प्रकाशाचे चकाकणे—प्रखर आणि सौम्य भाग एक
“धार्मिकांचा मार्ग मध्यान्हापर्यंत उत्तरोत्तर वाढणाऱ्या उदयप्रकाशासारखा आहे.”—नीतीसूत्रे ४:१८.
१. सत्य हळूहळू का प्रकट करण्यात आले?
नीतीसूत्रे ४:१८ च्या अनुषंगाने, प्रकाशाच्या चकाकण्याद्वारे हळूहळू आध्यात्मिक सत्य प्रकट झाले आहे हा ईश्वरी बुद्धीचा पुरावा आहे. आधीच्या लेखात हे वचन प्रेषितांच्या काळात कसे पूर्ण झाले ते आपण पाहिले. एकूण सर्व शास्त्रवचनीय सत्य एकाच वेळी प्रकट करण्यात आले असते, तर ते अंधारी आणण्याजोगे आणि गोंधळविणारे ठरले असते—एखाद्या काळोखलेल्या गुहेतून तेजस्वी सूर्यप्रकाशात आल्यावर जसे वाटते त्याचप्रमाणे ते झाले असते. त्याशिवाय, हळूहळू प्रकट होणारे सत्य ख्रिश्चनांच्या विश्वासाला सतत बळकट करते. ते त्यांची आशा अधिक तेजस्वी करते आणि त्यांना अनुसरण्याचा मार्ग अधिक स्पष्ट करते.
‘विश्वासू व बुद्धिमान दास’
२. येशूने त्याच्या अनुयायांना आध्यात्मिक प्रकाश देण्यासाठी कोणाचा उपयोग करील म्हणून दर्शवले आणि ते साधन कोणाचे मिळून बनलेले आहे?
२ प्रेषितांच्या काळात, येशू ख्रिस्ताला त्याच्या अनुयायांना प्रकाशाचे प्रथम चकाकणे देण्यास अलौकिक माध्यमाचा वापर करणे योग्य वाटले. आपल्याजवळ याची दोन उदाहरणे आहेत: सा. यु. ३३ पेन्टेकॉस्ट आणि सा. यु. ३६ मधील कर्नेल्याचे मतांतर. त्यानंतर, ख्रिस्ताला मानवी प्रतिनिधी वापरणे योग्य वाटले, त्याविषयी त्याने असेही भाकीत केले होते: “ज्या विश्वासू व बुद्धिमान दासाला धन्याने आपल्या परिवाराला यथाकाळी खावयास देण्यासाठी त्यांच्यावर नेमिले आहे असा कोण? धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना त्याच्या दृष्टीस पडेल तो धन्य. मी तुम्हास खचित सांगतो की, त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमील.” (मत्तय २४:४५-४७) हा दास कोणी एक व्यक्ती असू शकत नव्हता कारण त्याला पेन्टेकॉस्टमध्ये ख्रिस्ती मंडळी सुरु झाल्यापासून धनी, येशू ख्रिस्त जाब घेण्यास येईपर्यंत आध्यात्मिक अन्न पुरवायचे होते. वस्तुस्थिती हे दाखवून देतात की, कोणत्याही समयी, हा विश्वासू व बुद्धिमान दास वर्ग पृथ्वीवरील सर्व अभिषिक्त ख्रिश्चनांचा मिळून एक गट बनतो.
३. दास वर्गाच्या पहिल्या सदस्यांमध्ये कोणाचा समावेश होता?
३ विश्वासू व बुद्धिमान दास वर्गातील पहिल्या सदस्यांमध्ये कोणाचा समावेश होता? त्यांच्यामधील प्रेषित पेत्र एक होता, त्याने येशूची आज्ञा ऐकली: “माझी मेंढरे चार.” (योहान २१:१७) दास वर्गातील इतर प्रारंभिक सदस्यांमध्ये आपले नाव असलेले शुभवर्तमान लिहिणारा मत्तय तसेच पौल, याकोब व यहुदा हे होते ज्यांनी प्रेरित पत्रे लिहिली. प्रेषित योहान, ज्याने प्रकटीकरणाचे पुस्तक, त्याचे शुभवर्तमान व त्याची पत्रे लिहिली तो देखील विश्वासू व बुद्धिमान दास वर्गाचा एक सदस्य होता. या मनुष्यांनी येशूने दिलेल्या कामगिरीच्या एकवाक्यतेत हे सर्व लिहिले.
४. ‘परिवार’ कोण आहेत?
४ सर्व अभिषिक्त जण एक गट या नात्याने, पृथ्वीवर कोठेही जगत असले, तरी दास वर्गाचा भाग आहेत, तर मग ‘परिवार’ कोण आहे? ते त्यांच्यासारखेच अभिषिक्त जण आहेत परंतु त्यांना दुसऱ्या दृष्टिकोनातून—व्यक्ती म्हणून समजले जाते. होय, व्यक्ती या नात्याने, आध्यात्मिक अन्न देणारे किंवा घेणारे यावर अवलंबून ते “दास” किंवा ‘परिवार’ यांच्यापैकी असतील. स्पष्टीकरण द्यावयाचे झाल्यास: २ पेत्र ३:१५, १६ मध्ये अहवाल दिल्याप्रमाणे, प्रेषित पेत्र पौलाच्या पत्रांचा संदर्भ देतो. ती वाचत असताना, पौलाने दास वर्गाचा प्रतिनिधी म्हणून पुरवलेले आध्यात्मिक अन्न घेणाऱ्या परिवारातील पेत्र एक असेल.
५. (अ) प्रेषितांनंतरच्या शतकांमध्ये दासाला काय झाले? (ब) एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात कोणते विकास घडले?
५ या विषयावर, देवाचे हजार वर्षांचे राज्य जवळ आले आहे (इंग्रजी) हे पुस्तक म्हणते: “‘विश्वासू व बुद्धिमान दास’ वर्गाने, धनी येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांच्या मृत्यूनंतर शतकांपासून अस्तित्वात राहून कशी सेवा केली याबद्दल आपल्याजवळ स्पष्ट असा ऐतिहासिक अहवाल नाही. हे स्पष्ट आहे की, ‘दास’ वर्गाच्या एका पिढीने त्यानंतरच्या पुढील पिढीला अन्न पुरवले. (२ तीमथ्य २:२) परंतु एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात पवित्र बायबलमधील आध्यात्मिक अन्नाची आवड असणाऱ्या व ज्यांना ते खाण्याची इच्छा होती अशा देवभिरु व्यक्ती होत्या . . . बायबल अभ्यासाचे वर्ग . . . स्थापण्यात आले आणि पवित्र शास्त्रवचनांच्या मूलभूत सत्याची समज मिळवण्यात त्यांनी प्रगती केली. या बायबल विद्यार्थ्यांपैकी प्रामाणिक निःस्वार्थी जण आध्यात्मिक अन्नाच्या या अत्यावश्यक भागांची इतरांसोबत सहभागिता करण्यासाठी उत्सुक होते. ‘परिवाराला’ आवश्यक ते आध्यात्मिक ‘अन्न यथाकाळी देण्यासाठी’ नियुक्त केलेल्या ‘दासाचा’ विश्वासू आत्मा त्यांच्याजवळ होता. तो काळ योग्य व उचित होता तसेच अन्न द्यावयाचे सर्वोत्तम माध्यम कोणते होते हे समजण्यामध्ये ते ‘बुद्धिमान’ होते. त्याचे वाटप करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.”—पृष्ठे ३४४-५.a
आधुनिक काळातील प्रकाशाचे प्रथम चकाकणे
६. सत्य क्रमाने प्रकट होण्याच्या संबंधी कोणती वास्तविकता लक्षणीय आहे?
६ यहोवाने या आध्यात्मिक प्रकाशाची क्रमानुसार वाढ होण्याकरता ज्यांचा उपयोग केला त्यांच्यासंबंधी एक गोष्ट लक्षणीय आहे व ती म्हणजे, त्यांनी स्वतःला श्रेय दिले नाही. सी. टी. रस्सेल, या वॉचटावर संस्थेच्या पहिल्या अध्यक्षांची मनोवृत्ती, प्रभू त्यांचे सर्वसामान्य कौशल्य उपयोगात आणण्यास संतुष्ट होता अशी होती. त्यांचे शत्रू वापरत असलेल्या गुणवाचक विशेषणांविषयी बंधू रस्सेल यांनी जोरदारपणे हे स्पष्ट केले की, त्यांची भेट एखाद्या “रस्सेलाईट” सोबत कधीच झाली नव्हती आणि “रस्सेलिझम” अशी कोणतीही गोष्ट नव्हती. सर्व श्रेय देवाला देण्यात आले.
७. बंधु रस्सेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ते खरोखर विश्वासू व बुद्धिमान दासाच्या सहवासात असल्याचा कोणता पुरावा दिला?
७ परिणामांकडे पाहता, यहोवाचा पवित्र आत्मा बंधू रस्सेल आणि त्यांच्याशी सहवास असलेल्यांच्या प्रयत्नांना निर्देशित करत होता यात काही शंका असू शकत नाही. विश्वासू व बुद्धिमान दासाशी सहवास असल्याचा पुरावा त्यांनी दिला. त्यावेळेचे पुष्कळ पाळक बायबल हे देवाचे प्रेरित वचन आहे व येशू देवाचा पुत्र आहे असा विश्वास बाळगण्याचा दावा करत असले, तरीही त्यांनी त्रैक्य, मानवी जीवाचे अमरत्व आणि अनंत यातना अशा खोट्या, बॅबिलोनी शिकवणींना स्वीकृती दर्शवली. येशूच्या अभिवचनानुरुप, खरे म्हणजे पवित्र आत्म्याकरवीच बंधू रस्सेल व त्यांच्या सहकाऱ्यांच्या नम्र प्रयत्नांमुळे पूर्वी कधीही घडले नाही असे सत्य चकाकले. (योहान १६:१३) त्या अभिषिक्त बायबल विद्यार्थ्यांनी पुरावा दिला की, धन्याच्या परिवाराला आध्यात्मिक अन्न पुरवण्याची ज्यांची कामगिरी आहे त्या विश्वासू व बुद्धिमान दासाचे ते खरोखर भाग होते. अभिषिक्त जणांचे एकत्रीकरण करण्यात त्यांचे प्रयत्न खरोखर एक मोठी मदत ठरली.
८. यहोवा, बायबल, येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्मा यांच्याबद्दल कोणत्या मूलभूत गोष्टी बायबल विद्यार्थ्यांना स्पष्टपणे समजल्या?
८ यहोवाने पवित्र आत्म्याकरवी या प्रारंभिक बायबल विद्यार्थ्यांवर प्रकाशाचे चकाकणे पाडून किती कृपा केली हे पाहणे उल्लेखनीय आहे. प्रथम, निर्माणकर्ता अस्तित्वात आहे आणि त्याचे अतुलनीय नाव यहोवा आहे याचा त्यांनी ठोस पुरावा दिला. (स्तोत्र ८३:१८; रोमकर १:२०) यहोवाचे चार मुख्य गुण—सामर्थ्य, न्याय, बुद्धी आणि प्रीती आहेत हे त्यांनी पाहिले. (उत्पत्ती १७:१; अनुवाद ३२:४; रोमकर ११:३३; १ योहान ४:८) या अभिषिक्त ख्रिश्चनांनी स्पष्टपणे याचा पुरावा दिला की, बायबल देवाचे प्रेरित वचन आहे आणि ते सत्य आहे. (योहान १७:१७; २ तीमथ्य ३:१६, १७) शिवाय, त्यांचा असा विश्वास होता की, देवाचा पुत्र, येशू ख्रिस्त याला निर्माण करण्यात आले व त्याने सर्व मानवजातीकरता खंडणी म्हणून आपला प्राण अर्पिला. (मत्तय २०:२८; कलस्सैकर १:१५) पवित्र आत्मा, त्रैक्यातील तिसरी व्यक्ती कदापि नसून ती देवाची कार्यकारी शक्ती आहे असे आढळून आले.—प्रेषितांची कृत्ये २:१७.
९. (अ) मानवाचा स्वभाव आणि बायबलमध्ये दिलेले भवितव्य याविषयी बायबल विद्यार्थ्यांना कोणते सत्य समजले? (ब) यहोवाच्या सेवकांनी स्पष्टपणे इतर कोणती सत्ये जाणली?
९ बायबल विद्यार्थ्यांनी हे स्पष्टपणे पाहिले की, मनुष्याजवळ अमर जीव नसून तो स्वतः एक मर्त्य जीव आहे. त्यांनी हे जाणले की, “पापाचे वेतन” अनंत यातना नव्हे तर “मरण आहे.” तसेच जळता नरक असे कोणतेही ठिकाण नाही. (रोमकर ५:१२; ६:२३; उत्पत्ती २:७; यहेज्केल १८:४) त्याशिवाय, त्यांना हे स्पष्टपणे दिसून आले की, उत्क्रांतीचा सिद्धांत केवळ अशास्त्रवचनीयच नव्हे, तर त्याला कोणत्याही वास्तविक गोष्टींचा पुरावा नाही. (उत्पत्ती, अध्याय १ आणि २) त्यांना हे देखील समजले की, बायबल दोन भवितव्ये प्रदान करते—ख्रिस्ताच्या पावलांचे अनुकरण करणाऱ्या १,४४,००० अभिषिक्त अनुयायांकरता एक स्वर्गीय भवितव्य आणि “दुसरी मेंढरे” यांच्या अगणित ‘मोठ्या लोकसमुदायासाठी’ परादीस पृथ्वी. (प्रकटीकरण ७:९; १४:१; योहान १०:१६) त्या प्रारंभिक बायबल विद्यार्थ्यांनी जाणले की, पृथ्वी सर्वकाळासाठी राहते आणि पुष्कळ धर्मांनी शिकवल्याप्रमाणे तिला जाळून टाकण्यात येणार नाही. (उपदेशक १:४; लूक २३:४३) ख्रिस्ताचे पुनरागमन अदृश्य असेल आणि त्यावेळी तो राष्ट्रांवर न्यायदंड बजावील व पार्थिव परादीस आणील हे देखील त्यांना कळाले.—प्रेषितांची कृत्ये १०:४२; रोमकर ८:१९-२१; १ पेत्र ३:१८.
१०. बायबल विद्यार्थ्यांनी बाप्तिस्मा, पाळक आणि सामान्य लोकांमधील फरक व ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारक विधी याविषयी कोणते सत्य शिकले?
१० बायबल विद्यार्थी शिकले की, शास्त्रवचनीय बाप्तिस्मा म्हणजे बालकांवर पाणी शिंपडणे नव्हे, तर त्यामध्ये मत्तय २८:१९, २० मधील येशूच्या आज्ञेच्या अनुषंगाने ज्यांना शिकवण्यात आले आहे त्या विश्वास ठेवणाऱ्यांना पाण्यात बुडवून काढणे समाविष्ट आहे. त्यांना असे कळाले की, पाळक व सामान्य लोक यांच्यात फरक असण्याविषयी कोणताही शास्त्रवचनीय आधार नाही. (मत्तय २३:८-१०) त्याउलट, सर्व ख्रिश्चनांनी सुवार्तेचे प्रचारक असावयास हवे. (प्रेषितांची कृत्ये १:८) बायबल विद्यार्थ्यांना हे कळाले की, ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारक विधी केवळ वर्षातून एकदाच, निसान १४ ला पाळावयास हवा. त्याहून अधिक म्हणजे, त्यांनी पाहिले की, ईस्टर हा मूर्तिपूजक सुटीचा दिवस आहे. त्याशिवाय, त्या अभिषिक्त जणांना, देव त्यांच्या कार्याला पाठिंबा देत होता याची इतकी खात्री होती की, त्यांनी कधीही वर्गणी गोळा केली नाही. (मत्तय १०:८) प्रारंभीच्या काळापासूनच, ख्रिश्चनांनी बायबलच्या तत्त्वांनुरुप जीवन व्यतीत करावे हे त्यांना समजले. त्यामध्ये देवाच्या पवित्र आत्म्याची फळे विकसित करण्याचेही समाविष्ट आहे.—गलतीकर ५:२२, २३.
प्रकाशाचे वाढते चकाकणे
११. ख्रिश्चनांच्या कामगिरीवर आणि येशूने मेंढरे व शेरडे यांचा दिलेला दाखला यावर कोणता प्रकाश पडला?
११ विशेषतः १९१९ पासून, यहोवाच्या सेवकांना प्रकाशाच्या वाढत्या चकाकण्याद्वारे आशीर्वादित केले जात आहे. सन १९२२ च्या सिडर पॉईंट अधिवेशनात वॉचटावर संस्थेचे दुसरे अध्यक्ष जे. एफ. रदरफोर्ड यांनी, “राजा आणि त्याच्या राज्याची घोषणा करा, घोषणा करा, घोषणा करा” हे यहोवाच्या सेवकांचे प्रथम कर्तव्य आहे याबद्दल जोरदारपणे सांगितले तेव्हा प्रकाशाचा किती लख्ख प्रकाश पडला! अगदी त्याच्या पुढील वर्षीच, मेंढरे आणि शेरडे यांच्या दाखल्यावर लख्ख प्रकाश पडला. ही भविष्यवाणी पूर्वी समजली जात होती त्याप्रमाणे हजार वर्षांच्या भविष्यात नसून सध्या प्रभूच्या दिवशी पूर्ण व्हावयाची होती हे दिसून आले. हजार वर्षांमध्ये, ख्रिस्ताचे बंधू आजारी पडणार नाहीत तसेच त्यांना बंदिस्त देखील करण्यात येणार नाही. त्याशिवाय, हजार वर्षांच्या शेवटी, येशू ख्रिस्त नव्हे तर यहोवा देव न्याय करील.—मत्तय २५:३१-४६.
१२. हर्मगिदोनाच्या बाबतीत प्रकाशाचे कोणते चकाकणे होते?
१२ सन १९२६ मध्ये आणखी एक लख्ख प्रकाश चकाकला व असे प्रकट केले की, बायबल विद्यार्थी एकेकाळी समजत होते त्याप्रमाणे, हर्मगिदोनाची लढाई एक सामाजिक क्रांती असणार नव्हती. त्याउलट, ती एक लढाई असेल ज्यावेळी यहोवा त्याचे सामर्थ्य इतक्या स्पष्टपणे प्रदर्शित करील की, तो देव आहे याची खात्री सर्वांना पटेल.—प्रकटीकरण १६:१४-१६; १९:१७-२१.
नाताळ—मूर्तिपूजक सुटीचा दिवस
१३. (अ) नाताळ साजरा करण्याच्या बाबतीत कोणता प्रकाश पाडण्यात आला? (ब) जन्म दिवस साजरे करण्याचे का थांबवण्यात आले? (तळटीपाचा समावेश करा.)
१३ त्यानंतर अल्पावधीतच, प्रकाशाच्या चकाकण्यामुळे बायबल विद्यार्थ्यांनी नाताळ पाळण्याचे सोडून दिले. त्या काळाआधी, जगभरात बायबल विद्यार्थी नेहमी नाताळ साजरा करत होते, आणि ब्रुकलिन मुख्यालयातील तो दिवस साजरा करणे उत्सवाचा प्रसंग मानला जात होता. परंतु नंतर असे समजले की, डिसेंबर २५ हा दिवस पाळणे खरोखर मूर्तिपूजक होते आणि मूर्तिपूजक लोकांना धर्मांतर करण्यासाठी धर्मत्यागी ख्रिस्ती धर्मजगताने तो निवडला होता. त्याशिवाय, असे आढळले की मेंढपाळ आपले कळप रानात चारत होते त्यामुळे येशूचा जन्म हिवाळ्यात झाला नसावा कारण ही गोष्ट ते रात्रीच्या वेळी डिसेंबरच्या शेवटी करत नसावेत. (लूक २:८) त्याउलट, शास्त्रवचने आपल्याला दाखवतात की, येशूचा जन्म ऑक्टोबर १ च्या आसपास झाला होता. बायबल विद्यार्थ्यांना हे देखील कळून चुकले की, येशूला त्याच्या जन्माच्या दोन वर्षांनंतर भेटावयास आलेले तथाकथित ज्ञानी लोक मूर्तिपूजक मागी होते.b
एक नवे नाव
१४. बायबल विद्यार्थी हे नाव यहोवाच्या लोकांसाठी उचित का नव्हते?
१४ सन १९३१ मध्ये, सत्याच्या लख्ख प्रकाशाने त्या बायबल विद्यार्थ्यांना एक उचित शास्त्रवचनीय नाव प्रकट केले. यहोवाच्या लोकांना हे कळाले होते की, इतरांनी त्यांना दिलेली कोणतीही टोपण नावे जसे की, रस्सेलाइट्स, मिलीनीयल डॉनीस्ट्स आणि “नरक न मानणारे” यांना ते स्वीकारू शकत नव्हते.c पंरतु, त्यांना असेही समजले की, त्यांनी स्वतःहून स्वीकारलेले नाव—आंतरराष्ट्रीय बायबल विद्यार्थी—याने देखील त्यांचे उचितपणे प्रतिनिधीत्व होत नव्हते. ते केवळ बायबल विद्यार्थी असण्यापेक्षाही अधिक काही होते. त्याशिवाय, इतर अनेकजण बायबलचे विद्यार्थी होते परंतु बायबल विद्यार्थ्यांशी त्यांचे काहीच जुळत नव्हते.
१५. सन १९३१ मध्ये, बायबल विद्यार्थ्यांनी कोणते नाव स्वीकारले आणि ते उचित का आहे?
१५ बायबल विद्यार्थ्यांना नवे नाव कसे प्राप्त झाले? पुष्कळ वर्षांपासून, टेहळणी बुरुज यहोवाच्या नावाला महत्त्व देत आले होते. यास्तव, बायबल विद्यार्थ्यांनी यशया ४३:१० मधील नाव स्वीकारावे हे अधिक उचित होते: “परमेश्वराचे असे म्हणणे आहे की तुम्ही मला ओळखावे, मजवर भाव ठेवावा व मी तोच आहे, माझ्यापूर्वी कोणी देव नव्हता व माझ्यानंतरहि कोणी होणे नाही हे तुम्हाला समजावे म्हणून तुम्ही माझे साक्षी आहा, तू माझा निवडलेला सेवक आहेस.”
समर्थन आणि “मोठा लोकसमुदाय”
१६. पुनर्स्थापनेच्या भविष्यावाण्या पॅलेस्टाईनवरून परतलेल्या नैसर्गिक यहुद्यांना लागू का होऊ शकत नाहीत, परंतु त्या कोणाला लागू होतात?
१६ वॉचटावर संस्थेने १९३२ मध्ये प्रकाशित केलेल्या समर्थन (इंग्रजी) याच्या दुसऱ्या खंडात प्रकाशाच्या चकाकण्याद्वारे हे प्रकट झाले की, यशया, यिर्मया, यहेज्केल आणि इतर संदेष्ट्यांनी नोंदलेल्या पुनर्स्थापनेच्या भविष्यवाण्या, जे शारीरिक यहुदी पॅलेस्टाईनवरून अविश्वासू बनून व राजनैतिक प्रवृत्तींसह परतत होते त्यांना (एकेकाळी विचार केला जात होता त्याप्रमाणे) लागू होत नव्हत्या. त्याउलट, ह्या पुनर्स्थापनेच्या भविष्यवाण्या, ज्यांची लहान प्रमाणात पूर्णता सा. यु. पू. ५३७ मध्ये यहुदी लोक बॅबिलोनी लोकांच्या दास्यातून सुटल्यावर झाली. त्याचप्रमाणे १९१९ मध्ये आध्यात्मिक इस्राएलाची मुक्ती आणि पुनर्स्थापना होण्याची सुरवात झाली तेव्हा त्याचप्रमाणे यहोवाचे खरे उपासक आज उपभोगत असलेल्या आध्यात्मिक परादीसाची परिणामस्वरूप वृद्धी झाली तेव्हा त्यांची मोठ्या प्रमाणावर पूर्णता झाली.
१७, १८. (अ) कालांतराने, प्रकाशाच्या चकाकण्याकरवी यहोवाचा मुख्य उद्देश काय असल्याचे दाखवण्यात आले? (ब) सन १९३५ मध्ये प्रकटीकरण ७:९-१७ च्या बाबतीत कोणता प्रकाश पडला?
१७ कालांतराने, प्रकाशाच्या चकाकण्याद्वारे हे प्रकट करण्यात आले की, यहोवाचा मुख्य उद्देश प्राणीमात्रांचा उद्धार करणे हा नसून त्याच्या सार्वभौमत्वाचे समर्थन करण्याचा होता. बायबलचा सर्वात महत्त्वपूर्ण विषय खंडणी नव्हे, तर राज्य हा होता कारण तो यहोवाच्या सार्वभौमत्वाचे समर्थन करील. ते प्रकाशाचे केवढे चकाकणे होते! तेथून पुढे समर्पित ख्रिस्ती स्वर्गात जाण्याबद्दल प्रामुख्याने उत्सुक नव्हते.
१८ सन १९३५ मध्ये, प्रकाशाच्या प्रखर चकाकण्याने हे प्रकट केले की, प्रकटीकरण ७:९-१७ मध्ये उल्लेखिलेला मोठा लोकसमुदाय दुय्यम स्वर्गीय वर्ग नव्हता. त्या वचनांमध्ये उल्लेखिलेले जण अभिषिक्त जणांपैकी होते व ते पूर्णपणे विश्वासू नसल्याने येशू ख्रिस्तासोबत राजे व याजक या नात्याने सिंहासनांवर बसून राज्य करण्याऐवजी सिंहासनासमोर उभे होते असा विचार केला जात होता. खरे म्हणजे, काही प्रमाणात विश्वासू असणे अशी कोणतीही कल्पना नाही. एकतर विश्वासू किंवा अविश्वासू असू शकते. तर असे दिसून आले की, ही भविष्यवाणी सर्व राष्ट्रातून आलेल्या अगणित मोठ्या लोकसमुदायाला जे आता एकत्रित केले जात आहेत आणि ज्यांना पार्थिव आशा आहे त्यांना सूचित करते. ते मत्तय २५:३१-४६ ची ‘मेंढरे’ आणि योहान १०:१६ ची “दुसरी मेंढरे” आहेत.
क्रूस—ख्रिस्ती प्रतीक नव्हे
१९, २०. क्रूस खऱ्या ख्रिस्ती विश्वासाचे प्रतीक का असू शकत नाही?
१९ पुष्कळ वर्षांपर्यंत बायबल विद्यार्थ्यांनी ख्रिस्ती विश्वासाचे प्रतीक म्हणून क्रूसाला महत्त्व दिले. त्यांच्याकडे “क्रॉस ॲण्ड क्राऊन” याची पीन देखील होती. किंग जेम्स व्हर्शन प्रमाणे येशूने त्याच्या शिष्यांना त्यांचा “क्रूस” उचलण्यास सांगितले आणि पुष्कळ जण असा विश्वास ठेवू लागले की त्याचा वध क्रूसावर करण्यात आला. (मत्तय १६:२४; २७:३२) पुष्कळ दशकांपर्यंत, हे प्रतीक टेहळणी बुरुज नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर देखील येत होते.
२० संस्थेने १९३६ मध्ये प्रकाशित केलेल्या संपत्ती (इंग्रजी) या पुस्तकाने स्पष्ट केले की, येशू ख्रिस्ताचा वध क्रूसावर नव्हे तर एका सरळ खांबावर किंवा स्तंभावर करण्यात आला. एका आधाराप्रमाणे, किंग जेम्स व्हर्शन मध्ये “क्रूस” असा भाषांतरीत केलेला ग्रीक शब्द (स्टॉ·रोसʹ) “मूलतः एका सरळ खांबाला किंवा स्तंभाला सूचित करतो. [त्याला] दोन तुळया असलेल्या ख्रिस्ती धर्मजगताने मानलेल्या आकारापासून वेगळे केले पाहिजे. . . . नंतर उल्लेख केलेल्याचा उगम प्राचीन खाल्डीया येथे झाला असून त्याला तामूज दैवताचे प्रतीक म्हणून वापरण्यात येत होते.” येशूला ज्यावर खिळले त्या साधनाची पूजा न करता ते तिरस्करणीय वाटले पाहिजे.
२१. पुढील लेखात कोणती गोष्ट विचारात घेतली जाईल?
२१ प्रखर तसेच सौम्य समजल्या जाणाऱ्या प्रकाशाच्या चकाकण्याची आणखी उदाहरणे आहेत. यांच्या चर्चेसाठी, कृपया पुढील लेख पाहा.
[तळटीपा]
a वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉर्क, इंका. द्वारे प्रकाशित.
b कालांतराने, असे समजले की, सर्वकाळातील सर्वात महत्त्वपूर्ण जन्मदिवस साजरा करण्यात आला नाही, याचा अर्थ आपण कोणताही जन्मदिवस साजरा करू नये. त्याशिवाय, इस्राएल लोकांनी किंवा आरंभीच्या ख्रिश्चनांनीसुद्धा जन्मदिवस साजरे केले नाहीत. बायबल केवळ दोन जन्मदिवसांचा उल्लेख करते, एक फारोचा आणि दुसरा हेरोद अंतीपाचा. दिवस साजरा करण्याच्या त्या प्रत्येक प्रसंगी वध करण्यात आल्यामुळे ते वाईट प्रसंग ठरले. यहोवाचे साक्षीदार जन्मदिवस साजरे करत नाहीत कारण त्यामागे मूर्तिपूजक उगम आहेत आणि त्यावेळी ज्यांचा जन्मदिवस आहे त्यांना गौरव दिला जातो.—उत्पत्ती ४०:२०-२२; मार्क ६:२१-२८.
c ही चूक ख्रिस्ती धर्मजगतातील अनेक पंथांनी केली. लुथेरन हे मार्टीन लुथरच्या शत्रुंनी त्याच्या अनुयायांना दिलेले टोपण नाव होते, जे त्यांनी नंतर स्वीकारले. त्याचप्रमाणे, बॅप्टीस्ट्स पाण्यात बुडून बाप्तिस्मा देत असल्याकारणाने इतरांनी त्यांना दिलेले हे टोपण नाव त्यांनी स्वीकारले. या सारखेच, मेथोडिस्ट लोकांनी, एका गैर मेथोडिस्ट व्यक्तीने त्यांना दिलेले हे टोपण नाव स्वीकारले. सोसायटी ऑफ फ्रेंडस् यांना क्वेकर्स हे नाव कसे पडले त्याविषयी द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिया म्हणतो: “सुरवातीला क्वेकर हा शब्द फॉक्सकरता [संस्थापक] अपमानास्पद होता, त्याने एका इंग्रजी न्यायाधीशाला, ‘प्रभूच्या वचनाला काप’ असे सांगितले होते. त्या न्यायाधीशाने फॉक्सला ‘क्वेकर’ असे नाव दिले.”
तुम्हाला आठवते का?
◻ ‘विश्वासू व बुद्धिमान दास‘ आणि ‘परिवार‘ कोण आहे?
◻ आधुनिक काळात प्रारंभिक प्रकाशाचे काही चकाकणे कोणते होते?
◻ यहोवाचे साक्षीदार हे नवे नाव उचित का होते?
◻ सन १९३५ मध्ये कोणते उल्लेखनीय सत्य प्रकट करण्यात आले?
[१७ पानांवरील चित्रं]
सी. टी. रस्सेल व त्यांच्या सहकाऱ्यांनी आध्यात्मिक प्रकाश पसरवला, परंतु सर्व श्रेय यहोवाला देण्यात आले