मार्च—जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ
५-११ मार्च
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | मत्तय २०-२१
“ज्या कोणाला तुमच्यामध्ये श्रेष्ठ व्हायचं असेल त्याने तुमचा सेवक झालं पाहिजे”
nwtsty मिडिया
बाजार
कार्य पुस्तिकेत दाखवण्यात आलेला बाजार इतर काही बाजारांसारखाच रस्त्याच्या कडेला भरायचा. तिथे विक्रेते आपला माल रस्त्यावर लावायचे आणि त्यामुळे त्या रस्त्यावर नेहमीच खूप गर्दी असायची. तिथे स्थानिक रहिवासी घरात लागणारं सामान, मातीची भांडी, काचेच्या महागड्या वस्तू आणि फळभाज्यांसारखा ताजा माल विकत घेऊ शकत होते. त्या काळात लोकांच्या घरी फ्रिज नसल्या कारणाने रोज लागणाऱ्या ताज्या वस्तू घेण्यासाठी त्यांना बाजारात यावं लागायचं. इथे दुकानदार बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून आणि लोकांकडून माहिती मिळवायचे, मुलं तिथे खेळायची आणि बेरोजगार लोक काम मिळेपर्यंत तिथे उभे राहायचे. अशा बाजारात येशूने आजाऱ्याला बरं केलं आणि पौलने प्रचार केला. (प्रेका १७:१७) पण गर्विष्ठ शास्त्री व परूशी मात्र बाजारात इतरांनी आपल्याला पाहावं आणि आदराने नमस्कार करावा अशी लोकांकडून अपेक्षा करायचे.
nwtsty अभ्यासासाठी माहिती-मत्त २०:२०, २१
जब्दीच्या मुलांची आई: ही प्रेषित याकोब आणि योहानची आई, सलोमी होती आणि कदाचित ही येशूची मावशी असावी. मार्कच्या अहवालानुसार याकोब आणि योहान येशूकडे विनंती घेऊन आले. मत्तयच्या अहवालात ही विनंती त्यांच्या आईने केली असली, तरी खरंतर ती विनंती त्यांची होती.—मत्त २७:५५, ५६; मार्क १५:४०, ४१; योह १९:२५.
एक तुझ्या उजवीकडे आणि एक डावीकडे: या दोन्ही बाजू आदर आणि अधिकाराला सूचित करतात, पण सर्वात मोठ्या आदराचे स्थान नेहमी उजवीकडे असते.—स्तो ११०:१; प्रेका ७:५५, ५६; रोम ८:३४.
nwtsty अभ्यासासाठी माहिती-मत्त २०:२६, २८
सेवक: किंवा सेवा करणारा. बायबलमध्ये दियाकोनोस हा ग्रीक शब्द नेहमी अशा व्यक्तीला सूचित करण्यासाठी वापरण्यात आला आहे, जी नम्रपणे इतरांसाठी सेवा करणं थांबवत नाही. हा शब्द ख्रिस्तासाठी (रोम १५:८), ख्रिस्ताचे सेवक (१कर ३:५-७; कल १:२३), साहाय्यक सेवक (फिलि १:१; १ती ३:८), घरात काम करणारे सेवक (योह २:५, ९) आणि सरकारी अधिकारी (रोम १३:४) यांच्यासाठी वापरण्यात आला आहे.
आध्यात्मिक रत्नं शोधा
nwtsty अभ्यासासाठी माहिती-मत्त २१:९
आम्ही प्रार्थना करतो, उद्धार होवो: याचा शब्दशः अर्थ “होसान्ना” असा होता. हा ग्रीक शब्द “वाचव, आम्ही प्रार्थना करतो” किंवा “कृपा करून वाचव” या अर्थाच्या हिब्रू शब्दापासून आला आहे. इथे हा शब्द उद्धार किंवा विजय मिळावा म्हणून देवाला जी विनंती केली जायची यासाठी वापरण्यात आला आहे. “कृपा करून आमचा उद्धार होऊ दे” असाही या शब्दाचा अर्थ होतो. कालांतराने या शब्दाचा वापर प्रार्थना आणि स्तुती यांसाठी केला जाऊ लागला. हा इब्री शब्द स्तो ११८:२५ मध्ये सापडतो. ते स्तोत्र सहसा वल्हांडण सणाच्या काळात गायल्या जाणाऱ्या हालेल स्तोत्र याचा भाग होतं. त्यामुळे या प्रसंगी हे शब्द मनात येणं साहजिक होतं. दावीदच्या पुत्राला वाचवण्याच्या या प्रार्थनेचे उत्तर त्याचे पुनरुत्थान करण्याद्वारे यहोवाने दिले. मत्त २१:४२ इथे येशूने स्तो ११८:२२, २३ या वचनाचा संदर्भ देत हे वचन मसीहाला लागू केलं आहे.
दावीदचा पुत्र: हा वाक्यांश येशूच्या वंशावळीची ओळख आणि वचनयुक्त मसीहा म्हणून त्याची जी भूमिका होती तिला दर्शवतो.
सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. १०५ परि. ४-६
एका महत्त्वाच्या दिवसाची सुरवात
परंतु येशूने झाडाला का मारले? “मी तुम्हास खचित सांगतो, तुमच्या ठायी विश्वास असला व तुम्ही संशय धरिला नाही तर अंजिराच्या झाडाला केल्याप्रमाणे तुम्ही कराल,” असे तो म्हणतो. पुढे तो सांगतोः “इतकेच नाही तर, या डोंगरालाही [ज्यावर ते उभे आहेत तो जैतुनाचा डोंगर] ‘तू उपटून समुद्रात टाकला जा’ असे म्हणाल तर तसे होईल. आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल.”
तेव्हा, झाडाला वाळायला लावून, देवावर विश्वास असण्याच्या गरजेबद्दल उदाहरण घालून देऊन येशू आपल्या शिष्यांना धडा देत आहे. तो म्हणतो तसे “तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा म्हणजे ते तुम्हाला मिळेल.” विशेषतः लवकरच येऊ घातलेल्या परीक्षा लक्षात घेता हा धडा त्यांच्यासाठी किती महत्त्वाचा आहे! परंतु झाडाचे वाळणे व विश्वासाचा गुण यांचा आणखी एक संबंध आहे.
या अंजिराच्या झाडाप्रमाणे इस्राएल राष्ट्राचे बाह्य-स्वरूप फसवे आहे. ते राष्ट्र देवाशी कराराने बांधले असले व अनेक जण देवाचे नियम पाळत असल्यासारखे वरून दिसत असले तरी ते अविश्वासू शाबीत झालेले असून त्यात उत्तम कामांच्या फळांचा अभाव आहे. विश्वासात उणे पडल्याने ते देवाच्या पुत्राचा अव्हेर करण्याच्या पंथास आहेत! त्यामुळे उपज न देणाऱ्या त्या झाडाला वाळायला लावून या निष्फळ व अविश्वासू राष्ट्राच्या शेवटल्या दशेचे हुबेहूब चित्र येशूने रंगवले आहे.
१२-१८ मार्च
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | मत्तय २२-२३
“सगळ्यात महत्त्वाच्या दोन आज्ञांचं पालन करा”
nwtsty अभ्यासासाठी माहिती-मत्त २२:३७
मन: लाक्षणिक अर्थाने या शब्दाचा वापर करण्यात येतो तेव्हा तो संपूर्ण आंतरिक व्यक्तीला सूचित करतो. जेव्हा हा शब्द “जीव” आणि “बुद्धी” या दोन्ही शब्दांसोबत वापरला जातो तेव्हा त्याचा खास अर्थ होतो. तो व्यक्तीच्या भावना आणि इच्छा यांना दर्शवतो. इथे वापरण्यात आलेले तीन शब्द (मन, जीव, बुद्धी) एकमेकांपेक्षा वेगळे नाहीत तर एकमेकांशी संबंधित आहेत. येशूने त्यांचा एकत्रितपणे केलेला वापर ही गोष्ट दाखवून देते की आपण पूर्णपणे यहोवावर प्रेम केलं पाहिजे.
जीव: किंवा “संपूर्ण जीवन.”
बुद्धी: म्हणजेच विचार करण्याची क्षमता. देवाला ओळखण्यासाठी आणि त्याच्याबद्दल प्रेम विकसित करण्यासाठी एका व्यक्तीने आपल्या या विचार करण्याच्या क्षमतेचा उपयोग करणं गरजेचं आहे. (योह १७:३; रोम १२:१) अनु ६:५ या मूळ वचनात ‘मन, जीव आणि शक्ती’ हे तीन हिब्रू शब्द वापरण्यात आले आहेत. पण मत्तयच्या अहवालात असं दिसतं की ‘शक्तीऐवजी’ ‘बुद्धी’ असा अर्थ असणारा ग्रीक शब्द वापरण्यात आला आहे. हा दुसरा शब्द वापरण्यामागे अनेक कारणं असू शकतात. पहिलं हे, की जरी प्राचीन हिब्रू भाषेत ‘बुद्धीसाठी’ योग्य शब्द नसला तरी ‘मन’ यासाठी असलेल्या हिब्रू शब्दात त्याचा अर्थ समाविष्ट होतो. लाक्षणिक अर्थाने हा शब्द एका व्यक्तीच्या संपूर्ण आंतरिक व्यक्तिमत्त्वाला सूचित करतो. यात तिचे विचार, भावना, स्वभाव आणि प्रेरणा यांचा समावेश होतो. (अनु २९:४; स्तो २६:२; ६४:६ या वचनात मन यासाठी असलेली अभ्यासासाठी माहिती पाहा.) या कारणामुळे जिथे हिब्रू शब्द ‘मन’ वापरण्यात आला आहे तिथे ग्रीक सेप्टुअजिंटमध्ये ‘बुद्धी’ या समान अर्थाचा ग्रीक शब्द अनेकदा वापरला आहे. (उत्प ८:२१; १७:१७; नीत २:१०; यश १४:१३) मत्तयने ‘शक्ती’ या शब्दाऐवजी ‘बुद्धीसाठी’ असलेला ग्रीक शब्द का वापरला याचे आणखी एक कारण आहे. ते म्हणजे अनु ६:५ या मूळ वचनात ‘शक्ती’ यामध्ये शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा समावेश होऊ शकतो. कारण काहीही असो, हिब्रू आणि ग्रीक शब्दांतल्या एकमेकांसोबत असलेल्या या संबंधामुळे आपल्याला हे समजायला मदत होते की अनुवादाच्या पुस्तकाचे संदर्भ घेताना शुभवर्तमानाच्या लेखकांनी सारखेच शब्द का वापरले नाहीत.
nwtsty अभ्यासासाठी माहिती-मत्त २२:३९
दुसरी: येशूने परूशी लोकांना दिलेलं थेट उत्तर मत्त २२:३७ वचनात पाहायला मिळतं. पण येशू उत्तर देऊन थांबला नाही तर त्याने आणखी जास्त माहिती दिली आणि दुसऱ्या आज्ञेबद्दल सांगितलं. (लेवी १९:१८) यावरून त्याला स्पष्ट करायचं होतं की या दोन आज्ञा एकमेकांशी संबंधित आहेत आणि संपूर्ण नियमशास्त्र व संदेष्ट्यांची सगळी लिखाणे याच दोन आज्ञांवर आधारित आहेत.—मत्त २२:४०.
शेजारी: शेजारी (शब्दशः “जवळचा”) या शब्दासाठी असलेल्या ग्रीक शब्दाचा अर्थ फक्त शेजारी राहणाऱ्यांना सूचित करत नाही तर आपण ज्या कोणाशी बोलतो त्यांनाही सूचित करतो.—लूक १०:२९-३७; रोम १३:८-१०.
nwtsty अभ्यासासाठी माहिती-मत्त २२:४०
नियमशास्त्र आणि संदेष्टे: “नियमशास्त्र” हा शब्द बायबल मधल्या उत्पत्ति ते अनुवाद या पुस्तकांना सूचित करतो. संदेष्टे हा शब्द हिब्रू शास्त्रवचनांतल्या भविष्यवाणीच्या पुस्तकांना सूचित करतो. या दोन वाक्यांशाचा सोबत केलेला वापर संपूर्ण हिब्रू शास्त्रवचनाला सूचित करतो.—मत्त ७:१२; २२:४०; लूक १६:१६.
आधारित: या शब्दासाठी असलेल्या ग्रीक क्रियापदाचा शब्दशः अर्थ “टांगलेलं” असा होतो. यावरून येशू हे सांगू इच्छित होता की फक्त नियमशास्त्रातल्या दहा आज्ञा नाही, तर संपूर्ण हिब्रू शास्त्रवचन प्रेमावर आधारित आहे.—रोम १३:९.
आध्यात्मिक रत्नं शोधा
nwtsty अभ्यासासाठी माहिती-मत्त २२:२१
कैसराचं आहे ते कैसराला: येशूने रोमी सम्राटाला जे उत्तर दिलं ते आपल्याला मार्क १२:१७ आणि लूक २०:२५ या समान अहवालात वाचायला मिळतं. “कैसराचं आहे ते” यात सरकार पुरवत असलेल्या सोयींबद्दल आपण त्यांना दिलेल्या पैशाचा समावेश होतो. तसंच सरकारी अधिकाऱ्यांना दाखवत असलेला सन्मान आणि मर्यादित अधीनता यांचाही यात समावेश होतो.—रोम १३:१-७.
देवाचं आहे ते देवाला: यात पूर्ण हृदयाने केलेल्या देवाच्या उपासनेचा समावेश होतो. तसंच, पूर्ण जिवाने प्रेम करणं आणि एकनिष्ठ राहून आज्ञेचं पूर्णपणे पालन करणं यांचाही समावेश होतो.—मत्त ४:१०; २२:३७, ३८; प्रेका ५:२९; रोम १४:८.
nwtsty अभ्यासासाठी माहिती-मत्त २३:२४
तुम्ही माशी गाळून काढता पण उंट गिळून टाकता: माशी आणि उंट हे इस्राएली लोकांना माहीत असलेल्या सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या अशुद्ध प्राण्यांपैकी होते. (लेवी ११:४, २१-२४) येशूने बोलताना अतिशयोक्त्ती आणि काही प्रमाणात विरोधाभास यांचा वापर केला. तो म्हणाला की माशी पडल्यामुळे पेय शास्त्रानुसार दूषित होऊ नये म्हणून धार्मिक पुढारी ते पेय गाळून घ्यायचे. पण नियमशास्त्रातल्या महत्त्वाच्या गोष्टींकडे मात्र ते दुर्लक्ष करत होते. हे जणू उंटाला गिळून टाकल्यासारखं होतं.
१९-२५ मार्च
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | मत्तय २४
“शेवटल्या दिवसांत आध्यात्मिक रीत्या जागृत राहा”
इन्साइट-२ पृ. २७९ परि. ६
प्रेम
एखाद्याचं प्रेम थंड होऊ शकतं. पुढे होणाऱ्या गोष्टींबद्दल बोलताना येशूने त्याच्या शिष्यांना सांगितलं, की देवावर विश्वास असल्याचा दावा करणाऱ्या बऱ्याच जणांचं प्रेम (अगापे) थंड होईल. (मत्त २४:३, १२) प्रेषित पौलने कठीण काळाच्या चिन्हांबद्दल सांगताना म्हटलं, की माणसं “पैशावर प्रेम करणारे” होतील. (२ती ३:१, २) यावरून स्पष्ट होतं, की एक व्यक्ती चांगल्या तत्त्वांपासून दूर जाऊ शकते आणि तिचं पूर्वीचं प्रेम थंड होऊ शकतं. यामुळे आपल्याला देवावर असलेलं प्रेम सतत दाखवण्यासाठी आणि वाढवत राहण्यासाठी त्याच्या वचनावर मनन करणं आणि त्याच्या तत्त्वांनुसार जीवनात बदल करणं गरजेचं आहे.—इफि ४:१५, २२-२४.
टेहळणी बुरूज९९ ११/१५ पृ.१९ परि. ५
देवाप्रती तुम्ही तुमचे पूर्ण कर्तव्यकर्म पार पाडत आहात का?
५ येशू ख्रिस्ताने आपल्या या कठीण काळाविषयी असे म्हटले: “नोहाच्या दिवसांत होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. तेव्हा जसे जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसांत नोहा तारवात गेला त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते, आणि जलप्रलय येऊन सर्वांस वाहवून नेईपर्यंत त्यांस समजले नाही; तसेच मनुष्याच्या पुत्राचेही येणे होईल.” (मत्तय २४:३७-३९) खाण्यापिण्यात माफकपणा असला तर त्यात वाईट असे काही नाही आणि विवाहाची व्यवस्था तर स्वतः देवाने केली आहे. (उत्पत्ति २:२०-२४) पण जीवनाच्या या सामान्य गोष्टींचीच आपल्याला चिंता लागली आहे, हे आपल्या लक्षात आल्यावर त्याविषयी आपण प्रार्थना का करू नये? राज्य आस्थेला प्रथम स्थानी ठेवण्यास, योग्य ते करण्यास आणि देवाप्रती आपले कर्तव्यकर्म पूर्ण करण्यास यहोवा आपल्याला मदत करू शकतो.—मत्तय ६:३३; रोमकर १२:१२; २ करिंथकर १३:७.
टेहळणी बुरूज०५ १०/१ पृ. २१ परि. २-४
“जागृत राहा”—न्यायनिवाडा करावयाची घटिका आली आहे!
२ येशूने अनेकदा, चोर कशाप्रकारे कार्य करतो त्याचे उदाहरण दिले. (लूक १०:३०; योहान १०:१०) अंतकाळी व आपण न्यायनिवाडा करण्यासाठी येऊ त्याआधी ज्या घटना घडतील त्यांविषयी ताकीद देताना येशूने असे म्हटले: “जागृत राहा; कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभु येईल हे तुम्हास ठाऊक नाही. आणखी हे समजा की, कोणत्या प्रहरी चोर येईल हे घरधन्याला कळले असते तर तो जागृत राहिला असता, आणि त्याने आपले घर फोडू दिले नसते.” (मत्तय २४:४२, ४३) तर येशूने आपल्या आगमनाची तुलना, चोर कशाप्रकारे अगदी अनपेक्षित येतो त्याच्याशी केली.
३ ही तुलना उचित होती कारण येशूच्या येण्याची नेमकी तारीख त्याच्या अनुयायांना कळणार नव्हती. याआधी, याच भविष्यवाणीत येशूने म्हटले: “त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही, स्वर्गातील दिव्यदूतास नाही, पुत्रालाहि नाही.” (मत्तय २४:३६) म्हणूनच येशूने म्हटले: “तुम्हीहि सिद्ध असा.” (मत्तय २४:४४) यहोवाचा न्यायदंड बजावणाऱ्याच्या रूपात येशू केव्हाही येवो, पण ज्यांनी त्याच्या इशाऱ्याकडे लक्ष दिले ते आपली चालचलणूक चांगली ठेवण्याद्वारे त्याच्या येण्याकरता तयार असणार होते.
४ काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात: येशूने दिलेला इशारा केवळ जगातील लोकांकरता होता का, की खऱ्या ख्रिश्चनांनीही ‘जागृत राहिले’ पाहिजे? ‘जागृत राहणे’ इतके निकडीचे का आहे आणि आपण हे कसे करू शकतो?
आध्यात्मिक रत्नं शोधा
nwtsty अभ्यासासाठी माहिती-मत्त २४:८
संकटं: या ग्रीक शब्दाचा शब्दशः अर्थ ‘बाळाच्या जन्माच्या वेळी स्त्रीला होणाऱ्या तीव्र वेदना असा होतो. या ठिकाणी हा शब्द दुःख, कष्ट आणि समस्या या गोष्टींना सूचित करण्यासाठी वापरण्यात आला आहे. याचा असाही अर्थ होऊ शकतो की ज्या प्रकारे प्रसूतीच्या आधी स्त्रीला सतत वेदना होतात, त्या आणखी तीव्र बनतात आणि जास्त काळासाठी राहतात, त्याच प्रकारे मत्त २४:२१ मध्ये सांगितलेलं मोठं संकट येण्याआधी या समस्यांचा काळ, त्यांची तीव्रता आणि प्रमाण वाढेल.
nwtsty अभ्यासासाठी माहिती-मत्त २४:२०
हिवाळा: या ऋतूमध्ये जोरदार पावसामुळे, पूर आल्यामुळे आणि थंड वातावरणामुळे प्रवास करणं कठीण व्हायचं. तसंच, अशा ऋतूत अन्न आणि राहण्यासाठी जागा शोधणं कठीण जायचं.—एज १०:९, १३.
शब्बाथाच्या दिवशी: यहूदीया सारख्या क्षेत्रात शब्बाथाच्या नियमांच्या काही बंधनामुळे एका व्यक्तीला लांबचा प्रवास करणं आणि जड वस्तू घेऊन जाणंही कठीण जायचं. तसंच शब्बाथाच्या दिवशी शहराचे दरवाजे बंद असायचे.—प्रेका १:१२ आणि अभ्यास मार्गदर्शिका याचा भाग १६ पाहा.
२६ मार्च–१ एप्रिल
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | मत्तय २५
“जागृत राहा”
आध्यात्मिक रत्नं शोधा
टेहळणी बुरूज१५ ३/१५ पृ. २७ परि. ७
ख्रिस्ताच्या बांधवांशी एकनिष्ठ राहा
७ शेरडांच्या आणि मेंढरांच्या दाखल्याचा अर्थ आता आपल्याला अगदी स्पष्टपणे समजला आहे. आपल्याला माहीत आहे की “मनुष्याचा पुत्र” किंवा “राजा” हा येशू आहे. ज्यांना पवित्र आत्म्याद्वारे अभिषिक्त करण्यात आलं आहे ते राजाचे ‘बंधू’ आहेत आणि ते येशूसोबत स्वर्गात राज्य करतील. (रोम. ८:१६, १७) ‘शेरडं आणि मेंढरं’ सर्व राष्ट्रांतील लोकांना सूचित करतात. लवकरच येणाऱ्या मोठ्या संकटाच्या शेवटास त्यांचा न्याय केला जाईल. तसंच, अजून पृथ्वीवर जिवंत असलेल्या अभिषिक्तांशी त्यांनी कशा प्रकारे व्यवहार केला याच्या आधारावर येशू त्यांचा न्याय करेल हेदेखील आपल्याला समजलं आहे. या दाखल्याचा आणि मत्तय २४ आणि २५ मधील इतर दाखल्यांचा अर्थ समजण्यासाठी आपल्याला मदत केल्याबद्दल आपण यहोवाचे किती आभारी आहोत!
टेहळणी बुरूज०९ १०/१५ पृ. १६-१७ परि. १६-१८
“तुम्ही माझे मित्र आहा”
१६ तुम्ही देवाच्या राज्यात पृथ्वीवर जगण्याची आशा बाळगत असाल, तर ख्रिस्ताच्या बांधवांप्रती तुम्ही आपली मैत्री कशा प्रकारे व्यक्त करू शकता? याचे तीन मार्ग आपण पाहू या. पहिला मार्ग म्हणजे, प्रचार कार्यात मनापासून भाग घेणे. ख्रिस्ताने त्याच्या बांधवांना जगभरात सुवार्तेचा प्रचार करण्याची आज्ञा दिली होती. (मत्त. २४:१४) पण, ख्रिस्ताच्या बांधवांपैकी आज पृथ्वीवर राहिलेल्यांना, त्यांचे सोबती असलेल्या दुसऱ्या मेंढरांच्या मदतीशिवाय ही जबाबदारी पार पाडणे अतिशय कठीण गेले असते. त्याअर्थी, जेव्हा जेव्हा दुसऱ्या मेंढरांतील सदस्य प्रचार कार्यात भाग घेतात, तेव्हा तेव्हा ते ख्रिस्ताच्या बांधवांना त्यांची ही महत्त्वाची कामगिरी पूर्ण करण्यास मदत करतात. दुसऱ्या मेंढरांच्या या मैत्रीची येशूप्रमाणेच विश्वासू व बुद्धिमान दास वर्गही मनापासून कदर करतो.
१७ दुसऱ्या मेंढरांतील सदस्य ख्रिस्ताच्या बांधवांना ज्या आणखी एक मार्गाने मदत करतात तो म्हणजे प्रचार कार्याला आर्थिकदृष्ट्या साहाय्य करणे. येशूने आपल्या अनुयायांना “अनीतिकारक धनाने” आपल्याकरता मित्र जोडण्याचे प्रोत्साहन दिले. (लूक १६:९) याचा अर्थ आपण येशूची किंवा यहोवाची मैत्री विकत घेऊ शकतो असे नाही. उलट, राज्याशी संबंधित कार्यांकरता आपल्या धनसंपत्तीचा उपयोग करण्याद्वारे आपण आपली मैत्री आणि प्रेम केवळ शब्दांनीच नव्हे, तर “कृतीने व सत्याने” व्यक्त करतो. (१ योहा. ३:१६-१८) उदाहरणार्थ, जेव्हा आपण प्रचार कार्यात भाग घेतो, आपल्या उपासना स्थळांचे बांधकाम व देखभाल करण्याकरता आणि जगभरात केल्या जाणाऱ्या प्रचार कार्याकरता देणग्या देतो, तेव्हा आपण आर्थिक साहाय्य करण्याद्वारे ख्रिस्ताच्या बांधवांप्रती मैत्री व प्रेम व्यक्त करतो. आणि आपण आनंदाने दिलेल्या या दानाची यहोवा आणि येशू मनापासून कदर करतात, मग आपण दिलेली रक्कम छोटी असो वा मोठी.—२ करिंथ. ९:७.
१८ आपण ख्रिस्ताचे मित्र आहोत हे दाखवण्याचा तिसरा मार्ग म्हणजे मंडळीतील वडिलांकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनाचे पालन करणे. मंडळीतील वडिलांना येशूच्या मार्गदर्शनाखाली पवित्र आत्म्याद्वारे नियुक्त केले जाते. (इफिस. ५:२३) प्रेषित पौलाने असे लिहिले: “आपल्या अधिकाऱ्यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा.” (इब्री १३:१७) कधीकधी, आपल्याला मंडळीतील वडिलांकडून मिळणारा बायबलवर आधारित सल्ला स्वीकारणे कठीण वाटेल. त्यांच्यात असलेल्या उणिवांमुळे, दोषांमुळे कदाचित त्यांच्याकडून मिळणाऱ्या सल्ल्याकडे आपण चुकीच्या दृष्टिकोनातून पाहण्याची शक्यता आहे. पण, मंडळीचे मस्तक असलेला ख्रिस्त या अपरिपूर्ण मनुष्यांचा उपयोग करतो. त्यामुळे, त्यांच्या अधिकाराप्रती आपण कशी प्रतिक्रिया दाखवतो याचा ख्रिस्तासोबतच्या आपल्या मैत्रीशी थेट संबंध आहे. जेव्हा आपण मंडळीतील वडिलांच्या उणिवांकडे दुर्लक्ष करून आनंदाने त्यांच्या मार्गदर्शनाचे पालन करतो, तेव्हा ख्रिस्तावर आपले प्रेम असल्याचे आपण दाखवतो.