएल २:२६, २८, ४७.

१०, ११. (अ) नबुखद्‌नेस्सर राजाने आपल्या अभिमानाने काय केले व त्याने कोणती आज्ञा दिली? (ब) राजाचे आज्ञापालन करण्याचे नाकारण्यामुळे तीन इब्री पुरुषांनी कोणता वादविषय सामोरा आणला व त्याचा प्रत्यय काय दिसला?

१० इब्री लोकांच्या देवाचे ज्ञान व बुद्धीमत्ता बघून नबुखद्‌नेस्सर राजा निश्‍चये भारावला गेला तरीही त्याला अजून शिकायचे होते. त्याने आपल्या उन्मत्तपणामुळे सोन्याची एक भव्य मूर्ति दुरा नामक मैदानात उभी केली. ही मूर्ति ६० हात उंच आणि ६ हात रुंद होती. यामुळे आपल्याला प्रकटीकरण १३:१८ मधील “श्‍वापदा”च्या ६६६ या संख्येचे लगेच स्मरण होते. (एक हात साधारण दीड फूट लांब असतो, त्यामुळे ती मूर्ति ९० फूट उंच व ९ फूट रुंद होती.) राजाने “तिची प्रतिष्ठा करण्यासाठी” आपल्या राज्यातील सर्व अधिकाऱ्‍यांना बोलाविले आणि आज्ञापिले की संगीताचा नाद कानी पडताच सर्वांनी नमन करुन मूर्तीला भक्‍ती प्रदान करावी. यावेळी उपस्थित असणारे तीन इब्री तसे करीत नाहीत हे काही खास्दी द्वेष्ट्या अधिकाऱ्‍यांनी पाहिले व ते वर्तमान त्यांनी राजाला कळविले.—दानीएल ३:१, २.

११ नबुखद्‌नेस्सराने या गोष्टीकडे मोठ्या गांभिर्याने पाहिले कारण, “लोकांच्या मुखी मोठमोठ्या दैवतांची भक्‍ती वदवून दाखविणारा” अशी त्याने स्वतःविषयी घमेंड केली होती. या कारणास्तव, नबुखद्‌नेस्सराचा राजेशाही दिमाख आणि त्याची धर्माविषयीची इर्ष्या डिवचली गेली. क्रोधाने संतप्त होऊन या घमेंडी बादशहाने त्या इब्री पुरुषांना आणखी एक संधि दिली आणि हा शेवटचा निर्वाळा दिलाः “तुम्ही साष्टांग दंडवत घातले . . . नाही . . . तर तुम्हास धगधगीत अग्नीच्या भट्टीत ताबडतोब टाकण्यात येईल. माझ्या हातून सोडवील असा कोणता देव आहे?” पण सरतेशेवटी नबुखद्‌नेस्सरला हे प्रत्ययास आलेच की, त्यांचा देव आपल्या सेवकांची खरीच सोडवणूक करू शकतो आणि इब्री लोकांच्या देवासारखा मुक्‍तता देणारा दुसरा कोणताहि देव नाही.—दानीएल ३:१५.

वृक्षाचे स्वप्न

१२, १३. (अ) नबुखद्‌नेस्सराने पाहिलेल्या वृक्षाच्या स्वप्नाविषयीचे कोणते स्पष्टीकरण दानीएलाने त्याला दिले? (ब) या स्वप्नाच्या उलगड्याचा आपणावर काहीही परिणाम झाला नाही हे नबुखद्‌नेस्सराने कसे दाखविले?

१२ तुम्हाला ते धडे शिकायला मिळाले असते तर तुमच्यावर कोणता परिणाम घडला असता? ते तिन्ही धडे नबुखद्‌नेस्सर राजाला आपले स्थान ओळखण्यात पुरे झाले नाहीत असे दिसते. यामुळेच यहोवाला त्याला आणखी एक धडा शिकवावा लागला. यावेळी परत स्वप्न आले आणि पुन्हा एकदा बाबेलोनच्या कोणाही ज्ञान्यास ते उलगडता येईना. सरतेशेवटी, दानीएलाला आणण्यात आले व त्याने राजाला स्वप्नाचा अर्थ सांगितला तो असा की, तो सात वर्षे “वनपशू”प्रमाणे दिवस काढील व मग परत आपल्या स्थितीला येईल.—दानीएल ४:१-३७.

