वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ५/१ पृ. १४-२०
  • “वाचणाऱ्‍याने समजून घ्यावे”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “वाचणाऱ्‍याने समजून घ्यावे”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आधुनिक दिवसातील “अमंगळ पदार्थ”
  • भवितव्यातील हल्ला
  • ‘पळून जाणे’—कसे?
  • “मोठे संकट” येण्याआधी सुरक्षित स्थानाकडे पलायन
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • “अमंगळ पदार्थ” शांती आणण्यात असमर्थ ठरतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • “या गोष्टी केव्हा होतील, . . . हे आम्हास सांगा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ५/१ पृ. १४-२०

“वाचणाऱ्‍याने समजून घ्यावे”

‘ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्रस्थानात उभा असलेला जेव्हा तुम्ही पाहाल, तेव्हा जे यहूदीयात असतील त्यांनी डोंगराकडे पळून जावे.’—मत्तय २४:१५, १६, पं.र.भा.

१. लूक १९:४३, ४४ मध्ये येशूने दिलेल्या इशाऱ्‍याचा परिणाम काय झाला?

आपल्याला येणाऱ्‍या अरिष्टाविषयी सावधानतेचा इशारा देण्यात आल्यास आपल्याला धोका टाळता येईल. (नीतिसूत्रे २२:३) तेव्हा, सा.यु. ६६ मध्ये रोमनांनी चढवलेल्या हल्ल्यानंतर जेरुसलेममधील ख्रिश्‍चनांच्या परिस्थितीची कल्पना करा. शहराला घेरले जाऊन नाश केले जाईल अशी येशूने ताकीद दिली होती. (लूक १९:४३, ४४) पुष्कळ यहुद्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. पण, त्याच्या शिष्यांनी त्याच्या इशाऱ्‍याकडे कान दिला. यामुळे सा.यु. ७० मध्ये आलेल्या संकटातून ते वाचले.

२, ३. मत्तय २४:१५-२१ मधील येशूच्या भविष्यवाणीत आपण रस का घातला पाहिजे?

२ आज आपल्यासाठी अर्थ असलेल्या एका भविष्यवाणीत येशूने एक संयुक्‍त चिन्ह दिले; त्यात युद्धे, अन्‍नटंचाई, भूकंप, रोगराई आणि देवाच्या राज्याचा प्रचार करणाऱ्‍या ख्रिश्‍चनांचा छळ यांचा समावेश होता. (मत्तय २४:४-१४; लूक २१:१०-१९) अंत जवळ आहे हे माहीत व्हावे म्हणून येशूने आपल्या शिष्यांना एक संकेतही दिला होता—‘ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्रस्थानात उभा राहील.’ (मत्तय २४:१५) या अर्थपूर्ण शब्दांचा आपल्या जीवनावर आता आणि भवितव्यात कशाप्रकारे परिणाम होऊ शकतो त्याचे आपण पुनः-परीक्षण करू या.

३ चिन्ह दिल्यानंतर येशू म्हणाला: “ज्या ओसाडीच्या अमंगळ पदार्थाविषयी दानीएल भविष्यवाद्याने सांगितले तो पवित्रस्थानात उभा असलेला जेव्हा तुम्ही पाहाल, (वाचणाऱ्‍याने समजून घ्यावे,) तेव्हा जे यहूदीयात असतील त्यांनी डोंगराकडे पळून जावे; जो घराच्या धाब्यावर असेल त्याने आपल्या घरात असलेल्या वस्तु बाहेर काढून घेण्याकरिता खाली उतरू नये; आणि जो शेतात असेल त्याने आपले वस्त्र घेण्याकरिता माघारे येऊ नये. पण त्या दिवसांमध्ये ज्या गरोदर व ज्या अंगावर पाजणाऱ्‍या असतील त्यांना हायहाय. आणि तुमचे पळून जाणे हिवाळ्यांत किंवा शब्बाथ दिवशी होऊ नये म्हणून प्रार्थना करा. कारण जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत झाले नाही व पुढे होणारहि नाही, अशा प्रकारचे मोठे संकट तेव्हा होईल.”—मत्तय २४:१५-२१, पं.र.भा.

४. मत्तय २४:१५ ची पहिल्या शतकात पूर्णता झाली होती हे कशावरून सूचित होते?

४ मार्क आणि लूक यांचे अहवाल जादा माहिती देतात. मत्तयाने “पवित्रस्थानात उभा” असे म्हटले आहे तर मार्क १३:१४ मध्ये “जेथे नसावा तेथे उभा” असे म्हटले आहे. लूक २१:२० येशूच्या पुढील शब्दांबद्दल म्हणते: “सैन्ये यरुशलेमेला वेढा घालीत आहेत असे जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा तिची ओसाडी जवळ आली आहे हे जाणा.” यावरून आपल्याला हे पाहायला मदत मिळते, की पहिल्या पूर्णतेत जेरुसलेम आणि त्यातील मंदिर—जे यहोवाला नव्हे तर यहुद्यांना पवित्र वाटणारे मंदिर—यावर रोमनांनी हल्ला केला; हे सा.यु. ६६ मध्ये सुरू झाले. सा.यु. ७० मध्ये रोमनांनी जेव्हा शहराचा आणि मंदिराचाही नाश केला तेव्हा सर्वकाही पूर्णपणे उजाड झाले. त्या काळी तो ‘अमंगळ पदार्थ’ काय होता? तो ‘पवित्रस्थानात कसा उभा’ होता? या प्रश्‍नांची उत्तरे आपल्याला आधुनिक काळातील पूर्णतेचे स्पष्टीकरण प्राप्त करण्यास मदत करतील.

५, ६. (अ) दानीएल ९ व्या अध्यायाच्या वाचकांनी समजबुद्धीचा उपयोग करण्याची आवश्‍यकता का आहे? (ब) ‘अमंगळ पदार्थाविषयी’ येशूने केलेल्या भविष्यवाणीची पूर्णता कशी झाली?

५ येशूने वाचकांना समजबुद्धीचा उपयोग करण्यास आर्जवले. कोणते वाचक? बहुधा, दानीएलाच्या ९ व्या अध्यायाचे वाचक. तेथे आपल्याला एक भविष्यवाणी वाचायला मिळते जी मशीहा केव्हा येणार आहे व साडेतीन वर्षांनंतर त्याचा “वध होईल,” असे भाकीत करण्यात आल्याचे सूचित करते. भविष्यवाणी म्हणते: “उध्वस्त करणारा अमंगळांच्या पंखांवर आरूढ होऊन येईल व ठरलेल्या समाप्तीपर्यंत उध्वस्त करणाऱ्‍यावर कोपाचा वर्षाव होईल.” (तिरपे वळण आमचे.)—दानीएल ९:२६, २७; तसेच दानीएल ११:३१; १२:११.

६ सुमारे २०० वर्षांपूर्वी अंतुखिया चौथा याने मंदिर भ्रष्ट केले त्याला हे सूचित होते असे यहुद्यांना वाटले. परंतु येशूने दुसरेच काहीतरी दाखवले; त्याने समजबुद्धीचा उपयोग करण्यास आर्जवले कारण अद्याप, ‘अमंगळ पदार्थ’ प्रकट होऊन ‘पवित्रस्थानात’ उभे राहणे बाकी होते. सा.यु. ६६ मध्ये निरनिराळे ध्वज घेऊन येणाऱ्‍या रोमी सैन्याला येशू सूचित करत होता हे स्पष्ट आहे. पूर्वीपासून वापरात असलेले अशाप्रकारचे ध्वज वास्तविकतेत मूर्ती होत्या व यहुद्यांना त्यांचा वीट होता.a पण मग, ते ‘पवित्रस्थानात केव्हा उभे’ राहणार होते? रोमी सैन्याने आपल्या ध्वजांसह जेरुसलेमवर आणि यहुदी ज्याला पवित्र समजत होते त्या मंदिरावर हल्ला केला तेव्हा ते घडले. रोमनांनी तर मंदिराच्या भागातील भिंत देखील फोडण्यास सुरवात केली. खरेच, फार पूर्वीपासून अमंगळ असलेले आता पवित्रस्थानात उभे होते!—यशया ५२:१; मत्तय ४:५; २७:५३; प्रेषितांची कृत्ये ६:१३.

आधुनिक दिवसातील “अमंगळ पदार्थ”

७. येशूची कोणती भविष्यवाणी आज आपल्या दिवसांमध्ये पूर्ण होत आहे?

७ पहिल्या महायुद्धापासून आपण मत्तयाच्या २४ व्या अध्यायातील येशूने दिलेल्या चिन्हाची मोठी पूर्णता पाहिली आहे. तरी त्याच्या शब्दांची आठवण करा: ‘ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्रस्थानात उभा असलेला जेव्हा तुम्ही पाहाल, तेव्हा जे यहूदीयात असतील त्यांनी डोंगराकडे पळून जावे.’ (मत्तय २४:१५, १६) भविष्यवाणीच्या या पैलूची पूर्णता आपल्या काळातही असायला हवी.

८. अनेक वर्षांपासून यहोवाच्या साक्षीदारांनी आधुनिक काळांतील ‘अमंगळ पदार्थाची’ ओळख कशी दिली?

८ ही भविष्यवाणी पूर्ण होईल असा यहोवाच्या सेवकांना असलेला भरवसा प्रदर्शित करत, जानेवारी १, १९२१ च्या टेहळणी बुरूजने (इंग्रजी) मध्यपूर्वेतील वाढीसंबंधाने त्यावर जोर दिला. नंतर, डिसेंबर १५, १९२९, पृष्ठ ३७४ वर टेहळणी बुरूजने (इंग्रजी) ठामपणे असे म्हटले: “देव आणि ख्रिस्त यांच्यापासून लोकांना वळवणे हीच राष्ट्र संघाची प्रवृत्ती असल्यामुळे तो ओसाडीचा पदार्थ असून सैतानाचे उत्पादन व देवाच्या दृष्टीत किळसवाणा आहे.” म्हणून, १९१९ मध्ये ‘अमंगळ पदार्थ’ प्रकट झाला. कालांतराने, राष्ट्र संघाच्या जागी संयुक्‍त राष्ट्रे आले. यहोवाच्या साक्षीदारांनी, या शांततेच्या मानवी संघटनांना देवाच्या दृष्टीत घृणित असे फार पूर्वीपासूनच उघड केले आहे.

९, १०. आधी मोठ्या संकटाविषयी आपली जी समज होती त्यानुसार ‘अमंगळ पदार्थ’ केव्हा पवित्रस्थानात उभा राहील याविषयी आपला दृष्टिकोन काय होता?

९ मागच्या लेखात मत्तयाच्या २४ आणि २५ अध्यायांच्या बऱ्‍याचशा भागांची स्पष्ट समज सारांशात देण्यात आली होती. ‘पवित्रस्थानात उभ्या असलेल्या अमंगळ पदार्थाविषयीचे’ स्पष्टीकरण देण्याची काही गरज आहे का? पुराव्यानुसार होय. येशूच्या भविष्यवाणीत, ‘पवित्रस्थानात उभे राहणे’ आणि भाकीत केलेल्या ‘संकटाचा’ उद्रेक या दोन घटनांचा संबंध अगदी जवळचा आहे. म्हणूनच, ‘अमंगळ पदार्थ’ खूप काळापासून अस्तित्वात असला तरी, ‘पवित्रस्थानात त्याचे उभे राहणे’ आणि मोठे संकट यांतील संबंधाचा आपल्या विचारसरणीवर परिणाम झाला पाहिजे. ते कसे?

१० देवाच्या लोकांना एकेकाळी ही समज होती की संकटाचा पहिला टप्पा १९१४ मध्ये सुरू झाला व शेवटला टप्पा हर्मगिदोनाच्या लढाईत होईल. (प्रकटीकरण १६:१४, १६; पडताळा टेहळणी बुरूज (इंग्रजी) एप्रिल १, १९३९, पृष्ठ ११०.) यावरून आपल्याला समजेल की, नंतरच्या दिवसातील ‘अमंगळ पदार्थ’ पहिल्या महायुद्धानंतर लगेचच पवित्रस्थानात उभा राहिला असावा, असा विचार का केला जात असे.

११, १२. सन १९६९ मध्ये मोठ्या संकटाविषयीचा कोणता सुधारित दृष्टिकोन सादर करण्यात आला?

११ परंतु, नंतरच्या वर्षांत आपला दृष्टिकोन बदलला. गुरुवारी जुलै १०, १९६९ च्या “पृथ्वीवर शांती” नामक न्यूयॉर्क शहरातील आंतरराष्ट्रीय संमेलनात, वॉच टावर संस्थेचे तेव्हाचे उपाध्यक्ष एफ. डब्ल्यू. फ्रान्झ यांनी अंगावर शहारे आणणारे एक भाषण दिले. येशूच्या भविष्यवाणीविषयी असलेल्या आधीच्या समजेची उजळणी करताना बंधू फ्रान्झ म्हणाले: “असे स्पष्टीकरण देण्यात आले होते की, ‘मोठे संकट’ सा.यु. १९१४ मध्ये सुरू झाले व त्यावेळी त्याला पूर्ण होऊ देण्यात आले नाही तर देवाने नोव्हेंबर १९१८ मध्ये पहिले महायुद्ध थांबवले. तेव्हापासून देव, हर्मगिदोनाच्या युद्धात ‘मोठ्या संकटाच्या’ शेवटल्या भागाची पुन्हा सुरवात करू देण्याआधी आपल्या निवडलेल्या ख्रिश्‍चनांच्या अभिषिक्‍त शेषांच्या कार्यासाठी मध्यंतराचा काळ देत होता.”

१२ मग एक महत्त्वपूर्ण सुधारित स्पष्टीकरण देण्यात आले: “पहिल्या शतकातील घटनांशी जुळण्याकरता, . . . प्रतिनमुनेदार ‘मोठे संकट’ सा.यु. १९१४ मध्ये सुरू झाले नाही. तर, १९१४-१९१८ मध्ये जेरूसलेमच्या आधुनिक प्रतिनमुनेदारावर फक्‍त ‘पिडांचा आरंभ’ झाला. . . . आजपर्यंत कधी झाले नाही असे ‘मोठे संकट’ अजून पुढे आहे कारण त्याचा अर्थ, खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्याचा (ख्रिस्ती धर्मजगताचा देखील) नाश आणि त्यानंतर हर्मगिदोनात ‘सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवसाची लढाई’ होईल.” या सर्वांचा अर्थ असा, की संपूर्ण मोठे संकटच भवितव्यात आहे.

१३. भवितव्यात ‘अमंगळ पदार्थ पवित्रस्थानात उभा राहील’ असे म्हणणे तर्कशुद्ध का वाटते?

१३ ‘अमंगळ पदार्थ’ पवित्रस्थानात केव्हा उभा राहील हे समजून घेण्याशी याचा थेट संबंध आहे. पहिल्या शतकात काय झाले त्याची आठवण करा. रोमनांनी सा.यु. ६६ मध्ये जेरुसलेमवर हल्ला चढवला पण त्यांनी अचानक माघार घेतली; यामुळे ख्रिस्ती ‘मनुष्य’ वाचू शकला. (मत्तय २४:२२) त्यानुसार, ‘मोठ्या संकटाची’ सुरवात लवकर होईल अशी आपण अपेक्षा करतो, पण देवाच्या निवडलेल्यांसाठी ते कमी करण्यात येईल. या मुख्य मुद्द्‌याची नोंद घ्या: प्राचीन नमुन्यात, ‘पवित्रस्थानात उभा असलेला अमंगळ पदार्थ’ याचा संबंध सा.यु. ६६ मध्ये जनरल गॅलसच्या नेतृत्त्वाखाली रोमनांनी केलेल्या हल्ल्याशी होता. त्या हल्ल्याचे आधुनिक दिवसांतील समांतर—मोठ्या संकटाचा उद्रेक—अजून पुढे आहे. तेव्हा, १९१९ पासून अस्तित्वात असलेल्या ‘ओसाडीच्या अमंगळ पदार्थाचे’ पवित्रस्थानात उभे राहणे हे पुराव्यानुसार आणखी पुढे आहे.b हे कसे काय घडेल? याचा आपल्यावर परिणाम कसा होऊ शकतो?

भवितव्यातील हल्ला

१४, १५. ज्यांचा शेवट हर्मगिदोनात होतो त्या घटना समजण्यासाठी प्रकटीकरणाचा १७ वा अध्याय आपली मदत कशी करतो?

१४ प्रकटीकरणाचे पुस्तक भवितव्यातील खोट्या धर्मावरील नाशकारक हल्ल्याचे वर्णन देते. १७ व्या अध्यायात ‘कलावंतिणीची आई असलेल्या मोठ्या बाबेलविरुद्ध’—अर्थात खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्याविरुद्ध देवाच्या न्यायदंडाविषयी सांगण्यात आले आहे. ख्रिस्ती धर्मजगत याचा केंद्र भाग आहे व देवासोबत करारबद्ध नातेसंबंध असल्याचा ते दावा करते. (पडताळा यिर्मया ७:४.) खोटे धर्म आणि ख्रिस्ती धर्मजगत यांचे फार आधीपासून ‘पृथ्वीवरील राजांबरोबर’ अवैध संबंध आहेत; पण याचा अंत होईल आणि त्याचबरोबर ते धर्मही ओसाड होतील. (प्रकटीकरण १७:२, ५) कोणाच्या हातून हे सर्व होणार आहे?

१५ प्रकटीकरणात एका ‘किरमिजी रंगाच्या श्‍वापदाबद्दल’ सांगितले आहे जे काही काळासाठी अस्तित्वात असते, गायब होते आणि पुन्हा येते. (प्रकटीकरण १७:३, ८) या श्‍वापदाला जगीक शासकांचा आधार आहे. भविष्यवाणीत दिलेला तपशील आपल्याला हे ओळखण्यास मदत करतो की, हे लाक्षणिक श्‍वापद एक शांती संघटना आहे जी १९१९ साली राष्ट्र संघ (‘अमंगळ पदार्थ’) या नावाने अस्तित्वात आली आणि सध्या संयुक्‍त राष्ट्रे या नावाने ओळखली जाते. प्रकटीकरण १७:१६, १७ दाखवते की, खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्याला ओसाड करण्याची कल्पना देव या ‘श्‍वापदातील’ विशिष्ट प्रमुख मानवी शासकांच्या मनात अजून घालणार आहे. तो हल्ला म्हणजे ‘मोठ्या संकटाचा’ उद्रेक झाल्याचे चिन्ह होय.

१६. धर्मासंबंधी कोणत्या उल्लेखनीय घटना घडत आहेत?

१६ ‘मोठ्या संकटाची’ सुरवात भवितव्यात होणार असल्यामुळे, ‘पवित्रस्थानात उभे राहणे’ आणखी पुढे आहे का? पुराव्यावरून असेच आहे. ‘अमंगळ पदार्थ’ या शतकाच्या सुरवातीला प्रकट झाले व अनेक दशकांपासून अस्तित्वात असले तरी ते नजीकच्या भवितव्यात एका विशिष्ट मार्गाने ‘पवित्रस्थानात’ उभे राहील. ‘पवित्रस्थानात उभे राहणे’ कसे होईल ते पहिल्या शतकातील ख्रिस्ताच्या अनुयायांनी जसे आतुरतेने पाहिले असेल तसेच आजचे ख्रिस्ती देखील पाहतात. परंतु, सर्व तपशील जाणून घेण्याकरता आपल्याला खऱ्‍या पूर्णतेसाठी थांबून राहावे लागेल हे कबूल आहे. तरीही, उल्लेखण्याजोगी एक गोष्ट म्हणजे काही देशांत तर आजही धर्माबद्दल नावड असल्याचे स्पष्ट दिसते. खऱ्‍या विश्‍वासापासून बहकलेल्या पूर्वीच्या ख्रिश्‍चनांसह काही राजकीय घटक, एकंदरीत, धर्माविरुद्ध आणि खासकरून खऱ्‍या ख्रिश्‍चनांविरुद्ध वैरभाव चेतवीत आहेत. (स्तोत्र ९४:२०, २१; १ तीमथ्य ६:२०, २१) परिणामतः, राजकीय सत्तेचे ‘कोकऱ्‍याबरोबरचे लढणे’ अजूनही चालू आहे व प्रकटीकरण १७:१४ सूचित करते त्याप्रमाणे ही लढाई तीव्र होईल. त्यांना, देवाच्या कोकऱ्‍यावर अर्थात उंचावलेल्या, वैभवी येशू ख्रिस्तावर अक्षरशः हल्ला करता येत नसला तरी, ते देवाच्या खऱ्‍या उपासकांवर आणि खासकरून त्याच्या ‘पवित्र जनांवर’ आपला राग ओकतील. (दानीएल ७:२५; पडताळा रोमकर ८:२७; कलस्सैकर १:२; प्रकटीकरण १२:१७.) कोकरा आणि त्याच्यासोबत असलेल्यांचा विजय होईल याची आपल्याला देवाकडून हमी मिळते.—प्रकटीकरण १९:११-२१.

१७. ‘अमंगळ पदार्थ’ पवित्रस्थानात कसा उभा राहील याबाबत आपण अवाजवी न बनता काय म्हणू शकतो?

१७ खोट्या धर्माचा नाश होणार हे आपल्याला माहीत आहे. मोठी बाबेल ‘पवित्र जनांच्या रक्‍ताने मस्त झाली आहे.’ ती स्वतःला राणी समजते पण तिचा नाश मात्र निश्‍चित आहे. तिने पृथ्वीच्या राजांवर केलेला अशुद्ध प्रभाव अचानकपणे बदलून त्यांच्यातील संबंधाचे रूपांतर हिंसक द्वेषात होईल; हा द्वेष ‘दहा शिंगे आणि श्‍वापद’ यांच्याकडून येणार आहे. (प्रकटीकरण १७:६, १६; १८:७, ८) ‘किरमिजी रंगाचे श्‍वापद’ धार्मिक वेश्‍येवर हल्ला करील तेव्हा ‘अमंगळ पदार्थ’ नुकसान करण्याच्या हेतूने ख्रिस्ती धर्मजगताच्या तथाकथित पवित्रस्थानात उभे राहील.c अशाप्रकारे, स्वतःला पवित्र समजणाऱ्‍या विश्‍वासहीन ख्रिस्ती धर्मजगताचा नाश सुरू होईल.

‘पळून जाणे’—कसे?

१८, १९. “डोंगराकडे पळून” जाण्याचा अर्थ धर्म बदलणे असा होत नाही हे दाखवण्यासाठी कोणती कारणे दिली आहेत?

१८ ‘पवित्रस्थानात अमंगळ पदार्थ उभे राहील’ हे भाकीत केल्यानंतर येशूने समजबुद्धी असलेल्यांना कार्यहालचाल करण्याचा इशारा दिला. ‘पवित्रस्थानात अमंगळ पदार्थ उभा राहील’ तेव्हा म्हणजे इतक्या उशिरा, लोक खोट्या धर्मातून पळ काढून खरी उपासना स्वीकारतील असे येशूला म्हणायचे होते का? मुळीच नाही. पहिल्या पूर्णतेचा विचार करा. येशू म्हणाला: “जे यहूदीयात असतील त्यांनी डोंगरात पळून जावे. जो धाब्यावर असेल त्याने खाली उतरून अथवा आपल्या घरातून काही घेण्याकरिता आत जाऊ नये; आणि जो शेतात असेल त्याने आपले वस्त्र घेण्याकरिता परत येऊ नये. त्या दिवसात ज्या स्त्रिया गरोदर किंवा अंगावर पाजणाऱ्‍या असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार! तरी हे हिवाळ्यात होऊ नये म्हणून प्रार्थना करा.” (तिरपे वळण आमचे.)—मार्क १३:१४-१८.

१९ जेरुसलेमेत असलेल्यांनीच फक्‍त पळ काढावा असे येशू म्हणाला नव्हता कारण त्यांनी यहुदी उपासनेच्या केंद्रस्थानातून निघणे आवश्‍यक होते असे त्याला म्हणायचे नव्हते; किंवा त्याच्या इशाऱ्‍यात धर्म बदलण्याबाबत—खोट्या धर्मातून पळ काढून खरा धर्म स्वीकारण्याबाबत उल्लेख नव्हता. एका धर्मातून निघून दुसऱ्‍या धर्मात जाण्याबाबत येशूच्या शिष्यांना ताकीद देण्याची काहीही आवश्‍यकता नव्हती कारण ते आधीच खरे ख्रिस्ती बनले होते. तसेच सा.यु. ६६ मधील हल्ल्यामुळे, जेरुसलेम व संपूर्ण यहुदीयातील यहुदी धर्माचे आचरण करणारे आपला धर्म सोडून ख्रिस्ती धर्म स्वीकारायला प्रवृत्त झाले नाहीत. प्राध्यापक हाइनरीक ग्रेट्‌स म्हणतात, की पळून जाणाऱ्‍या रोमनांना पिटाळून लावणारे पुन्हा शहरात आले: “विजयाची युद्ध गीते गात झीलॉट पुन्हा जेरुसलेममध्ये (ऑक्टोबर ८ रोजी) आले; आपल्याला सुटका आणि स्वातंत्र्य मिळणार अशी त्यांना आशा असल्यामुळे त्यांना खूप आनंद झाला होता. . . . त्यांच्या वाडवडिलांना देवाने करुणामयरीत्या मदत केली होती तसेच त्याने यांनाही मदत केली नव्हती का? पुढे काय होणार आहे याची झीलॉटांना यत्किंचितही भीती नव्हती.”

२०. डोंगराकडे पळून जाण्याविषयी येशूने दिलेल्या इशाऱ्‍याला आरंभीच्या शिष्यांनी कशी प्रतिक्रिया दाखवली?

२० निवडलेल्यांच्या तुलनात्मकरीत्या अल्प संख्येच्या लोकांनी येशूच्या सल्ल्यानुसार कार्य कसे केले? यहुदीया सोडून जाण्याद्वारे व यार्देनेच्या पलिकडे डोंगरांत पळून जाण्याद्वारे त्यांनी दाखवून दिले, की ते यहुदी व्यवस्थेचे मग ते राजकीय असो अथवा धार्मिक असो, कोणत्याही प्रकारे भाग नव्हते. त्यांनी आपली शेते, सामानसुमानांसह आपली घरे सोडून दिली. यहोवाचे संरक्षण व पाठिंबा याची खात्री बाळगून त्यांनी, महत्त्वपूर्ण भासत असलेल्या सर्व गोष्टींऐवजी यहोवाच्या उपासनेला प्रथम स्थान दिले.—मार्क १०:२९, ३०; लूक ९:५७-६२.

२१. ‘अमंगळ पदार्थ’ हल्ला करील तेव्हा कशाची अपेक्षा करण्याची आपल्याला गरज नाही?

२१ आता मोठ्या पूर्णतेचा विचार करा. आपण अनेक दशकांपासून लोकांना, खोट्या धर्मांतून निघून खरी उपासना करण्यास आर्जवत आहोत. (प्रकटीकरण १८:४, ५) लाखोंनी तसे केले आहे. ‘मोठ्या संकटाचा’ उद्रेक झाल्यावर लोकांच्या समूहाचा समूह शुद्ध उपासनेकडे वळेल असे येशूच्या भविष्यवाणीत दर्शवलेले नाही; कारण, सा.यु. ६६ मध्ये यहुद्यांचे मोठ्या प्रमाणावर मतांतर झाले नव्हते. पण, खरे ख्रिश्‍चन येशूचा इशारा लागू करून पळ काढण्यास प्रवृत्त होतील.

२२. डोंगरात पळून जाण्याविषयी येशूच्या सल्ल्याचे पालन करण्यामध्ये काय गोवलेले असेल?

२२ मोठ्या संकटाविषयीची सविस्तर माहिती आपल्याकडे आता असू शकत नाही, तरी आपण तर्कशुद्धपणे असा निष्कर्ष काढू शकतो की, येशूने ज्या पलायनाविषयी सांगितले ते आपल्याबाबतीत भौगोलिक असणार नाही. देवाचे लोक संपूर्ण विश्‍वात, अगदी पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यात आहेत. पण आपण ही पक्की खात्री बाळगू शकतो, की आपल्याला पळ काढावा लागेल तेव्हा ख्रिश्‍चनांना स्वतःला खोट्या धार्मिक संघटनांपासून स्पष्ट दिसेल असे वेगळे राहावे लागेल. ही गोष्टही महत्त्वाची आहे, की येशूने वस्त्र वा इतर वस्तू घेण्याकरता पुन्हा घरात न जाण्याविषयी ताकीद दिली होती. (मत्तय २४:१७, १८) तेव्हा, भौतिक गोष्टींविषयी आपला दृष्टिकोन कसा आहे, त्या गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत की देवाच्या बाजूला असलेल्यांना मिळणारे तारण जास्त महत्त्वाचे आहे याविषयी आपल्या सर्वांच्या परीक्षा घेतल्या जातील. होय, आपल्याला पळून जावे लागेल तेव्हा कष्ट आणि नागवणूक यांचा सामना करावा लागेल. यहुदीयातून यार्देनेपलिकडील पेरिआला पळून जाणाऱ्‍या पहिल्या शतकातील आपल्या प्रतिरूपांप्रमाणे आपल्यालाही काहीही करण्यासाठी तयार राहावे लागेल.

२३, २४. (अ) आपल्याला सुरक्षितता केवळ कोठे मिळू शकेल? (ब) ‘पवित्रस्थानात उभ्या असलेल्या अमंगळ पदार्थाविषयी’ येशूने दिलेल्या इशाऱ्‍याचा आपल्यावर कोणता परिणाम झाला पाहिजे?

२३ यहोवा आणि त्याची डोंगरासमान संघटना आपला आश्रय असेल, याची आपण नेहमी खात्री केली पाहिजे. (२ शमुवेल २२:२, ३; स्तोत्र १८:२; दानीएल २:३५, ४४) तेथेच आपल्याला संरक्षण मिळणार आहे! मोठ्या बाबेलचा नाश झाल्यानंतर अल्पावधीसाठी अस्तित्वात राहणाऱ्‍या मानवी संघटना व संस्था, अर्थात ‘गुहांत’ पळून जाणाऱ्‍या व ‘डोंगरातील खडकात’ आश्रय घेणाऱ्‍या अनेक लोकांचे आपण अनुकरण करणार नाही. (प्रकटीकरण ६:१५; १८:९-११) सा.यु. ६६ मध्ये जसे गरोदर स्त्रियांना यहुदियातून पळून जाताना किंवा ज्यांना थंड, पावसाळी वातावरणात पळावे लागले त्यांना जसे कठीण गेले असेल त्याप्रमाणे आताही कठीण परिस्थिती येऊ शकेल, हे खरे आहे. पण, देव सर्वांना वाचवेल याची आपण खात्री बाळगू शकतो. तेव्हा, यहोवा आणि आता राज्याचा राजा म्हणून शासन करत असलेला त्याचा पुत्र यांच्यावरील आपला भरवसा आपण आताच आणखी पक्का करू या.

२४ जे घडणार आहे त्याबाबतीत आपल्याला घाबरण्याची काही आवश्‍यकता नाही. आपल्या शिष्यांनी घाबरावे अशी येशूची तेव्हा इच्छा नव्हती आणि आजही किंवा येणाऱ्‍या दिवसांमध्ये आपण घाबरावे ही त्याची इच्छा नाही. त्याने आपल्याला जागृत केले आहे जेणेकरून आपण आपली अंतःकरणे व मने तयार करू शकतो. कारण, खोट्या धर्मावर आणि बाकीच्या दुष्ट व्यवस्थीकरणावर नाश येईल तेव्हा आज्ञाधारक ख्रिश्‍चनांना शिक्षा दिली जाणार नाही. ते समजून घेतील आणि ‘पवित्रस्थानात उभ्या असलेल्या अमंगळ पदार्थाविषयीच्या’ इशाऱ्‍याकडे ते कान देतील. त्यांच्या अढळ विश्‍वासाच्या आधारे ते निर्णायक कृती करतील. “जो शेवटपर्यंत टिकाव धरून राहील तोच तारला जाईल,” हे येशूने दिलेले अभिवचन आपण केव्हाही विसरता कामा नये.—मार्क १३:१३.

[तळटीपा]

a “रोमी मंदिरांत रोमी ध्वजांचे पूज्य भावनेने जतन करण्यात येत असे; आणि इतर राष्ट्रांवरील त्यांच्या श्रेष्ठतेनुसार हे लोक आपल्या ध्वजांना पूज्य मानत असत. . . . [सैनिकांना तर ती] पृथ्वीवरील सर्वात पवित्र गोष्ट होती. रोमी सैनिक आपल्या ध्वजाच्या नावाने शपथ घेई.”—द एन्सायक्लोपिडिआ ब्रिटानिका, ११ वी आवृत्ती.

b सा.यु. ६६-७० मधील येशूच्या शब्दांची पूर्णता, मोठ्या संकटात त्यांची कशी पूर्णता होईल ते समजण्यास आपली मदत करू शकत असली तरी, दोन्ही पूर्णता अगदी समांतर असू शकत नाहीत कारण त्या वेगवेगळ्या पार्श्‍वभूमीत पूर्ण होतात.

c टेहळणी बुरूज (इंग्रजी) डिसेंबर १५, १९७५, पृष्ठे ७४१-४ पाहा.

तुम्हाला आठवते का?

◻ ‘ओसाडीचा अमंगळ पदार्थ’ पहिल्या शतकात कसा प्रकट झाला?

◻ आधुनिक दिवसांतील ‘अमंगळ पदार्थ’ पवित्रस्थानात भविष्यामध्ये उभा राहील असा विचार करणे तर्कशुद्ध का आहे?

◻ प्रकटीकरणात ‘अमंगळ पदार्थाच्या’ कोणत्या हल्ल्याविषयी भाकीत करण्यात आले आहे?

◻ आपल्याला पुढे कदाचित कोणत्या प्रकारचा ‘पळ’ काढावा लागणार आहे?

[१६ पानांवरील चित्र]

मोठ्या बाबेलला ‘कलावंतिणीची आई’ असे म्हटले आहे

[१७ पानांवरील चित्र]

येशूने उल्लेखलेला ‘अमंगळ पदार्थ’ हाच प्रकटीकरण अध्याय १७ मधील किरमिजी रंगाचे श्‍वापद आहे

[१८ पानांवरील चित्र]

किरमिजी रंगाचे श्‍वापद धर्मावर घातक हल्ला करण्यात पुढाकार घेईल

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा