वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w15 ७/१५ पृ. १४-१९
  • तुमचा मुक्‍तिसमय जवळ आला आहे!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमचा मुक्‍तिसमय जवळ आला आहे!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • मोठ्या संकटाची सुरवात
  • परीक्षेचा आणि न्यायाचा काळ
  • देवाच्या राज्यात सूर्यासारखं प्रकाशणं
  • “या गोष्टी केव्हा होतील, . . . हे आम्हास सांगा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • मोठ्या संकटादरम्यान विश्‍वासू राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • प्रकटीकरण​—आपल्या भविष्याबद्दल ते काय सांगतं?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • देव कार्य करील तेव्हा तुमचा बचाव होईल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
w15 ७/१५ पृ. १४-१९
पहिल्या शतकातील एक ख्रिस्ती कुटुंब त्यांच्या घराच्या छतावरून मंदिराची पडत असलेली भिंत पाहताना

तुमचा मुक्‍तिसमय जवळ आला आहे!

“सरळ उभे राहा आणि आपली डोकी वर करा; कारण तुमचा मुक्‍तिसमय जवळ आला आहे.”—लूक २१:२८.

गीत क्रमांक: ४९, ४३

तुम्ही कसं उत्तर द्याल?

  • इ.स. ६६ सालाप्रमाणे आपल्या काळातही लवकरच कोणत्या घटना घडतील?

  • ‘मोठ्या बाबेलचा’ नाश झाल्यानंतर आपल्याला कोणत्या परीक्षांचा सामना करावा लागेल?

  • मत्तय २४:३१ मधील ‘एकत्र केलं जाणं’ कशाला सूचित करतं?

१. इ.स. ६६ साली काय घडलं? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्रं पाहा.)

कल्पना करा की तुम्ही जेरूसलेममध्ये राहणारे ख्रिस्ती आहात. इ.स. ६६ चा तो काळ आहे. जेरूसलेममध्ये मोठमोठ्या गोष्टी घडत आहेत. फ्लॉरस नावाच्या एका रोमी अधिकाऱ्‍यानं मंदिराच्या भांडारातून १७ टॅलेंट्‌स, इतकी मोठी रक्कम काढून घेतली आहे. यामुळे यहुदी लोक खूप संतापले आहेत. रागाच्या भरात उसळलेल्या दंगलीत त्यांनी अनेक रोमी सैनिकांना ठार मारलं आहे आणि आता आपण रोमी शासनाच्या अधीन नाही अशी घोषणा ते करत आहेत. पण, यावर रोमदेखील शांत राहत नाही. तीन महिन्यांच्या आतच सेस्टियस गॅलसच्या नेतृत्वाखाली ३०,००० सैनिक जेरूसलेमला वेढा घालतात. बंड करणारे यहुदी, मंदिराच्या तटबंदीच्या आत आश्रय घेतात. पण, रोमी सैनिक मंदिराच्या बाहेरील तटबंदीची भिंत पाडण्याचा प्रयत्न करतात. यामुळे जेरूसलेममधील प्रत्येकाचा भीतीनं थरकाप उडतो. हे सर्व घडताना पाहून तुम्हाला कसं वाटलं असतं?

२. रोमी सैन्यांनी शहराला वेढा घातल्यावर ख्रिश्‍चनांना काय करण्याची गरज होती, आणि हे कसं शक्य होणार होतं?

२ या घटनेच्या अनेक वर्षांआधीच येशूनं आपल्या शिष्यांना अशी सूचना दिली होती, की “यरुशलेमेस सैन्यांचा वेढा पडत आहे असे पाहाल तेव्हा ती ओसाड पडण्याची वेळ जवळ आली आहे असे समजा. त्या वेळेस जे यहूदीयांत असतील त्यांनी डोंगरात पळून जावे, जे यरुशलेमेत असतील त्यांनी बाहेर निघून जावे व जे शिवारांत असतील त्यांनी तिच्या आत येऊ नये.” (लूक २१:२०, २१) पण, जेरूसलेम शहराला तर सैनिकांचा वेढा होता. मग, येशूच्या या सूचनांचं पालन करणं त्याच्या शिष्यांना कसं शक्य होणार होतं? त्याच दरम्यान एक आश्‍चर्यकारक गोष्ट घडते. रोमी सैनिक अचानक वेढा उठवतात आणि माघार घेतात! कारण हल्ल्याचे “दिवस कमी” केले जातील असं येशूनं आधीच सांगितलं होतं. (मत्त. २४:२२) त्यामुळे सैनिकांनी माघार घेताच, येशूच्या शिष्यांना डोंगराकडे पळ काढण्याद्वारे त्याच्या शब्दांचं पालन करणं शक्य झालं.a नंतर, इ.स. ७० साली पुन्हा एकदा रोमी सैन्यानं जेरूसलेमवर हल्ला केला. या वेळी मात्र त्यांनी संपूर्ण शहराचा नाश केला. पण, ज्यांनी येशूच्या म्हणण्यानुसार केलं त्या सर्वांचा जीव वाचला.

