अध्याय ५
जगात राहूनही आपले वेगळेपण कसे टिकवता येईल?
“तुम्ही जगाचे नाही.”—योहान १५:१९.
१. येशूने त्याच्या पृथ्वीवरील शेवटल्या रात्री कोणत्या गोष्टीवर जास्त जोर दिला?
येशूला पृथ्वीवरील त्याच्या शेवटल्या रात्री आपल्या अनुयायांची खूप काळजी वाटत होती. याविषयी त्याने आपल्या स्वर्गीय पित्याला प्रार्थना देखील केली. त्याने म्हटले: “तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी विनंती मी करीत नाही, तर तू त्यांना वाइटापासून राखावे अशी विनंती करितो. जसा मी जगाचा नाही तसे तेहि जगाचे नाहीत.” (योहान १७:१५, १६) येशूने केलेल्या या कळकळीच्या प्रार्थनेतून त्याला आपल्या अनुयायांबद्दल वाटत असलेले प्रेम दिसून येते. शिवाय, “तुम्ही जगाचे नाही,” असे जे त्याने आदल्या रात्री त्यांच्यापैकी काहींना सांगितले त्यातून त्याचे बोलणे किती महत्त्वाचे होते हेही दिसून येते. (योहान १५:१९) आपल्या अनुयायांनी जगापासून वेगळे राहिले पाहिजे, ही गोष्ट येशूला अतिशय महत्त्वाची वाटत होती.
२. येशूने उल्लेखलेला ‘जग’ हा शब्द कशास सूचित करतो?
२ येशूने उल्लेखलेला ‘जग’ हा शब्द, देवापासून दूर झालेल्या, सैतानाचे शासन असलेल्या व त्याच्यामुळे निर्माण होणाऱ्या स्वार्थी, घमेंडी प्रवृत्तीच्या आहारी गेलेल्या सर्व मानवजातीला सूचित करतो. (योहान १४:३०; इफिसकर २:२; १ योहान ५:१९) होय, “जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे.” (याकोब ४:४) परंतु, देवाच्या प्रेमात टिकून राहू इच्छिणारे, जगात राहूनही आपले वेगळेपण कसे टिकवून ठेवू शकतात? पाच मार्गांनी ते असे करू शकतात: (१) देवाच्या राज्याशी एकनिष्ठ राहण्याद्वारे व जगाच्या राजकारणाच्या बाबतीत तटस्थ राहण्याद्वारे, (२) जगाच्या आत्म्याचा विरोध करण्याद्वारे, (३) आपली वेशभूषा व केशभूषा सभ्य ठेवण्याद्वारे, (४) जीवनशैली साधी ठेवण्याद्वारे, (५) आपली आध्यात्मिक शस्त्रसामग्री धारण करण्याद्वारे. या पाच मार्गांची आता आपण चर्चा करूया.
एकनिष्ठ व तटस्थ राहा
३. (क) येशूचा त्याच्या दिवसातील राजकारणाविषयी काय दृष्टिकोन होता? (ख) येशूचे अभिषिक्त अनुयायी राजदूत आहेत असे का म्हणता येईल? (तळटीप पाहा.)
३ येशूने त्याच्या दिवसांतील राजकारणात भाग घेण्याऐवजी त्याने, तो ज्या स्वर्गीय सरकाराचा भावी राजा बनणार होता त्या देवाच्या राज्याचा जोमाने प्रचार केला. (दानीएल ७:१३, १४; लूक ४:४३; १७:२०, २१) म्हणूनच रोमी राज्यपाल पंतय पिलात याच्यासमोर उभा असताना तो म्हणू शकला, की “माझे राज्य ह्या जगाचे नाही.” (योहान १८:३६) येशूचे विश्वासू अनुयायी, जगाला राज्याचा प्रचार करण्याद्वारे येशू आणि त्याचे राज्य यांना आपली एकनिष्ठा दाखवून त्याचे अनुकरण करतात. (मत्तय २४:१४) प्रेषित पौलाने असे लिहिले: “आम्ही ख्रिस्ताचे राजदूत आहोत, जणू काय देव आमच्याद्वारे त्याचे आव्हान करीत होता. ख्रिस्ताच्या वतीने आम्ही तुम्हाला विनंती करतो. देवाशी समेट करा.”a—२ करिंथकर ५:२०, ईजी टू रीड व्हर्शन.
४. सर्व खरे ख्रिस्ती देवाच्या राज्याला आपली एकनिष्ठा कशी दाखवतात? (आरंभीचे ख्रिस्ती तटस्थ होते हा चौकोन पाहा.)
४ राजदूत हे परदेशात आपल्या सरकारचे प्रतिनिधीत्व करणारे पदाधिकारी असतात. त्यामुळे, ते ज्या देशात राहतात तिथल्या कारभारात लुडबुड करत नाहीत. त्यांची तटस्थ भूमिका असते. पण ते ज्या देशाचे प्रतिनिधीत्व करतात त्या देशाची वकिली मात्र करतात. ‘स्वर्गाचे नागरिकत्व’ मिळालेल्या ख्रिस्ताच्या अभिषिक्त अनुयायांच्याबाबतीतही असेच आहे. (फिलिप्पैकर ३:२०) देवाच्या राज्याचा आवेशाने प्रचार करून त्यांनी ख्रिस्ताच्या कोट्यवधी ‘दुसऱ्या मेंढरांना’ “देवाशी समेट” करण्यास मदत केली आहे. (योहान १०:१६; मत्तय २५:३१-४०) ही दुसरी मेंढरे येशूच्या अभिषिक्त बांधवांना या प्रचार कार्यात पाठिंबा देतात. मशीही राज्याची ऐक्याने वकिली करणारे हे दोन्ही गट जगाच्या राजकारणात अगदी तटस्थ राहतात.—यशया २:२-४.
५. प्राचीन काळातील देवाचे लोक आणि आज देवाची उपासना करणारे लोक यांच्यात काय फरक आहे व हा फरक का दिसतो?
५ ख्रिस्ताशी एकनिष्ठ असल्यामुळेच खरे ख्रिस्ती तटस्थ राहत नाहीत तर आणखी एका कारणामुळे ते तटस्थ राहतात. प्राचीन काळात देवाचे लोक एकाच राष्ट्रात अर्थात इस्राएलमध्ये राहत होते. परंतु आज देवाची उपासना करणारे लोक संपूर्ण जगभरात आहेत. (मत्तय २८:१९; १ पेत्र २:९) आपण कोणत्याही राजकीय पक्षाची बाजू घेतल्यास, देवाचे राज्य मानवजातीच्या सर्व समस्यांवर एकमात्र उपाय आहे असे पूर्ण मनाने सांगू शकणार नाही आणि ख्रिस्ती ऐक्यानेही राहू शकणार नाही. (१ करिंथकर १:१०) शिवाय, युद्धात आपण आपल्याच बांधवांविरुद्ध लढू. परंतु आपल्याला तर त्यांच्यावर प्रेम करण्याची आज्ञा देण्यात आली आहे. (योहान १३:३४, ३५; १ योहान ३:१०-१२) म्हणूनच तर येशूने आपल्या शिष्यांना युद्धात भाग घेऊ नका असे सांगितले. इतकेच नव्हे तर त्याने आपल्या शत्रूंवरही प्रेम करा, असे सांगितले.—मत्तय ५:४४; २६:५२; तसेच, “मी तटस्थ आहे का?” असे शीर्षक असलेला चौकोन पाहा.
६. देवाला तुम्ही केलेल्या समर्पणाचा सरकारी अधिकाऱ्यांशी असलेल्या तुमच्या नातेसंबंधावर कसा प्रभाव पडतो?
६ आपण खऱ्या ख्रिश्चनांनी, एखाद्या मानवाला, मानवीय संघटनेला किंवा राष्ट्राला नव्हे तर देवाला आपले जीवन समर्पित केले आहे. पहिले करिंथकर ६:१९, २० म्हणते: “तुम्ही स्वतःचे मालक नाही; कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहा.” यास्तव, येशूचे अनुयायी सरकारी अधिकाऱ्यांचा आदर करतात, कर भरतात व सापेक्ष आज्ञाधारकता दाखवतात आणि “देवाचे ते देवाला” देतात. (मार्क १२:१७; रोमकर १३:१-७) यामध्ये, त्यांची उपासना, पूर्ण मनापासूनचे त्यांचे प्रेम आणि त्यांची एकनिष्ठ आज्ञाधारकता यांचा समावेश होतो. वेळ प्रसंगी, ते देवासाठी आपला प्राणही अर्पण करायला तयार असतात.—लूक ४:८; १०:२७; प्रेषितांची कृत्ये ५:२९; रोमकर १४:८.
‘जगाच्या आत्म्याचा’ विरोध करा
७, ८. “जगाचा आत्मा” म्हणजे काय व हा आत्मा एखाद्यामध्ये कसा “कार्य” करतो?
७ ख्रिस्ती जन आणखी एका मार्गाने, जगात राहून आपले वेगळेपण जपतात. ते या जगाच्या दुष्ट प्रवृत्तीचा विरोध करतात. प्रेषित पौलाने लिहिले: “आपल्याला जगाचा आत्मा नव्हे, तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे.” (१ करिंथकर २:१२) आणि इफिसकरांना त्याने असे लिहिले: “त्या पातकांमध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, अर्थात ह्या जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षातील राज्याचा अधिपति म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकांत आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपति ह्याच्या धोरणाप्रमाणे चालत होता.”—इफिसकर २:२, ३.
८ या जगाचा “आत्मा” म्हणजे अदृश्य, कार्य करायला भाग पाडणारी प्रवृत्ती जी एखाद्याला देवाविरुद्ध बंड करण्यास चेतवते व “देहाची वासना, डोळ्यांची वासना” उत्पन्न करते. (१ योहान २:१६; १ तीमथ्य ६:९, १०) या जगाच्या आत्म्याचा अधिकार किंवा प्रवृत्ती पापी शरीराला आकर्षित करते. ती एखाद्याला भुरळ पाडण्याचा सतत प्रयत्न करते. ही प्रवृत्ती सर्वत्र दिसून येते. शिवाय ती एखाद्यामध्ये स्वार्थ, घमेंड, लोभी आकांक्षा, स्वतःचेच नैतिक स्तर ठरवण्याची आणि अधिकार पदावर असलेल्यांविरुद्ध बंड करण्याची वृत्ती हळूहळू वाढण्याद्वारे “कार्य” करते.b थोडक्यात, या जगाचा आत्मा अगदी बेमालूमपणे लोकांच्या हृदयात दियाबलासारखे गुण वाढवतो.—योहान ८:४४; प्रेषितांची कृत्ये १३:१०; १ योहान ३:८, १०.
९. जगाची प्रवृत्ती आपल्या मनात व हृदयात कोणकोणत्या मार्गांनी शिरकाव करू शकते?
९ जगाची ही प्रवृत्ती तुमच्याही मनात व हृदयात मुळावू शकते का? तुम्ही जर सतर्क राहिला नाहीत तर मुळावू शकते. (नीतिसूत्रे ४:२३) वरवर चांगल्या वाटणाऱ्या परंतु यहोवाबद्दल प्रेम नसलेल्या लोकांबरोबर मैत्री केल्यास या प्रवृत्तीचा आपल्यावर नकळत प्रभाव पडू शकतो. (नीतिसूत्रे १३:२०; १ करिंथकर १५:३३) आक्षेपार्ह साहित्य, इंटरनेटवरील अश्लील किंवा धर्मत्यागी संकेतस्थळे, अपायकारक मनोरंजन आणि अतिशय आक्रमक व स्पर्धात्मक वृत्तीचे खेळ यांद्वारे किंवा सैतान व त्याच्या जगाच्या विचारसरणीस बढावा देणाऱ्या कोणत्याही माध्यमाकडून तुमच्यात ही दुष्ट प्रवृत्ती येऊ शकते.
१०. आपण जगाच्या घातक प्रवृत्तीचा विरोध कसा करू शकतो?
१० या जगाच्या घातक प्रवृत्तीचा विरोध करून आपण स्वतःला देवाच्या प्रीतीमध्ये कसे राखू शकतो? यहोवाने केलेल्या आध्यात्मिक तरतूदींचा पूर्ण फायदा घेण्याद्वारे व पवित्र आत्म्यासाठी सतत प्रार्थना करण्याद्वारे आपण असे करू शकतो. सैतान किंवा त्याच्या प्रभावाखाली असलेल्या या दुष्ट जगापेक्षा यहोवा कैक पटीने महान आहे. (याकोब ४:७) यास्तव, प्रार्थनेद्वारे यहोवाच्या समीप राहणे खरोखरच किती महत्त्वाचे आहे, नाही का?
आपली वेशभूषा व केशभूषा सभ्य ठेवा
११. आपल्यावर जगाच्या आत्म्याचा प्रभाव झाला आहे हे आपल्या कपड्यांवरून कसे दिसून येते?
११ एखाद्यावर जगाच्या आत्म्याचा प्रभाव झाला आहे किंवा नाही हे त्याच्या पेहराव्यावरून, त्याच्या केशभूषेवरून व स्वच्छतेच्या सवयींवरून दिसून येते. अनेक देशांत लोकांची कपडे घालण्याची पद्धत अगदी खालच्या स्तराला पोहचली आहे. एका टीव्ही निवेदकाने याबाबत असे म्हटले, की जर सर्वसामान्य मुली वेश्यांसारखा उत्तेजक पोषाख घालू लागल्या तर, त्यांच्यातील आणि वेश्यांतील फरक आपण सांगू शकणार नाही. कोवळ्या वयात असलेल्या मुलींवरही हा प्रभाव दिसून येतो. “अंग प्रदर्शन जास्त, सभ्यता कमी” हे आजचे ब्रीदवाक्य बनले आहे, असे एका बातमीपत्रात म्हटले होते. या जगाची बंडखोर मनोवृत्ती दाखवण्याची आणखी एक पद्धत आहे गबाळे कपडे घालणे. यावरून त्या व्यक्तीला स्वतःचा आदर आहे किंवा तिला स्वाभिमान आहे असे वाटत नाही.
१२, १३. केश व वेशभूषा करताना आपण कोणती तत्त्वे विचारात घेतली पाहिजेत?
१२ यहोवाचे सेवक असल्यामुळे आपण स्वच्छ, नीटनेटके, साजेसे आणि प्रसंगाला शोभतील असे कपडे घालतो. आपल्या पेहराव्यावरून नेहमी, ‘भिडस्तपणा व मर्यादा’ तसेच “देवभक्ती स्वीकारलेल्या” स्त्री व पुरुषाला शोभेल अशी ‘सत्कृत्येही’ दिसून आली पाहिजेत. अर्थात लोकांचे लक्ष आकर्षित करण्याचा आपला मुख्य हेतू नाही तर स्वतःला ‘देवाच्या प्रीतिमध्ये राखणे’ हा आहे. (१ तीमथ्य २:९, १०; यहूदा २१) ‘देवाच्या दृष्टीने बहुमूल्य असलेले अंतःकरणातील गुप्त मनुष्यपण’ हा सर्वात देखणा साजशृंगार आपण करू इच्छितो.—१ पेत्र ३:३, ४.
१३ आपल्या पेहराव्याचा, खऱ्या उपासनेबद्दल लोकांच्या दृष्टिकोनावरही परिणाम होऊ शकतो, ही गोष्ट आपण विसरता कामा नये. ‘भिडस्तपणा’ असे भाषांतरीत करण्यात आलेला ग्रीक शब्द, नैतिक अर्थाने वापरला जातो तेव्हा त्यातून, पूज्यभाव, भीतीयुक्त आदर, इतरांच्या भावनांचा किंवा मतांचा आदर, असा अर्थ निघतो. यास्तव, आपल्या आवडीनुसार पेहराव करण्याचा आपल्याला हक्क आहे असा विचार करण्याआधी आपण इतरांच्या विवेकाचा विचार करू इच्छितो. आणि याहूनही महत्त्वाचे म्हणजे, आपण यहोवा व त्याच्या लोकांचा आदर करू इच्छितो तसेच आपण जे काही करतो ते “सर्व देवाच्या गौरवासाठी” करून स्वतःला देवाचे सेवक म्हणवतो.—१ करिंथकर ४:९; १०:३१; २ करिंथकर ६:३, ४; ७:१.
माझ्या पेहराव्यामुळे यहोवाचा आदर होतो का?
१४. आपला पेहराव व स्वच्छता याविषयी आपण स्वतःला कोणते प्रश्न विचारले पाहिजेत?
१४ आपण क्षेत्र सेवेला किंवा ख्रिस्ती सभेला जातो तेव्हा विशेषकरून आपला पेहराव स्वच्छ असला पाहिजे. स्वतःला विचारा: ‘लोकांचे लक्ष वेधले जाईल अशा प्रकारचा माझा अवतार असतो का? मला पाहून इतरांनाच लाज वाटते का? याबाबतीत मी, मंडळीतील विशेषाधिकार मिळण्याच्या पात्रतेपेक्षा माझ्या हक्कांना जास्त महत्त्व देतो का?’—फिलिप्पैकर ४:५; १ पेत्र ५:६.
१५. पेहराव, केशभूषा व स्वच्छतेच्या सवयी याविषयी बायबलमध्ये कोणतीही नियमावली का देण्यात आलेली नाही?
१५ आपला पेहराव, केशभूषा व स्वच्छतेच्या सवयी याविषयी बायबलमध्ये कोणतीही नियमावली देण्यात आलेली नाही. यहोवा आपल्याकडून निवड करण्याचे आणि आपल्या विचार क्षमतेचा वापर करण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ इच्छित नाही. उलट आपण बायबल तत्त्वांच्या आधारावर तर्क करणारे व आपल्या “ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव” करणारे प्रौढ ख्रिस्ती बनावे अशी त्याची इच्छा आहे. (इब्री लोकांस ५:१४) आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण देवावर आणि शेजाऱ्यावर प्रेम करावे असे तो इच्छितो. (मार्क १२:३०, ३१) या चौकटीत राहूनसुद्धा आपल्याला तऱ्हेतऱ्हेचा पोशाष घालण्यास व केशभूषा करण्यास वाव आहे. म्हणून यहोवाचे लोक मग ते पृथ्वीच्या पाठीवर कोठेही असोत, एकत्र जमतात तेव्हा आपण त्यांना रंगीबेरंगी कपडे परिधान केलेले व आनंदी असलेले पाहतो.
जीवनशैली साधी ठेवा
१६. जगाचा आत्मा आणि येशूने दिलेली शिकवण यांत कोणता विरोधाभास आहे व आपण स्वतःला कोणते प्रश्न विचारले पाहिजेत?
१६ जगाचा आत्मा अतिशय फसवा आहे. पैसा आणि चैनीच्या वस्तूंमुळेच आपण आनंदी होऊ शकतो, असा विचार तो आपल्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करतो. परंतु येशूने म्हटले: “कोणाजवळ पुष्कळ संपत्ति असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही.” (लूक १२:१५) येशू येथे असे म्हणत नव्हता, की आपण वैराग्यासारखे स्वत्यागाचे जीवन जगावे. तर त्याच्या म्हणण्याचा असा अर्थ होता, की ज्या लोकांना आपल्या “आध्यात्मिक गरजांची जाणीव” आहे व ज्यांची जीवनशैली साधी आहे त्यांनाच जीवन आणि खरा आनंद मिळते. (मत्तय ५:३; ६:२२, २३, NW ) आता स्वतःला विचारा: ‘येशूने जे म्हटले ते मी खरोखरच मानतो का? की जो “लबाडीचा बाप” आहे त्याच्या विचारसरणीचा माझ्यावर परिणाम झाला आहे? (योहान ८:४४) माझे बोलणे, माझी ध्येये, जीवनात मी कोणत्या गोष्टींना प्राधान्य देतो, माझी जीवनपद्धत यावरून काय दिसून येते?’—लूक ६:४५; २१:३४-३६; २ योहान ६.
१७. जीवनशैली साधी ठेवणाऱ्यांना कोणते काही लाभ होतात ते सांगा.
१७ “ज्ञान आपल्या कृत्याच्या योगे न्यायी ठरते,” असे येशूने म्हटले. (मत्तय ११:१९) एकाग्र दृष्टी ठेवणाऱ्यांना मिळणाऱ्या काही लाभांचा आपण आता विचार करू या. राज्य सेवेत भाग घेतल्यामुळे त्यांना खरा तजेला मिळतो. (मत्तय ११:२९, ३०) विनाकारण चिंता करत न बसल्यामुळे ते मानसिक व भावनिक ताणतणाव टाळतात. (१ तीमथ्य ६:९, १०) त्यांच्याजवळ जे काही आहे त्यात समाधानी असल्यामुळे ते आपल्या कुटुंबाबरोबर व ख्रिस्ती मित्रांबरोबर भरपूर वेळ घालवू शकतात. यामुळे त्यांना रात्रीची शांत व गोड झोप लागते. (उपदेशक ५:१२) आपल्याजवळ जे काही आहे ते इतरांना देत असल्यामुळे त्यांना आनंद मिळतो. (प्रेषितांची कृत्ये २०:३५) त्यांच्याजवळ “विपुल आशा” असते, त्यांना आंतरिक शांती व समाधान मिळते. (रोमकर १५:१३; मत्तय ६:३१, ३२) हे लाभ खरोखरच अमूल्य आहेत!
“संपूर्ण शस्त्रसामग्री घ्या”
१८. बायबलमध्ये आपल्या शत्रूचे, तो वापरत असलेल्या पद्धतींचे आणि आपल्याला कराव्या लागणाऱ्या झटापटीचे वर्णन कसे करण्यात आले आहे?
१८ जे स्वतःला देवाच्या प्रेमात टिकवून ठेवतात त्यांना देवाची सेवा करण्यास अडवणाऱ्या सैतानापासून संरक्षण मिळते. सैतान आपल्याला केवळ आनंदापासूनच नव्हे तर सार्वकालिक जीवनापासूनही वंचित ठेवू इच्छितो. (१ पेत्र ५:८) पौलाने म्हटले: “आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे.” (इफिसकर ६:१२) येथे “झगडणे” असे भाषांतर करण्यात आलेल्या ग्रीक शब्दाचा अर्थ दोघांतील झटापट किंवा कुस्ती असा होतो. ही झटापट आपण लपूनछपून किंवा शत्रूंपासून सुरक्षित अंतर ठेऊन बंदुकींचा किंवा तोफगोळ्यांचा वापर करून करत नाही. शिवाय, “सत्तांबरोबर,” “अधिकाऱ्यांबरोबर,” “अधिपतींबरोबर” या शब्दांवरून असे सूचित होते, की दुरात्मे आपल्यावर करत असलेले हल्ले अतिशय नियोजित व जाणीवपूर्वक आहेत.
१९. ख्रिश्चनांसाठी देवाने पुरवलेल्या शस्त्रसामग्रीचे वर्णन करा.
१९ आपण दुबळे व कमकुवत असलो तरी विजयी होऊ शकतो. ते कसे? “देवाची संपूर्ण शस्त्रसामग्री” घेण्याद्वारे आपण विजयी होऊ शकतो. (इफिसकर ६:१३, पं.र.भा.) या शस्त्रसामग्रीत असलेल्या शस्त्रांचे वर्णन इफिसकर ६:१४-१८ मध्ये दिले आहे: “आपली कंबर सत्याने कसा, नीतिमत्वाचे उरस्त्राण धारण करा, शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा, आणि ह्या सर्वांबरोबरच जिच्या योगे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण तुम्हाला विझविता येतील, ती विश्वासाची ढाल हाती घ्या व उभे राहा. तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तरवार म्हणजे देवाचे वचन, ही घ्या, सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा.”
२०. सैनिकात व आपल्यात काय फरक आहे?
२० देवाकडून मिळालेली ही शस्त्रसामग्री आपण सतत धारण केली तर ती निश्चितच आपले संरक्षण करेल. सैनिक नेहमीच लढत नसतात. परंतु, ख्रिस्ती सैनिकांना अथकपणे लढावे लागते. देव जोपर्यंत या सैतानी जगाचा नाश करत नाही व सर्व दुष्टात्म्यांना अथांग डोहात टाकत नाही तोपर्यंत जीवन-मरणाच्या या लढाईत त्यांना लढावे लागेल. (प्रकटीकरण १२:१७; २०:१-३) यास्तव, तुमच्या एखाद्या कमतरतेविरुद्ध अथवा चुकीच्या इच्छांविरुद्ध झगडताना हार मानू नका. यहोवाशी विश्वासू राहण्याकरता आपल्या सर्वांनाच आपले शरीर ‘कुदलावे’ लागते. (१ करिंथकर ९:२७) खरे तर आपण झगडत नसलो तर ही चिंतेची बाब आहे!
२१. आपल्या आध्यात्मिक लढाईत आपण विजयी कसे ठरू शकतो?
२१ शिवाय, ही लढाई आपण स्वतःच्या बळावर जिंकू शकत नाही. म्हणून पौल आपल्याला “सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने” यहोवाला प्रार्थना करण्याची आठवण करून देतो. तसेच आपण यहोवाच्या वचनाचा अभ्यास करून त्याचे ऐकले पाहिजे व नेहमी आपल्या ‘सहसैनिकांसोबत’ सहवास राखला पाहिजे कारण या लढाईत आपण एकटेच नाही. (फिलेमोन १-३; इब्री लोकांस १०:२४, २५) या सर्व बाबतीत विश्वासू राहणारे विजयी ठरतीलच शिवाय जे त्यांच्या धार्मिक विश्वासांबाबत त्यांच्याशी वाद घालतात त्यांना ते चोख उत्तरही देतील.
आपल्या विश्वासाचे समर्थन करण्यास तयार राहा
२२, २३. (क) आपण सर्व वेळी आपल्या विश्वासाचे समर्थन करण्यास का तयार असले पाहिजे व आपण स्वतःला कोणते प्रश्न विचारले पाहिजेत? (ख) पुढील अध्यायाचा विषय काय आहे?
२२ येशूने म्हटले, की “तुम्ही जगाचे नाही. . . . म्हणून जग तुमचा द्वेष करिते.” (योहान १५:१९) यास्तव ख्रिश्चनांनी नेहमी आपल्या विश्वासाचे समर्थन करण्यास तयार असले पाहिजे. परंतु हे त्यांनी आदराने व सौम्यतेने केले पाहिजे. (१ पेत्र ३:१५) आपण स्वतःला विचारू शकतो: ‘यहोवाचे साक्षीदार काही वेळा प्रवाहाविरुद्ध म्हणजे जगमान्य विचारसरणीपेक्षा वेगळी भूमिका का घेतात, हे मला नीट समजले आहे का? अशी भूमिका घेताना, बायबल आणि विश्वासू दास सांगत असलेल्या गोष्टी शंभर टक्के बरोबर आहेत अशी माझी पूर्ण खात्री पटलेली आहे का? (मत्तय २४:४५; योहान १७:१७) शिवाय, यहोवाच्या नजरेत जे उचित आहे ते मी करतो तेव्हा, इतरांपेक्षा वेगळा दिसण्याची माझी तयारी आहे का, नव्हे इतरांपेक्षा मी वेगळा दिसतो म्हणून मला त्याचा अभिमान वाटतो का?’—स्तोत्र ३४:२; मत्तय १०:३२, ३३.
२३ परंतु बहुतेकदा, जगात राहूनही आपले वेगळेपण जपताना धूर्त मार्गांनी समोर येत असलेल्या अनेक परीक्षांना आपल्याला तोंड द्यावे लागते. जसे की, आधी उल्लेख केल्याप्रमाणे सैतान मनोरंजनाद्वारे यहोवाच्या लोकांना फसवण्याचा प्रयत्न करतो. पण मग आपण आपल्याला तजेला मिळेल व आपला विवेक शुद्ध राहील अशा प्रकारचे हितकारक मनोरंजन कसे निवडू शकतो? पुढील अध्यायाचा हाच विषय आहे.
a सा.यु. पेंटेकॉस्ट ३३ पासून ख्रिस्ताने, पृथ्वीवरील आपल्या अभिषिक्त अनुयायांच्या मंडळीवर राज्य सुरु केले आहे. (कलस्सैकर १:१३) १९१४ मध्ये त्याला ‘जगाच्या राज्यावर’ राज्य करण्याचा अधिकार देण्यात आला. त्यामुळे, अभिषिक्त ख्रिस्तीसुद्धा आता मशीही राज्याचे राजदूत आहेत.—प्रकटीकरण ११:१५.
c “झेंडा वंदन, मतदान व नागरी सेवा” असे शीर्षक असलेला परिशिष्टातील लेख पाहा.