धार्मिकता तोंडी संप्रदायाने नव्हे
“शास्त्री व परुशी यांच्यापेक्षा तुमची धार्मिकता अधिक झाल्यावाचून स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही.” —मत्तय ५:२०.
१, २. येशूने डोंगरावरील प्रवचन देण्याआधी कोणकोणत्या गोष्टी घडल्या?
येशूने सबंध रात्र डोंगरावर घालवली होती. वर माथ्यावर आकाश ताऱ्यांनी झगमगून गेले होते. झुडुपात रात्रीचे वनचर सळसळत होते. पूर्वेकडे गालील समुद्राच्या लाटा संथपणे किनाऱ्यावर आदळत होत्या. तथापि, रात्रीच्या या सभोवर पसरलेल्या शांत व आल्हाददायक वातावरणाची येशूला किंचित कल्पना होती. त्याने ती रात्र, त्याचा स्वर्गातील पिता यहोवा याची एकाग्र प्रार्थना करण्यात घालवली. त्याला त्याच्या पित्याचे मार्गदर्शन हवे होते. पुढे येणारा दिवस खडतर होता.
२ आकाशात प्रभा फाकली. पक्ष्यांची हालचाल सुरु झाली. त्यांची किलबिल ऐकू येऊ लागली. वाऱ्याची झुळूक रानफुलांना सौम्यपणे हिंदोळे देऊ लागली. सूर्याची पहिली किरणे क्षितिजावर आल्यानंतर येशूने आपल्या शिष्यांना बोलावले व त्यामधून त्याने १२ जणांची प्रेषित या अर्थी निवड केली. मग, या सर्वांसोबत तो डोंगरावरुन खाली आला. पायथ्याशी आधीच जमाव जमला होता. तो गालील, सोर व सीदोन, तसेच यहूदीया व यरुशलेम येथून आला होता. आपणातील आजार बरे व्हावे अशी त्यांची इच्छा होती. येशूने लोकांना स्पर्श केला तेव्हा त्याला यहोवाकडून मिळालेली शक्ती निघाली व तिजमुळे लोक बरे झाले. आजारातून मुक्त होण्याव्यतिरिक्त, आपल्या त्रासलेल्या जिवाला हलकेपणा मिळावा यासाठी ते येशूकडील बोल ऐकण्यास उत्सुक होते.—मत्तय ४:२५; लूक ६:१२-१९.
३. येशूने बोलायला आरंभ केला तेव्हा त्याचे शिष्य व लोकसमुदाय उत्सुक का झाला?
३ औपचारिक शिक्षण देताना रब्बींचा खाली बसून शिकवण्याचा प्रघात होता, त्यामुळे आता इ. स. ३१ च्या वसंत ऋतुतील या सकाळी येशूने तेच केले. तो डोंगराच्या उतरणीवर एका सपाट जागी बसला. त्याचे शिष्य व लोकसमुदायाने हे पाहिले तेव्हा त्यांना कळले की, काही तरी खास असे ऐकायला मिळणार. त्यामुळे ते मोठ्या उत्सुकतेने त्याच्या सभोवती गोळा झाले. त्याने बोलायला सुरवात केली तेव्हा ते मोठे उत्सुक होते; आणि जेव्हा त्याने समारोप केला तेव्हा ऐकलेल्या गोष्टीमुळे ते खूपच विस्मित झाले. का ते आपण पाहू या.—मत्तय ७:२८.
दोन प्रकारच्या धार्मिकता
४. (अ) कोणत्या दोन प्रकारच्या धार्मिकता पणाला लागल्या होत्या? (ब) तोंडी संप्रदायांचा काय उद्देश होता, पण काय साध्य करण्यात आले?
