“आम्हास प्रार्थना करावयास शिकवा”
“त्याच्या शिष्यातील एकाने त्याला म्हटलेः ‘प्रभुजी, . . . आम्हास प्रार्थना करावयास शिकवा.’”—लूक ११:१.
१-३. (अ) येशूच्या शिष्यांनी प्रार्थनेविषयी त्याच्याकडून सूचना का मिळवली? (ब) प्रार्थनेविषयी कोणते प्रश्न उद्भवतात?
काही लोकांचा गाण्याचा सूर चांगला आहे. दुसरे काही निष्णात संगीतकार आहेत. पण आपली सर्वोत्तम उच्चता गाठण्यासाठी या गायकांना व संगीतकारांना सूचनांची गरज असते. हेच प्रार्थनेबद्दल देखील सांगता येईल. येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांचा हे कळले की, देवाने त्यांची प्रार्थना ऐकायची आहे तर तत्संबंधीच्या सूचना त्यांनी मिळवल्या पाहिजेत.
२ येशूने अनेकदा आपल्या पित्याची खाजगीपणे प्रार्थना केली. १२ प्रेषितांची निवड करण्याआधी त्याने सबंध रात्र अशाच एका प्रार्थनेत घालवली. (लूक ६:१२-१६) शिष्यांना खाजगी रितीने प्रार्थना करण्याचा सल्ला दिला होता तरी त्यांनी त्याला जाहीर प्रार्थना करताना पाहिले होते व त्याची ही जाहीर प्रार्थना धर्मढोंग्यासारखी नव्हती असे त्यांना दिसले होते. ते ढोंगी, लोकांनी आपणाला पाहावे या उद्देशाने जाहीरपणे प्रार्थना करीत असत. (मत्तय ६:५, ६) या कारणामुळे येशूच्या शिष्यांनी प्रार्थनेविषयी अधिक प्रगत सूचना मिळविणे हे साहजिकच आहे. यास्तव आम्ही वाचतोः “मग असे झाले की, तो एका ठिकाणी प्रार्थना करीत होता, आणि ती त्याने समाप्त केल्यावर त्याच्या शिष्यातील एकाने त्याला म्हटलेः ‘प्रभुजी, जसे योहानाने [बाप्तिस्मा करणारा] आपल्या शिष्यांस शिकवले तसेच आम्हास प्रार्थना करावयास शिकवा.’”—लूक ११:१.
३ येशूने कोणता प्रतिसाद दाखवला? त्याच्या उदाहरणाकडून आपल्याला काय शिकता येईल? शिवाय त्याने प्रार्थनेसंबंधाने दिलेल्या सूचनांकडून आम्हाला कसा लाभ मिळू शकेल?
आमच्यासाठी धडा
४. आम्ही “निरंतर प्रार्थना” का करावी, व तसे करण्याचा काय अर्थ होतो?
४ प्रार्थनाशील मनुष्य या नात्याने आपल्याला येशूच्या शब्दांकडून तसेच उदाहरणाद्वारे बरेच शिकता येते. जर देवाच्या या परिपूर्ण पुत्राला त्याची नेहमी प्रार्थना करण्याची गरज होती तर त्याच्या अपूर्ण शिष्यांना मार्गदर्शन, सांत्वन तसेच आध्यात्मिक पोषणासाठी देवाकडे बघण्याची अधिक गरज आहे. म्हणूनच आम्ही “निरंतर प्रार्थना करा”यची आहे. (१ थेस्सलीनकाकर ५:१७) याचा असा अर्थ नाही की, आपण नेहमीच अक्षरशः आपले गुडघे टेकले पाहिजेत. उलटपक्षी, आमची नेहमीच प्रार्थनाशील वृत्ती असावी. जीवनाच्या हर प्रकाराविषयी आम्ही देवाचा शोध घतला पाहिजे म्हणजे आम्हाला अंतर्दृष्टी मिळेल व त्याची मान्यता नेहमी राहील.—नीतीसूत्रे १५:२४.
