वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 ११/१ पृ. १०-१५
  • ‘दुष्ट पिढीतून’ बचावलेले

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘दुष्ट पिढीतून’ बचावलेले
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • “अंत”—केव्हा?
  • “ही पिढी”—कोणती?
  • ‘ही दुष्ट पिढी’
  • “ही पिढी” ओळखण्यात आली
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • जागृत राहण्याचा काळ
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • ख्रिस्ताच्या उपस्थितीचा काय अर्थ होतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 ११/१ पृ. १०-१५

‘दुष्ट पिढीतून’ बचावलेले

“अहो विश्‍वासहीन व कुटिल पिढीचे लोकहो, मी कोठवर तुम्हांबरोबर राहू व तुमचे सोसू?”—लूक ९:४१.

१. (अ) आपला संकटमय काळ काय पूर्वसूचित करतो? (ब) शास्रवचने वाचणाऱ्‍यांबद्दल काय सांगतात?

आपण संकटमय काळात जगत आहोत. भूकंप, पूर, दुष्काळ, आजार, स्वैराचार, बॉम्बस्फोट, भीतिदायक युद्ध—या तसेच इतर संकटांनी आपल्या २० व्या शतकात मानवजातीला गिळंकृत केले आहे. तथापि, नजीकच्या भवितव्यात सर्वात मोठे संकट धमकी देत आहे. ते कोणते आहे? ते “जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही, व पुढे कधीहि येणार नाही असे मोठे संकट” आहे. (मत्तय २४:२१) तरीही, आपल्यापैकी अनेक जण आनंदी भवितव्याकडे कदाचित पाहू शकतात! का बरे? कारण देवाचे स्वतःचे वचन असे वर्णन करते की, “सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्‍यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा . . . मोठा लोकसमुदाय . . . ‘मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत . . . ते ह्‍यापुढे भुकेले असे होणार नाहीत, व तान्हेलेहि होणार नाहीत . . . आणि देव त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील.’”—प्रकटीकरण ७:१, ९, १४-१७.

२. मत्तय २४, मार्क १३ आणि लूक २१ मधील सुरवातीच्या वचनांची प्रारंभिक भविष्यसूचक पूर्णता काय होती?

२ मत्तय २४:३-२२, मार्क १३:३-२० आणि लूक २१:७-२४ मधील प्रेरित अहवाल ‘व्यवस्थीकरणाच्या समाप्तीच्या’ येशूच्या भविष्यसूचक वर्णनाचा परिचय करून देतो.a या भविष्यवाणीची प्रारंभिक पूर्णता, आपल्या सामान्य युगाच्या पहिल्या शतकातील भ्रष्ट यहुदी व्यवस्थीकरणाच्या बाबतीत झाली तिने यहुद्यांवर अभुतपूर्व “मोठे संकट” आल्यावर कळस गाठला. जेरुसलेम मंदिराभोवती केंद्रित असलेली यहुदी व्यवस्थीकरणाची संपूर्ण धार्मिक आणि राजकीय रचना, जिची कधीही पुनःर्स्थापना होऊ शकणार नाही अशा रीतीने नष्ट झाली.

३. आज आपण येशूची भविष्यवाणी ऐकणे तातडीचे का आहे?

३ आता आपण, येशूच्या भविष्यवाणीच्या प्रथम पूर्णतेवेळी असलेल्या परिस्थितींचा विचार करू या. यामुळे आजची समांतर पूर्णता चांगल्याप्रकारे समजण्यास आपल्याला मदत होईल. ती पूर्णता आपल्याला सर्व मानवजातीला धमकावत असलेल्या सर्वात मोठ्या संकटातून बचावण्यासाठी आताच सकारात्मक पवित्रा घेणे किती निकडीचे आहे हे दाखवील.—रोमकर १०:९-१३; १५:४; १ करिंथकर १०:११; १५:५८.

“अंत”—केव्हा?

४, ५. (अ) सा. यु. पहिल्या शतकातील देवभीरू यहुदी दानीएल ९:२४-२७ मधील भविष्यवाणीविषयी आस्थेवाईक का होते? (ब) या भविष्यवाणीची पूर्णता कशी झाली?

४ सुमारे सा. यु. पू. ५३९ या वर्षी, देवाचा संदेष्टा, दानीएल यास ‘सत्तर सप्तकीय’ वर्षांच्या कालावधीच्या शेवटल्या ‘सप्तकात’ घडणाऱ्‍या घटनांचा दृष्टांत देण्यात आला. (दानीएल ९:२४-२७) त्या ‘सप्तकांचा’ आरंभ, सा. यु. पू. ४५५ मध्ये पारसाच्या अर्तहशश्‍त राजाने जेरुसलेम शहराची पुन्हा उभारणी करण्याची आज्ञा दिली तेव्हापासून झाला. मशीहा म्हणजे येशू ख्रिस्ताचा सा. यु. २९ मध्ये बाप्तिस्मा आणि अभिषेक करण्यासह शेवटल्या ‘सप्तकाची’ सुरवात झाली.b पहिल्या शतकातील देवभीरु यहुद्यांना दानीएलाच्या भविष्यवाणीतील या काळाची जाणीव चांगल्या प्रकारे होती. उदाहरणार्थ, सा. यु. २९ मध्ये बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाचा प्रचार ऐकण्याकरता गेलेल्या लोकसमुदायाबद्दल लूक ३:१५ सांगते: “लोक वाट पाहत असत व हाच ख्रिस्त असेल काय असा सर्व जण योहानाविषयी आपल्या मनात विचार करीत असत.”

५ सत्तरावे “सप्तक” यहुद्यांकरता खास अनुग्रहाची वाढवलेली सात वर्षे असणार होते. त्याची सा. यु. २९ मध्ये सुरवात होऊन, त्यामध्ये येशूचा बाप्तिस्मा व सेवा तसेच सा. यु. ३३ मधील ‘अर्ध सप्तकात’ त्याचा यज्ञार्पित मृत्यू आणि सा. यु. ३६ मधील दुसऱ्‍या ‘अर्ध सप्तकापर्यंतचा’ समावेश होतो. या ‘सप्तका’ दरम्यान, येशूचे अभिषिक्‍त शिष्य होण्यासाठी देवभीरु यहुदी व यहुदीयमतानुसारी यांनाच केवळ सुसंधी देण्यात आली. मग, सा. यु. ७० मध्ये, आगाऊ माहीत नसलेल्या तारखेला टायटसच्या अधिकाराखाली रोमी सैन्यांनी धर्मत्यागी यहुदी व्यवस्थेचा नाश केला.—दानीएल ९:२६, २७.

६. सा. यु. ६६ मध्ये ओसाडीचा अमंगळ पदार्थ कशाप्रकारे क्रियाशील झाला आणि ख्रिश्‍चनांनी कशी प्रतिक्रिया दाखवली?

६ अशा प्रकारे, जेरुसलेमच्या मंदिराला अशुद्ध करणाऱ्‍या आणि देवाच्या स्वपुत्राचा घात करण्याचा कट रचणाऱ्‍या यहुदी याजकपदाचा पूर्ण नाश झाला. सोबतच, राष्ट्रीय आणि जातीय नोंदीचा देखील नाश झाला. त्यानंतर, याजकीय किंवा राजकीय वारसाचा कायदेशीर दावा कोणीही यहुदी करू शकत नव्हता. तथापि, यहोवा देवाचे ‘गुण प्रसिद्ध’ करण्यासाठी राजकीय याजकगण म्हणून अभिषिक्‍त आध्यात्मिक यहुद्यांना वेगळे करण्यात आले ही गोष्ट आनंदाची आहे. (१ पेत्र २:९) सा. यु. ६६ मध्ये रोमच्या सैन्याने प्रथम जेरुसलेमला घेरले आणि मंदिराच्या क्षेत्राला देखील धोका उत्पन्‍न केला तेव्हा ख्रिश्‍चनांनी, “दानीएल संदेष्ट्याच्या द्वारे सांगितलेला ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्रस्थानात उभा असलेला” ओळखले. येशूच्या भविष्यसूचक आज्ञेचे पालन करून जेरुसलेम आणि यहुदीयातील ख्रिश्‍चन संरक्षणासाठी डोंगरात पळून गेले.—मत्तय २४:१५, १६; लूक २१:२०, २१.

७, ८. ख्रिश्‍चनांनी, कोणते “चिन्ह” पाहिले, पण त्यांना काय माहीत नव्हते?

७ त्या विश्‍वासू यहुदी ख्रिश्‍चनांनी दानीएलाच्या भविष्यवाणीची पूर्णता पाहिली आणि ते युद्ध, दुष्काळ, मऱ्‍या, भूकंप आणि स्वैराचार या येशूने भाकीत केलेल्या ‘युगाच्या समाप्तीच्या चिन्हाचा’ भाग प्रत्यक्ष पाहणारे साक्षीदार होते. (मत्तय २४:३) परंतु, यहोवा त्या भ्रष्ट व्यवस्थेवर खरोखर कधी न्यायदंड बजावील हे येशूने त्यांना सांगितले होते का? नाही. त्याने भविष्यातील आपल्या राजकीय उपस्थितीच्या कळसाबद्दल जे भविष्यकथन केले होते, ते पहिल्या शतकातील ‘मोठ्या संकटाला’ देखील नक्कीच लागू झाले: “त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही, स्वर्गातील दिव्यदूतास नाही, पुत्रालाहि नाही.”—मत्तय २४:३६.

८ यहुद्यांना दानीएलाच्या भविष्यवाणीवरून येशू मशीहा या नात्याने प्रकट होण्याच्या कालावधीला मोजता येऊ शकत होते. (दानीएल ९:२५) तरीही, त्या धर्मत्यागी यहुदी व्यवस्थीकरणाचा शेवटी नाश करणाऱ्‍या ‘मोठ्या संकटाची’ तारीख त्यांना देण्यात आली नव्हती. ती तारीख त्यांना जेरुसलेम व त्याच्या मंदिराचा नाश झाल्यानंतरच सा. यु. ७० होती असे समजले. तथापि, त्यांना येशूच्या भविष्यसूचक शब्दांची जाणीव होती: “हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणारच नाही.” (मत्तय २४:३४) येथे सांगितलेल्या ‘पिढीचा’ अवलंब, उपदेशक १:४ मध्ये काळाच्या ओघात पाठोपाठ येणाऱ्‍या पिढ्यांपासून वेगळा आहे, हे उघड आहे.

“ही पिढी”—कोणती?

९. ग्रीक शब्द जि·नि·याʹ, याची व्याख्या लेक्सिकन्स कशी करते?

९ येशूसोबत जैतुनाच्या डोंगरावर चार प्रेषित बसले असता त्यांनी ‘या युगाच्या समाप्तीविषयी’ त्याची भविष्यवाणी ऐकली. त्यांनी “ही पिढी” या अभिव्यक्‍तीला कसे समजले असावे बरे? शुभवर्तमानांत “पिढी” हा शब्द जि·नि·याʹ, या ग्रीक शब्दापासून भाषांतरीत केला आहे, अलीकडील शब्दकोश त्याची व्याख्या अशा शब्दात करतो: “शब्दशः एकाच पूर्वजाकडून आलेले.” (वॉल्टर बॉऊर यांचा ग्रीक-इंग्लिश लेक्सिकन ऑफ द न्यू टेस्टमेंट) “उत्पन्‍न झालेले एक कुटुंब; . . . वंशावळीतील नंतरचे सदस्य . . . किंवा लोकांचा वंश . . . अथवा एकाच काळात राहत असलेला लोकसमुदाय, मत्तय २४:३४; मार्क १३:३०; लूक १:४८; २१:३२; फिलि. २:१५ आणि विशेषपणे समकाळात राहत असलेले यहुदी वंशातील सदस्य होय.” (डब्ल्यू. ई. वाईन यांचा एक्सपोझिटरी डिक्शनरी ऑफ न्यू टेस्टमेंट वर्डस्‌) “उत्पन्‍न झालेले लोक; . . . एकाच काळात जगत असलेले लोक, एक कुटुंब; . . . समकाळात राहात असलेला लोकसमुह: मत्त. २४:३४; मार्क १३:३०; लूक १:४८ . . . विशेषपणे समकाळात राहत असलेल्या यहुदी वंशासाठी वापरण्यात आले.”—जे. एच. थायर यांचे ग्रीक-इंग्लिश लेक्सिकन ऑफ द न्यू टेस्टमेंट.

१०. (अ) मत्तय २४:३४ चे अवतरण घेऊन दोन तज्ज्ञ कोणत्या एकाच प्रकारच्या व्याख्या देतात? (ब) या व्याख्येला वेदान्तीय शब्दकोश आणि काही बायबल भाषांतरे कशी पुष्टी देतात?

१० अशा प्रकारे, वाईन आणि थेयर या दोघांनी “ही पिढी” (ही जि·नि·याʹ हॉʹटे) याची व्याख्या “समकाळात राहत असलेला लोकसमुह” अशी करताना, मत्तय २४:३४ उद्धृत केले. या व्याख्येचे समर्थन थिऑलॉजिकल डिक्शनरी ऑफ द न्यू टेस्टमेंट (१९६४) अशा प्रकारे करते: “येशूने केलेला ‘पिढीचा’ वापर त्याचा बहुव्याप्ती उद्देश स्पष्ट करतो: त्याचा रोख सर्व लोकांकडे आहे आणि त्यांच्या पापाची घनता त्याला माहीत आहे.” खरोखर, आजच्या जागतिक व्यवस्थेप्रमाणेच, येशू पृथ्वीवर असताना यहुदी राष्ट्राच्या “पापाची घनता” दिसत होती.c

११. (अ) ही जि·नि·याʹ हॉʹटे कसे लागू करावे हे ठरविण्यात आपल्याला प्रामुख्याने कोणत्या तज्ज्ञाने मार्गदर्शन करण्यास हवे? (ब) या तज्ज्ञाने ह्‍या संज्ञेचा वापर कसा केला?

११ अर्थातच, या बाबीचा अभ्यास करणारे ख्रिस्ती, ही जि·नि·याʹ हॉʹटे या ग्रीक अभिव्यक्‍तीचा अथवा “ही पिढी,” या संज्ञेचा वापर येशूच्या शब्दांचा अहवाल कळवून प्रेरित शुभवर्तमान लेखकांनी कशाप्रकारे केला याद्वारे त्यांच्या विचारसरणीला प्रामुख्याने मार्गदर्शित करतात. या संज्ञेचा सुसंगतपणे नकारात्मक रितीने वापर केला गेला. अशा प्रकारे, यहुदी धार्मिक नेत्यांना येशूने “सापांनो, सापांच्या पिलानो”, असे संबोधले आणि “या पिढीवर” गेहन्‍नाचा न्यायदंड बजावण्यात येईल, असे त्याने पुढे म्हटले. (मत्तय २३:३३, ३६) तथापि, हा न्यायदंड केवळ दांभिक पाळकांवर येणार होता का? कदापि नाही. येशूच्या शिष्यांनी त्याला अनेक प्रसंगी “ही पिढी” या संज्ञेचा अवलंब, एकसारख्या विस्तारित अर्थाने करताना ऐकले होते. तो काय होता?

‘ही दुष्ट पिढी’

१२. आपले शिष्य ऐकत असताना, येशूने ‘लोकसमुदायाचा’ मेळ ‘या पिढीसोबत’ कसा घातला?

१२ सा. यु. ३१ मध्ये, येशूच्या गालीलमधील मोठ्या सेवेच्या दरम्यान आणि वल्हांडणानंतर लगेच त्याने, ‘लोकसमुदायाला’ असे म्हणताना त्याच्या शिष्यांनी ऐकले: “ह्‍या पिढीला मी कोणती उपमा देऊ? जी मुले बाजारात बसून आपल्या सोबत्यांना हाक मारून म्हणतात, आम्ही तुमच्यासाठी पावा वाजविला, तरी तुम्ही नाचला नाही, आम्ही आक्रोश केला तरी तुम्ही ऊर बडवून घेतले नाहीत, त्यांच्यासारखी ही पिढी आहे. कारण [बाप्तिस्मा करणारा] योहान खातपीत आला नाही, तर त्याला भूत लागले असे म्हणतात. मनुष्याचा पुत्र [येशू] खातपीत आला; तर त्याच्याविषयी म्हणतात, पाहा, खादाड व दारूबाज मनुष्य, जकातदारांचा व पापी जनांचा मित्र!” त्या तत्त्वशून्य ‘लोकसमुदायाला’ खूष करण्यासारखे काहीही नव्हते!—मत्तय ११:७, १६-१९.

१३. आपल्या शिष्यांसमक्ष, येशूने कोणाची ‘ही दुष्ट पिढी’ अशी ओळख दिली व धिक्कार केला?

१३ नंतर, सा. यु. ३१ मध्ये, येशू व त्याचे प्रेषित गालीलातील प्रचारकार्याच्या दुसऱ्‍या दौऱ्‍यावर जात असताना, ‘शास्त्री व परुशी ह्‍यांच्यापैकी काहींनी’ येशूला चिन्ह विचारले. त्याने त्यांना व तेथे असलेल्या ‘लोकसमुदायाला’ सांगितले: “दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते, परंतु योना संदेष्टा ह्‍याच्या चिन्हावाचून तिला दुसरे चिन्ह मिळणार नाही. कारण जसा ‘योना तीन दिवस व तीन रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता’ तसा मनुष्याचा पुत्र तीन दिवस व तीन रात्री पृथ्वीच्या पोटात राहील. . . . तसेच ह्‍या दुष्ट पिढीचेहि होईल.” (मत्तय १२:३८-४६) ‘ह्‍या दुष्ट पिढीत’ येशूचा मृत्यू आणि पुनरुत्थानात पूर्णता झालेले चिन्ह कधीही न समजलेले धार्मिक नेते व ‘लोकसमुदायाचा’ देखील समावेश होतो, हे स्पष्टच आहे.d

१४. येशूने सदूकी व परूशी यांचा कोणता धिक्कार करताना त्याच्या शिष्यांनी ऐकले?

१४ सा. यु. ३२ च्या वल्हांडणानंतर येशू आणि त्याचे शिष्य गालीलच्या मगदानाच्या हद्दीत आल्यावर, सदूकी व परूशी यांनी येशूकडे पुन्हा एकदा चिन्हाची मागणी केली. त्याने त्यांना पुन्हा म्हटले: “दुष्ट व व्यभिचारी पिढी चिन्ह मागते, परंतु तिला योनाच्या चिन्हावाचून दुसरे चिन्ह दिले जाणार नाही.” (मत्तय १६:१-४) खरोखर, ते धार्मिक ढोंगी लोक, येशूने ‘ही दुष्ट पिढी’ म्हणून धिक्कारलेल्या अविश्‍वासू ‘लोकसमुदायातील’ नेत्यांमध्ये अधिक दोषास्पद होते.

१५. रुपांतराच्या थोडे आधी व त्यानंतर लगेच पुन्हा, येशू आणि त्याच्या शिष्यांना ‘या पिढीबरोबर’ कशाचा सामना करावा लागला?

१५ येशूने गालीलमधील त्याच्या सेवेच्या समाप्तीस लोकसमुदायाला व शिष्यांना आपल्याजवळ बोलावून म्हटले: ‘या व्यभिचारी व पापी पिढीमध्ये ज्या कोणाला माझी व माझ्या वचनाची लाज वाटेल, त्याची लाज मनुष्याच्या पुत्रालाही वाटेल.’ (मार्क ८:३४, ३८) यास्तव, त्या वेळचा पश्‍चात्तापहीन यहुद्यांचा जमाव ‘या व्यभिचारी व पापी पिढीने’ बनला होता हे उघडच आहे. काही दिवसांनी, येशूच्या रुपांतरानंतर तो व त्याचे शिष्य “लोकसमुदायाजवळ आल्यावर,” एका मनुष्याने आपल्या मुलाला बरे करावे अशी त्याच्याकडे विचारणा केली. येशूने म्हटले: “अहाहा, हे विश्‍वासहीन व कुटिल पिढी! मी कोठवर तुम्हाबरोबर असू? कोठवर मी तुमचे सोसू?”—मत्तय १७:१४-१७; लूक ९:३७-४१.

१६. (अ) येशूने यहुदीयात ‘लोकसमुदायाचा’ धिक्कार पुन्हा कसा केला? (ब) ‘या पिढीने’ सर्वात मोठा कोणता गुन्हा केला?

१६ कदाचित यहुदीयात सा. यु. ३२ मधील मांडवांच्या सणानंतर, ‘लोकसमुदाय येशूजवळ एकत्र जमत असताना’ त्याने “ही पिढी दुष्ट पिढी आहे, ही चिन्ह मागते; परंतु योनाच्या चिन्हाशिवाय हिला दुसरे चिन्ह दिले जाणार नाही,” असे म्हणून त्यांचा पुन्हा निषेध केला. (लूक ११:२९) शेवटी, धर्म पुढाऱ्‍यांनी येशूला चौकशीसाठी आणले तेव्हा, पिलाताने त्याची सुटका करण्याची तयारी दर्शवली. अहवाल सांगतो: “मुख्य याजक व वडील ह्‍यांनी बरब्बाला मागून घ्यावे व येशूचा नाश करावा, म्हणून लोकसमुदायांचे मन वळविले. . . . पिलाताने त्यांना म्हटले: ‘तर ख्रिस्त म्हटलेल्या येशूचे मी काय करावे? सर्व म्हणाले, त्याला वधस्तंभावर खिळून टाका. तो म्हणाला, का बरे? त्याने काय वाईट केले आहे? तेव्हा ते फारच आरडाओरड करीत म्हणाले, त्याला वधस्तंभावर खिळून टाका.’” ती “दुष्ट पिढी” येशूला ठार मारण्याची मागणी करीत होती!—मत्तय २७:२०-२५.

१७. पेन्टेकॉस्टच्या वेळी पेत्राने केलेल्या प्रचाराला ‘या कुटिल पिढीतील’ काहींनी कसा प्रतिसाद दिला?

१७ अशा प्रकारे, या ‘विश्‍वासहीन व कुटिल पिढीने,’ तिच्या धार्मिक नेत्यांद्वारे उत्तेजित होऊन, प्रभू येशू ख्रिस्ताचा मृत्यू घडवून आणण्यात प्रमुख भूमिका बजावली. पन्‍नास दिवसानंतर, सा. यु. ३३ मधील पेन्टेकॉस्टच्या वेळी शिष्यांना पवित्र आत्मा मिळाला आणि ते विविध भाषांमध्ये बोलू लागले. आवाज ऐकल्यावर, ‘लोकसमुदाय एकत्र आला’ आणि प्रेषित पेत्राने, “अहो यहुदी लोकांनो व यरुशलेमेतील रहिवाश्‍यांनो,” असे संबोधून म्हटले: “हा मनुष्य [येशू] . . . तुम्ही त्याला धरुन अधर्म्यांच्या हातांनी वधस्तंभावर खिळून मारले.” ऐकणाऱ्‍या काही लोकांनी कशी प्रतिक्रिया दाखवली? “त्यांच्या अंतःकरणास चुटपुट लागली.” मग पेत्राने त्यांना पश्‍चात्ताप करण्यास सांगितले. त्याने “साक्ष दिली व बोध करून म्हटले, ह्‍या कुटिल पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या.” याच्या प्रतिसादात, तीन हजार लोकांनी “त्याच्या संदेशाचा स्वीकार केला [आणि] त्यांचा बाप्तिस्मा झाला.”—प्रेषितांची कृत्ये २:६, १४, २३, ३७, ४०, ४१.

“ही पिढी” ओळखण्यात आली

१८. येशूने वापरलेली “ही पिढी” ही संज्ञा सुसंगतपणे कशाला सूचित करते?

१८ मग, येशूने आपल्या प्रेषितांच्या समक्ष अनेकदा उल्लेख केलेली “पिढी” कोणती आहे? “हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणारच नाही,” या येशूच्या शब्दांवरुन ते काय समजले? येशू, “ही पिढी” या संज्ञेच्या वापरात निश्‍चितच बदल करत नव्हता, कारण तिचा वापर त्याने, समकालीन लोकसमुदाय व सोबत त्यांचे “आंधळे वाटाडी” यांनी बनलेल्या यहुदी राष्ट्राला सुसंगतपणे लागू केला. (मत्तय १५:१४) ‘या पिढीने’ येशूने भाकीत केलेल्या सर्व विपत्ती अनुभवल्या आणि मग जेरुसलेमवर आलेल्या अतुल्य ‘मोठ्या संकटानंतर’ ती लयास गेली.—मत्तय २४:२१, ३४.

१९. यहुदी व्यवस्थेतील “आकाश व पृथ्वी” केव्हा व कशी नाहीशी झाली?

१९ यहोवा, पहिल्या शतकात यहुदी लोकांचा न्याय करत होता. ख्रिस्ताद्वारे यहोवाच्या दयाळू तरतूदीवर विश्‍वास प्रदर्शित करु लागणारे पश्‍चात्तापी जन, त्या ‘मोठ्या संकटातून’ बचावले गेले. अगदी येशूच्या शब्दांप्रमाणेच, भविष्यवाणी करण्यात आलेल्या सर्व गोष्टी घडल्या व यहुदी व्यवस्थीकरणाचे “आकाश व पृथ्वी”—धार्मिक नेते आणि दुष्ट मानवी समाजासहित त्या संपूर्ण राष्ट्राचा नाश झाला. यहोवाने न्यायदंड बजावला होता!—मत्तय २४:३५; पडताळा २ पेत्र ३:७.

२०. सर्व ख्रिश्‍चनांना कोणता समयोचित बोध तातडीसह लागू होतो?

२० येशूच्या भविष्यसूचक शब्दांकडे लक्ष दिलेल्या त्या यहुद्यांना त्यांचे तारण, ‘पिढीचा’ अवधी किंवा काही तारखेचा ‘काळ अथवा ऋतू’ मोजण्याचा प्रयत्न करण्यावर नव्हे, तर दुष्ट समकालीन पिढीपासून वेगळे व आवेशाने देवाची इच्छा करीत राहण्यावर अवलंबून असल्याची जाणीव झाली. येशूच्या भविष्यवाणीतील अंतिम शब्द आपल्या दिवसातील मोठ्या पूर्णतेला लागू होत असले, तरी पहिल्या शतकातील यहुदी ख्रिश्‍चनांनी देखील हा बोध ऐकायचा होता: “तुम्ही तर होणाऱ्‍या ह्‍या सर्व गोष्टी चुकवावयास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहावयास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा.”—लूक २१:३२-३६; प्रेषितांची कृत्ये १:६-८.

२१. नजीकच्या भवितव्यात आपण कोणत्या अचानक विकासाची अपेक्षा करू शकतो?

२१ आज, “परमेश्‍वराचा [यहोवाचा, NW] मोठा दिवस समीप आहे; तो . . . वेगाने येत आहे.” (सफन्या १:१४-१८; यशया १३:९, १३) अचानक, यहोवाच्या स्वतःच्या पूर्वनिश्‍चित केलेल्या ‘दिवस व घटिकेच्या’ वेळी, त्याचा क्रोध जगाच्या धार्मिक, राजकीय आणि व्यापारी घटकांवर तसेच हेका चालवणाऱ्‍या लोकांच्या मिळून बनलेल्या या समकालीन ‘दुष्ट व व्यभिचारी पिढीवर’ भडकेल. (मत्तय १२:३९; २४:३६; प्रकटीकरण ७:१-३, ९, १४) तुमचा ‘मोठ्या संकटातून’ बचाव कसा होऊ शकेल? आमचा पुढील लेख याचे उत्तर देईल आणि भविष्यातील महान आशेबद्दल सांगील.

[तळटीपा]

a या भविष्यवाणीच्या सविस्तर माहितीकरता फेब्रुवारी १, १९९४ च्या टेहळणी बुरुज नियतकालिकातील पृष्ठे २४, २५ पाहा.

b वर्षांच्या ‘सप्तकांबद्दल’ अधिक माहितीकरता वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट्‌ सोसायटी ऑफ न्यूयॉर्क, इंकाने प्रकाशित केलेल्या बायबल—गॉडस्‌ वर्ड ऑर मॅन्स? या पुस्तकातील पृष्ठे १३०-२ पाहा.

c विशिष्ट बायबल, मत्तय २४:३४ मध्ये ही जि·नि·याʹ हॉʹटे याचा अनुवाद पुढीलप्रमाणे करतात: “हे लोक” (डब्ल्यू. एफ. बेक यांचे द होली बायबल इन द लँग्वेज ऑफ टुडे [१९७६]); “हे राष्ट्र” (के. एस. वुस्ट यांचे द न्यू टेस्टामेंट—ॲन एक्स्पॉन्डेड ट्रान्सलेशन [१९६१]); “हे लोक” (डी. एच. स्टर्न यांचे ज्यूईश न्यू टेस्टामेंट [१९७९]).

d या अविश्‍वासू ‘लोकसमुदायाची’ तुलना, गर्विष्ठ धार्मिक नेत्यांनी संगत ठेवण्यास नाकारलेल्या पण येशूला ज्यांचा “कळवळा आला” अशा अम्‌·आʹरेटस्‌ किंवा “धरतीचे लोक” यासोबत करता येणार नाही.—मत्तय ९:३६; योहान ७:४९.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

◻ आपण दानीएल ९:२४-२७ च्या पूर्णतेपासून काय शिकतो?

◻ बायबलमध्ये वापर केल्याप्रमाणे “ही पिढी” ची व्याख्या अलीकडील लेक्सिकन्स कशी देतात?

◻ येशूने “पिढी” या संज्ञेचा वापर सुसंगतेत कसा केला?

◻ पहिल्या शतकात मत्तय २४:३४, ३५ ची पूर्णता कशी झाली?

[१२ पानांवरील चित्रं]

येशूने “ही पिढी” याची तुलना बेलगाम मुलांच्या समूहाशी केली

[१५ पानांवरील चित्रं]

दुष्ट यहुदी व्यवस्थेवर न्यायदंड बजावण्याची घटिका केवळ यहोवाच जाणत होता

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा