येशूचे जीवन व उपाध्यपण
पीडितांस दाखविलेला दयाळूपणा
स्वार्थी वृत्तीच्या संप्रदायाविषयी परूश्यांची कानउघाडणी केल्यानंतर येशू आपल्या शिष्यांबरोबर निघतो. तुम्हाला आठवत असेल की, अलिकडेच येशूने एकांत मिळावा यासाठी प्रयत्न केला पण लोकांनी त्याला शोधून काढल्यामुळे त्याला विश्रांती घेता आली नाही. आता, आपल्या शिष्यांसमवेत तो उत्तरेकडे कित्येक मैल लांब असलेल्या सोर व सीदोन प्रदेशाकडे निघतो. ही कदाचित येशूने इस्राएलच्या सरहद्दीपलिकडे आपल्या शिष्यांबरोबर केलेली एकमात्र भेट असावी.
तेथे एका घरात आल्यावर येशू हे सांगतो, की आपण कोठे आहोत हे कोणाला कळू देऊ नये. पण, या इस्राएलेत्तर प्रदेशात देखील तो नजरेआड होऊ शकला नाही. येथे अरामाच्या फेनिके येथील एका स्त्रीला तो आढळतो व ती त्याच्याकडे येऊन ही विनंती करतेः “हे प्रभो, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. माझी मुलगी भुताने फारच जर्जर केली आहे.” पण येशू काही उत्तर देत नाही.
त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन विनंती करतातः “तिला पाठवून द्या; कारण ती आमच्यामागून ओरडत येत आहे.”
तिच्याकडे दुर्लक्ष करण्याच्या कारणाची स्पष्टता करताना येशू म्हणतोः “इस्राएलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज इतर कोणाकडे मला पाठविलेले नाही.”
पण ती स्त्री हताश होत नाही. ती येशूकडे येते, त्याच्या पाया पडते व विनंती करतेः “प्रभुजी, मला साहाय्य करा.”
या स्त्रीच्या कळकळीच्या विनंतीने येशूचे हृदय किती द्रवले असावे! तरीपण तो त्याजवरील पहिल्या जबाबदारीकडे निर्देश करतो, म्हणजे त्याचे येणे देवाचे लोक इस्राएल यांच्यासाठी झाले आहे. पण याचवेळी तिच्या विश्वासाची परिक्षा पहावी या हेतूने, येशू, यहुद्यांना इतर राष्ट्रीयांबद्दल जो अहंकारी दृष्टीकोण वाटत होता त्याचे उदाहरण घेऊन असे म्हणतोः “मुलाची भाकरी घेऊन ती घरच्या कुत्र्यांना घालणे हे ठीक नव्हे.”
आपला कनवाळू सूर तसेच चर्या याकरवी येशूला यहुद्देतरांविषयी वाटत असलेली सहानुभूति व्यक्त होते. कारण तो विदेश्यांची जी तुलना दाखवितो तीमध्ये कडवटपणा नाही. तो त्यांना वाटेवरली कुत्री संबोधण्यापेक्षा घरची (पाळीव लहान) कुत्री अशी उपमा देतो. येशूच्या उद्गारांनी उद्विग्न होण्यापेक्षा ती स्त्री येशूने उदाहरणादाखल घेतलेल्या यहुद्यांच्या अहंभावाचा संदर्भ घेते व अत्यंत नम्रपणे म्हणतेः “खरेच, प्रभुजी; तरी घरची कुत्रीही आपल्या धन्यांच्या मेजावरून पडलेला चुरा खातात.”
“बाई, तुझा विश्वास मोठा,” असे येशू म्हणतो, “तुझी इच्छा सफळ होवो.” ती इच्छा खरेच सफळ होते! ती आपल्या घरी जाते तो काय बघते, तिची अंथरुणावर असलेली मुलगी खरीच बरी झालेली आहे.
यानंतर येशू सीदोनच्या किनारपट्टीकडून आपल्या शिष्यांसमवेत यार्देन नदीच्या प्रवाहाकडे येतो. ते गालील समुद्राजवळून ही नदी पार करून समुद्राच्या पूर्वेकडे दकापलीस प्रांतात येतात. तेथे ते डोंगरावर जातात, पण लोकसमुदायास त्यांच्याविषयी कळते व ते लंगडे, व्यंग, आंधळे, मुके व इतर व्याधिग्रस्तांना येशूकडे आणतात. ते यांना जवळजवळ येशूच्या पायाकडे लोटतात. तो त्यांना बरे करतो. मुके बोलतात, लंगडे चालतात, आंधळे बघतात आणि हे सर्व इस्राएलाच्या देवाची स्तुती गात आहेत हे बघून जनसमुदायाला आश्चर्य वाटते.
एक बहिरा व ज्याला अजिबात बोलता येत नाही अशा एका माणसाला येशू खास लक्ष देतो. जमावात असताना बहिऱ्यांना अगदी बावरल्यासारखे वाटत असते. येशूला देखील याचा बावरेपणा दिसला असावा व यासाठीच तो त्याला जमावातून दूर नेतो. ते एकटे असता, तो काय करणार हे तो त्याला दर्शवितो. तो त्याच्या कानात बोटे घालतो व थुंकून त्याच्या जिभेला स्पर्श करतो. मग, वर स्वर्गाकडे पाहून तो उसासा टाकतो व म्हणतोः “मोकळा हो.” तेव्हा माणसाची श्रवणशक्ती त्याला मिळते व तो सर्वसाधारणपणे बोलू लागतो.
येशूने इतकी अद्भुत कृत्ये केल्यावर जमाव त्याविषयी आपली रसिकता व्यक्त करतो. ते म्हणतातः “त्याने सर्व काही चांगले केले आहे; हा बहिऱ्यांना ऐकण्याची व मुक्यांना बोलण्याची शक्ती देतो.” मत्तय १५:२१-३१; मार्क ७:२४-३७.
◆ येशू त्या ग्रीक बाईच्या मुलीस लगेचच का बरे करीत नाही?
◆ नंतर, येशू आपल्या शिष्यांना कोठे घेऊन जातो?
◆ एका बहिऱ्या आणि बोलू न शकणाऱ्या माणसाला येशू केवढा कनवाळूपणा दाखवितो?