वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ९/१५ पृ. १०-१५
  • काळ आणि समय यहोवाच्या हातात

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • काळ आणि समय यहोवाच्या हातात
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाचे काळ आणि समय
  • “पूर्ण होण्याचा समय जसजसा जवळ आला तसतसे”
  • “काळाची पूर्णता झाली तेव्हा”
  • घटना—तारखांची आकडेमोड नव्हे
  • “प्रसंग व समय” यांवर नियंत्रण करणाऱ्‍या यहोवावर भरवसा ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • “मशीहा आम्हांस सापडला आहे”!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • दानीएलाची भविष्यवाणी मशीहाच्या आगमनाविषयी भाकीत करते
    बायबल नेमके काय शिकवते?
  • देवाच्या प्रतिज्ञांवर विश्‍वास ठेवून चालणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ९/१५ पृ. १०-१५

काळ आणि समय यहोवाच्या हातात

“जे काळ व समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत तेजाणणे तुम्हाकडे नाही.”—प्रेषितांची कृत्ये १:७.

१. वेळेसंबंधी विचारलेल्या आपल्या प्रेषितांच्या प्रश्‍नांना येशूने कशाप्रकारे उत्तर दिले?

ख्रिस्ती धर्मजगतात आणि सबंध पृथ्वीवर होणाऱ्‍या ‘सर्व अमंगळ कृत्यांमुळे अनेक लोक उसासे टाकून विलाप करीत आहेत.’ या दुष्ट व्यवस्थीकरणाचा नाश होऊन देवाचे नीतिमान नवे जग शेवटी येणार तरी केव्हा, असा विचार या लोकांच्या मनात येणे साहजिकच नाही का? (यहेज्केल ९:४; २ पेत्र ३:१३) येशूचा मृत्यू होण्याच्या थोड्याच काळाआधी आणि त्याच्या पुनरुत्थानानंतर त्याच्या शिष्यांनीही त्याला वेळेसंबंधी प्रश्‍न विचारले होते. (मत्तय २४:३; प्रेषितांची कृत्ये १:६) तथापि, या प्रश्‍नांचे उत्तर देताना येशूने त्यांना आकडेमोड करून तारखा कशा ठरवायच्या ते सांगितले नाही. एका प्रश्‍नाच्या वेळेस त्याने त्यांना एक संयुक्‍तिक चिन्ह दिले आणि दुसऱ्‍यांदा तो म्हणाला, की “जे काळ व समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत ते जाणणे तुम्हाकडे नाही.”—प्रेषितांची कृत्ये १:७.

२. आपल्या पित्याच्या वेळापत्रकानुसार, शेवटल्या काळी कोणती घटना केव्हा घडणार याविषयी येशूला नेहमीच सांगण्यात आलेले नव्हते हे कशावरून?

२ येशू स्वतः यहोवाचा एकुलता एक पुत्र असून देखील, आपल्या पित्याच्या वेळापत्रकानुसार कोणती घटना केव्हा घडणार याची माहिती प्रत्येक वेळेस त्याला होतीच असे नाही. शेवटल्या दिवसांविषयी केलेल्या आपल्या भविष्यवाणीत येशूने नम्रपणे मान्य केले की, “त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही, स्वर्गातील दिव्यदूतास नाही, पुत्रालाहि नाही.” (मत्तय २४:३६) या दुष्ट व्यवस्थीकरणाचा नायनाट करण्याची नेमकी वेळ पिता जोपर्यंत स्वतः आपल्याला सांगत नाही तोपर्यंत धीर धरायला येशू तयार होता.a

३. देवाच्या उद्देशासंबंधी विचारलेल्या प्रश्‍नांना येशूने दिलेल्या उत्तरावरून आपल्याला काय कळून येते?

३ देवाच्या उद्देशाच्या पूर्णतेनुसार विशिष्ट घटना केव्हा घडतील असे विचारण्यात आले असता, येशूने ज्याप्रकारे उत्तर दिले त्यावरून दोन गोष्टी स्पष्ट होतात. पहिली म्हणजे, यहोवाचे एक वेळापत्रक आहे; दुसरी अशी की, तो आणि केवळ तोच हे वेळापत्रक ठरवतो आणि त्याचे सेवक त्याच्या काळांसंबंधी, समयांसंबधी आधीपासून नेमकी माहिती दिली जाण्याची अपेक्षा करू शकत नाहीत.

यहोवाचे काळ आणि समय

४. प्रेषितांची कृत्ये १:७ येथे “काळ” आणि “समय” असे भाषांतर करण्यात आलेल्या मूळ ग्रीक शब्दांचे काय अर्थ आहेत?

४ “काळ” आणि “समय” म्हणजे नेमके काय? प्रेषितांची कृत्ये १:७ येथे आपण येशूचे जे शब्द वाचतो, त्यांत वेळेचे दोन पैलू आढळतात. ज्या ग्रीक शब्दाचे “काळ” असे भाषांतर करण्यात आले आहे त्याचा अर्थ “कालमर्यादेच्या अर्थाने,” (लहान किंवा मोठा) कालावधी असा होतो. “समय” मात्र, काही खास लक्षणे असलेल्या एका ठरावीक किंवा निश्‍चित काळाच्या संदर्भात किंवा एखाद्या विशिष्ट समयाच्या अथवा कालावधीच्या संदर्भात वापरल्या जाणाऱ्‍या शब्दाचे भाषांतर आहे. या दोन मूळ शब्दांविषयी डब्ल्यू. ई. व्हाइन म्हणतात: “प्रेषितांची कृत्ये १:७ या वचनानुसार, काळ (क्रोनॉस) म्हणजेच कालावधी आणि समय (कैरॉस) अर्थात, काही खास घटनांमुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरलेले काळ हे दोन्ही ‘पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत.’”

५. भ्रष्ट जगाचा नाश करण्याच्या आपल्या उद्देशाविषयी यहोवाने नोहाला केव्हा सांगितले आणि नोहाने कोणती दुहेरी जबाबदारी पार पाडली?

५ जलप्रलयाआधी मानवांनी आणि मानवी शरीरे धारण केलेल्या विद्रोही देवदूतांनी भ्रष्ट करून टाकलेले जग संपुष्टात आणण्याआधी देवाने १२० वर्षांचा कालावधी ठरवून टाकला. (उत्पत्ति ६:१-३) देवाच्या मार्गाने चालणारा नोहा त्यावेळी ४८० वर्षांचा होता. (उत्पत्ति ७:६) तेव्हा त्याला मूलबाळ नव्हते आणि पुढच्या २० वर्षांपर्यंत तो निःसंतानच राहिला. (उत्पत्ति ५:३२) यानंतर बराच काळ लोटला; नोहाची मुले मोठी होऊन त्यांची लग्ने झाली. यानंतरच देवाने पृथ्वीवरून दुष्टाईचा नाश करण्याच्या आपल्या उद्देशाविषयी नोहाला सांगितले. (उत्पत्ति ६:९-१३, १८) तारू बांधण्याची आणि लोकांना प्रचार करण्याची दुहेरी जबाबदारी जरी नोहावर सोपवण्यात आली होती तरीसुद्धा, यहोवाने अद्यापही आपले वेळापत्रक त्याला सांगितलेले नव्हते.—उत्पत्ति ६:१४; २ पेत्र २:५.

६. (अ) वेळेसंबंधी सर्व बाबी आपण यहोवाच्या हाती सोपवून दिल्या आहेत हे नोहाने कसे दाखवले? (ब) आपण नोहाच्या उदाहरणाचे कशाप्रकारे अनुकरण करू शकतो?

६ ‘आपल्याला देवाने जे काही सांगितले ते’ नोहा कितीतरी दशके—कदाचित अर्धे शतक उलटेपर्यंत—करत राहिला. आणि हे सर्व त्याने कोणतीही नेमकी तारीख माहीत नसताना “विश्‍वासाने” केले. (उत्पत्ति ६:२२; इब्री लोकांस ११:७) प्रलयाला केवळ एक आठवडा राहिला होता तोपर्यंत यहोवाने होणाऱ्‍या घटनांची नेमकी वेळ नोहाला सांगितली नव्हती. (उत्पत्ति ७:१-५) नोहाला यहोवावर संपूर्ण भरवसा आणि विश्‍वास असल्यामुळे तो वेळेसंबंधीच्या सर्व बाबी यहोवाच्या हाती सोपवू शकला. प्रलयात यहोवाने त्याला संरक्षण दिले तेव्हा आणि त्यानंतर एका स्वच्छ पृथ्वीवर त्याने पाऊल ठेवले तेव्हाही, त्याचे मन किती कृतज्ञतेने भरून आले असेल! नोहाप्रमाणेच आपल्यासमोरही बचाव होण्याची आशा असल्यामुळे, आपण देवावर त्याच्यासारखाच विश्‍वास दाखवू नये का?

७, ८. (अ) राष्ट्रे आणि जागतिक महाशक्‍ती कशा उदयास आल्या? (ब) यहोवाने ‘माणसांचे नेमलेले समय व त्यांच्या वस्तीच्या सीमा’ कशाप्रकारे ठरविल्या आहेत?

७ प्रलयानंतर नोहाच्या बहुतेक वंशजांनी यहोवाची खरी उपासना सोडून दिली. एकाच ठिकाणी स्थाईक व्हावे या इराद्याने त्यांनी एक शहर वसवले आणि खोट्या उपासनेकरता एक बुरूज बांधायला सुरवात केली. यहोवाने ठरवून टाकले की आता हस्तक्षेप करण्याची वेळ आली आहे. त्याने त्यांच्या भाषेत घोटाळा केला आणि “[बाबेलमधून] त्यांस सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगविले.” (उत्पत्ति ११:४, ८, ९) कालांतराने, वेगवेगळे भाषासमूह वाढून त्यांची राष्ट्रे झाली; यांतील काही राष्ट्रांनी इतर राष्ट्रांना काबीज केले आणि ही राष्ट्रे प्रादेशिक शक्‍ती आणि काही तर जागतिक महाशक्‍ती म्हणून नावारूपास आली.—उत्पत्ति १०:३२.

८ आपल्या उद्देशाची पूर्णता करण्याच्या अनुषंगाने, देवाने प्रसंगी देशांच्या सीमा नेमल्या आणि नेमक्या कोणत्या वेळी एखादे विशिष्ट राष्ट्र त्या विशिष्ट प्रदेशात किंवा जागतिक महाशक्‍तीच्या रूपात सत्ता गाजवील हे ठरवले. (उत्पत्ति १५:१३, १४, १८-२१; निर्गम २३:३१; अनुवाद २:१७-२२; दानीएल ८:५-७, २०, २१) यहोवाच्या काळांच्या आणि समयांच्या या पैलूविषयी प्रेषित पौलाने अथेन्स येथील ग्रीक बुद्धिवंतांना सांगितले: “ज्या देवाने जग व त्यातले अवघे निर्माण केले . . . त्याने एकापासून माणसांची सर्व राष्ट्रे निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या सबंध पाठीवर राहावे असे केले आहे; आणि त्यांचे नेमलेले समय व त्यांच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरविल्या आहेत.”—प्रेषितांची कृत्ये १७:२४, २६.

९. राजांच्या संबंधाने यहोवाने कशाप्रकारे ‘प्रसंग [काळ] व समय बदलले?’

९ पण म्हणून काही सर्वच राजकीय विजय आणि देशादेशांतील उलाढाली देवच घडवून आणतो असा याचा अर्थ होत नाही. तरीसुद्धा, स्वतःचे उद्देश साध्य करण्यासाठी इच्छा असल्यास तो हस्तक्षेप करू शकतो. बाबेलोनी जागतिक महाशक्‍तीचे पतन होऊन त्याठिकाणी मेद व पारस यांचे राज्य स्थापन झाले; दानीएल संदेष्टा हे सर्व आपल्या डोळ्यांनी पाहणार होता, म्हणूनच त्याने यहोवाविषयी म्हटले: “तोच प्रसंग [काळ] व समय बदलतो; तो राजांस स्थानापन्‍न अथवा स्थानभ्रष्ट करितो; तो ज्ञान्यांस ज्ञान देतो व बुद्धिमानांस बुद्धि देतो.”—दानीएल २:२१; यशया ४४:२४–४५:७.

“पूर्ण होण्याचा समय जसजसा जवळ आला तसतसे”

१०, ११. (अ) अब्राहामाच्या वंशजांना दास्यातून सोडवण्याची वेळ देवाने किती आधीपासून ठरवली होती? (ब) आपली सुटका नेमकी केव्हा होणार हे इस्राएली लोकांना माहीत नव्हते हे कशावरून म्हणता येईल?

१० इजिप्शियन जागतिक महाशक्‍तीच्या राजाचा पाणउतारा करून अब्राहामाच्या वंशजांना गुलामीतून सोडवण्याचे नेमके वर्ष यहोवाने चारशे वर्षांच्याही आधीच ठरवून टाकले होते. आपल्या या संकल्पाविषयी अब्राहामाला सांगताना त्याने पुढील आश्‍वासन दिले: “तू निश्‍चितपणे समज की जो देश स्वतःचा नाही अशा देशात तुझे संतान उपरी होऊन राहील व तेथल्या लोकांचे दास्य करील, आणि ते लोक चारशे वर्षे त्यांना छळितील; मग ज्या राष्ट्राचे दास्य ते करितील त्याचे मी पारिपत्य करीन; त्यानंतर ते पुष्कळ धन घेऊन तेथून निघतील.” (उत्पत्ति १५:१३, १४) यहुदी न्यायसभेपुढे इस्राएल राष्ट्राचा इतिहास सारांशरूपात सांगताना स्तेफनाने याच ४०० वर्षांच्या कालावधीच्या संदर्भात म्हटले: “मग देवाने अब्राहामाला जे अभिवचन दिले होते ते पूर्ण होण्याचा समय जसजसा जवळ आला तसतसे ते लोक मिसर देशात वाढून संख्येने पुष्कळ झाले. योसेफाची माहिती नसलेला असा दुसरा राजा मिसर देशाच्या गादीवर बसेपर्यंत असे चालले.”—प्रेषितांची कृत्ये ७:६, १७, १८.

११ या नव्या फारोने इस्राएली लोकांना गुलाम बनवले. मोशेने अद्याप उत्पत्तीचे पुस्तक लिहिलेले नव्हते; पण यहोवाने अब्राहामाला दिलेली अभिवचने तोंडी किंवा लेखी स्वरूपात कदाचित पुढच्या पिढ्यांना दिल्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीसुद्धा, या जुलमातून आपली नेमक्या कोणत्या तारखेला सुटका होईल हे त्या इस्राएली लोकांना उपलब्ध माहितीच्या आधारावर आकडेमोड करून ठरवता आले नाही. आपण त्यांना केव्हा सोडवू हे देवाला माहीत होते, पण गुलामीत अडकलेल्या इस्राएली लोकांना मात्र ते सांगण्यात आलेले नव्हते. बायबल सांगते: “बराच काळ लोटल्यावर मिसराचा राजा मृत्यु पावला; इकडे इस्राएलवंशज बिकट दास्यामुळे उसासे टाकून आक्रोश करीत, आणि त्या दास्यामुळे त्यांनी केलेली आरोळी वर देवापर्यंत जाऊन पोहंचली. देवाने त्यांचा आकांत ऐकला तेव्हा अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्याशी केलेल्या कराराचे त्यास स्मरण झाले, म्हणून देवाने इस्राएलवंशजांकडे दृष्टि लावली; देवाने त्यांच्याकडे लक्ष पुरविले.”—निर्गम २:२३-२५.

१२. देवाने ठरवलेला काळ येण्याआधीच मोशेने पाऊल उचलले हे स्तेफनाने कसे दाखवले?

१२ इस्राएलाच्या सुटकेची नेमकी वेळ सांगण्यात आलेली नव्हती हे स्तेफनाच्या सारांशावरूनही कळून येते. मोशेविषयी सांगताना तो म्हणतो: “तो जवळजवळ चाळीस वर्षांचा झाला तेव्हा आपले बांधव म्हणजे इस्राएलाचे संतान ह्‍यांची भेट घ्यावी असे त्याच्या मनात आले. तेव्हा मोशेने त्यांतील कोणाएकावर अन्याय होत आहे असे पाहून या जाचलेल्या माणसाचा कैवार घेतला आणि मिसऱ्‍याला मारून त्याचा सूड उगविला. तेव्हा देव त्याच्या हातून त्याच्या बांधवांची सुटका करीत आहे हे त्यांना समजले असेल असे त्याला वाटले होते, पण ते त्यांना समजले नाही.” (तिरपे वळण आमचे.) (प्रेषितांची कृत्ये ७:२३-२५) देवाने ठरवलेल्या काळापेक्षा ४० वर्षांआधी मोशेने हे पाऊल उचलले. स्तेफन सांगतो त्याप्रमाणे, मोशेला आणखी ४० वर्षे थांबावे लागले आणि त्यानंतर ‘देवाने त्याच्या हातून त्याच्या बांधवांची सुटका केली.’—प्रेषितांची कृत्ये ७:३०-३६.

१३. इजिप्तमधून सुटका होण्यापूर्वी इस्राएली लोकांची जशी स्थिती होती तशी आपलीही आहे असे कोणत्या अर्थाने म्हणता येईल?

१३ ‘जे अभिवचन दिले होते ते पूर्ण होण्याचा समय जवळ आला होता’ आणि देवाने यासाठी नेमके वर्षही ठरवून टाकलेले होते, तरीसुद्धा मोशेला आणि सर्वच इस्राएली लोकांना विश्‍वास धरायचा होता. यहोवाची नियुक्‍त वेळ येईपर्यंत त्यांना वाट पाहात राहायचे होते; ती नेमकी वेळ आकडेमोड करून आधीपासूनच ठरवणे त्यांना शक्य नव्हते. आपल्यालाही याची पूर्ण खात्री आहे, की सध्याच्या या दुष्ट व्यवस्थीकरणातून आपली सुटका होण्याची वेळ जवळ येत चालली आहे. आपण “शेवटल्या काळी” जगत आहोत हे आपल्याला माहीत आहे. (२ तीमथ्य ३:१-५) तेव्हा आपण देखील यहोवाच्या महान दिवसाच्या नियुक्‍त वेळेकरता विश्‍वासाने थांबून राहण्यास तयार असू नये का? (२ पेत्र ३:११-१३) मग मोशे आणि सर्व इस्राएली लोकांप्रमाणे आपण देखील आपली सुटका केल्याबद्दल यहोवाची स्तुती करण्यासाठी हर्षमय गीत गाऊ शकू.—निर्गम १५:१-१९.

“काळाची पूर्णता झाली तेव्हा”

१४, १५. देवाने आपल्या पुत्राची पृथ्वीवर येण्याची निश्‍चित वेळ ठरवली होती हे आपल्याला कसे कळून येते आणि संदेष्टे व देवदूत देखील कशाची जागृत राहून वाट पाहात होते?

१४ आपल्या एकुलत्या एका पुत्राने पृथ्वीवर मशीहा म्हणून येण्याकरता यहोवाने एक विशिष्ट काळ ठरवला होता. पौलाने लिहिले: “काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठविले; तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन जन्मलेला असा होता.” (गलतीकर ४:४) देवाने एक संतती पाठवण्याचे, अर्थात ‘राष्ट्रे ज्याच्या आज्ञांकित होतील तो [“शिलो,” तळटीप]’ येण्याचे अभिवचन दिले होते; या अभिवचनाची ही पूर्णता होती.—उत्पत्ति ३:१५; ४९:१०.

१५ देवाचे संदेष्टे, किंबहुना देवदूत देखील मशीहा पृथ्वीवर येईल आणि पापी मनुष्यजातीसाठी तारण शक्य होईल त्या ‘काळाची’ [समयाची] जागृत राहून वाट पाहात होते. पेत्राने सांगितल्याप्रमाणे “ज्या संदेष्ट्यांनी तुम्हांवर होणाऱ्‍या कृपेविषयी पूर्वी सांगितले, त्यांनी त्या तारणाविषयी बारकाईने शोध केला; त्यांच्यामध्ये जो ख्रिस्ताचा आत्मा होता त्याने ख्रिस्ताची दुःखे व त्यानंतरच्या गौरवयुक्‍त गोष्टी पूर्वीच सांगितल्या; त्यांत त्याने कोणता अथवा कसा काळ सुचविला ह्‍याविषयी ते शोध करीत होते. . . . त्या गोष्टी न्याहाळून पाहण्याची उत्कंठा देवदूतांना आहे.”—१ पेत्र १:१-५, १०-१२.

१६, १७. (अ) यहोवाने कोणत्या भविष्यवाणीच्या माध्यमाने पहिल्या शतकातील यहुद्यांना मशीहाच्या येण्याची वाट पाहण्यास मदत केली? (ब) यहुदी लोक मशीहाची वाट पाहात होते, त्यावर दानीएलाच्या भविष्यवाणीचा कसा प्रभाव पडला?

१६ अढळ विश्‍वास बाळगणारा—आपला संदेष्टा दानीएल याच्याद्वारे यहोवाने ‘सत्तर सप्तकांची’ एक भविष्यवाणी केली होती. या भविष्यवाणीच्या आधारावर पहिल्या शतकातील यहुद्यांना वचनयुक्‍त मशीहा येण्याची वेळ जवळ आली आहे हे समजणे शक्य होते. या भविष्यवाणीचा एक भाग असा होता: “यरुशलेमेचा जीर्णोद्धार करावा व ती बांधावी अशी आज्ञा निघाल्यापासून मशीहा जो अधिपती त्याच्या समयापर्यंत सात सप्तके व बासष्ट सप्तके होतील.” (दानीएल ९:२४, २५, पं.र.भा.) यहुदी, कॅथलिक आणि प्रोटेस्टंट विद्वान देखील मान्य करतात की येथे उल्लेखलेली “सप्तके” म्हणजे वर्षांची सप्तके आहेत. दानीएल ९:२५ येथे ज्यांचा उल्लेख आहे ती एकोणसत्तर “सप्तके” सा.यु.पू. ४५५ साली सुरू झाली; या वर्षी पर्शियन राजा अर्तहशश्‍त याने नहेम्याला “यरुशलेमेचा जीर्णोद्धार करावा व ती बांधावी” अशी परवानगी दिली. (नहेम्या २:१-८) त्यानंतर ४८३ वर्षे लोटल्यावर—सा.यु. २९ साली येशूचा बाप्तिस्मा झाला आणि पवित्र आत्म्याने अभिषेक होऊन तो मशीहा, अर्थात ख्रिस्त बनला तेव्हा ही एकोणसत्तर सप्तके संपली.—मत्तय ३:१३-१७.

१७ ही ४८३ वर्षे नेमकी केव्हा सुरू झाली हे पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांना ठाऊक होते किंवा कसे हे निश्‍चित नाही. पण बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानाने आपली सेवा सुरू केली तेव्हा ‘लोक वाट पाहत होते व हाच ख्रिस्त असेल काय असा सर्व जण योहानाविषयी आपल्या मनात विचार करीत होते.’ (लूक ३:१५) काही बायबल विद्वान त्यांच्या या वाट पाहण्याचा दानीएलाच्या भविष्यवाणीशी संबंध जोडतात. या वचनावर भाष्य करताना मॅथ्यू हेनरी लिहितात: “येथे सांगितले आहे की . . . योहानाची सेवा आणि त्याचा बाप्तिस्मा पाहून लोक मशीहाविषयी विचार करू लागले होते, तो अगदी दाराशीच आहे असे ते समजायचे. . . . दानीएलाची सत्तर सप्तके आता संपत आली होती.” व्हिगुरू बाक्वेज आणि ब्रासाक यांच्या फ्रेंच भाषेतल्या मान्युएल बीब्लीक या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे: “दानीएलाने ठरवून दिलेली वर्षांची सत्तर सप्तके संपत आली आहेत हे लोकांना माहीत होते; बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानाने देवाचे राज्य जवळ आले आहे असे घोषित केले तेव्हा कोणाला फारसे आश्‍चर्य झाले नाही.” यहुदी विद्वान अब्बा हिलेल सिलव्हर यांनी आपल्या ग्रंथात लिहिले की त्या काळच्या “सर्वमान्य कालगणनेच्या पद्धतीनुसार, सा.यु. २५ ते ५० च्या दरम्यान मशीहा येईल असा लोकांचा अंदाज होता.”

घटना—तारखांची आकडेमोड नव्हे

१८. दानीएलाची भविष्यवाणी, यहुद्यांना मशीहा येण्याचा काळ ओळखून त्याची वाट पाहण्यास सहायक ठरली, तरीसुद्धा येशू मशीहा असल्याचा सर्वात खात्रीलायक पुरावा कोणता होता?

१८ कालगणनेच्या आधारे यहुदी लोकांना मशीहा केव्हा येणार याचा साधारण अंदाज बांधता आला; परंतु पुढच्या घटनांवरून स्पष्ट झाल्याप्रमाणे या कालगणनेमुळे येशू मशीहा असल्याची खात्री त्यांच्यापैकी पुष्कळांना पटली नव्हती. आपल्या मृत्यूच्या साधारण एका वर्षाआधी, येशूने शिष्यांना विचारले: “लोक मला कोण म्हणून म्हणतात?” तेव्हा त्यांनी उत्तर दिले: “बाप्तिस्मा करणारा योहान; पण कित्येक म्हणतात एलीया; आणि कित्येक म्हणतात की, प्राचीन संदेष्ट्यांपैकी कोणीतरी पुन्हा उठला आहे.” (लूक ९:१८, १९) स्वतः येशूनेही या सांकेतिक सप्तकांच्या भविष्यवाणीचा आपण मशीहा असल्याचे सिद्ध करण्यासाठी उपयोग केला, असे आपल्याला कुठेही वाचायला मिळत नाही. पण एकदा तो म्हणाला: “माझ्याजवळ जी साक्ष आहे ती योहानाच्या साक्षीपेक्षा मोठी आहे; कारण जी कार्ये सिद्धीस नेण्याचे पित्याने माझ्याकडे सोपविले आहे, म्हणजे जी कार्ये मी करितो तीच माझ्याविषयी साक्ष देतात की, पित्याने मला पाठविले आहे.” (योहान ५:३६) कोणत्याही कालक्रमाने नव्हे, तर येशूचा प्रचार, त्याचे चमत्कार आणि त्याच्या मृत्यूच्या वेळी घडलेल्या घटना (चमत्कारिक अंधार, मंदिरातल्या पडद्याचे दुभंगणे आणि भूकंप) यांमुळे तो देवाने पाठविलेला मशीहा आहे, हे स्पष्ट झाले.—मत्तय २७:४५, ५१, ५४; योहान ७:३१; प्रेषितांची कृत्ये २:२२.

१९. (अ) जेरूसलेमचा नाश जवळ आला आहे हे ख्रिश्‍चनांना कसे कळणार होते? (ब) सुरवातीचे काही ख्रिश्‍चन जेरूसलेम सोडून पळून गेले, तरीसुद्धा दृढ विश्‍वास बाळगणे त्यांच्यासाठी का अगत्याचे होते?

१९ येशूच्या मृत्यूनंतर सुरवातीच्या ख्रिश्‍चनांना देखील यहुदी व्यवस्थीकरणाचा अंत केव्हा होणार हे ठरवण्याकरता कोणताही मार्ग पुरवण्यात आला नव्हता. दानीएलाच्या सांकेतिक सप्तकांच्या भविष्यवाणीत यहुदी व्यवस्थीकरणाच्या अंताचा उल्लेख होता. (दानीएल ९:२६ब, २७ब) पण हे, “सत्तर सप्तके” संपल्यानंतर घडणार होते (सा.यु.पू. ४५५-सा.यु. ३६). दुसऱ्‍या शब्दांत सांगायचे झाल्यास, सा.यु. ३६ साली विदेशी पहिल्यांदा येशूचे अनुयायी बनले त्यानंतर, दानीएलच्या ९ व्या अध्यायात ख्रिस्ती लोकांसाठी आणखी कोणतेच कालसंकेत उरले नाहीत. यहुदी व्यवस्थीकरण लवकरच नष्ट होणार हे त्यांना कालगणनेच्या आधारावर नव्हे, तर घटनांच्या आधारावर कळून येणार होते. सा.यु. ६६ साली रोमी सैन्यांनी जेरूसलेमवर हल्ला केला आणि मग माघार घेतली तेव्हापासून येशूने भाकीत केलेल्या या घटनांची अखेरची पूर्णता होऊ लागली. या घटनांवर लक्ष ठेवून असणाऱ्‍या जेरूसलेम आणि यहुदिया येथील विश्‍वासू ख्रिश्‍चनांना ‘डोंगरात पळून जाण्याची’ संधी मिळाली. (लूक २१:२०-२२) कोणतेही कालसंकेत नसल्यामुळे जेरूसलेमचा अंत केव्हा होणार हे त्या सुरवातीच्या ख्रिश्‍चनांना माहीत नव्हते. अशातही आपापले घरदार, शेतीवाडी, कामधंदे इत्यादी सोडून सा.यु. ७० साली रोमी सैन्याने परत येऊन यहुदी व्यवस्थीकरणाचा सर्वनाश केला तोपर्यंत, म्हणजे जवळजवळ चार वर्षे जेरूसलेमच्या बाहेर राहण्यासाठी त्यांना किती दृढ विश्‍वास बाळगावा लागला असेल!—लूक १९:४१-४४.

२०. (अ) नोहा, मोशे आणि यहुदियात राहणाऱ्‍या पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांच्या उदाहरणांवरून आपल्याला कोणत्या प्रकारे फायदा होतो? (ब) पुढच्या लेखात आपण कशाविषयी चर्चा करणार आहोत?

२० नोहा, मोशे आणि यहुदियात राहणाऱ्‍या पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांसारखे आपण देखील आज काळ आणि समय देवाच्या हातात सोपवून निश्‍चिंत राहू शकतो. आपण शेवटल्या काळी जगत आहोत आणि आपली सुटका होण्याची वेळ अगदी जवळ आली आहे हा आपला विश्‍वास केवळ तारखांच्या आकडेमोडीवर नव्हे, तर बायबलच्या भविष्यवाण्यांच्या पूर्णतेत घडत असलेल्या खऱ्‍याखुऱ्‍या घटनांवर आधारलेला आहे. शिवाय, आपण ख्रिस्ताच्या उपस्थितीच्या काळात जगत असलो तरीसुद्धा आपल्याला अद्यापही विश्‍वास बाळगून जागृत राहायचे आहे. पुढेही आपण बायबलमध्ये भाकीत करण्यात आलेल्या चित्तथरारक घटनांची उत्सुकतेने वाट पाहात राहूया. हाच पुढच्या लेखाचा विषय आहे.

[तळटीपा]

a टेहळणी बुरूज, ऑगस्ट १, १९९६ अंकातील पृष्ठे ३०-१ पाहा.

[उजळणी]

◻ यहोवाचे काळ आणि समय यांविषयी येशूने आपल्या प्रेषितांना काय सांगितले?

◻ जलप्रलय केव्हा सुरू होणार हे नोहाला किती काळाआधी समजले?

◻ इजिप्तमधून आपली सुटका नेमकी केव्हा होणार हे मोशे आणि इस्राएली लोकांना माहीत नव्हते हे कशावरून म्हणता येईल?

◻ यहोवाचे काळ आणि समय यांसंबंधी बायबलच्या उदाहरणांचा आपल्याला कोणत्याप्रकारे फायदा होतो?

[११ पानांवरील चित्र]

नोहाने काळासंबंधी सर्व बाबी यहोवाच्या हातात सोपवून दिल्या कारण त्याचा देवावर विश्‍वास होता

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा