वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w14 ७/१५ पृ. २८-३२
  • “तुम्ही माझे साक्षी व्हाल”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “तुम्ही माझे साक्षी व्हाल”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • “देवाची महत्कृत्ये”
  • “पुष्कळांच्या खंडणीसाठी”
  • धैर्याने सुवार्ता सांगा
  • येशू ख्रिस्त—देवाने पाठवलेला?
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
  • येशूने केलेल्या हृदयस्पर्शी प्रार्थनेच्या अनुषंगाने कार्य करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • चांगल्याप्रकारे साक्ष देण्याचे प्रशिक्षण मिळालेले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • ‘ख्रिस्ताला’ का अनुसरावे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
w14 ७/१५ पृ. २८-३२
अधिवेशनात यहोवाचे साक्षीदार

“तुम्ही माझे साक्षी व्हाल”

“[येशू] त्यांना म्हणाला, . . . पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.”—प्रे. कृत्ये १:७, ८.

तुम्ही उत्तर देऊ शकता का?

  • येशू आपल्या नावाच्या अर्थानुसार जीवन जगला असे का म्हणता येईल?

  • “तुम्ही माझे साक्षी व्हाल,” असे येशूने का म्हटले?

  • साक्षकार्यात आपण यशस्वी होऊ असा भरवसा आपण का बाळगू शकतो?

१, २. (क) यहोवाचा सर्वात उल्लेखनीय साक्षी कोण आहे? (ख) येशू या नावाचा काय अर्थ होतो, आणि तो कशा प्रकारे आपल्या नावाला जागला?

येशूला मृत्युदंड देण्यात आला त्याआधी यहूदियाचा रोमी सुभेदार पंतय पिलात याच्यासमोर येशूवर खटला सुरू होता. त्या प्रसंगी येशूने आपण राजा असल्याचे सांगितले. त्याने पिलाताला असेही सांगितले की, “मी यासाठी जन्मलो आहे व यासाठी जगात आलो आहे की, मी सत्याविषयी साक्ष द्यावी.” (योहान १८:३३-३७ वाचा.) येशूने दाखवलेल्या या धैर्याच्या उदाहरणाचा प्रेषित पौलाने अनेक वर्षांनंतर उल्लेख केला. त्याने असे म्हटले की येशूने “पंतय पिलातासमोर . . . चांगली साक्ष दिली.” (१ तीम. ६:१३, ईझी-टू-रीड व्हर्शन) येशूप्रमाणेच आज आपल्यालाही सैतानाच्या द्वेषपूर्ण जगात “विश्‍वसनीय व खरा साक्षी” होण्यासाठी कधीकधी खूप धैर्य दाखवण्याची गरज पडू शकते.—प्रकटी. ३:१४.

२ यहुदी राष्ट्राचा सदस्य असल्यामुळे येशू जन्मतःच यहोवाचा साक्षी होता. (यश. ४३:१०) खरे पाहता, देवाने आपले नाव इतरांना सांगण्यासाठी आजपर्यंत ज्यांचा उपयोग केला आहे त्यांपैकी येशू हा देवाचा सर्वात उल्लेखनीय साक्षी ठरला. येशू हे नाव यहोवाने त्याला दिले होते आणि त्याने त्याच्या नावाचा अर्थ गांभीर्याने घेतला. येशूचा पृथ्वीवरील पिता योसेफ याला एका देवदूताने जेव्हा सांगितले की मरियेला पवित्र आत्म्याद्वारे गर्भधारणा झाली आहे तेव्हा त्या देवदूताने हेदेखील सांगितले की, “तिला पुत्र होईल, आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारेल.” (मत्त. १:२०, २१) बरेच बायबलचे विद्वान हे कबूल करतात की येशू हे नाव येशूआ या इब्री नावापासून आले आहे आणि या नावात देवाच्या नावाचे संक्षिप्त रूप आहे. येशूआ या नावाचा अर्थ “यहोवा तारणारा आहे” असा होतो. येशूने आपल्या नावाच्या अर्थानुसार “इस्राएलाच्या घराण्यातील हरवलेल्या” मेंढरांना त्यांच्या पापांबद्दल पश्‍चात्ताप करण्यास मदत केली. त्यांना पुन्हा यहोवासोबत नातेसंबंध जोडणे शक्य व्हावे हा यामागचा उद्देश होता. (मत्त. १०:६; १५:२४; लूक १९:१०) याच कारणामुळे येशूने आवेशाने देवाच्या राज्याची साक्ष दिली. शुभवर्तमानाचा लेखक मार्क याने असे म्हटले: “येशू देवाची सुवार्ता गाजवत गाजवत गालीलात आला व म्हणाला, काळाची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे; पश्‍चात्ताप करा व सुवार्तेवर विश्‍वास ठेवा.” (मार्क १:१४, १५) तसेच येशूने यहुदी धर्मपुढाऱ्‍यांची अधार्मिकता सर्वांसमोर उघड केली. हेदेखील एक कारण होते ज्यामुळे त्या पुढाऱ्‍यांनी येशूला वधस्तंभावर मृत्युदंड देण्यात यावा अशी मागणी केली.—मार्क ११:१७, १८; १५:१-१५.

“देवाची महत्कृत्ये”

३. येशूच्या मृत्यूच्या तिसऱ्‍या दिवशी काय झाले?

३ पण यहोवाने एक चमत्कार घडवून आणला. येशूला निर्दयीपणे ठार मारण्यात आले, त्याच्या तीन दिवसांनंतर यहोवाने त्याला पुनरुत्थित केले. येशूचे पुनरुत्थान एका मानवी शरीरात नाही तर एका अमर आत्मिक शरीरात झाले. (१ पेत्र ३:१८) आपले पुनरुत्थान झाले आहे याचा पुरावा देण्यासाठी येशू मानवी शरीरात आपल्या शिष्यांसमोर प्रकट झाला. पुनरुत्थान झाले त्याच दिवशी, येशू कमीतकमी पाच वेळा वेगवेगळ्या शिष्यांना भेटला.—मत्त. २८:८-१०; लूक २४:१३-१६, ३०-३६; योहा. २०:११-१८.

४. पुनरुत्थानानंतर येशू पाचव्या वेळी प्रकट झाला तेव्हा तो कोणाला भेटला, आणि त्याने त्याच्या शिष्यांना कोणत्या जबाबदारीबद्दल सांगितले?

४ पुनरुत्थान झाल्यानंतर येशू जेव्हा पाचव्या वेळी प्रकट झाला तेव्हा तो त्याच्या प्रेषितांना व त्यांच्यासोबत जे इतर लोक एकत्रित झाले होते त्यांना भेटला. त्या खास प्रसंगी येशूने त्यांना बायबलमधील बऱ्‍याच गोष्टी समजावून सांगितल्या व त्या त्यांना समजाव्यात “म्हणून त्याने त्यांचे मन उघडले.” यामुळे त्यांना समजले की देवाच्या शत्रूंच्या हाती येशूचा मृत्यू होईल आणि चमत्कारिक रीत्या त्याचे पुनरुत्थान होईल या गोष्टी शास्त्रात भाकीत करण्यात आल्या होत्या. जमलेल्या सर्वांशी बोलल्यानंतर त्यांची जबाबदारी काय आहे हे शेवटी येशूने स्पष्टपणे सांगितले. येशूने त्यांना सांगितले की “यरुशलेमेपासून आरंभ करून सर्व राष्ट्रांना त्याच्या नावाने पश्‍चात्ताप व पापक्षमा घोषित करण्यात यावी.” त्याने पुढे असे म्हटले: “तुम्ही या गोष्टींचे साक्षी आहा.”—लूक २४:४४-४८.

५, ६. (क) “तुम्ही माझे साक्षी व्हाल” असे येशूने का म्हटले? (ख) यहोवाच्या उद्देशातील कोणत्या नव्या पैलूविषयी येशूच्या शिष्यांनी इतरांना सांगायचे होते?

