बायबल काळातील जेरुसलेम पुरातत्त्वविद्या काय प्रकट करते?
जेरुसलेममध्ये खासकरून, १९६७ सालापासून मनोरंजक पुरातत्त्वीय मोठ्या घडामोडी घडत आहेत. अनेक उत्खनित ठिकाणे आता पाहण्याकरता खुली आहेत, तेव्हा आपण काहींना भेट देऊन पुरातत्त्वविद्या बायबल इतिहासाशी कशी जुळते ते पाहू या.
राजा दावीदाचे जेरुसलेम
बायबल ज्याचा उल्लेख सीनाय पर्वत असे करते, अर्थात प्राचीन दावीदपूर ज्यावर बांधण्यात आले होते ते क्षेत्र, आधुनिक जेरुसलेमच्या महानगरीपुढे अतिशय क्षुल्लक दिसते. दिवंगत प्राध्यापक यिगल शायलो यांनी १९७८-८५ दरम्यान दावीदपूराचे उत्खनन चालू केले तेव्हा त्यांना डोंगराच्या पूर्व बाजूवर उतरते प्रचंड दगडी बांधकाम, किंवा आधार भिंत दिसली.
प्राध्यापक शायलोंनी दावा केला, की उतरत्या भिंतींच्या इमारतीचे हे अवशेष होते ज्यावर यबुसी लोकांनी (दावीदाने विजय मिळवण्याआधी तेथील रहिवासी) बालेकिल्ला बांधला होता. या उतरत्या भिंतींवर त्यांना आढळलेले दगडी बांधकाम, यबुसी बालेकिल्ल्याच्या जागेवर दावीदाने बांधलेला नवीन किल्ला होता असे त्यांनी स्पष्टीकरण दिले. २ शमुवेल ५:९ मध्ये आपण असे वाचतो: “दावीद त्या गडावर राहू लागला; त्यास दावीदपूर हे नाव पडले. दाविदाने मिल्लो बुरूजापासून आतल्या बाजूस सभोवार तटबंदी केली.”
या बांधकामाशेजारी, शहराच्या प्राचीन जलव्यवस्थांचे प्रवेशद्वार आहे, त्यातील काही भाग दावीदाच्या काळातील आहेत. जेरुसलेमच्या पाण्याच्या जलवाहक बोगद्याविषयी बायबलमधील काही विधानांबद्दल प्रश्न उभे राहिलेत. उदाहरणार्थ, दावीद आपल्या लोकांस म्हणाला: “जो कोणी यबूश्यांस मारील त्याने नळाजवळून [जलवाहक बोगद्याजवळून] जाऊन” शत्रूंचा संहार करावा. (२ शमुवेल ५:८) दावीदाचा सेनापती यवाबाने तसे केले. ‘जलवाहक बोगद्याचा’ नक्की काय अर्थ होतो?
कदाचित, राजा हिज्कीयाच्या अभियंतांनी सा.यु.पू. आठव्या शतकात खणलेल्या व २ राजे २०:२० आणि २ इतिहास ३२:३० मध्ये उल्लेखलेल्या प्रसिद्ध शिलोह जलवाहक बोगद्याविषयी अनेक प्रश्न सामोरे आले आहेत. विरुद्ध दिशेने जलवाहक बोगदा खणत आलेले दोन्ही गट एकमेकांना कसे काय भेटू शकले? सरळ खणत जाण्याऐवजी त्यांनी लांब व नागमोडी वळणाने जलवाहक बोगदा का खणला बरे? त्यांना कदाचित तेल दिव्यांचा वापर करावा लागला असावा तेव्हा श्वासोच्छ्वास करण्यासाठी पुरेशी हवा तरी कशी मिळाली असेल?
बायबल पुरातत्त्वविद्येची उजळणी (इंग्रजी) मासिकाने या प्रश्नांची संभवनीय उत्तरे दिली आहेत. उत्खननाचे भूशास्त्रज्ञ डॅन गील यांचे म्हणणे उद्धृत करण्यात आले आहे: “दावीदपूराखाली, सुविकसित नैसर्गिक कार्स्ट भूमिस्वरूप आहे. कार्स्ट ही भूशास्त्रीय संज्ञा आहे जी, भूपृष्ठाखालील खडकातून वाहणाऱ्या पाण्यामुळे तयार झालेल्या चुनखडकाच्या प्रदेशातील फटी, विवरे आणि प्रवाहांचे वर्णन करते. . . . दावीदपूराखालील भूपृष्ठ जलव्यवस्थांचे आम्ही केलेले भूशास्त्रीय परीक्षण सूचित करते, की भूपृष्ठाखालील प्रवाहामुळे नैसर्गिकरीत्या पडलेल्या (कार्स्ट) घळींना व पोकळ्यांना मानवांनी कौशल्याने वाढवून कार्यात्मक पाणी पुरवठा करणाऱ्या जलव्यवस्थांना जोडले.”
यावरून आपल्याला शिलोह जलवाहक बोगद्याचे उत्खनन कसे करण्यात आले त्याचे स्पष्टीकरण देण्यास मदत होईल. डोंगराखाली नागवळणी नैसर्गिक प्रवाहाद्वारेच ते बनवण्यात आले असावेत. प्रत्येक टोकापासून काम करत आलेल्या लोकांनी आधीपासून असलेल्या विवरांमध्येच फेरबदल करून तात्पुरता जलवाहक बोगदा बनवला असावा. मग, एक उतरता प्रवाह खोदण्यात आला जेणेकरून पाणी गिहोन झऱ्यातून, शहराच्या भिंतींच्या आत असलेल्या शिलोह तळ्यापर्यंत वाहू शकेल. हा खरोखरच एक अभियांत्रिकी पराक्रम होता कारण लांबी ५३३ मीटर असतानाही दोन्ही टोकांतील उंची केवळ ३२ सेंटीमीटर होती.
गिहोन झऱ्यातूनच प्राचीन शहराला पाणी पुरवठा होत होता हे विद्वानांनी केव्हाच ओळखले. गिहोन झरा, शहराच्या भिंतींच्या बाहेर जरी असला तरी, जलवाहक बोगद्याचे व ११ मीटर खोल पोकळीचे उत्खनन करण्याकरता तो जवळ होता. यामुळे संरक्षक भिंतींच्या बाहेर न जाताच रहिवासी पाणी काढू शकत होते. १८६७ साली चार्ल्स वॉरेनने त्याचा शोध लावल्यामुळे त्याला वॉरेन्स शाफ्ट असे संबोधले जाते. परंतु, जलवाहक बोगदा व पोकळी केव्हा बनवण्यात आली? दावीदाच्या काळात ती अस्तित्वात होती का? यवाबाने याच जलवाहक बोगद्याचा उपयोग केला होता का? डॅन गील म्हणतात: “वॉरन्स शाफ्ट वास्तविकतेत एक नैसर्गिक पोकळी होती की नव्हती याचे परीक्षण करण्यासाठी आम्ही त्याच्या उबडखाबड भिंतींतील चुनखडीच्या पापुद्र्याच्या तुकड्यांमध्ये कार्बन-१४ पाहण्यासाठी सूक्ष्म अभ्यास केला. परंतु, त्यात काहीच आढळले नाही, त्यावरून तो पापुद्रा ४०,००० वर्षांपेक्षा अधिक वर्षांचा आहे हे सूचित झाले: ही पोकळी मानवांनी खोदली नसावी याचा हा असंदिग्ध पुरावा आहे.”
हिज्कीयाच्या काळापासूनचे अवशेष
हिज्कीया राजा, असेरियन राष्ट्र वाटेत दिसेल त्यावर विजय मिळवत होते त्या काळी हयात होता. त्याच्या राज्याच्या सहाव्या वर्षी, असेरियन लोकांनी, दहा गोत्राच्या राज्याची राजधानी असलेल्या समारियावर विजय मिळवला. आठ वर्षांनंतर (सा.यु.पू. ७३२) असेरियन सैन्य पुन्हा आले, यहुदा आणि जेरुसलेमचे धाबे दणाणले. दुसरे इतिहास ३२:१-८ हिज्कीयाच्या संरक्षक युद्धनीतीचे वर्णन करते. या काळाचे काही दृश्य पुरावे आहेत का?
होय, १९६९ मध्ये प्राध्यापक नेमॉन ऑविगॉड यांना या काळच्या काही अवशेषांचा शोध लागला. उत्खननात त्यांना एका प्रचंड भिंतीचा विभाग दिसला, पहिला भाग ४० मीटर लांब, सात मीटर रुंद व अंदाजकांनुसार, आठ मीटर उंच होता. अर्धी भिंत भरीव दगडावर तर अर्धी अलीकडेच बांधलेली घरे पाडून त्यावर बांधली होती. ही भिंत कोणी व कधी बांधली? “बायबलमधील दोन उताऱ्यांनी, ही भिंत बांधल्याची तारीख व उद्देश दर्शवण्यास ऑविगॉड यांना साहाय्य केले,” असे एका पुरातत्त्वीय मासिकाने म्हटले. ते उतारे पुढीलप्रमाणे आहेत: “कोट मोडून पडला होता तो हिज्कीयाने हिंमत धरून पुनः बांधून काढिला व त्यावरील बुरूज उंच केले आणि त्याच्या बाहेरचा दुसरा कोट त्याने मजबूत केला.” (२ इतिहास ३२:५) ‘तट मजबूत करण्यासाठी तुम्ही घरे पाडाल.’ (यशया २२:१०) आज, पर्यटकांना जुन्या शहराच्या यहुदी जिल्ह्यातील हा तथाकथित रुंद कोट पाहायला मिळू शकतो.
उत्खननाद्वारे हेही प्रकट झाले, आतापर्यंत विचार केला जात होता त्यापेक्षा जेरुसलेम कितीतरी पटीने मोठे होते, कदाचित असेरियन लोकांनी उत्तरेकडील राज्याचा पराजय केला तेव्हा झुंडीच्या झुंडीने निर्वासित लोक तेथे राहावयास आले होते. यबुसी लोकांच्या शहराने जवळजवळ १५ एकर क्षेत्र व्यापले होते असा प्राध्यापक शायलोंनी अंदाज केला. शलमोनाच्या काळी शहराने जवळपास ४० एकर व्यापला होता. राजा हिज्कीयाच्या समयापर्यंत म्हणजे, ३०० वर्षांनंतर, शहराचे संरक्षित क्षेत्र सुमारे १५० एकर इतके वाढले होते.
पहिल्या मंदिराच्या काळातील स्मशानभूमी
पहिल्या मंदिराच्या काळातील म्हणजे, सा.यु.पू. ६०७ मध्ये बॅबिलोन्यांनी जेरुसलेम बेचिराख करण्याआधीच्या काळातील स्मशानभूमी, माहितीचा आणखी एक स्रोत ठरल्या आहेत. १९७९/८० मध्ये, हिन्नोम दरीच्या उतारावरील अनेक कबरस्थाने असलेल्या गुहांचे उत्खनन केल्यावर विस्मित करणारे निष्कर्ष काढण्यात आले. “जेरुसलेममध्ये पुरातत्त्वीय संशोधनाच्या सर्व इतिहासात, ही फार अल्प पहिल्या मंदिराची कोठारे आहेत जी आतील वस्तुंसह सापडली. त्यात एक हजार पेक्षा अधिक वस्तु होत्या,” असे पुरातत्त्वज्ज्ञ गेब्रीएल बॉरके म्हणाले. ते पुढे असेही म्हणाले, “लिखित साहित्यांचा शोध लागावा अशी इस्राएलमध्ये आणि विशेषतः जेरुसलेममध्ये काम करणाऱ्या प्रत्येक पुरातत्त्वज्ज्ञाची उत्कट आशा आहे.” चांदीच्या दोन लहानशा गुंडाळ्या सापडल्या, काय लिहिले होते त्यात?
बॉरके स्पष्टीकरण देतात: “मी ती उघडलेली चांदीची पट्टी सूक्ष्मदर्शक भिंगाखाली धरली तेव्हा मला पृष्ठभागावर हलक्या हाताने लिहिलेली अक्षरे दिसली. चांदीच्या त्या पातळ व नाजूक पत्र्यावर अतिशय टोकदार उपकरणाने ती लिहिली होती. . . . त्या लेखात स्पष्टपणे दिसणारे ईश्वरी नाम प्राचीन इब्री लिपित योदहेवावहे या चार इब्री अक्षरांचे मिळून बनलेले आहे.” नंतरच्या एका प्रकाशनात, बॉरके म्हणतात: “आश्चर्याची गोष्ट म्हणजे, चांदीच्या दोन्ही पट्ट्यांवर, बायबलमधील याजकीय आशीर्वादांशी बहुतेक तंतोतंत जुळणारे, आशीर्वादाची सूत्रे कोरली होती.” (गणना ६:२४-२६) जेरुसलेममध्ये आढळलेल्या लेखात यहोवाचे नाव पहिल्यांदाच दिसून आले होते.
विद्वानांनी या चांदीच्या गुंडाळ्यांचे कालमापन कसे केले? खासकरून, या चांदीच्या गुंडाळ्यांसोबत त्यांना सापडलेल्या इतर पुरातत्त्वीय गोष्टींवर आधारित. कोठारात, तारखा असलेली ३०० पेक्षा अधिक मृत्पात्रे सापडली. ती पात्रे सा.यु.पू. सातवे किंवा सहावे शतक दर्शवतात. चांदीच्या गुंडाळ्यांवरील लिखानाची, तारखा असलेल्या इतर लेखांशी केलेली तुलना एकच कालावधी सूचित करतात. त्या गुंडाळ्या जेरुसलेममधील इस्राएल संग्रहालयात ठेवल्या आहेत.
सा.यु.पू ६०७ मध्ये जेरुसलेमचा नाश
बायबल, २ राजे अध्याय २५, २ इतिहास अध्याय ३६ आणि यिर्मया अध्याय ३९ मध्ये सा.यु.पू. ६०७ मधील जेरुसलेमच्या विनाशाविषयी सांगते. नबुखद्नेस्सरच्या सैन्याने शहराची होळी केल्याचा वृत्तान्त तेथे आपल्याला आढळतो. अलीकडील उत्खननांनी या ऐतिहासिक अहवालाला पुष्टी दिली आहे का? प्राध्यापक यिगल शायलोंनुसार, “[बॅबिलोन्यांनी केलेल्या नाशाचा] बायबलमधील पुरावा . . . स्पष्ट पुरातत्त्वीय पुराव्याने पूर्ण होतो; विविध रचनांचा पूर्ण नाश व घरांचे भिन्न लाकडी भागांचे आगीत जळणे.” त्यांनी पुढे असे विवेचन मांडले: “जेरुसलेममधील प्रत्येक उत्खननांत या नाशाचा मागमूस सापडला आहे.”
सुमारे २,५०० वर्षांपूर्वी घडलेल्या या नाशाचे अवशेष पर्यटक आज पाहू शकतात. इस्राएली बुरूज, बर्न्ट हाऊस आणि बुले हाऊस ही लोकप्रिय पुरातत्त्वीय स्थळांची नावे आहेत ज्यांचे जतन करून लोकांना पाहण्याकरता खुले करण्यात आले आहे. प्राचीन जेरुसलेम प्रकट झाले (इंग्रजी) या पुस्तकात पुरातत्त्वज्ज्ञ जेन एम. केहिल व डेव्हीड टॉरलर यांनी अशा प्रकारे सारांश दिला: “बॅबिलोन्यांनी जेरुसलेमचा केलेला प्रचंड नाश, बर्न्ट हाऊस आणि बुले हाऊस यांतील जळालेल्या अवशेषांच्या जाड थरांतूनच नाही तर पूर्व उतारा झाकून टाकलेल्या कोसळलेल्या इमारतींच्या डबरांतूनही दिसतो. शहराच्या नाशाबद्दलची बायबलमधील वर्णने . . . पुरातत्त्वीय पुराव्याचे संपूरक आहेत.”
म्हणूनच, जेरुसलेमविषयी दावीदाच्या काळापासून ते सा.यु.पू. ६०७ मधील त्याच्या नाशापर्यंतचे बायबलमधील हुबेहूब वर्णनाची गेल्या २५ वर्षांदरम्यान अनेक मार्गांनी, पुरातत्त्वीय उत्खननांनी पुष्टी देण्यात आली आहे. परंतु, सा.यु. पहिल्या शतकातील जेरुसलेमबद्दल काय?
येशूच्या दिवसातील जेरुसलेम
उत्खनने, बायबल, पहिल्या शतकातील यहुदी इतिहासकार जोसिफस आणि इतर स्रोत, सा.यु. ७० मध्ये रोमी सैन्याने जेरुसलेमचा नाश करण्याआधी, येशूच्या दिवसांतील जेरुसलेमचे चित्र रेखाटण्यास विद्वानांना मदत करतात. जेरुसलेममधील एका विशाल हॉटेलच्या मागील बाजूला मांडलेला एक नमुना नवीन उत्खनने काय प्रकट करतात त्यानुसार नियमितरीत्या अद्ययावत केला जातो. टेंपल मौंट, शहराचे मुख्य आकर्षण होते; हेरोदाने शलमोनाच्या काळापेक्षा दुप्पट त्याचा विस्तार केला होता. ४८० मीटर बाय २८० मीटरचे ते प्राचीन युगातील सर्वात मोठे मानव-निर्मित व्यासपीठ होते. इमारतींचे काही दगड ५० टन वजनाचे होते; एक तर जवळजवळ ४०० टन वजनाचा होता आणि एका विद्वानाने म्हटले की “या आकाराचा दगड प्राचीन जगात अतुलनीय होता.”
म्हणूनच तर येशू जेव्हा, “हे मंदिर मोडून टाका, आणि मी तीन दिवसात ते उभारीन,” असे म्हणाला तेव्हा लोकांना धक्काच बसला. त्यांना वाटले की तो भव्य मंदिर इमारतीविषयी बोलत होता पण खरे तर तो “आपल्या शरीररूपी मंदिराविषयी” बोलत होता. यास्तव, ते त्याला म्हणाले: “हे मंदिर बांधावयास शेचाळीस वर्षे लागली आणि तुम्ही हे तीन दिवसांत उभारणार काय?” (योहान २:१९-२१) टेंपल मौंट परिसराचे उत्खनन केल्यामुळे पर्यटक आता भिंतींचे काही भाग आणि येशूच्या काळातील इतर वास्तुकला पाहू शकतात; तसेच येशूने मंदिराच्या दक्षिणेकडील फाटकाच्या चढलेल्या पायऱ्याही कदाचित चढू शकतील.
टेंपल मौंटच्या पश्चिमेकडील भिंतीपासून दूर नसलेल्या जुन्या शहरातील यहुदी जिल्ह्यात, बर्न्ट हाऊस आणि हेरिदियन क्वॉटर ही सा.यु. पहिल्या शतकातील दोन उत्खनित ठिकाणे आहेत ज्यांचे चांगल्याप्रकारे जतन करून ठेवण्यात आले आहे. बर्न्ट हाऊसचा शोध लागल्यावर पुरातत्त्वज्ज्ञ नेमॉन ऑविगॉडने लिहिले: “जेरुसलेमच्या नाशाच्या वेळी रोमनांनी इ. स. ७० मध्ये ही इमारत जाळली होती हे आता अगदी स्पष्ट होते. शहरातील उत्खननांच्या इतिहासात पहिल्यांदाच, शहराला जाळल्याचे ठळक आणि स्पष्ट पुरातत्त्वीय पुरावे उजेडात आले होते.”—पृष्ठ १२ वरील चित्रे पहा.
यातील काही शोध येशूच्या जीवनांतील काही घटनांवर प्रकाश पाडतात. या इमारती अप्पर शहरात होत्या, तेथे जेरुसलेमचे अमीर लोक तसेच महायाजक राहत असत. या घरांमध्ये अनेक विधीकुंड आढळले. एका विद्वानाच्या मते: “दुसऱ्या मंदिराच्या काळात अप्पर शहरातील रहिवाशी विधीपूर्वक शुद्धतेचे नियम काटेकोरपणे पाळत होते याची, या अनेक विधीकुंडांवरून साक्ष पटते. (हे नियम मिशनात लिहिलेले असून यातील दहा अध्यायात मिकवेहची सविस्तर माहिती आहे.)” ही माहिती आपल्याला, या विधींबद्दल येशूने परुशी आणि शास्त्रींना काय म्हटले ते समजण्यास मदत करते.—मत्तय १५:१-२०; मार्क ७:१-१५.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जेरुसलेममध्ये पुष्कळ अश्मपात्रही सापडले आहेत. नेमॉन ऑविगॉड अशी नोंद करतात: “जेरुसलेमच्या घरांमध्ये इतक्या अचानक व अधिक संख्येने हे पात्र कसे काय आढळले बरे? याचे उत्तर विधी शुद्धतेविषयी यहुदी नियमांत, अर्थात हलाखाच्या अधिकारितेमध्येच सापडते. मिशना सांगते की अश्मपात्र, अशुद्ध न होणाऱ्या वस्तुंपैकी आहेत. . . . अश्म, विधी दूषित होण्याजोगा नव्हता.” तेव्हा, येशूने पाण्याचा बनवलेला द्राक्षारस मातीच्या नव्हे तर दगडी रांजणात का साठवून ठेवण्यात आला त्याचे स्पष्टीकरण यावरून मिळते असे सुचवले जाते.—लेवीय ११:३३; योहान २:६.
इस्राएल संग्रहालयास भेट देताना तुम्हाला दोन असामान्य अस्थिपात्र दिसतील. बायबल पुरातत्त्वविद्येची उजळणी (इंग्रजी) म्हणते: “रोमनांनी सा.यु. ७० मध्ये जेरुसलेमचा नाश करण्याआधीच्या जवळजवळ एकशे वर्षांपूर्वी अस्थिपात्र वापरले जात होते. . . . दफन गुहेच्या भिंतीत कोरलेल्या खोबणीत मृत व्यक्तीला ठेवले जात असे; मांस कुजल्यानंतर अस्थी गोळा करून एका अस्थिपात्रात ठेवले जात होते. हे अस्थिपात्र बहुधा चुनखडीचे होते ज्यावर नक्षीकाम होते.” संग्रहालयातील ती दोन पात्रे एका दफनगुहेत नोव्हेंबर १९९० साली सापडली. पुरातत्त्वज्ज्ञ झ्वी ग्रीनहट असे सांगतात: “थडग्यातील त्या दोन अस्थिपात्रांपैकी एकावरील ‘कयफा’ हा शब्द, पुरातत्त्वीय संदर्भात पहिल्यांदाच आढळतो. ते कदाचित नव्या करारात . . . ज्याचा उल्लेख आला आहे त्या महायाजक कयफाच्या कुटुंबाचे नाव असावे. . . . जेरुसलेममधील कयफाच्याच घरातून येशूला रोमी सुभेदार पंतय पिलाताच्या हवाली करण्यात आले होते.” एका अस्थिपात्रात सुमारे ६० वर्षांच्या एका पुरुषाची हाडे होती. विद्वान असा अंदाज करतात की ती हाडे कयफाची आहेत. या सापडलेल्या वस्तू येशूच्या काळातील आहेत असा एक विद्वान उल्लेख करतात: “हेरोद अग्रीप्पाने (सा.यु. ३७-४४) पाडलेले एक नाणे एका अस्थिपात्रात सापडले. ती दोन कयफा अस्थिपात्रे, शतकाच्या सुरवातीची असावीत.”
युनिव्हर्सिटी ऑफ ॲरिझोनातील नियर इस्टर्न पुरातत्त्वाचे प्राध्यापक विल्यम जी. डेवर यांनी जेरुसलेमविषयी म्हटले: “गत १५० वर्षांमधील संशोधनापेक्षा अलीकडील १५ वर्षांत आम्ही पुरातत्त्वीय इतिहासाविषयी पुष्कळ काही शिकलो असे म्हणताना आम्हाला बढाई मारल्यासारखे वाटत नाही.” अलीकडील दशकांत जेरुसलेममधील बहुतेक महत्त्वाच्या पुरातत्त्वीय कार्यांमध्ये असे शोध लागले आहेत जे बायबल इतिहासावर प्रकाश पाडतात.
[९ पानांवरील चित्र]
होलीलॅण्ड हॉटेल, जेरुसलेम मैदानावरील दुसऱ्या मंदिराच्या वेळी जेरुसलेम शहराची प्रतिकृती
[१० पानांवरील चित्र]
वर: जेरुसलेमच्या टेंपल मौंटचा नैर्ऋत्येकडील कोपरा
उजवीकडे: हिज्कीयाच्या जलवाहक बोगद्यातून जाताना