१३ यानंतर जे काही घडले त्याकरवी नबुखद्‌नेस्सर राजावर स्वप्नाच्या अर्थाचा तेवढा परिणाम झाला असे दिसून आले नाही. तदनंतर एका वर्षाने राजमहालात हिंडत असता मोठ्या गर्विष्ठपणे म्हणालाः “हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधिले आहे ना?” केवढा हा अहंकार! तेव्हा त्याच क्षणी स्वर्गातून एक वाणी ऐकू आली, जिने त्या अहंकारी अधिपतीला म्हटले की, त्याचे राज्य काढून घेण्यात आले आहे व तो आता, त्याला “मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे . . . हे ज्ञान . . . होईपर्यंत” सात काळासाठी वनातील पशूंसोबत राहणार.—दानीएल ४:३०-३२.

१४. वृक्षाचे स्वप्न कसे पूर्ण झाले, व याचा नबुखद्‌नेस्सरावर कोणता परिणाम झाला?

१४ त्या सात काळासाठी वा वर्षांसाठी पशूसारखे जीवन व्यतित केल्यावर यहोवाने त्याची समज त्याला परत दिली आणि मग राजाला हे कबूल करावेच लागलेः ‘तू असे काय करतोस असे परात्पराचा हात धरून कोणाच्याने त्याला म्हणवत नाही.’ हा धडा आपल्याला चांगला शिकावयाला मिळाला हे त्या बाबेलोनी सत्ताधिशाने याप्रकारे व्यक्‍त केलेः “आता मी नबुखद्‌नेस्सर स्वर्गीच्या राजाचे स्तवन करतो, त्याचा जयजयकार करतो व त्याचा महिमा वर्णितो. कारण त्याची सर्व कृत्ये सत्य आहेत, त्याचे सर्व मार्ग न्याय्य आहेत. जे अभिमानाने चालतात”—जसा की राजा स्वतः होता—“त्यांस त्याला नीचावस्थेत लोटता येते.” अशाप्रकारे यहोवाने सार्वभौमत्वाचा विषय वारंवार ज्या पद्धतीने हाताळला तो, हा अहवाल कोणाचे काल्पनिक लिखाण नसून खरोखरचा इतिहास लिखित करण्यासाठी देवाकडून प्रेरणा मिळालेल्या लेखकाने लिहिला आहे याचा तो स्थितीजन्य पुरावा नाही का?—दानीएल ४:३५, ३७.

बेलशस्सर भिंतीवरील लिखाण बघतो

१५. खरा देव यहोवा याच्याविषयी बेलशस्सराने कसा तिटकारा दाखविला?

१५ यहोवाने धडा शिकवावा असा प्रसंग ज्याला आला तो आणखी एक बादशहा बेलशस्सर होता. हा नबुखद्‌नेस्सरचा मुलगा नबोनिडस राजाचा सहशासक व त्याचा वारस होता. एका भव्य मेजवानीप्रसंगी बेलशस्सरने आपल्या सन्माननीय पाहुण्यांना, बायकांना व उपपत्न्यांना मद्य प्राशन करता यावे म्हणून त्याच्या आजोबाने जी सोन्याची पात्रे यरुशलेमातील यहोवाच्या मंदिरातून आणली होती ती मोठ्या आडदांडपणे मागविली. अशा प्रकारे “त्यांनी द्राक्षारस पिऊन सोने, रुपे, पितळ, लोखंड, काष्ठ व पाषाण यापासून घडलेल्या दैवतांचे स्तवन केले.”—दानीएल ५:३, ४.

१६, १७. (अ) कोणत्या माध्यमाने यहोवाने बेलशस्सरास भीतीने गार केले? (ब) भिंतीवर लिहिण्यात आलेल्या लिखाणासंबंधाने दानीएलाने कोणता उलगडा केला व तो खरा असल्याचे कसे सिद्ध झाले?

१६ बाबेलोनचे अधिपत्य संपुष्टात आणावे ही देवाकडील वेळ आली होती. याकरताच, त्याने भिंतीवर विचित्रपणे हाताने केलेले लिखाण प्रकटविले. हा चमत्कार बघून राजाचे हातपाय इतके गारठले की त्याने लगेच आपल्या सर्व ज्ञान्यांनी येऊन लिखाणाचा उलगडा करावा असे फर्माविले. पण कोणालाही तो करता आला नाही. तेव्हा त्याच्या आईने त्याला स्मरण दिले की नबुखद्‌नेस्सर राजाच्या स्वप्नांचा ज्याने उलगडा केला होता तोच दानीएल हे काम करू शकेल. (दानीएल ५:१०-१२) दानीएलला बोलावून तो हे काम करु शकतो का अशी विचारणा करण्यात आली तेव्हा त्याने बादशहाला, त्याच्या अहंकारी आजोबाला, सबंध मानवजातीवर परात्पर देवाची सत्ता आहे हे ज्ञात करुन देण्यासाठी कसे नमविले होते त्याचे स्मरण दिले.—दानीएल ५:२०, २१.

१७ दानीएलाने पुढे बेलशस्सरास म्हटलेः “ज्याच्या हाती तुझा प्राण आहे व ज्याच्या स्वाधीन तुझे सर्व व्यवहार आहेत त्या देवाला [तू] मान दिला नाही.” (दानीएल ५:२३) या कारणास्तव भिंतीवरील लिखाणाने बाबेलोनी अधिपतीला ही नोटीस दिली की त्याच्या राजपदाचे दिवस आता संपले आहेत, त्याला तराजूत तोलण्यात येऊन तो उणा भरला आहे हे दिसले आणि त्याचे राज्य मेद व पारस यांच्या ताब्यात जाणार आहे. हा अत्यंत जरुरीचा धडा यहोवाने त्या घमेंडी बादशहाला शिकवल्यावर त्याच रात्री बेलशस्सर या खास्दी राजाचा वध झाला.—दानीएल ४:२३.

१८. आजच्या जागतिक शासनकर्त्यांना यहोवा, त्याचे सार्वभौमत्व व मुक्‍तता देण्याच्या त्याच्या सामर्थ्याविषयीचा तसाच धडा कोणत्या प्रकारे शिकविणार आहे?

१८ नबुखद्‌नेस्सर आणि बेलशस्सर या दोन गर्विष्ठ बादशहांना यहोवाने आपल्या सार्वभौमत्वाविषयी आणि मुक्‍तता प्रदान करण्याच्या सामर्थ्याविषयी जसा धडा दिला त्याचप्रमाणे हर्मगिदोन प्रसंगी तो पृथ्वीच्या सर्व शासनकर्त्यांना हे माहीत करून देईल की, तोच केवळ सर्वोच्च शास्ता, सर्वसमर्थ असा विश्‍वाचा सार्वभौम आहे. तुमच्या जीवनावर याकरवी परिणाम होणार. तो कसा? कारण याच वेळी यहोवा, त्याने तप्त अग्नीच्या भट्टीतून जसे तीन इब्री पुरुषांना वाचविले तसेच आपल्या विश्‍वासू सेवकांना वाचविणार आहे.—दानीएल ३:२६-३०.

दारयावेश मुक्‍तता देण्याच्या यहोवाच्या सामर्थ्याविषयी शिकतो

१९, २०. दानीएलाच्या जीवनात घडलेल्या कोणत्या प्रसंगाने दारयावेश राजाला, यहोवाठायी मुक्‍तता प्रदान करण्याचे सामर्थ्य आहे याचा धडा शिकविला?

१९ दानीएलाचा सहावा अध्याय आम्हाला आणखी एका प्रसंगाची माहिती देतो ज्यामध्ये यहोवाने दारयावेश या बादशहाला, देवाठायी मुक्‍तता प्रदान करण्याविषयी असणाऱ्‍या सामर्थ्याविषयीचा धडा शिकविला. एका कटाचा असा परिणाम झाला की बादशहाची इच्छा नव्हती तरी दानीएलाला सिंहाच्या गुहेत टाकण्यात आले. येथे या बादशहाने, आपण देवापेक्षाहि श्रेष्ठ आहोत असे गर्वाने म्हटले नव्हते. दानीएलला त्याचा देव वाचवू शकेल अशी दारयावेश राजाने खात्री दिली होती तरी यावर त्याचा पूर्णतयः विश्‍वास नव्हता असे दिसते. तसे असते तर मग त्याने रात्र काळजीने जागून का काढली असती व मग पहाटेच तो लगबगीने सिंहाच्या गुहेकडे का धावला असता बरे? तेथे पोहंचल्यावर तो मोठ्याने ओरडलाः “हे दानीएला, जिवंत देवाच्या सेवका, ज्या देवाची सेवा तू नित्य करतोस त्याला सिंहापासून तुला सोडविता आले आहे काय?”—दानीएल ६:१८-२०.

२० होय, देवाला दानीएलला संरक्षण देता आले. दारयावेश राजाला इतका आनंद झाला की त्याने हे फर्मान काढलेः “माझ्या साम्राज्याच्या सर्व हद्दीतील लोकांनी दानीएलाच्या देवापुढे कंपित होऊन त्याचे भय धरावे; कारण तो जिवंत देव आहे. तो सर्वकाळ जवळ आहे. त्याचे राज्य अविनाशी व त्याचे प्रभुत्व अनंत आहे. ज्याने दानीएलास सिंहाच्या पंजातून सोडविले तोच बचाव करणारा व मुक्‍तीदाता आहे; तो आकाशात व पृथ्वीवर चिन्हे व उत्पात घडवणारा आहे.”—दानीएल ६:२६, २७.

२१. (अ) दानीएलाच्या पुस्तकातील पहिले सहा अध्याय कशाविषयीची थरारक उदाहरणे देतात? (ब) या अहवालांचा आम्हावर कसा परिणाम होण्यास हवा?

२१ दानीएलच्या पुस्तकातील पहिले सहा अध्याय, आपल्या नामाविषयी इर्ष्यावान असणाऱ्‍या देवाने—यहोवाने—या जगाच्या प्रबळ बादशहांना, तो खराच सर्वशक्‍तीमान, विश्‍वाचा सार्वभौम सत्ताधीश असून अहंकारी अधिपतींना कसे नमवितो व सोबत आपल्या निष्ठावंत सेवकांची कशी सुटका करतो याविषयीचा कसा धडा दिला याबद्दलची लक्षणीय उदाहरणे देतात. या अहवालांनी आम्हामध्ये देवाविषयीचे हितकर भय उभारले पाहिजे आणि यहोवाचा सर्वशक्‍तीमानपणा व सार्वभौमत्व याविषयी आदर व्यक्‍त करण्याची चालना दिली पाहिजे. याबरोबरच हा प्रेरित अहवाल विश्‍वासास अधिकपणे उभारतो ते या अर्थी की, तो मोठा विश्‍वास व धैर्य प्रदर्शित करणाऱ्‍या यहोवा देवाच्या सेवकांचे उत्कृष्ठ उदाहरण प्रकटवितो. हेच आपल्याला पुढील लेखात पहावयाला मिळेल.

[तळटीपा]

a  पहा द वॉचटावर, ऑक्टोबर १, १९८६, पृष्ठे ३-७.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

◻ जागतिक शासनकर्त्यांना कोणता धडा शिकविण्याची गरज यहोवाला भासली?

◻ दानीएलाच्या पुस्तकाच्या विश्‍वासाह्‍यतेविषयी आपल्याला काय म्हणता येईल?

◻ नबुखद्‌नेस्सरास पुन्हा एकदा नमविणारा आणखी कोणता धडा शिकावा लागला?

◻ यहोवाने बादशहांना जे धडे शिकविले त्याचा आम्हावर कसा परिणाम होण्यास हवा?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा