मोठ्या संकटातून जिवंत वाचवलेले
“मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत; ह्यांनी आपले झगे कोकऱ्याच्या रक्तात धुऊन शुभ्र केले आहेत.”—प्रकटीकरण ७:१४.
१. पार्थिव पुनरुत्थानात पुनरुत्थित झालेल्यांचे स्वागत कोण करतील?
‘नीतिमान व अनीतिमानांच्या पुनरुत्थानात’ लाखोंना उठवण्यात आल्यावर, त्यांना ओसाड अशा पृथ्वीवर जीवन दिले जाणार नाही. (प्रेषितांची कृत्ये २४:१५) ते सुधारलेल्या सुंदर परिस्थितींमध्ये उठतील आणि त्यांच्यासाठी निवासस्थाने, कपडालत्ता आणि विपुल अन्न तयार करण्यात आले आहे असे त्यांना आढळेल. ही सर्व तयारी कोण करतील? स्पष्टपणे, पार्थिव पुनरुत्थानाची सुरवात होण्याआधी नवीन जगात लोक राहत असतील. कोण? बायबल दाखवते, की ते येणाऱ्या मोठ्या संकटातून बचावलेले लोक असतील. निःसंशये, सर्व बायबल शिकवणींमधील ही गोष्ट सर्वात कुतूहल निर्माण करणारी आहे—म्हणजेच काही विश्वासू जण मोठ्या संकटातून जिवंत असे बचावले जातील आणि कधीही मरणार नाहीत. पवित्र शास्त्रवचनांमध्ये या आशेचा खरेपणा शाबीत केला आहे.
नोहाच्या दिवसांप्रमाणे
२, ३. (अ) नोहाच्या दिवसात आणि आपल्या काळामध्ये कोणत्या समांतरता आहेत? (ब) नोहाच्या आणि त्याच्या कुटुंबाचा जलप्रलयातून झालेला बचाव याद्वारे काय दर्शवले जाते?
२ मत्तय २४:३७-३९ मध्ये, येशूने नोहाच्या दिवसाची व आपण स्वतः राहतो त्या शेवटल्या काळाची तुलना केली. तो म्हणाला: “नोहाच्या दिवसात होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल, तेव्हा जसे जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसात नोहा तारवात गेला त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते, आणि जलप्रलय येऊन सर्वांस वाहवून नेईपर्यंत त्यांस समजले नाही; तसेच मनुष्याच्या पुत्राचेहि येणे होईल.”
३ देवाच्या इशारेवजा संदेशाकडे दुर्लक्ष केलेल्या सर्वांना त्या जागतिक जलप्रलयाने वाहवून नेले. तथापि, त्या जलप्रलयाने नोहा व त्याच्या कुटुंबाला वाहवून नेले नाही. येशूने म्हटल्याप्रमाणे, ते ‘तारवात गेले.’ त्यांच्या ईश्वरी भक्तीमुळे यहोवाने त्यांना बचावाचा मार्ग पुरवला. दुसरे पेत्र २:५, ९ नोहा आणि त्याच्या कुटुंबाच्या बचावाचा संदर्भ देऊन असे म्हणते: “त्याने [देवाने] अभक्तांच्या जगावर जलप्रलय आणिला, आणि नीतिमत्त्वाचा उपदेशक नोहा ह्याचे सात जणांसह रक्षण केले. भक्तिमान लोकांस परीक्षेतून कसे सोडवावे . . . हे प्रभूला कळते.” सामान्यपणे लोक देवाच्या इशारेवजा संदेशाकडे लक्ष देणार नाहीत हे दाखवण्यासाठी येशूने नोहाच्या दिवसाची व शेवटल्या काळाची तुलना केली. तथापि तसे करत असता नोहा आणि त्याच्या कुटुंबाने यहोवा देवाचे आज्ञापालन केले, तारवात प्रवेश केला आणि मोठ्या जलप्रलयातून वाचले हे देखील त्याने शाबीत केले. नोहा आणि त्याच्या कुटुंबाचा बचाव या जगाच्या शेवटी देवाच्या विश्वासू सेवकांच्या बचावाला निर्देशित करतो.
पहिल्या शतकातील नमुना
४. येशूच्या शब्दांच्या पूर्णतेत सा. यु. ७० मधील जेरूसलेमचा नाश कोणत्या घटनांमुळे झाला?
४ येशूने या जगाच्या अंताच्या घटनांबद्दलही बोलणी केली. मत्तय २४:२१, २२ येथे आपण वाचतो: “जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही व पुढे कधीहि येणार नाही असे मोठे संकट त्या काळी येईल; आणि ते दिवस कमी केले नसते तर कोणाहि मनुष्याचा निभाव लागला नसता; परंतु निवडलेल्यांसाठी ते कमी केले जातील.” आपल्या सामान्य युगाच्या पहिल्या शतकात या शब्दांची प्राथमिक पूर्णता झाली. सा. यु. ६६ मध्ये सेस्टीयस गॅलसच्या नेतृत्वाखालील रोमी सैनिकांनी जेरूसलेमच्या शहराला वेढा घातला. रोमी सैन्याने मंदिराची भिंत देखील पाडली आणि पुष्कळ यहुदी लोक शरणागती पत्करण्यास तयार झाले. तथापि, अनपेक्षितपणे आणि कोणतेही स्पष्ट कारण नसतानाही, सेस्टीयस गॅलसने आपले सैन्य माघारी नेले. रोमी लोकांना माघारी गेलेले पाहून, येशूने पुष्कळ वर्षांआधी, “यरुशलेमेस सैन्यांचा वेढा पडत आहे असे पाहाल तेव्हा ती ओसाड पडण्याची वेळ जवळ आली आहे असे समजा. त्या वेळेस जे यहूदीयात असतील त्यांनी डोंगरात पळून जावे, जे यरुशलेमेत असतील त्यांनी बाहेर निघून जावे व जे शिवारात असतील त्यांनी तिच्या आत येऊ नये” या उद्गारलेल्या शब्दांनुरुप ख्रिश्चनांनी कृती केली. (लूक २१:२०, २१) अभिषेक झालेले यहुदी, निवडलेल्या जणांनी तत्काळ नाश केले जाणारे जेरूसलेम शहर सोडून दिले आणि अशाप्रकारे ते त्यानंतर लगेचच झालेल्या तिच्या भयानक नाशापासून वाचले. सा. यु. ७० मध्ये जनरल टायटसच्या नेतृत्वाखालील रोमी सैन्य परतले. त्यांनी जेरूसलेमभोवती छावणी केली, शहराला वेढा घातला आणि त्याला उद्ध्वस्त केले.
५. सा. यु. ७० मधील जेरूसलेमचा नाश कोणत्या अर्थाने कमी केला गेला होता?
५ जोसेफस हा यहुदी इतिहासकार सांगतो, की ११,००,००० यहुदी मारले गेले तर ९७,००० वाचले आणि त्यांना बंदिवान करून नेण्यात आले. ते वाचलेले गैर-ख्रिस्ती यहुदी निश्चितच येशूच्या भविष्यवाणीतील ‘निवडलेले जण’ नव्हते. बंडखोर यहुदी राष्ट्राला उद्देशून येशूने म्हटले होते: “पाहा! तुमचे घर तुम्हावर सोडले आहे. मी तुम्हास सांगतो, आतापासून तो ‘प्रभूच्या नावाने येणारा तो धन्यवादित’ असे तुम्ही म्हणाल तोपर्यंत मी तुमच्या दृष्टीस पडणारच नाही.” (मत्तय २३:३८, ३९) जेरूसलेममध्ये कैदेत असलेल्या त्या यहुद्यांनी शेवटल्या घटकेला येशूचा मशीहा म्हणून स्वीकार केला, ख्रिस्ती बनले आणि यहोवाची कृपापसंती मिळवली असा अहवाल कोठेच मिळत नाही. तथापि, जेरूसलेमवर सा. यु. ७० मध्ये आलेला नाश कमी केला होता. रोमी सैन्याचा अखेरचा वेढा दीर्घकाळासाठी नव्हता. यामुळे काही यहुदी लोकांना वाचण्यास वाव मिळाला परंतु त्यांनाही रोमी साम्राज्याच्या विविध भागांमध्ये दास म्हणून पाठवण्यात आले.
बचावणाऱ्यांचा मोठा लोकसमुदाय
६, ७. (अ) अतुलनीय संकटाचा भाग म्हणून कोणत्या धार्मिक शहराचा नाश अद्यापही व्हावयाचा आहे? (ब) या जगावर येणाऱ्या मोठ्या संकटाबद्दल योहानाने कोणती भविष्यवाणी केली?
६ सा. यु. ७० मधील जेरूसलेमच्या नाशाने त्या धार्मिक शहरावर निश्चितच “मोठे संकट” आणले होते, तरी येशूच्या शब्दांची मोठी पूर्णता अजूनही व्हावयाची आहे. आणखी एक मोठे धार्मिक शहर, मोठी बाबेल, खोट्या धर्माचे जागतिक साम्राज्य याला अद्याप मरणप्राय मोठ्या संकटाचा अनुभव घ्यावयाचा आहे आणि त्यानंतर लगेचच सैतानाच्या व्यवस्थीकरणाच्या उर्वरित भागावर अतुलनीय संकट येईल. (मत्तय २४:२९, ३०; प्रकटीकरण १८:२१) जेरूसलेमच्या नाशाच्या सुमारे २६ वर्षांनंतर प्रेषित योहानाने प्रकटीकरण ७:९-१४ मध्ये जगाला व्यापून टाकणाऱ्या या मोठ्या संकटाबद्दल लिहिले. लोकांचा एक मोठा समुदाय त्यातून वाचेल असे त्याने दर्शवले.
७ “मोठा लोकसमुदाय” असे संबोधलेल्या या बचावणाऱ्या लोकांना ते घेणाऱ्या काही विशिष्ट निर्णायक कृतींद्वारे ओळखले जाते. प्रकटीकरण ७:१४ नुसार स्वर्गातील २४ वडिलांपैकी एकाने योहानाला म्हटले: “मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत; ह्यांनी आपले झगे कोकऱ्याच्या रक्तात धुऊन शुभ्र केले आहेत.” होय, मोठा लोकसमुदाय आपल्या तारणाचा उगम म्हणून यहोवाचा जयजयकार करतो. ते येशूच्या ओतलेल्या रक्तावर विश्वास प्रकट करतात आणि त्यांचा निर्माणकर्ता आणि त्याचा नियुक्त राजा, येशू ख्रिस्त यांच्यासमोर त्यांची नीतिमान भूमिका आहे.
८. “मोठा लोकसमुदाय” आणि येशूच्या अभिषिक्त बांधवांच्या शेष जणांमध्ये कोणता उत्तम नातेसंबंध आहे?
८ आज, स्वर्गीय राजा येशू ख्रिस्ताच्या सक्रिय नेतृत्वाखाली मोठ्या लोकसमुदायातील सुमारे ५० लाख सदस्य आहेत. ते ख्रिस्ताच्या अधीन आहेत आणि अद्याप पृथ्वीवर असणाऱ्या त्याच्या बांधवांच्या निकट सहवासात आहेत. मोठा लोकसमुदाय या अभिषिक्त जणांना देत असलेल्या वागणूकीबद्दल येशू म्हणतो: “मी तुम्हास खचित सांगतो, की ज्याअर्थी तुम्ही ह्या माझ्या कनिष्ठ बंधूंपैकी एकाला केले त्याअर्थी ते मला केले आहे.” (मत्तय २५:४०) मोठ्या लोकसमुदायातील लोक निःस्वार्थाने ख्रिस्ताच्या अभिषिक्त बांधवांना मदत देत असल्यामुळे, त्यांनी स्वतः येशूला चांगली वागणूक दिली, असा त्यांचा न्याय करण्यात येतो. यामुळे त्यांना येशू ख्रिस्तासोबत आणि यहोवासोबत सुरक्षित नातेसंबंध राखण्यास मदत मिळते. देवाचे साक्षीदार होण्याचा आणि त्याचे नाव धारण करून अभिषिक्त शेषांना जाऊन मिळण्याचा त्यांना विशेषाधिकार प्राप्त झाला आहे.—यशया ४३:१०, ११; योएल २:३१, ३२.
जागृत राहणे
९, १०. (अ) मनुष्याच्या पुत्रासमोर नीतिमान स्थितीत उभे राहण्यासाठी आपण काय केले पाहिजे? (ब) ‘जागृत राहण्यासाठी’ आपण कशी कृती केली पाहिजे?
९ मोठ्या लोकसमुदायाने कुचराई न करता मनुष्याच्या पुत्रासमोर त्यांची नीतिमान भूमिका राखली पाहिजे. त्यासाठी शेवटपर्यंत जागृत राहण्याची आवश्यकता आहे. “तुम्ही सांभाळा, नाहीतर कदाचित अधाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता ह्यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुम्हावर पाशाप्रमाणे अकस्मात येईल. कारण तो अवघ्या पृथ्वीच्या पाठीवर राहणाऱ्या सर्व लोकांवर त्याप्रमाणेच येईल. तुम्ही तर होणाऱ्या ह्या सर्व गोष्टी चुकवावयास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहावयास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा,” असे येशूने म्हटले तेव्हा त्याने हे स्पष्टपणे सांगितले.—लूक २१:३४-३६.
१० मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यासाठी आपल्याला त्याची मान्यता असली पाहिजे. तसेच आपण या जगाच्या विचाराप्रमाणे स्वतःला प्रभावीत होऊ दिल्यास ती मान्यता आपल्याला प्राप्त होणार नाही. जगिक विचार भुरळ पाडणारा आहे आणि तो एखाद्या व्यक्तीला शारीरिक सुखविलासात अधिक गुंग होण्यास प्रवृत्त करील किंवा जीवनाच्या समस्यांनी इतके भारावून टाकील की त्यामुळे ती व्यक्ती त्यापुढे राज्य आस्थेला प्रथम ठेवण्याचे सोडून देईल. (मत्तय ६:३३) असे मार्गाक्रमण एखाद्याला आध्यात्मिकरित्या कमजोर करते आणि तो देवाबद्दल आणि इतरांबद्दलच्या आपल्या जबाबदाऱ्यांबाबतीत बेपर्वाईने वागतो. तो निष्क्रिय होऊ शकतो किंवा गंभीर पाप करून आणि अपश्चात्तापी मनोवृत्ती देखील दाखवून मंडळीतील आपले स्थान धोक्यात घालू शकतो. मोठ्या लोकसमुदायातील प्रत्येकाने स्वतःकडे लक्ष दिले पाहिजे. त्याने या अधार्मिक जगापासून आणि त्याच्या आचरणापासून अलिप्त राहिले पाहिजे.—योहान १७:१६.
११. कोणत्या शास्त्रवचनीय तत्त्वांचा अवलंब केल्याने आपल्याला हर्मगिदोनातून वाचण्यास मदत मिळेल?
११ त्यासाठी, यहोवाने त्याचे वचन, त्याचा पवित्र आत्मा आणि त्याची दृश्य संघटना याद्वारे आपल्याला आवश्यक त्या गोष्टी पुरवल्या आहेत. आपण यांचा पूर्ण फायदा घेतला पाहिजे. त्याशिवाय, आपल्याला देवाच्या कृपापसंतीची अपेक्षा आहे तर आपण प्रार्थनापूर्वक आणि आज्ञाधारक असले पाहिजे. एक गोष्ट म्हणजे, आपण आपल्यामध्ये वाईट गोष्टींबद्दल तीव्र द्वेष उत्पन्न केला पाहिजे. स्तोत्रकर्त्याने म्हटले: ‘अधर्म लोकात मी बसलो नाही; कपटी लोकांची संगत मी धरणार नाही. दुष्कर्म्यांच्या सभेचा मी द्वेष करितो; दुर्जनांबरोबर मी बसणार नाही. पातक्यांबरोबर माझा जीव आणि पातकी मनुष्यांबरोबर माझा प्राण काढून नेऊ नको.’ (स्तोत्र २६:४, ५, ९) ख्रिस्ती मंडळीत, तरुण व वृद्ध या दोघांनी यहोवाला समर्पित नसलेल्यांशी आपला सहवास मर्यादित ठेवला पाहिजे. देवाची कृपा मिळवण्यासाठी आपण जगाकडून निर्दोष आणि निष्कलंक राहण्याचा यत्न करतो. (स्तोत्र २६:१-५; याकोब १:२७; ४:४) अशाप्रकारे, हर्मगिदोनात अधार्मिकांसोबत यहोवा आपल्यालाही मारून टाकणार नाही.
काहीजण ‘कधीही मरणार नाहीत’
१२, १३. (अ) लाजराला पुनरुत्थित करण्याआधी येशूने असे कोणते शब्द उद्गारले जे मार्थेला पूर्णपणे कळाले नाहीत? (ब) काहीजण ‘कधीही मरणार नाहीत’ या येशूच्या शब्दांचा काय अर्थ नव्हता?
१२ या व्यवस्थीकरणाच्या अंतातून वाचणे आणि कधीही मरावे न लागण्याच्या शक्यतेचा गंभीरतेने विचार करणे उद्दीपित करणारे आहे. येशूने हेच भवितव्य आपल्यासाठी राखले आहे. आपला मृत मित्र लाजर याला पुनरुत्थित करण्या आधीच येशूने लाजराची बहीण मरीया हिला सांगितले: “पुनरुत्थान व जीवन मीच आहे; जो माझ्यावर विश्वास ठेवितो तो मेला असला तरी जगेल; आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीहि मरणार नाही, हे तू खरे मानतेस काय?” मार्था पुनरुत्थानावर विश्वास करीत होती, परंतु येशू जे म्हणत होता ते तिला कळाले नाही.—योहान ११:२५, २६.
१३ येशूचे विश्वासू प्रेषित शारीरिकरित्या जिवंत राहतील आणि कधीही मरणार नाहीत असा त्याच्या म्हणण्याचा अर्थ नव्हता. त्याउलट, त्याने नंतर दर्शवले की त्याचे शिष्य मरण पावतील. (योहान २१:१६-२३) खरे म्हणजे, सा. यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टला पवित्र आत्म्याने त्यांचा अभिषेक झाला म्हणजे त्यांना राजे आणि याजक या नात्याने आपला स्वर्गीय वारसा मिळवण्याकरता मरावे लागणारच होते. (प्रकटीकरण २०:४, ६) अशाप्रकारे, समय उलटला तसे, पहिल्या शतकातील सर्व ख्रिस्ती मरण पावले. तथापि, येशूने एका उद्देशास्तव तसे म्हटले. कधीही न मरता जगण्याबद्दलचे त्याचे शब्द पूर्ण होतीलच.
१४, १५. (अ) काहीजण ‘कधीही मरणार नाहीत’ हे येशूचे शब्द कसे पूर्ण होतील? (ब) या जगाची परिस्थिती काय आहे, परंतु नीतिमानांना कोणती आशा आहे?
१४ एक गोष्ट म्हणजे, विश्वासू अभिषिक्त ख्रिस्ती कधीही सार्वकालिक मृत्यू अनुभवणार नाहीत. (प्रकटीकरण २०:६) नोहाच्या दिवसात केले त्याचप्रमाणे, देव मानवी व्यवहारात हस्तक्षेप करील आणि पृथ्वीवरील दुष्टता काढून टाकील त्या विशिष्ट काळाकडे येशूचे शब्द निर्देशित करतात. त्या वेळी देवाची इच्छा करणाऱ्या विश्वासू जणांना देवाच्या न्यायकृत्यांमुळे मरावे लागणार नाही. त्याउलट, नोहा आणि त्याच्या कुटुंबाप्रमाणे त्यांना जगाच्या नाशातून बचावण्याची संधी असेल. बायबलच्या शिकवणींवर आधारित आणि उदाहरणांनी स्पष्ट केलेली आशा भक्कम आहे. (पडताळा इब्रीयांस ६:१९; २ पेत्र २:४-९.) बायबल भविष्यवाणीची पूर्णता दाखवून देते, की लवकरच अनीतिमान मानवी समाजाच्या सद्य जगाचा नाशाद्वारे अंत होणार आहे. सद्य परिस्थिती न बदलण्यासारखी आहे कारण हे जग कोडगेपणाने दुष्ट झालेले आहे. देवाने नोहाच्या दिवसातील जगाबद्दल जे म्हटले तेच आजच्या जगाबद्दलही खरे आहे. बहुतांश लोकांच्या अंतःकरणात दुष्टपणा भरला आहे आणि त्यांचे विचार नेहमीच वाईट असतात.—उत्पत्ती ६:५.
१५ यहोवाने पुष्कळ शतकांसाठी ईश्वरी हस्तक्षेप न करता, मानवाला पृथ्वीवर राज्य करण्यास मुभा दिली परंतु त्यांचा काळ आता जवळजवळ संपलाच आहे. बायबल म्हणते त्याप्रमाणे, लवकरच, यहोवा पृथ्वीवरील सर्व दुष्टांचा नाश करील. (स्तोत्र १४५:२०; नीतीसूत्रे २:२१, २२) तथापि, तो दुष्टांसह नीतिमानांचाही नाश करणार नाही. देवाने कधीच असे केलेले नाही! (पडताळा उत्पत्ती १८:२२, २३, २६.) त्याची सेवा विश्वासूपणाने, ईश्वरी भक्तीसह करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा तो नाश का करील? नोहाच्या दिवसातील दुष्ट जगाचा आपत्तीकारक नाश घडला तेव्हा त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा नाश झाला नाही त्याचप्रमाणे मोठे संकट सुरु होईल त्यावेळी जिवंत असणारे यहोवाचे विश्वासू उपासक त्याच्या नजरेत कृपा पावतील आणि त्यांना नाश केले जाणार नाही हे योग्यच आहे. (उत्पत्ती ७:२३) त्यांना ईश्वरी संरक्षण मिळेल आणि ते या जगाच्या अंतातून बचावतील.
१६. नवीन जगात कोणत्या अद्भुत गोष्टी घडतील आणि बचावणाऱ्यांसाठी त्यांचा काय अर्थ असेल?
१६ त्यानंतर काय? नवीन जगात, येशूच्या खंडणी बलिदानाचे लाभ पूर्णपणे लागू होतील त्यावेळी बरे करणारे आशीर्वाद मानवजातीला मिळतील. बायबल ‘देवाच्या व कोकऱ्याच्या राजासनातून निघालेल्या, नगरीच्या मार्गावरून वाहणाऱ्या, जीवनाच्या पाण्याची स्फटिकासारखी नितळ लाक्षणिक नदीबद्दल’ सांगते. ‘नदीच्या दोन्ही बाजूस बारा जातींची फळे देणारे जीवनाचे झाड होते, ते दर महिन्यास आपली फळे देते, आणि त्या झाडाची पाने राष्ट्रांना बरे करण्यासाठी उपयोगी पडतात.’ (प्रकटीकरण २२:१, २) आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ‘बरे करणे’ यामध्ये आदामाद्वारे आलेल्या मृत्यूवर विजय मिळण्याचाही समावेश आहे! “तो मृत्यु कायमचा नाहीसा करितो, प्रभु परमेश्वर सर्वांच्या चेहऱ्यावरील अश्रु पुशितो.” (यशया २५:८) यास्तव, मोठ्या संकटातून वाचून नवीन जगात जाणाऱ्यांना मृत्यूचा कधीही सामना करण्याची गरज नाही!
निश्चित आशा
१७. काहीजण हर्मगिदोनातून बचावतील आणि ‘कधीहि मरणार नाहीत’ ही आशा किती खात्रीदायक आहे?
१७ या आश्चर्यचकित करणाऱ्या आशेबद्दल आपल्याला पूर्ण खात्री असू शकते का? नक्कीच! येशूने मार्थेला सांगितले, की लोक कधीही न मरता जगतील असा समय येईल. (योहान ११:२६) त्याशिवाय, येशूने योहानाला दिलेल्या प्रकटीकरणाच्या ७ व्या अध्यायात मोठा लोकसमुदाय मोठ्या संकटातून वाचेल असे प्रकट केले होते. आपण येशू ख्रिस्तावर आणि नोहाच्या दिवसातील जलप्रलयाच्या ऐतिहासिक घटनेवर विश्वास ठेवू शकतो का? निःशंकपणे! त्याशिवाय, देवाने त्याच्या सेवकांना न्यायाच्या काळातून आणि राष्ट्रांच्या अधःपातातून जिवंत असे वाचवले अशा प्रसंगांचे इतर अहवाल बायबलमध्ये आहेत. या शेवटल्या काळी त्याच्याकडून यापेक्षा काही कमी अपेक्षिले जावे का? निर्माणकर्त्याला कोणती गोष्ट असंभवनीय आहे का?—पडताळा मत्तय १९:२६.
१८. यहोवाच्या नीतिमान नवीन जगातील जीवनाबद्दल आपल्याला खात्री कशी असू शकते?
१८ आता यहोवाची विश्वासूपणे सेवा केल्याने आपल्याला त्याच्या नवीन जगात सार्वकालिक जीवनाची खात्री आहे. अगणित लाखो लोकांना, त्या नवीन जगातील जीवन पुनरुत्थानाद्वारे प्राप्त होईल. तरीसुद्धा, आपल्या दिवसात यहोवाच्या लाखो लोकांना—होय, कोणीही मनुष्य मोजू शकत नाही किंवा मर्यादित करू शकत नाही अशा मोठ्या लोकसमुदायाला—मोठ्या संकटातून जिवंत वाचण्याचा अद्वितीय विशेषाधिकार असेल. तसेच त्यांना कधीही मरावे लागणार नाही.
कृपया स्पष्ट करा
▫ हर्मगिदोनातून वाचणे याला नोहाच्या दिवसांमध्ये आगाऊ सूचित कसे करण्यात आले होते?
▫ येशू यहोवाचा न्यायदंड बजावण्यास येतो त्यावेळी आपली भूमिका राखण्यासाठी काय केले पाहिजे?
▫ हर्मगिदोनातून बचावणाऱ्यांना ‘कधीही मरावे लागणार नाही’ असे आपण का म्हणू शकतो?
[१५ पानांवरील चित्रं]
ख्रिस्ती लोक जेरूसलेमच्या नाशातून निभावले