३. लवकरच आपल्याला कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागेल, आणि या लेखात आपण कशाविषयी चर्चा करणार आहोत?

३ येशूनं दिलेली ताकीद आणि सूचना आज आपल्यालाही लागू होतात. लवकरच आपल्यावरही अशीच परिस्थितीत येणार आहे. “मोठे संकट” अचानक सुरू झाल्यावर काय होईल हे स्पष्ट करण्यासाठी येशूनं या पहिल्या शतकातील घटनांचा वापर केला. (मत्त. २४:३, २१, २९) ज्याप्रमाणे जेरूसलेमच्या नाशातून विश्‍वासू ख्रिस्ती वाचले होते, अगदी त्याचप्रमाणे एक “मोठा लोकसमुदाय” लवकरच संपूर्ण जगावर येणाऱ्‍या विनाशातून वाचेल. (प्रकटीकरण ७:९, १३, १४ वाचा.) म्हणूनच, भविष्यात घडणाऱ्‍या घटनांबद्दल बायबल काय सांगतं ते समजून घेणं आज आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण, आपलं जीवन त्यावर अवलंबून आहे. तेव्हा, त्या घटनांचा व्यक्‍तिगत रीत्या आपल्यावर कसा परिणाम होईल यावर या लेखात आपण चर्चा करू या.

मोठ्या संकटाची सुरवात

४. मोठ्या संकटाची सुरवात कशी होईल?

४ मोठ्या संकटाची सुरवात कशी होईल? खोट्या धर्मावर होणाऱ्‍या हल्ल्यापासून मोठ्या संकटाची सुरवात होईल. बायबलमध्ये खोट्या धर्माला, “मोठी बाबेल वेश्‍यांची . . . माता” असं म्हणण्यात आलं आहे. (प्रकटी. १७:५-७, ईझी-टू-रीड) खोट्या धर्माला वेश्‍या का म्हणण्यात आलं आहे? कारण खोट्या धर्मातील धर्मपुढाऱ्‍यांनी देवाशी विश्‍वासघात केला आहे. येशू आणि त्याच्या राज्याला एकनिष्ठपणे पाठिंबा देण्याऐवजी केवळ आपलं वर्चस्व राखण्यासाठी त्यांनी बायबलच्या शिकवणींना नाकारून, मानवी सरकारांना आपला पाठिंबा दिला आहे. अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांप्रमाणे त्यांची उपासना शुद्ध स्वरूपाची नाही. त्यामुळे, मोठ्या बाबेलचा नाश होणं साहजिक आहे. (२ करिंथ. ११:२; याको. १:२७; प्रकटी. १४:४) पण, मोठ्या बाबेलचा नाश कोण करेल? “किरमिजी रंगाच्या” श्‍वापदाला जी “दहा शिंगे” आहेत त्यांच्या मनात स्वतः यहोवा ही गोष्ट घालेल. ‘किरमिजी रंगाचा श्‍वापद’ संयुक्‍त राष्ट्रसंघाला तर “दहा शिंगे” त्याला पाठिंबा देणाऱ्‍या सर्व राजकीय सत्तांना सूचित करतात.—प्रकटीकरण १७:३, १६-१८ वाचा.

५, ६. मोठ्या बाबेलचा नाश होईल तेव्हा त्यातील सर्वच सदस्यांचा नाश होणार नाही असं का म्हणता येईल?

५ ‘मोठ्या बाबेलचा’ नाश करण्यात येईल, तेव्हा खोट्या धर्माच्या सर्वच सदस्यांचा नाश होईल का? नक्कीच नाही. कारण, यहोवानं जखऱ्‍या संदेष्ट्याद्वारे पुढं काय होईल याविषयी आधीच भाकीत केलं होतं. खोट्या धर्माचे सदस्य त्या वेळी असं म्हणतील, “मी काही संदेष्टा नाही, शेती करणारा मनुष्य आहे; कारण मला लहानपणीच कोणी दास केले. जर कोणी त्यास विचारले की तुझ्या बाहूंच्यामध्ये या जखमा कसल्या? तर तो म्हणेल, माझ्या इष्टमित्रांच्या घरी लागलेल्या घावांचे हे वण आहेत.” (जख. १३:४-६) या भविष्यवाणीत सांगितल्याप्रमाणे खोट्या धर्माचे धार्मिक पुढारीदेखील, ‘मोठ्या बाबेलचा’ भाग असल्याचं नाकारतील.

६ मग, त्या वेळी देवाच्या लोकांचं काय होईल? येशू स्पष्ट करतो: “ते दिवस कमी केले नसते तर कोणाही मनुष्याचा निभाव लागला नसता; परंतु निवडलेल्यांसाठी ते कमी केले जातील.” (मत्त. २४:२२) पहिल्या शतकात जेरूसलेमवर आलेल्या संकटाचे “दिवस कमी” करण्यात आले होते. त्यामुळे ‘निवडलेल्यांना’ म्हणजे अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना तिथून पळ काढणं शक्य झालं होतं. त्याच प्रकारे “निवडलेल्यांसाठी” मोठ्या संकटाच्या पहिल्या टप्प्याचा काळ “कमी” केला जाईल. म्हणजेच, ‘दहा शिंगांना’ अर्थात राजकीय सत्तांना देवाच्या लोकांचा नाश करण्याची अनुमती दिली जाणार नाही. याउलट, पहिल्या हल्ल्यानंतर काही काळासाठी पुन्हा एकदा शांती असेल.

परीक्षेचा आणि न्यायाचा काळ

७, ८. खोट्या धर्माच्या नाशानंतर आपल्याजवळ कोणती संधी असेल, आणि देवाचे लोक इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत हे तेव्हा कसं दिसून येईल?

७ खोट्या धर्माच्या नाशानंतर काय होईल? आपल्या मनात नेमकं काय आहे हे दाखवण्याची ती वेळ असेल. तेव्हा बहुतेक लोक सुरक्षेसाठी आणि मदतीसाठी ‘डोंगर व खडकाप्रमाणे’ वाटणाऱ्‍या मानवी संघटनांकडे धाव घेतील. (प्रकटी. ६:१५-१७) पण, यहोवाचे लोक मात्र सुरक्षेसाठी यहोवावरच अवलंबून राहतील. पहिल्या शतकातील हल्ल्याचे “दिवस कमी” करण्यात आले, तेव्हा सर्वच यहुद्यांनी अचानकच ख्रिस्ती बनण्याची ती वेळ नव्हती. उलट, जे आधीच ख्रिस्ती होते त्यांनी येशूच्या सांगण्यानुसार जेरूसलेममधून पळ काढण्याची ती वेळ होती. त्याच प्रकारे भविष्यात जेव्हा मोठ्या बाबेलवर होणाऱ्‍या हल्ल्याचे “दिवस कमी” करण्यात येतील, तेव्हा अचानक अनेक जण सत्य स्वीकारतील अशी अपेक्षा आपण करू शकत नाही. उलट, यहोवाच्या सर्व खऱ्‍या उपासकांना यहोवाप्रती आपलं प्रेम दाखवण्याची आणि अभिषिक्‍तांना पाठिंबा देण्याची ती एक संधी असेल.—मत्त. २५:३४-४०.

८ परीक्षेच्या त्या काळात नेमकं काय होईल हे आपल्याला माहीत नाही. पण, तेव्हा आपलं जीवन अगदी कठीण असेल आणि आपल्याला अनेक त्याग करावे लागतील. पहिल्या शतकात, ख्रिश्‍चनांना स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आपलं घर सोडावं लागलं आणि नंतर फार कठीण परिस्थितीचाही सामना करावा लागला. (मार्क १३:१५-१८) तेव्हा, आपण स्वतःला विचारलं पाहिजे: ‘माझ्याजवळ असलेल्या भौतिक गोष्टींचा त्याग करण्यासाठी मी तयार आहे का? यहोवाला एकनिष्ठ राहण्यासाठी जे काही करणं गरजेचं आहे ते करण्यासाठी मी तयार आहे का?’ जरा विचार करा, त्या वेळी परिस्थिती कशीही असली तरी दानीएल संदेष्ट्याप्रमाणे आपल्या देवाची उपासना करणारे केवळ आपणच असू.—दानी. ६:१०, ११.

९, १०. (क) मोठ्या संकटादरम्यान देवाचे लोक कोणता संदेश सांगतील? (ख) देवाच्या शत्रूंची काय प्रतिक्रिया असेल?

९ मोठ्या संकटाचा काळ, हा ‘राज्याची सुवार्ता’ सांगण्याचा काळ नसेल. कारण, जगाचा ‘शेवट’ जवळ आल्यानं, सुवार्ता सांगण्याची वेळ तेव्हा निघून गेलेली असेल! (मत्त. २४:१४) उलट सर्व मानवजातीला बोचणारा असा न्यायाचा जळजळीत संदेश त्या वेळी देवाचे लोक अगदी धैर्यानं घोषित करतील. सैतानाच्या दुष्ट जगाचा आता पूर्णपणे नाश होईल, असा संदेश कदाचित आपण लोकांना त्या वेळी सांगू. बायबलमध्ये या संदेशाची तुलना गारांशी करण्यात आली आहे. त्यात म्हटलं आहे: “सुमारे एक मण वजनाच्या ‘मोठ्या गारा’ आकाशातून माणसांवर पडल्या; तेव्हा गारांच्या पीडेमुळे लोकांनी देवाची निंदा केली; कारण त्या गारांची पीडा ‘अतिभयंकर’ होती.”—प्रकटी. १६:२१.

१० आपले शत्रू हा न्यायदंडाचा संदेश ऐकतील, तेव्हा मागोगच्या गोगची म्हणजेच राष्ट्रांच्या गटाची प्रतिक्रिया काय असेल? याविषयी यहोवानं यहेज्केल संदेष्ट्याद्वारे असं सांगितलं: “प्रभू परमेश्‍वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की तुझ्या मनांत कल्पना येतील आणि तू दुष्ट युक्‍ती योजशील. तू म्हणशील, ज्या प्रदेशातील गावांना तटबंदी नाही त्यांवर मी चढाई करेन; जे स्वस्थपणे निर्भय राहत आहेत, व ज्यांपैकी कोणालाही कोट, अडसर, वेशी वगैरे काही नाहीत त्याजवर मी चालून जाईन; लोकांची मालमत्ता हिरावण्यासाठी व लुटालूट करावयासाठी; ज्या ओसाड ठिकाणी पुनः वस्ती झाली आहे त्यावर माझा हात चालवावा, आणि निरनिराळ्या राष्ट्रांतून जमा केलेल्या ज्या लोकांनी गुरेढोरे व मालमत्ता संपादन केली आहे व जे पृथ्वीच्या मधल्या प्रदेशी राहत आहेत त्यांजवर हात चालवावा म्हणून मी चालून जाईन.” (यहे. ३८:१०-१२) देवाचे लोक त्या वेळी सर्वांपेक्षा वेगळे आहेत हे स्पष्टपणे दिसून येईल. आणि शत्रूंच्या नजरेत ते असे भरतील की जणू ते ‘पृथ्वीच्या मधोमध’ उभे आहेत. तेव्हा राष्ट्रं स्वतःला रोखू शकणार नाहीत. यहोवाच्या अभिषिक्‍तांवर आणि त्यांना साथ देणाऱ्‍यांवर हल्ला करण्यासाठी ते चवताळून उठतील.

११. (क) मोठ्या संकटात घडणाऱ्‍या घटनांच्या क्रमाबद्दल कोणती गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे? (ख) लोक चिन्हं पूर्ण होताना पाहतील तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय असेल?

११ यानंतर काय होईल? घटनांचा क्रम नेमका कसा असेल याविषयी बायबल स्पष्टपणे काही सांगत नाही. पण, कदाचित याच वेळी इतरही काही घटना घडतील असं दिसतं. येशूनं युगाच्या समाप्तीविषयी केलेल्या भविष्यवाणीत असं म्हटलं: “तेव्हा सूर्य, चंद्र व तारे यांत चिन्हे घडून येतील, आणि पृथ्वीवर समुद्र व लाटा यांच्या गर्जनेने राष्ट्रे घाबरी होऊन पेचात पडतील; भयाने व जगावर कोसळणाऱ्‍या अरिष्टांची धास्ती घेतल्यामुळे माणसे मरणोन्मुख होतील. आकाशातील बळे डळमळतील. त्या काळी मनुष्याचा पुत्र पराक्रमाने व मोठ्या वैभवाने मेघात येताना लोकांच्या दृष्टीस पडेल.” (लूक २१:२५-२७; मार्क १३:२४-२६ वाचा.) या भविष्यवाणीनुसार खरंच घाबरून टाकणारी चिन्हं आणि घटना आकाशात घडतील का? येणारा काळच ते सांगेल. पण, एक गोष्ट मात्र नक्की आहे, जेव्हा देवाचे शत्रू ही चिन्हं पाहतील तेव्हा ते भीतीनं अक्षरशः सुन्‍न होतील आणि काय करावं हे त्यांना सूचणार नाही.

आपल्या बचावाची पूर्ण खात्री असलेले ख्रिस्ती अगदी आत्मविश्‍वासानं मोठ्या संकटाचा सामना करताना

बचावाची खात्री असल्यामुळे आत्मविश्‍वास आपल्या चेहेऱ्‍यावर झळकेल! (परिच्छेद १२, १३ पाहा)

१२, १३. (क) येशू जेव्हा “पराक्रमाने व मोठ्या वैभवाने” येईल तेव्हा काय होईल? (ख) त्या वेळी देवाचे सेवक काय करतील?

१२ येशू जेव्हा “पराक्रमाने व मोठ्या वैभवाने” येईल तेव्हा काय होईल? तेव्हा तो सर्व विश्‍वासू लोकांना प्रतिफळ देईल आणि जे विश्‍वासू नाहीत त्यांना दंड देईल. (मत्त. २४:४६, ४७, ५०, ५१; २५:१९, २८-३०) येशूनं एक दाखला देऊन ही गोष्ट आणखी स्पष्ट केली. तो म्हणाला, “जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व देवदूतांसह येईल, तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल; त्याच्यापुढे सर्व राष्ट्रे जमवली जातील; आणि जसे मेंढपाळ शेरडांपासून मेंढरे वेगळी करतो तसे तो त्यांस एकमेकांपासून वेगळे करेल, आणि मेंढरांस तो आपल्या उजवीकडे व शेरडांस डावीकडे ठेवेल.” (मत्त. २५:३१-३३) मग, शेरडांचं आणि मेंढरांचं काय होईल? त्यांचा न्याय केला जाईल. विश्‍वासू नसणारे शेरडासमान लोक “सार्वकालिक शिक्षा” भोगतील. आणि विश्‍वासू असणाऱ्‍या मेंढरासमान लोकांना “सार्वकालिक जीवन” मिळेल.—मत्त. २५:४६.

१३ आपला नाश होणार आहे हे जेव्हा शेरडांसमान लोकांना कळेल तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय असेल? ते “शोक करतील” असं बायबलमध्ये सांगितलं आहे. (मत्त. २४:३०) पण, अभिषिक्‍त जन आणि त्यांना साथ देणाऱ्‍यांची प्रतिक्रिया काय असेल? ते येशूच्या म्हणण्यानुसार कार्य करतील. त्यानं म्हटलं, “या गोष्टींस आरंभ होऊ लागेल तेव्हा सरळ उभे राहा आणि आपली डोकी वर करा; कारण तुमचा मुक्‍तिसमय जवळ आला आहे.”—लूक २१:२८.

देवाच्या राज्यात सूर्यासारखं प्रकाशणं

१४, १५. मागोगच्या गोगचा हल्ला सुरू झाल्यानंतर, कोणतं काम केलं जाईल आणि ते कसं केलं जाईल?

१४ मागोगचा गोग देवाच्या लोकांवर हल्ला करण्यास सुरवात करेल तेव्हा काय घडेल? बायबल म्हणतं की मनुष्याचा पुत्र “देवदूतांना पाठवून चार दिशांकडून, अर्थात पृथ्वीच्या सीमेपासून आकाशाच्या सीमेपर्यंत आपल्या निवडलेल्या लोकांस एकत्र करेल.” (मार्क १३:२७; मत्त. २४:३१) इ.स. ३३ पासून अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांची, पवित्र आत्म्याद्वारे जी निवड करण्यात येत आहे त्याला हे ‘एकत्र केलं जाणं,’ सूचित करत नाही. शिवाय, भविष्यात पृथ्वीवरील अभिषिक्‍तांवर जेव्हा शेवटला शिक्का मारण्यात येईल त्यालाही हे सूचित करत नाही. (मत्त. १३:३७, ३८) कारण, मोठं संकट सुरू होण्याच्या काही काळाआधीच अभिषिक्‍तांवर शेवटला शिक्का मारण्यात आलेला असेल. (प्रकटी. ७:१-४) तर मग, हे ‘एकत्र केलं जाणं’ कशाला सूचित करतं? पृथ्वीवर असलेल्या अभिषिक्‍तांना स्वर्गात घेतलं जाईल त्या घटनेला हे सूचित करतं. (१ थेस्सलनी. ४:१५-१७; प्रकटी. १४:१) मागोगच्या गोगनी हल्ला करण्यास सुरवात केल्याच्या काही वेळानंतर ही घटना घडेल. (यहे. ३८:११) त्यानंतर, येशूनं सांगितल्याप्रमाणे “नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील.”—मत्त. १३:४३.b

१५ ख्रिस्ती धर्मजगतातील अनेकांचा असा विश्‍वास आहे, की सर्व ख्रिश्‍चनांना मानवी शरीरातच स्वर्गात घेतलं जाईल. या शिकवणीला ते “रॅप्चर” म्हणून ओळखतात. तसंच, त्यांना असंही वाटतं की येशू पृथ्वीवर राज्य करण्यासाठी येईल तेव्हा आपण त्याला आपल्या डोळ्यांनी पाहू. पण, या शिकवणीला बायबलचा आधार नाही. बायबल म्हणतं, की “मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशात प्रगट होईल” आणि येशू “आकाशातल्या मेघांवर आरूढ होऊन” येईल. यावरून स्पष्ट होतं की येशूचं येणं अदृश्‍य स्वरूपात होईल. (मत्त. २४:३०) बायबल असंही सांगतं की “मांस व रक्‍त यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही.” त्यामुळे ज्यांना स्वर्गात घेतलं जाईल त्यांच्या हाडामांसाच्या शरीराला आधी आत्मिक शरीरात बदलण्यात येईल. हा बदल “शेवटला कर्णा वाजेल तेव्हा” अगदी “क्षणात, निमिषांत” होईल.c (१ करिंथकर १५:५०-५३ वाचा.) अशा प्रकारे पृथ्वीवर असलेल्या सर्व अभिषिक्‍तांना एका क्षणातच एकत्र केलं जाईल.

१६, १७. कोकऱ्‍याच्या लग्नापूर्वी काय घडेल?

