हा खरोखरच शेवटला काळ आहे?
तुम्ही एका लहानशा होडीत आहात आणि आता ती होडी नदीच्या उंचसखल पात्रात प्रवेश करते. नदीच्या फेसाळत्या आणि उसळत्या प्रवाहातून मोठमोठाले खडक डोकावत असल्याचे तुम्हाला अस्पष्ट दिसत आहेत. या खडकांवर आदळू नये म्हणून तुम्ही पुरेशी दक्षताही घेता. तुमच्या मागे बसलेला मनुष्य होडी वल्हवण्यासाठी तुम्हाला मदत करील असे तुम्ही गृहीत धरता; परंतु तो या कामात पुरेसा अनुभवी नाही. याहीपेक्षा वाईट गोष्ट म्हणजे तुमच्याजवळ नकाशा नाहीए त्यामुळे हा वेगवान प्रवाह तुम्हाला एखाद्या शांत तळ्याकडे नेईल की एखाद्या धबधब्याकडे नेईल हे तुम्हाला ठाऊक नाहीए.
वरील वर्णन ऐकून कोणालाही आनंद होणार नाही, हो ना? मग आपण या वर्णनात बदल करू या. अशी कल्पना करा, की तुमच्यासोबत एक अनुभवी मार्गदर्शक आहे ज्याला नदीतील प्रत्येक खडक आणि प्रत्येक वळण माहीत आहे. फेसाळणारा हा पाण्याचा प्रवाह कोठून सुरू होतो आणि कोठे संपतो याची त्याला आधीच कल्पना आहे, त्याला हे ठाऊक आहे, की हा उसळणारा प्रवाह पुढे संथ होईल आणि या उसळत्या प्रवाहात होडी वल्हवण्यात सुद्धा तो पारंगत आहे. तुम्हाला आता अधिक सुरक्षित वाटणार नाही का?
खरोखरच आपल्या सर्वांची अशीच दशा झाली आहे. आपल्या स्वतःचा कोणताही दोष नसतानाही मानवी इतिहासातील या कठीण काळात आपल्या सर्वांची अशीच अवस्था झाली आहे. अशा प्रकारची परिस्थिती किती काळ राहील, तिच्यामध्ये सुधारणा होईल किंवा नाही आणि तोपर्यंत कसा तग धरता येईल, या गोष्टीची अनेक लोकांना कल्पना नाही. परंतु, आपल्याला भरकटलेले किंवा आशाहीन होण्याची काही एक आवश्यकता नाही. आपल्या निर्माणकर्त्याने आपल्याला एक शिक्षक दिला आहे—ज्याने इतिहासाच्या या अंधःकार युगाविषयी भाकीत केले तसेच तो या अंधःकारमय युगाच्या अंताविषयी भाकीत करतो आणि यातून निभावण्यासाठी आपल्याला आवश्यक असणारे मार्गदर्शनही तो देतो. ते मार्गदर्शन म्हणजे बायबल हेच पुस्तक होय. या पुस्तकाचा लेखक यहोवा देव स्वतःला महान शिक्षक संबोधतो आणि तो यशयाद्वारे पुन्हा खात्रीशीरपणे असे म्हणतो: “हाच मार्ग आहे; याने चला, अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल; मग तुम्हाला उजवीकडे जावयाचे असो किंवा डावीकडे जावयाचे असो.” (यशया ३०:२०, २१) तुम्ही अशा मार्गदर्शनाचा स्वीकार करणार का? आपल्या दिवसांत कशा प्रकारची परिस्थिती असेल, याविषयी बायबलने निश्चितपणे भाकीत केले किंवा कसे याबद्दल आपण विचार करू या.
येशूचे अनुयायी अर्थपूर्ण प्रश्न विचारतात
येशूच्या अनुयायांना कदाचित आश्चर्य वाटले असेल. जेरुसलेमेच्या प्रभावी मंदिराची इमारत पूर्णपणे नष्ट होणार असल्याचे येशूने त्यांना नुकतेच जोर देऊन सांगितले होते! अशा प्रकारचे भविष्यकथन आश्चर्यजनक होते. ते जैतुनांच्या डोंगरावर बसल्यानंतर काही वेळाने चौघा शिष्यांनी येशूला विचारले: “ह्या गोष्टी केव्हा होतील, आणि आपल्या येण्याचे व ह्या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय, हे आम्हास सांगा.” (मत्तय २४:३; मार्क १३:१-४) त्यांनी हे ओळखलेले असो अगर नसो, येशूच्या उत्तराचा बहुपदरी अवलंब होणार होता.