४ मत्तय ५:१–७:२९ व लूक ६:१७-४९ मध्ये कळविण्यात आलेल्या डोंगरावरील प्रवचनात येशूने दोन वर्गाचा स्पष्ट फरक दर्शविला. परुशी व शास्त्री हा तो एक वर्ग आणि त्यांनी ज्यांना गांजले तो सर्वसाधारण लोकसमुदाय हा दुसरा वर्ग. त्याने दोन प्रकारच्या धार्मिकतेविषयी भाष्य केले. परुशांची दांभिक धार्मिकता आणि देवाची खरी धार्मिकता. (मत्तय ५:६, २०) परुशांची स्व-धार्मिकता ही तोंडी संप्रदायावर आधारीत होती. हे संप्रदाय इ. स. पूर्वीच्या दुसऱ्या शतकापासून सामोरे आले. ते “नियमशास्त्राभोवती कुंपण” असल्याचे समजले जाई. हेल्लेणी (ग्रीक) संस्कृतीचा शिरकाव नियमशास्त्रात होऊ देण्यापासून संरक्षण असावे हा त्यामागील हेतू होता. या संप्रदायांना नियमशास्त्राचा एक भाग असे मानण्यात येई. खरे म्हणजे, शास्त्र्यांनी तर लिखित नियमशास्त्राच्या वर या तोंडी संप्रदायांना प्राधान्य दिले होते. मिश्ना असे म्हणतेः “लिखित नियमशास्त्राच्या पालनापेक्षा शास्त्र्यांच्या वचनांचे [त्यांच्या तोंडी सांप्रदायांचे] पालन अगदी कडकपणे करण्याची अपेक्षा आहे.” अशाप्रकारे, नियमशास्त्राला सुरक्षित ठेवण्यासाठी, “नियमशास्त्राभोवती कुंपण” असण्याऐवजी त्यांच्या संप्रदायाने त्याला दुर्बळ केले आणि ते निरर्थक बनवले; यामुळे येशूने हे म्हटलेः “तुम्ही देवाची आज्ञा सोडून मनुष्याचा संप्रदाय अनुसरता.”—मार्क ७:५-९; मत्तय १५:१-९.
५. (अ) येशूचे ऐकण्यासाठी आलेल्या सर्वसाधारण लोकांची काय स्थिती होती, व अशांबद्दल शास्त्री व परुशांचा कोणता दृष्टीकोण होता? (ब) हे तोंडी संप्रदाय साधारण कामकऱ्याच्या खांद्यावरील जड ओझ्यासारखे कशामुळे झाले होते?
५ येशूचे बोल ऐकण्यासाठी त्याच्याभोवती गोळा झालेले सर्वसाधारण लोक आध्यात्मिक रितीने गरीब होते, ते “मेंढका नसलेल्या मेंढरांसारखे रंजीस झालेले व शिणलेले” होते. (मत्तय ९:३६) शास्त्री व परुशी यांना उद्दामपणे तुच्छ लेखीत, त्यांना ते ‘आमहा·’आʹरेटस् (धरणीवरील लोक) म्हणत आणि अज्ञानी, शाप मिळालेले पापी आणि तोंडी संप्रदाय न अनुसरल्यामुळे पुनरुत्थान मिळण्यास पात्र नसणारे अशी तुच्छता करीत. येशूच्या काळापर्यंत हे संप्रदाय इतके विस्तारीत, कायदेकानूंनी ओथंबलेले इतके जाचक, वेळ खाणाऱ्या संस्कारांनी व वहिवाटींनी इतके भारी बनले होते की, सर्वसाधारण कामकऱ्याला ते पाळता येणे अशक्यच होते. यास्तव, येशूने जेव्हा या संप्रदायांना ‘लोकांच्या खांद्यावर जड ओझी’ अशी उपमा दिली ते काही नवलाईचे नव्हते.—मत्तय २३:४; योहान ७:४५-४९.
६. येशूच्या प्रास्ताविकेत आश्चर्याचे असे काय होते, पण या आरंभीच्या शब्दांनी त्याच्या शिष्यांसाठी तसेच शास्त्री व परुशी यांजसाठी कोणता बदला दर्शवला?
६ यास्तव, येशू डोंगरावर खाली बसला तेव्हा जे त्याच्याभोवती गोळा झाले ते त्याचे शिष्य व आध्यात्मिक गोष्टींनी क्षुधित असणारा लोकांचा जमाव होता. या सर्वांना येशूचे प्रास्ताविक बोल खरेच आश्चर्यावह वाटले असावेत. तो म्हणाला, ‘दीन, भूकेले, रुदन करणारे, द्वेष करण्यात आलेले ते धन्य.’ पण गरीब, भूकेला, रडणारा आणि द्वेष करण्यात आलेला असा कोण वस्तुतः धन्य आहे? तसेच श्रीमंत, तृप्त, हसणाऱ्या व कौतुकास्पद लोकांबद्दल धिक्कार कळविण्यात आला! (लूक ६:२०-२६) अगदी थोडक्या शब्दात, येशूने प्रस्थापित मूल्यमापनास व स्वीकृत अशा मानवी दर्जास उलथवून टाकले. हे, पद-विभूषणांचे नाट्यमय उलटविणे झाले. ते येशूच्या नंतरच्या शब्दांच्या सहमतात होतेः “जो कोणी आपणाला उंच करतो तो नीच केला जाईल आणि जो आपणाला नीच करतो तो उंच केला जाईल.”—लूक १८:९-१४.
