वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • kl अध्या. १६ पृ. १५०-१५९
  • तुम्हाला देवाजवळ कसे येता येईल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्हाला देवाजवळ कसे येता येईल
  • सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • देवाजवळ का यावे
  • देवाजवळ येण्यासंबंधीच्या गरजा
  • देवाशी बोलण्याच्या सुसंधी
  • यहोवा ऐकतो अशा प्रार्थना
  • निरंतर प्रार्थना
  • यहोवासोबतचे दळणवळण एकतर्फी नव्हे
  • प्रार्थनेद्वारे देवाच्या जवळ या
    बायबल नेमके काय शिकवते?
  • प्रार्थनेतून मदत कशी मिळवावी
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
  • “आपली मागणी देवाला कळवा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • देवाला प्रार्थना करण्याचा बहुमान
    बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
अधिक माहिती पाहा
सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान
kl अध्या. १६ पृ. १५०-१५९

अध्याय १६

तुम्हाला देवाजवळ कसे येता येईल

१. पुष्कळ धर्मात कोणता सारखेपणा दिसतो?

पौर्वात्य देशाला भेट देणाऱ्‍या एका महिला पर्यटकाला बुद्धाच्या मंदिरातील धार्मिक विधी बघून आश्‍चर्य वाटले. तेथे मरीया किंवा ख्रिस्ताच्या मूर्त्या नव्हत्या; परंतु बहुतेक विधी तिच्या देशातील चर्चप्रमाणेच जुळणारे वाटत होते. उदाहरणार्थ, तिने मणी असलेली जपमाळ आणि प्रार्थनांचा जप या गोष्टी पाहिल्या. इतरांनीही अशाच गोष्टींचे अनुकरण केले आहे. पूर्व असो की पश्‍चिम, भक्‍तजन देवाजवळ किंवा ते भजत असलेल्या गोष्टीच्या समीप जाण्याकरता जे मार्ग अनुसरतात ते बहुतांशी सारखेच आहेत.

२. प्रार्थनेचे वर्णन कसे करण्यात आले आहे आणि पुष्कळ लोक का प्रार्थना करतात?

२ देवाजवळ जाण्याकरता पुष्कळ जन खासपणे त्याला प्रार्थना करतात. प्रार्थनेचे वर्णन “माणसाने पवित्र गोष्टी—देव, दैवते, पलीकडचे वातावरण किंवा अतिमानवी शक्‍ती—यांच्यासोबत केलेले दळणवळण,” असे केले आहे. (द न्यू एन्सायक्लोपिडिआ ब्रिटेनिका) तथापि, प्रार्थनेद्वारे देवाजवळ येण्यामध्ये काही लोकांना त्याच्याकडून केवळ जे मिळवता येते तेवढाच विचार दिसतो. उदाहरणार्थ, एका माणसाने यहोवाच्या साक्षीदाराला एकदा असे विचारले: “तुम्ही मजसाठी प्रार्थना केली तर माझे कुटुंब, नोकरी, आरोग्य याबाबतीत असणाऱ्‍या माझ्या समस्या सुटतील का?” त्या माणसाला तसेच वाटत होते हे स्पष्ट आहे. पण बहुतेक लोक प्रार्थना करतात आणि त्यांना दिसते की, त्यांच्या समस्या आहे तशाच आहेत. या कारणामुळे आम्ही कदाचित असे विचारू शकतो, ‘आम्ही देवाजवळ का यावे?’

देवाजवळ का यावे

३. आमच्या प्रार्थना कोणाला म्हटल्या जाण्यास हव्यात व का?

३ प्रार्थना हा काही अर्थहीन विधी नव्हे, शिवाय त्याद्वारे काही मिळवण्याचा तो निव्वळ मार्ग देखील नव्हे. देवाजवळ येण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्याच्यासोबत जवळचे नातेसंबंध राखणे हे आहे. या कारणामुळे आपल्या प्रार्थना यहोवा देवाला करण्यास हव्या. “जे कोणी त्याचा धावा करितात, . . . त्या सर्वांना परमेश्‍वर [यहोवा, NW] जवळ आहे,” असे स्तोत्रकर्त्या दाविदाने म्हटले. (स्तोत्र १४५:१८) आम्हाला यहोवा त्याच्याबरोबरच्या शांतीप्रिय नातेसंबंधामध्ये येण्याचे निमंत्रण देतो. (यशया १:१८) जे या निमंत्रणाला प्रतिसाद देतात ते स्तोत्रकर्त्याच्या या विधानाशी सहमत आहेत, ज्याने असे म्हटले: “माझ्याविषयी म्हटले तर देवाजवळ जाणे ह्‍यातच माझे कल्याण आहे.” पण का? कारण जे यहोवा देवाजवळ येतात अशांना खरा आनंद व मनःशांती अनुभवण्यास मिळते.—स्तोत्र. ७३:२८.

४, ५. (अ) देवाला प्रार्थना करणे महत्त्वाचे का आहे? (ब) प्रार्थनेद्वारे देवासोबत आपण कोणत्या प्रकारातील नातेसंबंध उभारू शकतो?

४ ‘आपल्या गरजा काय आहेत हे मागण्यापूर्वीच तो जाणून आहे’ तर मग देवाला मदतीकरता प्रार्थना का करावी? (मत्तय ६:८; स्तोत्र १३९:४) प्रार्थनेमुळे आपला देवावर विश्‍वास असल्याचे व तोच केवळ “प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान” याचा उगम असल्याचा आपला दृष्टिकोन असल्याचे प्रगट होते. (याकोब १:१७; इब्रीयांस ११:६) यहोवाला आमच्या प्रार्थनेत आनंद वाटतो. (नीतिसूत्रे १५:८) जसे एखादा पिता स्वतःच्या लहान मुलाचे कृतज्ञतेचे प्रामाणिक बोल ऐकून आनंदीत होतो, त्याचप्रमाणे देवाला सुद्धा रसिकता व स्तुतीचे अर्थपूर्ण वक्‍तव्य ऐकून आनंद होतो. (स्तोत्र ११९:१०८) जेथे पिता-पुत्र यांचे चांगले संबंध असतात तेथे उबदार दळणवळण असते. जो मुलगा प्रिय असतो तो आपल्या बापाशी बोलण्याची इच्छा धरतो. हीच गोष्ट देवासोबत असणाऱ्‍या आमच्या नातेसंबंधाच्या बाबतीत खरी आहे. आपण यहोवाबद्दल जे शिकतो व त्याने आम्हाबद्दल जी प्रीती दाखवली आहे त्याची खरीच कदर आपल्यामध्ये असल्यास, त्याला प्रार्थनेद्वारे स्वतःला व्यक्‍त करण्याची आपली प्रबळ इच्छा असेल.—१ योहान ४:१६-१८.

५ सर्वसमर्थ देवाकडे येताना आपण अत्यंत आदराने आले पाहिजे; आपण नेमके कोणते शब्द वापरतो त्याबद्दल अवास्तव चिंता करण्याची गरज नाही. (इब्रीयांस ४:१६) आम्हाला यहोवाकडे नेहमीच जाता येते. शिवाय देवापुढे प्रार्थनेमध्ये आपल्याला स्वतःचे ‘मन मोकळे करता येते’ हा केवढा विशेषाधिकार आहे! (स्तोत्र ६२:८) यहोवाबद्दलची रसिकता, अब्राहाम या विश्‍वासू माणसाने देवाचा मित्र म्हणून ज्या उबदार नातेसंबंधाचा आनंद घेतला त्याकडे निरवते. (याकोब २:२३) परंतु, विश्‍वाच्या सेनाधीश प्रभूला प्रार्थना करताना त्याच्याकडे येण्याबद्दलच्या ज्या गरजा त्याने घालून दिलेल्या आहेत त्यांचे पालन करावयास हवे.

देवाजवळ येण्यासंबंधीच्या गरजा

६, ७. आमच्या प्रार्थना ऐकण्याकरता देव पैशांची अपेक्षा करीत नसला तरी आपण प्रार्थना करतो तेव्हा त्याची कोणती अपेक्षा असते?

६ देवाकडे जाण्यासाठी पैशाची काही गरज आहे का? पुष्कळ लोक स्वतःकरता प्रार्थना करावी म्हणून धर्मगुरुंना पैसे देतात. काही ज्या प्रमाणात देणगी देत आहेत त्या प्रमाणात त्यांच्या प्रार्थना ऐकल्या जातील, असा त्यांचा विश्‍वास आहे. तथापि, यहोवाजवळ प्रार्थनेद्वारे येण्यासाठी आम्हाला पैशांची भेट चढवण्याची गरज आहे, असे देवाचे वचन सांगत नाही. त्याच्याकडील आध्यात्मिक तरतुदी व त्याच्यासोबत असलेल्या नातेसंबंधामुळे मिळणारे आशीर्वाद या गोष्टी विनामूल्य उपलब्ध आहेत.—यशया ५५:१, २.

७ तर मग, कशाची गरज आहे? योग्य प्रकारचे अंतःकरण ही एक महत्त्वाची गरज आहे. (२ इतिहास ६:२९, ३०; नीतिसूत्रे १५:११) आपण आपल्या अंतःकरणात यहोवा देवाबद्दल ‘प्रार्थना ऐकणारा’ व “त्याचा शोध झटून करणाऱ्‍यांना तो प्रतिफळ देणारा आहे,” असा विश्‍वास धरला पाहिजे. (स्तोत्र ६५:२; इब्रीयांस ११:६) नम्र अंतःकरणाची देखील आपल्याला जरूरी आहे. (२ राजे २२:१९; स्तोत्र ५१:१७) येशू ख्रिस्ताने एका दाखल्यात, एका नम्र जकातदाराने देवाकडे येताना अंतःकरणात अत्यंत लीन होऊन प्रार्थना केली व त्यामुळे तो गर्विष्ठ परुश्‍यापेक्षा अधिक नीतिमान ठरला, हे दाखवले. (लूक १८:१०-१४) आपणही देवाकडे प्रार्थनेद्वारे येताना, “प्रत्येक गर्विष्ठ मनाच्या मनुष्याचा परमेश्‍वराला [यहोवा, NW] वीट येतो.” हे लक्षात ठेवू या.—नीतिसूत्रे १६:५.

८. देवाने आमच्या प्रार्थना ऐकाव्या अशी आपली इच्छा असल्यास तर आपण कशापासून शुद्ध राहिले पाहिजे?

८ देवाने आमच्या प्रार्थनांना उत्तर द्यावे अशी आमची इच्छा आहे तर आपल्या सर्व पापी वर्तनापासून आपण स्वतःला शुद्ध केले पाहिजे. देवाजवळ येण्याचे उत्तेजन शिष्य याकोबाने दिले तेव्हा त्याने पुढे म्हटले: “अहो पापी जनहो, हात निर्मळ करा; अहो द्विबुद्धीच्या लोकांनो, आपली अंतःकरणे शुद्ध करा.” (याकोब ४:८) अपराध्यांनी पश्‍चात्ताप करून त्यांची पूर्वीची जीवनशैली सोडून दिली तर ते सुद्धा यहोवाच्या शांतीप्रिय नातेसंबंधात येऊ शकतील. (नीतिसूत्रे २८:१३) आपण आपला मार्ग शुद्ध केल्याचे नुसते ढोंग केले तर यहोवा आपले ऐकणार नाही. “परमेश्‍वराचे [यहोवा] नेत्र नीतीमानांवर असतात, व त्याचे कान त्यांच्या विनंतीकडे असतात; तरी वाईट करणाऱ्‍यांवर परमेश्‍वराची करडी नजर आहे,” असे देवाचे वचन म्हणते.—१ पेत्र ३:१२.

९. आपण यहोवाकडे कोणाद्वारे जाण्यास हवे व का?

९ बायबल सांगते: “सदाचाराने वागणारा व पाप न करणारा असा धार्मिक पुरुष पृथ्वीवर आढळणार नाही.” (उपदेशक ७:२०) ‘तर, आपल्याला यहोवा देवाकडे कसे जाता येईल?’ असे तुम्ही विचाराल. बायबल याचे असे उत्तर देते: “जर कोणी पाप केले, तर नीतिसंपन्‍न असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे.” (१ योहान २:१) आपण जरी पापी असलो तरी आम्हासाठी खंडणीचे मरण पत्करणाऱ्‍या येशू ख्रिस्ताद्वारे आपण देवाजवळ मुक्‍तपणे जाऊ शकतो. (मत्तय २०:२८) आपल्याला यहोवा देवाकडे जाण्यासाठी केवळ तोच एक मार्ग आहे. (योहान १४:६) आपण येशूच्या खंडणी बलिदानाच्या मूल्याला हलके समजून हेतुपुरस्सर पापाचरण करता कामा नये. (इब्रीयांस १०:२६) परंतु, जे वाईट ते करण्यापासून आपण होता होईल तितके दूर राहण्याचा प्रयत्न करीत आहोत; पण कधी कधी असे करण्यापासून चुकतो तेव्हा आपण पश्‍चात्ताप करून देवाकडे क्षमा मागू शकतो. आपण त्याच्याकडे नम्र हृदयाने आल्यास तो आमचे ऐकेल.—लूक ११:४.

देवाशी बोलण्याच्या सुसंधी

१०. प्रार्थनेची बाब येते तेव्हा आम्ही येशूचे कसे अनुकरण करू शकतो आणि खाजगी प्रार्थना करण्यासाठी कोणते प्रसंग उपलब्ध आहेत?

१० येशू ख्रिस्ताने यहोवासोबतचे नातेसंबंध खूप मोलाचे मानले होते. या कारणास्तव, येशूने देवाशी खाजगी प्रार्थनेद्वारे बोलण्याकरता वेळ काढला होता. (मार्क १:३५; लूक २२:४०-४६) आपण येशूचे उदाहरण अनुसरून देवाला नियमित प्रार्थना करणे चांगले ठरेल. (रोमकर १२:१२) दिवसाची सुरवात प्रार्थनेने करणे योग्य आहे, व रात्री झोपण्याआधी आपण यहोवाचे दैनंदिन कार्याबद्दल योग्यपणे आभार मानू शकतो. दिवसभरात “सर्व प्रसंगी” देवाकडे येण्याचा निश्‍चय राखा. (इफिसकर ६:१८) यहोवा प्रार्थना ऐकू शकतो हे जाणून आपण प्रार्थना शांतपणे अंतःकरणात देखील करू शकतो. देवाशी खाजगीरितीने बोलण्याद्वारे त्याच्यासोबत असणाऱ्‍या आपल्या नातेसंबंधाला अधिक बळकटी येते व यहोवाला दरदिवशी प्रार्थना करण्यामुळे त्याच्या अधिक समीप येण्यास आम्हाला मदत करते.

११. (अ) कुटुंबांनी एकत्रपणे का प्रार्थना करावी? (ब) प्रार्थनेच्या शेवटी तुम्ही “आमेन” म्हणता, त्याचा काय अर्थ होतो?

११ लोकांच्या गटाखातर ज्या प्रार्थना केल्या जातात त्याकडे देखील यहोवा लक्ष देतो. (१ राजे ८:२२-५३) आपण कुटुंब या नात्याने देवाकडे येऊ शकतो, ज्यामध्ये कुटुंबाचा प्रमुख नेतृत्व करतो. याद्वारे कुटुंबाचे बंधन बळकट होते आणि पालक देवाला नम्रपणे प्रार्थना करीत असल्याचे ऐकण्यामुळे लहान मुलांना यहोवा खरा वाटतो. पण यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांमध्ये होते तसे कोणी एका गटाचे प्रार्थनेमध्ये नेतृत्व केल्यास कसे? आपण सभागृहात आहोत तर ती प्रार्थना लक्षपूर्वक ऐकू म्हणजे प्रार्थनेच्या शेवटी आपल्याला अंतःकरणपूर्वक “आमेन” म्हणता येईल, त्याचा अर्थ “तसेच होवो,” असा आहे.—१ करिंथकर  १४:१६.

यहोवा ऐकतो अशा प्रार्थना

१२. (अ) देव काही प्रार्थनांना का उत्तर देत नाही? (ब) प्रार्थना करताना आपण केवळ आमच्या व्यक्‍तिगत गरजांवरच पूर्णपणे का लक्ष देऊ नये?

१२ देवाला ख्रिस्ताद्वारे प्रार्थना केल्या तरी तो त्या ऐकत नाही, असे काही लोकांना वाटते. तथापि, प्रेषित योहानाने असे म्हटले: “आपण त्याच्या [देवाच्या] इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल.” (१ योहान ५:१४) तेव्हा, आपण देवाच्या इच्छेनुसार मागणी करण्याची गरज आहे. तो आमच्या आध्यात्मिक कल्याणामध्ये रस बाळगून असल्यामुळे आमच्या आध्यात्मिकतेवर परिणाम करणारे काहीही आमच्या प्रार्थनेकरता योग्य विषय असतो. आपण निव्वळ भौतिक गोष्टींवर आपले लक्ष केंद्रित करण्याचा मोह टाळण्यास हवा. उदाहरणार्थ, आजाराला तोंड देण्यासाठी अंतर्दृष्टी व मजबुतीकरता प्रार्थना करणे उचित असले तरी आरोग्याच्या चिंतेने आमच्या आध्यात्मिक हितांना कधीही झाकाळता कामा नये. (स्तोत्र ४१:१-३) स्वतःच्या आरोग्याबद्दल अवास्तव चिंता करत असल्याची जाणीव झाल्यामुळे एका ख्रिस्ती स्त्रीने यहोवाला तिच्या आजारपणाबद्दल तिजठायी योग्य दृष्टिकोन राखण्यासंबंधाने प्रार्थना केली. याचा परिणाम असा झाला की, तिच्या आरोग्याच्या समस्या गौण चिंता बनल्या आणि तिला ‘पराकोटीचे सामर्थ्य’ मिळाल्याचे वाटू लागले. (२ करिंथकर ४:७) तिची इतरांना आध्यात्मिक मदत देण्याची इच्छा वाढली व ती पूर्ण वेळेची राज्य उद्‌घोषक बनली.

१३. मत्तय ६:९-१३ मध्ये सूचित केल्याप्रमाणे आमच्या प्रार्थनांमध्ये समाविष्ट करण्याजोगे काही योग्य विषय कोणते आहेत?

१३ आम्ही आमच्या प्रार्थनांमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करावा जेणेकरून यहोवाला त्या ऐकण्यासाठी संतुष्टता वाटेल? येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना प्रार्थना कशी करावी ते शिकवले. मत्तय ६:९-१३ मध्ये लिहिण्यात आलेल्या आलेल्या आदर्श प्रार्थनेमध्ये त्याने, ज्याकरता योग्यपणे प्रार्थना करता येईल अशा विषयांचा नमुना दिला. आमच्या प्रार्थनांमध्ये चिंतेची प्रमुख बाब कोणती असावी? यहोवा देवाचे नाव व राज्य या गोष्टींना प्रार्थनेत अग्रक्रम असावा. आपल्या भौतिक गरजांसंबंधाने विचारणा करणे देखील योग्य आहे. याचप्रमाणे आपल्या पापांची क्षमा मागणे तसेच परीक्षेपासून व तो दुष्ट, दियाबल सैतान याजपासून मुक्‍ततेकरता विनंती करणे देखील महत्त्वाचे आहे. या प्रार्थनेचा जप करीत राहावे किंवा तिच्या अर्थाचा विचार न करता ती एकसारखी म्हणत राहावी असे येशूने इच्छिले नव्हते. (मत्तय ६:७) मुलाने आपल्या बापाशी बोलताना दर वेळी तेच तेच शब्द वापरले तर तो कशा प्रकारचा नातेसंबंध असेल?

१४. विनंत्याशिवाय आणखी कोणत्या प्रकारच्या प्रार्थना आम्ही कराव्यात?

१४ विनंत्या व नम्रतापूर्वक प्रार्थनांशिवाय आम्ही स्तुती व उपकारस्मरणाच्या प्रार्थनांही करू शकतो. (स्तोत्र ३४:१; ९२:१; १ थेस्सलनीकाकर ५:१८) आपण इतरांसाठीही प्रार्थना करू शकतो. आपल्या छळग्रस्त किंवा त्रासात अडकलेल्या आध्यात्मिक बंधूभगिनींसाठी केलेल्या प्रार्थना आम्हाला त्यांच्यासंबंधाने आस्था असल्याचे दाखवतात आणि यहोवा, अशा प्रकारे काळजी व्यक्‍त करणाऱ्‍या प्रार्थना आवडीने ऐकतो. (लूक २२:३२; योहान १७:२०; १ थेस्सलनीकाकर ५:२५) खरे म्हणजे प्रेषित पौलाने असे लिहिले: “कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा; म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांति तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.”—फिलिप्पैकर ४:६, ७.

निरंतर प्रार्थना

१५. आपल्या प्रार्थनांना उत्तर मिळत नसल्याचे दिसत असल्यास आपण काय लक्षात ठेवावे?

१५ तुम्ही देवाविषयीच्या ज्ञानाची प्राप्ती करीत असला तरी तुमच्या प्रार्थनांना कधी कधी उत्तर मिळत नसल्याचे तुम्हाला वाटत असेल. हे असे कदाचित असू शकेल, कारण विशिष्ट प्रार्थनेचे उत्तर देण्याची देवाची ती वेळ नसेल. (उपदेशक ३:१-९) यहोवा कदाचित एखादी परिस्थिती काही काळासाठी चालू देण्याची अनुमती देईल, पण तो प्रार्थनेचे उत्तर देतो व त्याची सर्वोत्तम वेळ कधी असेल ते तो जाणून आहे.—२ करिंथकर १२:७-९.

१६. आम्ही प्रार्थनेत निरंतरता का राखावी आणि असे केल्यामुळे देवासोबतच्या आमच्या नातेसंबंधावर कसा परिणाम होऊ शकतो?

१६ आपण प्रार्थनेत सातत्य राखले तर, देवाला जे सांगत असतो त्याबद्दल आपल्याला केवढी तळमळ वाटत असते ते प्रकट होते. (लूक १८:१-८) उदाहरणार्थ, एखाद्या कमतरतेवर मात करता यावी म्हणून यहोवाकडे आपण मदतीची विचारणा केली असेल. अशा प्रार्थनेत निरंतरपणा राखल्यामुळे व त्या विनंतीनुसार हालचाल केल्यामुळे आपण आपला प्रांजळपणा दाखवत असतो. विनंत्या सादर करताना आपण स्पष्ट व प्रामाणिक असले पाहिजे. आपण परीक्षा अनुभवत असल्यास खासपणे उत्कट रीतीने प्रार्थना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. (मत्तय ६:१३) स्वतःच्या पापीष्ठ तीव्र आकांक्षेवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करीत असता सतत प्रार्थना करीत राहिल्यास यहोवा कशी मदत देतो ते आपल्याला दिसेल. यामुळे आपला विश्‍वास अधिक उभारला जाईल आणि त्याच्याबरोबर आपले नातेसंबंध अधिक बळकट होईल.—१ करिंथकर १०:१३; फिलिप्पैकर ४:१३.

१७. देवाची सेवा करीत असताना प्रार्थनाशील वृत्तीमुळे आम्हाला कसा लाभ घडेल?

१७ यहोवा देवाला पवित्र सेवा सादर करताना आपण प्रार्थनाशील वृत्ती विकसित केल्यास, आपण त्याची सेवा स्वतःच्या बळावर करीत नाही याची आपल्याला समज होईल. यहोवाच केवळ सर्व गोष्टी घडवून आणतो. (१ करिंथकर ४:७) हे मान्य केल्यास आपल्याला नम्र राहण्यास मदत मिळेल व आपले त्याच्याशी असणारे नातेसंबंध अधिक समृद्ध होईल. (१ पेत्र ५:५, ६) होय, प्रार्थनेत निरंतर राहण्याची सबळ कारणे आम्हापाशी आहेत. आपल्या कळकळीच्या प्रार्थना तसेच आपल्या प्रेमळ स्वर्गीय पित्याच्या जवळ कसे जाता येते ते मौल्यवान ज्ञान आमचे जीवन खरे आनंदी बनवू शकेल.

यहोवासोबतचे दळणवळण एकतर्फी नव्हे

१८. आपण देवाचे कसे ऐकू शकतो?

१८ देवाने आमच्या प्रार्थना ऐकाव्या असे आम्हास वाटते तर आपण तो जे म्हणतो ते ऐकले पाहिजे. (जखऱ्‍या ७:१३) आता तो आपले संदेश, ईश्‍वरी प्रेरणा असणाऱ्‍या संदेष्ट्यांकडून पाठवीत नाही; आणि दुरात्मिक माध्यमांचा तर निश्‍चितच वापर करत नाही. (अनुवाद १८:१०-१२) पण त्याचे वचन, बायबलचा अभ्यास करून आपण देवाचे ऐकू शकतो. (रोमकर १५:४; २ तीमथ्य ३:१६, १७) जसे आम्हासाठी आरोग्यदायी शारीरिक अन्‍नाची रुचि स्वतःमध्ये वाढवण्याची गरज असते तसेच देवाच्या वचनाच्या “निऱ्‍या दुधाची इच्छा धरा” असा आर्जव आपल्याला करण्यात आला आहे. देवाच्या वचनाचे वाचन दररोज करून आध्यात्मिक अन्‍नाची रूची वाढवा.—१ पेत्र २:२, ३; प्रेषितांची कृत्ये १७:११.

१९. बायबलमध्ये जे वाचता त्यावर मनन करण्याचे कोणते फायदे आहेत?

१९ बायबलमधून जे वाचता त्याचे मनन करा. (स्तोत्र १:१-३; ७७:११, १२) याचा अर्थ, त्या साहित्यात गढून गेले पाहिजे. याची तुलना तुम्हाला अन्‍नाच्या पचनक्रियेसोबत करता येईल. जे काही तुम्हाला आधीच माहीत आहे त्याच्याशी सध्याच्या साहित्याचा संबंध स्पष्ट करून तुम्ही ते आध्यात्मिक अन्‍न पचवू शकता. ती माहिती तुमच्या जीवनावर कशी परिणीत होते त्याचा विचार करा किंवा ती यहोवाचे गुण व त्याच्या व्यवहाराबद्दल काय प्रकटविते त्याचे पुनरावलोकन करा. याप्रकारे, वैयक्‍तिक अभ्यासाद्वारे यहोवा देत असलेले आध्यात्मिक अन्‍न तुम्हाला मिळवता येईल. हे तुम्हाला देवाजवळ आणील आणि तुम्हाला दररोजच्या समस्यांची हाताळणी करण्यास मदत देईल.

२०. ख्रिस्ती सभांना उपस्थित राहण्यामुळे आपल्याला देवाजवळ येण्यास कशी मदत होते?

२० देवाच्या नियमशास्त्राचे होणारे जाहीर वाचन ऐकण्याकरता एकत्र झाल्यावर जसे इस्राएल लोक त्याकडे लक्षपूर्वक कान देत, तसेच ख्रिस्ती सभांमध्ये चर्चा केल्या जाणाऱ्‍या देवाच्या वचनाचे श्रवण केल्यामुळे देखील तुम्हाला देवाच्या जवळ येता येईल. नियमशास्त्राचे वाचन होताना बोधक त्याचा अर्थ समजावून सांगे व त्यामुळे लोकांना समज मिळून ऐकलेल्या गोष्टींचा अवलंब करण्याकरता ते प्रवृत्त होत. त्यामुळे त्यांना मोठा आनंद होत होता. (नहेम्या ८:८, १२) याकरता, यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना उपस्थित राहण्याचा तुमचा प्रघात बनवा. (इब्रीयांस १०:२४, २५) हे, तुम्हाला देवाविषयीचे ज्ञान समजण्यास व मग तुमच्या जीवनात लागू करायला आणि तुम्हाला आनंदी बनायला मदत देईल. जगव्याप्त ख्रिस्ती बंधुत्वाचा भाग बनल्यामुळे तुम्हाला यहोवाच्या जवळ राहण्याची मदत मिळेल आणि तुम्हाला देवाच्या लोकांमध्ये खरी सुरक्षितता लाभेल, जे आपण पाहणारच आहोत.

तुमच्या ज्ञानाचे परीक्षण करा

तुम्ही यहोवाजवळ का आले पाहिजे?

देवाजवळ येण्याच्या काही गरजा कोणत्या आहेत?

तुम्ही तुमच्या प्रार्थनांमध्ये कशाचा समावेश करू शकता?

तुम्ही प्रार्थनेत का निरंतर असले पाहिजे?

आज तुम्ही यहोवाचे कसे ऐकू शकता?

[Full-page picture on page 157]

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा