वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 १/१५ पृ. १०-१५
  • तुमच्या प्रार्थना “धुपाप्रमाणे” आहेत का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमच्या प्रार्थना “धुपाप्रमाणे” आहेत का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • विश्‍वासाने प्रार्थना करा
  • यहोवाची उपकारस्तुती करा
  • नम्रपणे यहोवाच्या मदतीची याचना करा
  • प्रार्थना कशी करावी हे येशूकडून शिका
  • आपल्या प्रार्थनांच्या अनुरूप वागा
  • प्रार्थनेद्वारे देवाच्या जवळ या
    बायबल नेमके काय शिकवते?
  • प्रार्थनेच्या बहुमानाची कदर करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • देवाला प्रार्थना करण्याचा बहुमान
    बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
  • प्रार्थनेतून मदत कशी मिळवावी
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 १/१५ पृ. १०-१५

तुमच्या प्रार्थना “धुपाप्रमाणे” आहेत का?

“माझी प्रार्थना, तुझ्यासमोर धुपाप्रमाणे . . . होवो.”—स्तोत्र १४१:२.

१, २. धूप जाळणे हे कशाचे प्रतीक होते?

यहोवा देवाने आपला संदेष्टा मोशे याला इस्राएलाच्या उपासनेच्या निवासमंडपात वापरण्यासाठी पवित्र धूप तयार करण्याची आज्ञा दिली होती. देवाने सांगितलेल्या पद्धतीनुसार चार सुगंधी पदार्थ वापरून हे धूपद्रव्य तयार करायचे होते. (निर्गम ३०:३४-३८) या मिश्रणातून अतिशय सुवासिक धूप तयार होत असे.

२ इस्राएल राष्ट्रासोबत केलेल्या नियमशास्त्राच्या करारात, दररोज धूप जाळण्याची आज्ञा होती. (निर्गम ३०:७, ८) पण या धूप जाळण्याचा काही खास अर्थ होता का? हो, कारण स्तोत्रकर्ता एका भजनात म्हणतो: “माझी प्रार्थना, तुझ्यासमोर धुपाप्रमाणे, माझे हात उभारणे संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे सादर होवो.” (स्तोत्र १४१:२) प्रकटीकरणाच्या पुस्तकात प्रेषित योहान देवाच्या सिंहासनाच्या भोवती असलेल्यांचे वर्णन करताना सांगतो की त्यांच्या हातात धुपाने भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या. देवाच्या प्रेरणेने लिहिलेल्या या अहवालात पुढे म्हटले आहे, “त्या वाट्या म्हणजे पवित्र जनांच्या प्रार्थना होत.” (प्रकटीकरण ५:८) तेव्हा, सुवासिक धूप जाळणे हे रात्रंदिवस यहोवाच्या सेवकांनी त्याला केलेल्या आणि त्याला स्वीकार्य असलेल्या प्रार्थनांचे प्रतीक होते.—१ थेस्सलनीकाकर ३:१०; इब्री लोकांस ५:७.

३. ‘देवापुढे धुपाप्रमाणे आपल्या प्रार्थना सादर करण्यासाठी’ आपल्याला कशामुळे मदत मिळेल?

३ आपल्याही प्रार्थना देवाने स्वीकाराव्यात, यासाठी आपण त्याला येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना केल्या पाहिजेत. (योहान १६:२३, २४) पण आपल्याला आणखी चांगल्या प्रार्थना कशा करता येतील? बायबलमध्ये दिलेल्या काही उदाहरणांवर विचार केल्यामुळे आपल्या प्रार्थना यहोवापुढे धुपाप्रमाणे सादर करण्यासाठी आपल्याला मदत मिळेल.—नीतिसूत्रे १५:८.

विश्‍वासाने प्रार्थना करा

४. देवाच्या नजरेत स्वीकार्य असणाऱ्‍या प्रार्थनांचा विश्‍वासाशी कसा संबंध आहे?

४ आपल्या प्रार्थना देवापुढे सुवासिक धुपाप्रमाणे सादर व्हाव्यात असे जर आपल्याला वाटत असेल तर आपण विश्‍वासाने प्रार्थना केली पाहिजे. (इब्री लोकांस ११:६) ख्रिस्ती वडील एखाद्या आध्यात्मिकरित्या रोगी झालेल्याला बायबलमधून मार्गदर्शन करतात आणि तो त्यांची ही मदत स्वीकारतो, तेव्हा वडिलांची “विश्‍वासाची प्रार्थना दुःखणाइतास वाचवील.” (याकोब ५:१५) विश्‍वासाने केलेल्या प्रार्थना आपल्या स्वर्गीय पित्याला आवडतात, तसेच त्याच्या वचनाचा आपण प्रार्थनापूर्वक अभ्यास करतो तेव्हाही त्याला आनंद होतो. याबाबतीत स्तोत्रकर्त्याने एक अतिशय चांगली मनोवृत्ती दाखवली; आपल्या एका भजनात तो म्हणतो: “तुझ्या आज्ञा मला प्रिय आहेत म्हणून मी आपले हात उभारीन आणि तुझ्या नियमांचे मनन करीन. विवेक व ज्ञान मला दे, कारण तुझ्या आज्ञांवर माझी निष्ठा [विश्‍वास] आहे.” (स्तोत्र ११९:४८, ६६) आपणही ‘आपले हात उभारून’ नम्रपणे प्रार्थना करावी आणि नेहमी देवाच्या आज्ञांनुसार विश्‍वासाने आचरण करावे.

५. आपल्याजवळ सुबुद्धी नसेल तर आपण काय करावे?

५ कदाचित एखाद्या अडचणीला कसे तोंड द्यावे हे आपल्याला कळत नसेल. कदाचित बायबलमध्ये दिलेली एखादी भविष्यवाणी आपल्या काळातच पूर्ण होत आहे याविषयी आपल्याला शंका वाटत असेल. अशा गोष्टींमुळे आपली आध्यात्मिक स्थिती डळमळीत न होऊ देता, आपण प्रार्थना करून देवाकडे सुबुद्धी मागावी. (गलतीकर ५:७, ८; याकोब १:५-८) अर्थात देव अगदी चमत्कारिकपणे आपल्या प्रार्थनेचे उत्तर देईल अशी आपण अपेक्षा करू शकत नाही. आपल्या प्रार्थना प्रांजळ आहेत हे आपल्याला दाखवून द्यावे लागेल; आणि यासाठी, देवाला त्याच्या सर्व लोकांकडून ज्या अपेक्षा आहेत त्या आपल्याला पूर्ण कराव्या लागतील. आपला विश्‍वास बळकट करण्यासाठी ‘विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाने’ पुरवलेल्या पुस्तकांच्या, मासिकांच्या साहाय्याने बायबलचा अभ्यास करणे अत्यावश्‍यक आहे. (मत्तय २४:४५-४७; यहोशवा १:७, ८) शिवाय, ज्ञानात वाढत जाण्यासाठी देवाच्या लोकांच्या सभांमध्ये नियमितपणे सहभाग घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.—इब्री लोकांस १०:२४, २५.

६. (अ) आपल्या या काळाविषयी आणि बायबलच्या भविष्यावाण्यांच्या पूर्णतेविषयी आपण सर्वांनी काय लक्षात घेतले पाहिजे? (ब) यहोवाच्या नामाच्या पवित्रीकरणासाठी प्रार्थना करण्यासोबतच आपण काय केले पाहिजे?

६ आज काही ख्रिस्ती बांधव आपलीच ध्येये गाठण्याच्या आणि आपल्या व्यवसायात यशस्वी होण्याच्या ज्याप्रकारे मागे लागले आहेत, त्यावरून असे भासते की आपण अगदी ‘अंतसमयात’ जगत आहोत याची त्यांना पूर्वीसारखी जाणीव राहिलेली नाही. (दानीएल १२:४) इतर सहविश्‍वासू बांधवांनी अशा या बांधवांसाठी प्रार्थना करणे योग्य आहे; १९१४ साली यहोवाने ख्रिस्ताला स्वर्गात राजपद दिले तेव्हापासून त्याची उपस्थिती सुरू झाली असून आज तो आपल्या शत्रूंमध्ये राज्य करत आहे, हे दाखवून देणाऱ्‍या बायबलच्या पुराव्यावर या बांधवांनी आपला विश्‍वास पुन्हा मजबूत करावा अशी प्रार्थना आपण करू शकतो. (स्तोत्र ११०:१, २; मत्तय २४:३) आपण सर्वांनी हे लक्षात घेतले पाहिजे, की मोठी बाबेल, अर्थात खोटा धर्म याचा नाश—यहोवाच्या लोकांवर मागोगच्या गोगचा सैतानी हल्ला आणि त्यावेळी हर्मगिदोनाच्या युद्धात सर्वशक्‍तिमान देवाचे त्याच्या लोकांना बचावणे या सर्व भाकीत केलेल्या घटना अगदी अनपेक्षितपणे अचानक सुरू होऊन अगदी थोड्या कालावधीत घडू शकतात. (प्रकटीकरण १६:१४, १६; १८:१-५; यहेज्केल ३८:१८-२३) तेव्हा, आध्यात्मिकदृष्ट्या जागृत राहण्याकरता आपण देवाकडे मदतीसाठी प्रार्थना करत राहू. यहोवाच्या नावाचे पवित्रीकरण व्हावे, त्याचे राज्य यावे आणि त्याची इच्छा स्वर्गाप्रमाणेच पृथ्वीवरही पूर्ण व्हावी अशी कळकळीने आपण प्रार्थना करू. होय, सतत विश्‍वासूपणे आचरण करत राहून आपल्या प्रार्थना प्रामाणिक आहेत हे आपण दाखवून देऊ. (मत्तय ६:९, १०) खरोखर, यहोवावर प्रेम करणाऱ्‍या सर्वांनी आधी त्याचे राज्य आणि धार्मिकता शोधावी आणि शेवट येण्याआधी प्रचार कार्यात जास्तीतजास्त सहभाग घेण्याचा निर्धार करावा.—मत्तय ६:३३; २४:१४.

यहोवाची उपकारस्तुती करा

७. पहिले इतिहास २९:१०-१३ येथे दाविदाच्या प्रार्थनेचा काही भाग दिलेला आहे, तो वाचताना तुम्हाला कोणती गोष्ट मनोवेधक वाटते?

७ ‘धुपाप्रमाणे आपल्या प्रार्थना सादर करण्यासाठी’ प्रार्थनेत देवाची मनापासून स्तुती करणे आणि त्याचे आभार मानणे महत्त्वाचे आहे. दावीद राजाने आणि इस्राएली लोकांनी यहोवाच्या मंदिराच्या बांधकामासाठी देणग्या दिल्या, त्याप्रसंगी दाविदाने अशाचप्रकारे प्रार्थनेत स्तुती आणि आभार व्यक्‍त केला. तो म्हणाला: “हे परमेश्‍वरा, आमचा पिता इस्राएल याच्या देवा, तू सदासर्वकाळ धन्य आहेस. हे परमेश्‍वरा, महिमा, पराक्रम, शोभा, विजय व वैभव ही तुझीच; आकाशात व पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व तुझेच; हे परमेश्‍वरा; राज्यहि तुझेच; तू सर्वांहून श्रेष्ठ व उन्‍नत आहेस. धन व मान तुजपासूनच प्राप्त होतात, व तू सर्वांवर प्रभुत्व करितोस; सामर्थ्य व पराक्रम तुझ्याच हाती आहेत; लोकांस थोर करणे व सर्वांस समार्थ्य देणे हे तुझ्याच हाती आहे. तर आता आमच्या देवा, आम्ही तुझे आभार मानितो, तुझ्या प्रतापी नामाची स्तुति करितो.”—१ इतिहास २९:१०-१३.

८. (अ) स्तोत्र १४८ ते १५० यांत वाचायला मिळणाऱ्‍या स्तुतिस्तोत्रांत कोणते शब्द खासकरून तुमच्या हृदयाला स्पर्शून गेले? (ब) स्तोत्र २७:४ या वचनात व्यक्‍त केलेल्या भावना आपल्याही असतील तर आपण काय करू?