५. आम्ही प्रार्थनेसाठी जो वेळ देण्यास हवा त्यावर काय अतिक्रमण करू शकते, व याबाबतीत आम्ही काय केले पाहिजे?
५ आम्ही प्रार्थनेसाठी जो वेळ द्यायला पाहिजे त्यावर या “शेवटल्या काळी” अधिक अतिक्रमणे होत आहेत. (२ तीमथ्य ३:१) पण तेच, घरगुती चिंता, व्यावसायिक काळज्या इत्यादि गोष्टी स्वर्गीय पित्याला केलेल्या आमच्या नित्याच्या प्रार्थनेत अडथळा आणीत आहेत तर मग, सद्य जीवनाच्या चितांनी आम्ही भारावून गेलो आहोत हे स्पष्ट आहे. अशी ही परिस्थिती विलंब न लावता सुधारली गेली पाहिजे, अन्यथा प्रार्थना करण्यात मागे पडलो तर त्यामुळे विश्वास गमावला जाईल. एकतर आम्ही आमची प्रापंचिक बंधने कमी करावीत किंवा जीवनातील चिंतांचा, आपली अंतःकरणे अधिक कळकळीने व सातत्याने देवाकडे मार्गदर्शनाकरता लावून तोल साधावा हे केले पाहिजे. आम्ही “प्रार्थना करण्यासाठी सावध असा”वे.—१ पेत्र ४:७.
६. कोणत्या प्रार्थनेचा आम्ही आता अभ्यास करणार आहोत व त्यामागील हेतू कोणता?
६ ज्याला नमुनेदार प्रार्थना म्हणतात त्यामध्ये येशूने, शब्दशः काय म्हणावे ते नव्हे, तर प्रार्थना कशी करावी हे शिकवले. लूक व मत्तय शुभवर्तमानातील याबद्दलच्या अहवालात भिन्न प्रसंगामुळे फरक आढळतो. तेव्हा, आम्ही या प्रार्थनेचा अभ्यास, येशूचे अनुयायी व यहोवाचे साक्षीदार या नात्याने आमच्या प्रार्थनेचा प्रकार कसा असावा ते पाहण्यासाठी करणार आहोत.
आमचा पिता व त्याचे नाम
७. यहोवाला “आमचा पिता” म्हणण्याचा अधिकार कोणाचा आहे?
७ “हे आमच्या स्वगातील पित्या.” (मत्तय ६:९; लूक ११:२) वस्तुतः यहोवा हा मानवजातीचा निर्माणकर्ता असून तो स्वर्गीय आसमंतात राहात असल्यामुळे त्याला “आमच्या स्वर्गातील पित्या” असे संबोधणे उचित आहे. (१ राजे ८:४९; प्रे. कृत्ये १७:२४, २८) “आमच्या” असे म्हणण्यात, इतर देखील देवाबरोबर जवळचे नातेसंबंध राखून आहेत हा अर्थ अभिप्रेत होतो. पण आपला पिता म्हणून कोण अनिर्बंधितपणे त्याला हाक मारू शकतो? त्याच्या उपासकांच्या कुटुंबातील केवळ समर्पित, बाप्तिस्मा घेतलेले सदस्य. यहोवाला “आमचा पिता” असे संबोधण्यामुळे, आमचा देवावर विश्वास आहे आणि त्याच्यासोबत समेट होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे येशूच्या खंडणी यज्ञार्पणाचा पूर्णपणे स्वीकार करणे हा आहे ही जाणीव आपणाठायी असल्याचे आम्ही दाखवतो.—इब्रीयांस ४:१४-१६; ११:६.
८. आम्ही यहोवाला प्रार्थना करण्यासाठी वेळ देण्यात का उत्कंठा राखावी?
८ आपला स्वर्गीय पिता आम्हाला किती जवळचा वाटावा! जसे मुलांना आपल्या बापाकडे जाण्याचे कधी कंटाळवाणे वाटत नाही तसेच आम्हीही देवाची प्रार्थना करण्यास वेळ देण्यात उत्कट इच्छा धरावी. त्याने आम्हास पुरविलेल्या आध्यात्मिक व भौतिक आशीर्वादांची कदर बाळगून त्याच्या चांगुलतेविषयी आम्ही त्याचे उपकार मानावेत. ज्या भारामुळे आम्ही दबून जात आहोत ती आम्ही त्याच्यापाशी नेली पाहिजेत व तो आमची काळजी घेईल हा आत्मविश्वास बाळगला पाहिजे. (स्तोत्रसंहिता ५५:२२) आम्ही विश्वासू आहोत तर मग, तो आमची काळजी करतो म्हणून सर्वकाही आमच्या भल्यासाठीच घडेल याची आम्हाला खात्री धरता येईल.—१ पेत्र ५:६, ७.
९. देवाचे नाम पवित्र होण्याविषयी प्रार्थना म्हणणे म्हणजे कशासाठी विनंती करणे आहे?
९ “तुझे नाम पवित्र मानले जावो.” (मत्तय ६:९; लूक ११:२) “नाम” याचा संदर्भ कधी कधी व्यक्तीला अनुलक्षून असतो आणि “पवित्र मानणे” म्हणजे “त्याला पावित्र्य देणे, वेगळे ठेवणे किंवा महान समजणे.” (पडताळा प्रकटीकरण ३:४.) तद्वत, देवाचे नाव पवित्र मानले जावो अशी प्रार्थना करणे म्हणजे यहोवाने आपले नाव पवित्र करण्यासाठी हालचाल करावी अशी त्याला विनंती करणे होय. ते तो कसे पवित्र करील? त्याच्या नावावर जितकी निंदा लादण्यात आली आहे ती सर्व दूर करून. (स्तोत्रसंहिता १३५:१३) यासाठी, देव दुष्टतेला काढून टाकील, स्वतःला मोठे बनवील, आणि राष्ट्रांना दाखवील की तो यहोवा आहे. (यहेज्केल ३६:२३; ३८:२३) आम्हाला तो दिवस पाहण्याची उत्कटता आहे तसेच यहोवाच्या थोरवीची आपल्याला कदर आहे तर “तुझे नाम पवित्र मानले जावो,” हे अत्यंत सद्भावाने व पूज्येतेने म्हणत त्याच्यापाशी नित्य जात राहू या.
देवाचे राज्य व त्याची इच्छा
१०. देवाचे राज्य येवो अशी प्रार्थना आपण करतो त्यावेळी त्याचा काय अर्थ असतो?
१० “तुझे राज्य येवो.” (मत्तय ६:१०; लूक ११:२) येथे राज्याचा अर्थ यहोवाची सार्वभौम राज्यसत्ता असा होतो. ती, येशू ख्रिस्त व त्याच्या सहवासात राहणारे “पवित्र जन” यांच्या हाती असणारी स्वर्गीय मशीही सरकार याच्या रुपात प्रकट होते. (दानीएल ७:१३, १४, १८, २७; यशया ९:६, ७; ११:१-५) ते “येवो” अशी प्रार्थना करण्याचा काय अर्थ होतो? याचा अर्थ, देवाच्या राज्याने येऊन ईश्वरी राजवटीचा विरोध करणाऱ्या सर्व पृथ्वीवरील विरोधकांचा विमोड करावा अशी त्यात विचारणा असते. त्या राज्याने ‘सर्व पृथ्वीवरील राज्ये चूर्ण करून त्यांना नष्ट केल्यावर’ ते या पृथ्वीचे रुपांतर गालार्धव्याप्त नंदनवनात करील.—दानीएल २:४४; लूक २३:४३.
११. यहोवाची इच्छा सबंध विश्वात पूर्ण होत आहे हे पाहण्याची आमची उत्कटता आहे तर आम्ही काय करू?
११ “जसे स्वर्गात, तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” (मत्तय ६:१०) ही, देवाने पृथ्वीसंबंधाने आपला राखलेला उद्देश पूर्ण करावा अशी विनंती आहे. यामध्ये त्याने सर्व शत्रूंना काढून टाकण्याचे समाविष्ट आहे. (स्तोत्रसंहिता ८३:९-१८; १३५:६-१०) खरे म्हणजे, ईश्वरी इच्छा सबंध विश्वामध्ये साकार व्हावी हे पाहण्याची आमची उत्कट इच्छा आहे असे आम्ही म्हणत असतो. हेच जर आमच्या अंतःकरणी आहे तर मग, आम्हाला शक्य आहे तितक्या अधिकपणे आम्ही यहोवाच्या इच्छेप्रमाणे नेहमी करीत राहू. देवाची इच्छा जर आमच्याच बाबतीत पूर्ण करण्याचा आम्ही निकराचा प्रयत्न केला नाही तर ती विनंती देवाला प्रामाणिकपणे सादर करता येणार नाही. आम्ही तशी प्रार्थना म्हणत आहोत तर त्या इच्छेच्या विरुद्ध वागत नाही याची आम्ही खात्री करावी. विश्वासात नसलेल्या कोणा व्यक्तीसोबत भेटीगाठी घेणे किंवा जगीक मार्गांचा अवलंब करणे या त्या विरुद्ध गोष्टी होत. (१ करिंथकर ७:३९; १ योहान २:१५-१७) उलटपक्षी, आमच्या मनात हाच विचार नित्य असावा की, ‘याबाबतीत यहोवाचे विचार काय आहेत?’ होय, आम्ही देवावर आपल्या पूर्ण अंतःकरणाने प्रीती करीत असलो तर आमच्या जीवनाच्या हर प्रकारात त्याचे मार्गदर्शन संपादण्याचा यत्न करू.—मत्तय २२:३७.
आमची दैनंदिन भाकर
१२. ‘रोजची भाकर’ मागण्याचा कोणता उत्तम परिणाम आम्हावर होतो?
१२ “आमची रोजची भाकर आज आम्हास दे.” (मत्तय ६:११) लूकचा अहवाल असा वाचण्यात येतोः “आमच्या प्रतिदिवसाची भाकर प्रतिदिवशी आम्हास दे.” (लूक ११:३) देवाने “आज” आम्हाला अन्न द्यावे अशी त्याच्याकडे विनंती करणे हे तो दररोज आमच्या गरजांची काळजी वाहू शकतो असा त्याच्याविषयी विश्वास प्रकट करणे आहे. इस्राएलांना एक आठवड्याकरता किंवा अधिक दिवसांसाठी नव्हे तर “एकेका दिवसाला पुरेल इतका” मान्ना गोळा करण्यास सांगण्यात आले होते. (निर्गम १६:४) ही काही मिष्टान्न व भरपूर पुरवठा करण्याची विनंती नव्हे, तर दर दिवशीच्या ज्या गरजा उत्पन्न होतात त्यासाठी विनवणी आहे. केवळ दिवसाच्या आहारासाठी विनंती केल्यामुळे आपल्याला लोभी न होण्याची मदत मिळते.—१ करिंथकर ६:९, १०.
१३. (अ) रोजची भाकर मागण्याचा विस्तारीत रूपाने काय अर्थ होऊ शकतो? (ब) आम्ही कष्ट उपसले आणि तरीदेखील बेताचेच उत्पन्न मिळाले तरी आमची मनोवृत्ती कशी असावी?
१३ विस्तारीत रुपाने पाहू गेल्यास दररोजच्या भाकरीची विनंती करणे याचा अर्थ आपण स्वावलंबी नसून अन्न, पाणी, कपडे व इतर जरुरीच्या गोष्टींसाठी देवाकडे सतत बघत असतो हे त्यातून व्यक्त होते. त्याच्या उपासकांच्या कुटुंबातील समर्पित सदस्य या नात्याने आमच्या पित्यावर आमचा भाव आहे, पण आम्ही आळशीपणे एका जागी बसून तो आम्हाला अद्भूतरितीने कशा सर्व गोष्टी पुरवितो याची वाट पहात नाही. आम्ही काम करतो व जे काही उत्पन्न येते त्यामधून अन्न व जरुरीच्या वस्तु घेतो. तरीही आपण देवाचे योग्यपणे आभार मानतो, कारण या तरतुदींमागे आम्हाला त्याचे प्रेम, सूज्ञान, व सामर्थ्य दिसते. (प्रे. कृत्ये १४:१५-१७; पडताळा लूक २२:१९.) आमचा उद्योगीपणा आम्हाला समृद्धी देईल. पण आम्ही कष्ट करून देखील केवळ पुरेसेच आपल्या पदरी आले तरीही आपण कृतज्ञ व समाधानी राहू. (फिलिप्पैकर ४:१२; १ तीमथ्य ६:६-८) खरे म्हणजे, साधारण मिळकतीचा व पेहरावाचा भक्तीमान माणूस भौतिकदृष्ट्या सधन असणाऱ्या माणसापेक्षा अधिक संतुष्ट असू शकतो. यास्तव, आमच्या आटोक्याबाहेरील परिस्थितीमुळे जरी आम्हापाशी कमी असेल तरी आम्ही निराश होता कामा नये. आम्हाला आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध होता येईल. खरेच, आम्ही यहोवासंबंधाने विश्वास, आशा व प्रीती दाखवण्यात कधीही दरिद्री होऊ नये. त्यालाच आम्ही अंतःकरणपूर्वक प्रार्थनेद्वारे आपली स्तुती व उपकार सांगू या.
आमची ऋणे सोडणे
१४. आम्ही कोणत्या ऋणांसाठी क्षमा मागत असतो व देव यासाठी कशाचा अवलंब करतो?
१४ “जसे आम्ही आपल्या ऋण्यांस ऋण सोडले आहे, तशी तू आमची ऋणे आम्हास सोड.” (मत्तय ६:१२) लूकचा अहवाल ही ऋणे, पापे असल्याचे सांगतो. (लूक ११:४) आम्हाठायी वारशाने पाप वसत असल्यामुळे आमच्या पित्याच्या पूर्ण इच्छेनुरुप आम्हाला सर्व गोष्टी करण्यापासून परावृत्त केले जाते. यामुळे आमचे हे उणेपण आमची ऋणे किंवा आम्ही ‘आत्म्याच्या प्रेरणेने जगू व वागू लागल्या’पासून देवाला द्यावी लागणारी कर्तव्ये आहेत. (गलतीकर ५:१६-२५; पडताळा रोमकर ७:२१-२५.) आम्ही अपूर्ण असल्यामुळे तसेच देवाच्या दर्जांनुरुप पूर्णपणे भरत नसल्यामुळे आम्हावर ही ऋणे आहेत. या पापांची क्षमा मिळण्यासाठी आम्हाला ही प्रार्थना म्हणण्याचा हक्क आहे. ही ऋणे किंवा पापे याविषयीच देव येशूच्या खंडणी यज्ञार्पणाचे मोल लागू करू शकतो ही आनंदाची गोष्ट आहे.—रोमकर ५:८; ६:२३.
१५. आवश्यक असणाऱ्या शिस्तीसंबंधाने आमचा दृष्टीकोण कसा असावा?
१५ देवाने आमची ऋणे आम्हाला सोडावी किंवा आमच्या पापांची क्षमा करावी असे आम्हाला वाटते तर आम्ही पश्चाताप करण्याची व शिस्त स्वीकारण्याची तयारी दाखवली पाहिजे. (नीतीसूत्रे २८:१३; प्रे. कृत्ये ३:१९) यहोवाचे आम्हावर प्रेम आहे म्हणून तो आम्हाला व्यक्तीशः सुधारणा देत असतो की ज्यायोगे आम्ही आमचा अशक्तपणा सुधरावा. (नीतीसूत्रे ६:२३; इब्रीयांस १२:४-६) आमची विश्वास व ज्ञानात वृद्धी झाल्यावर आमची अंतःकरणे देवाचे कायदे व तत्त्वे यांना रसिकता दाखविण्यासाठी कृतज्ञतेने ओतप्रोत भरली आहेत असे दिसते तेव्हा आम्ही स्वेच्छेने पाप करण्याचे धाडस होऊ देणार नाही हेही आनंदाचे आहे. पण तेच आमच्या चुकीत काही हेतुपुरस्सरता आम्हास दिसली तर काय? तर आम्हाला मोठ्या यातना व्हाव्या व यांची क्षमा होण्यासाठी कळकळीने प्रार्थना करावी. (इब्रीयांस १०:२६-३१) आपल्याला प्राप्त झालेल्या सूचनेचा अवलंब करून आपले मार्गाक्रमण त्वरेने सुधरविले पाहिजे.
१६. आमच्या पापांची क्षमा मिळावी म्हणून देवाकडे प्रार्थना करीत राहणे हे का लाभदायक आहे?
१६ आपल्या पापांची क्षमा मागण्यासाठी देवाजवळ नियमितपणे प्रार्थना करणे हे लाभदायक आहे. यामुळे आमची पापीष्ठ स्थिती आम्हासमोर नित्य राहते व यामुळे आम्हावर नेहमी विनयशील परिणाम होण्यास हवा. (स्तोत्रसंहिता ५१:३, ४, ७) आमच्या स्वर्गीय पित्याने “आपल्या पापांची क्षमा [करणे] व आपल्याला सर्व अधर्मापासून शुद्ध” करणे आवश्यक आहे. (१ योहान १:८, ९) यासाठीच आमच्या पापांचा प्रार्थनेत उल्लेख करणे हे आम्हाला त्यांच्याविरुद्ध निकराची लढत देण्याची मदत करते. याद्वारे आम्हाला खंडणीची तसेच येशूने ओतलेल्या रक्ताच्या मोलाची केवढी नित्याची गरज आहे त्याचे स्मरण मिळते.—१ योहान २:१, २; प्रकटीकरण ७:९, १४.
१७. क्षमेसाठी करण्यात येणारी प्रार्थना ही आमच्या इतरांसोबतच्या नातेसंबंधाविषयी कसे साहाय्य देते?
१७ क्षमा मिळावी म्हणून प्रार्थना करणे हे आम्हाला लहान किंवा मोठ्या गोष्टीत ऋणी असणाऱ्या लोकांच्या बाबतीत दयाळू, सहानभूतियुक्त व उदारशील असण्याची मदत देते. लूकचा अहवाल सांगतोः “आमच्या पापांची क्षमा कर, कारण आम्ही प्रत्येक ऋण्याला क्षमा करतो.” (लूक ११:४) खरे म्हणजे, आम्ही “आपल्या ऋण्यांस [आम्हाविरुद्ध पाप करणाऱ्यांस] ऋण सोडले आहे” तरच देवाकडून आम्हाला क्षमा मिळू शकेल. (मत्तय ६:१२; मार्क ११:२५) येशूने पुढे म्हटलेः “जर तुम्ही मनुष्यांच्या अपराधांची क्षमा करता तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हास क्षमा करील; परंतु जर तुम्ही मनुष्यांच्या अपराधांची क्षमा करीत नाही, तर तुमचा पिता तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही.” (मत्तय ६:१४, १५) आमच्या पापांची क्षमा मिळविण्यासाठी प्रार्थना करणे याने आम्हाला इतरांचे सहन करण्यास व त्यांची क्षमा करण्यास पुढे सारले पाहिजे. प्रेषित पौलाने लिहिलेः “यहोवाने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही [इतरांना] करा.”—कलस्सैकर ३:१३; इफिसकर ४:३२.
मोहपाश व तो दुष्ट
१८. आम्हावर येणारे मोहपाश व परीक्षा यांजसाठी आम्ही देवाला का दोष देऊ नये?
१८ “आम्हास परिक्षेत आणू नकोस.” (मत्तय ६:१३; लूक ११:४) या शब्दांचा, यहोवा आम्हास परिक्षेत घालतो असा अर्थ नाही. शास्त्रवचने देवाविषयी, तो काही करण्याबद्दल वा घडू देण्याबद्दल सांगतात, पण हे केवळ त्याच्या अनुमतीने होत असते. (रुथ १:२०, २१; पडताळा उपदेशक ११:५.) वस्तुतः “देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहात पाडीत नाही,” असे शिष्य याकोबने लिहिले. (याकोब १:१३) यासाठी मोहपाश तसेच वाईट गोष्टींची परीक्षा यासाठी आपण देवाला दोष देऊ नये, कारण सैतान हा प्रत्यक्षात मोह घालणारा आहे; आम्ही देवाविरुद्ध पाप करावे यासाठी तो हे करीत असतो.—मत्तय ४:३; १ थेस्सलनीकाकर ३:५.
१९. मोहपाशासंबंधाने आम्हाला कशी प्रार्थना करता येईल?
१९ “आम्हास परिक्षेत आणू नकोस,” अशी प्रार्थना करण्याद्वारे, आम्ही यहोवाला, आम्हावर मोहपाश ओढवला किंवा त्याची आज्ञा मोडण्याचा दबाव आला तर पराजित होऊ नये म्हणून मदत देण्याची विनंती करीत असतो. आमच्या स्वर्गीय पित्याने आमची पावले योग्य मार्गाने निरवावी याकरता त्याची विनवणी आम्ही करू शकतो, म्हणजे आम्हापुढे येणारे मोहपाश हे आम्हासाठी सहन करण्यास कठीण असणार नाहीत. याबद्दल पौलाने लिहिलेः “मनुष्यास सहन होते तिच्याशिवाय दुसरी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही; आणि देव विश्वासपात्र आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलिकडे होऊ देणार नाही, तर परिक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपाय करील असे की, तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हावे.” (१ करिंथकर १०:१३) यहोवाने आमचे मार्गदर्शन करावे यासाठी आम्ही प्रार्थना करू शकतो, म्हणजे आम्हास सहन होते त्यापलिकडे आम्हावर परीक्षा बेतणार नाही, आणि आम्ही हताश होतो तेव्हा तो सुटकेचा मार्ग आम्हास देऊ शकेल. मोहपाश हे दियाबल, आमचे पापीष्ठ शरीर, व इतरांच्या उणीवा याद्वारे येतात, पण आमचा स्वर्गीय पिता आम्हाला मार्गदर्शन देऊ शकतो की ज्याद्वारे आम्ही गर्भगळीत होऊ शकणार नाही.
२०. “त्या दुष्टापासून” सुटका मिळण्यासाठी प्रार्थना का करावी?
२० “तर आम्हास त्या दुष्टापासून सोडीव.” (मत्तय ६:१३, न्यू.व.) सैतान या “दुष्टाला” आम्हावर मात करण्यापासून देव निश्चितपणे रोखू शकतो. (२ पेत्र २:९) शिवाय, दियाबलापासून सुटका मिळविण्याची पूर्वी नव्हती इतकी निकडीची वेळ सध्या आहे, कारण ‘आपला काळ थोडा आहे असे समजून तो अतिशय संतप्त’ झालेला आहे. (प्रकटीकरण १२:१२) आम्ही सैतानाच्या कुयुक्त्यांविषयी अजाण नाही, पण तो देखील आमच्या अशक्तपणाविषयी अजाण नाही. यासाठीच, त्या सिंहासारख्या शत्रूच्या पंजातून आम्हास दूर राखावे याकरता आम्ही यहोवाला प्रार्थना करण्याची जरुरी आहे. (२ करिंथकर २:११; १ पेत्र ५:८, ९; पडताळा स्तोत्रसंहिता १४१:८, ९.) याचे उदाहरण द्यायचे झाल्यास, आम्ही विवाहबद्ध होण्याची इच्छा करीत आहोत असे समजू. अशावेळी आम्ही यहोवाला प्रार्थना करू शकू की, त्याने आम्हास सैतानाच्या कुयुक्त्या तसेच मोहपाश यापासून दूर राखावे; म्हणजे आम्ही जगीक संबंध राखणार नाही, ज्यामुळे अनैतिकता आचरली जाण्याचा किंवा खऱ्या विश्वासात नसलेल्या कोणाशी विवाहबद्ध होण्याचा संभव असतो. (अनुवाद ७:३, ४; १ करिंथकर ७:३९) आम्हाला संपत्तीविषयी लालसा वाटते का? तर प्रार्थना ही आम्हाला जुगार खेळण्याचा किंवा अफरातफरी करण्याचा मोह आवरण्यासाठी जरुरीची ठरेल. आमचे यहोवासोबत असलेले नाते नष्ट करावे यासाठी सैतान स्वतःजवळ असणाऱ्या मोहपाशाच्या युक्त्यांपैकी कोणत्याही अस्राचा वापर करील. यासाठीच आम्ही आमच्या स्वर्गीय पित्याला नित्य प्रार्थना करू या. तो धार्मिकांना कधीही मोहपाशाच्या आहारी सोडून देत नाही आणि त्या दुष्टापासून मुक्तता मिळवून देत असतो.
प्रार्थना विश्वास व आशा वाढवते
२१. देवाच्या राज्यासाठी प्रार्थना करण्यामुळे आमचा कसा फायदा झाला?
२१ आमची दुष्टापासून सुटका करणारा आमचा स्वर्गीय पिता याला आम्हास विपुल आशीर्वाद देण्यात आनंद वाटतो. मग, त्याने आपल्या प्रिय लोकांना इतक्या काळ “तुझे राज्य येवो,” ही प्रार्थना का म्हणायला लावली आहे बरे? इतक्या काळ आम्ही ही प्रार्थना म्हणण्याद्वारे आमची त्या राज्याविषयीची इच्छा व रसिकता वाढीस लावली आहे. अशी ही प्रार्थना या परोपकारी स्वर्गीय राज्याची किती गरज आहे त्याचे स्मरण आम्हाला देते. ती आम्हापुढे देवाच्या राजवटीखालील जीवनाची आशा ठेवते.—प्रकटीकरण २१:१-५.
२२. आमचा स्वर्गीय पिता यहोवा याला प्रार्थना करण्यासंबंधाने आमची मनोवृत्ती सतत कशी असली पाहिजे?
२२ प्रार्थना यहोवावरील आमचा विश्वास निश्चये वाढविते. तो आमच्या प्रार्थनांचे उत्तर देतो तेव्हा आमचे नाते अधिक बळकट होते. यासाठीच, आम्ही त्याची स्तुती, उपकारस्मरण व त्याजपुढे विनंत्या दर दिवशी सादर करण्यामध्ये कधीही कंटाळा करू नये. येशूच्या शिष्यांनी त्याला जी विनंती केली होती की, “प्रभुजी . . . आम्हास प्रार्थना करावयास शिकवा,” त्यासंबंधाने ही जी माहिती त्याने पुरविली त्याबद्दल आम्ही येशूचे ऋणी राहू.
तुम्हाला आठवते का?
◻ एक प्रार्थनाशील मनुष्य या नात्याने आपण येशूचे वक्तव्य व त्याचे उदाहरण याबद्दल कोणते धडे शिकू शकतो?
◻ आम्ही आमचा स्वर्गीय पिता व त्याचे नाम याविषयी काय प्रार्थना केली पाहिजे?
◻ देवाचे राज्य येवो व त्याच्या इच्छेप्रमाणे या पृथ्वीवर होवो अशी प्रार्थना म्हणताना आपण कशाविषयी विनंती करीत असतो?
◻ आमच्या रोजच्या भाकरीसाठी प्रार्थना करताना आम्ही कशाची विचारणा करीत असतो?
◻ आमच्या ऋणांची क्षमा मागण्याविषयी प्रार्थना करताना त्याचा काय अर्थ होतो?
◻ मोहपाश तसेच तो दुष्ट सैतान यापासूनच्या मुक्ततेविषयी प्रार्थना करणे का महत्त्वाचे आहे?
[१७ पानांवरील चित्रं]
येशूच्या अनुयायांनी त्याला प्रार्थना कशी करावी ते शिकवावे अशी विनंती केली. त्याने प्रार्थनेसंबंधाने ज्या सूचना दिल्या त्याकडून कसा फायदा आम्ही मिळवू शकतो ते तुम्हाला माहीत आहे का?