७. येशूचे भाषण ऐकणाऱ्या आध्यात्मिकरित्या क्षुधित असणाऱ्या श्रोतेजनांवर त्याच्या सुरवातीच्या शब्दांद्वारे कोणता परिणाम घडला असावा?
७ स्वसंतुष्ट शास्त्री परुशांच्या उलट, येशूकडे त्या दिवशी सकाळी आलेले लोक आपल्या आध्यात्मिक स्थितीबद्दल दुःखी होते. येशूच्या शब्दांनी त्यांना मोठी आशा मिळाली असावी, कारण तो म्हणलाः “आध्यात्मिक गरजांची जाणीव असणारे ते धन्य; कारण स्वर्गाचे राज्य त्यांचेच आहे.” शिवाय जेव्हा त्याने असे म्हटले की, “जे धार्मिकतेचे भुकेले व तान्हेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील,” तेव्हा त्यांना किती हायसे वाटले असावे! (मत्तय ५:३, ६; योहान ६:३५; प्रकटीकरण ७:१६, १७) होय, ते धार्मिकतेने भरले होते, पण परुशी दर्जाप्रमाणे नव्हते.
“मनुष्यांसमक्ष धार्मिक” असणे पुरेसे नाही
८. शास्त्री व परुशांपेक्षा आपली धार्मिकता कशी अधिक होऊ शकेल याबद्दल कदाचित काहींना नवल का वाटेल, पण ती का अधिक भरली पाहिजे?
८ “शास्त्री व परुशी यांच्यापेक्षा तुमची धार्मिकता अधिक झाली नाही तर,” येशू म्हणाला, “स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही.” (मत्तय ५:१७-२०; पहा मार्क २:२३-२८; ३:१-६; ७:१-१३.) काहींना वाटेलः ‘परुशांपेक्षा अधिक धार्मिकता? ते तर उपास, प्रार्थना करतात, दशमांश देतात, दानधर्म करतात आणि आपले जीवन नियमशास्त्राचा अभ्यास करण्यामध्ये घालवतात. मग, आमची धार्मिकता ही त्यांच्यापुढे कशी जाणार?’ पण, ती अधिक असण्यास हवी. परुशी कदाचित लोकांच्या कौतुकास पात्र ठरले असतील, पण ते देवाच्या पसंतीस उतरले नाहीत. या परुशांबद्दल येशू दुसऱ्या एके प्रसंगी म्हणालाः “तुम्ही आपणांस मनुष्यांसमक्ष धार्मिक ठरवून घेणारे आहा; परंतु देव तुमची अंतःकरणे ओळखून घेतो. मनुष्यांस जे उच्च असे वाटते ते देवाच्या दृष्टीने ओंगळ आहे.”—लूक १६:१५.
९-११. (अ) देवासमोर आपली धार्मिकता कशी मिळवता येईल याचा कोणता एक मार्ग असल्याचे शास्त्री व परुशी समजत? (ब) कोणत्या दुसऱ्या मार्गाने धार्मिकता मिळवता येते असे ते मानीत? (क) तिसरा कोणता मार्ग ते जमेस धरीत आणि प्रेषित पौलाने असे काय म्हटले जे याची अपशयता सिद्ध करते?
९ धार्मिकता मिळविण्याबद्दल रब्बींनी आपले स्वतःचे नियम शोधून काढले होते. अब्राहामाचे वंशज आहोत हा दावा यापैकीचा एक नियम होता. “अब्राहाम आमचा बाप याचे शिष्य या जगाचा आनंद लुटतात व ते येणाऱ्या जगात वतन मिळवतील.” (मिश्ना) या संप्रदायाचा सामना करावा यासाठीच बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने त्याच्याकडे येणाऱ्या परुशांना ही ताकीद दिलीः “पश्चातापास योग्य असे फळ द्या. आणि ‘अब्राहाम आमचा बाप [जणू तो तसाच] आहे,’ असे म्हणण्याची कल्पना आपल्या मनात आणू नका.’”—मत्तय ३:७-९; तसेच योहान ८:३३, ३९ पहा.
१० धार्मिकता वाढविण्याचा दुसरा प्रकार त्यांच्या मते असा होता की, दानधर्म करण्यामुळे आमची धार्मिकता वाढते असे ते म्हणत. इ. स. पू. च्या दुसऱ्या शतकात भक्तीमान यहुद्यांनी लिहिलेल्या बनावट पुस्तकात हा सांप्रदायिक दृष्टीकोण प्रवर्तित असल्याचा दिसतो. तोबीथमध्ये एक वाक्य असे आढळतेः “दानधर्म करणे हे एखाद्याला मृत्युपासून वाचवते व प्रत्येक पापाची क्षमा देते.” (१२:९, द न्यू अमेरिकन बायबल) सिराख (उपदेशक) हे कळवतेः “पाणी जसे जळत्या आगीस शमविते तसे दानधर्म पापांची क्षमा करतो.”—३:२९, न्यू.अ.बा.
११ धार्मिकता संपादण्याचा तिसरा मार्ग नियमशास्त्राची कर्मे आचरणे हा होता. माणसाने सर्वसाधारण चांगली कृत्ये केल्यास त्याचा बचाव होईल असा त्यांचा तोंडी संप्रदाय सांगे. न्याय “चांगले किंवा वाईट कामाच्या अधिकतेवर अवलंबून आहे.” (मिश्ना) न्यायामध्ये कृपादर्शक बाजूस येण्यासाठी ते “पापावर प्रभुत्व मिळवणारी पुण्याई संपादण्यावर” अधिक भर देत. माणसाचे एखादे काम जरी त्याच्या वाईट कामापेक्षा अधिक भरले तर तो वाचणार अशी त्यांची खात्री होती. हे जणू देव त्यांच्या लहानसहान कृत्यांची मोजणी व नोंदणी करून त्यानुसार न्याय करतो! (मत्तय २३:२३, २४) याबद्दलचा बरोबरचा दृष्टीकोण सांगताना पौलाने लिहिलेः “[देवा] समोर कोणी मनुष्य नियमशास्त्रातील कर्मांनी नीतीमान ठरणार नाही.” (रोमकर ३:२०) खरेच, ख्रिस्ती धार्मिकता ही शास्त्री व परुशांपेक्षा अधिक भरली पाहिजे!
“सांगितले होते ते तुम्ही ऐकले आहे”
१२. (अ) इब्री शास्त्रवचनांचा संदर्भ दर्शवताना येशूने नेहमीच्या पद्धतीपेक्षा कोणत्या वेगळ्या पद्धतीचा अवलंब डोंगरावरील प्रवचनाच्या बाबतीत केला, व का? (ब) “सांगितले होते,” या शब्दप्रयोगाच्या सहाव्या वापराकडून आम्ही काय शिकू शकतो?
१२ आधी येशूने इब्री शास्त्रवचनांचा संदर्भ घेतला होता तेव्हा तो “असे लिहिले आहे,” असे म्हणाला. (मत्तय ४:४, ७, १०) पण, डोंगरावरील प्रवचनात त्याने इब्री शास्त्रवचनातील अवतरणे सांगताना सहा वेळा “सांगितले होते,” असे म्हटले. (मत्तय ५:२१, २७, ३१, ३३, ३८, ४३) असे का? कारण यावेळी तो, देवाच्या नियमांचे उल्लंघन करणारे परुशी, संप्रदायांच्या प्रकाशात शास्त्रवचनांचा जसा अर्थ करीत असत त्याचा उल्लेख करीत होता. (अनुवाद ४:२; मत्तय १५:३) हे, येशूने शेवटल्या सहाव्या संदर्भात जे म्हटले त्यावरुन दिसून येते. तो म्हणालाः “‘आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर व आपल्या वैऱ्याचा द्वेष कर,’ असे सांगितले होते ते तुम्ही ऐकले आहे.” पण, “आपल्या वैऱ्याचा द्वेष कर” असे कोणताही मोशेचा नियम म्हणत नाही. ते, शास्त्री व परुशी म्हणत असत. त्यांनी नियमशास्त्राचा तसा अर्थ लावला होता—आपले यहुदी शेजारी यांच्यावरच केवळ प्रीती दाखवा, इतरांवर नव्हे.
१३. ज्याकरवी खरोखर खून घडू शकतो त्या वागणूकीच्या आरंभाबद्दलदेखील येशू कसा इशारा देतो?
१३ त्या सहा विधानांच्या मालिकेतील पहिल्या विधानाचा विचार करा. येशूने म्हटलेः “‘मनुष्यहत्त्या करू नको, आणि जो कोणी मनुष्यहत्त्या करील तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल,’ असे प्राचीन लोकांस सांगितले होते हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हास सांगतो की, जो कोणी आपल्या भावावर राग धरीत राहील तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल.” (मत्तय ५:२१, २२) अंतःकरणातील राग हा निंद्य भाषण करण्यास प्रवृत्त करतो व मग तो त्याला नालायक ठरवतो आणि तो कदाचित खून करण्यास निरवतो. हा राग हृदयात सतत वागवीत राहणे खूपच घातक आहे. “जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करतो तो नरहिंसक आहे,” असे शास्त्र म्हणते.—१ योहान ३:१५.
१४. व्यभिचाराकडे नेणाऱ्या वाटचालीच्या आरंभातही आपला पाय टाकू नये याबद्दल येशू कशी सूचना करतो?
१४ येशूने पुढे म्हटलेः “‘व्यभिचार करू नको,’ म्हणून सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हास सांगतो, जो कोणी स्त्रीकडे कामदृष्टीने पाहतो त्याने आपल्या अंतःकरणाने तिजबरोबर व्यभिचार केलाच आहे.” (मत्तय ५:२७, २८) तुम्हाला व्यभिचार करायचा नाही ना? मग, त्या मार्गाकडे नेणाऱ्या विचारांना आपल्या मनात वावरायला वाव देऊच नका. जेथे या गोष्टीचा उगम होतो ते अंतःकरण आपल्या ताब्यात ठेवा. (नीतीसूत्रे ४:२३; मत्तय १५:१८, १९) याकोबाचे पत्र १:१४, १५ इशारा देतेः “प्रत्येक मनुष्य आपल्या वासनेने ओढलेला व भुलविलेला असा मोहात पडतो. मग, वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते; आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजविते.” आम्ही कधीकधी लोकांना असे म्हणताना ऐकतो की, ‘जे तुम्हाला पूर्ण करता येणार नाही असे काही सुरु करूच नका.’ पण या प्रकरणात आम्ही म्हणू शकू की, ‘जे तुम्हाला थोपवता येणार नाही असे काही सुरु करू नका.’ गोळ्या झाडणाऱ्या माणसांद्वारे मरणाची भीती दाखवली असताही जे विश्वासू राहिले असे काहीजण नंतर लैंगिक अनैतिकतेच्या कावेबाज मोहाला बळी पडले.
१५. येशूने सूटपत्राविषयी घेतलेली भूमिका ही यहुद्यांच्या तोंडी सांप्रदायाच्या तुलनेत केवढी वेगळी होती?
१५ आता आपण येशूच्या तिसऱ्या विधानाकडे येतो. तो म्हणालाः “‘कोणी आपली बायको टाकिली तर त्याने तिला सूटपत्र द्यावे,’ हेही सांगितले होते. मी तर तुम्हास सांगतो की, जो कोणी आपली बायको व्यभिचाराच्या कारणावाचून टाकतो तो तिला व्यभिचारिणी करतो; आणि जो कोणी अशा टाकिलेल्या स्त्रीबरोबर [म्हणजे, लैंगिक अनैतिकतेच्या कारणाशिवाय इतर कारणामुळे टाकलेल्या] लग्न करतो तो व्यभिचार करतो.” (मत्तय ५:३१, ३२) काही यहुदी आपल्या बायकांसोबत निष्ठुरतेने वागत आणि थोड्या थोड्या गोष्टीसाठी ते सूटपत्र देत. (मलाखी २:१३-१६; मत्तय १९:३-९) तोंडी सांप्रदाय तर एखाद्या माणसाला, त्याच्या बायकोने “त्याला दिलेले अन्न वाईट शिजले गेले तरी सुद्धा” किंवा “त्याला तिच्यापेक्षा अधिक सुंदर अशी कोणी आढळल्यास” तिला सूटपत्र देण्यास मुभा देत होता.—मिश्ना.
१६. यहुद्यांच्या कोणत्या प्रघातामुळे शपथ घेणे निरर्थक बनले होते, आणि येशूने याबद्दल कोणती भूमिका ग्रहण केली?
१६ येशूने अगदी त्याच सुरात पुढे म्हटलेः “‘खोटी शपथ वाहू नको,’ . . . म्हणून प्राचीन लोकांस सांगितले होते हेही तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हास सांगतो, ‘शपथ म्हणून वाहूच नका.” या काळापावेतो यहुदी शपथेचा भंग करीत होते आणि काहीही न करता येणाऱ्या युक्तीबाज गोष्टीसाठी ते खूप शपथा घेत. पण येशूने म्हटलेः “शपथ म्हणून वाहूच नका . . . तुमचे बोलणे होय तर होय, किंवा नाही तर नाही, एवढेच असावे.” त्याने दाखविलेला नियम सरळ होताः सर्वदा सत्य असा, आपल्या शब्दांची खात्री देण्यासाठी शपथेची पुष्टी जरुरीची नाही. महत्त्वपूर्ण गोष्टीसाठी शपथा राखून ठेवा.—मत्तय ५:३३-३७; पडताळा करा २३:१६-२२.
१७. “डोळ्याबद्दल डोळा व दाताबद्दल दात” असा बदला देण्याऐवजी येशू कोणता चांगला मार्ग शिकवतो?
१७ येशूने पुढे म्हटलेः “‘डोळ्याबद्दल डोळा व दाताबद्दल दात’ असे सांगितले होते हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हास सांगतोः “दुष्टाला अडवू नका; जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारील त्याजकडे दुसरा गाल कर.” (मत्तय ५:३८-४२) येथे येशू इजा करण्याच्या इराद्याने मारलेल्या ठोशाबद्दल सांगत नव्हता, तर हाताच्या तळव्याने चपराक करण्याच्या कृतीबद्दल बोलत होता, जी अपमान करण्याकरता केली जाई. यास्तव, अपमानाचा प्रतिकार करून स्वतःला नीच बनवू नका. वाईटाबद्दल वाईट फेड करण्याचे टाळा. उलटपक्षी, चांगले ते करा व “बऱ्याने वाईटाला जिंका.”—रोमकर १२:१७-२१.
१८. (अ) शेजाऱ्यावर प्रेम करण्याच्या कायद्याला यहुद्यांनी कसे बदलविले, पण येशूने याबद्दल कशी उलट प्रतिक्रिया दाखवली? (ब) ‘शेजारी’ ह्या संज्ञेचा मर्यादित अर्थ ठेवणाऱ्या विशिष्ट शास्त्र्याला येशूने कसे उत्तर दिले?
१८ सहाव्या शेवटल्या उदाहरणात येशू, रब्बींच्या सांप्रदायामुळे मोशाचे नियमशास्त्र कसे दुर्बळ करण्यात आले याबद्दलची स्पष्टता देतो. तो म्हणतोः “‘आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर व आपल्या वैऱ्याचा द्वेष कर’ असे सांगितले होते ते तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हास सांगतो, ‘तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.” (मत्तय ५:४३, ४४) मोशेच्या नियमशास्त्राने प्रेमावर कोणतेही बंधन घातले नव्हते. ते सांगत होतेः “तू आपल्या शेजाऱ्यांवर स्वतःप्रमाणे प्रेम ठेव.” (लेवीय १९:१८) तर परुशांनी या कायद्याचा उपहास केला आणि यापासून पळवाट शोधावी म्हणून त्यांनी ‘शेजारी’ ही संज्ञा सांप्रदाय पाळणाऱ्यांपुरतीच मर्यादित ठेवली. या कारणामुळेच नंतर जेव्हा येशूने एका शास्त्र्याला ‘आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करण्या’च्या आज्ञेचे स्मरण दिले तेव्हा तो शास्त्री गोंधळला व याने येशूला विचारले की, “माझा शेजारी तो कोण?” येशूने उत्तम शोमरोन्याचा दाखला देऊन त्याचे उत्तर दिले की, ज्याला तुमची गरज आहे अशाला तुम्ही आपला शेजारी करा.—लूक १०:२५-३७.
१९. यहोवाने दुष्टांच्या बाबतीत केलेल्या कोणत्या हालचालीचे आम्ही अनुकरण करावे म्हणून येशू शिफारस करतो?
१९ आपले प्रवचन पुढे चालवून येशूने आणखी म्हटले की, ‘देवाने वाईटांवरही आपले प्रेम दर्शवले. त्याने त्यांच्यावर आपला सूर्य उगवला व पाऊसही पाडला. जे आपणावर प्रीती दाखवतात अशांवर प्रेम दाखवणे यात मोठे असे काही नाही. दुष्ट लोकही तेच करतात. याकडून प्रतिफळ मिळवण्याजोगे कोणतेही कारण राहात नाही. यासाठी आपल्या संबंधाने, आपण देवाचे पुत्र असल्याचे शाबीत करा. त्याचे अनुकरण करा. स्वतःला सर्वांसाठी शेजारी करा आणि आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती करा. अशाप्रकारे, “जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे, तसे तुम्ही पूर्ण व्हा.”’ (मत्तय ५:४५-४८) खरेच, अनुसरण्याजोगा हा केवढा आव्हानात्मक दर्जा आहे! याद्वारे, परुशी व शास्त्री यांची धार्मिकता केवढी संकुचित असल्याचे दिसते!
२०. मोशाचे नियमशास्त्र दूर लोटण्याऐवजी येशूने त्यातील प्रभाव कसा विस्तृत व खोल केला व त्याला अधिक श्रेष्ठ दर्जावर कसे ठेवले?
२० येशूने जेव्हा नियमशास्त्रातील भागांचा उल्लेख केला व असे म्हटले की, “मी तर तुम्हास सांगतो,” तेव्हा तो मोशेचे नियमशास्त्र बाजूला सारुन त्याऐवजी दुसऱ्या कशाचा पर्याय सुचवीत नव्हता. तसे नाही, तर तो नियमशास्त्रामागील आत्म्याची स्पष्टता करून त्याची शक्ती खोल व विस्तृत करीत होता. बंधुत्वाचा श्रेष्ठ नियम, राग वागवीत राहणे ही गोष्ट खून करण्यासमान असल्याचे दाखवत होता. शुद्धतेचा श्रेष्ठ नियम, सतत कामुकता बाळगणे व्यभिचार करण्यासमान आहे म्हणून धिक्कारतो. विवाहाचा श्रेष्ठ नियम पोरकटपणे सूटपत्र देण्याला व्यभिचारी विवाहाप्रत नेणारा मार्ग या नात्याने धिक्कारतो. सत्याचा श्रेष्ठ मार्ग सतत शपथा घेत राहणे जरुरीचे नाही असे दाखवतो. सौम्यतेचा श्रेष्ठ नियम जशास तसे वागणूकीला दूर सारतो. प्रीतीचा श्रेष्ठ नियम ईश्वरी प्रेमाचे आव्हान करतो, ज्याला कसल्याही मर्यादा नाहीत.
२१. येशूच्या सल्ल्याने रब्बींच्या स्व-धार्मिक वृत्तीबद्दल काय प्रकटविले व शिवाय जमावास काय शिकण्यास मिळू शकले?
२१ असा कधी ऐकण्यात न येणारा सल्ला जेव्हा प्रथमच लोकांच्या कानी पडला तेव्हा त्याने केवढा सखोल परिणाम घडवून आणला असावा! रब्बी संप्रदायाच्या दास्यत्वात गढलेले किती ढोंगीपणाने स्व-धार्मिक वृत्ती दाखवून आहेत हे त्याने केवढ्या प्रकर्षाने दाखवले! आता, येशू डोंगरावरील प्रवचनाची पुढील माहिती सादर करीत असताना देवाच्या नीतीमत्वाविषयी क्षुधित व तान्हेले असणाऱ्या जमावाला ती कशी मिळवता येऊ शकेल ते अजून शिकून घ्यायचे होते. हेच आपल्याला पुढील लेखावरुन दिसेल.
उजळणी प्रश्न
◻ यहुद्यांनी तोंडी संप्रदायाची का निर्मिती केली?
◻ येशूने शास्त्री व परुशी आणि सर्वसाधारण लोक यांच्या अनुषंगाने कोणता नाट्यमय बदल घडवून आणला?
◻ शास्त्री व परुशांनी देवासोबत धार्मिक भूमिका कोणत्या आधारावर ग्रहण करण्याची अपेक्षा धरली?
◻ व्यभिचार व जारकर्म टाळण्याचा कोणता मार्ग येशूने दाखवला?
◻ मोशेच्या नियमशास्त्रामागील आत्मा दाखवून देण्याद्वारे येशूने कोणते श्रेष्ठ दर्जे प्रस्थापिले?