५ यामुळे पुनरुत्थानाच्या ४० दिवसांनंतर येशू जेव्हा त्याच्या प्रेषितांना शेवटल्या वेळी भेटला तेव्हा त्याने साध्याच पण जोरदार शब्दांत दिलेली पुढील आज्ञा त्यांना पूर्णपणे समजली असेल. येशूने म्हटले की, “यरुशलेमेत, सर्व यहूदीयात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.” (प्रे. कृत्ये १:८) तुम्ही यहोवाचे साक्षी व्हाल असे न म्हणता, “तुम्ही माझे साक्षी व्हाल” असे येशूने त्यांना का म्हटले? कारण येशू ज्यांच्याशी बोलत होता ते लोक इस्राएली होते आणि त्यामुळे ते आधीपासूनच यहोवाचे साक्षी होते.

१. पहिल्या शतकातील येशूचे शिष्य प्रचार कार्य करताना; २. आपल्या काळातील एक साक्षीदार सार्वजनिक साक्षकार्य करताना; ३. आपल्या काळातील काही साक्षीदार एका स्त्रीला jw.org वेबसाईटवरील माहिती दाखवताना

येशूचे शिष्य या नात्याने आपण भविष्याबद्दल असलेला यहोवाचा उद्देश इतरांना सांगतो (परिच्छेद ५, ६ पाहा)

६ यापुढे येशूच्या शिष्यांना यहोवाच्या उद्देशातील एक नवीन पैलू इतरांना सांगायचा होता. येशू ख्रिस्ताचा मृत्यू व पुनरुत्थान यामुळे आता सर्वात मोठ्या गुलामगिरीतून, म्हणजेच पाप आणि मृत्यू यांच्यातून सुटका मिळणे शक्य झाले होते. ही सुटका इजिप्तच्या गुलामीतून आणि बॅबिलोनच्या बंदिवासातून इस्राएली लोकांना मिळालेल्या सुटकेपेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ होती. इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्ट रोजी अभिषिक्‍त झालेल्या येशूच्या शिष्यांनी लोकांना “देवाची महत्कृत्ये” सांगितली आणि बरेच लोक येशूचे शिष्य झाले. हजारो लोकांनी आपल्या पापांबद्दल पश्‍चात्ताप केला आणि येशू हा तारण मिळवण्यासाठी यहोवाने नेमलेला मार्ग आहे यावर विश्‍वास ठेवला. अशा रीतीने स्वर्गात आपल्या पित्याच्या उजवीकडे बसलेला येशू हे पाहू शकला की त्याच्या नावाचा अर्थ मोठ्या प्रमाणात खरा ठरत आहे.—प्रे. कृत्ये २:५, ११, ३७-४१.

“पुष्कळांच्या खंडणीसाठी”

७. इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी ज्या घटना घडल्या त्यांवरून काय स्पष्ट झाले?

७ इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्ट रोजी ज्या घटना घडल्या त्यांवरून हे अगदी स्पष्ट झाले की येशूने पापासाठी प्रायश्‍चित्त म्हणून आपल्या परिपूर्ण जीवनाचे जे बलिदान दिले ते यहोवाने स्वीकारले होते. (इब्री ९:११, १२, २४) पृथ्वीवर असताना येशूने सांगितले होते की तो “सेवा करून घेण्यास नाही, तर सेवा करण्यास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे.” (मत्त. २०:२८) येशूच्या खंडणी बलिदानाचा ज्या ‘पुष्कळांना’ फायदा होणार होता त्यांत फक्‍त पश्‍चात्ताप करणारे यहुदीच सामील नव्हते. तर देवाची अशी इच्छा आहे की “सर्व माणसांचे तारण व्हावे.” म्हणूनच बायबल असे सांगते की येशूच्या खंडणीमुळे ‘जगाच्या’ पापांची क्षमा मिळणे शक्य होते.—१ तीम. २:४-६; योहा. १:२९.

८. येशूचे शिष्य साक्षकार्यात कितपत यशस्वी ठरले, आणि हे कशामुळे शक्य झाले?

८ पण मग येशूबद्दल साक्ष देत राहण्यासाठी लागणारे धैर्य त्याच्या सुरुवातीच्या शिष्यांमध्ये होते का? त्यांच्यात नक्कीच ते धैर्य होते, पण त्यांनी हे कार्य स्वतःच्या बळावर केले नाही. यहोवाच्या शक्‍तिशाली पवित्र आत्म्याने त्यांना साक्ष देत राहण्यासाठी प्रोत्साहन व बळ दिले. (प्रेषितांची कृत्ये ५:३०-३२ वाचा.) यामुळेच इ.स. ३३ पेन्टेकॉस्टच्या जवळजवळ २७ वर्षांनंतर बायबलमध्ये असे सांगण्यात आले की, “आकाशाखालच्या सर्व सृष्टीत” जे यहुदी व परराष्ट्रीय होते त्यांच्यापर्यंत सुवार्तेचे सत्यवचन पोचले होते.—कलस्सै. १:५, २३.

९. भाकीत केल्याप्रमाणे सुरुवातीच्या ख्रिस्ती मंडळीत काय घडले?

९ पण दुःखाची गोष्ट म्हणजे सुरुवातीची ख्रिस्ती मंडळी हळूहळू दूषित होऊ लागली. (प्रे. कृत्ये २०:२९, ३०; २ पेत्र २:२, ३; यहू. ३, ४) येशूने भाकीत केले होते की दुष्ट वैरी म्हणजेच सैतान याने पेरलेला धर्मत्याग युगाच्या समाप्तीपर्यंत वाढेल आणि खऱ्‍या ख्रिस्ती शिकवणींना काही प्रमाणात झाकून टाकेल. (मत्त. १३:३७-४३) त्यानंतर यहोवा सर्व मानवजातीवर राज्य करण्यासाठी येशूला राजासन देईल. ही घटना १९१४ च्या ऑक्टोबर महिन्यात घडली, व तेव्हापासून सैतानाच्या दुष्ट जगाचे शेवटले दिवस सुरू झाले.—२ तीम. ३:१.

१०. (क) आधुनिक काळातील अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी कोणत्या तारखेविषयी आधीच सांगितले होते? (ख) ऑक्टोबर १९१४ या महिन्यात काय घडले आणि ती घटना सर्वांसाठी स्पष्ट कशी झाली?

१० आधुनिक काळातील अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी आधीच सांगितले होते की ऑक्टोबर १९१४ हा एक खास महिना असेल. त्यांनी हा निष्कर्ष दानीएलाच्या भविष्यवाणीच्या आधारावर काढला, ज्यात सांगण्यात आले होते की एका मोठ्या वृक्षाला तोडण्यात येईल व “सात काळ” गेल्यानंतर तो वृक्ष पुन्हा वाढेल. (दानी. ४:१६) भविष्यातील आपल्या उपस्थितीविषयी आणि युगाच्या समाप्तीविषयी येशूने जी भविष्यवाणी केली त्यात त्याने याच सात काळांना “परराष्ट्रीयांची सद्दी” असे म्हटले. १९१४ सालापासून पृथ्वीचा नवा राजा ख्रिस्त याच्या “उपस्थितीचे चिन्ह” स्पष्टपणे दिसत आहे. (मत्त. २४:३, NW; २४:७, १४; लूक २१:२४) त्यामुळे १९१४ पासून सर्व मानवजातीवर राजा म्हणून येशू ख्रिस्ताचे राज्य सुरू होणे ही गोष्टदेखील ‘देवाच्या महत्कृत्यांत’ सामील झाली आहे.

११, १२. (क) पृथ्वीच्या नव्या राजाने १९१९ साली काय करण्यास सुरुवात केली? (ख) १९३५ च्या सुमारास कोणती गोष्ट स्पष्ट झाली? (लेखाच्या सुरुवातीला दिलेले चित्र पाहा.)

११ पृथ्वीचा नवा राजा या नात्याने लवकरच येशू ख्रिस्ताने “मोठी बाबेल” हिच्या गुलामगिरीतून आपल्या अभिषिक्‍त अनुयायांना सोडवण्यास सुरुवात केली. (प्रकटी. १८:२, ४) पहिले महायुद्ध संपल्यानंतर १९१९ साली ख्रिश्‍चनांना सबंध जगभरात ही सुवार्ता सांगण्याची संधी मिळाली, की येशू ख्रिस्त हा तारण मिळवण्यासाठी देवाने नियुक्‍त केलेला मार्ग आहे व त्याचे राज्य सुरू झाले आहे. अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी साक्ष देण्याच्या या संधीचा पूर्णपणे उपयोग केला. यामुळे आणखी हजारो जणांनी सत्य स्वीकारले आणि त्यांना येशू ख्रिस्तासोबत सहराजे होण्यासाठी अभिषिक्‍त करण्यात आले.

१२ ख्रिस्ताने “दुसरी मेंढरे” म्हटलेल्या लाखो लोकांना गोळा करण्याचे काम सुरू केले आहे हे १९३५ च्या सुमारास स्पष्टपणे दिसून आले. वेगवेगळ्या राष्ट्रांतून आलेल्या या लोकांचा मिळून एक “मोठा लोकसमुदाय” बनणार होता. अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचे मार्गदर्शन स्वीकारून हा मोठा लोकसमुदायदेखील येशूने दाखवलेल्या धैर्याच्या उदाहरणाचे अनुकरण करतो. त्यातील लोक इतरांना सांगतात की त्यांचे तारण हे फक्‍त यहोवा आणि येशू यांच्याकडूनच होणार आहे. साक्ष देण्याचे हे काम करत राहिल्याने आणि ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानावर विश्‍वास प्रदर्शित करत राहिल्याने या लोकांना “मोठ्या संकटातून” म्हणजेच सैतानाच्या जगाच्या नाशातून बचावण्याचा सुहक्क मिळेल.—योहा. १०:१६; प्रकटी. ७:९, १०, १४.

धैर्याने सुवार्ता सांगा

१३. यहोवाचे साक्षीदार या नात्याने आपला कोणता निर्धार आहे, आणि आपल्याला यश मिळेल अशी खात्री आपण का बाळगू शकतो?

१३ यहोवा देवाने आजपर्यंत जी महत्कृत्ये केली आहेत व भविष्यात जी करणार आहे, त्यांची साक्ष देणे हा आपल्याकरता एक बहुमान आहे, ज्याची आपण नेहमीच कदर बाळगली पाहिजे. हे खरे आहे की साक्षकार्य करणे नेहमीच सोपे नसते. आपले बरेच बांधव अशा क्षेत्रांत सेवा करतात जेथे लोक ऐकून घेत नाहीत, थट्टा करतात किंवा छळही करतात. अशा परिस्थितीत प्रेषित पौल आणि त्याच्या सोबत्यांनी जे केले तेच आपणदेखील करू शकतो. पौलाने म्हटले: “मोठ्या कष्टात असता देवाची सुवार्ता तुम्हाला सांगण्याचे धैर्य आपल्या देवाकडून आम्हास मिळाले.” (१ थेस्सलनी. २:२) साक्षकार्य सोपे नसले तरी आपण कधीही निराश होऊ नये. याउलट, सैतानाच्या जगाचा नाश होईपर्यंत, आपण यहोवाला केलेल्या समर्पणानुसार साक्षकार्य करत राहण्याचा निर्धार करू या. (यश. ६:११) आपण हे कार्य स्वतःच्या बळावर करू शकत नाही. म्हणूनच आपण पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांप्रमाणे यहोवाला प्रार्थना करून त्याच्या पवित्र आत्म्याचे अद्‌भुत सामर्थ्य आपल्याला देण्याची विनंती केली पाहिजे.—२ करिंथकर ४:१, ७ वाचा; लूक ११:१३.

१४, १५. (क) पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांना कोणत्या गोष्टीला सामोरे जावे लागले, आणि प्रेषित पेत्राने त्यांच्याविषयी काय म्हटले? (ख) यहोवाचे साक्षीदार असल्यामुळे आपला जेव्हा छळ होतो तेव्हा आपण कशी मनोवृत्ती दाखवली पाहिजे?

१४ आज लाखो लोक ख्रिस्ती असल्याचा दावा करतात पण ते आपल्या “कृतींनी त्याला [देवाला] नाकारतात. ते अमंगळ, आज्ञाभंजक व प्रत्येक चांगल्या कामास नालायक आहेत.” (तीत १:१६) पहिल्या शतकातील खऱ्‍या ख्रिश्‍चनांचा बऱ्‍याच लोकांनी द्वेष केला होता हे आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. यामुळे प्रेषित पेत्राने म्हटले: “ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहा; कारण . . . देवाचा आत्मा तुमच्यावर येऊन राहिला आहे.”—१ पेत्र ४:१४.

१५ हे देवप्रेरित शब्द आज यहोवाच्या साक्षीदारांवर लागू होतात का? नक्कीच होतात, कारण येशू राजा बनला आहे अशी आपण साक्ष देतो. त्यामुळे यहोवाच्या नावाने ओळखले जाण्यामुळे आपली निंदा होणे आणि “[येशू] ख्रिस्ताच्या नावामुळे” आपली निंदा होणे एकच आहे. येशूने आपल्या विरोधकांना असे म्हटले: “मी आपल्या पित्याच्या नावाने आलो आहे पण तुम्ही माझा स्वीकार करत नाही.” (योहा. ५:४३) तेव्हा, पुढे कधी साक्षकार्य करताना तुमचा विरोध झालाच तर निराश होऊ नका. कारण साक्षकार्यासाठी विरोध होणे हे या गोष्टीचा पुरावा आहे की तुमच्या कार्यावर यहोवाचा आशीर्वाद आहे आणि त्याचा पवित्र आत्मा तुमच्यावर आहे.

१६, १७. (क) जगातील बऱ्‍याच भागांत यहोवाच्या साक्षीदारांना कोणता अनुभव आला आहे? (ख) तुमचा निर्धार काय आहे?

१६ त्यासोबतच, आपण हेदेखील लक्षात घेतले पाहिजे की जगातील बऱ्‍याच भागांत चांगली वाढ होत आहे. वारंवार प्रचार झालेल्या क्षेत्रांतदेखील आपल्याला अजूनही असे लोक भेटतात जे आपले ऐकून घेतात व ज्यांना आपण तारण देणारा संदेश सांगू शकतो. जे लोक आस्था दाखवतात त्यांची पुनर्भेट घेण्यासाठी आपण तत्पर असले पाहिजे. तसेच शक्य असल्यास आपण बायबल अभ्यास सुरू करून त्या लोकांना समर्पण करण्यास व बाप्तिस्मा घेण्यास मदत केली पाहिजे. मागील ६० वर्षांपासून आवेशाने सेवा करत असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील सारी नावाच्या बहिणीसारखेच कदाचित तुम्हालाही वाटत असेल. त्या म्हणतात: “येशूच्या खंडणी बलिदानामुळे मला सबंध विश्‍वाचा सर्वोच्च राजा, यहोवा याच्यासोबत एक चांगला नातेसंबंध जोडणं शक्य झालं यासाठी मी मनापासून खूप आभारी आहे. यहोवाचं महान नाव मी इतरांना सांगू शकते याचा मला खूप आनंद होतो.” सारी व त्यांचे पती मार्टीनस यांनी त्यांच्या तीन मुलांसहित अनेकांना यहोवाचे उपासक बनण्यास मदत केली आहे. त्या पुढे म्हणतात: “दुसऱ्‍या कुठल्याच कार्यात इतकं समाधान मिळत नाही. आणि जीवन वाचवण्याचं हे काम करत राहण्यासाठी लागणारी मदत यहोवा आपल्या सर्वांना त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे देतो.”

१७ आपण बाप्तिस्माप्राप्त ख्रिस्ती असू किंवा मग ते पाऊल उचलण्यास तयारी करत असू, आपण सर्वांनी यहोवाचे आभार मानले पाहिजे कारण त्याने आपल्याला यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळीचा सदस्य बनण्याचा सुहक्क दिला आहे. त्यामुळे सैतानाच्या दूषित जगापासून शुद्ध राहण्याचा प्रयत्न करत असताना आपण आवेशाने साक्ष देत राहू या. असे करण्याद्वारे आपण ज्याच्या महान नावाने ओळखले जातो, त्या आपल्या स्वर्गीय पित्याचा आपण आदर करत असू.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा