जगाच्या आत्म्यामुळे तुम्हाला विषबाधा होत आहे का?
सप्टेंबर १२, १९९० रोजी कझाकस्तान कारखान्यात एक विस्फोट झाला. त्यावेळी वातावरणात धोकेदायक किरणांचे उत्सर्जन झाले आणि परिणामी स्थानिक १,२०,००० लोकांचे स्वास्थ्य धोक्यात आले होते, या प्राणघातक वायूच्या विरोधात अनेक लोकांनी रस्त्यांवर निदर्शने केली.
परंतु जसजशी अधिक माहिती उजेडात आली, तसतसे कळून आले, की ते त्या विषारी वातावरणात कित्येक दशकांपासून राहत आले होते. अनेक वर्षांपासून १,००,००० टन किरणोत्सर्गी टाकाऊ पदार्थ अरक्षित, खुल्या वातावरणात टाकण्यात आला होता. धोका उंबरठ्यावर होता तरी देखील त्यांच्यापैकी कोणीही त्याच्याकडे इतक्या गंभीरपणे पाहिले नव्हते. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष का केले?
प्रत्येक दिवशी स्थानिक स्पोर्ट स्टेडिअमवर अधिकाऱ्यांद्वारे किरणोत्सर्गाचे प्रमाण दर्शविण्यात येत असे, त्यावरील प्रमाणावरून असे वाटत होते, की त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही. त्या फलकावरील किरणोत्सर्गाचे प्रमाण अचूक होते, पण ते केवळ गॅमा किरणांच्या उत्सर्गाचे होते. अल्फा किरणांचे उत्सर्जन मोजण्यात आले नव्हते, आणि हे किरण तितकेच प्राणघातक असू शकतात. आपली मुले आजारी का पडत आहेत, हे अनेक मातांना आता समजू लागले.
आध्यात्मिक अर्थाने बोलताना, अदृश्य प्रदूषणामुळे आपल्याला देखील विषबाधा होऊ शकते. कझाकस्तानमधील दुर्दैवी लोकांप्रमाणे जीव धोक्यात घालणाऱ्या या धोक्याबद्दल लोकांना कल्पना नाही. या प्रदूषणाची ओळख बायबल “जगाचा आत्मा” अशी करून देते ज्याचा कार्यवाहक दुसरा तिसरा कोणी नसून दियाबल सैतान आहे. (१ करिंथकर २:१२) देवाचा विरोधी मोठ्या मत्सराने या जगाच्या आत्म्याचा—वरचढ होण्याच्या प्रवृत्तीचा—आपल्या ईश्वरी भक्तीला सुरुंग लावण्यासाठी उपयोग करतो.
हा जगाचा आत्मा आपली आध्यात्मिक शक्ती कशाप्रकारे क्षीण करू शकतो? डोळ्यांची वासना उत्तेजित करण्याद्वारे आणि आपल्यातील स्वार्थी भावनेचा फायदा घेण्याद्वारे हा आत्मा आपली आध्यात्मिक शक्ती क्षीण करतो. (इफिसकर २:१-३; १ योहान २:१६) आपण उदाहरणासहित तीन वेगवेगळ्या क्षेत्रांचा विचार करू जेथे जगिक विचार आपल्या आध्यात्मिकतेला हळूहळू विषबाधित करतात.
प्रथम राज्य मिळवणे
येशूने ख्रिश्चनांना आर्जवले, की ‘त्यांनी पहिल्याने राज्य व देवाचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटावे.’ (मत्तय ६:३३) दुसरीकडे पाहता, जगाचा आत्मा आपल्याला स्वतःच्या आस्था आणि सुखसोयी यांच्याकडे अनावश्यक लक्ष देण्यासाठी प्रवृत्त करू शकतो. आरंभिक धोका आध्यात्मिक आस्थांना एकदम धाब्यावर बसविल्याने नव्हे, तर त्यांना दुय्यम स्थान दिल्याने निर्माण होतो. सुरक्षेच्या खोट्या भ्रमामुळे आपण या धोक्याकडे कानाडोळा करू शकतो—कझाकस्तानमधील लोकांचे नेमके हेच झाले होते. विश्वासू सेवेची आपली वर्षे आणि आपल्या आध्यात्मिक भाऊ-बहिणींच्याप्रती आपली कदर यांमुळे आपल्याला असे वाटेल, की आपण कधीही सत्याचा मार्ग त्यागणार नाही. इफिस मंडळीतील अनेकांना कदाचित असेच वाटले होते.
सा. यु. ९६ च्या सुमाराला येशूने त्यांना खालीलप्रमाणे सल्ला दिला: “तू आपली पहिली प्रीति सोडली ह्याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे.” (प्रकटीकरण २:४) दीर्घकाळ सेवा केलेल्या या ख्रिस्ती लोकांनी अनेक संकटांना तोंड दिले होते. (प्रकटीकरण २:२, ३) प्रेषित पौलासारख्या विश्वासू वडिलांद्वारे त्यांना शिकवण्यात आले होते. (प्रेषितांची कृत्ये २०:१७-२१, २७) तथापि, त्यानंतर कित्येक वर्षांनी यहोवाप्रती त्यांचे प्रेम थंडावले आणि त्यांचा आध्यात्मिक आवेश देखील नाहीसा झाला.—प्रकटीकरण २:५.
कदाचित, इफिस शहरातील व्यापारीवादाचा आणि त्याची भरभराटीचा इफिसमधील काही रहिवाश्यांवर परिणाम झाला असावा. दुःखाची गोष्ट म्हणजे आजच्या सामाजिक भौतिकवादाच्या प्रवाहाने काही ख्रिश्चनांना आपल्यासोबत वाहून नेले आहे. ऐषआरामाची जीवनशैली प्राप्त करण्याच्या मागे हात धुऊन लागल्याने निश्चितच आध्यात्मिक उद्दिष्टांपासून आपले लक्ष विचलित होईल.—पडताळा मत्तय ६:२४.
या धोक्याविषयी इशारा देताना येशूने म्हटले: “डोळा शरीराचा दिवा आहे; ह्यास्तव तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल; पण तुझा डोळा सदोष [“मत्सरी,” तळटीप, NW] असला तर तुझे संपूर्ण शरीर अंधकारमय होईल.” (मत्तय ६:२२, २३) “निर्दोष” डोळा असा डोळा आहे जो आध्यात्मिक गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो, देवाचे राज्य नेहमी त्याच्या दृष्टिपथात असते. दुसऱ्या बाजूला पाहता, “सदोष” किंवा “मत्सरी” डोळा अगदी जवळच्या गोष्टी पाहतो, त्याला केवळ तात्कालिक भौतिक गोष्टींवर लक्ष केंद्रित करता येते. आध्यात्मिक उद्दिष्टे आणि भवितव्यातील प्रतिफळे त्याच्या समजेच्या पलीकडची असतात.
त्याआधीच्या वचनात येशूने म्हटले: “जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मनहि लागेल.” (मत्तय ६:२१) आपले मन आध्यात्मिक गोष्टींकडे आहे किंवा भौतिक गोष्टींकडे आहे हे आपल्याला कसे कळू शकेल? हे समजण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे आपले संभाषण होय, कारण ‘अंतःकरणात जे भरले आहे तेच मुखावाटे निघते.’ (लूक ६:४५) आपण एकसारखे भौतिक गोष्टींविषयी किंवा जगिक साध्यतांविषयी बोलत असल्याचे आपल्याला निदर्शनास आल्यास हे स्पष्ट आहे, की आपले हृदय विभाजित आहे आणि आपली आध्यात्मिक दृष्टी सदोष आहे.
कारमेन, ही स्पॅनिश बहीण तिच्या एका समस्येत गुरफटली होती.a “मी सत्यातच लहानाची मोठी झाले,” कारमेन सांगते, “वयाच्या १८ व्या वर्षी मी स्वतःची बालवाडी उघडली तीन वर्षांनंतर चार शिक्षिका या व्यवसायात मला येऊन मिळाल्या तसेच या व्यवसायाची चांगलीच भरभराट होत असल्यामुळे मला चांगले पैसे देखील मिळत होते. तथापि, मला एका गोष्टीचं समाधान लाभलं होतं, ती गोष्ट म्हणजे मी आता स्वतःच्या पायावर उभी होते आणि या व्यवसायात मी ‘यशस्वी’ झाले होते. खरं सांगायचं तर माझं मन या व्यवसायातच गुंतलं होतं—तो व्यवसाय माझ्यासाठी जीव की प्राण झाला होता.
“माझ्या या व्यवसायात जास्तीत-जास्त वेळ खर्च करूनही मी साक्षीदार राहू शकते, असे मला वाटत होतं. आणि दुसरीकडे, मी यहोवाची सेवा करण्यासाठी मला अधिकाधिक करणं शक्य आहे, या विचारानं माझं मन मलाच खात होतं. राज्य आस्थांना प्रथम स्थान देण्यासाठी ज्या गोष्टीनं मला प्रेरित केले ती गोष्ट म्हणजे पायनियर असलेल्या दोघा मैत्रिणींचे उदाहरण. त्यांपैकी एकीचे नाव ज्युलियाना होतं आणि ती माझ्याच मंडळीत होती. पायनियर कार्य करावं म्हणून तिने माझ्यावर कधीही दबाव आणला नाही, पण तिची संभाषणं आणि सेवाकार्यातून तिला मिळणारा आनंद पाहून मला माझ्या आध्यात्मिक मूल्यांबद्दल पुन्हा एकदा विचार करण्यास मदत मिळाली.
“काही काळानंतर, मी सुट्टीसाठी अमेरिकेत गेले होते त्यावेळी ग्लोरिया नामक एका पायनियर बहिणीकडे माझा मुक्काम होता. काही काळाआधीच ती विधवा झाली होती आणि तिच्या पाच वर्षांच्या मुलीची आणि कर्करोग झालेल्या तिच्या आईची जबाबदारी तिच्या खांद्यावर येऊन पडली होती. तरी देखील ती पायनियर कार्य करत होती. तिचं उदाहरण आणि सेवाकार्याप्रती तिची मनःपूर्वक कदर या गोष्टींनी माझ्या हृदयाला स्पर्श केला. तिच्या घरी मी केवळ चार दिवस राहिले पण त्यामुळे यहोवाला माझं सर्वोत्तम देण्याचा निश्चय करायला मी प्रवृत्त झाले. पहिल्यांदा मी नियमित पायनियर झाले आणि काही वर्षे उलटल्यानंतर मला आणि माझ्या पतीला बेथेलमध्ये काम करण्यासाठी बोलावण्यात आलं. त्यानंतर माझ्या आध्यात्मिक प्रगतीला अडथळा असलेला व्यवसाय मी थांबवला. आता मला वाटतं, की यहोवाच्या दृष्टीत माझं जीवन यशस्वी आहे आणि ही खरी महत्त्वाची बाब आहे.”—लूक १४:३३.
कारमेनप्रमाणे “अधिक महत्त्वपूर्ण गोष्टी” करण्याचे शिकल्यामुळे नोकरी, शिक्षण, निवास आणि जीवनशैली यांबाबतीत योग्य निर्णय घेण्यास मदत होईल. (फिलिप्पैकर १:१०, NW) परंतु मनोरंजनाची बाब येते तेव्हा देखील अधिक महत्त्वपूर्ण गोष्टी करण्याचे पसंत करतो का? हे दुसरे क्षेत्र आहे जेथे जगाचा आत्मा मोठ्या प्रमाणात प्रभाव पाडतो.
रिकामा वेळ योग्य स्थानी ठेवा
जगाचा आत्मा विश्रांतीबद्दलच्या आणि रिकाम्या वेळाबद्दल असणाऱ्या लोकांच्या स्वाभाविक इच्छेचा अगदी धूर्तपणे उपयोग करतो. अनेक लोकांना भवितव्याबद्दल खरी आशा नसल्यामुळे, हे समजण्याजोगे आहे, की ते त्यांच्या सध्याच्या समयात मनोरंजन आणि विश्रांतीशिवाय दुसरे काही करणार नाहीत. (पडताळा यशया २२:१३; १ करिंथकर १५:३२.) रिकाम्या वेळेला आपण अधिकाधिक महत्त्व देत आहोत का? जगाची विचारसरणी आपला दृष्टिकोन बदलत आहे, याचे ते एक चिन्ह असू शकते.
बायबल इशारा देते: “ज्याला ख्यालीखुशाली [“मनोरंजन,” लामसा] आवडते तो दरिद्री होतो.” (नीतिसूत्रे २१:१७) मजा करण्यात काहीएक गैर नाही, पण त्याच्यावर प्रेम केल्यामुळे, त्याला सर्वाधिक महत्त्व दिल्यामुळे आध्यात्मिक दारिद्र्य येईल. आपली आध्यात्मिक लालसा निश्चितपणे मंद होईल आणि आपल्याकडे सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी इतका वेळा राहणार नाही.
या कारणामुळे देवाचे वचन आपल्याला सल्ला देते, की “कार्यासाठी मनरूपी कंबर बांधून पूर्ण आत्मसंयमी व्हा.” (१ पेत्र १:१३, द न्यू इंग्लिश बायबल) आपला रिकामा वेळ जितका उचित आहे तितका वाजवी ठेवण्यासाठी आपल्याला आत्मसंयमाची गरज आहे. कार्यासाठी कंबर बांधणे म्हणजे आध्यात्मिक कार्यासाठी तयार असणे मग तो अभ्यास असो, सभा असो की क्षेत्र सेवा असो.
आवश्यक विश्रांतीबद्दल काय? आपण विश्रांतीसाठी वेळ काढतो तेव्हा आपल्याला अपराधी वाटण्याची गरज आहे का? निश्चितच तसे वाटण्याची गरज नाही. विश्रांती आवश्यक आहे, विशेषतः आजच्या धकाधकीच्या जगात. तथापि, समर्पित ख्रिस्ती या नात्याने आपण आपले जीवन रिकाम्या वेळेभोवतीच केंद्रित करू शकत नाही. अतिशय रिकामटेकडेपणा अर्थपूर्ण कामात कमीत-कमी भाग घेण्यासाठी आपल्याला आळशी बनवू शकतो. हा रिकामटेकडेपणा तातडीची आपली जाण आणखी कमी करू शकतो आणि आपल्याला तो भोगासक्तीकडे देखील घेऊन जाऊ शकतो. तर मग, आपण विश्रांतीच्या बाबतीत संतुलित दृष्टिकोन कसा बाळगू शकतो?
बायबल आपल्याला शिफारस करते, की विशेषतः ऐहिक काम अनावश्यक असल्यास अधिक दगदग करण्यापेक्षा थोडी विश्रांती घ्यावी. (उपदेशक ४:६) विश्रांतीमुळे आपल्याला उत्साहाची पुनःप्राप्ती होत असली तरी आध्यात्मिक सामर्थ्याचा उगम देवाची कार्यकारी शक्ती आहे. (यशया ४०:२९-३१) आपल्या ख्रिस्ती कार्यांसंबंधाने आपल्याला हा पवित्र आत्मा प्राप्त होतो. व्यक्तिगत अभ्यासामुळे आपल्या हृदयाची भरवणूक केली जाते आणि आपल्यातील योग्य आकांशा प्रेरित होतात. सभांना उपस्थित राहिल्यामुळे आपल्या निर्माणकर्त्याप्रती आपली कदर निर्माण होते. ख्रिस्ती सेवाकार्यात सहभागी झाल्याने इतरांबद्दल आणखी कळकळ वाटू शकते. (१ करिंथकर ९:२२, २३) पौलाने वास्तविकपणे वर्णन केले, “बाह्य देह क्षय पावत आहे, तरी अंतरात्मा दिवसानुदिवस नवा होत आहे.”—२ करिंथकर ४:१६.
इलियाना यांना सहा मुले आहेत आणि त्यांचा पती सत्यात नाही, आणि त्यांचे जीवनही फार धकाधकीचे झाले आहे. स्वतःच्या कुटुंबाची आणि इतर अनेक नातेवाईकांची त्यांच्यावर जबाबदारी आहे म्हणजे त्या प्रत्येक वेळी कोणत्या तरी कामात असतात. तथापि, प्रचार कार्यात आणि सभांची तयारी करण्यात त्या प्रशंसनीय उदाहरण मांडतात. ही सर्व कामे त्या कशा प्रकारे पार पाडतात?
“माझ्या इतर जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सभा आणि क्षेत्र कार्य मला खरोखरच मदत करतात,” इलियाना सांगतात. “उदाहरणार्थ, प्रचारकार्य करून घरी आल्यानंतर माझ्याकडे विचार करण्यासारखं पुष्कळ काही असतं. घरातील कामं करत असताना मी गात असते. उलटपक्षी मी सभा चुकवल्यास किंवा अगदी थोड्यावेळ क्षेत्र सेवा केल्यास, घरची ही कामं करता करता माझ्या नाकी नऊ येतात.”
रिकाम्या वेळेच्या कमालीच्या महत्त्वाशी किती विरोधाभास!
आध्यात्मिक सुंदरतेमुळे यहोवाला आनंद होतो
आपण अशा जगात जगत आहोत जेथे शारीरिक स्वरूपाला दिवसेंदिवस अधिकाधिक महत्त्व दिले जाते. अधिक चांगले दिसण्यासाठी आणि वाढत्या वयाच्या खुणा झाकण्यासाठी लोक उपचारावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करत आहेत. हेअर ट्रान्सप्लान्ट तसेच कलरींग, ब्रेस्ट इम्पालान्ट आणि कॉसमेटिक सर्जरी यांसारख्या गोष्टींचा यांमध्ये समावेश होतो. करोडो लोक वजन कमी करणाऱ्या केंद्रात, जिम्नॅझिअमला आणि एरोबिक क्लासला जातात किंवा व्यायाम करण्याचे व्हिडिओ टेप्स आणि आहारसंबंधी पुस्तके विकत घेतात. हे जग आपल्याला असा विश्वास बाळगण्यास भाग पाडते, की शारीरिक सौंदर्य आपल्या आनंदाचा पासपोर्ट आहे, आपले “स्वरूप” हेच सर्वकाही आहे.
न्युझवीक या नियतकालिकाने अमेरिकेत घेतलेल्या एका सर्वेक्षणात असे दिसून आले, की ९० टक्के श्वेतवर्णीय अमेरिकी किशोरवयीन “त्यांच्या शरीरयष्टीबद्दल असमाधानी आहेत.” चांगली शरीरयष्टी प्राप्त करण्यासाठी केलेल्या जीवघेण्या प्रयत्नामुळे आपल्या आध्यात्मिकतेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. डोरा यहोवाची तरुण साक्षीदार होती, तिला तिच्या शारीरिक प्रकृतीची लाज वाटत असे कारण तिचे वजन जरा जास्तच होते. “मी जेव्हा बाजारहाट करायला जायचे तेव्हा माझ्या मापाचे कपडे मला मिळत नसत,” ती म्हणते. “चांगले कपडे आणि सडसडीत मुली हे ठरलेलं गणित, असं मला वाटायचं. याहूनही वाईट गोष्ट म्हणजे लोक माझ्या वजनावरून मला टोमणे मारत असत आणि विशेषतः जेव्हा माझे आध्यात्मिक भाऊ-बहीण मला टोमणे मारत तेव्हा मी अगदी खचून जात असे.
“याचा परिणाम असा झाला, की मी माझं जास्तीत-जास्त लक्ष माझ्या स्वरूपाकडे देऊ लागले इतकं, की आध्यात्मिक मूल्ये माझ्या जीवनात दुय्यम स्थानावर गेली. मला असं वाटत होतं जणू सर्व आनंद माझ्या सडपातळ होण्यावर अवलंबून आहे. या गोष्टीला आता कित्येक वर्षे होऊन गेली आहेत आणि मी आता महिला आणि ख्रिस्ती या नात्याने प्रौढ झाले आहे तसेच गोष्टींकडे बघण्याचा माझा दृष्टिकोनही बदलला आहे. मी माझ्या स्वरूपाची काळजी घेत असले तरी मी हे पूर्ण जाणलं आहे, की आध्यात्मिक सुंदरता खरी महत्त्वाची आहे आणि त्यामुळे मला खरं समाधान मिळतं. हे एकदा मला कळल्यानंतर राज्य आस्थांना योग्य स्थानी ठेवणं मला शक्य झालं.”
सारा प्राचीन काळातील विश्वासू स्त्री होती. तिने संतुलित दृष्टिकोन बाळगला. खरे तर बायबल तिच्या शारीरिक सौंदर्याविषयी बोलते तेव्हा तिचे वय ६० पेक्षाही अधिक होते, बायबल तिच्या उत्तम गुणांकडे—अंतःकरणातील गुप्त व्यक्तित्वाकडे लक्ष आकर्षित करते. (उत्पत्ति १२:११; १ पेत्र ३:४-६) तिने सौम्य आणि शांत आत्मा प्रदर्शित केला आणि आपल्या पतीच्या अधीन राहून तिने त्याचे आज्ञापालन केले. इतर लोक तिच्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतात, याकडे तिने अनावश्यक लक्ष दिले नाही. ती श्रीमंत घराण्यातून आली होती तरी ६० पेक्षा अधिक वर्षे तंबूत स्वेच्छेने राहिली. तिने तिच्या पतीला नम्रपणे आणि निःस्वार्थपणे पाठिंबा दिला; ती विश्वासू स्त्री होती. त्यामुळे ती खरोखर सौंदर्यवती झाली होती.—नीतिसूत्रे ३१:३०; इब्री लोकांस ११:११.
ख्रिस्ती या नात्याने, आध्यात्मिक सौंदर्य खुलवण्यात आपल्याला आस्था आहे, हे सौंदर्य नियमितपणे खुलवल्यास त्यात वाढ होईल आणि ते टिकून देखील राहील. (कलस्सैकर १:९, १०) आपण मुख्यतः दोन प्रकारे आपल्या आध्यात्मिक स्वरूपाची काळजी घेऊ शकतो.
जीवन-रक्षक सेवाकार्यात आपण सहभागी झाल्यास आपण यहोवाच्या दृष्टीने अधिक सुंदर बनतो. (यशया ५२:७; २ करिंथकर ३:१८–४:२) याशिवाय, जसजसे ख्रिस्ती गुण प्रदर्शित करण्याचे आपण शिकतो तसतसे सौंदर्य खुलते. आपले आध्यात्मिक सौंदर्य खुलवण्याच्या अनेक संधी आहेत: “एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा; तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपणापेक्षा थोर माना. . . . आत्म्यात उत्सुक असा. . . . आतिथ्य करण्यात तत्पर असा. . . . आनंद करणाऱ्यांबरोबर आनंद करा आणि शोक करणाऱ्या बरोबर शोक करा. . . . वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. . . . सर्व माणसांबरोबर . . . शांतीने राहा.” (रोमकर १२:१०-१८) अशा प्रकारच्या प्रवृत्ती विकसित केल्याने आपण दोघांना अर्थात देवाला आणि सहमानवांना देखील प्रिय होऊ आणि यामुळे आपल्यातील पापमय प्रवृत्तींचे कुरूप स्वरूप कमी होईल.—गलतीकर ५:२२, २३; २ पेत्र १:५-८.
जगाच्या आत्म्याशी आपण लढू शकतो!
जगाचा हा विषारी आत्मा अनेक धूर्त मार्गांनी आपल्या सचोटीचा क्षय करू शकतो. आपल्याकडे जे काही आहे त्याविषयी हा आत्मा आपल्याला असमाधानी करू शकतो तसेच आपल्या स्वतःच्या गरजा आणि आस्था देवाच्या आधी ठेवण्यासाठी आपल्याला चिंताग्रस्त करू शकतो. किंवा हा आत्मा देवाच्या विचारांऐवजी मनुष्याच्या विचारांवर मन लावण्यासाठी प्रेरित करू शकतो, कदाचित आपण रिकाम्या वेळेला किंवा शारीरिक स्वरूपाला अनावश्यक महत्त्व देवू.—पडताळा मत्तय १६:२१-२३.
आपल्या आध्यात्मिकतेचा नाश करण्याचा सैतानाने चंग बांधला आहे आणि जगाचा आत्मा हे त्याचे एक प्रमुख हत्यार आहे. हे लक्षात ठेवा, की दियाबल त्याच्या क्लृप्त्या गर्जणाऱ्या सिंहापासून ते धूर्त सापापर्यंत बदलू शकतो. (उत्पत्ति ३:१; १ पेत्र ५:८) काहीवेळा हे जग ख्रिस्ती मनुष्याचा क्रूर छळ करून त्याच्यावर मात करते, पण बहुतेक वेळा ते त्याच्यामध्ये हळूहळू विष भिनवते. या दुसऱ्या धोक्याविषयी पौल अधिक चिंताग्रस्त होता: “जसे सापाने कपट करून हव्वेला ठकविले तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयीचे सरळपण व शुद्धता ह्यांपासून भ्रष्ट होतील असे मला भय आहे.”—२ करिंथकर ११:३.
सैतानाच्या लबाडीपासून आपल्याला स्वतःचे संरक्षण करायचे असल्यास ‘जगापासून असणाऱ्या’ प्रसाराला आपण ओळखले पाहिजे आणि नंतर त्याचा दृढपणे अव्हेर केला पाहिजे. (१ योहान २:१६) जगिक विश्वास निरुपद्रवी आहे, असा विचार करून आपण स्वतःची फसवणूक करून घेऊ नये. सैतानाच्या व्यवस्थीकरणाच्या या विषारी हवेने धोक्याची पातळी गाठली आहे.—इफिसकर २:२.
जगिक विचारसरणीला आपण एकदा ओळखल्यास आपली मने आणि अंतःकरणे यहोवाच्या शुद्ध शिकवणींनी भरण्याद्वारे आपण त्या विचारसरणीचा विरोध करू शकतो. दावीद राजाप्रमाणे आपणही म्हणून या: “हे परमेश्वरा, तुझे मार्ग मला दाखीव; तुझ्या वाटा मला प्रगट कर. तू आपल्या सत्पथाने मला ने, मला शिक्षण दे, कारण तूच माझा उद्धारक देव आहेस.”—स्तोत्र २५:४, ५.
[तळटीप]
a नावे बदलण्यात आली आहेत.
[२६ पानांवरील चित्र]
ऐषआरामाची जीवनशैली प्राप्त करण्याच्या मागे हात धुऊन लागल्याने आध्यात्मिक उद्दिष्टांपासून आपले लक्ष विचलित होऊ शकते