“असे होणे अवश्य आहे”
“येशूने त्यांस उत्तर दिले, . . . असे होणे अवश्य आहे, परंतु तेवढ्यात शेवट होत नाही.”—मत्तय २४:४-६.
१. कोणत्या विषयात आपण रस घेतला पाहिजे?
तुम्हाला तुमचे जीवन आणि भवितव्य यात नक्कीच रस असेल. तेव्हा, १८७७ मध्ये सी. टी. रस्सल यांचे लक्ष आकर्षित करणाऱ्या विषयातही तुम्हाला रस वाटला पाहिजे. कालांतराने, वॉच टावर सोसायटीचे संस्थापक बनलेल्या रस्सल यांनी आपल्या प्रभूच्या पुनरागमनाचा हेतू व पद्धत (इंग्रजी) नामक एक पुस्तिका लिहिली. या ६४ पानी पुस्तिकेत, येशूच्या पुनरागमनाविषयी, किंवा भवितव्यातील येण्याविषयी लिहिले आहे. (योहान १४:३) जैतुनाच्या डोंगरावर एकदा प्रेषितांनी येशूला त्याच्या परतण्याविषयी विचारले: “ह्या गोष्टी केव्हा होतील, आणि आपल्या येण्याचे व ह्या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय?”—मत्तय २४:३.
२. येशूने जे भाकीत केले होते त्याविषयी इतके विरोधात्मक दृष्टिकोन का आहेत?
२ तुम्हाला येशूचे उत्तर माहीत आहे का व तुम्हाला ते समजले का? ते तिन्ही शुभवर्तमानांत आहे. प्राध्यापक डी. ए. कारसन म्हणतात: “मत्तय २४, आणि त्याच्या मार्क १३ व लूक २१ मधील समांतर अहवालांव्यतिरिक्त बायबलच्या काही मोजक्याच अध्यायांवर भाषांतरकारांचे दुमत आहे.” हे प्राध्यापक पुढे स्वतःचे विचार मांडतात, जे विरोधात्मक मानवी दृष्टिकोनांतील आणखी एक मत आहे. गेल्या शतकाच्या सुमारास, अनेक लोकांच्या अशा दृष्टिकोनांतून त्यांच्या विश्वासाचा अभाव दिसून आला. असे दृष्टिकोन सादर करणाऱ्यांचे म्हणणे होते, की आपण शुभवर्तमानांत जे वाचतो ते येशूने कधी म्हटलेच नव्हते; अथवा त्याने बोललेल्या गोष्टीत नंतर फेरफार करण्यात आला; किंवा त्याने केलेली भाकिते खोटी ठरली—हे दृष्टिकोन बायबल टीकाकारांच्या विचाराने प्रभावित झालेले होते. एका भाष्यकाराने तर मार्कच्या शुभवर्तमानाकडे ‘महायान अर्थात बौद्ध तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिले!’
३. यहोवाचे साक्षीदार येशूच्या भविष्यवाणीकडे कसे पाहतात?
३ पण, यहोवाचे साक्षीदार बायबलची आणि येशूने आपल्या मृत्यूच्या तीन दिवसांआधी जैतुनांच्या डोंगरावर आपल्या चार शिष्यांना जे काही सांगितले त्याची सत्यता व विश्वसनीयता स्वीकारतात. येशूने तेथे जी भविष्यवाणी केली होती तिची स्पष्ट समज, सी. टी. रस्सल यांच्या दिवसांपासूनच देवाच्या लोकांना प्रगतीशीलपणे प्राप्त झाली आहे. गेल्या काही वर्षांत, टेहळणी बुरूजने या भविष्यवाणीविषयी त्यांचा दृष्टिकोन आणखी स्पष्ट केला आहे. तुम्ही ती माहिती प्राप्त करून तिचा तुमच्या जीवनावर कसा प्रभाव होतो ते पाहिले आहे का?a आपण तिची उजळणी करू या.
भवितव्यातील दुःखद पूर्णता
४. येशूच्या प्रेषितांनी त्याला भवितव्याबद्दल का विचारले असावे?
४ येशू, मशीहा आहे हे प्रेषितांना ठाऊक होते. म्हणून, त्यांनी त्याच्या तोंडून, त्याचा मृत्यू, त्याचे पुनरुत्थान आणि त्याचे पुनरागमन यांबद्दलचे बोलणे ऐकले तेव्हा कदाचित त्यांच्या मनात असा विचार आला असावा की, ‘येशूचा जर मृत्यू झाला व तो आपल्याला सोडून गेलाच तर, मशीहाकडून ज्या अद्भुत गोष्टींची अपेक्षा आहे त्या तो कसे काय पूर्ण करील?’ शिवाय, येशू जेरुसलेम आणि त्यातील मंदिराच्या नाशाविषयीही बोलला होता. तेव्हा प्रेषितांनी विचार केला असावा, की ‘हे केव्हा आणि कसे घडेल?’ हे समजून घेताना प्रेषितांनी विचारले: “ह्या गोष्टी कधी घडतील? आणि ह्या सर्व गोष्टी पूर्ण होण्याच्या सुमारास आल्या म्हणजे काय चिन्ह होईल?”—मार्क १३:४; मत्तय १६:२१, २७, २८; २३:३७–२४:२.
५. येशूने जे म्हटले होते त्याची पूर्णता पहिल्या शतकात कशी झाली?
५ युद्धे, दुष्काळ, महामाऱ्या, भूकंप, ख्रिश्चनांचा द्वेष व छळ होईल, खोटे मशीहा उठतील व मोठ्या प्रमाणावर राज्याच्या सुवार्तेचा प्रचार होईल, असे येशूने भाकीत केले होते. त्याच्यानंतर अंत येणार होता. (मत्तय २४:४-१४; मार्क १३:५-१३; लूक २१:८-१९) सा.यु. ३३ च्या सुरवातीला येशूने हे भाकीत केले होते. पुढील दशकांत, त्याचे जागृत शिष्य हे ओळखू शकले, की भाकीत केलेल्या गोष्टी खरे तर लक्षणियरित्या पूर्ण होत होत्या. होय, इतिहास शाबीत करतो, की त्या काळी त्या चिन्हाची पूर्णता झाली; सा.यु. ६६-७० मध्ये रोमनांद्वारे यहुदी व्यवस्थीकरणाचा शेवट झाला. ते कसे पूर्ण झाले?
६. सा.यु. ६६ मध्ये रोमनांमध्ये आणि यहुद्यांमध्ये काय निर्माण झाले?
६ सा.यु. ६६ च्या तळपत्या उन्हाळ्यात यहुदी झीलॉटांनी जेरुसलेममधील मंदिराजवळच्या एका किल्ल्यात रोमी रक्षकांवर हल्ला चढवला आणि त्यामुळे जेरुसलेममध्ये इतरत्र हिंसेची सुरवात झाली. हिस्ट्री ऑफ द ज्यूझ नामक आपल्या पुस्तकात प्राध्यापक हाईनरीक ग्रेट्स म्हणतात: “सिरियाचा राज्यपाल या नात्याने रोमी सैन्याचा मान राखण्याची जबाबदारी सेस्टियस गॅलस याच्यावर असल्यामुळे, . . . त्याच्या आजूबाजूला होत असलेली बंडाळी निमूटपणे पाहत उभे राहणे त्याला सहन झाले नाही. त्याने आपल्या सैन्याला एकत्र बोलावले तसेच शेजारच्या राजपुत्रांनी स्वेच्छेने आपले सैन्य पाठवले.” तीस हजारांच्या या सैन्याने जेरुसलेमला घेरले. थोडीशी लढाई झाल्यावर यहुद्यांनी माघार घेतली व मंदिराजवळच्या भिंतीमागे ते लपले. “लागोपाठ पाच दिवस रोमनांनी भिंतींवर हल्ला चढवला, पण यहुद्यांच्या क्षेपणास्रांपुढे त्यांना नेहमी माघार घ्यावी लागली. परंतु, सहाव्या दिवशी मंदिरासमोरच्या उत्तरेकडील भिंतीचा काही भाग फोडून काढण्यात त्यांना यश मिळाले.”
७. येशूच्या शिष्यांचा बहुतेक यहुद्यांपासून वेगळा दृष्टिकोन का होता?
७ अशावेळी यहुदी लोक किती गोंधळून गेले असावेत याचा विचार करा; कारण त्यांना पूर्वीपासून असेच वाटत होते, की देव त्यांचे आणि त्यांच्या पवित्र शहराचे संरक्षण करील! येशूच्या शिष्यांना मात्र पूर्वताकीद देण्यात आली होती, की जेरुसलेमचा नाश हा अटळ आहे. येशूने भाकीत केले होते: “पुढे तुला असे दिवस येणार आहेत की त्यांत तुझे शत्रु तुझ्याभोवती मेढेकोट उभारतील व तुला वेढितील, तुझा चहूकडून कोंडमारा करितील, तुला व तुझ्या मुलाबाळांना धुळीस मिळवितील, आणि तुझ्यामध्ये चिऱ्यावर चिरा राहू देणार नाहीत.” (लूक १९:४३, ४४) म्हणजे, सा.यु. ६६ मध्ये जेरुसलेममधील ख्रिश्चनांचा नाश होणार होता का?
८. येशूने कोणत्या दुःखद गोष्टीबद्दल भाकीत केले व ज्यांच्यासाठी दिवस कमी केले जातील ते ‘निवडलेले’ कोण होते?
८ “देवाने निर्माण केलेल्या सृष्टीच्या प्रारंभापासून आजपर्यंत झालेल्या नाहीत व पुढेहि होणार नाहीत इतक्या हालअपेष्टांचे ते दिवस होतील. आणि ते दिवस प्रभूने कमी केले नसते तर कोणाहि माणसाचा निभाव लागला नसता; परंतु ज्यांना त्याने निवडले आहे त्या निवडलेल्यांसाठी त्याने ते दिवस कमी केले आहेत,” असे येशूने जैतुनाच्या डोंगरावर प्रेषितांना उत्तर देताना भाकीत केले. (मार्क १३:१९, २०; मत्तय २४:२१, २२) याचा अर्थ, दिवस कमी केले जाणार होते व ‘निवडलेल्यांना’ वाचवले जाणार होते. हे निवडलेले कोण होते? यहोवाची उपासना करत असल्याचा दावा करणारे परंतु त्याच्या पुत्राला नाकारणारे बंडखोर यहुदी तर नक्कीच नाहीत. (योहान १९:१-७; प्रेषितांची कृत्ये २:२२, २३, ३६) मशीहा व तारणकर्ता म्हणून येशूवर विश्वास ठेवणारे यहुदी व गैर-यहुदी हे खरे निवडलेले लोक होते. देवाने यांना निवडले होते आणि सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टला त्याने त्यांचे एक नवीन आध्यात्मिक राष्ट्र, ‘देवाचे इस्राएल’ तयार केले.—गलतीकर ६:१६; लूक १८:७; प्रेषितांची कृत्ये १०:३४-४५; १ पेत्र २:९.
९, १०. रोमी हल्ल्याचे दिवस कशाप्रकारे “कमी” करण्यात आले व याचा परिणाम काय झाला?
९ जेरुसलेममध्ये दिवस ‘कमी करून’ अभिषिक्त निवडलेल्यांना वाचवण्यात आले का? प्राध्यापक ग्रेट्स म्हणतात: “त्या शूरवीरांविरुद्ध झगडत राहण्यात व त्या ऋतूत एक मोठी मोहीम सुरू करण्यात शहाणपण नव्हते कारण हिवाळ्यातला पाऊस लवकरच सुरू होणार होता . . . ज्यामुळे सैन्याला कदाचित आवश्यक साधनसामग्री मिळाली नसती असे [सेस्टियस गॅलसला] वाटले. कदाचित यामुळेच त्याने माघार घेण्यात शहाणपण आहे असा विचार केला.” सेस्टियस गॅलसचा काहीही विचार असो, पण रोमी सैन्याने माघार घेतली आणि त्यांचा पिच्छा करणाऱ्या यहुद्यांनी त्यांचे खूप नुकसान केले.
१० रोमनांनी घेतलेल्या त्या आश्चर्यकारक माघारीमुळे ‘माणसांना’ अर्थात जेरुसलेममध्ये धोक्यात असलेल्या येशूच्या शिष्यांना वाचण्याची संधी मिळाली. ही संधी मिळताच ख्रिश्चनांनी तेथून पळ काढला असे इतिहासाचा अहवाल दाखवून देतो. भवितव्य जाणण्याच्या व आपल्या उपासकांचा निश्चित बचाव करण्याच्या देवाच्या क्षमतेचे किती हे अद्भुत प्रदर्शन! पण, जेरुसलेम व यहुदीयांतच राहिलेल्या अविश्वासू यहुद्यांचे काय झाले?
समकालीन पाहू शकणार होते
११. येशू ‘या पिढीविषयी’ काय म्हणाला?
११ अनेक यहुद्यांना वाटले, की मंदिरावर केंद्रित असलेल्या त्यांच्या उपासनेच्या व्यवस्थेचा कधीच अंत होणार नाही. पण येशू म्हणाला: “अंजिराच्या झाडापासून . . . शिका: आता जेव्हा त्याची डहाळी कोवळी झाली आहे, व तिला आपली पाने फुटू लागतात, तेव्हा उन्हाळा जवळ आहे, हे तुम्ही ओळखता. तसेच, तुम्हीही, या सर्व गोष्टी जेव्हा तुम्ही पाहाल, तेव्हा तो जवळ आहे, दाराशी आहे, असे समजा. मी तुम्हांस खचित सांगतो की ह्या सर्व गोष्टी पूर्ण होतील तोपर्यंत ही पिढी नाहीशी होणारच नाही; आकाश व पृथ्वी ही नाहीतशी होतील, परंतु माझी वचने नाहीतशी होणारच नाहीत.” (तिरपे वळण आमचे.)—मत्तय २४:३२-३५, पं.र.भा.
१२, १३. ‘या पिढीविषयी’ असा येशूने केलेला उल्लेख शिष्यांना कसा समजला असावा?
१२ सा.यु. ६६ पर्यंतच्या वर्षांमध्ये ख्रिश्चनांनी संयुक्त चिन्हाच्या सुरवातीचे अनेक भाग, जसे की युद्धे, दुष्काळ आणि राज्याच्या सुवार्तेचा मोठ्या प्रमाणावर प्रचार यांसारखी चिन्हे पूर्ण होताना पाहिली असतील. (प्रेषितांची कृत्ये ११:२८; कलस्सैकर १:२३) परंतु, मग अंत केव्हा येणार होता? “ही पिढी [ग्रीक, यिनेया] नाहीशी होणारच नाही” असे जेव्हा येशूने म्हटले तेव्हा त्याचा काय अर्थ होता? येशू नेहमी, त्याच्या काळातील विरोध करणाऱ्या यहुद्यांना आणि धार्मिक नेत्यांना ‘दुष्ट, व्यभिचारी पिढी’ असे संबोधत असे. (मत्तय ११:१६; १२:३९, ४५; १६:४; १७:१७; २३:३६) यास्तव, जैतुनांच्या डोंगरावर तो पुन्हा जेव्हा ‘या पिढीविषयी’ बोलला तेव्हा, ती पिढी म्हणजे इतिहासातील संपूर्ण यहुदी वंश किंवा “निवडलेला वंश” असलेले त्याचे अनुयायी, असे त्याला निश्चित म्हणायचे नव्हते. (१ पेत्र २:९) शिवाय, “ही पिढी” म्हणजे एक कालावधी असेही येशू म्हणत नव्हता.
१३ तर, येशूच्या मनात, त्याने दिलेल्या चिन्हाच्या पूर्णतेचा अनुभव घेणारे विरोधक हे यहुदी होते. लूक २१:३२ मधील ‘या पिढीच्या’ संदर्भाबद्दल प्राध्यापक जोएल बी. ग्रीन म्हणतात: “तिसऱ्या शुभवर्तमानात, ‘ही पिढी’ (आणि संबंधित वाक्यांश) नेहमी, देवाच्या उद्देशांना विरोध करणाऱ्या लोकांच्या गटाला सूचित करते. . . . ईश्वरी उद्देशाकडे हट्टीपणे पाठ वळवणाऱ्यांना [ती सूचित करते].”b
१४. त्या ‘पिढीने’ काय अनुभवले पण ख्रिश्चनांना तसा अनुभव का आला नाही?
१४ चिन्ह पूर्ण होताना पाहणाऱ्या यहुदी विरोधकांची दुष्ट पिढी देखील यहुदी व्यवस्थीकरणाचा नाश अनुभवणार होती. (मत्तय २४:६, १३, १४) आणि त्यांनी ती अनुभवली देखील! सा.यु. ७० मध्ये, वेस्पासियन सम्राटाचा पुत्र टायटस याच्या नेतृत्त्वाखाली रोमी सैन्य परत आले. पुन्हा एकदा शहरात अडकून बसलेल्या यहुद्यांचे हाल, विश्वास ठेवता येणार नाही इतके वाईट झाले.c आपल्या डोळ्यांनी सर्व गोष्टी पाहिलेला फ्लेवियस जोसिफस सांगतो, की रोमनांनी शहराचा नाश करेपर्यंत सुमारे ११,००,००० यहुदी मरण पावले होते व सुमारे १,००,००० यहुद्यांना बंदिवासात नेण्यात आले होते; त्यांच्यातील बहुतेकांना उपासमारीमुळे किंवा रोमी आखाड्यांत क्रूर मरण येणार होते. खरेच, सा.यु. ६६-७० मधील हे संकट इतके प्रचंड होते, की जेरुसलेमने व यहुदी व्यवस्थीकरणाने पूर्वी कधी असे संकट अनुभवले नव्हते किंवा पुन्हा कधी अनुभवणारही नव्हते. पण, येशूच्या भविष्यसूचक इशाऱ्याकडे कान दिलेल्या व सा.यु. ६६ मध्ये रोमन सैन्याने माघार घेतल्यावर जेरुसलेम सोडून गेलेल्या ख्रिश्चनांना मात्र गोड फळे चाखायला मिळाली! सा.यु. ७० मध्ये ‘निवडलेल्या’ अभिषिक्त ख्रिश्चनांचा “निभाव लागला” किंवा त्यांना राखण्यात आले.—मत्तय २४:१६, २२.
आणखी एक पूर्णता बाकी
१५. सा.यु. ७० नंतर येशूच्या भविष्यवाणीची मोठी पूर्णता होईल याची आपण खात्री कशी बाळगू शकतो?
१५ पण हा काही शेवट नव्हता. पूर्वी येशूने सूचित केले होते, की शहराचा नाश झाल्याच्या नंतर तो यहोवाच्या नावाने येणार होता. (मत्तय २३:३८, ३९; २४:२) जैतुनांच्या डोंगरावर केलेल्या भविष्यवाणीत त्याने अधिक स्पष्टपणे हे सांगितले. येणाऱ्या ‘मोठ्या संकटाविषयी’ सांगितल्यावर तो म्हणाला, की नंतर खोटे ख्रिस्त येतील व एका विस्तृत कालावधीपर्यंत परराष्ट्रे जेरुसलेमला तुडवतील. (मत्तय २४:२१, २३-२८; लूक २१:२४) कदाचित याची आणखी एक, मोठी पूर्णता असावी का? वस्तुस्थिती होय असे उत्तर देते. आपण जेव्हा (सा.यु. ७० मध्ये जेरुसलेमवरील संकटानंतर लिहिण्यात आलेल्या) प्रकटीकरण ६:२-८ ची तुलना मत्तय २४:६-८ व लूक २१:१०, ११ या वचनांशी करतो तेव्हा, युद्धे, अन्नटंचाई आणि रोगराई हे भवितव्यात मोठ्या प्रमाणावर घडणार असल्याचे आपल्याला दिसून येते. येशूच्या शब्दांची ही मोठी पूर्णता, १९१४ मध्ये उद्रेक झालेल्या पहिल्या महायुद्धापासून सुरू झाली आहे.
१६-१८. आणखी काय घडण्याची आपण अपेक्षा करीत आहोत?
१६ अनेक दशकांपासून आतापर्यंत यहोवाचे साक्षीदार ही शिकवण देत आले आहेत की चिन्हाची आधुनिक पूर्णता म्हणजे एक ‘मोठे संकट’ अद्याप यायचे आहे हे शाबीत करते. सध्याची दुष्ट “पिढी” ते संकट पाहील. सा.यु. ६६ मध्ये गॅलसच्या हल्ल्याने जेरुसलेमवरील संकटाची सुरवात झाली त्याचप्रमाणे पहिला टप्पा (सर्व खोट्या धर्मांवर हल्ला) पुन्हा एकदा होणार आहे असे दिसते.d मग, अनिश्चित काळाच्या कालावधीनंतर अंत येईल—सा.यु. ७० च्या नाशाप्रमाणेच जगव्याप्त प्रमाणावर हा नाश येईल.
१७ आपल्या पुढे असलेल्या संकटाविषयी बोलताना येशू म्हणाला होता: “त्या दिवसातील संकटानंतर लागलेच सूर्य अंधकारमय होईल, चंद्र प्रकाश देणार नाही, तारे आकाशातून पडतील, व आकाशाची बळे डळमळतील. तेव्हा मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशात प्रगट होईल; मग पृथ्वीवरील सर्व जातीचे लोक शोक करितील, आणि ते मनुष्याच्या पुत्राला आकाशातल्या मेघांवर आरूढ होऊन पराक्रमाने व मोठ्या वैभवाने येताना पाहतील.”—मत्तय २४:२९, ३०.
१८ यास्तव, येशू स्वतः म्हणतो की, “त्या दिवसातील संकटानंतर,” कोणतीतरी दैदिप्यमान घटना घडेल. (पडताळा योएल २:२८-३२; ३:१५.) हे पाहून अवज्ञाकारी मानवांना इतके आश्चर्य वाटेल व धक्का बसेल, की ते “शोक करितील.” पुष्कळजण, “भयाने व जगावर कोसळणाऱ्या अरिष्टांची धास्ती घेतल्यामुळे . . . मरणोन्मुख होतील.” पण खऱ्या ख्रिश्चनांची अशी गत होणार नाही! उलट ते ‘आपली डोकी वर करतील, कारण त्यांचा मुक्तीसमय जवळ आला आहे.’—लूक २१:२५, २६, २८.
पुढे न्यायदंड!
१९. शेरडे आणि मेंढरे यांचा दाखला केव्हा पूर्ण होणार हे आपण कसे ठरवू शकतो?
१९ याकडे लक्ष द्या, की मत्तय २४:२९-३१ पुढील गोष्टी भाकीत करते: (१) मनुष्याचा पुत्र येईल, (२) त्याचे येणे मोठ्या वैभवात असेल, (३) त्याच्याबरोबर देवदूत असतील आणि (४) पृथ्वीवरील सर्व जातीचे लोक त्याला पाहतील. शेरडे आणि मेंढरे यांच्या दाखल्यात येशूने या गोष्टींचा पुन्हा उल्लेख केला. (मत्तय २५:३१-४६) यास्तव, आपण असा निष्कर्ष काढू शकतो, की या दाखल्याचा संबंध, संकटाच्या उद्रेकानंतरच्या सुरवातीच्या काळाशी आहे; तेव्हा येशू आपल्या देवदूतांसह येईल आणि न्याय करण्यासाठी आपल्या सिंहासनावर बसेल. (योहान ५:२२; प्रेषितांची कृत्ये १७:३१; पडताळा १ राजे ७:७; दानीएल ७:१०, १३, १४, २२, २६; मत्तय १९:२८.) कोणाचा न्याय केला जाईल व त्याचा परिणाम काय होईल? दाखल्यानुसार येशू सर्व राष्ट्रांकडे लक्ष देईल, जणू काय ते त्याच्या वैभवी सिंहासनाच्या अगदी समोर एकत्र आले आहेत.
२०, २१. येशूच्या दाखल्यातील मेंढरांचे काय होईल? (ब) शेरडांना भवितव्यात कशाचा अनुभव येणार आहे?
२० मेंढरासमान स्त्री-पुरुषांना येशूच्या पसंतीच्या उजव्या बाजूला वेगळे करण्यात येईल. असे का? कारण त्यांनी संधींचा उपयोग करून त्याच्या बांधवांना अर्थात ख्रिस्ताच्या स्वर्गीय राज्यात भाग घेणाऱ्या अभिषिक्त ख्रिश्चनांना चांगली वागणूक दिली. (दानीएल ७:२७; इब्री लोकांस २:९–३:१) दाखल्याप्रमाणे, मेंढरासमान लाखो ख्रिश्चनांनी येशूच्या आध्यात्मिक बांधवांना ओळखले आहे व ते त्यांना पाठबळ देऊन त्यांच्याबरोबर कार्य करतात. यामुळे या ‘मोठ्या लोकसमुदायाला’ ‘मोठ्या संकटातून’ बचावून परादीसमध्ये अर्थात पृथ्वीवरील देवाच्या राज्यात कायम जिवंत राहण्याची बायबलवर आधारित असलेली आशा आहे.—प्रकटीकरण ७:९, १४; २१:३, ४; योहान १०:१६.
२१ पण शेरडासमान लोकांचे असे होणार नाही. येशू येईल तेव्हा हे लोक “शोक करितील,” असे मत्तय २४:३० मध्ये त्यांच्याबद्दल म्हटले आहे. आणि शोक तर त्यांनी केलाच पाहिजे, कारण, त्यांनी राज्याची सुवार्ता नाकारल्याचे, येशूच्या शिष्यांचा विरोध केल्याचे व नाहीसे होत चाललेल्या जगाची आवड बाळगल्याचे बरेच पुरावे दिले असतील. (मत्तय १०:१६-१८; १ योहान २:१५-१७) पृथ्वीवरील येशूचे कोणी शिष्य नव्हे तर स्वतः येशू, शेरडे कोण आहेत ते ठरवतो. त्यांच्याविषयी तो म्हणतो: “ते तर सार्वकालिक शिक्षा भोगावयास जातील.”—मत्तय २५:४६.
२२. येशूच्या भविष्यवाणीच्या कोणत्या भागाकडे आपण लक्ष देणे अगत्याचे आहे?
२२ मत्तय अध्याय २४ आणि २५ मधील भविष्यवाणीची जी अधिक समज आपल्याला प्राप्त झाली आहे ती रोमांचकारी होती. परंतु, येशूच्या भविष्यवाणीच्या एका भागावर मात्र आपण आणखी लक्ष केंद्रीत केले पाहिजे—‘पवित्रस्थानात उभ्या असलेल्या ओसाडीचा अमंगळ पदार्थ.’ याविषयी आपल्या समजबुद्धीचा उपयोग करण्यास व कार्यहालचाल करण्यास सज्ज असण्यास येशूने आपल्या अनुयायांना आर्जवले. (मत्तय २४:१५, १६) हा “अमंगळ पदार्थ” आहे तरी काय? तो पवित्रस्थानात केव्हा उभा राहतो? यात आपल्या सध्याची आणि भवितव्यातील जीवनाची आशा कशी काय गोवली आहे? पुढील लेखात याची चर्चा केली जाईल.
[तळटीपा]
a टेहळणी बुरूजचे फेब्रुवारी १, १९९४; ऑक्टोबर १५ व नोव्हेंबर १, १९९५; आणि ऑगस्ट १५, १९९६ अंकांतील अभ्यासाचे लेख पाहा.
b ब्रिटिश विद्वान जी. आर. बिझली-मरी म्हणतात: “‘ही पिढी’ या वाक्यांशाचे भाषांतर करणे अनुवादकांना वास्तविकतेत कठीण वाटण्याची काही गरज नाही. आरंभीच्या ग्रीकमध्ये यिनेयाचा अर्थ, जन्म, संतती व यास्तव वंश असा होत असला तरीही . . . [ग्रीक, सेप्टुआजिंटमध्ये] वय, मानवजातीचे वय, किंवा समकालीन या अर्थाने पिढी, असा ज्याचा अर्थ होतो तो इब्री शब्द डोर याचे भाषांतर म्हणून त्याचा बहुतेकवेळा उपयोग करण्यात आला आहे. . . . येशूच्या उद्गारांमध्ये या वाक्यांशातून दोन अर्थ निघतात असे दिसते: एका बाजूला तो वाक्यांश नेहमी त्याच्या समकालीन लोकांना सूचित करतो तर दुसऱ्या बाजूला त्यातून टीका ध्वनित होते.”
c हिस्ट्री ऑफ द ज्यूझ नामक आपल्या पुस्तकात प्राध्यापक ग्रेट्स म्हणतात, की रोमी लोक कधीकधी दिवसाला ५०० कैद्यांना सुळावर चढवत असत. बंदिवासातील इतर यहुद्यांचे हात कापून त्यांना परत शहरात पाठवण्यात आले. तेथील परिस्थिती कशी होती? “पैशाला काही किंमत नव्हती, कारण त्याने भाकरसुद्धा विकत घेता येत नव्हती. मूठभर कडबा, चामड्याचा एक तुकडा किंवा कुत्र्यांना दिले जाणारे फेकावयाचे मटणाचे तुकडे यासारख्या सर्वात गलिच्छ आणि किळसवाण्या अन्नासाठी लोक रस्त्यामध्ये एकमेकांवर तुटून पडायचे. . . . न पुरलेल्या मृत शरीरांमुळे दमट उष्ण हवा विषारी झाली, आणि लोक आजारपण, दुष्काळ आणि तलवार यांना बळी पडले.”
d पुढील लेख भवितव्यातील संकटाच्या या पैलूची चर्चा करतो.
तुम्हाला आठवते का?
◻ पहिल्या शतकात मत्तय २४:४-१४ ची कोणती पूर्णता झाली?
◻ मत्तय २४:२१, २२ मध्ये भाकीत केल्याप्रमाणे प्रेषितांच्या दिवसांत कशाप्रकारे दिवस कमी करून लोकांचा निभाव लागला?
◻ मत्तय २४:३४ मध्ये उल्लेखलेल्या ‘या पिढीची’ वैशिष्ट्ये काय होती?
◻ जैतुनांच्या डोंगरावर केलेल्या भविष्यवाणीची आणखी एक मोठी पूर्णता होणार आहे हे आपल्याला कसे माहीत होते?
◻ शेरडे आणि मेंढरे यांच्या दाखल्याची पूर्णता केव्हा आणि कशी होणार आहे?
[१२ पानांवरील चित्र]
रोममधील टायटसच्या कमानीवरील तपशील, जेरुसलेमच्या नाशाच्या वेळी लुटलेल्या मालाचे चित्र
[Credit Line]
Soprintendenza Archeologica di Roma