ख्रिस्ताच्या उपस्थितीचा आणि संपूर्ण जगाच्या व्यवस्थीकरणाच्या समाप्तीचा समय याप्रमाणे जेरुसलेमेच्या मंदिराचा विनाश आणि यहुदी व्यवस्थीकरणाचा अंत नव्हता. तथापि, आपल्या सविस्तर उत्तराद्वारे येशूने संबंधित प्रश्नाचे सर्व पैलू कौशल्याने मांडले. जेरुसलेमेच्या विनाशापूर्वी कशा प्रकारची परिस्थिती असेल याबद्दल त्याने त्यांना सांगितले; आपल्या उपस्थितीच्या वेळी जगाची कशी परिस्थिती असेल हे देखील त्याने त्यांना सांगितले, ज्यावेळी तो स्वर्गीय राजा म्हणून राज्य करीत असेल आणि संपूर्ण जागतिक व्यवस्थीकरणाचा अंत करण्याच्या मार्गावर असेल.
जेरुसलेमेचा अंत
जेरुसलेम आणि तिचे मंदिर यांविषयी येशूने काय म्हटले याचा पहिल्यांदा विचार करा. तीसपेक्षा अधिक वर्षांपूर्वीच त्याने जगातील या एका मोठ्या शहरावर येणाऱ्या संकटाविषयी भाकीत केले. लूक २१:२०, २१ येथे नमूद केलेल्या त्याच्या स्वतःच्या शब्दांकडे लक्ष द्या: “यरुशलेमेस सैन्यांचा वेढा पडत आहे असे पाहाल तेव्हा ती ओसाड पडण्याची वेळ जवळ आली आहे असे समजा. त्या वेळेस जे यहूदीयात असतील त्यांनी डोंगरात पळून जावे, जे यरुशलमेत असतील त्यांनी बाहेर निघून जावे व जे शिवारांत असतील त्यांनी तिच्या आत येऊ नये.” जेरुसलेमेला जर सैन्यांचा वेढा पडणार होता तर येशूने आज्ञा दिल्याप्रमाणे “तिच्या आत” असणाऱ्यांना “बाहेर” कसे पडता येणार होते? स्पष्टपणे, बाहेर पडण्याची संधी उपलब्ध होणार असल्याचे येशू सूचित करत होता. त्यांना ती संधी मिळाली का?
सा. यु. ६६ मध्ये सेस्टीअस गॅलसच्या नेतृत्वाखाली रोमी सैन्यांनी यहुदी बंडखोर तुकड्यांना जेरुसलेमेपर्यंत मारत आणले आणि त्या शहराच्या आतच त्यांना खिळवून ठेवले. रोमी सैन्यांनी या शहरात प्रवेशही केला आणि ते आता मंदिराच्या भिंतीपर्यंत येऊन पोहंचले होते. पण नंतर गॅलसने आपल्या सैन्याला असे काही करायला लावले जे खरोखरच गोंधळात टाकणारे होते. त्याने त्यांना माघार घेण्याची आज्ञा दिली. पलायन करणाऱ्या रोमी शत्रूंचा या हर्षभरीत झालेल्या यहुदी सैनिकांनी पिच्छा केला आणि त्यांना क्षती देखील पोहंचवली. अशा प्रकारे येशूने भाकीत केलेले संधीचे द्वार त्यांच्यासाठी खुले करण्यात आले होते. खऱ्या ख्रिश्चनांनी त्याच्या इशाऱ्याकडे लक्ष दिले आणि ते जेरुसलेमेच्या बाहेर पडले. हा सुज्ञतेचा निर्णय होता कारण चार वर्षांनंतर रोमी सैन्य जनरल टायटसच्या नेतृत्वाखाली परत आले. यावेळी मात्र जेरुसलेमेच्या बाहेर जाण्याचा मार्ग बंद झाला होता.
रोमी सैन्यांनी जेरुसलेमला पुन्हा वेढा घातला; त्यांनी या शहराभोवती मेढेकोट उभा केला. येशूने जेरुसलेमबद्दल असे भाकीत केले होते: “पुढे तुला असे दिवस येणार आहेत की त्यांत तुझे शत्रु तुझ्याभोवती मेढेकोट उभारतील व तुला वेढितील, तुझा चहूंकडून कोंडमारा करितील.”a (लूक १९:४३) लवकरच जेरुसलेमचा पाडाव झाला; त्या शहराचे वैभवी मंदिर जळून खाक झाले. येशूच्या शब्दांची इत्थंभूत पूर्णता झाली!
तथापि, येशूच्या मनात जेरुसलेमेच्या विनाशापेक्षाही अधिक काही होते. त्याच्या शिष्यांनी त्याला त्याच्या उपस्थितीच्या चिन्हाविषयी देखील विचारले. तेव्हा त्यांना ठाऊक नव्हते, पण या गोष्टीने अशा वेळेला सूचित केले ज्यावेळी तो स्वर्गीय राजा म्हणून अधिकारपदावर येणार होता. त्याने काय भाकीत केले?
शेवटल्या काळातील युद्ध
मत्तय अध्याय २४ आणि २५, मार्क अध्याय १३, आणि लूक अध्याय २१ तुम्ही वाचल्यास तेथे येशू आपल्या काळाविषयी बोलत होता याचा अचूक पुरावा तुम्हाला पाहायला मिळेल. त्याने युद्धाच्या काळाविषयी भाकीत केले—मानवी इतिहासात नेहमीच घडलेल्या ‘युद्धाविषयी आणि युद्धाच्या आवयाविषयीच’ नव्हे, तर “राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल” अशा लढायांविषयी—होय, मोठ्या आंतरराष्ट्रीय युद्धांविषयी त्याने भाकीत केले.—मत्तय २४:६-८.
आपल्या शतकातील युद्ध व्यवस्थेत किती बदल झाला आहे, याचा अंमळ विचार करा. गतकाळात युद्ध म्हणजे दोन राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सैनिकांतील संघर्ष होता, युद्धभूमीवर ते एकमेकांवर तलवारीने हल्ला करत किंवा एकमेकांच्या दिशेने गोळीबारही करत आणि हे अतिशय भयंकर देखील होते. परंतु १९१४ मध्ये महान युद्धाला तोंड फुटले. डोमिनो इफेक्टच्या वणव्यात—पहिल्या जगव्याप्त युद्धात अनेक राष्ट्रांनी भाग घेतला. दूरवरूनच अधिकाधिक लोकांना ठार मारता येईल अशी स्वयंचलित हत्यारे बनविण्यात आली. अतिशय कार्यक्षमता असलेल्या मशिनगन गोळ्यांच्या फैरी झाडण्यात आल्या; मस्टर्ड गॅस जाळण्यात आला; शत्रूच्या क्षेत्रातून तोफा निर्दयीपणे चालविण्यात आल्या त्यावेळी तोफांच्या तोंडातून आग ओकत होती परिणामी हजारो सैनिकांना यातना सहन कराव्या लागल्या; हजारो सैनिक विकलांग झाले हजारो मृत्युमुखी पडले. विमानांचा आणि पाणबुड्यांचा देखील वापर करण्यात आला—पुढे येणाऱ्या स्वरूपाची ती पडछाया होती.
दुसरे महायुद्ध कल्पनेच्याही पलीकडे गेले—खरं तर ते मागील सर्व युद्धांपेक्षा सर्वात भिषण होते; कित्येक कोटी लोक या युद्धात मृत्युमुखी पडले. मोठ्या विमानवाहक नौकांनी पाणतीर सोडून शत्रूच्या भल्यामोठ्या जहाजांना जलसमाधी दिली. ॲटम बॉम्ब टाकण्यात आले आणि प्रत्येक बॉम्बच्या विस्फोटामुळे हजारो लोकांना आपला जीव गमावावा लागला. येशूने भविष्यवाणी केल्याप्रमाणे ‘भयंकर उत्पात’ हे युद्धामुळे जेरीस आलेल्या युगाचे लक्षण खरोखरच पाहण्यास मिळते.—लूक २१:११.
दुसऱ्या महायुद्धानंतर युद्धाला पूर्ण विराम मिळाला आहे का? निश्चितच नाही. काही वेळा एका वर्षाच्या दरम्यान कित्येक युद्धे चालू असतात—या १९९० च्या दशकात देखील—लाखो लोक मृत्युमुखी पडले. युद्धाला जे प्रामुख्याने बळी पडतात त्यांच्यातही बदल झाला आहे. आता, युद्धांमध्ये मुख्यतः सैनिक मृत्युमुखी पडत नाहीत. आज, युद्धाला बळी पडणारे—९० टक्के लोक—सामान्य नागरिक असतात.
चिन्हाची इतर गुणलक्षणे
येशूने उल्लेख केलेल्या चिन्हाचा युद्ध हा केवळ एक पैलू आहे. “दुष्काळ” होतील असा देखील त्याने इशारा दिला. (मत्तय २४:७) सर्व मानवांना पुरेल त्यापेक्षा अधिक प्रमाणात पृथ्वी अन्न उत्पादित करीत आहे, शेतकी विज्ञान आज मानवी इतिहासापेक्षा कितीतरी प्रगत आहे, जगाच्या पाठीवर कोठेही अन्न पाठविण्यासाठी वेगवान आणि कार्यक्षम वाहतूक उपलब्ध आहे तरीही विरोधाभासात्मक गोष्ट म्हणजे दुष्काळ हा आहेच. हे सर्व असताना जगाच्या एकूण लोकसंख्येच्या एक पंचमाश लोक प्रत्येक दिवशी भुकेले राहतात.
“जागोजाग मऱ्या येतील” असे देखील येशूने भाकीत केले होते. (लूक २१:११) आपल्या काळात, वरील विधान विरोधात्मक वाटते—पहिल्यापेक्षा चांगले मेडिकल केअर, नवनवीन तंत्रज्ञान, सामान्य आजार टाळण्यासाठी लशी आणि तरीही प्राणघातक आजारांमध्ये अभूतपूर्व वाढ झाली आहे. पहिल्या महायुद्धानंतर लगेचच स्पॅनिश इनफ्ल्यूएन्झाची साथ आली आणि युद्धात मरण पावलेल्यांपेक्षा अधिक लोक त्यामुळे मरण पावले. हा आजार इतका संसर्गजन्य होता, की केवळ शिंकल्यामुळे न्यूयॉर्कसारख्या शहरांत लोकांना दंड होऊ शकत होता किंवा त्यांना अटक देखील होऊ शकत होती! आज, दर वर्षी कर्करोगाने आणि हृदयरोगाने—वास्तविक मऱ्यांमुळे लाखो लोकांचे जीव जातात. एड्स या रोगावर औषध माहीत नसल्यामुळे देखील लोक मृत्युमुखी पडत आहेत.
येशूने शेवटल्या काळाची चर्चा मुख्यतः व्यापक ऐतिहासिक आणि राजकीय परिस्थितींबद्दल केली होती, तर प्रेषित पौलाने सामाजिक समस्यांवर आणि प्रचलित मनोवृत्तींवर जोर दिला. त्याने थोडक्यात लिहिले: “शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. कारण माणसे स्वार्थी, . . . अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी” होतील.—२ तीमथ्य ३:१-५.
वरील शब्द तुम्हाला तुमच्या परिचयाचे वाटत नाहीत का? कुटुंबाचे विभाजन होणे—हा आजच्या जगातील सामाजिक ऱ्हासाचा एक पैलू विचारात घ्या. घरे विभाजित होणे, विवाह सोबत्याला टाकून बोलणे, मुलांना मारहाण करणे आणि वडीलधाऱ्या पालकांचा अवमान करणे या गोष्टींचे वाढते प्रस्थ—या सर्व गोष्टींवरून हे स्पष्ट होते की लोक “ममताहीन” “क्रूर” आणि “विश्वासघातकी” तसेच “चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी” झाले आहेत! होय, आज आपल्याला अशा प्रकारची लक्षणे सर्वत्र पाहायला मिळतात.
भाकीत केलेली आपली पिढी आहे का?
तुम्ही कदाचित विचाराल, पण, ‘अशा प्रकारच्या गोष्टींमुळे मानव नेहमीच पीडित झालेले नाहीत का? या प्राचीन भविष्यवाण्यांमध्ये भाकीत केलेली पिढी आपली अर्वाचीन पिढी आहे हे आपल्याला कसे कळू शकते?’ येशू आपल्या काळाविषयी बोलत होता, पुराव्याच्या तीन पैलूंचा आपण विचार करू या.
पहिला पैलू म्हणजे, जेरुसलेम आणि तिच्या मंदिराच्या नाशाची पूर्णता अंशिक होती त्यामुळे येशूच्या शब्दांनी निश्चितपणे पुढील काळाकडे निर्देश केला. सुमारे ३० वर्षांनी भयंकर उलथापालथ होऊन जेरुसलेमचा विनाश झाला, येशूने वृद्ध योहानाला दृष्टान्त दिला त्यात त्याने भविष्यवाणी केलेली परिस्थिती दाखवली—युद्ध, दुष्काळ, मरी आणि यामुळे येणारा मृत्यू—भवितव्यात जगाच्या पाठीवर सर्वत्र असणार होता. होय, अशा प्रकारच्या विपत्ती केवळ एकाच ठिकाणी न येता संपूर्ण ‘पृथ्वीवर’ येणार होत्या.—प्रकटीकरण ६:२-८.
दुसरा पैलू म्हणजे, या शतकात येशूच्या चिन्हाची काही गुणलक्षणे मोठ्या प्रमाणात पूर्ण होत आहेत. उदाहरणार्थ, सन १९१४ पासून होत असलेल्या युद्धांपेक्षा अधिक वाईट युद्ध होण्याची सुतराम देखील शक्यता आहे का? यदाकदाचित तिसरे महायुद्ध झालेच आणि त्यात आजच्या सर्व आण्विक शक्तींचा उपयोग केला तर त्याचा परिणाम म्हणजे पृथ्वी जळून खाक होईल—आणि मानवाचे अस्तित्व पूर्णपणे लयास जाईल. याच अनुषंगाने प्रकटीकरण ११:१८ येथे भाकीत करण्यात आले, की राष्ट्रे “क्रोधाविष्ट” झाली आहेत अशा दिवसांमध्ये मानवजात “पृथ्वीची नासाडी” करील. प्रदूषण आणि पर्यावरणाचा ऱ्हास यांमुळे इतिहासात पहिल्यांदाच या ग्रहावर राहणाऱ्यांच्या जिवास धोका निर्माण झाला आहे! म्हणून या गुणलक्षणाची पूर्णता देखील जवळजवळ किंवा पूर्णपणे होत आहे. मानव स्वतःचा आणि या ग्रहाचा जोपर्यंत नाश करीत नाहीत तोपर्यंत युद्धे आणि प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच राहील का? नाही; कारण बायबल खुद्द हे स्पष्टपणे सांगते, की पृथ्वी ही अनंतकाळ राहील आणि धार्मिक जण तिच्यावर वस्ती करतील.—स्तोत्र ३७:२९; मत्तय ५:५.
तिसरा पैलू म्हणजे, आपण सर्व गोष्टींचा एकत्र विचार करतो तेव्हा आपल्याला शेवटल्या काळाची खात्री निश्चितपणे पटते. तीन शुभवर्तमानातील येशूने उल्लेख केलेली तसेच पौलाच्या लिखाणांतील आणि प्रकटीकरणातील गुणलक्षणे आपण एकत्रितपणे विचारात घेतो तेव्हा आपल्याला या चिन्हाची अनेक गुणलक्षणे पाहायला मिळतात. एखादा मनुष्य प्रत्येक गुणलक्षणाच्या बाबतीत कदाचित साशंक असेल आणि असा वाद घालेल, की अशा प्रकारच्या समस्या इतिहासात देखील होत्या, पण आपण त्या सर्वांचा एकत्रित विचार करतो तेव्हा मात्र त्या समस्या आपल्या काळाकडे स्पष्टपणे अंगुली दर्शवितात.
तथापि, या सर्वाचा काय अर्थ होतो? बायबल आपल्या काळाचे वर्णन निराशेचा आणि आशाहिनतेचा काळ असे करते का? निश्चितच नाही!
सुवार्ता
शेवटल्या काळाच्या एका सर्वात उल्लेखनीय चिन्हाचे वैशिष्ट्य मत्तय २४:१४ मध्ये नमूद करण्यात आले आहे: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.” या शतकामध्ये यहोवाच्या साक्षीदारांनी संपूर्ण मानवी इतिहासात हे काम पूर्ण केले आहे. बायबलमधील संदेशाचा अर्थात यहोवा देवाच्या राज्याचा—ते काय आहे, ते कसे आधिपत्य गाजवते आणि ते काय साध्य करील याचा त्यांनी स्वीकार केला आहे—आणि त्यांनी या संदेशाचा संपूर्ण पृथ्वीवर प्रसार देखील केला आहे. त्यांनी या विषयावर ३०० पेक्षा अधिक भाषांमध्ये साहित्य प्रकाशित केले आहे आणि त्यांनी ते साहित्य लोकांच्या घरी, रस्त्यावर किंवा त्यांच्या व्यापाराच्या ठिकाणी म्हणजे पृथ्वीच्या जवळजवळ सर्व प्रदेशांत दिले आहे.
असे करण्याद्वारे ते या भविष्यवाणीची पूर्णता करत आहेत. तसेच ते या आशेचा देखील प्रसार करत आहेत. याकडे लक्ष द्या, की येशूने “सुवार्ता” म्हटले, दुःवार्ता असे त्याने म्हटले नाही. या अंधःकारमय युगात ते कसे शक्य आहे? कारण बायबलचा मुख्य संदेश या जुन्या जगाच्या शेवटच्या काळात वाईट गोष्टी कशा असतील याविषयी नाही. त्याच्या मुख्य संदेशामध्ये देवाच्या राज्याचा समावेश होतो आणि त्या राज्याची अभिवचने शांतिप्रिय मानवाच्या हृदयाला प्रिय वाटतात—मुक्तता.
ही मुक्तता काय आहे आणि ती तुम्ही कशी मिळवू शकता? या विषयावर कृपया पुढील लेख वाचा.
[तळटीपा]
a यावेळी टायटसची बाजू निश्चितपणे उजवी होती. तथापि, महत्त्वांच्या दोन प्रसंगी त्याला जे करायचे होते ते नेमके त्याने केले नाही. शांतपणे शरण येण्यास त्याने सांगितले, पण शहरातील पुढाऱ्यांनी असे करण्यास हेकेखोरपणे आणि गूढार्थाने नकार दिला. अखेरीस शहराच्या भिंतींना भगदाड पाडण्यात आल्यानंतर मंदिराला कोणतीही हानी न पोहंचविण्याची त्याने आज्ञा दिली. तरी सुद्धा मंदिराला पूर्णपणे जाळण्यात आले! जेरुसलेम ओसाड होईल आणि तिच्या मंदिराचा पूर्णपणे विनाश होईल, असे येशूच्या भविष्यवाणीने स्पष्ट केले होते.—मार्क १३:१, २.
[५ पानांवरील संक्षिप्त आशय]
वाईट परिस्थिती का आहे? मानवजात कोठे जात आहे? यांसारख्या भेडसावून सोडणाऱ्या प्रश्नांच्या उत्तरांचा लोक शोध घेत आहेत
[६ पानांवरील संक्षिप्त आशय]
आज, युद्धाला बळी पडणारे ९० टक्के लोक सामान्य नागरिक असतात
[७ पानांवरील चित्र]
जेरुसलेमेच्या विनाशाविषयी येशूच्या भविष्यवाणीची इत्थंभूत पूर्णता झाली