८ किती सुरेख शब्दांत दाविदाने यहोवाची उपकारस्तुती केली आहे! कदाचित आपल्याला इतक्या सुंदर शब्दांत प्रार्थना करता येत नसेल, पण इतक्याच मनःपूर्वक प्रार्थना आपण नक्कीच करू शकतो. स्तोत्रसंहिता या पुस्तकात उपकारस्तुतीच्या अशा कितीतरी प्रार्थना आहेत. विशेषतः स्तोत्र १४८ ते १५० यांत आपल्याला अतिशय सुंदर स्तुतिपर शब्द वाचायला मिळतात. बऱ्‍याच स्तोत्रांत देवाला कृतज्ञता व्यक्‍त करणाऱ्‍या प्रार्थना आढळतात. दावीद एका स्तोत्रात म्हणतो: “परमेश्‍वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन; ते हे की, आयुष्यभर परमेश्‍वराच्या घरात माझी वस्ती व्हावी; म्हणजे मी परमेश्‍वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करीन.” (स्तोत्र २७:४) अशाप्रकारे प्रार्थना करण्यासोबत आपले आचरणही त्या प्रार्थनांच्या अनुरूप असले पाहिजे आणि त्यासाठी आपण यहोवाच्या जनसभांतून चालणाऱ्‍या सर्व कार्यांत अतिशय उत्साहपूर्ण सहभाग घेतला पाहिजे. (स्तोत्र २६:१२) असे जेव्हा आपण करतो, आणि त्यासोबत देवाच्या वचनावर दररोज मनन करतो, तेव्हा प्रार्थनेत यहोवाची मनःपूर्वक स्तुती करण्याची आणि त्याचे आभार मानण्याची बरीचशी कारणे आपल्याला आपोआपच सापडतात.

नम्रपणे यहोवाच्या मदतीची याचना करा

९. राजा आसा याने कशी प्रार्थना केली आणि याचा काय परिणाम झाला?

९ यहोवाचे साक्षीदार या नात्याने आपण जर यहोवाची तन मन लावून सेवा करत आहोत, तर मग आपण त्याला मदतीसाठी केलेल्या प्रार्थना तो ऐकतो असे आपण खात्रीने म्हणू शकतो. (यशया ४३:१०-१२) यहुदाचा राजा आसा याचे उदाहरण घ्या. ४१ वर्षांच्या त्याच्या राज्यकाळातील (सा.यु.पू. ९७७-९३७) पहिल्या १० वर्षांत त्याच्या राज्यात शांती होती. नंतर जेरह नावाचा एक कूशी दहा लाख सैनिकांना घेऊन यहुदावर चाल करून आला. आसाचे सैन्य त्याच्या तुलनेत अगदीच लहान होते, तरीसुद्धा तो आपल्या माणसांना घेऊन शत्रूचा सामना करायला निघाला. मात्र लढाईच्या आधी आसाने कळकळीची प्रार्थना केली. शत्रूच्या हातून सोडवण्याचे यहोवालाच सामर्थ्य आहे हे त्याने कबूल केले आणि म्हणून त्याने यहोवाकडे मदतीची याचना करीत म्हटले: “आमची भिस्त तुजवर आहे; आम्ही तुझ्या नामावर भरवसा ठेवून या समूहाशी सामना करण्यास आलो आहो. हे परमेश्‍वरा, तू आमचा देव आहेस; मानवांचे तुजवर वर्चस्व होऊ देऊ नको.” आसाला लढाईत विजय मिळाला; यहोवाने आपल्या महिमावान नावासाठी यहुदाला शत्रूंपासून बचावले. (२ इतिहास १४:१-१५) कधी देव आपल्याला परीक्षेतून सोडवतो, तर कधी त्या परीक्षेला तोंड देण्याचे आपल्याला साहाय्य करतो; पण आपण त्याला मदतीची जेव्हाही याचना करतो तेव्हा तो आपल्या प्रार्थना ऐकतो यात शंकाच नाही.

१०. एखाद्या कठीण परिस्थितीला कसे तोंड द्यावे हे आपल्याला कळत नाही तेव्हा राजा यहोशाफाटाची प्रार्थना आपल्याला कशी मदत करू शकते?

१० एखाद्या कठीण परिस्थितीला कसे तोंड द्यावे हे जेव्हा आपल्याला समजत नाही, तेव्हाही आपण खात्री बाळगू शकतो की यहोवा आपल्या मदतीच्या याचना अवश्‍य ऐकेल. यहोशाफाट या यहुदी राजाच्या काळात असेच घडले; यहोशाफाटाने सा.यु.पू. ९३६ पासून एकूण २५ वर्षे राज्य केले. मवाबी व अम्मोनी आणि त्यांच्याबरोबर सेईर पहाडातले कित्येक लोक युद्ध करण्यासाठी यहोशाफाटावर चालून आले, तेव्हा त्याने यहोवाला अशी प्रार्थना केली: “हे आमच्या देवा; तू त्यांचे शासन करणार नाहीस का? कारण आमच्यावर चालून आलेल्या या मोठ्या समूहाशी सामना करण्यास आम्हास ताकद नाही; आम्ही काय करावे ते आम्हास सुचत नाही; पण आमचे डोळे तुजकडे लागले आहेत.” यहोवाने या विनम्र प्रार्थनेचे उत्तर दिले; तो यहुदाच्या बाजूने लढला आणि शत्रुसैन्यांना असे गोंधळवून टाकले की त्यांनी एकमेकांचाच वध केला. याचा परिणाम असा झाला की सर्व आसपासच्या राष्ट्रांना यहुद्यांची भीती वाटू लागली आणि त्यामुळे त्यांच्या राष्ट्रात शांती नांदू लागली. (२ इतिहास २०:१-३०) आपल्याला एखाद्या कठीण परिस्थितीला कसे तोंड द्यावे हे समजत नाही तेव्हा आपणही यहोशाफाटासारखीच प्रार्थना करू शकतो, की ‘यहोवा, आम्ही काय करावे ते आम्हास सुचत नाही; पण आमचे डोळे तुजकडे लागले आहेत.’ कदाचित पवित्र आत्मा आपल्याला आपल्या समस्येला तोंड देण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्‍या बायबलमधील माहितीची आठवण करून देईल किंवा मानवी बुद्धीला कल्पनाही करवणार नाही अशा अद्‌भुत मार्गाने कदाचित देव आपल्या मदतीला धावून येईल.—रोमकर ८:२६, २७.

११. जेरुसलेमच्या भिंतीच्या संबंधाने नहेम्याने जे केले त्यावरून आपल्याला प्रार्थनेच्या बाबतीत काय शिकायला मिळते?

११ देवाची मदत मिळण्यासाठी केवळ एकदा प्रार्थना करून चालणार नाही. जेरुसलेमच्या पडलेल्या भिंतींसाठी आणि यहुदाच्या रहिवाशांच्या दुर्दशेसाठी नहेम्या कितीतरी दिवसांपर्यंत विलाप करीत, उपास करीत रडत यहोवाला प्रार्थना करत राहिला. (नहेम्या १:१-११) शेवटी त्याच्या प्रार्थना सुवासिक धुपाप्रमाणे देवाजवळ पोचल्या. एकदा पर्शियन राजा अर्तहशश्‍त त्याला म्हणाला: “तुझी विनंति काय आहे?” नहेम्या सांगतो, ‘तेव्हा [“लगेच,” NW] मी स्वर्गींच्या देवाची प्रार्थना केली.’ नहेम्याने मनातल्या मनात केलेली ती लहानशी प्रार्थना देवाने ऐकली, कारण नहेम्याला आपल्या मनातल्या इच्छेप्रमाणे जेरुसलेमला जाऊन पडलेल्या भिंतीच्या पुनर्बांधणीचे काम करण्याची परवानगी देण्यात आली.—नहेम्या २:१-८.

प्रार्थना कशी करावी हे येशूकडून शिका

१२. स्वतःच्या शब्दांत, तुम्ही येशूच्या आदर्श प्रार्थनेतील मुख्य मुद्यांचे थोडक्यात कसे वर्णन कराल?

१२ बायबलमध्ये दिलेल्या सर्व प्रार्थनांपैकी आपल्याला सर्वात जास्त शिकायला मिळते ते येशूने सुवासिक धुपाप्रमाणे सादर केलेल्या आदर्श प्रार्थनेतून. लूकच्या शुभवर्तमानात आपण वाचतो: “[येशूच्या] शिष्यातील एकाने त्याला म्हटले, ‘प्रभुजी जसे योहानाने आपल्या शिष्यांना प्रार्थना करावयास शिकविले तसे आपणहि आम्हाला शिकवा.’ तो त्यांना म्हणाला, ‘तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा असे म्हणा: “हे पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जावो; तुझे राज्य येवो; आमची रोजची भाकर रोज आम्हाला दे; आणि आम्हाला आमच्या पापांची क्षमा कर, कारण आम्हीहि आपल्या प्रत्येक ऋण्याला क्षमा करितो; आणि आम्हाला परीक्षेत आणू नको.”’” (लूक ११:१-४; मत्तय ६:९-१३) ही प्रार्थना तोंडपाठ करून म्हणावयाची प्रार्थना नव्हे, तर प्रार्थना कशी करावी हे शिकवणारी एक आदर्श प्रार्थना म्हणून आपण विचारात घेऊ.

१३. “पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जावो,” या शब्दांचा अर्थ तुम्ही कसा समजावून सांगाल?

१३ “हे पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जावो.” यहोवाला पिता म्हणण्याचा त्याच्या समर्पित सेवकांना एक खास मानाचा अधिकार आहे. प्रेमळ बापाकडे जशी मुले अगदी हक्काने कोणतीही विवंचना घेऊन जातात, तसेच आपणही नियमितपणे देवाला आदरणीय आणि श्रद्धापूर्ण रितीने प्रार्थना केली पाहिजे. (स्तोत्र १०३:१३, १४) यहोवाच्या नामाच्या पवित्रीकरणाविषयी आपल्याला आस्था आहे, आणि त्याच्या नावावर आलेला कलंक पूर्णपणे नाहीसा होईल तो दिवस पाहण्यासाठी आपण अधीर आहोत, हे आपल्या प्रार्थनांतून दिसून आले पाहिजे. निश्‍चितच यहोवाचे नाम सर्वांहून वेगळे आणि पवित्र ठरावे अशीच आपली इच्छा आहे.—स्तोत्र ५:११; ६३:३, ४; १४८:१२, १३; यहेज्केल ३८:२३.

१४. “तुझे राज्य येवो,” अशी प्रार्थना करण्याचा काय अर्थ होतो?

१४ “तुझे राज्य येवो.” हे राज्य म्हणजे यहोवाचे शासन; आणि हे शासन तो आपला पुत्र येशू आणि त्याच्यासोबत त्याचे “पवित्र जन” यांनी मिळून बनलेल्या स्वर्गीय मशीही सरकाराच्या माध्यमाने चालवतो. (दानीएल ७:१३, १४, १८, २७; प्रकटीकरण २०:६) लवकरच देवाच्या सार्वभौमत्त्वाच्या विरोधात असणाऱ्‍या पृथ्वीवरील सर्व लोकांच्या विरुद्ध हे राज्य ‘येईल’ आणि त्या सर्वांना नाहीसे करील. (दानीएल २:४४) तेव्हा यहोवाची इच्छा जशी स्वर्गात तशी पृथ्वीवरही पूर्ण होईल. (मत्तय ६:१०) सबंध विश्‍वाच्या सार्वभौम अधिकाऱ्‍याची एकनिष्ठपणे सेवा करणारे सर्व यामुळे किती हर्षित होतील!

१५. यहोवाला “रोजची भाकर” मागण्यातून काय सूचित होते?

१५ “आमची रोजची भाकर रोज आम्हाला दे.” आपण यहोवाला “रोजची” भाकर देण्याची विनंती करतो, म्हणजेच, आपण आपल्या गरजेच्या वस्तू अवास्तव प्रमाणात मागत नाही, तर केवळ रोजच्यापुरत्या गरजा पूर्ण करण्याची त्याला प्रार्थना करतो. देव आपल्या गरजा भागवील असा आपल्याला भरवसा असला तरीसुद्धा आपण स्वतः मेहनत करून नैतिक मार्गाने अन्‍नपाणी आणि आपल्या इतर गरजा भागवण्याचा आपल्या परीने प्रयत्न करतो. (२ थेस्सलनीकाकर ३:७-१०) अर्थात, आपण आपल्या स्वर्गीय अन्‍नदात्याचे आभार मानले पाहिजेत कारण आपल्याला लागणाऱ्‍या सर्व गोष्टी त्याच्या प्रेमामुळे, बुद्धीमुळे आणि त्याच्या सामर्थ्यामुळेच आपल्याला मिळू शकतात.—प्रेषितांची कृत्ये १४:१५-१७.

१६. आपल्याला देवाची क्षमा कशी मिळू शकते?

१६ “आम्हाला आमच्या पापांची क्षमा कर, कारण आम्हीहि आपल्या प्रत्येक ऋण्याला क्षमा करितो.” आपण अपरिपूर्ण आहोत, आणि आपली पाप करण्याची प्रवृत्ती आहे; त्यामुळे आपण यहोवाचे परिपूर्ण स्तर कधीच गाठू शकत नाही, कोठे न कोठे आपण कमी पडतोच. म्हणूनच, येशूच्या खंडणी बलिदानाच्या योगे देवाने आपल्याला क्षमा करावी अशी प्रार्थना करणे आवश्‍यक आहे. पण ‘प्रार्थना ऐकणाऱ्‍याने’ येशूने दिलेल्या बलिदानाच्या मोलाच्या आधारावर आपल्या पापांची क्षमा करावी असे जर आपल्याला वाटते, तर आपण पश्‍चात्ताप करून त्याने जी काही शिक्षा दिली ती स्वीकारण्यास तयार असले पाहिजे. (स्तोत्र ६५:२; रोमकर ५:८; ६:२३; इब्री लोकांस १२:४-११) शिवाय, आपण जर आपल्या विरुद्ध पाप करणाऱ्‍या “आपल्या ऋण्यास ऋण सोडिले [असेल],” तरच आपण देवाकडून आपल्या पापांची क्षमा होण्याची अपेक्षा करू शकतो.—मत्तय ६:१२, १४, १५.

१७. “आम्हाला परीक्षेत आणू नको,” याचा काय अर्थ होतो?

१७ “आम्हाला परीक्षेत आणू नको.” बायबलमध्ये काही ठिकाणी काही गोष्टी यहोवा करतो असे म्हटलेले आहे, प्रत्यक्षात तो केवळ या गोष्टी होऊ देत असतो. (रूथ १:२०, २१) देव कधी आपल्याला पाप करण्यासाठी मोहात पाडत नाही. (याकोब १:१३) वाईट गोष्टी करण्याचा मोह दियाबल, आपले पापमय शरीर आणि हे जग यांच्या माध्यमातून होतो. देवाविरुद्ध पाप करण्यासाठी आपल्याला भूल घालणारा परीक्षक हा सैतान आहे. (मत्तय ४:३; १ थेस्सलनीकाकर ३:५) “आम्हाला परीक्षेत आणू नको,” अशी ज्याअर्थी आपण प्रार्थना करतो त्याअर्थी आपण देवाला अशी विनंती करत असतो की त्याच्या आज्ञांचा भंग करण्याचा मोह होतो तेव्हा त्या मोहावर विजय मिळवण्यासाठी त्याने आपल्याला मदत करावी. आपण मोहाला बळी पडू नये आणि ‘वाईटाने,’ म्हणजेच सैतानाने आपल्याला कह्‍यात घेऊ नये म्हणून देव आपल्याला योग्य मार्ग दाखवू शकतो.—मत्तय ६:१३; १ करिंथकर १०:१३.

आपल्या प्रार्थनांच्या अनुरूप वागा

१८. आनंदी वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनासाठी आपण प्रार्थना करतो तेव्हा आपण आपल्या प्रार्थनांच्या अनुरूप कसे वागू शकतो?

१८ येशूच्या या आदर्श प्रार्थनेत मुख्य मुद्द्‌यांचाच समावेश केला आहे, पण तसे आपण कोणत्याही गोष्टीबद्दल प्रार्थना करू शकतो. उदाहरणार्थ, सुखी वैवाहिक जीवनाची इच्छा आपण प्रार्थनेत व्यक्‍त करू शकतो. लग्न होईपर्यंत नैतिकरित्या निर्दोष राहता यावे म्हणून आपण आत्म-नियंत्रणासाठी प्रार्थना करू शकतो. पण यासोबतच, आपण आपल्या प्रार्थनांच्या अनुरूप वागून अनैतिक पुस्तके आणि मनोरंजन माध्यमे यांपासून दूर राहिले पाहिजे. तसेच आपण “केवळ प्रभूमध्ये, लग्न [करण्याचा]” निश्‍चय केला पाहिजे. (१ करिंथकर ७:३९; अनुवाद ७:३, ४) लग्न झाल्यावरही कौटुंबिक आनंदासाठी प्रार्थना करण्यासोबत देवाच्या मार्गदर्शनाचे पालन करण्याद्वारे आपल्याला आपल्या प्रार्थनांच्या अनुरूप वागावे लागेल. आणि आपल्याला मुले असल्यास, त्यांनी यहोवाचे विश्‍वासू सेवक बनावे अशी केवळ प्रार्थना करणे पुरेसे नाही. तर बायबल अभ्यासाद्वारे आणि त्यांच्यासोबत ख्रिस्ती सभांना नियमितपणे हजर राहण्याद्वारे त्यांच्या मनांत देवाची सत्ये बिंबवण्यासाठी आपण प्रयत्नांची शिकस्त केली पाहिजे.—अनुवाद ६:५-९; ३१:१२; नीतिसूत्रे २२:६.

१९. आपल्या सेवाकार्याच्या संबंधाने जर आपण प्रार्थना करत असू, तर आपली काय जबाबदारी आहे?

१९ आपल्या सेवाकार्यात चांगले परिणाम मिळण्यासाठी आपण प्रार्थना करत आहोत का? मग या प्रार्थनांच्या अनुरूप, आपण राज्याच्या प्रचार कार्यात आपला मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून सहभाग घेतला पाहिजे. आपल्याला कोणा व्यक्‍तीला सार्वकालिक जीवनाच्या मार्गावर आणण्यासाठी मदत करण्याची संधी मिळावी अशी आपण प्रार्थना करत असू; मग त्यासोबतच आपण आस्थेवाईक लोकांचे नाव-पत्ते नीट लिहून घेतले पाहिजेत आणि लोकांच्या घरी जाऊन बायबल अभ्यास चालवण्यासाठी आपल्या इतर कामांतून वेळ काढायला आपण तयार असले पाहिजे. पायनियर बनून प्रचार कार्यात पूर्ण वेळ सहभाग घेण्याची आपली इच्छा आहे का? मग आपल्या प्रार्थनांच्या अनुरूप आपण प्रचार कार्यात आपला सहभाग वाढवला पाहिजे आणि इतर पायनियर्ससोबत प्रचार कार्याला गेले पाहिजे. अशी पावले आपण उचलतो तेव्हा आपण दाखवून देत असतो की आपण आपल्या प्रार्थनांच्या अनुरूप कार्य करत आहोत.

२०. पुढच्या लेखात काय विचारात घेतले जाईल?

२० आपण यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करत असू, तर त्याच्या इच्छेनुसार केलेल्या आपल्या प्रार्थनांचे तो जरूर उत्तर देईल याची आपण खात्री बाळगू शकतो. (१ योहान ५:१४, १५) बायबलमध्ये दिलेल्या काही प्रार्थना विचारात घेतल्यामुळे अतिशय उपयोगी मुद्दे आपल्याला शिकायला मिळाले आहेत. ‘यहोवासमोर धुपाप्रमाणे प्रार्थना सादर करण्याची’ ज्यांची इच्छा आहे त्यांच्याकरता बायबलमधून आणखी मार्गदर्शक मुद्दे पुढच्या लेखात विचारात घेतले जातील.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

◻ विश्‍वासाने प्रार्थना करणे महत्त्वाचे का आहे?

◻ आपल्या प्रार्थनेत स्तुती आणि आभार यांना कोणते स्थान असावे?

◻ आपण प्रार्थनेत खात्रीपूर्वक यहोवाची मदत का मागू शकतो?

◻ आदर्श प्रार्थनेचे काही मुख्य मुद्दे कोणते आहेत?

◻ आपण आपल्या प्रार्थनांच्या अनुरूप कसे वागू शकतो?

[१२ पानांवरील चित्र]

राजा यहोशाफाटाप्रमाणे कधीकधी आपल्यालाही प्रार्थनेत असे म्हणावे लागेल, की ‘यहोवा, आम्ही काय करावे ते आम्हास सुचत नाही; पण आमचे डोळे तुजकडे लागले आहेत’

[१३ पानांवरील चित्र]

येशूच्या आदर्श प्रार्थनेनुसार तुम्ही प्रार्थना करता का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा