वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w02 ४/१ पृ. १०-१५
  • बाप्तिस्मा का घ्यावा?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बाप्तिस्मा का घ्यावा?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • बाप्तिस्मा—कशाप्रकारे?
  • बाप्तिस्म्याकरता एक नवे कारण
  • अचूक ज्ञान आवश्‍यक
  • पश्‍चात्ताप आणि परिवर्तन आवश्‍यक
  • मनःपूर्वक समर्पण आवश्‍यक
  • तुम्हाला कोणती गोष्ट मागे ओढत आहे का?
  • बाप्तिस्मा आणि देवाबरोबर तुमचा नातेसंबंध
    बायबल नेमके काय शिकवते?
  • तुम्हाला बाप्तिस्मा घेण्यास काय अडचण आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • बाप्तिस्मा म्हणजे काय?
    बायबलमधून प्रश्‍नांची उत्तरं
  • तुमच्या बाप्तिस्म्याचा अर्थ
    उपासनेतील ऐक्य
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
w02 ४/१ पृ. १०-१५

बाप्तिस्मा का घ्यावा?

“तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा; त्यांस . . . बाप्तिस्मा द्या.”—मत्तय २८:१९.

१, २. (अ) काही लोकांना कोणत्या परिस्थितीत बाप्तिस्मा देण्यात आला? (ब) बाप्तिस्म्याच्या संबंधाने कोणते प्रश्‍न उद्‌भवतात?

फ्रेंच राजा शार्लमेन याने सा.यु. ७७५-७७ या काळादरम्यान सॅक्सन लोकांवर विजय मिळवल्यानंतर त्यांना जबरदस्तीने सामुहिकरित्या बाप्तिस्मा घेण्यास भाग पाडले. इतिहासकार जॉन लॉर्ड याच्या लिखाणांनुसार “त्याने जबरदस्तीने नाममात्र ख्रिस्ती धर्मात त्यांचे धर्मपरिवर्तन केले.” तसेच, सा.यु. ९८७ साली रशियन शासक व्लादिमीर पहिला यानेही एका ग्रीक ऑर्थोडॉक्स राजकन्येशी विवाह केल्यानंतर आपल्या सर्व प्रजाजनांना “ख्रिस्ती” बनवण्याचे ठरवले. त्याने लोकांना सामूहिक बाप्तिस्मा देण्याचा—जरूर पडल्यास तलवारीचा धाक दाखवून लोकांना बाप्तिस्मा घेण्यास भाग पाडण्याचा हुकूम जारी केला!

२ अशारितीने बाप्तिस्मा देणे योग्य होते का? त्या बाप्तिस्म्यांना काही अर्थ होता का? कोणालाही बाप्तिस्मा दिला जावा का?

बाप्तिस्मा—कशाप्रकारे?

३, ४. पाणी शिंपडून किंवा डोक्यावर पाणी ओतून बाप्तिस्मा देणे ही बाप्तिस्म्याची योग्य ख्रिस्ती पद्धत का नाही?

३ लोकांना बाप्तिस्मा घेण्यास भाग पाडणारा शार्लमेन आणि व्लादिमीर पहिला, हे दोघेही देवाच्या वचनाच्या विरोधात वागत होते. किंबहुना, पाणी शिंपडून, किंवा डोक्यावर पाणी ओतून किंवा एखाद्या व्यक्‍तीला बायबल सत्य न शिकवता तिला पाण्यात डुबवून बाप्तिस्मा दिला जातो तेव्हा देखील या बाप्तिस्म्याला काहीएक अर्थ नसतो.

४ सा.यु. २९ साली नासोरी येशू बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानाकडे आला तेव्हा काय घडले याकडे लक्ष द्या. योहान यार्देन नदीत लोकांना बाप्तिस्मा देत होता. ते स्वेच्छेने त्याच्याकडे बाप्तिस्मा घेण्यास आले होते. त्याने केवळ त्यांना नदीत उभे राहायला सांगून त्यांच्या डोक्यावर नदीतले थोडे पाणी घेऊन ते ओतले का किंवा त्यांच्यावर शिंपडले का? योहानाने येशूला बाप्तिस्मा दिला तेव्हा काय घडले? मत्तयाच्या वृत्तात आपल्याला असे कळून येते की बाप्तिस्मा झाल्यावर “येशू लागलाच पाण्यातून वर आला.” (मत्तय ३:१६) तो पाण्यात होता, त्याला यार्देन नदीत बुडवण्यात आले होते. त्याचप्रकारे, प्रामाणिक अंतःकरणाच्या कूशी षंढाला देखील एका ‘पाणवठ्यात’ बाप्तिस्मा देण्यात आला. बाप्तिस्मा देण्याकरता असे पाणवठे आवश्‍यक होते कारण येशूला व त्याच्या शिष्यांना पाण्यात बुडवून बाप्तिस्मा देण्यात आला.—प्रेषितांची कृत्ये ८:३६.

५. सुरवातीचे ख्रिस्ती कशाप्रकारे बाप्तिस्मा द्यायचे?

५ “बाप्तिस्मा देणे,” किंवा “बाप्तिस्मा” असे भाषांतरित करण्यात आलेले मूळ ग्रीक शब्द पाण्यात बुडवण्यास, किंवा पाण्यात डुबकी मारण्यास किंवा डुंबण्यास सूचित करतात. स्मिथ्स बायबल डिक्शनरी यात असे म्हटले आहे: “बाप्तिस्मा याचा योग्य आणि शब्दशः अर्थ बुडवणे असाच आहे.” म्हणूनच बायबलच्या काही भाषांतरांत “बुडवणारा योहान” आणि “पाण्यात बुचकळणारा योहान” असा उल्लेख आढळतो. (मत्तय ३:१, रॉतरहॅम; डायग्लॉट, इंटरलिनियर) ऑगस्टस नेॲन्डर यांच्या पहिल्या तीन शतकातील ख्रिस्ती धर्माचा व चर्चचा इतिहास (इंग्रजी), या ग्रंथात असे म्हटले आहे: “सुरवातीला बाप्तिस्मा पाण्यात बुडवून दिला जात असे.” विसाव्या शतकातील लेरूस या सुप्रसिद्ध फ्रेंच (पॅरिस, १९२८) लिखाणात असे विधान आढळते: “सुरवातीच्या खिस्ती धर्मियांना जेथे कोठे पाणी उपलब्ध होते तेथे पाण्यात बुडवूनच बाप्तिस्मा देण्यात येई.” तसेच न्यू कॅथलिक एन्सायक्लोपिडिया यात असे म्हटले आहे: “आरंभीच्या चर्चमध्ये बाप्तिस्मा पाण्यात बुडवूनच दिला जायचा यात काही वाद नाही.” (१९६७, खंड दुसरा, पृष्ठ ५६) आजच्या काळातही यहोवाचा साक्षीदार या नात्याने घेतला जाणारा बाप्तिस्मा स्वेच्छने आणि पाण्यात पूर्णपणे बुडवून घेतला जातो.

बाप्तिस्म्याकरता एक नवे कारण

६, ७. (अ) योहानाने दिलेल्या बाप्तिस्म्यांचा काय उद्देश होता? (ब) येशूच्या अनुयायांच्या बाप्तिस्म्यांच्या संबंधाने कोणती गोष्ट नवीन होती?

६ योहानाने दिलेल्या बाप्तिस्म्यांचा उद्देश आणि येशूच्या शिष्यांनी दिलेल्या बाप्तिस्म्यांचा उद्देश वेगवेगळा होता. (योहान ४:१, २) योहानाचा बाप्तिस्मा हा लोकांनी नियमशास्त्राच्या विरोधात केलेल्या पापांकरता पश्‍चात्ताप केल्याचा जाहीर पुरावा होता.a (लूक ३:३) पण येशूच्या अनुयायांच्या बाप्तिस्म्याला एक नवीन अर्थसूचकता होती. सा.यु. ३३ सालच्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी प्रेषित पेत्राने आपल्या श्रोत्यांना असे आर्जवले: “पश्‍चात्ताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या.” (प्रेषितांची कृत्ये २:३७-४१) पेत्र यहुद्यांना आणि यहुदी मतानुसाऱ्‍यांना उद्देशून बोलत होता तरीसुद्धा तो येथे नियमशास्त्राच्या विरोधात केलेल्या पापांविषयी पश्‍चात्ताप सूचित करण्यास बाप्तिस्मा घेण्याविषयी सांगत नव्हता; शिवाय, येशूच्या नावाने बाप्तिस्मा घेणे म्हणजे पापांचे धुतले जाणे असेही त्याने त्यांना सुचवले नाही.—प्रेषितांची कृत्ये २:१०.

७ त्या प्रसंगी पेत्राने ‘राज्याच्या किल्ल्यांपैकी’ पहिल्या किल्लीचा वापर केला. कशासाठी? आपल्या श्रोत्यांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्याकरता त्यांना असलेल्या संधीचे ज्ञान प्रकट करण्याकरता. (मत्तय १६:१९) यहुद्यांनी येशू मशीहा असल्याचे नाकारल्यामुळे, पश्‍चात्ताप करणे आणि येशूवर विश्‍वास ठेवणे ही देवाची क्षमा मिळवण्याकरता एक नवीन व महत्त्वपूर्ण आवश्‍यकता होती. येशूच्या नावाने पाण्यात बुडवले जाण्याकरवी ते आपल्या विश्‍वासाचा जाहीर पुरावा देऊ शकत होते. अशाप्रकारे ते ख्रिस्ताच्याद्वारे देवाला आपले वैयक्‍तिक समर्पण चिन्हित करू शकत होते. आजही, जे कोणी देवाची संमती मिळवू इच्छितात त्यांनी अशाप्रकारे विश्‍वास केला पाहिजे, स्वतःचे जीवन यहोवा देवाला समर्पित केले पाहिजे आणि परमपवित्र देवाला केलेल्या विनाशर्त समर्पणाचे द्योतक म्हणून ख्रिस्ती बाप्तिस्मा घेतला पाहिजे.

अचूक ज्ञान आवश्‍यक

८. ख्रिस्ती बाप्तिस्मा सर्वांसाठी का नाही?

८ ख्रिस्ती बाप्तिस्मा हा सर्वांसाठी नाही. येशूने आपल्या शिष्यांना अशी आज्ञा दिली: “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा.” (मत्तय २८:१९, २०) लोकांना बाप्तिस्मा देण्याआधी त्यांना ‘येशूने त्याच्या शिष्यांना जे आज्ञापिले ते सर्व पाळावयास शिकवणे’ महत्त्वाचे आहे. त्याअर्थी, जे देवाच्या वचनातील अचूक ज्ञानाच्या आधारावर विश्‍वास धरत नाहीत अशा लोकांना जबरदस्तीने बाप्तिस्मा देण्यासारखी अर्थहीन गोष्ट दुसरी नाही; शिवाय हे येशूने आपल्या खऱ्‍या अनुयायांना दिलेल्या आज्ञेच्या विरोधात आहे.—इब्री लोकांस ११:६.

९. ‘पित्याच्या नावाने’ बाप्तिस्मा घेण्याचा काय अर्थ होतो?

९ ‘पित्याच्या नावाने’ बाप्तिस्मा घेण्याचा काय अर्थ होतो? याचा असा अर्थ होतो की बाप्तिस्मा घेण्यास इच्छुक असणारा आपल्या स्वर्गीय पित्याची पदवी आणि त्याचा अधिकार ओळखतो. दुसऱ्‍या शब्दांत, यहोवा आपला निर्माणकर्ता आहे, “सर्व पृथ्वीवर परात्पर” आणि सबंध विश्‍वाचा सार्वभौम आहे हे तो स्वीकारतो.—स्तोत्र ८३:१८; यशया ४०:२८; प्रेषितांची कृत्ये ४:२४.

१०. ‘पुत्राच्या नावाने’ बाप्तिस्मा घेण्याचा काय अर्थ होतो?

१० ‘पुत्राच्या नावाने’ बाप्तिस्मा घेणे म्हणजे देवाचा एकुलता एक पुत्र या नात्याने येशूची पदवी व अधिकार ओळखणे. (१ योहान ४:९) बाप्तिस्मा घेण्यास योग्य असलेले हे स्वीकारतात की देवाने “पुष्कळांच्या खंडणीसाठी” ज्याला दिले तो येशू आहे. (मत्तय २०:२८; १ तीमथ्य २:५, ६) बाप्तिस्मा घेण्यास इच्छुक असणाऱ्‍यांनी हेही ओळखले पाहिजे की येशूला देवाने गौरवान्वित करून “अत्युच्च” स्थान दिले आहे.—फिलिप्पैकर २:८-११; प्रकटीकरण १९:१६.

११. “पवित्र आत्म्याच्या नावाने” बाप्तिस्मा घेण्याचा काय अर्थ होतो?

११ “पवित्र आत्म्याच्या नावाने” बाप्तिस्मा घेण्याचा काय अर्थ आहे? यावरून असे सूचित होते की पवित्र आत्मा यहोवाची कार्यकारी शक्‍ती असून आपल्या उद्देशाच्या एकवाक्यतेत तो त्याचा वेगवेगळ्या मार्गाने उपयोग करतो हे बाप्तिस्मा घेण्यास इच्छुक असलेली व्यक्‍ती स्वीकारते. (उत्पत्ति १:२; २ शमुवेल २३:१, २; २ पेत्र १:२१) बाप्तिस्मा घेण्यास योग्य असणारे कबूल करतात की पवित्र आत्मा त्यांना ‘देवाच्या गहन गोष्टी’ समजून घेण्यास, राज्य प्रचाराचे कार्य करण्यास आणि आत्म्याचे फळ अर्थात “प्रीति, आनंद, शांति, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्‍वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन” प्रदर्शित करण्यास साहाय्य करतो.—१ करिंथकर २:१०; गलतीकर ५:२२, २३; योएल २:२८, २९.

पश्‍चात्ताप आणि परिवर्तन आवश्‍यक

१२. ख्रिस्ती बाप्तिस्म्याचा पश्‍चात्तापाशी कशाप्रकारे संबंध आहे?

१२ ज्याच्यात पापाचा अंशही नव्हता अशा येशूचा अपवाद वगळता, बाप्तिस्मा हे पश्‍चात्तापाशी संबंधित, देवाची स्वीकृती असलेले चिन्ह आहे. जे करायला नको होते ते केल्याबद्दल किंवा जे करायला हवे होते ते न केल्याबद्दल आपण पश्‍चात्ताप करतो तेव्हा आपल्याला त्याविषयी मनापासून दिलगिरी किंवा खेद वाटतो. देवाला संतुष्ट करू इच्छिणाऱ्‍या पहिल्या शतकातील यहुद्यांना ख्रिस्ताविरुद्ध केलेल्या पापांविषयी पश्‍चात्ताप करणे आवश्‍यक होते. (प्रेषितांची कृत्ये ३:११-१९) करिंथ येथे राहणाऱ्‍यांपैकी सत्य मानणाऱ्‍या काही गैरयहुद्यांनी व्यभिचार, मूर्तिपूजा, चोरी आणि इतर गंभीर पापांबद्दल पश्‍चात्ताप केला. आणि यामुळे ते येशूच्या रक्‍तात ‘धुतले गेले;’ त्यांना देवाच्या सेवेकरता ‘पवित्र करण्यात’ आले अर्थात निवडण्यात आले आणि ख्रिस्ताच्या नावाने आणि देवाच्या आत्म्याने त्यांना ‘नीतिमान ठरवण्यात’ आले. (१ करिंथकर ६:९-११) चांगला विवेक प्राप्त होण्याकरता आणि पापाबद्दलच्या दोषभावनेतून देवाद्वारे मुक्‍त केले जाण्याकरता पश्‍चात्ताप करणे ही एक महत्त्वाची पायरी आहे.—१ पेत्र ३:२१.

१३. बाप्तिस्म्याच्या संबंधाने, परिवर्तनात कशाचा अंतर्भाव आहे?

१३ परिवर्तन हे यहोवाचा साक्षीदार म्हणून आपला बाप्तिस्मा होण्याआधी घडले पाहिजे. परिवर्तन हे ख्रिस्त येशूचे अनुसरण करण्याचा मनःपूर्वक निर्णय घेतलेल्या व्यक्‍तीने स्वेच्छेने करायचे कृत्य आहे. ही व्यक्‍ती आपल्या पूर्वीच्या वर्तनाचा धिक्कार करून देवाच्या नजरेत जे योग्य ते करण्याचा निर्धार करते. बायबलमध्ये, परिवर्तनाशी संबंधित असलेल्या इब्री आणि ग्रीक क्रियापदांचा अर्थ मागे फिरणे किंवा वळणे असा होतो. हे एका चुकीच्या मार्गावरून फिरून देवाकडे वळण्याला सूचित करते. (१ राजे ८:३३, ३४) परिवर्तनाकरता “पश्‍चात्तापास शोभतील अशी कृत्ये” करणे आवश्‍यक आहे. (प्रेषितांची कृत्ये २६:२०) त्याकरता आपण खोटी उपासना सोडून दिली पाहिजे, देवाच्या आज्ञांच्या अनुसार वागले पाहिजे आणि केवळ यहोवाची अनन्य उपासना केली पाहिजे. (अनुवाद ३०:२, ८-१०; १ शमुवेल ७:३) परिवर्तनामुळे आपल्या विचारसरणीत, ध्येयांत आणि स्वभावात बदल घडून येतो. (यहेज्केल १८:३१) अधार्मिक गुणांऐवजी आपण नवे मनुष्यपण धारण करतो व या अर्थाने आपण ‘वळतो.’—प्रेषितांची कृत्ये ३:१९; इफिसकर ४:२०-२४; कलस्सैकर ३:५-१४.

मनःपूर्वक समर्पण आवश्‍यक

१४. येशूच्या अनुयायांचे समर्पण कशास सूचित करते?

१४ येशूच्या अनुयायांच्या बाप्तिस्म्याआधी त्यांनी देवाला मनःपूर्वक समर्पण करणे देखील आवश्‍यक आहे. समर्पण हे एखाद्या पवित्र उद्देशाकरता राखून ठेवण्यास सूचित करते. ही पायरी इतकी महत्त्वाची आहे की आपण यहोवाची सदासर्वकाळ अनन्य भक्‍ती करण्याचा हा निर्णय प्रार्थनेत त्याच्याजवळ व्यक्‍त केला पाहिजे. (अनुवाद ५:९) अर्थात आपले समर्पण हे एखाद्या कार्याला किंवा एखाद्या मानवाला नसून खुद्द देवाला आहे.

१५. बाप्तिस्मा घेण्यास इच्छुक असणाऱ्‍यांना पाण्यात का बुडवले जाते?

१५ आपण ख्रिस्ताद्वारे देवाला स्वतःचे समर्पण करतो तेव्हा आपण बायबलमध्ये प्रकट केलेल्या देवाच्या इच्छेनुसार आपल्या जीवनाचा उपयोग करण्याचा संकल्प व्यक्‍त करतो. ज्याप्रमाणे देवाच्या सेवेकरता स्वतःला सादर करत असल्याचे चिन्ह म्हणून येशूचाही यार्देन नदीत बाप्तिस्मा झाला त्याचप्रमाणे आपल्या समर्पणाचे द्योतक म्हणून बाप्तिस्मा घेण्यास इच्छुक असणाऱ्‍यांना पाण्यात बुडवले जाते. (मत्तय ३:१३) त्या अत्यंत महत्त्वाच्या प्रसंगी येशू प्रार्थना करत होता हे लक्ष देण्याजोगे आहे.—लूक ३:२१, २२.

१६. इतरांचा बाप्तिस्मा होताना आपण पाहतो तेव्हा कोणत्या योग्य पद्धतीने आपल्याला आनंद व्यक्‍त करता येईल?

१६ येशूचा बाप्तिस्मा हा एक गंभीर परंतु आनंदी प्रसंग होता. सध्याच्या काळातील ख्रिस्ती बाप्तिस्म्याविषयीही हेच म्हणता येईल. जेव्हा आपण इतरांना, देवाला केलेले समर्पण बाप्तिस्म्याच्या रूपात जाहीर करताना पाहतो तेव्हा आपण आदरणीय पद्धतीने टाळ्या वाजवून आणि प्रेमळपणे त्यांचे कौतुक करून आपला आनंद व्यक्‍त करू शकतो. पण एक व्यक्‍ती जेव्हा आपला विश्‍वास जाहीरपणे व्यक्‍त करते त्या प्रसंगाची पवित्रता ओळखून आपण जोरजोराने ओरडणे, शिट्या वाजवणे आणि अशाप्रकारच्या इतर पद्धतीने आनंद व्यक्‍त करण्याचे टाळतो. आपण आपला आनंद मर्यादशील पद्धतीने व्यक्‍त करतो.

१७, १८. एक व्यक्‍ती बाप्तिस्म्याकरता योग्य आहे किंवा नाही हे कसे ठरवता येते?

१७ काहीजण तान्ह्या मुलांवर पाणी शिंपडतात तर काहीजण बायबलविषयी कसलेही ज्ञान नसलेल्या लोकांना सामूहिक बाप्तिस्मा देतात; पण यहोवाचे साक्षीदार मात्र कधीही कोणाला जबरदस्तीने बाप्तिस्मा देत नाहीत. किंबहुना, जे आध्यात्मिक दृष्टीने अद्याप योग्य नाहीत अशांना ते बाप्तिस्मा देत नाहीत. बाप्तिस्मा न झालेला सुवार्ता प्रचारक होण्याआधी देखील, ख्रिस्ती वडील या व्यक्‍तीला बायबलच्या मूलभूत शिकवणुकी समजल्या आहेत किंवा नाही, ती त्यांचे पालन करत आहे किंवा नाही याची खात्री करतात आणि “तुम्हाला खरोखर यहोवाचा साक्षीदार व्हायचे आहे का?” या आशयाच्या प्रश्‍नाला त्या व्यक्‍तीने होकारार्थी उत्तर दिले तरच पुढचे पाऊल उचलतात.

१८ तुरळक अपवाद वगळता, एक व्यक्‍ती जेव्हा राज्य प्रचाराच्या कार्यात बऱ्‍यापैकी सहभाग घेऊ लागते आणि बाप्तिस्मा घेण्याची इच्छा व्यक्‍त करते तेव्हा ख्रिस्ती वडील तिच्यासोबत चर्चा आयोजित करतात; जेणेकरून त्यांना याची खात्री करता येईल की ही व्यक्‍ती सत्य मानते आणि तिने यहोवाला समर्पण केले असून बाप्तिस्म्याकरता लागणाऱ्‍या देवाच्या अपेक्षा ती पूर्ण करते. (प्रेषितांची कृत्ये ४:४; १८:८) १०० पेक्षा अधिक प्रश्‍नांची उत्तरे ती व्यक्‍ती स्वतः ज्याप्रकारे देते त्यावरून वडिलांना हे ठरवण्यास मदत होते की ती बाप्तिस्मा घेण्याकरता बायबलमध्ये दिलेल्या अपेक्षा पूर्ण करते की नाही. काही जण योग्य नसल्याचे दिसून येते आणि त्यामुळे त्यांना ख्रिस्ती बाप्तिस्म्याकरता स्वीकारले जात नाही.

तुम्हाला कोणती गोष्ट मागे ओढत आहे का?

१९. योहान ६:४४ या वचनानुसार कोण येशूचे सहवारस असतील?

१९ सामूहिक बाप्तिस्मा घेण्याकरता भाग पाडलेल्यांपैकी बऱ्‍याच जणांना असे सांगितले जाते की मृत्यू झाल्यानंतर ते स्वर्गात जातील. पण आपल्या आदर्शानुसार चालणाऱ्‍या अनुयायांसंदर्भात येशूने म्हटले: “ज्याने मला पाठविले त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीहि माझ्याकडे येऊ शकत नाही.” (योहान ६:४४) यहोवाने १,४४,००० जणांना स्वर्गातील राज्यात ख्रिस्ताचे सहवारस म्हणून राज्य करण्याकरता आकर्षिले आहे. बळजबरीने दिलेला बाप्तिस्मा, देवाच्या व्यवस्थेतील ते वैभवी स्थान मिळवण्याइतपत एका व्यक्‍तीला कधीही पवित्र ठरवू शकलेला नाही.—रोमकर ८:१४-१७; २ थेस्सलनीकाकर २:१३; प्रकटीकरण १४:१.

२०. अद्याप ज्यांचा बाप्तिस्मा झाला नाही अशांना कशामुळे मदत मिळेल?

२० एकोणीसशे तीसच्या दशकाच्या मध्यापासून, “मोठ्या संकटातून” बचावून पृथ्वीवर सर्वकाळ जगण्याची आशा बाळगणारे लाखो लोक येशूच्या ‘दुसऱ्‍या मेंढरांत’ सामील झाले आहेत. (प्रकटीकरण ७:९, १४; योहान १०:१६) ते बाप्तिस्म्याकरता योग्य आहेत कारण त्यांचे जीवन देवाच्या वचनाशी सुसंगत असून ते देवावर आपल्या “संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण शक्‍तीने व संपूर्ण बुद्धीने” प्रेम करतात. (लूक १०:२५-२८) काही जणांना, यहोवाचे साक्षीदार ‘आत्म्याने व खरेपणाने देवाची उपासना’ करतात हे माहीत असूनही त्यांनी अद्याप येशूचे अनुकरण करून बाप्तिस्मा घेण्याद्वारे यहोवा देवाप्रती आपले मनःपूर्वक प्रेम आणि अनन्य भक्‍ती जाहीरपणे व्यक्‍त केलेली नाही. (योहान ४:२३, २४; अनुवाद ४:२४; मार्क १:९-११) हे महत्त्वाचे पाऊल उचलण्याकरता मनापासून, सुस्पष्टपणे प्रार्थना केल्यामुळे त्यांना देवाच्या वचनाचे पूर्णार्थाने पालन करून यहोवा देवाला विनाशर्त समर्पण करण्याची व बाप्तिस्मा घेण्याची प्रेरणा व धैर्य मिळेल.

२१, २२. काहीजण समर्पण व बाप्तिस्म्याविषयी टाळाटाळ का करतात?

२१ काहीजण समर्पण व बाप्तिस्म्याविषयी टाळाटाळ करतात कारण ते जगिक कामांत किंवा धनसंपत्ती गोळा करण्यात इतके गुंतले आहेत की आध्यात्मिक गोष्टींकरता त्यांच्याकडे फार कमी वेळ उरतो. (मत्तय १३:२२; १ योहान २:१५-१७) त्यांनी आपला दृष्टिकोन आणि ध्येये बदलली तर ते किती आनंदी होऊ शकतात! यहोवाच्या जवळ येण्याद्वारे त्यांची आध्यात्मिक उन्‍नती होईल आणि यामुळे त्यांना अनावश्‍यक चिंतांपासून मुक्‍त होता येईल आणि देवाची इच्छा पूर्ण केल्यामुळे मिळणारी शांती व समाधान त्यांना प्राप्त होईल.—स्तोत्र १६:११; ४०:८; नीतिसूत्रे १०:२२; फिलिप्पैकर ४:६, ७.

२२ इतरजण म्हणतात की त्यांचे यहोवावर प्रेम आहे पण ते समर्पण करून बाप्तिस्मा यासाठी घेत नाहीत कारण त्यांना असे वाटते की यामुळे त्यांना जाब द्यावा लागणार नाही. पण प्रत्येकाला देवाला हिशेब द्यावा लागेल. आपण यहोवाचे वचन ऐकले तेव्हाच आपल्यावर ही जबाबदारी आली. (यहेज्केल ३३:७-९; रोमकर १४:१२) ‘निवडून घेतलेली प्रजा’ या नात्याने प्राचीन इस्राएल लोक यहोवाला समर्पित राष्ट्रात जन्मले होते; त्याअर्थी त्याच्या कायदेकानूनांनुसार विश्‍वासूपणे त्याची सेवा करण्यास ते बांधील होते. (अनुवाद ७:६, ११) आज मात्र कोणीही अशा राष्ट्रात जन्म घेत नाही, पण जर आपल्याला बायबलमधून अचूक ज्ञान मिळाले असेल तर मग आपण विश्‍वासूपणे त्यानुसार वागले पाहिजे.

२३, २४. कोणत्या गोष्टींची भीती बाळगून एखाद्याने बाप्तिस्मा घेण्यापासून मागे हटू नये?

२३ आपल्याजवळ पुरेसे ज्ञान नाही अशी भावना देखील कित्येक लोकांना बाप्तिस्मा घेण्यापासून रोखते. पण आपल्यापैकी कोणाजवळही पूर्ण ज्ञान नाही कारण “देवाचा आदिपासून अंतापर्यंतचा कार्यक्रम मनुष्याला उमगत नाही.” (उपदेशक ३:११) कूशी षंढाचे उदाहरण पाहा. यहुदी मतानुसारी असल्यामुळे त्याला शास्त्रवचनांचे थोडेबहुत ज्ञान होते पण देवाच्या उद्देशांविषयी प्रत्येक प्रश्‍नाचे त्याच्याजवळ उत्तर नव्हते. येशूच्या खंडणी बलिदानाद्वारे तारणाकरता यहोवाने केलेल्या तरतुदीविषयी शिकल्यावर या षंढाने लगेच बाप्तिस्मा घेतला.—प्रेषितांची कृत्ये ८:२६-३८.

२४ काहीजण देवाला समर्पण करण्यास कचरतात कारण त्यांना अपयशी होण्याची भीती वाटते. सतरा वर्षांची मोनीक म्हणते: “मी बाप्तिस्मा घेण्याचे आजपर्यंत टाळत आले आहे कारण मी माझ्या समर्पणानुसार जगू शकणार नाही अशी मला भीती वाटते.” पण जर आपण यहोवावर पूर्ण हृदयाने भरवसा ठेवला तर ‘तो आपल्या वाटा नीट करील.’ तो आपल्याला त्याचे विश्‍वासू समर्पित सेवक या नात्याने ‘सत्यात चालत राहण्यास’ मदत करेल.—नीतिसूत्रे ३:५, ६, पं.र.भा.; ३ योहान ४.

२५. कोणता प्रश्‍न विचार करण्याजोगा आहे?

२५ यहोवावर पूर्ण भरवसा आणि मनःपूर्वक प्रेम असल्यामुळे दर वर्षी हजारो लोक समर्पण करण्यास व बाप्तिस्मा घेण्यास प्रवृत्त होतात. आणि ज्यांनी आधीच समर्पण केले आहे असे देवाचे सर्व सेवक निश्‍चितच त्याला विश्‍वासू राहू इच्छितात. पण आपण आज कठीण काळात जगत आहोत आणि त्यामुळे आपल्याला विश्‍वासाच्या अनेक परीक्षांना तोंड द्यावे लागते. (२ तीमथ्य ३:१-५) पण आपण यहोवाला केलेल्या समर्पणानुसार जगण्यासाठी काय केले पाहिजे? हे आपण पुढच्या लेखात पाहणार आहोत.

[तळटीप]

a येशूच्या ठायी पाप नव्हते त्यामुळे त्याने पश्‍चात्ताप जाहीर करण्यासाठी बाप्तिस्मा घेतला नाही. तर, त्याचा बाप्तिस्मा तो स्वतःला देवाची इच्छा पूर्ण करण्याकरता सादर करत असल्याचे चिन्ह होते.—इब्री लोकांस ७:२६; १०:५-१०.

तुम्हाला आठवते का?

• ख्रिस्ती बाप्तिस्मा कशाप्रकारे दिला जातो?

• बाप्तिस्मा घेणाऱ्‍या व्यक्‍तीला कोणते ज्ञान असणे आवश्‍यक आहे?

• खऱ्‍या ख्रिश्‍चनांना बाप्तिस्मा घेण्याआधी कोणती पावले उचलावी लागतात?

• काहीजण बाप्तिस्मा घेण्याचे का टाळतात, पण त्यांना कशामुळे मदत होऊ शकते?

[१४ पानांवरील चित्रे]

“पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने” बाप्तिस्मा घेण्याचा काय अर्थ होतो हे तुम्हाला माहीत आहे का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा