देवाप्रती तुम्ही तुमचे पूर्ण कर्तव्यकर्म पार पाडत आहात का?
“सगळ्या बऱ्यावाईट गुप्त गोष्टींचा न्याय करिताना देव सगळ्या कृत्यांची झाडाझडती घेईल.”—उपदेशक १२:१४.
१. यहोवाने त्याच्या लोकांकरता कोणत्या तरतुदी केल्या आहेत?
यहोवाचे लोक त्याची सेवा करत असताना आणि राज्याच्या सुवार्तेचे महत्त्वपूर्ण प्रचारकार्य पार पाडत असताना त्यांना यहोवा देवाकडून अनेक प्रकारे आशीर्वाद प्राप्त होतो. एक तर, यहोवा स्वतः आपल्या लोकांना पाठिंबा देतो कारण ते आपल्या महान निर्माणकर्त्याला स्मरून चालतात. दुसरे म्हणजे त्याचे प्रेरित वचन त्यांना अशाप्रकारचे ज्ञान देते ज्यामुळे त्यांना त्याला पूर्णपणे आनंदी करता येते. शिवाय, देवाचा आत्मा त्यांना ईश्वरी इच्छेप्रमाणे चालण्यास आणि “प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फळ द्यावे” म्हणून मार्गदर्शन करतो. (कलस्सैकर १:९, १०) तसेच, ‘विश्वासू आणि बुद्धिमान दासाद्वारे’ यहोवा त्यांना नियमितपणे आध्यात्मिक अन्न आणि ईश्वरशासित मार्गदर्शन पुरवतो. (मत्तय २४:४५-४७) तर मग अशा अनेक मार्गांनी, यहोवाची सेवा करत असताना आणि राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करत असताना देवाच्या लोकांना आशीर्वाद प्राप्त होतो.—मार्क १३:१०
२. यहोवाची सेवा करताना कोणते प्रश्न मनात येऊ शकतात?
२ यहोवाच्या पवित्र सेवेमध्ये व्यग्र राहण्यात खऱ्या ख्रिश्चनांना आनंद प्राप्त होतो. पण त्यांपैकी काही जण कदाचित निराश होतील आणि आपली सेवा निरर्थक आहे असा विचार करू लागतील. उदाहरणार्थ, आपल्या नेकीच्या प्रयत्नांचे खरेच काही मोल आहे का, अशी शंका काही वेळा समर्पित ख्रिस्ती लोकांच्या मनात येईल. कौटुंबिक अभ्यासावर आणि इतर कार्यहालचालींवर विचार करत असताना कुटुंबाचे मस्तक असलेल्याच्या मनात असे प्रश्न येऊ शकतात: ‘आम्ही जे काही करतो त्यामुळे यहोवा खरोखरच आनंदी आहे का? देवाप्रती आम्ही पूर्ण कर्तव्यकर्म पार पाडत आहोत का?’ उपदेशकाच्या उद्बोधक शब्दांतून आपल्याला या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील.
सर्व काही व्यर्थ?
३. उपदेशक १२:८ या वचनानुसार सर्वात मोठी व्यर्थता कोणती म्हणता येईल?
३ “व्यर्थ हो व्यर्थ! उपदेशक म्हणतो, सर्व काही व्यर्थ!” (उपदेशक १२:८) काही जण कदाचित म्हणतील की शलमोनाचे हे शब्द केवळ तरुणांच्याच नव्हे तर वयस्कांच्याही दृष्टिकोनातून विचार केल्यास, अतिशय निराशावादी वाटतात. पण खरे पाहता, तारुण्यात आपल्या महान निर्माणकर्त्याकडे दुर्लक्ष करणे, सबंध आयुष्य त्याची सेवा न करताच घालवणे आणि इतकी वर्षे आपण जगलो यातच केवळ समाधान मानणे यापेक्षा मोठी व्यर्थता कोणती असू शकते. दियाबल सैतानाला वश झालेल्या या जगातील संपत्ती आणि नावलौकिक प्राप्त करूनही अशा व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा या सर्व गोष्टी व्यर्थ ठरतात.—१ योहान ५:१९.
४. सर्वकाही व्यर्थ नाही असे का म्हणता येईल?
४ पण यहोवाचे विश्वासू सेवक या नात्याने स्वर्गात संपत्ती गोळा करणाऱ्यांचे जीवन व्यर्थ ठरत नाही. (मत्तय ६:१९, २०) प्रभूच्या आनंददायक सेवेत करण्यासारखे त्यांना पुष्कळ आहे आणि त्यांचे हे श्रम निश्चितच कधीही व्यर्थ जाणार नाहीत. (१ करिंथकर १५:५८) पण आपण समर्पित ख्रिस्ती असल्यास, या शेवटल्या काळात देवाने दिलेल्या कामात आपण व्यग्र राहात आहोत का? (२ तीमथ्य ३:१) की आपल्या आसपासच्या, शेजारपाजारच्या लोकांप्रमाणेच आपण जीवन जगत आहोत? त्यांचा विविध धर्मांशी संबंध असेल आणि कदाचित ते अगदी प्रामाणिकपणे त्याचे पालन करत असतील, त्यांच्या मंदिरात ते नियमितपणे जात असतील आणि त्यांच्या धर्मांच्या नियमांचे काटेकोर पालनही करत असतील. अर्थात, ते देवाच्या संदेशाचे प्रचारक नाहीत हे नक्की. हा ‘अंतसमय’ आहे याचे ज्ञान त्या लोकांना नाही आणि आपण ज्या काळात जगत आहोत तो किती निकडीचा काळ आहे याची त्यांना जाण नाही.—दानीएल १२:४.
५. जीवनाच्या सामान्य गोष्टींचीच आपल्याला चिंता लागली असल्यास आपण काय केले पाहिजे?
५ येशू ख्रिस्ताने आपल्या या कठीण काळाविषयी असे म्हटले: “नोहाच्या दिवसांत होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. तेव्हा जसे जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसांत नोहा तारवात गेला त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते, आणि जलप्रलय येऊन सर्वांस वाहवून नेईपर्यंत त्यांस समजले नाही; तसेच मनुष्याच्या पुत्राचेहि येणे होईल.” (मत्तय २४:३७-३९) खाण्यापिण्यात माफकपणा असला तर त्यात वाईट असे काही नाही आणि विवाहाची व्यवस्था तर स्वतः देवाने केली आहे. (उत्पत्ति २:२०-२४) पण जीवनाच्या या सामान्य गोष्टींचीच आपल्याला चिंता लागली आहे, हे आपल्या लक्षात आल्यावर त्याविषयी आपण प्रार्थना का करू नये? राज्य आस्थेला प्रथम स्थानी ठेवण्यास, योग्य ते करण्यास आणि देवाप्रती आपले कर्तव्यकर्म पूर्ण करण्यास यहोवा आपल्याला मदत करू शकतो.—मत्तय ६:३३; रोमकर १२:१२; २ करिंथकर १३:७.
समर्पण आणि देवाप्रती आपले कर्तव्य
६. काही बाप्तिस्माप्राप्त ख्रिस्ती देवाप्रती त्यांचे कर्तव्य पार पाडण्यात कोणत्या प्रकारे उणे पडत आहेत?
६ काही बाप्तिस्माप्राप्त ख्रिश्चनांना मनःपूर्वक प्रार्थना करण्याची आवश्यकता आहे कारण देवाला समर्पण करतेवेळी त्यांनी देवाप्रती जी सेवकपणाची कर्तव्ये स्वीकारली होती त्याप्रमाणे ते आता जगत नाहीत. काही वर्षांपासून दर वर्षी सुमारे ३,००,००० लोक बाप्तिस्मा घेत आहेत, पण यहोवाच्या नावाविषयी व राज्याविषयी साक्ष देणाऱ्यांच्या संख्येत मात्र तितकीच वाढ झालेली नाही. राज्य प्रचारक झालेल्या काही जणांनी सुवार्तेचा प्रचार करण्याचे थांबवले आहे. खरे पाहता, एक व्यक्ती ख्रिस्ती सेवाकार्यामध्ये अर्थपूर्ण सहभाग घेऊ लागल्यावरच तिला बाप्तिस्मा घेता येतो. त्याअर्थी, “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा,” या येशूने त्याच्या अनुयायांना दिलेल्या कार्याची या लोकांनाही पूर्ण जाण आहे. (मत्तय २८:१९, २०) अर्थात, प्रकृतीमुळे किंवा त्यांच्या इतर अपरिहार्य कारणांमुळे ते असमर्थ असतील तर गोष्ट वेगळी; पण अशी कारणे नसताना बाप्तिस्माप्राप्त लोकांनी देवाचे आणि ख्रिस्ताचे सक्रिय साक्षीदार या नात्याने कार्य करण्याचे थांबवल्यास ते आपल्या महान निर्माणकर्त्याप्रती त्यांचे पूर्णकर्तव्य पार पाडत आहेत, असे म्हणता येणार नाही.—यशया ४३:१०-१२.
७. उपासनेकरता आपण नियमितरित्या एकत्र का आले पाहिजे?
७ प्राचीन इस्राएल देवाला समर्पित असे राष्ट्र होते आणि नियमशास्त्रानुसार त्या राष्ट्रातील लोकांना यहोवाप्रती काही कर्तव्ये पूर्ण करायची होती. उदाहरणार्थ, सर्व पुरुषांनी तीन वार्षिक सणांकरता उपस्थित राहावे अशी आज्ञा होती आणि वल्हांडण सणाला मुद्दाम गैरहजर राहणाऱ्या पुरुषाचा “उच्छेद” करण्यात येत असे. (गणना ९:१३; लेवीय २३:१-४३; अनुवाद १६:१६) देवाचे समर्पित लोक या नात्याने आपले कर्तव्य पार पाडण्याकरता सर्व इस्राएल लोकांना उपासनेकरता एकत्र यावे लागायचे. (अनुवाद ३१:१०-१३) नियमशास्त्रामध्ये असे म्हटले नव्हते, की ‘तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही असे करा.’ यहोवाला समर्पित असलेल्या आजच्या लोकांकरता एकत्र होण्याच्या आज्ञेवर पौलाच्या पुढील शब्दांमुळे आणखी जोर पडतो: “प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांस बोध करावा, आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसतसा तो अधिक करावा.” (इब्री लोकांस १०:२४, २५) होय, सहविश्वासूंसोबत नियमितपणे एकत्र येणे हा ख्रिस्ती व्यक्तीच्या देवाप्रती असलेल्या कर्तव्याचा एक भाग आहे.
तुमचे निर्णय काळजीपूर्वक तोलून पाहा!
८. तरुण बाप्तिस्माप्राप्त मनुष्याने त्याच्या पवित्र सेवेविषयी प्रार्थनापूर्वक विचार का केला पाहिजे?
८ तुम्ही कदाचित यहोवाला समर्पण केलेली तरुण व्यक्ती असाल. तुम्ही देवाच्या राज्याशी संबंधित गोष्टींना आपल्या जीवनात प्राधान्य दिल्यास तुम्हाला अनेक आशीर्वाद प्राप्त होतील. (नीतिसूत्रे १०:२२) प्रार्थना आणि काळजीपूर्वक योजना केल्याने तुम्हाला तुमच्या तारुण्यातील काही वर्षे कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या पूर्णवेळेच्या सेवेत घालवता येतील. तुम्ही तुमच्या निर्माणकर्त्याला स्मरता हे दाखवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. नाहीतर हळूहळू भौतिक गोष्टींतच तुमच्या जीवनातील जास्तीत-जास्त वेळ आणि लक्ष जाईल. सर्वसामान्य लोकांप्रमाणे तुम्हीही कदाचित लवकर लग्न कराल आणि निरनिराळ्या भौतिक गोष्टी मिळवण्यासाठी कर्ज घ्याल. पैसा मिळवून देणाऱ्या करिअरच्या मागे लागल्याने तुमचा खूपच वेळ आणि श्रम खर्ची पडेल. तुम्हाला मुले असल्यास त्यांची जबाबदारी तुमच्या खांद्यावर कितीतरी दशके राहील. (१ तीमथ्य ५:८) तुम्हाला कदाचित तुमच्या महान निर्माणकर्त्याचे विस्मरण झाले नसेल, पण या गोष्टीची जाण असणे केव्हाही चांगले आहे, की तुमची आगाऊ योजना किंवा योजनेची उणीव यांवर तुमचे भवितव्यातील जीवन अवलंबून राहील. उतारवयात, तुम्ही आपल्या जीवनाकडे सिंहावलोकन कराल तेव्हा तुम्हाला कदाचित वाटेल तुमच्या तारुण्यातील काही वर्षे आपल्या महान निर्माणकर्त्याच्या पवित्र सेवेत घालवता आली असती तर किती बरे झाले असते! त्यापेक्षा तारुण्यातील दिवसांमध्ये यहोवाची पवित्र सेवा केल्यामुळे समाधान प्राप्त होण्याकरता भवितव्यातील योजनांवर आताच विचार करणे चांगले नाही का?
९. मंडळीमध्ये एकेकाळी जबाबदारी सांभाळलेल्या पण आता वृद्ध झालेल्या बांधवाला काय करता येण्यासारखे आहे?
९ आता दुसऱ्या परिस्थितींचा विचार करा—असा मनुष्य ज्याने “देवाच्या कळपाचे” एकेकाळी पालन केले आहे. (१ पेत्र ५:२, ३) काही कारणास्तव त्याने कळपाचे पालन करण्याचा सुहक्क स्वेच्छेने त्यागला आहे. हे खरे आहे, की तो मनुष्य आता वृद्ध झाला आहे आणि देवाची सेवा करणे आता त्याच्याकरता आणखीनच कठीण होऊन बसले आहे. पण पुन्हा एकदा त्याला ईश्वरशासित बहुमानांकरता प्रयत्न करता येण्यासारखा आहे का? अशा मनुष्याला मंडळीची जबाबदारी खांद्यावर घेता आली तर त्याच्यामुळे मंडळीतील इतर लोकांना किती लाभ होईल! आणि कोणीही स्वतःकरता जगत नाही त्यामुळे अशा मनुष्याला त्याची सेवा वाढवता आली, देवाचे आणखी गौरव करता आले तर मित्रपरिवार आणि प्रियजनांना त्यामुळे आनंदच होईल. (रोमकर १४:७, ८) सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यहोवाच्या सेवेकरता केलेले श्रम तो कधीही विसरणार नाही. (इब्री लोकांस ६:१०-१२) तर मग, आपल्या महान निर्माणकर्त्याचे स्मरण ठेवण्याकरता आपल्याला कशामुळे मदत होईल?
आपल्या महान निर्माणकर्त्याचे स्मरण ठेवण्याकरता मदत
१०. आपल्या महान निर्माणकर्त्याला स्मरण्याविषयी मार्गदर्शक गोष्टी उपदेशकालाच उत्तमप्रकारे का सांगता आल्या?
१० आपल्या महान निर्माणकर्त्याला कसे स्मरावे याविषयी उपदेशकालाच उत्तमप्रकारे सांगता येईल. त्याने मनापासून केलेल्या प्रार्थनेचे यहोवाने उत्तर दिले आणि त्याला असाधारण बुद्धी बहाल केली. (१ राजे ३:६-१२) शलमोनाने मनुष्याच्या जीवनातील सर्व घडामोडींचे चांगल्या प्रकारे परीक्षण केले. याशिवाय, त्याला उलगडलेल्या सर्व गोष्टी इतरांच्या लाभाकरता लिहून ठेवण्यासाठी त्याला देवाने प्रेरणा दिली. त्याने लिहिले: “उपदेशक ज्ञानी असून तो लोकांना ज्ञान शिकवीत गेला; त्याने विचार व शोध करून पुष्कळ बोधवचने रचली. सरळ लिहिलेली सत्य व मनोहर वचने शोधण्याचा उपदेशकाने प्रयत्न केला आहे.”—उपदेशक १२:९, १०.
११. शलमोनाचा बुद्धिमान सल्ला आपण का स्वीकारला पाहिजे?
११ ग्रीक सेप्ट्युजींट यामध्ये वरील शब्द अशाप्रकारे लिहिले आहेत: “आणि याशिवाय, उपदेशक बुद्धिवंत असल्यामुळे, त्याने मानवजातीला बुद्धी शिकवल्यामुळे तसेच त्याने दाखल्यावरून शिकवलेल्या गोष्टी ऐकणाऱ्याला सुरेख वाटतील, आनंदविणारे शब्द आणि धार्मिकतेचे लिखाण—सत्याचे शब्द लिहिण्याकरता उपदेशकाने खूप मेहनत घेतली आहे.” (द सेप्ट्युजींट बायबल, चार्ल्स थॉमसन यांच्याद्वारे भाषांतरित) आनंददायक शब्द तसेच खरोखरच मनोरंजक आणि उचित विषयांकरवी वाचकांच्या हृदयाचा ठाव घेण्याचा शलमोनाने प्रयत्न केला. शास्त्रवचनांमध्ये असणारे त्याचे शब्द पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने जतन करून ठेवण्यात आले आहेत, त्यामुळे त्याला गवसलेल्या संकल्पना आणि त्याच्या बुद्धिमान सल्ल्याचा आपल्याला तत्परतेने स्वीकार करता येईल.—२ तीमथ्य ३:१६, १७.
१२. उपदेशक १२:११, १२ येथे नमूद करण्यात आलेला शलमोनाचा सल्ला तुम्ही तुमच्या शब्दात कसा सांगाल?
१२ शलमोनाच्या काळात आजसारखे छपाई तंत्रज्ञान विकसित झाले नव्हते, तरी देखील त्याकाळातही असंख्य पुस्तके उपलब्ध होती. या साहित्याविषयी शलमोनाने कोणता दृष्टिकोन मांडला? तो म्हणतो: “ज्ञान्यांची वचने पराण्यासारखी असतात; सभापतीचे बोल घट्ट ठोकलेल्या खिळ्यांप्रमाणे असतात; एकाच मेंढपाळांपासून ती प्राप्त झाली आहेत. ह्याखेरीज, माझ्या पुत्रा असा बोध घे की ग्रंथरचनेला काही अंत नाही; बहुत ग्रंथपठण देहास शिणविते.”—उपदेशक १२:११, १२.
१३. ईश्वरी बुद्धीचे शब्द पराण्यासारखे कसे आहेत आणि “घट्ट ठोकलेल्या खिळ्यांप्रमाणे” कोण आहेत?
१३ देवाच्या ज्ञानानुसार बोध देणाऱ्यांची वचने पराण्यासारखी आहेत. ते कसे? त्यांमुळे वाचकाला किंवा ऐकणाऱ्याला वाचलेल्या किंवा ऐकलेल्या शब्दांनुरूप प्रगती करायला चालना मिळते. खरोखरच बुद्धिमान आणि उचित गोष्टी किंवा बोल आत्मसात करणाऱ्या “घट्ट ठोकलेल्या खिळ्यांप्रमाणे असतात.” कारण अशा लोकांच्या उत्तम शब्दांतून यहोवाची बुद्धी दिसून येते आणि त्यामुळे वाचणाऱ्याला किंवा ऐकणाऱ्याला स्थिर राहण्यास आणि आधार मिळण्यास मदत होऊ शकते. तुम्ही देवभीरू पालक असल्यास अशाप्रकारची बुद्धी तुमच्या मुलाच्या मनावर आणि हृदयावर बिंबवण्याकरता तुम्ही हरएक प्रयत्न करू नये का?—अनुवाद ६:४-९.
१४. (अ) कोणत्या प्रकारच्या पुस्तकांचे ‘बहुत पठण’ करूनही काही लाभ होत नाही? (ब) कोणत्या साहित्यावर आपले प्रमुख लक्ष असण्यास हवे आणि का?
१४ पण शलमोनाने पुस्तकांविषयी असे का म्हटले? यहोवाच्या वचनाशी तुलना करता या जगातील अनंत पुस्तकांमध्ये निव्वळ मानवी तत्त्वज्ञान पाहायला मिळते. त्यांतील बहुतेक विचारसरणीमधून दियाबल सैतानाचे आचारविचार दिसून येतात. (२ करिंथकर ४:४) त्यामुळे अशा जगीक पुस्तकांचे ‘बहुत पठण’ केल्यास त्यामुळे कायमस्वरूपी लाभ होत नाही. खरे तर, असे केल्यामुळे आध्यात्मिकरित्या मोठी हानी मात्र होऊ शकते. त्यामुळे शलमोनाप्रमाणे, जीवनाविषयी देवाचे वचन काय म्हणते त्यावर आपण मनन करू या. त्यामुळे आपला विश्वास मजबूत होईल आणि आपण देवाच्या आणखी जवळ येऊ. इतर पुस्तकांच्या किंवा साहित्याच्या मागे लागल्याने आपण दमून जाऊ. विशेषतः अशा पुस्तकांमध्ये ईश्वरी बुद्धीच्या विरोधात असणारा जगीक तर्क असल्यास अशी पुस्तके हानीकारक ठरू शकतात आणि त्यांमुळे देवावरील आणि त्याच्या उद्देशांवरील आपला विश्वास कमजोर होऊ शकतो. म्हणून आपण हे लक्षात ठेवू या, की शलमोनाच्या काळाकरता आणि आपल्या काळाकरता सर्वात लाभदायक असलेले लिखाण तेच आहे ज्यातून ‘एकाच महान मेंढपाळाची’ अर्थात यहोवा देवाची बुद्धी दिसून येते. पवित्र शास्त्रवचनाची त्याने ६६ पुस्तके आपल्याला दिली आहेत आणि या पुस्तकांवरच आपले प्रमुख लक्ष असण्यास हवे. बायबलमुळे आणि ‘विश्वासू दासाच्या’ मदतदायक प्रकाशनांमुळे “देवाविषयीचे ज्ञान” प्राप्त करण्यास आपल्याला साहाय्य होईल.—नीतिसूत्रे २:१-६.
देवाप्रती आपले पूर्ण कर्तव्यकर्म
१५. (अ) “मनुष्यकर्तव्य” या शलमोनाच्या अभिव्यक्तीविषयी तुम्ही काय म्हणाल? (ब) देवाप्रती आपले कर्तव्य पार पाडण्याकरता आपल्याला काय केले पाहिजे?
१५ उपदेशक शलमोन त्याच्या संपूर्ण तपशीलाचे सार पुढील शब्दांत सांगतो: “आता सर्व काही तुम्ही ऐकले; सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ, मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे. सगळ्या बऱ्यावाईट गुप्त गोष्टींचा न्याय करिताना देव सगळ्या कृत्यांची झाडाझडती घेईल.” (उपदेशक १२:१३, १४) आपल्या महान निर्माणकर्त्याविषयी हितकारक भय किंवा त्याच्याविषयी आदराची भावना यांमुळे आपले आणि कदाचित आपल्या कुटुंबाचे अविचारी जीवनमार्ग निवडण्यापासून संरक्षण होईल अन्यथा अशा जीवनमार्गामुळे आपल्यावर आणि आपल्या प्रियजनांवर संकटे किंवा क्लेष येऊ शकतात. देवाचे हितकारक भय बाळगणे चांगले आहे आणि खरे तर अशाप्रकारचे भय बुद्धीची आणि ज्ञानाची सुरवात आहे. (स्तोत्र १९:९; नीतिसूत्रे १:७) आपल्याकडे देवाच्या प्रेरित वचनाची सूक्ष्मदृष्टी असल्यास आणि बायबलमधील सल्ला आपण प्रत्येक गोष्टीमध्ये लागू करत असल्यास आपण देवाप्रती आपले पूर्ण ‘कर्तव्य’ पार पाडू. याचा अर्थ, आपण कर्तव्यकर्मांची एक यादीच तयार करावी असे नाही. तर जीवनातील समस्या सोडवण्याकरता आपण शास्त्रवचनांचा आधार घेतो का आणि देवाच्या मार्गानुसार सर्व गोष्टी करतो का हे महत्त्वाचे आहे.
१६. न्यायाच्या संबंधाने यहोवा काय करील?
१६ आपल्या महान निर्माणकर्त्याकडून कोणतीही गोष्ट सुटत नाही हे आपल्याला समजण्यास हवे. (नीतिसूत्रे १५:३) तो “सगळ्या कृत्यांची झाडाझडती घेईल.” होय, सर्वोच्च देव यहोवा सर्व गोष्टींचा, मानवी डोळ्यांना न दिसणाऱ्या गोष्टींचाही न्याय करील. या बाबींची जाण असल्यामुळे देवाच्या आज्ञा पाळण्यास आपल्याला प्रेरणा मिळेल. पण सर्वात महत्त्वाची प्रेरक गोष्ट म्हणजे आपल्या स्वर्गीय पित्याविषयी आपल्याला वाटणारे प्रेम; कारण प्रेषित योहानाने असे लिहिले: “देवावर प्रीति करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय; आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत.” (१ योहान ५:३) आणि देवाच्या आज्ञा आपल्या कायमस्वरूपी लाभाकरताच असल्यामुळे त्यांचे पालन करणे केवळ योग्य नाही तर तसे करणे खरोखरच बुद्धिमत्तेचे आहे. महान निर्माणकर्त्यावर प्रेम करणाऱ्यांना देवाच्या आज्ञा भारी वाटत नाहीत. त्यांना देवाप्रती त्यांचे कर्तव्य पूर्ण करण्याची इच्छा आहे.
तुमचे पूर्ण कर्तव्यकर्म पार पाडा
१७. देवाप्रती आपले पूर्ण कर्तव्यकर्म पार पाडण्याची आपली इच्छा असल्यास आपण काय करू?
१७ आपण शहाणे असू आणि देवाप्रती आपले कर्तव्यकर्म पूर्ण करण्याची आपली खरोखर इच्छा असल्यास आपण केवळ त्याच्या आज्ञा पाळणार नाही, तर त्याला निराश करू नये म्हणून त्याचे आदरयुक्त भय देखील आपण बाळगू. खरोखरच, “परमेश्वराचे भय ज्ञानाचा [बुद्धीचा] आरंभ होय,” आणि त्याच्या आज्ञा पाळणाऱ्यांना “सुबुद्धि [सूक्ष्मदृष्टी]” प्राप्त होते. (स्तोत्र १११:१०; नीतिसूत्रे १:७) तर मग, आपण शहाणपणाने वागू आणि सर्व गोष्टींमध्ये यहोवाच्या आज्ञा पाळू. आता तर विशेषतः असे करणे फार महत्त्वाचे आहे कारण राजा येशू ख्रिस्त उपस्थित आहे आणि देवाच्या नियुक्त न्यायधीशाचा न्याय करण्याचा दिवस जवळ आला आहे.—मत्तय २४:३; २५:३१, ३२.
१८. यहोवा देवाप्रती आपण आपले कर्तव्य पार पाडल्यास त्याचा काय परिणाम होईल?
१८ यहोवा देव आज आपल्यांपैकी प्रत्येकाचे परीक्षण करत आहे. आपण आध्यात्मिक प्रवृत्तीचे आहोत का की जगाच्या प्रभावांमुळे देवासोबतचा आपला नातेसंबंध कमजोर झाला आहे? (१ करिंथकर २:१०-१६; १ योहान २:१५-१७) आपल्या महान निर्माणकर्त्याला आनंदी करण्यासाठी आपण सर्व लहानथोर आपल्याला होता होईल तितके करू या. आपण यहोवाचे ऐकल्यास आणि त्याच्या आज्ञा पाळल्यास लयास जाणाऱ्या या जगाच्या व्यर्थ गोष्टींपासून आपण दूर राहू. असे केल्यास, आपल्याला देवाने अभिवचन दिलेल्या सार्वकालिक जीवनाची आशा प्राप्त होईल. (२ पेत्र ३:१३) देवाप्रती आपले पूर्ण कर्तव्यकर्म पार पाडणाऱ्या लोकांकरता हे किती मोठे आशीर्वाद!
तुम्ही कसे उत्तर द्याल?
◻ सर्वकाही व्यर्थ नाही असे तुम्ही का म्हणू शकता?
◻ तरुण बाप्तिस्माप्राप्त मनुष्याने त्याच्या पवित्र सेवेविषयी प्रार्थनापूर्वक विचार का केला पाहिजे?
◻ कोणत्या प्रकारच्या पुस्तकांचे ‘बहुत पठण’ करूनही काही लाभ होत नाही?
◻ “मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच” हे कशाविषयी म्हटले आहे?
[२० पानांवरील चित्र]
यहोवाची सेवा करणाऱ्यांकरता सर्वकाही व्यर्थ नाही
[२३ पानांवरील चित्र]
देवाचे वचन जगीक पुस्तकांप्रमाणे नाही, उलटपक्षी ते स्फुर्तिदायक आणि लाभदायक आहे