शिष्य बनविण्यातील आनंद कसा शोधावा
देवाचा सहकर्मी होण्याद्वारे एखादा मनुष्य अत्यानंदाचा अनुभव घेऊ शकतो. आज, धार्मिकतेकडे कल असणाऱ्या लोकांना ख्रिस्ती मंडळीमध्ये एकत्रित करणे आणि ख्रिस्ती या नात्याने त्यांना जीवन प्राप्त व्हावे म्हणून आता, तसेच नवीन जगामध्ये बचावून जाण्यासाठी देखील प्रशिक्षण देणे, या गोष्टींचा समावेश देवाच्या कार्यामध्ये होतो.—मीखा ४:१-४; मत्तय २८:१९, २०; २ पेत्र ३:१३.
लॅटीन अमेरिका येथे १९८० पासून दहा लाख लोक येशू ख्रिस्ताचे शिष्य झाले त्यामुळे तेथील यहोवाच्या साक्षीदारांसाठी हा मोठ्या आनंदाचा स्रोत राहिला आहे. या फलदायी क्षेत्रातील अनेक लोक बायबलचा आदर करतात आणि त्यावर विश्वास ठेवतात. तेथील अनेकांनी स्वतःच्या जीवनांचे समर्पण यहोवाला करावे म्हणून त्यांना मदत करण्यास पूर्ण-वेळेच्या काही सेवकांना शक्य झाले आहे. त्यांच्या पुष्कळ अनुभवामुळे ते आपल्याला शिष्य बनविण्याच्या आनंदाविषयी कदाचित काही सांगू शकतील. तुम्ही राहता तेथील लोकांना शिष्य बनविण्यातील आनंदाचा तुम्हाला शोध घेता यावा म्हणून त्यांच्या काही सूचना तुम्हाला मदत करतील.
संभाव्य ‘मेंढरास’ ओळखणे
येशूने त्याच्या प्रेषितांना प्रचार करण्यासाठी पाठविले तेव्हा त्याने म्हटले, “ज्या ज्या नगरात किंवा गावात तुम्ही जाल त्यात कोण योग्य आहे हे शोधून काढा.” (मत्तय १०:११) तुम्ही लोकांना भेट देण्यास जाता तेव्हा आध्यात्मिकरीत्या कोणास मदत देता येईल, हे तुम्ही कसे ओळखू शकता? ५० वर्षांपेक्षा अधिक काळापासून पूर्ण-वेळेचे सेवक असणारे एडवर्ड म्हणतात: “त्यांचे उत्सुक प्रश्न आणि शास्त्रवचनांतून देण्यात आलेल्या उत्तरांमुळे त्यांना मिळणारे समाधान यावरून ते प्रकट करतात.” कॅरल यात भर घालतात: “एखादा मनुष्य त्याची व्यक्तिगत समस्या अथवा चिंता घेऊन माझ्याकडे आत्मविश्वासाने येतो तेव्हा ती जणू मदतीकरता विनवणी असते. मी वॉच टावर संस्थेच्या प्रकाशनांमध्ये मदतदायी माहिती शोधण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारच्या व्यक्तिगत आस्थेमुळे बहुतेक वेळा बायबल अभ्यास सुरू होतो.” तथापि, प्रामाणिक लोकांना नेहमीच सहजगत्या ओळखता येत नाही. लुईस सांगतात: “काही जण फारच आस्थेवाईक वाटतात परंतु बिलकुल आस्थेवाईक नसल्याचे नंतर निष्पन्न होते, तर इतर जण जे सुरवातीस विरोधक असल्याचा भास होतो पण बायबल खरोखरच काय म्हणते हे ऐकल्यानंतर ते परिवर्तन करतात.” अनेक लॅटीन अमेरिकी लोक, बायबलचा आदर करतात त्यामुळे ते पुढे म्हणतात, “मी लोकांना बायबलमधून काही दाखविल्यानंतर ते तत्परतेने त्याचा स्वीकार करतात तेव्हा आध्यात्मिकरीत्या मदत करता येऊ शकेल अशा लोकांना मी ओळखतो.” अशा “योग्य” लोकांना आध्यात्मिकरीत्या प्रगती करण्यास्तव मदत केल्यामुळे खरे सुख आणि समाधान लाभते. हे तुम्ही कसे करू शकता?
बायबल अभ्यास सुरू करणे
‘बुद्धिमान आणि विश्वासू दासाद्वारा’ निर्मित बायबल अभ्यास साहित्यांचा उपयोग करणे, हा सामान्यतः लोकांना बायबल सत्याची समज देण्याचा एक सर्वोत्तम मार्ग आहे. (मत्तय २४:४५) तुम्ही अशा प्रकारच्या बायबल साहित्यांबद्दलची गुणग्राहकता कशी वाढवू शकता? एडवर्ड म्हणतात: “लोकांच्या परिस्थिती, व्यक्तिमत्त्व आणि दृष्टिकोन यांमध्ये फार तफावत असते त्यामुळे बायबल अभ्यास सुरू करता यावा म्हणून मी नम्य होण्याचा यत्न करतो.” तुम्ही एकच पद्धत प्रत्येकाच्या बाबतीत वापरू शकत नाही.
काही जणांना बायबल अभ्यास पाठ्यपुस्तकाशी परिचय करून देण्याआधी त्यांच्यासोबत शास्त्रवचनांच्या कित्येक अनौपचारिक चर्चा करण्याची गरज असेल. तथापि, एक मिशनरी दांपत्य असा अहवाल देते: “आम्ही सामान्यपणे पहिल्या भेटीतच अभ्यास सादर करतो.” त्याचप्रमाणे, ५५ लोकांना बाप्तिस्मा घेण्याकरता मदत केलेली एक महिला साक्षीदार म्हणते: “तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल या पुस्तकाचा थेटपणे परिचय करून देणे, ही माझी बायबल अभ्यास सुरू करण्याची प्रमुख पद्धत राहिली आहे.” काहींना कोणत्याही प्रकारचा अभ्यास करण्यास आवडत नाही, तरीदेखील इतर जण जीवनात त्यांना मदत होईल असा त्यांचा विश्वास असणाऱ्या कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करण्यास उत्सुक असतात. अशा लोकांना, घरी बायबल वर्ग मोफत सादर करणे बहुतेक वेळा आकर्षक वाटते. काही मिशनरी या सादरतेचे स्पष्टीकरण करतात आणि नंतर म्हणतात: “हे कसे केले जाते ते मला तुम्हास दाखविण्यास आवडेल. तुम्हाला ते आवडल्यास, तुम्ही हा अभ्यास कायम ठेवू शकता. तुम्हाला पसंत नसल्यास, जशी तुमची इच्छा.” अशा प्रकारे अभ्यास सादर केला जातो, तेव्हा लोकांना त्याचा स्वीकार करण्यात धास्ती वाटत नाही.
आणखी एक साक्षीदार, ज्यांनी गरिबांना आणि अल्प शिक्षितांना मदत केली आहे, असे म्हणतात: “बायबल अभ्यास सुरू करण्याकरता पत्रिका विशेषतः मदतदायी असल्याचे मला दिसून आले आहे.” पूर्ण-वेळेचे शिक्षक कोणत्याही प्रकारच्या प्रकाशनाचा उपयोग करत असले, तरी ते बायबलवर प्रमुख जोर देण्याचा प्रयास करतात. कॅरोला म्हणतात: “अभ्यासाच्या पहिल्या वेळी मी केवळ चित्रांचा आणि सुमारे पाच शास्त्रवचनांचा उपयोग करते त्यामुळे मुख्य मुद्दा स्पष्ट होतो आणि बायबल कठीण वाटत नाही.”
आस्था जिवंत ठेवणे
प्रगतीच्या भावनेमुळे लोकांना आनंद होतो, यास्तव जेनिफर सल्ला देतात: “अभ्यासात जिवंतपणा आणा. प्रगमनशील असा.” सप्ताहांचा खंड पडू न देता नियमितपणे अभ्यास संचालित केल्यामुळे देखील स्वतःची कोठेतरी प्रगती होत आहे, असे वाटण्यास त्यांना मदत होते. ग्रामीण भागात संगोपन झालेले एक खास पायनियर, अल्प शालेय शिक्षण झालेल्यांना देखील प्रगती करता यावी म्हणून सोप्या शब्दांत वर्णन करण्याच्या आणि मुख्य मुद्यांवर लक्ष केंद्रित करण्याच्या महत्त्वावर जोर देतात. ते म्हणतात: “माझ्या गावी पेरणी केल्यानंतर आम्हाला जमिनीवर तुषार सिंचन करावे लागत होते. शेतांत प्रमाणापेक्षा अधिक पाणी सोडल्यास जमीन फार घट्ट होते, परिणामी अंकुर फुटणाऱ्या बिजांना बाहेर पडता न आल्यामुळे ते मरतात. त्याचप्रमाणे, नवोदितांवर तुम्ही अनेक मुद्यांची सरबत्ती केल्यास त्यांना फार अवघड वाटेल आणि ते अभ्यास करण्याचे सोडून देतील.” चौकस मनांच्या लोकांना स्वतःच्या समजेमध्ये प्रगती करावयाची असल्यास त्यांनी देखील एका वेळी एका मुद्यावर लक्ष केंद्रित करण्याचे शिकले पाहिजे. येशूने त्याच्या शिष्यांना म्हटले: “मला अद्याप तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगावयाच्या आहेत, परंतु आताच तुमच्याने त्या सोसवणार नाहीत.”—योहान १६:१२.
तुम्ही अभ्यास संचालित करून परतता तेव्हा त्यांना देवाच्या वचनावर सतत विचार करण्याचे उत्तेजन देणे, हा आस्था जिवंत ठेवण्याचा आणखी एक मार्ग आहे. योलांडा याची शिफारस करतात: “एखादा प्रश्न तसाच राहू द्या. बायबलच्या भागाच्या वाचनाचा किंवा त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या विषयाचे अन्वेषण करण्याचा गृहपाठ त्यांना द्या.”
यहोवाबद्दलचे प्रेम विकसित करणे
तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांस ‘वचनाचे केवळ ऐकणारे नव्हे, तर त्याप्रमाणे आचरण करणारे’ होण्याकरता त्यांची मदत करता तेव्हा तुमचा आनंद द्विगुणित होईल. (याकोब १:२२) तुम्ही हे कसे करू शकता? खरे ख्रिस्ती यहोवावरील त्यांच्या प्रेमामुळे प्रवृत्त होतात. मेक्सिकोमधील पेद्रो स्पष्टीकरण देतात: “अपरिचित असलेल्या व्यक्तीवर लोक प्रेम करीत नाहीत म्हणून अभ्यासाच्या अगदी सुरवातीपासूनच मी त्यांना देवाचे नाव बायबलमधून शिकवितो आणि यहोवाच्या गुणांवर जोर देण्याकरता संधींचा फायदा घेतो.” संभाषणामध्ये यहोवाविषयी असणाऱ्या तुमच्या भावनांना अभिव्यक्त करण्याद्वारे तुम्ही त्याच्याबद्दल असणारी गुणग्राहकता वाढवू शकता. एलिजाबेथ म्हणतात: “मी यहोवाच्या चांगुलपणाचा उल्लेख करण्याचा नेहमी प्रयत्न करते. अभ्यासांच्या दरम्यान एखादे सुंदर फुल, आकर्षक पक्षी किंवा मांजराचे खट्याळ पिल्लू मला दिसल्यास, हे यहोवाचे कृत्य असल्याचे मी नेहमी उल्लेखिते.” “ज्याप्रकारे देवाचे अभिवचनयुक्त नवे जग एक वास्तविकता असल्याचे तुम्ही जाणता त्याप्रकारे त्याच्याविषयी बोला,” जेनिफर सुचवितात. “नवीन जगामध्ये तुम्हाला काय करण्यास आवडेल, हे त्यांना विचारा.”
एखादा मनुष्य यहोवाविषयी जे काही शिकतो त्यावर गुणग्राहकतेने मनन करतो तेव्हा ते शिक्षण त्याच्या अंतःकरणाप्रत पोहंचते आणि त्यास कार्य करण्यास प्रवृत्त करते. स्मरणात आल्याखेरीज तो मनन करू शकत नाही. प्रत्येक अभ्यासानंतर तीन किंवा चार प्रमुख मुद्यांची थोडक्यात उजळणी केल्यामुळे त्यांना स्मरणात ठेवण्यास मदत होते. अनेक बायबलचे शिक्षक नवोदितांना स्वतःच्या बायबलच्या मागील बाजूस महत्त्वाच्या सर्व शास्त्रवचनांना टिपणीसहित लिहिण्यास सांगतात. इंग्लंडमधील एक मिशनरी, उजळणी केल्यामुळे होणाऱ्या आणखी एका फायद्याचे वर्णन करतात: “ही माहिती तुम्हाला कशी लाभदायक ठरली आहे, असे मी त्यांना विचारते. यामुळे त्यांना यहोवाचे मार्ग आणि नियम यांवर गुणग्राहकतेने मनन करण्यास मदत होते.”
गिलियडच्या तिसऱ्या वर्गातून पदवीधर झालेली एक विश्वासू महिला साक्षीदार म्हणते: “आपण उत्साही असणे अगत्याचे आहे. आपण जे शिकवितो त्यावर आपला विश्वास आहे, याची जाणीव आपल्या विद्यार्थ्यांना झाली पाहिजे.” ज्या विश्वासाने तुम्हाला आनंदाने “कृती करणारा” बनविले आहे; त्यास तुम्ही व्यक्त केल्यास तो विश्वास संसर्गजन्य होऊ शकतो.—याकोब १:२५.
“मला असे दिसते, की लोकांना स्वतःच्या प्रार्थनांची उत्तरे ओळखण्याकरता मी त्यांना मदत केल्यास त्यांना देवाच्या अधिक जवळ असल्याचे वाटते,” असे यहोवाची उपासना करण्याकरता अनेकांना मदत केलेली एक महिला साक्षीदार म्हणते. “मी त्यांना माझ्या स्वतःच्या अनुभवातून उदाहरणे देते, जसे: मला आणि माझ्या सोबतीणीला पायनियर या नात्याने नवीन नियुक्ती मिळाली तेव्हा आमच्याजवळ केवळ काही पालेभाज्या, कृत्रिम लोण्याचे एक पाकीट होते आणि थोडे सुद्धा पैसे नव्हते. आमच्याकडील अन्न आम्ही संध्याकाळच्या जेवणाच्या वेळी संपवले आणि म्हटले, ‘आता आपल्याकडे उद्यासाठी काही उरले नाही.’ आम्ही त्याविषयी प्रार्थना केली आणि झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी अगदी सकाळीच एक स्थानिक महिला साक्षीदार आमच्याकडे आली आणि असे म्हणून तिने स्वतःचा परिचय दिला, ‘यहोवाने पायनियरांना पाठवावे म्हणून मी प्रार्थना केली होती. आता मी दिवसातील बहुतेक वेळ तुम्हाला सोबत देईन, परंतु मी बाहेरगावी राहते त्यामुळे तुमच्या समवेत मला दुपारचे जेवण करता यावे म्हणून मी माझ्या सोबत आपल्या सर्वांकरता अन्न आणले आहे.’ त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मांस आणि पालेभाज्यांचा समावेश होता. आपण यहोवाच्या राज्यास प्रथम स्थान दिले, तर तो आपला केव्हाही परित्याग करीत नाही, असे मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगते.”—मत्तय ६:३३.
व्यवहार्य मदत सादर करा
येशूचे शिष्य बनविण्यामध्ये, बायबल अभ्यास संचालित करण्यापेक्षा अधिक काही समाविष्ट आहे. प्रवासी पर्यवेक्षक या नात्याने अनेक वर्षे सेवा केलेले एक मिशनरी म्हणतात: “त्यांना वेळ द्या. अभ्यास संपल्यानंतर परतण्याची घाई करू नका. उचित असल्यास त्यांच्यासोबत थोड्या वेळ राहून त्यांच्याशी बोला.” एलिजाबेथ म्हणतात: “जीवन गोवलेले असल्यामुळे मी त्यांच्यामध्ये आस्था घेते. माझ्या स्वतःच्या मुलांप्रमाणे मी त्यांच्याविषयी अनेक वेळा चिंतित होते.” इतर साक्षीदारांनी अशा प्रकारच्या सूचना दिल्या: “ते आजारी असताना त्यांना भेट द्या.” “तुम्ही त्यांच्या घराच्या आसपास असता तेव्हा उदाहरणार्थ, क्षेत्र सेवेत, इतर साक्षीदारांचा त्यांच्याशी परिचय करून देण्यासाठी त्यांना आटोपशीर भेट द्या.” इव्हा म्हणतात: “एखाद्या मनुष्याची पार्श्वभूमी आणि जीवनातील परिस्थिती समजावी म्हणून काळजीपूर्वक ऐका. यामुळे लोक कोणत्या प्रकारे सत्यास प्रतिक्रिया दाखवितात यावर त्याचा परिणाम होतो तसेच त्यामुळे प्रगतीमध्ये बाधाही येऊ शकते. त्यांचे मित्र व्हा जेणेकरून त्यांच्या समस्यांविषयी बोलण्यास त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल.” कॅरल असेही म्हणतात: “सत्यामुळे होणाऱ्या परिवर्तनांचा संबंधित व्यक्तीसाठी कुटुंब आणि मित्रांना मुकणे असा काही वेळा अर्थ होतो अशा समयी संबंधितामधील खरी आस्था महत्त्वाची असते. आपण कोठे राहतो याची विद्यार्थ्याला कल्पना असल्यास तसेच त्याच्याठायी आपल्याकडे कोणत्याही घटकेला येण्याचा आत्मविश्वास असल्यास ते सामान्यतः चांगले असते.” मंडळी जणू त्याचे नवे कुटुंब आहे, असा दृष्टिकोन बाळगण्यास त्याला मदत करा.—मत्तय १०:३५; मार्क १०:२९, ३०.
“व्यवहार्य मदत सादर करण्यात तत्पर असा. सभांमध्ये त्यांच्यासोबत बसा आणि त्यांच्या मुलांसहित त्यांना मदत करा,” असे योलांडा म्हणतात. स्वतःच्या मुलांना कसे प्रशिक्षण द्यावे, हे नवोदितांना दाखविणे, त्यांच्या स्वच्छतेच्या दर्जांमध्ये सुधारणा करणे, सभांकरता विवेचनांची तयारी करणे आणि ईश्वरशासित सेवा प्रशालेमध्ये भाषण देणे, हे सर्व शिष्य बनविण्याच्या कार्याचे भाग होत. आणखी एक बहीण पुढे म्हणते: “नवोदितांना सेवाकार्यासाठी प्रशिक्षण देणे महत्त्वाचे आहे. प्रशिक्षणाच्या या पैलूकडे दुर्लक्ष केले जाते तेव्हा काहींमध्ये प्रचार कार्याचे भय कायम राहते, यहोवाच्या सेवेतील आनंद ते गमावतात आणि सहन करण्यास अपयशी होतात.” म्हणून घरोघरच्या कार्यामध्ये, पुनर्भेटी घेण्यात आणि बायबल अभ्यास सुरू करण्यामध्ये त्यांना काळजीपूर्वक प्रशिक्षण द्या. तुमच्या मदतीने आणि मार्गदर्शनाने तुमचा विद्यार्थी प्रगती करत असल्याचे पाहून तुम्हाला फार आनंद होईल.
सहन करण्यासाठी त्यांना दृढ करा
“एकदा विद्यार्थ्याचा बाप्तिस्मा झाल्यानंतर पुढे अभ्यास करण्याकडे दुर्लक्ष करण्याचा कल असतो,” असा इशारा शिष्य बनविणारी एक अनुभवी व्यक्ती देते. नवीन बाप्तिस्मा घेतलेला मनुष्य आध्यात्मिक प्रौढ होण्यापासून फार दूर असतो, हे शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांनीही लक्षात ठेवले पाहिजे. त्याचा विश्वास, देवाच्या नियमासाठी असणारी त्याची गुणग्राहकता आणि यहोवासाठी असणारी त्याची प्रीती यांमध्ये त्याला पुष्कळ वाढ करावयाची आहे. उत्तम व्यक्तिगत अभ्यासाच्या सवयींमध्ये विकास करण्यासाठी त्याला उत्तेजन देणे अत्यावश्यक आहे जेणेकरून तो निरंतर प्रगमनशील राहील.—१ तीमथ्य ४:१५.
नवोदिताला प्रगतीसाठी आणि बांधवांच्या सहवासातील तो आतिथ्यशील सदस्य होण्यासाठी मदतीची गरज असेल. बांधवांच्या अधिक सान्निध्यात येत असता त्यांच्या अपरिपूर्णतांना सहन करण्याकरता त्याला मार्गदर्शनाची गरज असेल. (मत्तय १८:१५-३५) निष्णात शिक्षक होण्याकरता, स्वतः होऊन संशोधन करण्यासाठी त्याला मदतीची गरज असेल. एक महिला मिशनरी सांगते: “एका विद्यार्थिनीला बाप्तिस्म्यानंतर शिक्षक या नात्याने तिच्या क्षमतेमध्ये सुधारणा करण्याची इच्छा होती, म्हणून तिने मला म्हटले, ‘मला पुढील सप्ताहात एक नवीन अभ्यास संचालित करावयाचा आहे, परंतु मी आधीच अभ्यासलेल्या अध्यायांवरील माझ्या स्मरणशक्तीला ताजेतवाने करण्याची मला गरज आहे. तुम्ही एका वेळी एक यानुसार या अध्यायांचा अभ्यास माझ्यासोबत घ्याल का, जेणेकरून शास्त्रवचने आणि दृष्टान्त यांवरील स्पष्टीकरणांच्या मला नोंदी घेता येतील आणि मी अभ्यास संचालित करण्यासाठी जाईल तेव्हा मला त्यांचा उपयोग करता येईल?’ आता ती एक उत्तम शिक्षिका झाली असून एका संमेलनामध्ये तिच्या चार विद्यार्थ्यांचा बाप्तिस्मा झाला.”
शिष्य बनविण्याकरता लागणारा प्रयत्न सार्थ का आहे
“शिष्य बनविण्याचा अर्थ यहोवाचे अधिक स्तुतीकर्ते बनविणे असा होतो. सत्याचा स्वीकार करणाऱ्यांकरता जीवन हा याचा अर्थ होय,” असे पामेला म्हणतात. “इतरांना सत्य शिकविणे मला फार आवडते—ते फारच आनंददायक आहे! विद्यार्थी हळूहळू प्रगती करीत आहेत, स्वतःच्या जीवनांमध्ये परिवर्तन आणि दुर्निवार्य भासणाऱ्या अडथळ्यांवर मात करीत आहेत, हे सर्व यहोवाच्या आत्म्याशिवाय शक्य नसल्याचे एखाद्यास दिसून येते. यहोवावर प्रीती करण्यास ज्यांनी सुरवात केली आहे ते सर्वजण माझे अतिप्रिय मित्र झाले आहेत.”
जर्मनीमधील एक महिला मिशनरी सांगते, “शिष्य बनविण्याकरता मी ज्यांना मदत केली अशांचा मी विचार करते तेव्हा मला असे दिसते, की अतिशय बुजरे असणाऱ्या लोकांनी देवाचे सेवक या नात्याने एवढी मोठी प्रगती केली आहे, यावर माझा विश्वासच बसत नाही. लोक कठीण अडथळ्यांवर अर्थातच यहोवाच्या मदतीने मात करत असल्याचे मी पाहते. एकेकाळी विभाजित असणारी कुटुंबे आता जबाबदार पालकांसह आनंदी मुलांनी—एकत्रित असल्याचे मला दिसते. यहोवाची सेवा करून लोक अर्थपूर्ण जीवनांचा आनंद घेत असल्याचे मी पाहते. शिष्य बनविण्याचा हा आनंद आहे.”
होय, शिष्य बनविण्याच्या कामात यहोवाचे सहकर्मी होणे, हा एक अतुलनीय आनंदाचा स्रोत आहे. मिशनरी आणि पायनियरांच्या अनुभवांनी याची प्रचिती दिली आहे. तुम्ही या सूचनांचा अवलंब केल्यास आणि त्यासाठी मनःपूर्वक कार्य केल्यास तुम्हाला अशाच प्रकारचा आनंद आणि समाधान मिळू शकते. यहोवाच्या आशीर्वादाने तुमचा आनंद पूर्ण होईल.—नीतिसूत्रे १०:२२; १ करिंथकर १५:५८.