१६ सर्व १,४४,००० अभिषिक्‍त जनांना स्वर्गात एकत्र केल्यानंतर कोकऱ्‍याच्या लग्नाची अंतिम तयारी सुरू होईल. (प्रकटी. १९:९) पण, कोकऱ्‍याच्या लग्नाआधी आणखी एक महत्त्वाची घटना घडणं गरजेचं आहे. हे लक्षात घ्या, की अभिषिक्‍त जन पृथ्वीवर असतानाच गोगनं देवाच्या लोकांवर हल्ला केलेला असेल. (यहे. ३८:१६) मग, यावर देवाच्या लोकांची काय प्रतिक्रिया असेल? ते पुढील सूचनेनुसार कार्य करतील, “या लढाईत तुम्हास लढावे लागणार नाही; . . . स्थिर उभे राहा आणि परमेश्‍वर तुमचे कसे तारण करेल ते पाहा; घाबरू नका, कचरू नका.” (२ इति. २०:१७) गोगच्या हल्ल्यानंतर काही वेळातच पृथ्वीवरील अभिषिक्‍तांना स्वर्गात घेतलं जाईल. त्यानंतर काय होईल याबद्दल प्रकटीकरण १७:१४ मध्ये वाचायला मिळतं. त्यात म्हटलं आहे, तेव्हा देवाच्या लोकांचे शत्रू “कोकऱ्‍याबरोबर लढतील, परंतु कोकरा त्यास जिंकेल, कारण तो प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे; आणि जे त्याच्याबरोबर आहेत ते पाचारण केलेले, निवडलेले व विश्‍वासू आहेत.” शेवटी, पृथ्वीवर देवाच्या लोकांचा बचाव करण्यासाठी येशू स्वर्गातील १,४४,००० अभिषिक्‍त राजांसोबत येईल.

१७ देवाच्या लोकांचा बचाव करण्यासाठी हर्मगिदोनाची लढाई लढली जाईल. त्यामुळे यहोवाच्या पवित्र नावाचा महिमा होईल. (प्रकटी. १६:१६) ज्या अविश्‍वासू लोकांचा ‘शेरडं’ म्हणून न्याय केला जाईल त्यांचा नाश होईल. त्यामुळे, पृथ्वीवर दुष्टाईचं नामोनिशाण राहणार नाही. आणि एक “मोठा लोकसमुदाय” हर्मगिदोनातून बचावेल. त्यानंतर, प्रकटीकरण पुस्तकात सांगितलेली शेवटची रोमांचक घटना घडेल. ती म्हणजे कोकऱ्‍याचं लग्न! (प्रकटी. २१:१-४)d पृथ्वीवर जिवंत बचावलेले सर्व जण देवाची कृपा, त्याचं महान प्रेम आणि त्याच्या दयाळूपणाचा अनुभव घेतील. आपण सर्व जण त्या वेळेची किती आतुरतेनं वाट पाहत आहोत! खरंच, लग्नाची ती मेजवानी नक्कीच खास असेल!—२ पेत्र ३:१३ वाचा.

१८. पुढं होणाऱ्‍या रोमांचक घटनांची वाट पाहताना आपण काय करण्याची गरज आहे?

१८ लवकरच या सर्व रोमांचक घटना घडणार आहेत. पण, तोपर्यंत आपल्यापैकी प्रत्येकानं काय करण्याची गरज आहे? यहोवानं प्रेषित पेत्राद्वारे असं म्हटलं: “तर ही सर्व अशी लयास जाणारी आहेत म्हणून पवित्र वर्तणुकीत व सुभक्‍तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत . . . त्याच्या दृष्टीने निष्कलंक व निर्दोष असे शांतीत असलेले त्याला आढळावे म्हणून होईल तितके प्रयत्न करा.” (२ पेत्र ३:११, १२, १४) तेव्हा, खोट्या धर्माचा जराही लवलेश नसलेली शुद्ध उपासना करत राहण्याचा आपण दृढ निश्‍चय केला पाहिजे. आणि, शांतीचा राजा येशू ख्रिस्त याला नेहमी पाठिंबा देत राहिलं पाहिजे.

a टेहळणी बुरूज १५ एप्रिल २०१२, पृष्ठे २५-२६ पाहा.

b टेहळणी बुरूज १५ जुलै २०१३, पृष्ठे १३-१४ पाहा.

c त्या वेळी जिवंत असलेल्या अभिषिक्‍तांना त्यांच्या हाडामांसाच्या शरीरासोबत स्वर्गात घेतलं जाणार नाही. (१ करिंथ. १५:४८, ४९) ज्या प्रकारे येशूच्या मानवी शरीराला चमत्कारिकपणे नाहीसं करण्यात आलं त्या प्रकारे कदाचित अभिषिक्‍तांच्या शरीरालादेखील नाहीसं करण्यात येईल.

d स्तोत्र ४५ मध्ये या घटना कोणत्या क्रमानं होतील याविषयी अधिक माहिती दिली आहे. तिथं म्हटलं आहे की राजा आधी युद्ध लढेल आणि त्यानंतर लग्न होईल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा