तुम्ही यहोवाच्या दिवसाकरता तयार आहात का?
“परमेश्वराचा मोठा दिवस समीप आहे. तो येऊन ठेपला आहे; वेगाने येत आहे.”—सफन्या १:१४.
१. शास्त्रवचनांमध्ये यहोवाच्या दिवसाचे वर्णन कसे केले आहे?
यहोवाचा “महान व भयंकर दिवस” लवकरच या दुष्ट व्यवस्थीकरणावर येईल. शास्त्रवचनांमध्ये यहोवाच्या दिवसाचे वर्णन युद्ध, अंधःकार, कोप, विपत्ती, यातना, भयसूचक आणि नाश असे करण्यात आले आहे. तरीही, बचावणारे लोक तर असतीलच कारण “जो कोणी परमेश्वराचा धावा करील तो तरेल.” (योएल २:३०-३२; आमोस ५:१८-२०) होय, त्यावेळी देव त्याच्या शत्रूंचा नाश करील आणि आपल्या लोकांना वाचवेल.
२. यहोवाच्या दिवसाबद्दल आपल्याला निकडीची जाणीव का असावी?
२ देवाच्या संदेष्ट्यांनी, यहोवाचा दिवस निकडीचा असल्याचे सांगितले. उदाहरणार्थ, सफन्याने लिहिले: “परमेश्वराचा मोठा दिवस समीप आहे. तो येऊन ठेपला आहे; वेगाने येत आहे.” (सफन्या १:१४) ही स्थिती आज पूर्वीपेक्षा अधिक निकडीची बनली आहे कारण देवाचा मुख्य वधिक, राजा येशू ख्रिस्त, ‘आपली तरवार कंबरेला बांधून सत्य, नम्रता व न्यायपरायणता ह्यांच्या प्रीत्यर्थ प्रतापाने स्वारी’ करणार आहे. (स्तोत्र ४५:३, ४) तुम्ही त्या दिवसाकरता तयार आहात का?
त्यांच्या पुष्कळ अपेक्षा होत्या
३. थेस्सलनीकाकर ख्रिश्चनांच्या काही अपेक्षा कोणत्या होत्या, आणि कोणत्या दोन कारणांसाठी त्यांच्या चुकीच्या धारणा होत्या?
३ पुष्कळांना यहोवाच्या दिवसाविषयी काही अपेक्षा होत्या ज्या पूर्ण झाल्या नाहीत. थेस्सलनीकेतील काही प्रारंभिक ख्रिश्चनांनी म्हटले, “[यहोवाचा] दिवस येऊन ठेपला आहे!” (२ थेस्सलनीकाकर २:२) पण तो जवळ ठेपला नव्हता यासाठी दोन मुख्य कारणे होती. यातील एक कारण देऊन प्रेषित पौल म्हणाला होता: “शांति आहे, निर्भय आहे असे ते म्हणतात तेव्हा . . . त्यांचा अकस्मात् नाश होतो.” (१ थेस्सलनीकाकर ५:१-६) या ‘अंतसमयी’ आपण स्वतः त्या शब्दांच्या पूर्णतेची वाट पाहून आहोत. (दानीएल १२:४) यहोवाचा महान दिवस आला होता याचा आणखी एक पुरावा थेस्सलनीकाकरांकडे नव्हता कारण पौल त्यांना म्हणाला होता की, ‘त्या दिवसाच्या अगोदर धर्मत्याग होईल.’ (२ थेस्सलनीकाकर २:३) पौलाने ते शब्द लिहिले तेव्हा (सा. यु. ५१ च्या सुमारास), खऱ्या ख्रिस्ती धर्मात ‘धर्मत्याग’ पूर्णतः घडून आला नव्हता. पण आज, ख्रिस्ती धर्मजगतात तो पूर्णपणे पसरल्याचे दृश्य आपल्याला दिसून येते. मृत्यूपर्यंत देवाची एकनिष्ठतेने सेवा करीत राहिलेल्या थेस्सलनीकेतील त्या विश्वासू अभिषिक्त जनांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नसल्या, तरी शेवटी त्यांना स्वर्गीय प्रतिफळ मिळाले. (प्रकटीकरण २:१०) आपणही यहोवाच्या दिवसाची एकनिष्ठतेने वाट पाहत राहिल्यास, आपल्याला सुद्धा प्रतिफळ मिळेल.
४. (अ) दुसरे थेस्सलनीकाकर २:१, २ येथे यहोवाच्या दिवसाचा संबंध कशासोबत लावण्यात आला आहे? (ब) ख्रिस्ताच्या पुनरागमनाविषयी आणि त्याजशी संबंधित असलेल्या विषयांबद्दल तथाकथित चर्चच्या पाळकांची काय धारणा होती?
४ “परमेश्वराचा मोठा दिवस” आणि “प्रभू येशू ख्रिस्ताची उपस्थिती” यांचा एकमेकांशी संबंध आहे असे बायबल दाखवते. (२ थेस्सलनीकाकर २:१, २, NW) ख्रिस्ताचे पुनरागमन, त्याची उपस्थिती आणि त्याच्या हजार वर्षीय राजवटीबद्दल तथाकथित चर्चच्या पाळकांच्या विविध कल्पना होत्या. (प्रकटीकरण २०:४) सा. यु. दुसऱ्या शतकात, हायरापलीसच्या पॅपीअसला ख्रिस्ताच्या हजार वर्षीय राजवटीदरम्यान पृथ्वीच्या आश्चर्यजनक सुपीकतेविषयी काही अपेक्षा होत्या. जस्टिन मार्टर यांनी वारंवार येशूच्या उपस्थितीविषयी सांगितले आणि पुनर्स्थापित जेरूसलेमेतून तो राज्य करील अशी अपेक्षा धरली. लायॉन्सच्या आयरिनियसने अशी शिकवण दिली की, रोमी साम्राज्याचा नाश झाल्यावर येशू दृश्यरित्या येईल, सैतानाला कैद करील आणि पार्थिव जेरूसलेममध्ये राज्य करील.
५. काही तज्ज्ञांनी ख्रिस्ताच्या ‘दुसऱ्या आगमनाविषयी’ आणि त्याच्या हजार वर्षीय राजवटीविषयी काय म्हटले आहे?
५ इतिहासकार फिलिप्प शॅफ यांच्या मते, सा. यु. ३२५ मध्ये नायसियाच्या मंडळाआधीच्या कालावधीतला “सर्वात उल्लेखनीय विश्वास” म्हणजे, “सर्वसामान्य पुनरुत्थान आणि न्यायदंडाआधी, पृथ्वीवर एक हजार वर्षांकरता पुनरुत्थित संतांसोबत वैभवात असलेल्या ख्रिस्ताच्या दृश्य राजवटीचा विश्वास.” जेम्स हेस्टींग्स यांचे बायबलचा शब्दकोश (इंग्रजी) हे पुस्तक म्हणते: “टर्टुलीयन, आयरिनियस आणि हिपॉलटस त्या वेळी देखील [येशू ख्रिस्ताच्या] लवकरात लवकर होणाऱ्या आगमनाची वाट पाहत होते; परंतु ॲलेक्झान्ड्रियन पाळकांची नवीनच विचारधारा आहे. . . . ऑगस्टीनने हजार वर्षीय राजवटीचा कालावधी म्हणजे चर्च प्रयतमानाचा कालावधी आहे असे शिकवले तेव्हा दुसरे आगमन दूरच्या भविष्यात ढकलण्यात आले.”
यहोवाचा दिवस आणि येशूची उपस्थिती
६. यहोवाचा दिवस यायला आणखी बराच अवकाश आहे असा निष्कर्ष आपण का काढू नये बरे?
६ चुकीच्या धारणांमुळे निराशा झाली आहे, पण यहोवाचा दिवस अतिशय दूर आहे असा विचार आपण करू नये. त्याचा संबंध शास्त्रवचनीयरित्या येशूच्या अदृश्य उपस्थितीशी असून ती उपस्थिती आधीच सुरू झाली आहे. ख्रिस्ताची उपस्थिती १९१४ या वर्षी सुरू झाली आहे या वस्तुस्थितीस यहोवाच्या साक्षीदारांच्या टेहळणी बुरूज आणि इतर संबंधित प्रकाशनांनी बहुतेक वेळा शास्त्रवचनीय पुष्टी दिली आहे.a तर मग, येशू आपल्या उपस्थितीविषयी काय म्हणाला?
७. (अ) येशूच्या उपस्थितीच्या चिन्हाची आणि व्यवस्थीकरणाच्या समाप्तीची काही वैशिष्ट्ये कोणती आहेत? (ब) आपला बचाव कसा होऊ शकतो?
७ येशूच्या मृत्यूच्या काही काळाआधीच त्याची उपस्थिती चर्चेचा विषय बनली होती. जेरूसलेमच्या मंदिराच्या नाशाबद्दल त्याने केलेले भाकीत ऐकल्यावर पेत्र, याकोब, योहान आणि आन्द्रियास या प्रेषितांनी विचारले: “ह्या गोष्टी केव्हा होतील, आणि आपल्या [उपस्थितीचे] व ह्या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय.” (मत्तय २४:१-३; मार्क १३:३, ४) याचे उत्तर देताना, येशूने युद्धे, दुष्काळ, भूकंप आणि त्याची उपस्थिती व युगाची समाप्ती याच्या ‘चिन्हाच्या’ इतर वैशिष्ट्यांचे भाकीत केले. तो असेही म्हणाला: “जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल.” (मत्तय २४:१३) आपण आपल्या सद्य जीवनाच्या अंतापर्यंत किंवा या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या अंतापर्यंत विश्वासूपणे टिकून राहिलो, तर आपला बचाव होईल.
८. यहुदी व्यवस्थीकरणाच्या अंताआधी काय साध्य करायचे होते आणि याबाबत आज काय केले जात आहे?
८ अंत येण्याआधी येशूच्या उपस्थितीचे अतिमहत्त्वपूर्ण वैशिष्ट्य पूर्ण होईल. त्याबाबत तो म्हणाला: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.” (तिरपे वळण आमचे.) (मत्तय २४:१४) रोमन लोकांनी जेरूसलेमचा नाश करण्याआधी आणि सा. यु. ७० मध्ये यहूदी व्यवस्थीकरणाचा अंत होण्याआधी, सुवार्तेची “आकाशाखालच्या सर्व सृष्टीत . . . घोषणा झाली” असे पौल म्हणू शकला. (कलस्सैकर १:२३) परंतु, आज यहोवाचे साक्षीदार “सर्व जगात” त्याहून अधिक व्यापकरितीने प्रचार कार्य करत आहेत. गेल्या काही वर्षांत, पूर्व युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात साक्ष देण्यास देवाने मार्ग खुला केला आहे. जगभर, छापखाने आणि इतर सुविधा उपलब्ध असल्याने, यहोवाची संघटना ‘प्रचार न झालेल्या क्षेत्रातही’ अधिकाधिक कार्य करण्यास सज्ज आहे. (रोमकर १५:२२, २३, NW) अंत येण्याआधी होता होईल तितकी साक्ष देण्यास तुमचे अंतःकरण तुम्हाला प्रवृत्त करते का? असे असल्यास, पुढील कार्यात प्रतिफळदायी सहभाग असण्यास देव तुम्हाला समर्थ करू शकतो.—फिलिप्पैकर ४:१३; २ तीमथ्य ४:१७.
९. मत्तय २४:३६ येथे नमूद केल्यानुसार येशूने कोणता मुद्दा मांडला?
९ भाकीत केलेले राज्य-प्रचाराचे कार्य आणि येशूच्या उपस्थितीच्या चिन्हाची इतर वैशिष्ट्ये सद्य काळात पूर्ण होत आहेत. यास्तव, या दुष्ट व्यवस्थीकरणाचा अंत समीप आहे. “त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही, स्वर्गातील दिव्यदूतास नाही, पुत्रालाहि नाही,” असे येशू म्हणाला हे खरे आहे. (मत्तय २४:४-१४, ३६) परंतु, येशूची भविष्यवाणी आपल्याला त्या ‘दिवसाकरता आणि घटकेकरता’ तयारीत राहण्यास मदत करू शकते.
ते तयारीत होते
१०. आध्यात्मिकरित्या जागृत राहणे शक्य असल्याचे आपल्याला कसे ठाऊक आहे?
१० यहोवाच्या मोठ्या दिवसातून वाचण्याकरता आपण आध्यात्मिकरित्या जागृत आणि खऱ्या उपासनेत स्थिर असले पाहिजे. (१ करिंथकर १६:१३) अशाप्रकारचा धीर धरणे शक्य आहे हे आपल्याला ठाऊक आहे कारण एका भक्तिमान कुटुंबाने तसे केले आणि सा. यु. पू. २३७० मध्ये दुष्ट मानवांचा नाश करणाऱ्या प्रलयातून ते वाचले. त्या युगाची तुलना आपल्या उपस्थितीशी करून येशू म्हणाला: “नोहाच्या दिवसात होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे [“उपस्थिती,” NW] होईल. तेव्हा जसे जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसात नोहा तारवात गेला त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते, आणि जलप्रलय येऊन सर्वांस वाहवून नेईपर्यंत त्यास समजले नाही; तसेच मनुष्याच्या पुत्राचेहि येणे [उपस्थिती] होईल.”—मत्तय २४:३७-३९.
११. नोहाच्या दिवसात हिंसा असतानाही त्याने कोणता मार्ग पत्करला?
११ आपल्याप्रमाणे, नोहा आणि त्याचे कुटुंब एका हिंसक जगात राहत होते. अवज्ञाकारी देवदूतीय ‘देवपुत्रांनी’ मानवी देह धारण करून आपल्यासाठी बायका केल्या आणि मग त्यांना कुविख्यात नफिलीमाचे संतान झाले—हे नफिलीम म्हणजे दादागिरी करणारे होते ज्यामुळे परिस्थिती आणखीनच हिंसक बनली. (उत्पत्ति ६:१, २, ४; १ पेत्र ३:१९, २०) तथापि, विश्वासूपणे “नोहा देवाबरोबर चालला.” “आपल्या काळच्या लोकांमध्ये”—त्याच्या दिवसातील दुष्ट पिढीत—तो “नीतिमान व सात्विक मनुष्य” ठरला. (उत्पत्ति ६:९-११) देवावर प्रार्थनापूर्वक विसंबून राहिल्याने, आपण देखील यहोवाच्या दिवसाची वाट पाहत असता या हिंसक आणि दुष्ट जगात हेच करू शकतो.
१२. (अ) तारू बांधण्याशिवाय नोहाने कोणते कार्य केले? (ब) नोहाच्या प्रचाराला लोकांनी कसा प्रतिसाद दिला आणि त्यांच्याकरता त्याचा काय परिणाम झाला?
१२ प्रलयातून जिवाचे रक्षण करण्यासाठी तारू बांधणारा म्हणून नोहा सुप्रसिद्ध आहे. तो “नीतिमत्त्वाचा उपदेशक” सुद्धा होता पण त्याच्या काळातील लोकांनी देवाने त्याला सांगितलेल्या संदेशाकडे ‘लक्ष दिले नाही.’ प्रलय येऊन त्यांना वाहून नेईपर्यंत ते खातपित, लग्न करीत, संसार थाटत आणि दैनंदिन जीवन व्यतीत करत राहिले. (२ पेत्र २:५; उत्पत्ति ६:१४) “पश्चात्ताप करून देवाकडे वळणे,” ख्रिस्तावर विश्वास ठेवणे, नीतिमत्त्वता आणि “पुढे होणारा न्याय” यांविषयी यहोवाच्या साक्षीदारांच्या म्हणण्याकडे आजची दुष्ट पिढी दुर्लक्ष करते त्याचप्रमाणे त्यांना देखील उचित भाषा आणि वर्तन याविषयी ऐकण्याची इच्छा नव्हती. (प्रेषितांची कृत्ये २०:२०, २१; २४:२४, २५) नोहा जेव्हा देवाचा संदेश ऐकवत होता त्यावेळी पृथ्वीवर किती लोक राहत होते याचा कोणताही पुरावा नाही. परंतु, एक गोष्ट मात्र खरी आहे की, सा. यु. पू. २३७० मध्ये पृथ्वीची लोकसंख्या नाट्यमयरित्या रोडावली! जलप्रलयाने दुष्टांचा संपूर्णतः नाश केला आणि देवाच्या त्या कार्यासाठी तयार असलेल्यांनाच—नोहा व त्याच्या कुटुंबातील इतर सात जणांनाच केवळ बचावले.—उत्पत्ति ७:१९-२३; २ पेत्र ३:५, ६.
१३. नोहाने कोणत्या न्यायालयीन हुकुमावर पूर्णपणे भरवसा ठेवला, आणि त्याच्या एकवाक्यतेत त्याने कसे कार्य केले?
१३ प्रलय नेमक्या कोणत्या दिवशी आणि घटकेला येईल याची बऱ्याच वर्षांपूर्वी कोणत्याही प्रकारची आगाऊ सूचना देवाने नोहाला दिली नव्हती. परंतु, नोहा ४८० वर्षांचा असताना, यहोवाने हुकूम दिला: “मनुष्य भ्रांत झाल्यामुळे माझ्या आत्म्याची त्याच्या ठायी सर्वकाळ सत्ता राहणार नाही. तो देहधारी आहे तथापि मी त्याला एकशेवीस वर्षांचा काळ देईन.” (उत्पत्ति ६:३) या ईश्वरी न्यायालयीन हुकुमावर नोहाने पूर्णपणे भरवसा ठेवला. नोहा ५०० वर्षांचा झाल्यावर, त्याला “शेम, हाम व याफेथ हे झाले,” आणि त्या काळच्या रूढीनुसार हे कळते की ५० ते ६० वर्षांनंतर त्याच्या मुलांनी विवाह केला. प्रलयातून बचाव व्हावा म्हणून नोहाला तारू बांधायला सांगण्यात आले तेव्हा त्याच्या त्या मुलांनी व त्यांच्या पत्नींनी त्याची मदत केली असे दिसते. संभवतः, तारू बांधणे आणि “नीतिमत्त्वाचा उपदेशक” अशी नोहाची सेवा एकाच वेळी चालू असून प्रलय येण्याआधी ४० ते ५० वर्षांपर्यंत तो त्यातच मग्न असावा. (उत्पत्ति ५:३२; ६:१३-२२) त्या सर्व वर्षांकरता तो व त्याचे कुटुंब विश्वासाने कार्य करीत होते. आपण देखील सुवार्तेची घोषणा करत असता आणि यहोवाच्या दिवसाची वाट पाहत असता विश्वास प्रदर्शित करत राहू या.—इब्री लोकांस ११:७.
१४. यहोवाने सरतेशेवटी नोहाला काय सांगितले, आणि का?
१४ तारवाचे काम संपत आले, तेव्हा प्रलय नेमका केव्हा येणार हे नोहाला निश्चित ठाऊक नसले, तरीही तो अगदी जवळ असावा असे त्याला वाटले असावे. सरतेशेवटी, यहोवाने त्याला सांगितले: “अजून सात दिवसांचा अवकाश आहे; मग मी चाळीस दिवस व चाळीस रात्री पृथ्वीवर पर्जन्य पाडणार.” (उत्पत्ति ७:४) या सूचनेमुळे नोहा व त्याच्या कुटुंबाला प्रलयाआधी सर्व जातींच्या प्राणीमात्रांना एकत्र करून स्वतः देखील त्या तारवात जायला पुरेसा अवधी मिळाला. या व्यवस्थीकरणाच्या नाशाचा दिवस आणि वेळ कोणता हे आपल्याला ठाऊक असण्याची गरज नाही; प्राण्यांच्या बचावाचे कार्य आपल्याला सोपवलेले नाही, शिवाय भावी मानवी उत्तरजीवी लाक्षणिक तारवात अर्थात देवाच्या लोकांच्या आध्यात्मिक परादीसमध्ये आधीच प्रवेश करत आहेत.
“जागृत राहा”
१५. (अ) तुम्ही मत्तय २४:४०-४४ येथील येशूच्या शब्दांचे स्पष्टीकरण स्वतःच्या शब्दांत कसे द्याल? (ब) देवाच्या वतीने बदला घेण्यासाठी येशू नेमका केव्हा येणार हे ठाऊक नसण्याचा काय परिणाम होतो?
१५ आपल्या उपस्थितीविषयी येशू म्हणाला: “त्या वेळेस शेतात [काम करत] असलेल्या दोघांपैकी एक घेतला जाईल व एक ठेवला जाईल; जात्यावर [दळण] दळीत बसलेल्या दोघींपैकी एक घेतली जाईल व एक ठेवली जाईल. म्हणून जागृत राहा; कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभु येईल हे तुम्हास ठाऊक नाही. आणखी हे समजा की, कोणत्या प्रहरी चोर येईल हे घरधन्याला कळले असते तर तो जागृत राहिला असता, आणि त्याने आपले घर फोडू दिले नसते. म्हणून तुम्हीहि सिद्ध असा, कारण तुम्हास कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.” (मत्तय २४:४०-४४; लूक १७:३४, ३५) देवाच्या वतीने बदला घेण्यासाठी येशू नेमक्या कोणत्या वेळी येईल हे ठाऊक नसल्याने आपण जागृत राहतो आणि आपण निःस्वार्थ हेतूंनी यहोवाची सेवा करत आहोत हे सिद्ध करण्यास आपल्याला दररोज संधी मिळते.
१६. ‘ठेवल्या जाणाऱ्या’ आणि ‘घेतल्या जाणाऱ्या’ व्यक्तींचे काय होईल?
१६ दुष्टांसोबत नाशासाठी ‘ठेवलेल्यांमध्ये’ एके काळी ज्ञान मिळवलेल्या परंतु आत्म-केंद्रित जीवनशैलीमध्ये गुरफटलेल्यांचा समावेश असेल. आपण ‘घेतले जाणाऱ्यांपैकी,’ यहोवाला संपूर्णतः समर्पित असलेले आणि ‘विश्वासू व बुद्धिमान दासाकरवी’ त्याने केलेल्या आध्यात्मिक तरतुदींकरता खरोखर कृतज्ञता बाळगणारे असू या. (मत्तय २४:४५-४७) अगदी शेवटपर्यंत, आपण ‘शुद्ध अंतःकरणाने, चांगल्या विवेकभावाने व निष्कपट विश्वासाने उद्भवणारी प्रीति व्यक्त करीत’ देवाची सेवा करत राहू या.—१ तीमथ्य १:५.
पवित्र वर्तणूक अत्यावश्यक
१७. (अ) दुसरे पेत्र ३:१० येथे काय भाकीत करण्यात आले होते? (ब) २ पेत्र ३:११ येथे कोणती वर्तणूक आणि आचरण ठेवण्याचे उत्तजेन देण्यात आले आहे?
१७ प्रेषित पेत्राने लिहिले: “तरी चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल; त्या दिवशी आकाश मोठा नाद करीत नाहीसे होईल, सृष्टितत्त्वे तप्त होऊन लयास जातील, आणि पृथ्वी व तिच्यावरील गोष्टी उघडकीस येतील.” (२ पेत्र ३:१०) लाक्षणिक स्वर्ग आणि पृथ्वी देवाच्या धगधगत्या क्रोधापासून वाचणार नाहीत. म्हणून पेत्र पुढे म्हणतो: “तर ही सर्व अशी लयास जाणारी आहेत म्हणून पवित्र वर्तणुकीत व सुभक्तीत राहून . . . तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे!” (२ पेत्र ३:११) अशा वर्तणुकीत आणि आचरणात, ख्रिस्ती सभांमधील नियमित उपस्थिती, इतरांचे भले करणे आणि सुवार्तेच्या प्रचारात अर्थपूर्ण सहभाग घेणे सामील होते.—मत्तय २४:१४; इब्री लोकांस १०:२४, २५; १३:१६.
१८. जगासोबत आपली सलगी वाढत असल्यास, आपण काय करावे?
१८ ‘पवित्र वर्तणुकीत व सुभक्तीत राहण्यासाठी’ आपण “स्वतःला जगापासून निष्कलंक” ठेवावे हे अत्यावश्यक आहे. (याकोब १:२७) पण जगाशी आपली सलगी वाढत असल्यास काय? कदाचित, अशुद्ध मनोरंजन किंवा या जगाच्या अभक्त आत्म्यास चालना देणारे संगीत आणि गाणी ऐकून देवासमोरची आपली भूमिका धोक्यात येत असावी. (२ करिंथकर ६:१४-१८) तसे असल्यास, जगासोबत आपणही लयास जाऊ नये पण मनुष्याच्या पुत्रासमोर आपली भूमिका स्वीकृत असावी म्हणून प्रार्थनेद्वारे आपण देवाची मदत मागू या. (लूक २१:३४-३६; १ योहान २:१५-१७) आपण देवाला स्वतःचे समर्पण केले असल्यास, निश्चितच त्याच्यासोबत प्रेमळ नातेसंबंध विकसित करून तो टिकवण्याकरता कसोशीने प्रयत्न करू आणि अशाप्रकारे यहोवाच्या महान व भयंकर दिवसाकरता तयारीत राहू.
१९. या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या समाप्तीतून राज्य उद्घोषकांच्या झुंडीच्याझुंडी बचावण्याची अपेक्षा का धरू शकतात?
१९ प्राचीन जगाचा नाश केलेल्या प्रलयातून भक्तिमान नोहा व त्याचे कुटुंब तरले. सा. यु. ७० मध्ये, नीतिमान व्यक्ती यहुदी व्यवस्थीकरणाच्या अंतामधून वाचले. उदाहरणार्थ, प्रेषित योहानाने प्रकटीकरणाचे पुस्तक, त्याचा शुभवर्तमान अहवाल आणि तीन प्रेरित पत्रे लिहिली तेव्हा, म्हणजे सा. यु. ९६-९८ च्या सुमारास देखील तो देवाच्या सेवेत सक्रिय होता. सा. यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टला ज्या हजारोंनी खरा विश्वास अंगीकारला त्यांच्यापैकी पुष्कळजण संभवतः यहुदी व्यवस्थीकरणाच्या अंतामधून पार पडले. (प्रेषितांची १:१५; २:४१, ४७; ४:४) राज्य उद्घोषकांच्या झुंडीच्याझुंडी आज, सद्य दुष्ट व्यवस्थीकरणाच्या समाप्तीतून बचावण्याची आशा बाळगू शकतात.
२०. आपण ‘नीतिमत्त्वाचे आवेशी उद्घोषक’ का असावे?
२० आपल्यासमोर, नवीन जगात स्वतःचा जीव वाचवून प्रवेश करण्याची प्रत्याशा असल्यामुळे आपण ‘नीतिमत्त्वाचे आवेशी उद्घोषक’ बनू या. या शेवटल्या दिवसांमध्ये देवाची सेवा करणे हा केवढा सुहक्क आहे! शिवाय, देवाचे लोक ज्या आध्यात्मिक परादीसचा उपभोग घेतात त्या सध्याच्या “तारवात” जाण्याची दिशा लोकांना दाखवणे केवढे आनंददायक काम आहे! त्यात असलेले लाखो जण विश्वासू, आध्यात्मिकरित्या जागृत अवस्थेत आणि यहोवाच्या महान दिवसासाठी तयारीत असोत. पण, आपणा सर्वांना जागृत राहण्यास कोणती गोष्ट मदत करील?
[तळटीपा]
a वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ इंडियाने प्रकाशित केलेल्या सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान या पुस्तकातील १० आणि ११ अध्याय पाहा.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
◻ यहोवाच्या दिवसाविषयी आणि ख्रिस्ताच्या उपस्थितीविषयी काहींच्या अपेक्षा काय होत्या?
◻ नोहा व त्याचे कुटुंब प्रलयाकरता तयार होते असे आपण का म्हणू शकतो?
◻ ‘जागृत राहणाऱ्यांचे’ आणि जागृत न राहणाऱ्यांचे काय होईल?
◻ पवित्र वर्तणूक, विशेषेकरून यहोवाचा मोठा दिवस समीप येत असता अत्यावश्यक का आहे?